निखळ आनंदास-गोविंदासही

Submitted by अस्मिता. on 27 May, 2021 - 17:03

निखळ आनंदास-गोविंदासही

कोणे एकेकाळी.....
अभिनेता गोविंदा मला कधीही क्लासी वाटायचा नाही. एवढंच काय ज्यांना तो आवडतो तेही क्लासी नाहीत हेही मी ठरवले होते. स्वतंत्रविचारसरणीमुळे सगळ्यांचा क्लास मीच ठरवायचे. बेसिकली मीच एकटी क्लासी यावर माझा अढळ विश्वास होता. अजूनही जुन्या अस्मिताचा रेसेड्यू माझ्यात आहे व तो अधूनमधून फणा काढतोच.

गोविंदाचे डोळे हे चंचल नेत्र होते, असे लोक मला आजही विश्वासू वाटत नाहीत ,जणू काही मला गोविंदासोबत इस्टेटीचे व्यवहारच करायचे होते. माझ्या भावाला गोविंदा आवडायचा. तो व्यापार खेळताना जेव्हां वडिलोपार्जित धन रूपये दोन हजार पाचशे पन्नास जिंकायचा तेव्हा त्याला हर्षवायू व्हायचा. इथे मी बँकेशेजारी मांडी ठोकून बँकेतला अर्धा माल हडप करायचे त्याला कळायचं सुद्धा नाही.

शिवाय तो इतका भोळा होता की त्याला फसवणं फार सोपं होतं , आळशी असल्याने मला अवघड कामापेक्षा सोपे काम आवडते म्हणून मी त्याला जन्मभर फसवलेलं आहे. नीतिपाठ दिले नसते तर मी कुठल्या कुठे गेले असते आणि आज नेटफ्लिक्सने माझा माहितीपट लावला असता. असो. (बायदवे, हे 'असो' किती सत्तरीतले वाटते नं ,असो !)

या दोन हजार पाचशे पन्नासात होणाऱ्या हर्षवायूमुळे तो अल्पसंतुष्ट आहे , गोविंदा न आवडला तर नवलच हा विचार मी मनात करायचे. माझ्या सगळ्याच भावांना गोविंदा फार आवडायचा , त्यामुळे मला आमच्या घरी व आजोळी सुटका नसायची, त्यांनी माझा मेंदू धुवायचा पुष्कळ प्रयत्न केला पण मी नर्मदेतल्या गोट्यासारखी अभेद्य राहिले. मी एखाद्या माणसाबद्दल एकदा मत बनवले की नंतर माझे मत बदलले असले तरी मी ते कबूल करायचे नाही. त्याने मला कमीपणा येईल असे वाटायचे ,कमीपणापेक्षा खोटारडेपणा अहं पोषणासाठी पूरक व बुद्धीसाठी आव्हानात्मक आहे. त्यामुळे मी वाका-वाका करेल पण मोडणार नाही या तत्वावर जगायचे !!

आजोळी गेल्यावर मात्र त्याला सोबत म्हणून चार भावंडं मिळायची ,सगळी मुलं. बहिणी खूप लहान किंवा खूप मोठ्या होत्या. मगं मला एकटीने खिंड लढवावी लागायची. सारखं गोविंदाची गाणी आणि सिनेमे ,आनंदाने एकमेकांना ओरडून ओरडून हाका मारून त्या वाड्यात असतील तर या वाड्यात रंगीत टिव्हीवर बघू अशा गोविंद-योजना व्हायचा.

क्वचितच लाइट असायची, म्हणजे असल्यावर आवर्जून सांगावे अशी परिस्थिती. आमच्या घरी परतल्यावर रात्री जेवताना ताटातलं अन्न दिसायचं ह्याचंच काही दिवस अप्रुप वाटायचं. पण मिणमिणत्या चिमणीच्या प्रकाशात केलेल्या अंगतीपंगतीच्या आनंदामुळे प्रेमळ सोबतीची किंमत कुठल्याही भौतिक गोष्टींपेक्षा जास्त असते हे आता कळतयं !!

