जन्मपत्रिका - मानो या ना मानो :-)

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 August, 2021 - 16:38

माझ्या जन्म झाला तेव्हा माझी जन्मपत्रिका काढली गेली. ती जन्म झाल्यावर लगेच काढली की दोनचार वर्षांनी ते आता आईला विचारावे लागेल. ती कुठली पद्धत वापरून काढली, कोणी काढली याची मला कल्पना नाही. पण जेव्हा जेव्हा घर आवरताना ती आईला सापडली तेव्हा तेव्हा मी ती कौतुकाने जरूर वाचली. प्रत्येकवेळी हेच लक्षात आले की त्यात जे जे लिहिले होते तेच जवळपास माझ्या आयुष्यात घडलेय.

उदाहरणार्थ, भावंडांचे फार सुख नाही.
आणि हो, खरेच की! मी एकुलता एक आहे Happy

पुढे प्रॉपर्टी वादात चुलत भाऊबहिणींच्या सुखालाही मुकलो ते कायमचेच Sad

मला स्वतःला किमान दोन अपत्ये होतील असे पत्रिकेत लिहिलेले. आतापर्यंत दोन तरी झाली आहेत. कन्यारत्नाचे सुख लिहिलेले. पहिली मुलगीच झाली. दोन्ही मुलांत जास्त लाडकी तीच आहे हे विशेष.

सरकारी नोकरी आणि सरकारी गाडीतून फिरण्याचा योग आहे असे लिहिलेले. खरे तर त्या काळात हे साधारण असावे, पण माझे शिक्षण होईस्तोवर काळ बदलला होता आणि मी त्याला अनुसरून ईंजिनिअरींग केल्यावर खाजगी नोकरीच करणार होतो, किंबहुना करतही होतो. पण अपघातानेच म्हणा, त्या खाजगी कंपनीत कामाला असताना तिथे माझा एक खास मित्र झाला. जसे दोन खास मित्र टॉयलेटला सुद्धा एकत्र जातात तसे तो एमपीएससी परीक्षेचा फॉर्म भरायला जात असताना निव्वळ त्याला सोबत म्हणून मी गेलो होतो आणि हीच सोबत कायम ठेवायला म्हणून अचानक मी सुद्धा परीक्षा द्यायचे ठरवले. तिथेच फॉर्म घेतला आणि दोन दिवसांनी मी सुद्धा भरला. पण नंतर सिलॅबस बघून मात्र कॉलेज सुटल्यावर पुन्हा अभ्यास करायच्या कल्पनेनेच जाऊ दे म्हटले.

पुढे परीक्षेच्या वीसेक दिवस आधी आठवडाभर आजारी पडल्याने तीच सुट्टी दोनेक आठवडे वाढवून आयत्या वेळी पुस्तकांची जमवाजमव करून जे विषय माझे चांगले होते त्याचीच रिवीजन करत परीक्षेला बसलो आणि शॉर्टलिस्ट झालो. ईंटरव्यू सुद्धा चांगला गेला. मधल्या काळात पत्रिकेत लिहिलेले मित्राला सांगितले. तो बिचारा नव्हता शॉर्टलिस्ट झाला. पण तो रोज मला म्हणायचा, "तुझे सिलेक्शन तर होणारच रे, तुझ्या पत्रिकेतच लिहीले आहे" .... आणि अखेर तसेच झाले. गडचिरोलीला का होईना आठेक महिन्यांची सरकारी नोकरी झाली. सरकारी गाडीत फिरायचाही योग जुळून आला.

करीअरबाबत अजून एक लिहिले होते ते म्हणजे मुलगा हुशार निघेल. वृत्तपत्रात फोटो झळकेल. शालेय जीवनातच चौथी आणि सातवीत स्कॉलरशिप परीक्षांच्या निमित्ताने वृत्तपत्रात फोटो झळकत ते देखील सत्य ठरले. आमच्या बिल्डींगमध्ये वा आमच्या घराण्यात असे होणारा मी पहिलाच मुलगा असल्याने ही देखील नक्कीच छोटी गोष्ट नव्हती जे तुक्का लागला असे म्हणू शकतो. जसे की विमानप्रवासाचा योग आहे असेही पत्रिकेत लिहिले होते, पण ते मात्र आजच्या काळात फार साधारण झाले आहे.

