अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते
जिथे शांतता स्वतःच निवारा शोधीत थकून आली असते - कवी अनिल
आजच्या भागात आपण केतकीशी पाणथळ प्रदेश या परिसंस्थेविषयी बोलणार आहोत. ही नदीनंतर गोड्या पाण्याची सर्वत्र आढळणारी परिसंस्था आहे. मात्र आपल्याला नदीविषयी जितकी माहिती असते तितकी या परिसंस्थेबद्दल सहसा नसते. पण इकॉलॉजीच्या दृष्टीने आणि विशेषतः कार्बन सिंकचा विचार केला तर एक अत्यंत महत्त्वाची अशी ही परिसंस्था आहे. कार्बन सिंक म्हणजे अशा जागा ज्या कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात.
जिज्ञासा: पाणथळ प्रदेश म्हणजे कोणते? आणि हे प्रदेश कसे तयार होतात?
केतकी: पाणथळ जागा म्हणजे अशा जागा जिथे तुमचे पाण्यात पाय बुडतील पण तुम्हाला पोहता येणार नाही अशा उथळ पाणी असलेल्या जागा - उदाहरणार्थ दलदलीचा प्रदेश - जिथे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचू शकतो. आता या जागा कशा तयार होतात हे सांगण्यापेक्षा मी त्यांची जी ५/६ वैशिष्ट्ये आहेत त्यांच्याबद्दल सांगते त्यातून या जागा कशा तयार होतात आणि त्यांची इकॉलॉजी दोन्ही लक्षात येईल. तर पहिलं character म्हणजे hydrology - म्हणजे पाणथळ जागेतल्या पाण्याचे वर्णन - आता कोणत्याही जागी पाणी कुठून येऊ शकतं? तर पाऊस, एखादा जमिनीतून वर आलेला झरा, किंवा बर्फ वितळल्याने. असे पाण्याचे साधारण ३ स्रोत असू शकतात. मग आता हे पाणी कसं येतंय, किती काळ थांबतंय यामुळे त्याची hydrology बदलते - म्हणजे जर हे पाणी वर्षभर राहणार असेल तर बारमाही पाणथळ प्रदेश तयार होतो आणि काही काळ राहणार असेल म्हणजे फक्त पावसाळ्यात तर मग हंगामी पाणथळ जागा तयार होतात. पाणथळ प्रदेशात पाणी येण्याचा मार्ग असतो तसा पाणी जाण्याचाही मार्ग असतो - काही अंशी पाणी मुरतं आणि बरंचसं पाणी वाहून जातं - समजा नदीकाठी पाणथळ जागा असेल तर वरचं पाणी पुन्हा नदीत जातं - यामुळे पाणथळ जागेत पाणी उथळ राहतं.
दुसरी गोष्ट म्हणजे hydrogeology - यातला geology चा भाग म्हणजे जमीन कशी आहे? कोणत्या स्वरूपाचा दगड आहे - बेसाल्ट, जांभा, चुनखडी आहे त्या प्रमाणे पाणथळ जागेत असणाऱ्या गाळाचा प्रकार ठरतो, त्यात कोणती मिनरल्स असतील हे ठरतं. आता यात केवळ पाण्याखाली असलेली जमीन एवढंच न बघता या पाणथळ जागेचं ‘पाणलोट क्षेत्र’ पण पहायला हवं - म्हणजे कोणत्या आणि किती मोठ्या भागातून गोळा होऊन पाणी या जागेत येतं आहे? या पाणलोट क्षेत्रात काय घडतंय याचा पाणथळ प्रदेश हे आरसा असतात. पाणलोट क्षेत्रात जमिनीचा कसा वापर होतोय यावर पाणथळ जागेची गुणवत्ता ठरते. म्हणजे जर क्षेत्रात उतारावर झाडे, जंगल असे माती धरून ठेवणारी नैसर्गिक संस्था नसेल तर पावसाच्या पाण्याबरोबर ही सारी माती वाहून येते. जर पाणलोट क्षेत्रात शेती होत असेल तर त्यात वापरली जाणारी कीटकनाशके, खते पाणथळ भागात दिसतात. आता पुण्याच्या पाषाण तलावाचं उदाहरण घेतलं तर त्याच्या पाणलोट क्षेत्रात वस्ती आहे आणि या वस्तीतून बरंचसं सांडपाणी काहीही प्रक्रिया न करता तळ्यात सोडून दिलेलं दिसतं. याउलट जर आजूबाजूला उत्तम जंगल असेल, एखाद्या जिवंत झऱ्याचं पाणी पाणथळ जागेत येत असेल तर मग त्याची hydrology वेगळी होते.