भर उन्हात बाहेर खेळायला जाता आले नाही की दुपारी घरी टिव्ही बघणे व्हायचेच. पत्ते, व्यापार लपाछपी यात तास दीड तासातल्या क्वॉलिटी टाइम मधली क्वॉलिटी संपून भांडणे सुरू व्हायचेच. तुझा पत्ता जळाला , तू पैसे चोरले , बुडवले , चार पडले होते तरी जेल नको म्हणून खोटंच सहा म्हटले , तू मला धप्पा जोरात देऊन स्कोअर सेटल केलास, माझ्यावरंच का राज्यं सारखं अशा ना ना तर्‍हा असायच्या. असे राडे सुरू झाले की मामा टिव्ही बघण्याचा आग्रह करायचा. बाकी बायाबापड्या ज्यानं टिव्हीचा शोध लावलायं त्याचं भलं चिंतायच्या. कुणीतरी 'काय माय कडंकडं करतात लेकरं आम्ही नव्हतो अशे' हे सुविचार रिपीट करायचे. सगळ्याच मुलांना ऐकावे लागणारे त्रिकालाबाधित सत्य...!!

तर लाइट असणे म्हणजे या छोट्या खेड्यात कपिलाषष्ठीचा योग , त्यात टीव्हीवर गोविंदाचा सिनेमा लागणे म्हणजे आधीच 'मर्कटा त्यात मद्य प्याला' गत व्हायची. कोणीच खेळायला नसल्याने मी पहायचे अगदीच आनंदाने पहायचे पण पाहिल्यासारखं करतेयं असं दाखवायचे.

'राजाबाबु' सारखा आचरट सिनेमा किती वेळा पाहिलायं गणतीच नाही. तोच कशाला सगळेच नंबर वन माळेतले सिनेमे अनेक वेळा बघत हसून धमाल केलेली आहे. तो सुट्ट्यांचा एकत्र वेळ बरेचदा अशा हलक्याफुलक्या सिनेमांमुळे व त्या मुग्ध /बावळट सहवासाने मजेदार गेलायं. आताही पुन्हा पहाते तेव्हा मनाने त्या आश्वस्त काळात जाऊन येते. उगाच !!

कधीतरी 'उगाच' वाटणाऱ्या गोष्टीही कराव्यात, मन रमतं. बरेचदा त्या गोष्टीपेक्षा ती गोष्ट कुणासोबत केली हेच महत्त्वाचे ठरते , म्हणजे ते फक्त निमित्तं असते. प्रत्येकाला असं निमित्तं हवं असतं , ज्यात पुन्हा लहान व्हावं, पुन्हा वेडं व्हावं.
गोविंदा मला आवडतो का याचे उत्तर अजूनही मला माहिती नाही , आणि मला जाणूनही घ्यायचे नाही. जाणून घ्यायला वापरावी लागणारी बुद्धीही खर्चायची नाही , निर्मळ आनंद घ्यायचा. खरंतर हा लेख त्या गोविंदाबद्दल ही नाही फक्त निर्भेळ आनंदाचा कुठलाही क्षण 'गोविंद' होऊ शकतो. कधीतरी मोठमोठ्या तात्विक गोष्टींचा कंटाळा येतो, कशाचा ताळमेळ कशाला रहात नाही, आपण माणूस आहोत की घाण्याला लावलेला बैल वाटत रहाते. तेव्हा असे एकदोन क्षणही मनाला रम्य अशा आश्वस्त काळाची सहल करून आणतात.

कधी उठताबसता पायाला कळ लागली किंवा चालताचालता ठेच लागली की आई 'गोविंद, गोविंद' म्हणायची तेव्हा मी तिला नेहमी गोविंदाच का कधीतरी 'शाहरूख खान-शाहरूख खान किंवा अक्षयकुमार-अक्षयकुमार' म्हण की
म्हणायचे, तसं ती 'परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला' नजरेने बघायची व "पाप लागेल गं मला" म्हणायची. पापपुण्य वगैरे आहे की नाही माहिती नाही पण हा लक्ष विचलित करण्याचा एक उत्तम मार्ग आहे हे आता कळतयं. शेवटी कधीतरी एक उगाच वाटणारा निर्भेळ आनंदाचा क्षण सुद्धा माणसाला असंच तवानं करून जातो. तो कसा शोधावा हे आपण आपलेच ठरवावे.

