तळजाईचा भूतबंगला

Submitted by अदित्य श्रीपद on 7 August, 2021 - 22:46
#तळजाईचा_भूतबंगला

taljai2.jpgतळजाईचा भूतबंगला
मी लहान असताना आम्ही पर्वती पायथ्याशी राहायचो तर मावशी सहकारनगर इथे रहायची त्यामुळे तिच्याकडे नेहमी जाणे येणे होत असे. सहकारनगरला मुक्तांगण बालरंजन केंद्राचे जे मैदान आहे त्याच्या मागील बाजूने जाणारया रस्त्याच्या उजव्या बाजुला असणाऱ्या बंगल्यांच्या रांगेतील शेवटचा-लेण्याद्री बंगला म्हणजे मावशीचे बिऱ्हाड.तिच्या घरासमोरून तळजाई टेकडीची मागील बाजू दिसे आणि मुख्य म्हणजे भूतबंगला दिसे. १९८०-८३ चा काळ तो! तेव्हा सहकारनगरला वस्ती आणि रहदारी कमीच होती. मावशीच्या घरासमोरच्या रस्त्यावर अगदी मंद असे ट्यूब लाईटचे पथदिवे होते. त्यांचा मिणमिणता अपुरा प्रकाश, मधूनच एखादी फडफड करणारी खराब ट्यूबलाईट ह्यामुळे दिवेलागणीच्या वेळी तो रस्ता अगदी भेसूर दिसे. अशात समोर अंधारात बुडत चाललेला निर्जन ओसाड असा भूतबंगला पाहून आम्हा लहान मुलाना अगदी भीती वाटे. त्याला भूतबंगला का म्हणत? तेथे काही घडले होते का? ह्याबाबत मीअनेक आख्यायिका ऐकल्या होत्या पण त्यापैकी माझ्या मोठ्या मावस बहिणीने सांगितलेली कथा मला अगदी चांगली आठवत्ये. एकदा असेच आम्ही मामे-मावस भावंड मावशीकडे जमलो असताना तिच्या घराच्या पायरीवर बसून तिने आम्हाला, एका मराठी सरदाराने एका आवडत्या नाचणाऱ्या बाई करता तो बंगला बांधला होता आणि तिथे तिचा खून झाल्यावर तिचा अतृप्त आत्मा तिथे वावरतो त्यामुळे तो बंगला ओसाड पडलाय अशी गोष्ट अगदी रंगवून सांगीतली होती. ती गोष्ट सांगत असतानाच टेकडीवरून किणकिण-टीण टीण असा लयबद्ध आवाज येताना आम्ही सगळ्यानी अगदी स्पष्ट ऐकला (आणि चांगलेच घाबरलो )आणि हा त्या नाचणारणीच्या पायातल्या घुंगरांचा आवाज आहे आणि ह्या वेळी रात्री किंवा बारा वाजता असा तो मधून मधून येतो हे बहिणीने अगदी गंभीर चेहरा करून सांगितले. ह्या घटने मुले असेल पण ती गोष्ट अजूनही माझ्या लक्षात आहे. पुढे थोडा मोठा झाल्यावर (६वी ७वीत असताना) आम्ही टेबल टेनिस खेळायला म्हणून तिथल्या अजय मंगल कार्यालयात एक त्रिदल क्रीडा केंद्र भरत होते तिथे जायचो. एरवी हे अजय मंगल कार्यालय फारसे काही चालत नसावे पण क्वचित कधीतरी लग्न मुंज वगैरे कार्यक्रम असला कि आमचे सर मग आम्हाला ह्या तळजाई टेकडीवरच्या भूत बंगल्यासमोरच्या मैदानात घेऊन जात. आमच्या सरांना किंवा इतर मुलाना तरी माझ्या बहिणीने सांगितलेल्या आख्यायिका माहिती नव्हत्या पण भूत बंगला हे नाव मात्र माहित होते. मी ती नाचणारीच्या खुनाची गोष्ट आणि पायातल्या घुंगरांचा आवाज वगैरे गोष्ट सांगितल्यावर मात्र ते भरपूर हसले आणि आम्हा सगळ्याना त्या बंगल्यात घेऊन गेले. बंगला ओसाड असला तरी बराच सुस्थितीत होता. खालच्या मजल्यावरील, खोल्या, गच्चीत जायचा जिना, गच्ची सगळं ठीकठक होतं. गच्चीत तर पूर्वी टाइल्सचे तुकडे,कपचे वगैरे लावून करत तशी फरसबंदी होती. त्याकाळच्या आमच्या घरातल्या शहाबादी फरशी पेक्षा मला ती खूप सुंदर वाटली. तिथेच नाचताना त्या बाईचा खून झाला असणार