या पुढचा मुद्दा आहे hydrochemistry. आता आपण जे सांडपाण्याबद्दल किंवा खतं, कीटकनाशकं याबद्दल बोललो त्याने पाण्याची chemistry बदलून जाते. पाण्याचं chemical composition बघताना pH, biological oxygen demand (BOD), chemical oxygen demand (COD) इत्यादी गोष्टी पण पाहिल्या जातात. जर या सगळ्या गोष्टी एका योग्य मर्यादेत असतील तर मग अशा पाण्यात आपल्याला जीवसृष्टी दिसते कारण ते पाणी सुरक्षित असतं. जेव्हा BOD, COD या गोष्टी प्रमाणाबाहेर असतात तेव्हा मग अशा पाण्यात काहीही जिवंत राहू शकत नाही - ते पाणी किंवा पाण्याचा स्रोत हा मृत मानला जातो. आणि आपल्याकडचे अनेक तलाव असे मृत झालेले दिसतात कारण त्यांची hydrochemistry बिघडलेली असते. म्हणजे त्यात पाणी असतं पण काही जीवन नसतं. त्यामुळे हे सगळे घटक महत्त्वाचे ठरतात.
आता या सगळ्या घटकांमुळे त्या पाणथळ जागेची माती जिला hydric soil म्हणतात ती कशी आहे ते ठरतं. आता ही माती कायम पाण्यानी संतृप्त (saturated) असते आणि सतत पाण्याखाली असल्याने ती aerobic नसते - या जमिनीत हवेचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे या मातीत उगवणाऱ्या वनस्पती आणि राहणारे प्राणी दोन्ही स्पेशल असतात.
इथे मग आपल्याला पाणवनस्पती (hydrophytes) आणि जलचर प्राणी दिसतात.
जिज्ञासा: या पाणवनस्पतींविषयी थोडं विस्ताराने सांगशील का?
केतकी: नक्कीच. भारतामध्ये खरोखरीचे पाणथळ प्रदेश म्हणता येतील अशा जागा फार कमी आहेत. म्हणजे जिथे जिथे पाणी आहे तिथे फक्त पाणथळ प्रदेश आहे अशा जागा खूपच कमी आहेत. आपल्याकडच्या पाणथळ जागा कुठे दिसतात तर एखाद्या तळ्याच्या काठी, नदीच्या काठी अशा दिसतात. संपूर्ण भागात उथळ पाणी आहे अशा जागा फारशा दिसत नाही.
सहसा जर आपण आपल्याकडच्या कोणत्याही पाणथळ जागेचा आकार बघितला तर तो साधारण बशीसारखा असतो. आता या बशीच्या मध्यभागी पाण्याची खोली बरीच जास्त असते - तिथे पोहता येऊ शकतं. मध्यभागी सूर्यप्रकाश तळापर्यंत पोहोचत नाही तिथे आपल्याला प्राणी दिसतात म्हणजे मासे वगैरे. शिवाय काही phytoplanktons पण असतात. पण आपण ज्या पाणथळ जागा म्हणतोय त्या या तळ्यांच्या कडेला असतात. यात वेगवेगळ्या पाणवनस्पतींचे प्रकार दिसतात. पहिला प्रकार म्हणजे तरंगणाऱ्या वनस्पती (floating hydrophytes) उदाहरण द्यायचं तर duckweed जे बदकं खातात. अशा वनस्पती तळ्यात सगळीकडे असतात. यातलं सगळ्यांना माहिती असणारं उदाहरण म्हणजे जलपर्णी किंवा water hyacinth. ही परदेशी वनस्पती आहे आणि अतिशय invasive आहे. आपण नंतर त्या विषयी बोलूच. पण ही देखील एक तरंगणारी पाणवनस्पती आहे. एक कोबीसारखी दिसणारी वनस्पती असते तिला water cabbage असंच नाव आहे, एक mosquito fern नावाची वनस्पती असते तिचा पाण्यावर असा मखमली छान लालसर गालिचा तयार होतो. हे बऱ्याचदा गोळा करून, कुजवून, खत म्हणून वापरतात.
दुसरा प्रकार म्हणजे तरंगणाऱ्या पण ज्यांची खाली मूळं रुजलेली असतात अशा वनस्पती. त्यांना rooted floating म्हणतात. याचं माहित असलेलं उदाहरण म्हणजे कमळ, शिवाय वॉटर लिली, कुमुद अशा वनस्पती. आता या अर्थातच तळ्याच्या काठानीच वाढतात. मात्र काही छोट्या तळ्यांमध्ये जी संपूर्ण उथळ आहेत अशा ठिकाणी पूर्ण कमळांनी भरलेलं तळ दिसतं. गोवा किंवा कोकणात काही ठिकाणी सहज आढळतात अशो तळी. तिसरा प्रकार म्हणजे submerged floating hydrophytes ज्या पाण्यात बुडालेल्या असतात आणि तरंगत असतात. यात आपण घरातल्या माशांच्या aquarium मध्ये ज्या वनस्पती सोडतो म्हणजे Vallisneria, Hydrilla या वनस्पती येतात. या शेवाळ्यासारख्या दिसणाऱ्या पण शेवाळापेक्षा अधिक उत्क्रांत झालेल्या वनस्पती आहेत. चौथा प्रकार म्हणजे amphibious किंवा उभयचर वनस्पती - यात लव्हाळ्यासारख्या वनस्पती येतात ज्या पाणी सहन ही करू शकतात आणि पाण्यात नसल्या तरी जगू शकतात. यामध्ये मग हळदकुंकू, Polygonum किंवा शेरळ, टायफा या जाती येतात ज्या पाणथळ जागेच्या काठी दिसतात आणि पाणी कमी जास्त झाले तरी जगतात.