सध्या जो मला Crohn's Disease नामक आजार झाला आहे जो बरा होत नाही, फक्त कंट्रोल करू शकतो. त्याचाही पत्रिकेत उल्लेख आजाराचे नाव न घेता आयुष्यभराचा सोबती म्हणून अगदी समर्पक केलाय. तसेच शरीराचा नाजूक भाग म्हणून पोटाचा त्रास कायम सतावणार असेही लिहीले आहे, ते देखील खरेच ठरले आहे. कारण आजवर विविध आजारात माझ्या पोटानेच बरेच काही सहन केले आहे. याऊपर अजूनही ऊतार वयात अमुकतमुक काहीबाही चूटूरपुटूर वा प्राणघातक होईल असे नमूद केले आहे, पण ते कुठल्या स्वरुपाचे आजार असतील यावर भाष्य न करता केवळ वयाच्या कोणकोणत्या वर्षी होणार ईतकेच दिले आहे. त्यातून बचावलात तर सत्तरेक वर्षांचे आयुष्य जगाल असेही लिहिले आहे. पुन्हा पत्रिका शोधून चेक करायला हवे. पण नकोच ते आता. उगाच ती वयवर्षे आता लक्षात राहतील, आणि त्या काळात त्या भितीत जगणे होईल.

अरे हो, महत्वाचे तर राहिले. पत्रिकेत प्रेमविवाहही लिहिलेला. लहानपणी हे वाचून फार गुदगुल्या व्हायच्या. पण नंतर कॉलेज उरकल्यावर असे वाटले की प्रेमप्रकरणांच्या ऐवजी प्रेमविवाह असे चुकून छापले गेलेले की काय...
पण अखेरीस प्रेमविवाहच झाला. तो देखील बदलत्या काळाला अनुसरून ऑर्कुटच्या माध्यमातून झाला. विशेष म्हणजे जेव्हा आम्ही नवरा-बायको दोघेही अरेंज मॅरेजच्या तयारीला लागलेलो त्या वयात झाला. जेव्हा आमची ओळख झाली तेव्हा बायकोची काही स्थळेही बघून झालेली, त्या स्टेजला येऊन झाला. जणू काही जोड्या आकाशातूनच ठरवून येतात आणि त्या एकमेकांच्या जन्मपत्रिकेत लिहिल्या जातात Happy

पण जन्मपत्रिकेत लिहिलेली जोडी लग्नपत्रिकेत पोहोचायचा प्रवास सोपा नव्हता. आणि हे देखील माझ्या जन्मपत्रिकेतच लिहिले होते. प्रेमविवाहात अडचणी येतील असे स्पष्ट शब्दात लिहिले होते. आता आपल्याकडे प्रेमविवाह कधीच सुखासुखी होत नाहीत. पण तरीही पत्रिकेत मुद्दाम नमूद केलेले त्याचा मान राखत जरा जास्तच अडचणी आल्या. सोशलसाईटवरची ओळख आणि आंतरजातीय विवाह असल्याने घरच्यांच्या विरोधात जात रजिस्टर विवाह करावा लागला. पण त्यानंतरही घरचे तयार झाल्यावर दोघांची पत्रिका जुळवताच त्यात मृत्युयोग आला Happy

याऊपर माझ्या जन्मपत्रिकेत स्वभावावरही भाष्य केले होते. आता त्यात स्वभावातील चांगले गुण सोडून देऊया. कारण ते कुठल्याही नाक्यावरच्या ज्योतिषाने सांगितले तरी आपल्याला पटतातच. जसे की भाऊ तुम्ही फार स्वाभिमानी आहात बघा, कोणाचे दोन पैश्यांचे फुकटचे खाणार असा तुमचा स्वभाव नाही भाऊ.. तर आता कुठला भाऊ हे नाकारणार बोला Happy