असे मला वाटले. थोडी भीती हि वाटली पण बरोबर मास्तर आणि इतर मुलं असल्याने अगदी भेदरलो वगैरे नाही तेवढ्यात अगदी तसाच घुंगरांचा आवाज हलके हलके यायला लागला आणि मग मात्र जाम टरकलो. आमच्या सराना घाबरून जाऊन तुम्हाला आवाज येतो का विचारले तर त्यानाही तो येत होता आणि ते देखिल चकित झाले आवाज खालून येत होता म्हणजे भूत खालच्या खोलीत असणार अशी माझी खात्री झाली, वेळ देखिल सात सव्वासाताची म्हणजे अंधार पडायला सुरुवात झाली होती. रडायला यायला लागलं. आमच्या सरांनी गच्चीवरून खाली पहिले तर कोणी माणूस आपल्या दहा बारा म्हशी घेऊन चरायला जो टेकडीवर गेला होता तो परतत होता आणि त्या म्हशीच्या गळ्यातल्या घंटाचं तो लयबद्ध आवाज येत होता. तालाजैच्या पायथ्याशी अरण्याश्वर मंदिराजवळ गवळी वाडा आहे तिथला कोणी असणार.त्यानंतर मला इतर मित्र इतके चिडवीत कि त्यापेक्षा त्या बाईच्या भुताने आपल्याला खाऊन टाकले असते तर बरे झाले असते असे वाटत राही.
तर हा बंगला कुणा ठोसर नावाच्या मराठी बऱ्याच अप्रसिद्ध सरदाराचा आहे आणि काही कोर्टकचेऱ्या दावे ह्यांच्या मुळे तो बेवसाउ झाला आणि खराब झाला ही माहिती नंतर मिळाली, हा बंगला १९९५ पर्यंत अगदी सुस्थितीत होता आणि मी तिथे जाऊन दहावीचा अभ्यास वगैरे केला होता. हल्ली मात्र फारच पडझड झाली आहे. बहुधा आसपासच्या लोकांनी बांधकामातले दगड काढून नेल्याने असेल. आजमितीला एक दोन भिंती आणि जिन्याचा थोड्या पायऱ्या,जिना वर घेऊन जाणारया मनोऱ्याचा( मनोरा कसला?) काही भाग एवढेच शिल्लक आहे. तिथे खरेच एखादे भूत असले असते तर लोकांची असे काही करायची हिम्मत झाली नसती...
झाली होती. रडायला यायला लागलं. आमच्या सरांनी गच्चीवरून खाली पहिले तर कोणी माणूस आपल्या दहा बारा म्हशी घेऊन चरायला जो टेकडीवर गेला होता तो परतत होता आणि त्या म्हशीच्या गळ्यातल्या घंटाचं तो लयबद्ध आवाज येत होता. तालाजैच्या पायथ्याशी अरण्याश्वर मंदिराजवळ गवळी वाडा आहे तिथला कोणी असणार.त्यानंतर मला इतर मित्र इतके चिडवीत कि त्यापेक्षा त्या बाईच्या भुताने आपल्याला खाऊन टाकले असते तर बरे झाले असते असे वाटत राही.
तर हा बंगला कुणा ठोसर नावाच्या मराठी बऱ्याच अप्रसिद्ध सरदाराचा आहे आणि काही कोर्टकचेऱ्या दावे ह्यांच्या मुळे तो बेवसाउ झाला आणि खराब झाला ही माहिती नंतर मिळाली, हा बंगला १९९५ पर्यंत अगदी सुस्थितीत होता आणि मी तिथे जाऊन दहावीचा अभ्यास पहिली वाहिली फोटोग्राफी तिथे जाऊन केली होती हल्ली मात्र फारच पडझड झाली आहे. बहुधा आसपासच्या लोकांनी बांधकामातले दगड काढून नेल्याने अशे पडझड झाली आहे. एक दोन भिंती आणि जिन्याचा थोड्या पायऱ्या,जिना वर घेऊन जाणारया मनोऱ्याचा( मनोरा कसला?) काही भाग एवढेच आता शिल्लक आहे
--आदित्य
ता.क.
१९८२ साली आलेल्या मायबाप नावाच्या सचिनच्या चित्रपटात हा ठुबे भूतबंगला दिसतो, यु ट्युबवर आहे. त्याचा स्क्रीन फ्रीज करून त्यातून स्क्रीन शॉट घेतलाय, हा भूत बंगला जरा सुस्थितीत असताना कसा दिसत असे ह्याची कल्पना ह्यावी म्हणून बाकीचे फोटो हल्ली हल्लीच मी स्वत: काढलेले आहेत

