क्यू याम किम सी s s सर s s क्यू याम किम सी s s असं न समजणाऱ्या एलियन भाषेत रस्त्यावरच्या बायका ओरडत होत्या. कडेला बरीच गर्दी जमली होती. मी कुतूहलाने बाईक रस्त्याच्या कडेला थांबवली आणि काय प्रकार आहे, हे पाहण्याचा प्रयत्न करू लागलो. तोपर्यंत आकर्षक, गोल चेहरेपट्टीची, चपळ ठेंगणी म्यानमारी युवती तुरुतुरू चालत माझ्याकडे आली. उन्हातान्हात राबून रापलेला पीतवर्ण गव्हाळ झालेला. डोक्यावर मोठी बांबूची म्यानमारी टोपी. दोन्ही हातात भलेमोठे रसरशीत टोमॅटो घेऊन क्यू याम किम सी ss सर ss असं म्हणत ती पुढे आली. रस्त्याच्या बाजूला टोमॅटोचे ढीग मांडून काही बायका बसल्या होत्या. आत्ता कुठं माझ्या हेल्मेटधारी डोक्यात प्रकाश पडला. 'टमाटं घ्या वं सायेब!' असं म्यानमारी भाषेत ती ओरडत होती. बाईकवरचा हा परदेशी मासा गळाला लागावा म्हणून तिची लगबग सुरू होती. लालबुंद रसरशीत टोमॅटो पाहून तोंडाला पाणी सुटलं.
त्या रसरशीत टोमॅटोचा एक वाटा उचलला आणि कोरे करकरीत म्यानमारी कॅट त्या टोमॅटो सुंदरीच्या हातावर ठेवले. कॅट पाहून टोमॅटोची चमक तिच्या चेहऱ्यावर उमटली. एवढे रसरशीत टोमॅटो कुठं पिकवले जातात? असं आमच्या आमच्या गाईड, 'ज्यु टिन' ला विचारला तेव्हा, "इथंच, पाण्यावरच्या तरंगत्या शेतात" असं उत्तर मिळालं.
"काय?" हेल्मेट खाजवत मी विचारलं.
"सांगतो!" असं म्हणत टोमॅटोचा एक भलामोठा तुकडा त्याने सफरचंदासारखा दाताने तोडला. पक्षांतर करणाऱ्या आमदारासारखा त्याचा एक थेंब ओठावरून हनुवटीकडे ओघळला. बेडकाने लांब जिभेने किड्याला तोंडात ओढावं तसा तो थेंब सर्रकन स्वगृही परत आणत त्याने ‘टोमॅटो आख्यानाला’ सुरुवात केली.
म्यानमारच्या या राजधानीच्या शहरापासून अडीचशे किलोमीटर वर "इन्ले" नावाचं तळं आहे. ह्या तळ्याचा आकार तरी किती असावा, तर तब्बल ११६ वर्ग किलोमीटर. समुद्रसपाटीपासून २९०० फूट उंचीवरील त्या तळ्याची सरासरी खोली मात्र फक्त ७ फूट आहे. तळ्याच्या पाण्यात वाढणारे पानफुटी गवत लहानलहान बोटीतून गोळा करून पाण्यावर लांब पट्टीसारखा ढीग केला जातो. मग तरंगणाऱ्या ह्या ढिगावर मातीचा पातळ थर देऊन त्यावर शेती केली जाते. ह्या शेतीला "येचांग" असं म्हणतात. पाण्याच्या लाटांबरोबर डोलणारी शेतं मनोहारी दिसतात. ही शेतं वाहून जाऊ नयेत म्हणून तळ्यात बांबूची खुंटी गाडून म्हैस बांधावी तशी बांधून ठेवतात. एखाद्या बिलंदर शेतचोराने खुंटीचा दोर कापून म्हैस पळवावी तशी शेती पळवण्याच्या घटनाही अधूनमधून घडतात. आपल्याकडे विहीर चोरीला गेल्याचं ऐकलं होतं. पण शेताची चोरी पहिल्यांदाच ऐकत होतो.