Because, sometimes greatest moments in life are the simplest..!! आहे त्या वेडेपणाला/बालपणाला सांभाळून घेऊ ,आणि पुरवून पुरवून वापरू , मुग्ध आहे पण अमर्याद नाहीये ते !!

--

अटी त.टी. हे लेखन विनोदी आहे का हलकेफुलके ललित ते कळत नाहीये. विनोदी म्हणजे अर्चना पुरण सिंह आणि हलकेफुलके म्हणजे मंद हसणारे नारदमुनी , किंवा दोन्हीच्या मधले... तुम्हीच ठरवा. Wink

आभार
©अस्मिता

चित्र टाकायला आवडतं (वेमा योग्य नसल्यास कळवणे) आंतरजालाहून साभार #कूलअँडस्मार्ट.कॉम.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol सही आहे!! धमाल आली वाचून.
People are raising their expectations
Go on and feed them, this is your moment
No hesitations
अजून लिहायचं ना जरा मोठं!!! (गोविंदाबद्द्ल नंतर दुसरी मोठी पोस्ट टाकते.)

काय भारी लिहितेस गं तू. मी पण अनवाइंड व्हायचे असेल तर जिस देश में गंगा रहता है बघते. कधीही आणि कितीही वेळा Wink

मस्त वाटलं.
राजा बाबू होता खरा मनोरंजक.त्यातले सगळे अचाट अतर्क्यपणे कबूल करुन पण.

हायला गोविंदा..
नेहमी प्रमाणेच छान लिहीलं आहेस.. मला तो शोला और शबनम आणि साजन चले ससुराल मधे जबरदस्त वाटलेला..
तुझं जसं गोविंदा बाबत झालं तसं माझं सन्नी पाजी विषयी व्हायचं.. फार सोज्वळ वाटायचा म्हणून आवडायचा मला ..पण काय अगदी बेंबीच्या देठापासून खच्चून ओरडायचा..व्हिजाबिजा नसला तरीही पाकिस्तनात जाऊनही ओरडायचा.. Happy

हायला गोविंदा.. >> च्या मायला तू कोण - ह्या एका वाक्याने गोविंदाने अंदाज अपना अपना मध्ये तो सीन खाल्ला आहे.

कित्येक गाणी गोविंदाने केवळ चेहऱ्यावरच्या हावभावांमुळे बघणेबल बनवली आहेत. केंदी पॉ हे असंच एक उदाहरण.

छान लिहिलं आहे. शीर्षक वाचून रेखाचं 'निर्मल आनंद' आठवलं.

मस्त लिहिलं आहे.
'निर्भेळ आनंद ' वरून आठवलं. लहानपणी सुट्टीच्या दिवशी एखाद् दिवशी घरी भेळ होत असे. मग वडील आम्हांला हाकारायचे 'चला रे निर्भेळ भेळ खायला'. आणि स्वतः: डुलू डुलू हसायचे. ( त्यांचं पोट थोडसं सुटलं होतं). आम्ही लोकांनी कम्पल्सरी हसणं मस्ट असायचं. नाही हसलो तर त्यांचा चेहरा पडायचा. पुढे ह्यामागची त्यांची ती आनंद वाटून (शेअर) घेण्याची धडपड जाणवू लागली आणि आम्ही एकमेकांना टाळ्या वगैरे देत हसू लागलो.
आता जाणवतंय की आमचं ते खोटं हसणं त्यांना कळत होतं आणि त्यांचा साधासुधा विनोद खाली पडू न देता त्यांना आनंदी ठेवण्याची आमची तळमळही. ह्या उभयपक्षी फसवाफसवीने आता मन भरून येतं.
लेख आवडलाच.