पण पत्रिकेत लिहिलेले स्वभावातील दुर्गुणही पटण्यासारखे होते. जसे की शीघ्रकोपी. चटकन राग येणे आणि चटकन निवळणे. स्वभावातील हा दोष मी मान्यही करतो आणि नेहमी यावर कसा कंट्रोल राहील या प्रयत्नातही असतो. याऊपर अजून एक म्हणजे आरामाची आवड. हे बहुधा तुपात घोळवून लिहिले असावे. स्पष्ट भाषेत आळशी म्हणायचे टाळले असावे. पण काहीही लिहिले तरी आहे ते खरेच. माझे घरचे नावही "साळशीचा आळशी" असे आहे (साळशी आमचे मूळ गाव). तसेच शाळाकॉलेजच्या जमान्यापासून आजही मी ज्या ज्या ठिकाणी काम केले तिथे ऑफिसमधील सर्वात आरामप्रिय व्यक्ती म्हणून मीच ओळखला जातो.

शेवटचे मी पत्रिका पाहिलेली वा वाचलेली त्याला आता पाचसहा वर्षे झाली असावीत. घर बदलल्यापासून मी ईथे नवी मुंबईला आलो तर पत्रिका जुन्या मुंबईतच राहिली. अन्यथा नेमके शब्द, नेमकी वाक्ये लेखात टाकता आली असती. पण आज अचानक हे लिहावेसे वाटले कारण एका व्हॉटसपग्रूपवरच्या चर्चेत विषय निघाला तेव्हा माझ्या पत्रिकेतील हे मुद्दे तिथे लिहिणे झाले. त्यांनाच एकत्र करत मग हा लेख लिहिला.

गंमतीचा भाग म्हणजे हे असे असूनही माझा आजही पत्रिका वा भविष्य अश्या कुठल्याही प्रकारावर विश्वास नाही. मी देवधर्म काही मानत नाही. कुठला सणवार पाळत नाही. चालीरीती, कुळाचार, प्रथा-परंपरा वगैरे काही काही नाही.
पण तरीही माझ्या पत्रिकेत जे लिहिलेय ते बहुतांश माझ्या आयुष्यात घडलेय आणि म्हणूनच स्वत:ची पत्रिका वाचणे मला नेहमीच रोचक वाटत आलेय हे प्रामाणिकपणे कबूल करण्यात मला कसलाही संकोच वाटत नाही.

कुठलीही श्रद्धा अंधश्रद्धा पसरवायचा हेतू नाही. पण जे माझ्याबाबत आहे ते असे आहे. अब तुम लोग मानो, या ना मानो Happy

धन्यवाद,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरकारी गाडीत फिरायचाही योग जुळून आला.>>>> हुश्श!!!!!!!!!!!!!! मला वाटलं आता ह्या तुरूंगातून त्या तुरूंगात नेताना ऋन्मेष सुटका मोहिम करावी लागते का काय मायबोलीकरांना... ठीक आहे गडचिरोली तर गडचिरोली... Happy

छे हो सीमंतिनी, पत्रिकेत लिहिलेले सरळसोट आयुष्य जगतोय. तुरुंगात वगैरे जावे लागेल असे काही थ्रिल नाहीये त्यात. लिहीणाऱ्याने फारच रटाळ पत्रिका लिहिली आहे Happy

माझा आधी नव्हता विश्वास पण आज बसला.
तुझ्या अनुभवाने आणि मग हा माझा:
हा धागा वाचून मी माझी पत्रिका बघितली, ४० वर्षांनी. त्यात लिहिलं होतं "नामांकीत लोक पाय धरतील."
अपघाताने पावलाला इजा झाल्यापासून किमान सहा प्रख्यात ऑर्थोपेडिक सर्जन्स, तेवढेच प्रख्यात फिजिओथेरपीस्ट्स दोन पोडीऍट्रिस्ट्स लोकांनी माझे पाउल हातात घेऊन तपासले, अजूनही सुरूच आहे.

मानव Lol

पण माझी खरीच खरी आहे. कसलेही विनोदी संदर्भ न जोडता. काल रात्री हा लेख लिहिल्यापासून डोक्यात समांतर आणि स्वप्निल जोशीच घोळत होते, स्वप्नातही तसेच काहीसे दिसले... ऑन ए सिरीअस नोट, जर जन्मवेळ आणि ग्रहस्थिती तशीच असताना आणखी चाळीच वर्षांनी कोणी जन्म घेतला तर त्याची पत्रिकाही तशीच असेल का? आणि त्याच्या आयुष्यातही तसेच घडेल का... अर्थात थोड्याफार फरकाने. जसे समांतरमध्ये हडले. अर्थात ते डायरीत लिहिलेले म्हणून तसे जुळवता आले. पण पत्रिकाही अश्या समसमान / समांतर असू शकतीलच ना, फक्त त्या कोणी जुळवायला जात नाही.

