वाचलास रेsssss वाचलास ! [भाग ७]

Submitted by 'सिद्धि' on 30 August, 2021 - 01:46

{ भाग १ - https://www.maayboli.com/node/79721 }
{ भाग २ - https://www.maayboli.com/node/79743}
{ भाग ३ - https://www.maayboli.com/node/79771 }
{ भाग ४- https://www.maayboli.com/node/79792 }
{ भाग ५- https://www.maayboli.com/node/79801 }
{ भाग ६- https://www.maayboli.com/node/79830 }

-------------------------------------

'मिसेस कारखानिस नी हसत हसत रक्षाचे स्वागत केले. तिचे येणे म्हणजे खरं तर त्यांच्यासाठी सुखद धक्का होता. दोघी खूप दिवसांनी फार मनमोकळेपणाने बोलल्या. अभिमन्यूची काळजी होतीच, एवढ्या दिवसांनी दोघींची भेट झाली आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला होता. तोपर्यंत अभिमन्यू देखील त्यांच्या बैठकीत सामील झाला. चहापान उरकून त्या भूतकाळातून वर्तमानकाळात आल्या तेव्हा त्यांची मुद्रा फार चिंताग्रस्त वाटली. म्हणून रक्षाने देखील विषय बदलला. ती अभिमन्यूच्या येणाऱ्या नवीन कादंबरी विषयी बोलू लागली.'

" अभि, कुठपर्यंत आली तुझी प्रेमकथा? "

" संपेल काही दिवसात, तशी थोडीच राहिलेय, पण लिखाणात म्हणावे तसे मन लागत नाही ग. "

" अरे अभि, तू चक्क प्रेमकथा लिहितोस? मी तर फक्त भयकथा लिहिणारा म्हणूनच तुला ओळखते. " मिसेस कारखानिस सहज बोलून गेल्या.

" काकू, याच्या कथा तुम्ही वाचल्या आहेत का? " हातातील रिकामी डिश खाली ठेवत रक्षा म्हणाली.

" वाचते म्हणजे, मला एवढा वेळ कुठे असतो. पण याची ती सुप्रसिद्ध कादंबरी वाचलेय हो मी. काय भीतीदायक लिहितो हा. "

" मम्मा त्याला फार वर्षे झाली, त्यानंतर माझी शंभर एक पुस्तक छापली गेली असतील. " तो हसत हसत म्हणाला.

" नको रे बाबा, एक कथा वाचली तेव्हा फार घाबरून गेले होते. त्यानंतर तुझ्या भयकथा वाचण्याची माझी हिम्मत झाली नाही. हं, पण प्रेमकथा लिहितोयस तर नक्की वाचेन हं. शेवट गोडं कर म्हणजे झालं. "

" काकू कोणती होती ती कथा? आणि तुम्ही घाबरण्यासारखं काय होत एवढं ? " काहीतरी गवसल्यासारखे सावधपणे रक्षा त्या कथेविषयी माहिती काढू लागली.

" सोड ना तू पण, काय घेऊन बसतेस. मम्मा तुला कारखान्यात व्हिजीटसाठी निघायचं होत ना, उशीर करू नको, नाहीतर पप्पा पुन्हा रागवतील. " अभिमन्यू विषयाची टाळाटाळ करत उठला.

" अरे हो. मी निघते, तुम्ही दोघे बोलत बसा. तसाही मला उशीर झालाय. " हातातील पर्स आणि फाइल्स घेऊन मिसेस कारखानिसनी निघण्याची तयारी करू लागल्या.

" काकू सांगा ना, कोणती होती ती कादंबरी? " रक्षा आपल्या मुद्द्यावर आडून होती.

" काय बर ती... आठवत नाही गं. नक्की आठवत नाही. काही तरी 'वाडी...' असं नाव होत." दारातून बाहेर पडत असताना त्या बोलत होत्या.

" मु.पो.जांभूळवाडी... ? " चाणाक्ष रक्षा चटकन बोलून गेली. आणि तिच्या वाक्यासरशी बावरलेला अभिमन्यू गर्रकन मागे वळला.