बेसिकली मीच एकटी क्लासी यावर माझा अढळ विश्वास होता. >> उपरोधिक वाटतंय. आणि नसेल तर प्रांजळ वाटलं.

हलकं फुलकं म्हणा किंवा नर्मविनोदी म्हणा, प्रसन्न शैलीत स्वभाववैशिष्ट्यावर अचूक बोट ठेवलं आहे. काहींमधे हे लक्षण ठळक दिसते. आपण स्वतः इंटेलेक्चुअल आहोत असे स्वतः स्वतःला प्रमाणपत्र दिले की इतर लोक आपल्याला आपल्यापेक्षा हीन अभिरूचीचे वाटू लागतात. मग इंटेलेक्चुअल वर्तुळात ज्या गोष्टींना महत्व आहे त्याच आपल्याला आवडाव्यात असा अट्टाहास सुरू होतो. त्यामुळे इतर लोक जे क्षण मनापासून एंजॉय करतात त्यांना आम जिंदगी म्हणत नाकं मुरडली जातात. हा लसावि आहे कदाचित लेखाचा. माझं आकलन चुकीचं असेल तर करेक्ट कर मला.

काही काही गोष्टी विचार न करता कराव्यात याच्याशी अगदी सहमत.
माझ्याच आवडीनिवडीवर लिहीलंय की काय असं वाटतंय. गोविंद गोविंद !!
असंच लिहीत रहा.

लेख वाचताना अगदी अगदी झालं. नवा व्यापार, पत्ते, लपाछपी, लाईट नसणे इत्यादी सगळे खूप को-रिलेट होणारे आहे. या सगळ्याच्या जोडीला आरशाने सूर्यकिरण परावर्तित करून सिनेमाच्या प्लास्टिक फिल्मवरची चित्रे भिंगाच्या सहाय्याने भिंतीवर प्रोजेक्ट करून पाहणे हा एक आवडता 'दुपारचा' उद्योग असायचा.

सिनेमा बघायला मिळायचा नाही. सिनेमा पाहणे फार दुर्मिळ होते. त्यामुळे अमिताभ, शशी कपूर, प्राण इत्यादी सगळे चेहरे असेच ओळखीचे झालेले.

माझ्या बाबत गोविंदा, अक्षय, संजय दत्त या तिघांचाही प्रवास असाच 'हे मना नेई मज नावडत्या कडून आवडत्याकडे' असा झाला आहे. मला आठवते त्यानुसार गोविंदाचा 'हत्या' म्हणून चित्रपट आला होता. त्याची हि पोस्टर्स शहरभर लागली होती:

अमिताभच्या एंग्री यंग मॅन प्रतिमेमुळे नवीन अभिनेते सुद्धा तेच करीत. 'हत्या' मध्ये गोविंदाचा असाच काहीसा रोल असावा असे त्या पोस्टर वरून जाणवायचे. गोविंदाची हि पहिली ओळख. त्यामुळे 'आला अजून एक देमार हाणामारी करणारा हिरो' अशी त्याची तेंव्हा मनातल्या मनात संभावना केली होती. ती फार तशी चुकीची सुद्धा नव्हती. कारण सुरवातीचे त्याचे काही चित्रपट असेच होते. पुढे पुढे त्याचे 'विनोदी' म्हणवले जाणारे चित्रपट आले. सुरवातीला 'बिनडोक विनोद' अशी संभावना करून ते सुद्धा मनाने नाकारलेच. पण नंतर नंतर लक्षात आले कि कादरखान-गोविंदा-जॉनी ह्या कॉम्बिनेशनचे चित्रपट फार विचार न करता पाहिले कि त्यासारखे निखळ मनोरंजन नाही. मग मात्र गोविंदा भलताच आवडता झाला. गोविंदाचे काही विनोदी सिन्स आजही तितकेच हसवतात जितके पहिल्यांदा पाहिल्यावर हसायला आले होते. एकटे दुकटे असताना आठवून सुद्धा हसायला येते. आणि कधी कधी खऱ्या आयुष्यातसुद्धा काही अप्रिय प्रसंगामध्ये इथे गोविंदा असता तर काय बोलला असता अशी कल्पना करून फिदीफिदी हसून नाहक गांभीर्य हलके करायला गोविंदाची मदत झाली आहे. गोविंदा असा हळू हळू भिनत गेला. गोविंदाचे चित्रपट आणि त्यातले आजही हसवणारी कॉमेडी प्रसंग यावर वेगळा धागा निघेल.

अक्षय आणि संजय दत्त सुद्धा असेच आवडत गेले. संजय तर आधी अक्षरशः डोक्यात जायचा. त्याचे चित्रपट बघणारे सुद्धा आपसूकच नावडत्या वर्गात जायचे. माझा एक मित्र परदेशात गेला होता. आणि एका कलीग सोबत शेअरिंग मध्ये राहत होता. तेंव्हा त्याने मला सांगितले होते कि हा त्याचा पार्टनर म्हणजे डोकेदुखी आहे. सदानकदा संजय दत्तची डीव्हीडी लावून बसलेला असतो. हे ऐकून मला माझ्या मित्राविषयी प्रचंड सहानुभूती वाटली होती. पण गोविंदा-संजय दत्त, किंवा संजय दत्तचे नंतर नंतरचे विनोदी-नर्मविनोदी-मूर्खविनोदी (Silly comedy) चित्रपट पाहिल्यावर संजूभाय सुद्धा आवडत्या नसल्या तरी 'नॉट बॅड' वर्गात येऊन पोहोचला. अक्की सुद्धा असाच नावडता होता. पण हेराफेरी व तत्सम चित्रपटांनंतर तो आवडू लागला.

या सगळ्या पार्श्वभूमीवर एक प्रसंग हटकून आठवतोय. हे सगळे हिरो जेंव्हा 'नावडत्या' वर्गात होते त्याकाळात मला पहिल्यांदा परदेशात जायचा योग आला होता. आणि माझे दुर्दैव असे कि पहिलीच फ्लाईट मला एअर-फ्रांसची मिळाली होती. ज्यात आसपास कुठे कुठेही औषधाला सुद्धा भारतीय मनुष्य दिसत नव्हता. मी प्रचंड नर्वस होऊन बसलो होतो. तेंव्हा त्यांनी अक्की कि संजय दत्त चा मुव्ही लावला होता. भारतीय विमानतळावरून उड्डाण करताना भारतीय चित्रपट असा काहीसा प्रोटोकॉल असावा. पण त्या 'प्रचंड परक्या' वातावरणात छोट्या पडद्यावरचा हिरो नावडता असूनही त्याला पाहून मला गदगदून आले होते Biggrin आज हे सगळे आठवले कि खूप हसायला येते. पण त्यावेळची मानसिकताच तशी होती.

वा! आठवणी भळभळ वाहायला लागल्या लेख वाचून. मस्त मस्त मस्त लेख.

>> बेसिकली मीच एकटी क्लासी यावर माझा अढळ विश्वास होता. अजूनही जुन्या अस्मिताचा रेसेड्यू माझ्यात आहे व तो अधूनमधून फणा काढतोच.

Proud Happy Lol Biggrin

लहानपणी गोविंदा आणि त्याचे चित्रपट खूप आवडायचे. विरारला राहणारी मैत्रीण बालपणी सुट्टीत गावी यायची,तेव्हा गोंविदाला इथे पाहीलं.. तिथे पाहीलं .. ( गोविंदाचं बालपण विरारला गेलं होतं आणि ती विरारला राहायची म्हणून) अशी बतावणी नेहमी करायची.. त्यावेळी मला खूप हेवा वाटायचा तिचा..!!

त्याकाळी गोविंदा सगळ्या लोकांना आपल्या मधलाचं एक वाटायचा.. हेचं खरंतर त्याचं आणि त्याच्या चित्रपटांचं यश आहे. त्याचे चित्रपट खूपच मजेशीर आणि धमाल आहेत. चित्रपटातली त्याची आणि करिश्मा कपूरची जोडी खूप छान वाटायची.

लेख नेहमीप्रमाणे सुंदर आणि मनाला ताजेतवाना करणारा...!!

छान लिहिलंय.. गोविंदा म्हटल्यावर मला लगेच हत्या मुविच आठवला.. सरकार मुवि मधले गोविंदा गोविंदा.... आठवले..

गोविंदाचं ते हटा सावन की घटा पूर्ण पाठ करून त्यांच्यासारखं अस्खलित म्हणायची माझी फारा दिवसांची इच्छा आहे. माझा मेव्हणा असंच कधीही "टाइम फिल" करायला म्हणत असतो. त्याच्याकडून संथा घेणार आहे आता.

सेम सेम! मी सुद्धा लहानपणी त्याच्या मूव्हिजना ईईईई म्हणायचे..माझ्या वडिलांना फार आवडतात त्याचे पिक्चर. सो गुरुवारी त्यांना सुट्टी असली कि आम्हाला हमखास शिक्षा असायची...
पण अगदी परवा नवीन कूली न.१ बघताना गोविंदा, गोविंदा का आहे लक्षात येते. गोविंदाचे कॉमेडीचे टायमिंग अचाट आहे.

अगदी अथेना, तो करायचा तेव्हा सहज वाटायचं हे नवीन रिमेक सिनेमे बघून आता कळतयं. तो त्याच्या अभिनयातला एफर्टलेसनेस होता. नवीन कुली नं वन फारच बेकार आहे.
आभार. Happy

सही लेख अस्मिता
आचरटपणा, रंगीत कपडे आणि डान्स साठी लहानपणी गोविंदा खूपच आवडायचा.
डान्स साठी अजूनही Happy

जियो जियो! एक नंबर लिहिलंय!
मला आवडतो गोविंदा. काय मस्त नाचतो तो एफर्टलेस.. आणि जबरदस्त कॉमिक टायमिंग!
गोविंदाचा अनेको वेळा पाहिलेला सिनेमा म्हणजे दुल्हे राजा! मैं तो आप ही की तरफ हूँ!
त्याचा एक सिरीअस पिक्चर आहे - परदेसी बाबू नावाचा. म्हणजे त्यातही बरीच कॉमेडी आहे - न्यूटन का बाप ओल्डटन वगैरे! पण कथा एकदम दास्ताने (घिसीपिटी) प्रेमकथा आहे. गरीब हिरो, श्रीमंत हिरोईन, व्हिलन बाप, व्हिलन मंगेतर (अर्थात मोहनीश बहल) असलेली. इट हॅपन्स ओन्ली इन इंडिया गाणं त्यातलं आहे.
मला तो सिनेमा जाम आवडतो. त्याची खूप पारायणं झाली आहेत! आता इतक्यात पाहिला नाहीये.. पहायला हवा!
तुस्सी और लिखो जी! बडा चंगा लिखते हो!

लेखिकेचा मी ड्युआय नसूनही माझ्या जिवंतपणीच्या भावना जशाच्या तशा मांडल्या आहेत.
मधून भांग पाडणारा गोविंदा हा राजस्थानी मिठाईच्या दुकानातल्या हात न धुता बनवलेल्या आणि माशा बसलेल्या मिठाईप्रमाणेच घातक होता हे माझं प्रामाणिक मत होतं. ती मिठाई जशी इमग्रेडीएण्ट्स माहीत झाल्यावर कुणी खाऊ शकत नव्हतं तद्वतच दादा कोंडके सारख्या जिवणीच्या भागातून खालचा जाड ओठ खाली ओढत विनाकारण घुसडलेल्या इमोशनल डायलॉगवर विनाकारण फुटेज खात केलेली इमेशनल अ‍ॅक्टींग पाहताना ऋन्मेषच्या धाग्यावर यावा तशा संमिश्र भावनांची दाटी होत असे. या अभिनयावर चिडावं, हसावं की संताप व्यक्त करावा हे समजत नसे. पण त्याला दिलीपकुमार या अभिनेत्याने सत्तावीस वर्षे जपून ठेवलेली भाकरी खायला दिली आणि म्हणतात ना जहर को जहर काटता है, त्याचप्रमाणे त्याच्या अभिनयाला लागलेली वाळवी भाकरीच्या बुरशीने नाहीशी झाली.