छान लेख.
आता पत्रिका काढून तसंच घडलंय का आतापर्यंत हे पण पाहता येतं का?

गडचिरोलीला का होईना आठेक महिन्यांची सरकारी नोकरी झाली. >>>>म्हणजे mpsc करून तुला गडचिरोली ला नोकरी लागली पण ती तू सोडून दिलीस असा अर्थ आहे का???खरंच तसं असेल तर मात्र आता फेकाफेक खूपच जास्त होतेय हा.

जन्मवेळ ही मिनिटापर्यन्त लिहितात (सेकंदा पर्यन्त नाही.) गुगुलून पाहिल्यावर जगात दर मिनिटाला 267 बाळ जन्माला येतात असे दिसले. तर या सर्वांच्या पत्रिका जन्मवेळ आणि ग्रहस्थिती सारखी असून सारख्या नसणार, कारण जन्मस्थळ वेगळे असेल. आता जन्मवेळ मध्ये जसा लिस्ट काउंट १ मिनिट आहे तसा जन्मस्थळातील अक्षांश-रेखांशाचा लिस्ट काउंट किती माहीत नाही. त्या स्थळाच्या लिस्ट काऊंट दरम्यान त्या मिनिटामध्ये एका पेक्षा जास्त बाळ जन्माला आले तर त्यांचे आयुष्य समांतर असायला हवे. (की जन्मवेळ आणि स्थळ या व्यतिरिक्त अजून काही फॅक्टर्स आहेत पत्रिका बनवायला?)

@ मानव,
हे तर आता जाणकारच सांगू शकतात. नुसते आपली जन्मवेळ आणि स्थळ नाही तर ग्रहतार्‍यांची स्थितीही याला जबाबदार असू शकते. बाकी स्थळ काळाचा लीस्ट काऊंट घेतला तरी तो ईतक्या करोडो बालकांमधून कोण्या दोन बालकांच्या जोडीचा मॅच होणे ईतकेही अतर्क्य नसणार. अक्षांश रेखांशाच्या लीस्ट काऊंटमध्ये एकाच ऑपरेशन थिएटरमध्ये जन्माला येणार्‍या बाळांबाबत तर ते लीस्ट काऊंटला मॅच होणे अगदीच शक्य आहे.

अरे ग्रह ताऱ्यांची स्थिती तीच असणार ना जन्मवेळ (म्हणजे तारखेसह तीच तारीख( महिना-वर्ष सकट) आणि वेळ) आणि स्थळ तेच असले तर. त्यावरूनच तर ग्रह ताऱ्यांची स्थिती काढतात आणि पत्रिका बनवतात.

म्हणजे mpsc करून तुला गडचिरोली ला नोकरी लागली पण ती तू सोडून दिलीस असा अर्थ आहे का???खरंच तसं असेल तर मात्र आता फेकाफेक खूपच जास्त होतेय हा.
>>>>>>>

@ आदू,
यात फेकाफेक काय वाटली? किंबहुना का वाटली? गडचिरोलीला नोकरी लागणे अविश्वसनीय आहे की ती सोडणे अतर्क्य आहे की मी एमपीएससी पासच होऊ शकत नाही असे काही आहे..?

बाकी हा धागा वाचू शकता. हे माझे आयुष्यातले पहिलेवहिले लिखाण आहे. जर वरचे खोटे असते तर हे कधी लिहीता आलेच नसते Happy

माझी गडचिरोली सफर - एक थरारक अनुभव.
https://www.maayboli.com/node/33749

अरे ग्रह ताऱ्यांची स्थिती तीच असणार ना जन्मवेळ (म्हणजे तारखेसह तीच तारीख आणि वेळ)
>>
सर्वच ग्रहतार्‍यांच्या स्थितीला एका वर्षाचे सायकल लागू होत नसावे. बाकी पत्रिका काढताना काय कुठले ग्रहतारे बघतात याची कल्पना नाही.