हा लेख फेसबुकवर टाकल्यानंतर अनेक मह्जुण्या लोकांनी तो वाचला आणि बरीच माहिती मिळाली ती जशीच्या तशी देत आहे. त्या माहितीच्या सत्यतेबाबत बाबत खातरजमा केलेली नाही
ठुबे हे तया काळी फार मोठे प्रस्थ होते इंग्रजांनी त्यांना रावबहादुर ही पदवी दिली. पुण्यात संचेती जवळ ठुबे पार्क नावाचा बंगला आहे. तो त्यांचाच
साभार-अशोक सोमवंशी

विट्ठल लक्ष्मण ठुबे 1930 ते 52 पर्यन्त पुणे येथे कॉन्ट्रक्टर होते इंग्रज सरकारने त्याना सरदार तसेच राव बहादुर या पदव्या बहाल केल्या होत्या पाचगांव पर्वतीचा डोंगर त्याच्या मालकिचा होता. तळजाई देवी त्यांच्या स्वप्नात आली होती. दृष्टांताप्रमाणे खोदल्यावर मूर्ति सापड़ली. मग त्यानी देउळ बांधले 1940 च्या दरम्यान हा बंगला बांधला होता हवा पालट म्हणून ते येथेरहायला यायचे. तेव्हाही इथे विजपाणी होते , त्यांना एकुलता एक मुलगा होता आणि त्याने आत्महत्या केली नाही. तो मुलगा साठी उलटल्यावर वारला.
साभार--अशोक डुंबरे

सरदार ठुबे आणि या बंगल्याबद्दल बरेच किस्से त्याकाळी फेमस होते. कोणी सांगायचे की तळजाई देवळाच्या मागील विहिरीत त्या ठुबेंना देवीची मूर्ती आणि खजिना मिळाला आणि त्यातून त्यांनी तो भव्य बंगला बांधला आणि त्यानंतर त्यांची नियत फिरली वगैरे वगैरे, पण त्याकाळी म्हणजे 1948 साली जेंव्हा त्या भागात कोणीच नव्हते तेंव्हा या ठुबे महाशयांनी हा इतका भव्य बंगला इतक्या गावाबाहेर का बांधला असावा ? असा प्रश्न पडतो.केवळ बंगलाच अतिभव्य होता असे नव्हे तर त्या बंगल्यालापाणी पुरवठा करण्यासाठी एक भली थोरली टाकी तळजाई मंदिराच्या अलीकडे उभारली होती आणि त्यातून पाण्याची पाईपलाईन बंगल्यापर्यंत आणली होती. त्या बंगल्या साठी स्पेशल विजेची लाईन व अनेक खांब रोवून खूप लांबून विजेची सोय तिथे केली होती. टेकडीच्या पायथ्याचे सहकारनगर पानशेत पुरानंतर 1962-63 सालापासून उभारले गेले आणि तिथे लाईट 1969-70 साली आली हे इथे नमूद केले तर ठुबेंनी 1948 साली किती सुखसोयी निर्माण केल्या होत्या हे लक्षात येते.
त्या बंगल्याचे रेखीव दगडी चिरे, सागवानी दरवाजे, चौकटी, खिडक्या हळूहळू गायब होत गेल्या आणि बंगला भकास मोडकळीस आला. या बंगल्यात दोन कार पार्किंग होत्या व त्याच्या आउट हाऊसच्या खोल्यांमध्ये तीन कुटुंबे त्याकाळी रहात होती त्यांपैकी दोन मराठी व एक उत्तर प्रदेशी भय्ये कुटुंब होते. त्यातील नांगरे कुटुंबातील श्याम हा आमचा बालपणीचा जिवलग मित्र. हा श्याम उत्तम शिकून पुढे शिक्षक झाला व आता कोथरूडमध्ये राहतो
साभार-–प्रसाद दशरथ

taljai3.jpgtaljai4.jpgtaljai5.jpgtaljai6.JPGtaljai6.JPG

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

झाली होती. रडायला यायला लागलं. आमच्या सरांनी गच्चीवरून खाली पहिले तर कोणी माणूस आपल्या दहा बारा म्हशी घेऊन चरायला जो टेकडीवर गेला होता तो परतत होता आणि त्या म्हशीच्या गळ्यातल्या घंटाचं तो लयबद्ध आवाज येत होता. तालाजैच्या पायथ्याशी अरण्याश्वर मंदिराजवळ गवळी वाडा आहे तिथला कोणी असणार.त्यानंतर मला इतर मित्र इतके चिडवीत कि त्यापेक्षा त्या बाईच्या भुताने आपल्याला खाऊन टाकले असते तर बरे झाले असते असे वाटत राही.>>>>> हा भाग रिपीट झालाय .
फोटो छान आहेत.

आई ग, वाईट वाटलं बंगल्याची अवस्था बघून. घरात माणसं हवीतच. नाहीतर ते घर एकदम ओकंबोकं दिसतं Sad बंगला बांधला तेव्हा किती छान असेल ते उरल्यासुरल्या अवशेषांवरून कळतंय. माणसं कोर्टकज्ज्यांच्या मागे लागून सोन्यासारखं घर का मातीमोल होऊ देतात काय माहित. त्यापेक्षा सामोपचाराने प्रकरण मिटवत का नाहीत? निदान वास्तू नांदतीगाजती तरी राहील.

त्या बंगल्या समोरच्या ग्राऊंडवर मी गाडी शिकायला जायचे,तेव्हा ऐकल्या होत्या ह्या खून वगैरे च्या गोष्टी

आता सुरेख गार्डन झालंय, त्याच्या समोर ,आसपास, पण ती दोन मजली पडकी भिंत तशीच आहे,
अर्थात फार दिवस राहू देतील असं वाटत नाही,कोर्ट-कचेरी प्रकरण नसेल तर

चांगली माहिती.
त्या डोंगरावर भुतबंगला आहे,असं लहानपणी ऐकलेलं.

बघायला हवा. हे ठुबे पार्क मात्र पाहिले आहे संचेती जवळचं. तिथे एस के जैन ची लॉ फर्म आहे. सध्या काहीतरी काम चालू आहे तिथे.

याच्याविषयी बरेचदा वाचले ऐकले होते. जायचे होतेच एकदा. अखेर काल परवा जाऊन आलो. अर्धवट बांधकाम असावे तसे उभ्या असलेल्या दोन चार दगडी भिंती पण अतिशय जुनाट झालेल्या, झाडाझुडपांनी वेढलेल्या. छत वगैरे काहीही नाही. फक्त अर्धवट उभ्या भिंती. आणि त्या भिंतींच्या आत बराच कचरा आणि वाढलेले गवत. इतकेच इथे आहे.

मागच्या काही वर्षात आता खूप छान डेव्हलप केलेले तळजाई क्रिकेट स्टेडियम जिथे आहे तिथूनच थोडे आत गेले कि हे ठिकाण आहे. आता तळजाई रस्ता परिसराचा कायापालट झाला आहे. संध्याकाळी फिरायला येणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते. परंतु अगदी दहा एक वर्षांपूर्वी सुद्धा हा भाग म्हणजे अगदी पडके माळरान होते. संध्याकाळनंतर कुणी इकडे फिरकत नसे. इथे बरेच गुन्हे सुद्धा घडायचे तेंव्हा. तसा कुप्रसिद्धच होता हा परिसर. दहा वर्षापूर्वीच जर अशी परिस्थिती होती तर १९४० साली इथे काय असेल? आणि त्या परीस्थीतीत त्यांनी इथे इतका मोठा बंगला कसा बांधला असेल व कसे रहात असतील? वगैरे प्रश्न मनात येतात.

"भूतबंगला" वगैरे म्हणतात पण तसे भयानक वातावरण जाणवत नाही (रात्री बेरात्री गेले तर कदाचित वाटत असेल तो भाग वेगळा). पण वातावरणात एक प्रकारची प्रचंड उदासी मात्र जाणवते. फार काळ थांबायची इच्छा होत नाही. पाच दहा मिनिटातच निघून आलो.

360 इथे आहे:
तळजाई बंगला परिसर ३६०

ऐकले / पाहिल्यासारखे वाटतेय.
ईमेलच्या काळात ईमेल फॉर्वर्ड आला होता. हा लेख कोविड काळातला दिसतोय.
एक अशीच आठवण या धाग्यावर लिहू का ?

नेमके वर्ष आणि तारीख लक्षात नाही.
पण ब्लॉगिंग जोरात सुरू होते आणि युट्यूब रूळत होते तेव्हां काही पेजेस हॉण्टिंग साठी लोकप्रिय होती. याहू होतं कि नाही लक्षात नाही. पन एकेकाळी याहूवर हॉण्टींगच्या कम्युनिटीज होत्या. ऑर्कुटवर पण ग्रुप्स होते.

अशाच एका ग्रुपवर काही जणांची ओळख झाली.
सर्वात आधी अशा गोष्टींचा किडा बिडा काही नाही. उगीचच काहीही साहस करावं असंही नाही. हल्ली काही युट्यूबर्सने व्यवसाय बनवला आहे तसंही काही नाही. पण आम्ही महानाज मधे समोसा खायला भेटायचो. ते बर्‍याच काळाने चालू झालेलं होतं. या ग्रुप मधे कॉलेजचे दोघे होते. आधी रविवारी भेटायचो. पण जेव्हढ्या गप्पा हॉण्टिंग ग्रुपवर व्हायच्या तेव्हढ्या भेटल्यावर नाहीत व्हायच्या.