मग त्याने दिलीपकुमार ची ग्रामीण भागातून शहरी भागात आलेल्या युवकाची अ‍ॅक्टींग ढापली (आठवा सगिना महातो, राम और शाम), संजीवकुमारची खर्जातली बोलण्याची ढब ढापली (आठवा अंगुर मधला गँग गँग हा स्वर) त्याला अमिताभची खुसफुसत बोलण्याचा तडका दिला आणि धर्मेंद्रची कॉमेडी अ‍ॅक्टींग कढीपत्यासारखी वापरून एक मसाला अ‍ॅक्टींग तयार केली. नृत्यातही असेच चार पाच इन्ग्रेडीएण्ट्स वापरले. शिवाय ज्यांची शैली वापरली त्यांचीच मिमिक्रीही अधूनमधून केली. हे रसायन भन्नाट जमलं.

त्याच वेळेस तो एका बाजूने भांग पाडायला लागल्याने जबाबदार वगैरे वाटू लागला आणि आंखे पासून सर्वांनाच आवडू लागला. ज्याप्रमाणे पिझ्झा मधे कुणीही सात्विक तत्त्वं शोधत नाही तसे गोविंदाचे सिनेमे धो धो चालू लागले.
अशा महान अभिनेत्याला दिलेली ही मानवंदना माझ्या ओरिजिनल नसलेल्या आयडीकडून देण्यात आली याहून अधिक काय हवे ?

डान्स साठी 'मेरे प्यार का रस जरा चखना' एकदम मास्टरक्लास आहे! तिघेही उतरणीला लागलेले पण तरी अशक्य धमाल करून जातात. सिनेमात तर त्या गाण्याच्या का ही ही संबंध नाही. पण तरी तेच गाणं बघितलं जातं. स्विट्झर्लंड इ जागी जाऊन चेहर्‍यावरची माशी उडवायचे पण पैसे घेईन अशा थाटातले सिद्धार्थ, आदित्य रॉयकपूर पाहिले की 'मै से मीना से' नाचणारा गोविंदा फारच स्ट्राँग वर्क एथिक असणारा वाटतो.

जाता जाता 'दि ग्रॅज्युएटींग क्लास ऑफ २०२१' साठी (अनाहूत पण आवश्यक) सल्ला देऊ इच्छिते - करोना-लॉकडाऊन इ मुळे वाईटप्रकारच्या नोकर्‍या मिळतात असं वाटत असेल तर 'मैं आया तेरे लिए' बघा. "अप्पा लो अप्पा लो" असं चार लोकं म्हणतात मग पावलं मोजत मोजत डान्स करणारी अनिता राज प्रकटते. गाण्यावर पूर्ण 'मिथुन-मिथुन' लिहीलेले असताना, गोविंदा तिथे शिरून स्वतःच्या सिग्नेचर स्टेप्स करत राहतो. काम्/नोकरी कधीच खास नसते, तुम्ही जाऊन ती खास बनवता. तेव्हा ग्रॅज्युएटींग क्लास, in Corona at least you have an excuse.

लिंक देता येईल का सी? जमल्यास दे.
खरंतर सगळ्यांनीच त्यांच्या आवडीचे सिनेमे, सिन्स, डान्स याबद्दल सांगितले किंवा लिंक दिल्या तरी आवडेल , सर्वांना जरा ब्रेक मिळेल , शेअर करण्याची धमाल येईल. Happy

https://www.youtube.com/watch?v=xQpAfesHTYs हे बघ. मी तरी सिमी गरेवालला कधी इतकं हसताना पाहिलेलं नाही. ती नेहमी "क्लासी, पॉईज्ड, एलिगंट" इ असते. तिलापण फालतू पण धमाल टाईमपास करवला.

सिमी गरेवाल video... अर्ध्याच्या पुढे tooo good. Stress buster, full of laughter n liveliness. निखळ आनंद Happy

Pages