" होय ग, बरोबर हेच नाव आहे. चलो बाय, आल्यावर बोलू. "
टाटा-बायबाय करून त्या घराबाहेर पडल्या आणि रक्षाने आपला मोर्चा अभिमन्यूकडे वळवला. " तुझी लायब्ररी कुठे आहे दाखव. मला ती कथा वाचायची आहे. "
त्याच्या उत्तराची वाट न पाहता ती तरातरा जिने चढून वरच्या मजल्यावर आली. अभिमन्यूही तिच्या मागून धावत वरती आला. पण त्याला काही समजण्याच्या आत बेडरूममध्ये दिसेल ते कपाट उघडून तिने पुस्तक चाळायला सुरुवात केली होती. रक्षाला थांबवणे आता कोणाच्याही हातात नव्हते, त्या रूममध्ये हळूहळू पुस्तकांचा ढीग सर्वत्र विखुरला गेला. "कुठे आहे ती कथा ? इथे....नाही, तिथे....नाही." तिची सुरु असलेली असंबंध बडबड, सोबत अस्ताव्यस्त पसरलेला ढिगारा, पुस्तकंच-पुस्तकं , त्यातच स्टेशनरी साहित्य, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू, सगळे आलेले गिफ्ट्स, विखुरलेले कपडे आणि जुन्या फोटोचे अल्बम्स सगळा पसारा उपसून झाला होता. पण पाहिजे असलेले काही तिच्या हाती लागले नाही. तेव्हा ती मटकन तिथेच बेडवर बसली. एका कोपऱ्यात उभाराहून बघत असलेला अभिमन्यू तिच्या शेजारी येऊन बसला.

" तू शेधत आहेस ती कथा इथे नाही. ते छापील पुस्तक मी माझ्याकडे ठेवलेलं नाहीय. होय पण त्याचे कच्चेचिटठे, रफ लेखन माझ्या डायरीत आहे... "

तो पुढे बोलणार एवढ्यात ती ओरडलीच. " आणि ती डायरी तू त्या घाटात सोडून आलेल्या बाईकच्या डिक्कीत आहे. बरोबर ना ? "

" होय." तो मन खाली घालून म्हणाला.

" म्हणजे तुला माहित होत. हे सगळं त्या जुन्या कथेमुळे घडत आहे. आणि तू हे माझ्यापाहून लपवून ठेवलास. यापुढे मी तुझी काहीही मदत करणार नाही. बाय. " तिचा राग अनावर झाला होता. आता ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती सरळ उठून ती बाहेर निघाली.

" रक्षा थोडा वेळ दे. मी सगळं सांगतो. प्लिज. " तिला अडवण्याचा पर्यंत करत तो हि तिच्या मागे-मागे हॉल मध्ये आला.

" बोल. सगळं खरं आणि स्पष्ट... काहीही न लपवता. "

" माझी ती कथा सात वर्षापूर्वीची, मु.पो.जांभूळवाडी यामध्ये मी जांभूळवाडी या एका काल्पनिक गावात घडलेल्या अघटित घटनांवर कथा लिहिली होती. दुर्दैव असे कि, त्या तंतोतंत घटना काही दिवसांनी सत्यात उतरल्या, मुख्य म्हणजे तो ट्रेन अपघात मी जसा माझ्या कथेत उतरवला तसाच तिथे प्रत्यक्ष घडला, माझ्या कथेमध्ये जे प्रसंग होते ते बहुतांशी त्या गावी घडून गेलेत. पण हे मला आता समजलं, कारण मागे काही दिवसांपूर्वी मी त्या गावात जाऊन वेष बदलून राहून आलोय."

" बरं, मला कथेची सुरुवात आणि शेवट सांग? "

" कथा थोडक्यात सांगतो, एका गावात रेल्वे स्टेशनचे बांधकाम सुरु करण्यासाठी गरीब आदिवासी लोकांची जमीन जबरदस्तीने बळकावली जाते, त्या बदल्यात त्यांना काहीही मिळत नाही. मग सुरु होते, मृत्यू सत्र... त्यातील काही लोक आत्महत्या करतात, आणि आत्मे बनून बदला घेतात, ज्या दिवशी स्टेशनचे बांधकाम संपुष्ठात येते आणि ट्रेन सुरु होते, त्यादिवशी स्टेशन ऑफिसचे सामान घेऊन आलेली एक मालगाडी उलटवून लावली जाते, या घडवून आणलेल्या अपघातामध्ये स्टेशनवरील सगळे नोकरवर्ग आणि अधिकारी सापडतात आणि स्टेशन नेस्तनाबूत होते, त्यापुढे ते स्टेशन केव्हाही चालू होत नाही. आणि कथा संपते. "

" हि सेम घटना तिथे घडली होती हे मलाही माहित आहे. म्हणजे त्यानंतरच लोक तुझ्या या कथेवर भडकले तर? सत्य घटना म्हणून."

" तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे माझी ती डायरी... " अभिमन्यू पुढे बोलू लागला.

" आता तिचं का? "

" मी खूप कथा, कादंबऱ्या लिहिल्या आहेत, बऱ्याच वेळा समाजात घडत असलेल्या घटनांवर लिहायचो, आणि त्या प्रसिद्ध हि व्हायच्या यामुळे माझे शत्रू, जे लेखक आहेत पण स्वतःला माझे स्पर्धक मानतात, ते माझ्या कथांचा कुठेही घडणाऱ्या सत्य घटनांशी संबंध जोडून माझी उगाचच बदनामी करायचे. "

" बरोबर, कारण तू रोज डझनभर कथा लिहायचास त्यातली एखादी तरी कुठल्या सत्य घटनेशी मिळती जुळती होऊ शकते, पण त्याचा इथे काय संबंध ? "

" खरं सांगायचं तर, मी फक्त त्या डायरीत लिहिलेल्या कथाच खऱ्या होतात. " तो हळू आवाजात बोलला.

" म्हणजे " ती पुन्हा जवळजवळ ओरडली.

" ती डायरी विशेष आहे, त्यात मी फक्त दोन कथा लिहिल्या एक 'मु.पो. जांभूळवाडी', आणि दुसरी 'नदीघाटातील रहस्य' जी अजून अपूर्ण आहे. "

" एक, एक मिनिट... म्हणजे तू काही दिवसांपूर्वी तिथे राहायला गेलास तेव्हा तुला समजलं कि तू लिहिलेली ती जांभूळवाडी कथा खरोखर सत्य झाली होती, तेव्हा जाणून बुजून तू त्याच ठिकाणवरून दुसरी कथा लिहायला घेतलीस. ते पण स्वतःला मध्यस्थी ठेवून... बरोबर? "

" शंभर टक्के अचूक ओळखलस. मी मुद्दाम लिहीत असलेली कथा दुसऱ्या रात्री खरी ठरली आणि सलीम त्यात अडकला. मी फक्त माझ्यावरतीच कथा लिहिली असती तर बरं झालं असतं. तो अडकला, आणि मी हि घाबरलो होतो, त्यामुळे मी माझी डायरी सुध्या तिथेच सोडून तिथून पळ काढला. नाहीतर मी त्या डायरीचा आणि सगळ्या कथेचा शेवट करणार होतो. तसही गेल्या काही वर्षात मला खूप वाईट अनुभव येत होते, कोणीतरी सतत माझा पाठपुरावा करत असतं. ती वाईट स्वप्न, माझे वेडाचे झटके या सगळ्यातून सुटका करून घेण्यासाठी, त्याची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी मी त्या गावी गेली होतो, पण आता काहीतरी नवीनच गोष्टी सुरु झाल्या आहेत. ज्याला थांबवणे बहुदा माझ्या हातात राहिलेले नाही."

" ती डायरी कोणी दिली होती कि तू विकत घेतली होतीस? आणि कुठून ? तिचा काही इतिहास आहे का रे? " रक्षाने प्रश्न केला.

" आपला कॉलेजचा शेवटचा दिवस आठवतो? त्या दिवशी आपण सगळे फ्रेंड्स एकमेकांना आठवण म्हणून भेटवस्तू दिल्या होत्या. एक कादंबरी म्हणून माझी फ्रेंड होती. ती सुद्धा लेखक होती, तिने दिलेले गिफ्ट आहे ती डायरी..." अभिमन्यू सांगताना थोडा भूतकाळात गढून गेला.

" तुझे काय बाबा, खूप सारे फ्रेंड्स होते, नावाजलेला लेखक ना तू, कादंबरी, हु ,,, एवढी काय आठवत नाहीय मला... ती आता कुठे असते? आय मिन आता तुला तिची काही माहिती आहे का? किंवा काही कॉन्टॅक्ट? "

" सध्या मी सगळ्यांपासून लांब आहे. त्यामुळे काहीही माहिती नाही. " तो त्याच्या विचारात अजूनच गढून गेला होता . हे रक्षाच्या लक्षात आलं, त्यामुळे ती देखील शांत बसली.

-------------------

क्रमश:
©सर्व हक्क लेखिकेस्वाधिन
https://siddhic.blogspot.com

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धनवन्ती प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
पुढचा भाग शेवटचा आहे, एकत्र केलं तर सरमिसळ होईल, वाचताना गोंधळ व्हायला नको म्हणून हा भाग थोडा छोटाच ठेवला आहे.
तरीही शेवटी काही ओळी नव्याने जोडल्या आहेत, त्या पाहाव्या. Bw