आता या काठावरच्या झाडांना लागूनच एक riparian झाडांचा पट्टा असतो. यात बरेचसे वृक्ष येतात जे आपल्याला नदीच्या काठी पण दिसतात. जसे करंज, उंबर, कदंब, जांभूळ.
असा हा पाणथळ जागेतला वनस्पतींचा क्रॉस सेक्शन दिसतो. ही सगळी जरा अधिक उत्क्रांत झाडे आहेत याच्या बरोबरीने पाणथळ जागेत पाण्याला रंग ज्यांच्यामुळे येतो अशा सूक्ष्म शैवाल अर्थात phytoplanktons देखील असणे महत्त्वाचे असतात. काही एकपेशीय काही बहुपेशीय, काही डोळ्यांना दिसणाऱ्या आणि बऱ्याचशा नुसत्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या अशा अनेक जाती या phytoplanktons मध्ये येतात. यातले काही शैवालांचा पाणथळ जागेच्या तळाशी जी दगडमाती असते त्यावर एक थर निर्माण झालेला दिसतो - त्यांना periphytons म्हणजे दगडाला वगैरे चिकटून वाढणारी शैवालं म्हणतात. जवळपास अख्खी पाणथळीची जागा या phytoplanktons ने भरून गेलेली असते. यांच्यापासून या परिसंस्थेतली अन्न साखळी सुरु होते. Zooplanktons म्हणजे अत्यंत सूक्ष्म असे प्राणी हे Phytoplanktons खातात. शिवाय phytoplanktons मोठ्या प्रमाणात फोटोसिन्थेसिस करतात - यातून खूप सारा कार्बन डाय ऑक्साईड शोषला जातो आणि मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन बाहेर टाकला जातो. त्यामुळे जितका पाणथळ प्रदेश जास्त मोठा तितक्या प्रमाणात या क्रिया देखील वाढलेल्या दिसतात.
प्रकाशचित्र: पाणथळ जागेचे रेखाचित्र (साभार: केतकी घाटे, ऑयकॉस, पुणे)
जिज्ञासा: आपण पाणवनस्पतींविषयी बोललो. आता या पाण्यात कोणते प्राणी, कीटक वगैरे आढळतात याबद्दल सांग ना.
केतकी: हो. या पाणथळ जागेच्या इतर घटकांशी अनुकूल असे इथले प्राणीजीवन असते. आपल्याला पाणथळ जागा म्हटले की सगळ्यात आधी बगळे किंवा पक्षी निरीक्षकांना स्थलांतर करून येणारे पक्षी यांची आठवण होते. आणि ते साहजिक आहे कारण या जागा अशा पक्षांसाठी एक उत्तम अधिवास (हॅबिटॅट) असतात. पण तो हॅबिटॅट तयार होण्यामागे पाणथळ जागेत असलेल्या सगळ्या अन्न साखळीचा मोठा वाटा असतो. ही आपण आत्ता उल्लेख केला तसं phytoplanktons पासून सुरु होते. आणि यांच्यावर अवलंबून असणारा एक मोठा प्राण्यांचा ग्रुप असतो तो म्हणजे invertebrates -अपृष्ठवंशीय प्राणी यांचा.यात वॉटर बीटल सारखे कीटक येतात, striders असतात, बरोबरीने molluscs म्हणजे गोगलगाय, limpets, clamps, oysters यासारखे शंख शिंपल्यातले राहणारे प्राणी हे देखील मोठ्या प्रमाणात दिसतात. दुसरा मोठा ग्रुप म्हणजे crustaceans म्हणजे खेकड्यांसारखे प्राणी. यात fairy shrimp (brachiopods), copepods, seed shrimp (ostracods), crayfish असे छोट्या आकाराचे, डोळ्यांना न दिसणारे crustaceans पण येतात. या प्राण्यांवर आपल्याकडे अजून फार कामच झालेलं नाही. खरंतर हे फूडचेनचा खूप महत्त्वाचा भाग आहेत. पण अभ्यास झाला नसल्याने आपल्याला यांच्यामधली विविधता तितकीशी माहिती नाही. हे सगळे प्राणी मिळून फूडचेनचा बेस तयार करतात. आणि दुसरा मोठा गट अर्थातच vertebrates ज्यात मग मासे, पक्षी, साप, बेडूक असे सगळे प्राणी येतात. जे आपल्याला बहुतांशी माहिती असतात. यातले पक्षी सहज समजण्याजोगे ‘स्थिती दर्शक’ म्हणजे indicators आहेत. म्हणजे सगळ्याच जाती काही ना काही दर्शवताततच पण पक्षी काहीसे पॉप्युलर आहेत म्हणून त्यांचं उदाहरण. पूर्वी बऱ्याचशा तळ्यांमध्ये, जसं की पाषाण तलाव, कमल पक्षी सहजी आढळायचा. जसाना नावाचा सुंदर पक्षी कमळाच्या पानांवर अलगद पाय ठेवत चालतो म्हणून त्याचं नाव पडलं असावं. तर हा पक्षी प्रदूषण विरहित स्वच्छ पाणथळ जागांमध्येच आढळतो. आता मात्र मानवी हस्तक्षेपामुळे पाण्याची गुणवत्ता बदलते आहे तसे कमल पक्षी नाहीसे होऊन शेकोट्या सारखे प्रदूषण दर्शवणारे पक्षी वाढत आहेत. पाणकावळे जे प्रदूषण सहन करू शकतात त्यांची संख्या वाढत राहते. आणि वैशिष्ठयपूर्ण जाती कमी होत आहेत.