माझी गडचिरोली सफर - एक थरारक अनुभव.>>>
हा पुढचा disclaimer ka आहे मग कथेत?
कथेतील सर्व पात्र, घटना काल्पनिक आहेत. त्याचा कुठल्याही जिवीत अथवा मृत व्यक्तीशी सार्धम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.
थरारक आहे पण..

मस्त. कुठल्याही विषयावर लिहायची हातोटी आवडली.
तुम्हाला पहिली ते दहावी मराठी विषयात छान मार्क्स पडत असतील ,निबंध, पत्रलेखन , उताऱ्यावरची गोष्ट वगैरे. मराठीच्या शिक्षकांना पण आवडत असेल.( मी हे उपरोधाने लिहील नाही . नोंद घ्यावी)

ते सरकारी गाडी वाचून आधी वाटलं कुठंतरी मित्रांशी पंगा घेऊन गाडीतून कुठं जावं लागलं की काय. याला कारण तुमचे जुने धागे .. माझ्या वाईट सवयी क्र १ ........ n
माझ्या पत्रिकेत असं समजेल अस काहीच लिहिलं नाहीये. अगम्य आकड्यात आहे नुसतं.
मानव Lol

म्हणजे mpsc करून तुला गडचिरोली ला नोकरी लागली पण ती तू सोडून दिलीस असा अर्थ आहे का???खरंच तसं असेल तर मात्र आता फेकाफेक खूपच जास्त होतेय हा.

>>>>mpsc करून dysp किंवा डेप्युटी कलेक्टर पोस्ट मिळणे अवघड असते, बाकी भरपूर पोस्ट्स असतात ज्या मिळतात पण लोक घेत नाहीत... माझा एक मित्र अमेरिकेत चार वर्षे राहून परत भारतात गेला होता mpsc करायला, झाला पास पण तलाठी पोस्ट मिळाली..
Apple मध्ये सॉफ्टवेर इंजिनेयर आणि नंतर तलाठी असा करियर मूव्ह नको म्हणून परत आला Happy
आता जो चौथी आणि सातवी स्कॉलरशिप मिळवू शकतो, vjti मध्ये ऍडमिशन मिळवू शकतो, mpsc पास केली असेल यात नवल काय.

ते सरकारी गाडी वाचून आधी वाटलं कुठंतरी मित्रांशी पंगा घेऊन गाडीतून कुठं जावं लागलं की काय. याला कारण तुमचे जुने धागे .. माझ्या वाईट सवयी क्र १ ........ >>>>>>>>>>>> अगदी अगदी वर्णिता... मला तर सिग्नल तोडा सिच्युएशन पण मनात आली.

@ एमपीएससी शंका कुशंका -

एमपीएससी मध्ये कलेक्टर वगैरे पोस्टसाठी सिविल सर्विसेसच्या जश्या एक्झाम असतात तसे आम्हा सिविल ईंजिनिअरसाठी ईंजिनिअरींग सर्विसेसची एक्झाम असते.
सिलॅबस म्हणून चार वर्षांच्या पुर्ण डिग्रीचा सिलॅबस आणि ६०० मार्कांची हात तुटेपर्यंत लिहायची परीक्षा होती. नंतर शॉर्टलिस्ट उमेदवारांचा ईंटरव्यू होतो. त्यातून मग असिस्टंट ईंजिनिअर ग्रेड वन आणि ग्रेड टू च्या पोस्ट निघतात - PWD आणि Irrigation Department - माझी पोस्टींग PWD Department मध्ये झाली होती.

माझे आधी मेरीटनुसार एका नंबरसाठी ग्रेड वन गेलेले. ग्रेड टू च्या ओपन कॅटेगरी लिस्टमध्ये मी पहिलाच होतो. त्यामुळे सहा-आठ महिन्यांनी वॅकेन्सी निघताच मी ग्रेड वन झालो. पण मला महाराष्ट्रभर कुठेही जॉब करावा लागणार , आणि ते मला जमणार नाही हे एव्हाना माझ्या लक्षात आलेले. कारण त्या आधी मी असिस्टंट ईंजिनिअर ग्रेड टू पोस्टवर गडचिरोलीला आठ महिने जॉब केला होता.