एकाची आई आजारी असल्याने तिला बघायला जायचो. कँपमधे आल्यावर फूटपाथ मार्केट बघत तीन चार तास सहज जायचे. लग्नं झालेली असल्याने पहिल्यासारखे फिरता यायचे नाही.त्यामुळे लवकरच रविवारच्या या बैठकांबद्दल कुरबूर सुरू झाली. शिवाय हॉण्टिंगचा ग्रुप आहे हे घरी सांगणे शक्यच नव्हते. कॉलेजचा ग्रुप आहे सांगावे तर नवीन नावे पण सांगता येत नव्हती. तरी कुणी फिमेल मेंबर नव्हती.

असंच या बैठका चालू राहतील न राहतील असे वातावरण असताना ऑर्कुटवर पुण्यातल्या झपाटलेल्या जागेचा धागा आला. त्यात नाझ पासून जवळच एक झपाटलेली वास्तू आहे असा उल्लेख झालेला होता. कधी तरी ऐकले होते. पण त्या वेळी सांगणारा रटाळ असल्याने हाफ हार्टेडली ऐकलेले होते. त्यामुळे लक्षात नव्हते. अशा गोष्टी नाहीतर लक्षात राहतात.

त्या धाग्यावरचं वर्णन वाचून ही वास्तू कॅम्पातलं टेलिफोन एक्स्चेंज आहे त्या लाईनीत असल्याचा समज झाला. मग हरे राम हरे कृष्ण मिशनचा उल्लेख झाला. हा बोर्ड अनेकदा वाचल्याचे आठवत होते पण कुठेय ते आठवत नव्हते.

मग एकदा रविवारी चहा कॉफी घेऊन पायी चालत दस्तूर मार्गावर आलो. तेव्हां हे हरे राम हरे कृष्ण मिशन दिसले. एक जण मुस्लीम होता. त्याने बोट दाखवून ही ती वास्तू असे सांगितले. तिथे दोन चार पडलेल्या वास्तू होत्या. एक बंगला पूर्ण होता. ऑर्कुटच्या वर्णनाशी जुळणारा बंगला पडलेला नव्हता. जो पडलेला होता तो खंडहर होता आणि तिथे वेली आणि झाडे होती. त्यामुळं काय ते कळलंच नाही.

मुस्लीम असं उल्लेख करण्याचं कारण पुढे येईल.

आम्ही वास्तू पाहिली (रस्त्यावरूनच) तेव्हां दुपार होती. संध्याकाळ सुरू झाली होती हे जास्त योग्य राहील.
त्यातही रस्त्याच्या पलिकडून पाहिली. अगदी खरं सांगायचं तर नेमकी कुठली कुप्रसिद्ध वास्तू हे समजलं नव्हतं. त्या वेळी त्या मुस्लीम ब्लॉगरने इथे लाईव्ह करायचा प्रस्ताव ठेवला. मी उघड नास्तिक आहे. आतूनही नास्तिक आहे. आता माझा पेच असा होता कि नास्तिक आहे तर मग अशा ठिकाणांना भेट देण्याचे प्रयोजन काय ? आणि नास्तिकच आहेस ना ? मग विश्वास नाही तर भिण्याचे काम नाही असा दुहेरी पेच पडला होता.

पण आस्तिक नास्तिक पेक्षा एक कुतूहल असते. ते शमवण्याचे हे काही वय नव्हते. लग्न बिग्न झाल्यावर अशा मोहीमांवर जाणे हे काही घरी सांगण्यासारखे नसते. त्यातही आईवडील वगैरे एकत्र म्हटल्यावर भूताच्या घरात चाललोय असे सांगून जाणे शक्य नव्हते आणि लपून छपून जाणेही शक्य नव्हते. भीती पेक्षाही सेटल झालास ना ? काय धंदे करतोस म्हणून वडलांनी झापले असते. बायकोला विश्वासात घेणे एक वेळ शक्य होते. पण ती खूप काळ ही गोष्ट पोटात ठेवणे शक्य नाही याची कल्पना होती.

जायलाच पाहीजे असं कंपल्शन नव्हतं. खरं सांगायचं तर उत्साह नव्हताच. भीती सुद्धा नव्हती.
पण म्हणतात ना, होऊन जातं. नाही म्हणता आलं नाही आणि एका रविवारी दुपारच्या ऐवजी संध्याकाळी सातला जमायचं ठरवलं. काही तरी कारण सांगून मी सटकलो. सगळे एकत्र येता येता आठ वाजले.