जिज्ञासा: या पाणथळ जागेच्या इकॉलॉजिकल सर्विसेस कोणत्या असतात?
केतकी: पाणथळ जागांच्या भरपूर इकॉलॉजिकल सेवा सांगता येतील. या पाणथळ जागेत पडणारा सेंद्रिय कचऱ्याचे विघटन होऊन त्यातली पोषकद्रव्य पुन्हा वापरासाठी उपलब्ध होतात. यात detritus food chain चा सहभाग असतो. मगाशी आपण ज्या invertebrates प्राण्यांविषयी बोललो ते प्राणी सेंद्रिय कचऱ्याचे छोटे छोटे तुकडे करतात आणि मग सूक्ष्मजीव त्यांचं पुन्हा असं रूपांतर करतात की ज्यामुळे वनपस्ती ते पुन्हा मूलद्रव्याच्या रूपात शोषून घेऊ शकतात. अशीच फूड चेन जमिनीवर पण असते फक्त हे काम करणाऱ्या प्राण्यांच्या जाती वेगळ्या असतात. अशा प्रकारे होणारे Nutrient recycling ही एक सेवाच आहे. याच धर्तीवर मग सांडपाणी प्रक्रियेसाठी constructed wetland तयार करून त्यांचा STP (sewage treatment plants) म्हणून वापर केला जातो. पाणथळ वनस्पतींमुळे इथे काही प्रमाणात पाण्याचे शुद्धीकरण देखील होते. अर्थात प्रत्येक जागेची त्यासाठी एक carrying capacity असते हे लक्षात घेतले पाहिजे. पाणथळ जागा मोठ्या प्रमाणात पाणी जिरवू शकतात आणि त्यातून आजूबाजूच्या झऱ्यांना (aquifers) पाणी मिळते त्यामुळे जमिनीतली पाण्याची पातळी वाढण्यास देखील मदत होते.
माणसाला होणारा पाणथळ जागांचा मोठा उपयोग म्हणजे त्यातून होणारा अन्नाचा पुरवठा. कोकणात सगळीकडे आपल्याला तळी दिसतात - जुना हायवे सोडून कर्जतच्या पुढे जायला लागलं की उजव्या हाताला एक मोठं तळं आहे त्यातून लोकं वर्षानुवर्षे विविध गोष्टींचं उत्पन्न घेताना दिसतात. यात कमळ काकडी, जिचं लोणचं घालतात, शिंगाडा, इतर पाणवनस्पती, मासे, खेकडे अशा गोष्टी येतात. आम्ही गेली अनेक वर्षे तिथे थांबून शिंगाडे विकत घेत आलोय. त्या माणसाला पूरक उत्पन्नाचं हे एक साधन आहे. जर या गोष्टींचा उपसा योग्य प्रमाणात झाला आणि मूळ जागेची देखभाल होत राहिली तर अशा जागांमधून चांगले उत्पन्न मिळू शकते.
अजून एक महत्त्वाची सेवा म्हणजे या पाणथळ जागांमुळे आजूबाजूच्या हवेचं microclimate उत्तम राहतं कारण पाणी सावकाश तापतं आणि सावकाश गार होतं. यामुळे पाण्याच्या जागेच्या आजूबाजूचे तपमान हे कधीही तीव्र होत नाही. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात अशी एखादी पाणथळ जागा आजूबाजूला असणं हे फारच चांगलं असतं. आणि शेवटी एक सेवा अशी सांगता येईल की या पाणथळ जागा मनोरंजन किंवा पर्यटनासाठी वापरता येतात - त्यांची एक recreational value असते. एखाद्या घराच्या किंवा सोसायटीच्या समोर जर विस्तीर्ण तलाव असेल तर त्या घराची किंमत “lake view“ असल्याने जास्त असते. तलावामुळे जागेची economical value पण वाढते.