थेट ग्रेड वन झालो असतो तर गडचिरोलीला गेलोच नसतो, कारण ग्रेड वनला वर्षभर मुंबई-नागपूर-पुणे-नाशिक वगैरे चारही विभागात तीन तीन महिने ट्रेनिंग म्हणून फिरवतात. आठ महिन्यांनी वॅकेन्सी निघत मी ग्रेड वन झाल्यावर मला पुन्हा वर्षभर तसे फिरावे लागणार होते. आणि मग कुठे मिळेल ती पोस्टींग.

ग्रेड वन झाल्यावर जॉब प्रोफाईल, मान मरातब छान मिळेल हे गडचिरोलीचे ग्रेड वनचे साहेब बघून कळलेले. ते बघून माझी बायकोही प्रभावित झालेली. झाल्यास पैश्याची कमाईही भरपूर असावी. कारण तिथे जे ग्रेड टू च्याही खालच्या पोस्टवर काम करायला ईंजिनिअर होते (जे एमपीएससी परीक्षेने निवडले जात नाहीत) त्यांच्याच भल्यामोठ्या बंगल्यावर मी पेईंग गेस्ट म्हणून राहत होतो. पण तरीही कुठेही पोस्टींग होणारा हा जॉब माझ्या आरामाच्या पिंडाला परवडणारा नाही हे मला कळले होते. तसेच सतत विविध स्तरातील लोकांशी संपर्क साधणे माझ्या माणूसघाण्या स्वभावालाही जमणार नव्हते. म्हणून मग अखेर जॉब सोडायचा निर्णय घेतला.

असो, वर जी गडचिरोली सफरची लिंक दिली आहे त्यात काल्पनिकचे डिस्कलेमर टाकले आहे कारण त्यात नक्षलवाद्यांचा उल्लेख केला आहे. उगाच कुठे फसायला नको. त्यातले काय खरे काय खोटे हे तिकडे वाचूनच ठरवा, ती चर्चा ईथे नको. धागा जन्मपत्रिकेचा आहे ओ Happy

तुम्हाला पहिली ते दहावी मराठी विषयात छान मार्क्स पडत असतील ,निबंध, पत्रलेखन , उताऱ्यावरची गोष्ट वगैरे. मराठीच्या शिक्षकांना पण आवडत असेल.
>>>>>>
कुठल्याही भाषा विषयात मला मार्क्स छान नाही पडायचे. पण येस्स, माझे निबंध मात्र बाई वर्गात वाचून दाखवायच्या. अ‍ॅक्चुअली मलाच वाचायला लावायच्या, कारण माझे अक्षर मलाच वाचता यायचे. पण ते आदर्श निबंध म्हणून नाही, तर मी त्यात काहीच्या काही किस्से कहाण्या भरून कल्पनाविस्तार करायचो त्याने मुलांचे मनोरंजन व्हायचे. जरा मौजमजा विरंगुळा म्हणून तो कार्यक्रम असायचा ... आणि शेवटी बाई म्हणायच्या - निबंध असा नसावा Wink

मुहूर्ताबद्दलही माझी अशीच शंका आहे. मुहूर्ताची वेळ एकच असणार ना? म्हणजे समजा भारतात ४ वाजता सकाळी शुभमुहूर्त आहे तर त्या वेळी संध्याकाळी अमेरीकेत तो मुहूर्त असणार बरोबर?

हा धागा वाचून मी माझी पत्रिका बघितली, ४० वर्षांनी. त्यात लिहिलं होतं "नामांकीत लोक पाय धरतील."
अपघाताने पावलाला इजा झाल्यापासून किमान सहा प्रख्यात ऑर्थोपेडिक सर्जन्स, तेवढेच प्रख्यात फिजिओथेरपीस्ट्स दोन पोडीऍट्रिस्ट्स लोकांनी माझे पाउल हातात घेऊन तपासले, अजूनही सुरूच आहे. >>> हाहाहा.

हो, लिहायचा मला फार आळस आहे. पण हे टायपिंग फार सोयीचे पडते.
बाकी माबोवर धागे काढणे माझा छंद आहे. आणि छंद तोच जो जोपासायला कोणी आळस करत नाही.

Pages