बघता बघता, भगवद्गीतेचे अंतरंग समजून घेण्याच्या प्रयत्नात आता आपण जवळपास अर्धे अंतर पार केलं. १८ अध्यायांच्या गीतेच्या मध्यभाग म्हणजे नववा अध्याय असं मानायला हरकत नाही. (याच अध्यायातील १३ वा आणि १४वा श्लोक हे गीतेच्या मध्यभागी येतात. त्याबद्दल पुढे कधीतरी) 'राजविद्याराजगुह्ययोग' असे भले मोठे नाव असणारा हा अध्याय, अक्षय कुमारच्या ओह माय गॉड (Oh My God) या सिनेमामुळे अचानक प्रकाशात (मराठीत - लाईमलाईट!) आला. या सिनेमात परेश रावल आपल्या युक्तीवादात नवव्या अध्यायातल्या आठव्या श्लोकाचा उल्लेख करतो. त्यामुळे या अध्यायाच्या वाचकात अचानक वाढ झाली! पण मग लोक केवळ या अध्यायाचेच भाषांतर किंवा निरुपण वाचून गीतेत '...असे म्हटले आहे' किंवा '...तसे म्हटले आहे' असे सांगायला लागले. गंमतीचा भाग असा की बाकीचे अध्याय सोडून एकदम नवव्या अध्यायात जे म्हटले आहे त्याचा अर्थ लावल्याने समजापेक्षा गैरसमज अधिक फोफावले!
जिना चढताना एकदम नववी पायरी घ्यावी आणि पाय अवास्तव ताणल्याने पडावे किंवा अवघडावे तशी अनेकांची अवस्था झाली! आपण आधी पाहिल्याप्रमाणे गीतेच्या १८ अध्यायांचा सोपान ही अतिशय जाणीवपूर्वक रचलेली विचारांची साखळी आहे. कोणत्याची श्लोकाचा त्याच्या आधीच्या आणि चालू अध्यायाच्या योग्य संदर्भाशिवाय उल्लेख केल्यास त्याच्या अर्थाचा विपर्यास होण्याचा धोका असतो. हे आपण मागच्या अध्यायात पाहिलेच आहे. (पहा – अक्षरब्रह्मयोग). या अध्यायातही अशी उदाहरणे मिळतील. वानगीदाखल नवव्या अध्यायातले एक उदाहरण घेऊ.
आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाला एलआयसी (LIC) चे बोधवाक्य ठाऊक आहे.
योगक्षेमं वहाम्यहम्।।
या उद्गारांचा शब्दशः अर्थ –
‘मी (अहम्) उपजिविकेचा भार (योगक्षमम्) वहन करेन (वहामि)’
असा होतो.याचा अर्थ तुमच्या उपजिविकेचा भार एलआयसी वाहणार आहे. आता हे बोधवाक्य वाचून जर प्रत्येकजण एलआयसीच्या दारात उभा रहायला लागला तर त्याला काय म्हणावे!!?
हे बोधवाक्य आहे. त्यातून बोध घ्यायचा आहे गैरसमज नव्हे. बोध घ्यायचा तर त्या वाक्याचा ससंदर्भ अर्थ ध्यानात घ्यायला हवा.
पूर्ण श्लोक असा आहे
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।
जे अनन्य प्रेमी भक्त माझे (परमेश्वराचे) निरंतर चिंतन करीत (मला) निष्काम भावाने भजतात, त्या नित्य चिंतन करणाऱ्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो.
म्हणजे काय, तर जे लोक नित्यनियमितपणे एलआयसीची भक्ती करतात (पॉलिसीचे हप्ते भरतात) त्यांच्या उपजिविकेची काळजी एलआयसी करेल. जे अर्थातच खरे आहे. पण केवळ अर्धेच वचन वाचून त्याचा अर्थ घ्यायला जाणाऱ्याची फजिती होणे सहाजिकच नाही का?
(पुलंना घर दाखवणारा कुळकर्णी जेव्हा ‘हा वर जायचा रस्ता! ’ असे म्हणतो तेव्हा घर दाखविण्याचा संदर्भ लक्षात न घेता अर्थ घेतला तर भलताच समज व्हायचा... (पहा – मी आणि माझा शत्रुपक्ष)
आता सिनेमातल्या श्लोकाकडे पहा
प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः । भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात्।
आपल्या मायेचा अंगीकार करून प्रकृतीच्या ताब्यात असल्यामुळे पराधीन झालेल्या या सर्व भूतसमुदायाला मी वारंवार उत्पन्न करतो.
येथे ‘मी उत्पन्न करतो’ इतकाच अर्थ घेऊन 'सृष्टीची उत्पत्ती आणि नाश भगवंताच्या इच्छेने होतो' असे म्हणणे हे केवळ अर्धसत्य झाले. व्यक्तीच्या कर्मानुरुप गती त्याला प्राप्त होते हे श्रीकृष्णाने आधीच्या अध्यायात सांगून ठेवले आहे. तसेच या आधीच्या सातव्या श्लोकात (९-७)
‘कल्पाच्या किंवा युगाच्या आरंभी संपूर्ण भूतमात्र माझ्यात विलिन होते आणि मी त्याचे पुनः सर्जन करतो’
असेही श्रीकृष्ण सांगतो. याचा अर्थ व्यक्ती जसे कर्म करेल तसे फळ त्याला मिळेल.
संपूर्ण सृष्टीचक्राला हा नियम लागू पडतो. जरूरीपेक्षा जास्त वाढलेली वृक्षाची फांदी बुंध्याला वजन न पेलल्यामुळे तुटुन पडते. आवश्यकतेपेक्षा जास्तीचे अतिक्रमणाने निसर्गाचा समतोल ढळतो व त्याच्या परिणामस्वरुप नैसर्गिक आपत्ती येते. म्हणूनच बेसुमार वृक्षतोड, खाणकाम किंवा प्रदुषण करणाऱ्या माणसांच्या समुहाला पूर, ज्वालामुखी, भूकंप किंवा त्सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागते हे त्याच्या स्वतःच्या कर्माचे फळ नव्हे काय? तेथे ईश्वराच्या शक्तीला दोष देणे, तेही एका वेगळ्या काढलेल्या श्लोकाच्या संदर्भाने, हे अयोग्य आहे.
मौजेचा भाग म्हणजे सिनेमाच्या अंतिम भागात प्रत्यक्ष देवच माणसाच्या मूर्खपणाचे वाभाडे काढतो. श्रीकृष्ण (कुमार अक्षय!) श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला भेद सांगतो. धर्माच्या नावाखाली मानवाने देवावर कसे अतिक्रमण केले हे तो दाखवून देतो. म्हणूनच मग सृष्टीच्या सर्जनामागचे मूळ तत्व एकच आहे हे विसरून अनेक धर्म, अनेक पंथ आणि अनेक देव(!) कसे निर्माण केले जातात, याच निर्मात्यांचे भाऊबंद असणारे उरलेले मानव याला कसे बळी पडतात हेही तो सांगतो! जे श्लोकाचा, धर्मग्रंथाचा आणि पर्यायाने ईश तत्वाचा विपरीत अर्थ खरा समजून अंधश्रद्धेत गुरफटून जातात. त्यांच्या विनाशाला ते स्वतः च कारणीभूत ठरतात देव नाही.
सिनेमात शेवटी श्रीकृष्ण जे सांगतो ते गुपित म्हणजेच राजविद्या-राजगुह्य-योग. त्याबद्दल अधिकचे पुढील भागात...
छान लिहिले आहे. पुढील
छान लिहिले आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत..!!
छान भाग.. अजून थोडे मोठे भाग
छान भाग.. अजून थोडे मोठे भाग वाचायला आवडतील.