पाण्यावरच्या ह्या शेतात म्यानमारी बळीराजा पाण्यासारखा घाम गाळतो. ही शेतं कसताना बरेच शारीरिक श्रम होतात. शेताच्या बाजूला खोपट्यात तो राहतो. लहानग्या निमुळत्या बोटीतून तो शेतीकामात मग्न असतो. त्याची बोट वल्हवायची तऱ्हाही जागावेगळीच. एक पाय बोटीवर ठेवून दुसऱ्या पायाने लांब बांबूचं वल्हं तळ्याच्या पोटात खुपसत तो बोटीला पुढे ढकलत नेतो. हे करताना तो लंगडीलंगडी खेळल्यागत किंवा एका पायाने बांबूवर कसरत करणाऱ्या डोंबाऱ्याच्या पोरागत वाटतो. अशा या पायाळू जलपुत्राचं दोन वरंब्यामधून सराईतपणे फिरत शेतकाम सुरू असतं.
तुम्ही शेताची सीमा कशी ठरवता? इथं बांधावरून भांडणं होत नाहीत का? माझ्या डोक्यातल्या भारतीय किड्याने प्रश्न कुरतडला. यावर "नाही!" असं उत्तर मिळालं. शेजारी सहसा भांडत नाहीत. उलट एकदुसऱ्याला निंदण्या-खुरपण्यात मदत करतात. मी विचार केला, तसंही पाण्यातल्या शेतातला बांध कोरणार तरी कसा? आपल्याकडे 'शेत विकलं तरी बेहत्तर, पण बांधाची केस नाही हरणार!' अशा निग्रही बांध्याच्या लोकांचं उदाहरण समोर असताना, दात कोरावा एवढ्या सोप्या पद्धतीने बांध कोरायचा प्रॉब्लेम इथं सुटला होता. पाण्यात शेती करूनही शेजाऱ्याला पाण्यात न पाहणाऱ्या म्यानमारी शेतकऱ्याचं अप्रूप वाटलं. "निंदकाचं घर असावं शेजारी" ही म्हण इथं "निंदणाऱ्याचं घर असावं शेजारी" अशी झाली होती.
या तरंगणाऱ्या शेतात सत्तर टक्के पीक टोमॅटोचं घेतलं जातं. उरलेल्या तीस टक्क्यांत बीन्स, फुलशेती आणि काकडीसारखे वेलवर्गीय पिकं घेतली जातात. या पाण्याचा पीएच म्हणजे सामू आहे तब्ब्ल ७.८ ते ८.०. एवढ्या क्षारीय पाण्यात वाढणारी पिके म्हणजे चमत्कारच म्हणावा लागेल. पण हा मोठा चमत्कार घडवतात लहानगे सूक्ष्मजीव. पाणगवताच्या सेंद्रिय पदार्थांचं विघटन करून, ऑरगॅनिक अॕसिड तयार करून पिकाच्या मुळाजवळ ते आम्लता तयार करतात. पाणवनस्पतीचं हळूहळू कंपोस्ट खतात रूपांतर करत हे सूक्ष्मजीव पिकाला अन्नद्रव्याचा आयुष्यभर रतीब घालत असतात. कोणतेही खत, कीटकनाशक न वापरता वाढलेली लालभडक टोमॅटोची झाडं 'हवा में उडत जाय रे, मेरा लाल दुपट्टा मलमल का' असं गात पाण्याच्या लाटेबरोबर आनंदाने डोलत असतात. आपल्याकडे श्रीनगरला दल तळ्यात अशा प्रकारची शेती होते. मणिपुर मधेही पाण्यावर तरंगणारे गार्डन आहे. पण म्यानमार मधील ही तरंगती शेती फार मोठ्या प्रमाणात आणि तंत्रशुद्ध प्रकारे केली जाते.
