वाचलास रेsssss वाचलास !

Submitted by 'सिद्धि' on 9 August, 2021 - 02:16

{वाचलास रेsssss वाचलास ! - ही माझी एक छोटी कथा आहे. भयकथा असली तरीही यात सस्पेन्स आणि प्रेम दोन्ही गोष्टी असल्याने वाचक निराश होणार नाहीत. आजपासून दोन दिवस आड यातील नवा भाग प्रकाशित करण्यात येईल. अपेक्षित लेखनदुरुस्ती तसेच आवश्यक सुधारणा नक्की सुचवा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. }

----------------------
'पॉssssssss.... रात्री १२:४० ची शेवटची लोकल निघून गेली. बाहेर रस्त्यावर २० वर्षे जुनी फटफटी वाट बघत होती. किक मारताच गाडीत भरलेल्या रॉकेलची साक्ष म्हणून, ढीगभर धूर परिसरात सोडून, उरलेल्या ब्रँडीचे दोन घोट पोटात टाकत, मी तशाच भिजलेल्या बेलबॉटम मध्ये बाटली कोंबली आणि तोऱ्यात निघालो... चांगलीच किक बसली होती, फटफटीला पण आणि मला पण.'

आठ-दहा पावलांवर कोणी तरुणी पावसात आपली छत्री सरळ करताना पाहून मला पुढे जावेना. तेवढाच विरंगुळा... आणि ती तरुणी, अर्थातच सुंदर तरुणी.
"पुराणी ब्रँडी आणि गळ्यात रुमाल,
चिंब पावसाळी निशा.
फाटकी बेलबॉटम आणि फटफटी रॉकेल वाली.
समोर उभी ती...जणू अप्सरा नखशिखांत भिजलेली."

“वाह्ह वाह।” {मी… माझे… मलाच.}
माझ्यातला कवी क्षणात जागा झाला. चार शब्दाची बळेच जुळवा-जुळव करून, एक चार ओळी रचुन करकचून ब्रेक लावला.
"काही मदत हवी आहे का? " {अगदी अगदी फिल्मी स्टाईल. }

तिने एक तिरकस कटाक्ष माझ्याकडे टाकला. गाडीतून निघणाऱ्या धुराकडे आणि नंतर माझ्या त्या गलिछ अवताराकडे तुच्छतेने बघून, नाक मुरडत पुढे निघाली.

"आयला, मी एवढा वाईट दिसतो?"
त्या शेक्सपिअर ने 'नावात काय आहे'? या पेक्षा 'दिसण्यात काय आहे?' असा डायलॉग मारायला हवा होता. असा विचार माझ्या मनात येतो न येतो, तोच हा निव्वळ माझा गैरसमज आहे, हे मला लक्षात आले. कारण जात जात ती मला ऐकू येईल अश्या आवाजात पण पुटपुटत म्हणाली होती.
"बेवडा कुठला."

"वा ... म्हणजे मी तेवढा वाईट दिसत नाही तर. चला, हे ही नसे थोडके."
मला हायसे वाटले. तिचा बेवडा शब्द ऐकताक्षणी मला माझ्या बाटलीची आठवण झाली. झटक्यात बाहेर काढून सगळी फटक्यात गट्टम करून टाकली .
"स्वाहा...
दर्द ए जिंदगी में, बस तुही एक सहारा हैं.
और एक गम हैं, जो सदियोंसे हमारा हैं."

माझी उस्फुर्त शायरी विनाकारण बाहेर पडली. नेहमीप्रमाणेच.

“बाई फार चांगल्या होत्या... म्हणजे, फारच चांगल्या होत्या... दिसायला..."

पुन्हा गाडीला किक मारून मी तिच्या मागेमागे निघायाच ठरवलं. एवढ्या सुमसान रस्त्यावर एकटीच ती, मनाला काही बारं वाटेना, ते ही उगाचच… एव्हाना मागून येणाऱ्या एका आलिशान पांढऱ्याफट कारला हात दाखवत ती आत जाऊन बसली देखील, आतमध्ये बसलेला एक तरुण असा गोरा-गोमटा इसम स्पष्ट दिसत होता. कदाचित मला घाबरून ती त्या गाडीत बसली असावी , मी पुन्हा खजील होऊन आपला स्वतःचा रस्ता पकडला.

'जेमतेम दहा मिनिटे झाली असावी. एका वळणाला मी माझी फटफटी डावीकडे घेतली. ती सफेद कार सरळ समोर निघून गेली. का कोण जाणे, मला ओरडलया सारखा आवाज आला, खरं-खोट माहित नाही. कसलाही विचार न करता मी माझी फटफटी पुन्हा वळवून त्या गाडीचा पाठलाग करू लागलो. दोन घोट चढवून डोक्यात फारच हवा भरली होती त्याचा परिणाम. जसा त्या गाडीतून ओरडण्याचा आवाज येई तसा मी अजून वेगाने मोटार पळवत होतो. बराच वेळ पाठलाग असाच चालू होता. एक आलिशान ह्युन्दाईची कार आणि माझी जुनी-पुरानी फटफटी... जवळजवळ अशक्य पाठलाग.'

' सुमारे अर्ध्या तासाने अचानक त्या गाडीचा वेग कमी कमी होऊ लागला, संधीचा फायदा घेऊन मी त्या गाडीच्या सरळ पुढे माझी गाडी आडवी केली. दोन्ही गाड्या जागच्या जागीच थांबल्या होत्या. इकडे-तिकडे न बघता त्या पोराला गाडीतुन बाहेर ओढलं. तो आधीच रक्तबंबाळ झाला होता. शर्टची बटने तुटली होती. नखांचे ओरबडे अंगावर स्पष्ट दिसत होते.'
"साल्या. भर रस्त्यात मुलीची छेड काढतोस. बघतोच तुला." मी थोडी रजनीकांत स्टाईल मारत त्याला ठोकणारचं होतो. उगाच त्या मुलीला शायनिंग दाखवावी. तेवढेच इम्प्रेशन म्हणून मी तिच्या दिशेने त्याला कॉलर धरून सरळ वरती उचलले. आणि माझी दातखिळी बसली.

'गाडीच्या बंद दरवाज्यातून तशीच आरपार बाहेर पडून ती बाजूला असणाऱ्या नदी घाटाकडे निघाली, तशीच पाठमोरी तिची मान गर्रकन मागे वळली, एक छद्मी हास्य आपल्या विद्रुप चेहऱ्यावर दाखवत दुसऱ्याच क्षणी डोळे विस्फारून तिने त्या गोऱ्या पोराकडे पहिले, आणि मोठयाने ओरडून आम्हाला दिसेनासी झाली.'
"वाचलास रेsssss वाचलास !"

क्रमश:
©सर्व हक्क लेखिकेस्वाधिन
https://siddhic.blogspot.com

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

अय्यो!!
उत्कंठा वाढली आहे आता.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

छान सुरूवात

पण काही टायपो आहेत
एवढ्या सुमसान रस्त्यावर एकटीच ती, मनाला काही बार वाटेना >>>> बरं वाटेना

रस्तावर >>> रस्त्यावर / रस्त्यात ?

रश्मी. देवभुबाबा, @Shraddha , सामो , प्राची , अजिंक्य , आसा , च्रप्स - सगळ्यांचे आभार.
कथा वाचताय म्हणजे, बरं वाटलं...
आज दुसरा भाग टाकतेय.

आसा थॅक्स, दुरुस्ती केली आहे.