बाईक्स नीट जागा पाहून पार्क केल्या. समोर खूपदा पार्क केल्या होत्या. तिथून पायी पायी मग ठरलेल्या ठिकाणी आलो.
त्या मुस्लीम मुलाने कॅमेरा चालू केला. मी व्हिडीओत यायला नकार दिला. त्याला कारणे होती. मग माझ्याकडे फ्लॅश पकडण्याचे काम आले. ऑर्कुटचे वर्णन आठवले. एक गवत पण उगवत नाही हे साफ खोटे निघाले. इथे वेली होत्या, झाडी होती. गजबजलेल्या वस्तीच्या मधोमध एक जंगल होते. त्या जंगलातली जी पडकी वास्तू होती तीच झपाटलेली आहे हे समजले. आत्ता नीट समजले. किती वेळा या रस्त्याने गेलो असेन.

तो त्याच्या भावाबरोबर आत गेला. आत शिरताना कॅमेर्‍याकडे पाहून त्याने प्रस्तावना केली.बराच सरावलेला होता. लिहून न आणता बोलला. भीती अशी वाटलीच नाही. कारण रस्त्यावर गाड्या होत्या. आवाज येत होते. या वेळी थर्मास आणला नव्हता कुणीच.
तो मुलगा आत गेला आणि धावत बाहेर आला. काहीतरी धप्प दिशी पडले.
तो या खुदा म्हणत काही तरी मुस्लीम मंत्र किंवा प्रार्थना करत होता,
(एव्हढ्यासाठी मुस्लीम असल्याचा उल्लेख केलेला).

मनात म्हटलं कि तो उघड आस्तिक आहे. त्याचा भूतावर पण विश्वास आहे म्हणून तो येतोय. आपला विश्वास नाही. तरी आलोय आणि आतही नाही गेलो. भीतीचा प्रश्न नव्हताच. पण उगीच आत जाण्यात पण इंटरेस्ट नव्हता. कुतूहल मात्र खूप होतं आणि आता इथे आलोच आहोत तर भीतीने रोमांचित झालो होतो.

तो पळत आला आणि मोहीम थांबली.
मग तो म्हणाला कि चला इतके तर माहिती झाले. आधी काहीही माहिती नव्हते. आता थोडी ओळखीची झाली जागा. ही वेळ गजबज असलेली आहे. त्यामुळे इफेक्ट येत नाही. आपण पुढच्या रविवारी (शनिवार आणि रविवारच्या मधली रात्र) रात्री बारा वाजता इथे येऊ आणि सगळं शांत झाल्यावर आत जाऊ असा प्रस्ताव त्याने ठेवला. रात्री बाहेर पडणे मला शक्य नव्हते. पण बहुमतापुढे मी काही बोललो नाही.

सांगायचं म्हणजे मला काही जमलंच नाही. इतरांनाही रात्रभर बाहेर राहण्याचे कारण जमले नाही.
खूप वर्षांनी मग हा राहून गेलेला उद्योग पार पाडता आला. मी स्वतंत्र राहू लागलो होतो. त्यामुळं किमान वडलांची भीती नव्हती. बायको आठवड्यासाठी माहेरी गेलेली. त्या वेळी मग नाझ बंद झाल्याने रामकृष्ण हॉटेलला जमलो होतो. त्याच रात्री परत यायचं ठरलं. मी सायकलवर आलो होतो. तंगडतोड करत परत घरी गेलो. झोप काढली. कुत्र्याला खायला दिलं. फिरवून आणलं. सायकल घ्यावी कि बाईक हा विचार करत बाईकच काढली. (पळून जायला बरं).

या वेळी उत्सुकता सुद्धा नव्हती. उगीच मित्र मित्र एकत्र भेटलोय, बायकोही घरी नाही एव्हढाच आनंद होता.सेलिब्रेशन मूड होता.
मला रस्त्यावर उभं रहायचं काम आलं ते मी आनंदाने स्विकारलं. बाईक पार्क केली होती ती नजरेच्या टप्प्यात होती. आत काही झालं तर मदत मागायची आणि रस्त्यावर काही प्रॉब्लेम आला (पोलीस वगैरे) तर आत कळवायचं ही कामगिरी होती.

आणखी एक जण आत जाण्यापासून गळाला आणि माझ्यासोबत उभा राहिला.हे तर खूपच मस्त झालं. आता गप्पा मारायला पण साथीदार मिळाला. हा जुगाडू असल्याने रामकृष्ण हॉटेलच्या शेजारी असलेल्या खोपटासारख्या ग्यारेजच्या मागे असलेल्या वेटरच्या राहण्याच्या खोलीवर जाऊन रात्री चहा बनवून घेऊन आला. या वेळी थर्मास होता. अजून एक थर्मास राखीव ठेवला. ते येतील तेव्हां. थंडीत चहा पीत पीत झपाटलेल्या वास्तूच्या बाहेर आउटिंग ही कल्पना फारच भन्नाट असते. करून बघा.