जैवविविधतेच्या बाबतीतही हे 'इन्ले' तळं जगात भारी आहे. इथं ३५ प्रकारचे मासे आणि ४५ गोगलगाईंच्या प्रजाती आढळतात. त्यातील निम्म्या प्रजाती जगात फक्त इथंच वास्तव्याला आहेत. देशविदेशातील २०,००० पक्षी वर्षभरात या तळ्याला भेट देतात. पक्ष्यांचं बरंय, ते कोणत्याही पक्षात नसल्याने कुठल्याही सीमेच्या बंधनात न अडकता, पासपोर्ट, व्हिजाच्या कटकटींशिवाय त्यांना जगभर फिरत येतं.
एखाद्या स्वर्गसुंदरीचा सुंदर चेहरा कुणीतरी बेपर्दा करावा आणि सर्वांच्या नजर चुंबकासारख्या तिच्याकडे आकर्षित व्हाव्यात अगदी तसंच १९६० मध्ये घडलं. मार्टिन मीचालॉन या भूगोल शास्त्रज्ञाने या तळ्यावरील त्याचा प्रबंध १९६० मध्ये प्रकाशित करून आपलं शास्त्रीय नाक खुपसलं आणि जगाच्या नजरा ह्या वर्जिन सौंदर्याकडे वळल्या. १९९२ ते २००९ या सतरा वर्षांत तळ्यावरच्या तरंगत्या शेतीत ५०० टक्क्यांनी वाढ झाली. तळ्यातील पाणी सुकलंय असं वाटायला लागलं. आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी वाढल्याने पर्यटकांचे पाय इकडे वळू लागले. गेल्या शतकात हिऱ्याच्या खाणींसाठी या हिऱ्यासारख्या देशाची वाट लावणारा गोरा साहेब आपल्या मडमेसह सुट्ट्या घालवायला तळ्याच्या गावात येऊ लागला. १९९२ साली वर्षाकाठी २६,००० पर्यटक इथं यायचे. ती संख्या २०१३ मध्ये ८,४२,००० एवढी फुगली. साहेब येणार म्हटल्यावर मोठ्ठाली आलिशान हॉटेलं हवीच. मग हॉटेलसाठी २५० एकर जागा जंगल तोडून साफ केली गेली. जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याच्या शर्यतीत रासायनिक खते आणि कीटकनाशकांचे विषारी फवारे उडू लागले. पिकाबरोबर पाण्यालाही रसायनं पाजली जाऊ लागली. मासेमारीचं प्रमाण वाढलं. माशांच्या काही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. वल्हवणाऱ्या बोटी कमी झाल्या. डिझेलवरील बोटींची घरघर वाढून तळ्याच्या आरोग्याला घरघर लागलीय. हवेचं, आवाजाचं प्रदूषण वाढतंय.
तरंगणाऱ्या शेतात पाय आणि डोकं जमिनीवर ठेवून आपल्या मेहनतीने बहारदार पिकं काढून आपण किती पाण्यात आहोत, हे दाखवणाऱ्या बळीराजाला कॉर्पोरेट जग पाण्यात पाहत होतं. ह्या नैसर्गिक सौंदर्याला व्यावसायिक ग्रहण लागलं होतं.
kramashaha ahe ka?
kramashaha ahe ka?
@ नानबा.... नाही
@ नानबा.... नाही
सुंदर माहिती आहे.परत एकदा
सुंदर माहिती आहे.परत एकदा वाचते.
रोचक ! धन्यवाद ह्या लेखाकरता.
रोचक !
धन्यवाद ह्या लेखाकरता. शेवट वाचून वाईट वाटले.
नवीन माहिती मिळाली.छान आहे
नवीन माहिती मिळाली.छान आहे लेख.
रोचक माहिती!
रोचक माहिती!
छान माहितीपूर्ण आणि तरीही
छान माहितीपूर्ण आणि तरीही खुसखुशीत लेख.