आता या सगळ्या माणसांसाठीच्या सेवा झाल्या. जर इकॉलॉजीच्या दृष्टीने सांगायचं तर या पाणथळ जागांची primary productivity खूप जास्त असते. Primary productivity म्हणजे सोप्या भाषेत एखाद्या जागेत प्रकाश संश्लेषण - photosynthesis किती वेगाने होतं याचं प्रमाण. हा वेग पाणथळ जागेचा सर्वात जास्त असतो. एखाद्या जंगलापेक्षा देखील हा वेग जास्त असतो. कारण पाणथळ जागी सगळेच आवश्यक घटक भरपूर उपलब्ध असतात - जमीन, पाणी, सूर्यप्रकाश, आणि वनस्पती किंवा phytoplanktons. म्हणजे आपण बघतोच ना की एखादं छोटंसं डबकं जरी असलं तरी त्यात लगेच शेवाळं साचलेलं दिसतं. त्यामुळे जितका वेळ प्रकाश असेल तितका वेळ या ठिकाणी फोटोसिन्थेसिस सुरु राहतं. त्यामुळे अर्थात आजूबाजूच्या हवेत ऑक्सिजन मिसळत राहणार आणि कार्बन शोषला जात राहणार. Primary productivity हा एखाद्या इकोसिस्टिमचं महत्त्व जाणून घेताना मोजला जाणारा एक मुख्य निकष आहे.
जिज्ञासा: पाणथळ जागा या जवळपास विषुवतीय वर्षावनांइतक्याच वेगाने फोटोसिन्थेसिस करतात हे मला माहिती नव्हतं! म्हणजे आपण आसपास असणारी एखादी दलदलीची जागा बुजवून त्यावर काहीतरी टोलेजंग इमारत बांधतो आणि म्हणतो की त्या जागेचा तसाही काही उपयोग नव्हता! खरंतर आपण त्यावेळी आपल्याजवळ असणारी एक अमेझॉन जंगलाइतकीच महत्त्वाची एक इकोसिस्टिम, एक कार्बन सिंक नष्ट करत असतो!
मघाशी आपण तळ्याकाठी असलेली पाणथळ इकोसिस्टिम पाहीली. अशा अजून कोण कोणत्या जागी आपल्याला ही इकोसिस्टिम दिसते? ही मानवनिर्मित पण असू शकते ना?
केतकी: खरं आहे तुझं! पाणथळ जागा या नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही प्रकारच्या असू शकतात. आता यांचे विविध प्रकार हे वेगवेगळे criteria लावून बघता येतात - जसा आपण आधी पाहिलं बारमाही किंवा हंगामी. मानवनिर्मित वेटलँड्सचे बरेच प्रकार आहेत त्यात मग घराभोवती बांधलेलं छोटं तळं ज्यात आपण लिली वगैरे लावतो ती पण एक पाणथळ जागा होऊ शकते किंवा भाताची खाचरं ही एक हंगामी वेटलँडच आहे कारण त्यात आपण पूर्णवेळ उथळ पाणी साचवतो आणि त्यात भात पीक घेतो. असं काही ठिकाणी फक्त शिंगाड्यांसाठी असं तळं केलेलं दिसतं. काही ठिकाणी माशांसाठी, shrimps साठी तळी असतात या सगळ्या ठिकाणी आपल्याला पाणथळ जागा दिसतात.
नैसर्गिक पाणथळ जागांमध्ये देखील बरेच प्रकार असतात. एक म्हणजे गोड्या पाण्याच्या पाणथळ जागा आणि दुसऱ्या खाऱ्या पाण्याच्या. आता खाऱ्या पाण्यात पुन्हा प्रकार आहेत - ओपन मरीन वॉटर बॉडी ज्यात मोठे लगून्स असतात आणि काही खाडीच्या ठिकाणी जिथे समुद्राचं खारं पाणी आणि नदीचं गोडं पाणी मिसळून खारफुटीच जंगल तयार होतं. आपण नदीच्या परिसंस्थेच्या भागात जी mangroves किंवा खारफुटीची जंगल पाहिली ती वेटलँडच आहे. त्या प्रकारच्या पाणथळ जागेला swamps म्हणतात. Swamps connote wetland but these are wetlands with trees. मार्श या प्रकारात आपल्याला प्रामुख्याने गवतं उगवलेली दिसतात, तिथे झाडं किंवा canopy दिसत नाही.
अजून एक इंटरेस्टिंग प्रकार म्हणजे Myristica swamps. हे नाव का तर Myristica - रानजायफळ या प्रजातीची वृक्ष मोठ्या प्रमाणात असतात. महाराष्ट्रात नुकतीच काही महिन्यांपूर्वी अशीच एक पाणथळ जागा वन विभागाने वारसा स्थळ म्हणून घोषित केली आहे. ही गोव्याला जाताना दोडामार्ग जवळ हेवाळे नावाच्या गावी आहे. अगदी छोटी दोनचार एकर जमिनीवर ही पाणथळ जागा आहे. तिथे अनेक झरे आहेत त्यामुळे तिथे पूर्ण वर्षभर पाणी असतं. आम्ही तिथे गेलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की गोव्यात आणि केरळ मध्ये या Myristica wetlands भरपूर दिसतात पण महाराष्ट्रातली ही एकमेव आहे. आणि शिवाय ही बरीच जुनी वेटलँड आहे. आपण आख्या महाराष्ट्राचं हजारो एकर क्षेत्रफळ पाहिलं तर हा २/४ एकरांचा अत्यंत युनिक असा patch आहे जो इतर कुठेच नाहीये. म्हणजे रानजायफळीची झाडे पण फक्त इथेच दिसतात. त्यामुळे ही वेटलँड्स खरोखरच महत्त्वाचा वारसा आहे. जशी खारफुटीच्या जंगलातल्या झाडांना आधारमुळं (prop roots) असतात तशी या झाडांना knee roots असतात - ही अशी वेलांटी काढल्यासारखी दिसतात. म्हणजे त्या सगळ्या जमिनीवर सगळीकडे आपल्याला या मुळांच्या वेलांट्या दिसतात! म्हणजे ते मूळ जमिनीतून वर येतं आणि पुन्हा खाली जातं. काही झाडांना शिवाय आधारमुळं पण दिसतात. या जागेत अगदी वीतभर पाणी असतं पण वर्षभर असतं. या ठिकाणी Myristica च्या जोडीला Calophyllum, Gymnacranthera अशी इतर झाडं पण आहेत. इथे भुईचाफा पण दिसला आम्हाला.
भारतात न आढळणारी पण एक अजून इंटरेस्टिंग पाणथळ जागा म्हणजे peat किंवा bog. ह्या मुख्यतः समशीतोष्ण (temperate) प्रदेशात म्हणजे सायबेरिया वगैरे भागात दिसतात जिथे कुठलेही जैविक अवशेष म्हणजे मृत झाडं किंवा प्राणी अतिशय संथ गतीने कुजतात. त्यामुळे या पाणथळ जागेत सगळे जैविक अवशेषांचे अनेक थर जमा होत राहतात आणि त्या उथळ पाण्यात हळूहळू कुजतात. या जागा आता जरा धोक्यात आहेत कारण हे अर्धवट कुजलेले बायोमास आता इंधन म्हणून वापरले जात आहे.
जिज्ञासा: केतकी, परदेशात इंधनासाठी पाणथळ जागा नष्ट होत आहेत हा धोका आहे या जागांसाठी. आता असे अजून काही धोके आहेत का? विशेषतः भारताच्या दृष्टीने.
केतकी: बरेच धोके आहेत - त्यातला आपण ज्याचा आधी उल्लेख केला ते प्रदूषण हा सगळ्यात मोठा धोका आहे. आता प्रदूषण विविध प्रकारचं असतं - उद्योगांमधून बाहेर पडणारं पाणी, घरांमधून बाहेर पडणारं सांडपाणी, शेती असेल तर त्या पाण्यातून येणारी कीटकनाशकं, खतं हे सगळं पाणथळ जागांमध्ये येऊन मिसळतं. त्याचे अनेक दुष्परिणाम होतात.
दुसरा मोठा धोका म्हणजे reclamation चा. आता मुंबई तर सगळी असलेली Avicennia ची म्हणजे खारफुटीची जंगलं तोडूनच वसवलेली आहे. अशाच प्रकारे अनेक ठिकाणच्या पाणथळ जागा बुजवून आपण त्या वापरत होतो कारण अगदी अलीकडेपर्यंत आपल्या सरकारी कागदपत्रांमध्ये या जागा या चक्क “waste lands” म्हणून नोंदवल्या होत्या! आता चित्र बदललं आहे. आपण आधी बोललो नाही पण जगात जिथे जिथे अत्यंत वैशिष्ठयपूर्ण जाती असलेल्या पाणथळ जागा आहेत त्यांना रामसर साईट्स म्हणून मान्यता दिली जाते. ज्या अंतर्गत त्यांना विशेष संवर्धनाचा दर्जा मिळतो. हे १९७१ साली इराण मधल्या रामसर या जागी भरलेल्या अधिवेशनात कराराने ठरवलं गेलं. भारताने १९८२ साली या करारावर सही केली. आज भारतात सुमारे ४२ पाणथळ जागा या रामसर साईट्स म्हणून ओळखल्या जातात. आपलं लोणार तळं त्यात येतं. यामुळे बऱ्याच पाणथळ जागांना संरक्षण मिळतंय आता. पण तरीही शहरांमध्ये अशी एखादी मोक्याची जागा असेल तर ती टिकवणं आजही अवघड आहे.
जिज्ञासा: बरोबर आहे. मी असं ऐकलं होतं की चेन्नई मधली काही तळी बुजवल्यामुळे जो मध्यंतरी तिथे पूर आला होता त्याने जास्त नुकसान झालं कारण ते पुराचं पाणी शोषून घ्यायला काही पाणथळ जागाच उरल्या नव्हत्या.
केतकी: बरोबर आहे तुझं. वर्षानुवर्षं पुराचं पाणी सामावून घेण्याची सोयच आपण नष्ट केली तर पाणी वस्तीत शिरून नुकसान होणारच हे खरंतर साधं गणित आहे. पण अशा सेवा डावलून infrastructure ला प्राधान्य देण्याऱ्या आपल्या प्रशासनाला हे लवकरच उमगेल अशी आशा. आता पुढचा धोका म्हणजे invasive species. Invasive species म्हणजे असे प्राणी किंवा वनस्पती जे स्थानिक नाहीत आणि खूप पसरतात. आता ही स्थानिक नसल्याने त्यांना नैसर्गिक रित्या खाणारे कोणी प्राणी/शत्रू नसतात आणि या कारणामुळे त्यांच्या वाढीवर काहीही नियंत्रण राहत नाही. पाणथळ जागेत स्थानिक नसणारे मासे किंवा वनस्पती यांची अनिर्बंध वाढ झाली तर मूळ जाती नष्ट होतात कारण त्यांचे अन्न कमी होते. आता जलपर्णी (water hyacinth) ने तर आपले सगळे तलाव, नद्या व्यापलेल्याच आहेत. आता यात जर पाण्यात सांडपाणी मिसळले जात असेल तर त्याने eutrophication होते. म्हणजे पोषकद्रव्यांचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा खूप जास्त वाढतं. त्यामुळे या जलपर्णीच्या वाढीला अजून चालना मिळते. अर्थात मग अशा पाण्यात इतर पाणवनस्पती, त्यांच्यावर अवलंबून असलेले मासे, इतर जीव हे सारे जगू शकत नाहीत.
अशाच तिलापियासारख्या माशांच्या invasive species आपल्या सरकारने त्यांची फूड व्हॅल्यू चांगली आहे म्हणून आपल्या तळ्यांमध्ये सोडल्या. यात सरकारचा उद्देश चांगला होता की लोकांना चांगलं खाद्य मिळावं पण त्या जाती invasive झाल्याने त्या तळ्यांमधली बाकीची जैवविविधता नष्ट झाली. नैसर्गिक संस्थांमध्ये कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ करण्याआधी त्याचे सर्वदूर परिणाम तपासणं गरजेचं ठरतं.
जिज्ञासा: हे निर्माण झालेले धोके जर आपण सजग राहिलो तरच कमी करता येतील असं मला वाटतं. यावर उपाय म्हणून आपण वेटलँड्स तयार करू शकतो का? वेटलँड्सची primary productivity जवळपास वर्षवनांइतकी आहे. Perhaps you can’t have an Amazon rainforest near you but you can have a wetland instead.
केतकी: हो नक्कीच. जसं मगाशी म्हटलं तसं घराजवळ, शेताजवळ तळी निर्माण करता येतील. अगदी शहरांत देखील छोटे तळे तयार करता येऊ शकेल ज्याच्या कडेला पाणथळ जागा तयार होतील. या तळ्यांत मग आपण उल्लेख केला त्या पाणवनस्पती, मासे अशा गोष्टी वाढवता येतील. पण यात एक काळजी घ्यायला लागते. जर अगदी छोटं तळं असेल आणि त्यात मासे असतील तर माशांना जपावं लागतं नाहीतर पक्षी येऊन त्यांना खाऊन टाकतात!
जिज्ञासा: अच्छा! आणि अजून एक प्रश्न पडला मला - या तळ्यांमुळे डास वाढू शकतात का?
केतकी: नाही, जर का तळ्यात चांगली फूडचेन सेट झाली तर डास येत नाहीत. कारण जे चतुर (ड्रॅगनफ्लाय) असतात त्यांच्या अळ्या (larvae) वाढीच्या एका पायरीवर डासांच्या अळ्या खातात. त्यामुळे जर तळ्यात ड्रॅगनफ्लाईज असतील तर मग आपोआप डासांवर नियंत्रण राहील. हेच तर निसर्गातल्या साखळ्यांचं महत्त्व आहे !
जिज्ञासा: ग्रेट! केतकी, आज तुझ्याशी वेटलँड्स किंवा पाणथळ जागा या विषयावर गप्पा मारून मजा आली! आता पुढच्या भागात एका नवीन परिसंस्थेविषयी गप्पा मारूया!
या गप्पांचा पुढला भाग पुढच्या सोमवारी प्रकाशित होईल.
आधीचे भाग
भाग १: नातं निसर्गाशी - पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः - भाग १ - https://www.maayboli.com/node/79187
भाग २: नातं निसर्गाशी - पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः - भाग २ - https://www.maayboli.com/node/79290
भाग ३: नातं निसर्गाशी - सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम् - https://www.maayboli.com/node/79333
भाग ४: नातं निसर्गाशी: अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा - https://www.maayboli.com/node/79412
भाग ५: नातं निसर्गाशी: गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती - भाग १ https://www.maayboli.com/node/79462
भाग ६: नातं निसर्गाशी: गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती - भाग २ https://www.maayboli.com/node/79513
रोचक, माहीतीपुर्ण आणि उद्बोधक
रोचक, माहीतीपुर्ण आणि उद्बोधक
जि, चांगला लेख.
जि, चांगला लेख.
बॉग बद्द्ल थोडी अजून माहिती आवडली असती. स्वॉम्प आणि बॉग मध्ये माझा गोंधळ होतो. नक्की काय फरक असतो? म्हणजे पाण्याचा पीएच इ असले काही टेक्निकल क्रायटेरिया आहेत की माणसाला बघून हा 'बॉग' असं समजेल? (अडाणी प्रश्न आहे पण मी अजून बॉग/ दलदल बघितलेला नाही. )
बरीच माहिती आहे. फोटो अधिक
बरीच माहिती आहे. फोटो अधिक हवेत.
((बॉग म्हणजे चिखल आणि वर पाणी कमी। स्वाम्प म्हणजे चिखल आणि वर थोडे पाणी असावं.))
Wetlands/ wastelands हा धूर्त बदल आहे!!
तलावांचे उतार आणि काठ हे तलावाची फुफ्फुसं (lungs) असतात. ते काढल्यास तलाव मरतो. २०गुणिले २० मिटर तलावाचे क्षेत्रफळ ४०० चौरस मिटर्स होते. याच तलावास सर्व बाजूने पाच मिटरसचा काठ उतार असला तर फक्त काठाचे क्षेत्रफळ ५०० चौरस मिटरस होते. तलावातली माशांची बारीक पिल्ले या काठावरच मोठी होतात. कासवं या काठावरूनच बाहेर येतात आणि अंडी घालतात. काठच सूर्याची ऊर्जा अधिक शोषतो. तर असा काठ निरुपयोगी ठरवून फक्त तलावापुरती भिंत बांधून बाजूला पेवर ब्लॉकचा प्रोमिनेड ( चालण्यासाठी मार्ग)बांधतात. वरती सोनेरी दिवे रात्रभर चालू ठेवतात. यास beautification of lake तलावाचे सुशोभिकरण म्हणतात. उदाहरणार्थ ठाणे जिल्ह्यातील अनेक तलाव. निळजे तलाव.
तलावाच्या सभोवार डोंगर असले की त्याच्या उतारावर बेस्ट लेक व्ह्यू हॉटेल्स उभारतात. सर्व सांडपाणी उतारामुळे अर्थातच तलावात येते. शिवाय पाण्याचा उपसा. साबण आणि डिटर्जनटसने हाई नाईट्रोजन पाण्यायत येतो. उत्तराखंड - कुमाऊ - साततालातले फक्त नैनीताल मोठा असल्याने दिसतो आहे. बाकीचे गेले.
वाचलेले तलाव हे संरक्षित क्षेत्रांत आहेत. उदाहरणादाखल विहार आणि तुळशी तलाव, मुंबई. यांंच्या काठावरच्या अर्धा एक फुट पाण्यात प्रचंड बारकी मासळी आहे. तानसा तलाव ,शहापूर तालुका,ठाणे जिल्हा.
Srd, प्रतिसाद आवडला.
Srd, प्रतिसाद आवडला.
नेहमीप्रमाणेच सुंदर माहिती.
नेहमीप्रमाणेच सुंदर माहिती.
एस आर डी, छान माहिती.
छान चालू आहे जिज्ञासा. वाचतो
छान चालू आहे जिज्ञासा. वाचतो आहे.
Srd, प्रतिसाद आवडला.
Srd, प्रतिसाद आवडला.
काही वर्षांपुर्वी असा सुशोभीकरणाचा प्रकार पाषाण तलावासंदर्भातही घडायला सुरुवात झाली होती पण तज्ञांनी आणि काही सुजाण जागरुक नागरिकांनी हरकती घेतल्यावर थांबला. तिथे अजूनही स्थलांतरित पक्षी येत असतात.
सीएमई एरियात मानव निर्मीत दोन तीन तलाव आहेत. ते तर स्थलांतरित पक्ष्यांकरता नंदनवनच ठरत आहे.
सीएमई मधेच एक नाला आहे त्यात आजूबाजूच्या गावातून येणारे सांडपाणी नैसर्गिकरित्या झाडझाडोरा लावून वगैरे बर्यापैकी स्वच्छ आणि शुद्ध स्वरुपात वाहत असते.
जि, तू केतकीला देखील ह्याबद्दल विचारून बघ तिला नक्की तपशीलवार माहीत असेल.
धन्यवाद हर्पेन, सी, srd, हीरा
धन्यवाद हर्पेन, सी, srd, हीरा, सुनिधी, आणि भा!
सी, माझ्या माहितीप्रमाणे swamp म्हणजे जिथे झाडं असतात अशी पाणथळ जागा. पीट/बॉग मध्ये झाडे नसावीत. तरी एकदा केतकीला विचारते.
Srd, हर्पेन, खरंय, आपण केलेलं सुशोभीकरण हा एक थ्रेटच आहे नद्या आणि तलावांसाठी माझ्या सौन्दर्याच्या कल्पना किती sterile आणि निसर्गाशी फटकून आहेत याची मला कल्पना नव्हती इकॉलॉजी शिकायला लागेपर्यंत!
केतकीला पुण्याच्या तलावांबद्दल विचारते. आणि जमले तर थोडे फोटो देण्याचा प्रयत्न करते.