दोघांचं आत काय चाललंय काहीच कळत नव्हतं.
एक दोनदा पळापळीचे आवाज पण आले. आत जायचं का असं एकमेकांना विचारत अनिच्छेनेच आम्ही दोघेही बसून राहिलो. किंवा अनिच्छेनेच एकमेकांना विचारत हे जास्त योग्य राहील.

एकदा दोघेही पळत बाहेर आले. घाबरले होते.
काहीतरी चालायचा आवाज ऐकला . आम्ही म्हटलं कि कुत्रं, मांजर असेल. ते त्यांना पटलं. त्यांच्या धाडसाला सलाम पण करावासा वाटत होता. चहा घ्या म्हटल पण दोघांनाही नको होता. ते इतके एक्साईट झालेले होते.
ते पुन्हा आत गेले. पहाटे चारच्या सुमारास परत आले.
मग थोडा वेळ आम्ही पायी फिरलो. नंतर एक चहाची गाडी दिसली. तिथे चहा पीत पीत व्हिडीओ पाहिला.
आम्ही दोघे जे रस्त्यावर उभे राहिलेलो ते व्हिडीओ पाहून घाबरलो. दोघांनी केव्हढे धाडस केले ते समजले.
आत चांगला मोठा बंगला दिसत होता.
आवाज पण खूप येत होते. आत वाघळं होती.गेल्या वेळी धप्प आवाज आला तो बहुतेक आमच्या मुळे चाहूल लागल्याने वाघळांचा किंवा माजर पळाल्याने काही तरी पडल्याचा होता.
भीती वाटली. पण शेवटी काहीही घडले नाही. तिथे काहीही नाही.
कसलेही भूत नाही. कुठली बाई नाही. काहीही नाही.
वास्तू झपाटलेली असल्याचा काहीही अनुभव आला नाही. आत गेलेल्यांनाही आला नाही. रस्त्यावर उभ्या असलेल्या आम्हाला तर नाहीच आला.
ही अफवा आहे हे आमच्या पुरते तरी क्लिअर झाले.

होळकर ब्रीजचे सत्य

मी तेव्हां एका स्विडीश कंपनीतून ट्रेनिंग संपवून भोसरीच्या एका कंपनीत जॉईन झालो होतो. भोसरीतून कल्याणीनगरला जाताना होळकर ब्रीज लागतो. खासगी कंपनी असल्याने सकाळी साडेसातला रिपोर्ट वेळेवर करणे सक्तीचे होते. पण घरी जाण्याची वेळ फिक्स नव्हती. मी क्वालिटी कंट्रोलैं इंजिनियर असल्याने दुसर्‍या शिफ्टमधेही थांबावे लागायचे. हाताखाली कामगार देतो म्हणाले पण दिलेच नाहीत. यामुळे रोजचे साडेबारा एक वाजत. असंच एकदा रात्री दीड वाजता निघालो.

मुंबई पुणे हायवे कासारवाडी इथे पेट्रोल संपले. त्या वेळी भोसरी दिघी हा रस्ता माहिती नव्हता. असता तरी त्या वेळी वर्दळ नसल्याने टाळला असता. पेट्रोल पंप बंद होते. एकाने गाडीतले पेट्रोल दिले. त्यात आणखी उशीर झाला. खडकीत एका पोलिसाने लिफ्ट मागितली. होळकर ब्रीजच्या एका बाजूला स्मशान आणि दुसर्‍या बाजूला खाली नदीपात्रात तंत्र विद्या वगैरे विधी चालत. पाठी मागे दुसर्या महायुद्धात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांचे कबरस्तान आहे. त्यामुळे या पुलाबद्दल वदंता का नाहीत असे मनात यायचे. जिथे विधी चालायचे त्या जागेकडे पाहण्याचे टाळायचो. पण जे स्मशान आहे त्याची कधीही भीती वाटली नाही. आजही नाही वाटत. मस्त गार्डन आहे तिथे.

पोलीसाची गंमत करायची हुक्की आली. होळकर ब्रीजवर माझ्या डोळ्याच्या कोपर्‍याने काही तरी हालचाल टिपली. ती काहीही असू शकते. पण उगीचच मीठ मसाला लावून मी पोलिसाला म्हणालो कि "मामा, तुम्हाला काही दिसले का ?" तर ते म्हणाले " नाही,काय होतं ?" मी म्हणालो कि " कुणी तरी झटकन पास झालं समोरून" पोलीसाने माझ्या पाठीत बोटं खुपसली. तलवार कशी खुपसतात तशी. ती सरळ चालत रहा या अर्थाची खून होती. नंतर खांदा दाबला. तेव्हांही समजले की बोलू नको काही..

मग बीईजीचं गेट आल्यावर पोलिसाने सांगितलं, अशा ठिकाणी असं थांबायचं नाही. काही बोलायचं नाही. सरळ जायचं.
कसं असतं ते आशेनं येतं आपल्याकड्म काही खायला असलं तर. मी म्हणालो माझ्याकडे काही नाही.
पोलीस म्हणाला " माझी रात्रपाळी आहे. जरा मटण आणलंय "

त्याला येरवडा पोलीस स्टेशनला सोडून मी पुढे गेलो. इतकं हसायला येत होतं कि बस्स.
पुढे बहुतेक त्या नंतरच त्या किश्शानंतर होळकर ब्रीज झपाटला असणार. कदाचित आणखीही कुणी असे प्रकार केले असतील.
माझ्या मित्राने सुद्धा मला झपाट्याने पार होणार्‍या माणसाचा किस्सा सांगितला होता. पण तो आधी कि नंतर हे लक्षात नाही.
एकूण तिथे काहीही नाही. अनेक वर्षे या रस्त्याने मी रात्री अपरात्री आलो आहे. पहाटे सायकलवरून मुंबई पुणे रस्त्याने लोणावळा केलेलं आहे. कधीही अनुभव आलेला नाही.

सोशल मीडीया, याहू आल्यानंतर हा रस्ता बदनाम होऊ लागला. आणि आता युट्यूबर्सने एव्हढी बदनामी केली आहे कि ऑस्ट्रेलियातून एक फेमस भूतहंटर बाई येऊन गेली. तिने कसले शास्त्रीय प्रयोग केले म्हणे आणि खूप वाईट जागा असल्याचे घोषित पण केलेले आहे.
खूप इच्छा होतेय कि रात्रीचे एकदा जाऊन तसे काही नाही हे सिद्ध करावे. आता ते शक्य नाही. वायको माहेरी गेली तरी व्हिडीओ कॉल मुळे तिचे अमानवी अस्तित्व सोबत असतेच.

भारी अनुभव फीबां.
माझा भुतावर विश्वास नाही, पण मुद्दाम या अश्या जागेत रात्रीची जाणार पण नाही.एखादी पाल बिल अंगावर पडली,उंदीर बेडूक पायावर आला तर हार्टफेल व्हायचा.

मी अनु ,धन्यवाद.

खादी पाल बिल अंगावर पडली,उंदीर बेडूक पायावर आला तर हार्टफेल व्हायचा. >> Happy

दोन्ही अनुभव भारी आहेत. अमानवीय धाग्यावर जायला हवे वास्तविक. आजकाल असे काही विचार मनात आले तरी लगेचच त्यातला फोलपणा दिसणारे विचार शतपटीने येतात. आणि सगळी मजाच निघून जाते.
तळजाईतल्या या जागेवर गेलो तेंव्हाही वाटले होते की समजा इथे इन्फ्रारेड सीसीटीव्ही कॅमेरा उंच जागी लावून (जेणेकरून त्याची चोरी होऊ नये) एका अमावसेच्या रात्रीचे ८ ते १० तासांचे रेकॉर्डिंग केले तर त्यात काही दिसेल का? एखादा आत्मा फिकट आकृती हालचाल वगैरे? तिथे कुणी आत्महत्या केल्यात त्यांच्या अपुऱ्या इच्छा हवेच्या कणांचे शरीर धारण करून तिथून फिरत नसतील कशावरून? त्या हवेच्या झोतातले काहीतरी इन्फ्रा लाईट मध्ये दिसेलच की. कल्पना भन्नाट होती. पण लगेचच विचार आला. तीव्र इच्छा किंवा आकांक्षा म्हणजे तरी काय? मेंदूतले न्यूरॉन पॅटर्न. प्रेत जाळले तर पॅटर्न जळले. इच्छा डिझायर वगैरे सगळेच जळले. मग कसे काय कोण हवेचे शरीर धारण करेल? जाऊदे. झालं! लागली वाट एका भन्नाट कल्पनेची Lol पण इतके असूनही अमावस्या रात्री सीसीटीव्ही बसवून त्यात काय दिसेल याची काल्पनिक रवंथ करण्यात मनास मजा येतेच Proud

>> एखादी पाल बिल अंगावर पडली
माझा तर एनी वे होइल. पाल भयानक असते.

होय ते खरे आहे. मला एकवेळ प्रत्यक्ष भूत अंगावर पडले तरी चालेल. पण पाल? बिग नो Proud

<<<तर तो किस्सा 'अपालवीय' धाग्यावर लिहायला लागेल

नवीन Submitted by हरचंद पालव >>>

हपाना "माबोचे शब्द लालित्य भास्कर " किताब बहाल करण्यात यावा अशी मी विनंती करून माझे दोन शब्द संपवते.

Pages