अजून लिहीत रहा!
रोचक माहिती!
रोचक माहिती!
पायाळू जलपुत्रांचे काम झकास
पायाळू जलपुत्रांचे काम झकास
आपल्याकडे पूर्वोत्तर भागात काही ठिकाणी करतात अशी शेती.
शेवट वाचून वाईट वाटले.
फारच मस्त माहिती!
फारच मस्त माहिती!
नवीन माहिती मिळाली. मानवी
नवीन माहिती मिळाली. मानवी हव्यास काही संपत नाही. शेवट वाचून वाईट वाटलं.
माहिती छान आहे. शेवट वाचून
माहिती छान आहे. शेवट वाचून वाईट वाटले.
लेखात उपमांचा जरा अतिरेक झाला आहे मात्र.
नवीन माहिती! शेवट वाचून वाईट
नवीन माहिती! शेवट वाचून वाईट वाटले.
@देवकी, पराग, वर्णिता,
@देवकी, पराग, वर्णिता, जिज्ञासा, अनिंद्य, मंजूताई, व्यत्यय,मानव पृथ्वीकर, धनुडी, हर्पेन, mi_anu, नानबा ...प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद
छान माहिती.
छान माहिती.
छान माहितीपूर्ण लेख.
छान माहितीपूर्ण लेख. नावाड्यांचे फोटो अतिशय सुंदर आहे. लालभडक टोमॅटोचे फोटो बघायला अजून चांगले वाटले असते
नविनच माहिती कळली. शेवट
नविनच माहिती कळली. शेवट वाचून वाईट वाटले. होणारा र्हास थांबून, शाश्वततेकडे वाटचाल व्हावी म्हणून तिथे काही प्रयत्न सुरु आहेत का?
फारच सुंदर लेख आणि माहिती
फारच सुंदर लेख आणि माहिती
शेवट वाचून खरेच वाईट वाटले..
चांगला लेख! धन्यवाद. अशा
चांगला लेख! धन्यवाद. अशा शेतीबद्दल कधीही वाचले नव्हते. शेवट वाचून खरंच वाईट वाटले.
@स्वाती...
@स्वाती...
म्यानमार सरकारने इन्ले तळ्याचा संवर्धन पंचवार्षिक योजना राबवायला सुरवात केलीय. बघूया त्यातून काय परिणाम साधला जातो ते.
Photos छान आले आहेत.
Photos छान आले आहेत.
हा लेख मस्त झालाय.
फोटोग्राफी वर पण एक लेख लिहा...म्हणजे कशी सुरुवात केली, काय युक्त्या शिकल्या..cameras... वाचायला आवडेल.
छान माहिती
छान माहिती
छान माहितीपूर्ण लेख ,
छान माहितीपूर्ण लेख , टोमॅटोचा पण फोटो टाकायचा की.
छान माहिती आणि सुंदर फोटो..!!
छान माहिती आणि सुंदर फोटो..!!
नवीन माहिती छान
नवीन माहिती
छान
@फलक से जुदा....
@फलक से जुदा....
मी तसा शिकाऊ फोटोग्राफर आहे. हे फोटो आमच्या म्यानमारच्या मित्राकडून मिळाले आहेत.
@सरनौबत, श्री ...
@सरनौबत, श्री ...
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
माझ्या या बाईक प्रवासाला आता सहासात वर्षे झाली आहेत. जे फोटो सापडले ते टाकलेत
तरीही मी टोमॅटो चा फोटो शोधून टाकायचा प्रयत्न करतो.
@ mrunali.samad, फलक से जुदा,
@ mrunali.samad, फलक से जुदा, निलुदा, रूपाली विशे - पाटील, श्री, प्रसाद70, वर्षा, ऋन्मेऽऽष, स्वाती२, सरनौबत, mrunali.samad .......
आपल्याला लेख आवडला हे वाचून छान वाटलं.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद