मुलीचा बाप होणे फार अवघड असते ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 May, 2021 - 17:59

मुलीचा बाप होणे फार अवघड असते. आणि त्यात तुझ्या लेकीसारखीचा बाप होणे तर आणखी अवघड. येतील हळूहळू अनुभव तुला ..

लेक अगदी अडीच तीन वर्षाची झाल्यापासून हे ऐकतोय. आणि तेव्हापासून उत्सुक आहे, तयार आहे, ते अनुभव कधी येताहेत याची वाट बघत Happy

आज एक बहुधा त्यातलाच मजेशीर अनुभव आला, तो शेअर करावासा वाटतोय. तेवढीच विचारांची देवाणघेवाण...

तर झाले असे,
काल लेकीने आपली एक पँट दाखवली. जिला लेगिंग की काय म्हणतात. तिला गुडघ्याजवळ एक छानसे भोक पडले होते. म्हटले बाद झाली.
आज तिने गपचूप तिच्या दोन्ही पायांवर छान कातरकाम करत आणखी भोकं पाडली आणि मी एक बाद झालेली पँट कशी फॅशनच्या नावावर पुनर्जिवित केली असा आव आणू लागली.

आईबापच आहोत तिचे. सात वर्षे झाली तिच्यासोबत. तर तिनेच हा गेम केला हे आम्हाला समजले.
त्यात मी पडलो बाप, मला तर तिचे सारेच आवडते, हे सुद्धा आवडले. म्हणजे आता पुन्हा असे करू नकोस अशी ताकीद देऊन झाली. पण कौतुकाने तिचा एक फोटोही काढला. तिनेही छान दारातली सायकल घरात आणून त्यावर बसून छान पोज वगैरे देत फोटो काढून घेतला. त्यानंतर शास्त्रंच असते ते म्हणत मी तो फोटो छानसे कॅप्शन देत फेसबूक आणि व्हॉटसप स्टेटसवर शेअर केला... आणि कामाला लागलो.

तासाभराने लाईक्स कॉमेंट चेक केल्या. ज्यात व्हॉटसपवर मला एका शालेय मित्राची मजेशीर कॉमेंट आढळली.

थांबा, एक मिनिट, फोनच बघून सांगतो.. म्हणजे त्यापुढे आमच्यात घडलेल्या संवादाचा शब्दन शब्द डिट्टो देता येईल..

हम्म, तर मित्राची प्रतिसाद होता,
भिकारपणा आहे हा, आवरायला हवे..

मी - छे रे, बघण्याचा दृष्टीकोण Happy .. (तुटक उत्तर देऊन संवाद न वाढवता निसटणार होतो पण तो भाई काही ऐकायच्या मूडमध्ये नव्हता)

मित्र - काय बघण्याचा दृष्टीकोण? तुला तुझा आणि ईतर लोकांचा पोरींकडे बघण्याचा दृष्टीकोण माहीत नाही का? की आता बदलला आहेस तू.. सर्वांचा दृष्टीकोण तोच असतो..
(मला उगाचच मी स्वत:ही शक्ती कपूर, रणजीत कॅटेगरी असल्यासारखे वाटू लागले)

मी - सर्वच लोकांचा दृष्टीकोण तसा आहे हे मानले तरी काय मग आपल्या पोरी बुरख्यात ठेवायच्या का?

मित्र - बुरख्यात कशाला, पण आहे ते नीट घालावे ना, फाडायचे कश्याला. लोकांना मुद्दाम फाडून दाखवावेच कश्याला?

मी - तसे तर साडीतही पोट दिसते, ब्लाऊजमध्ये पाठ दिसते. एखादा पाठ पोट बघून चेकाळत असेल तर मग आपले पारंपारीक वस्त्र साडीही नेसणे सोडायचे का आता?

मित्र - हे बघ मला ईतके गहन नाही जायचेय, काय दिसतेय काय नाही. याबाबत तू आईबाबांचा सल्ला घे.

मी - बाबा तर मीच आहे.

मित्र - अरे तुझ्या आईवडिलांचा सल्ला घे.

मी - त्यांचा काय ईथे संबंध?

मित्र - पोरगी लहान आहे. काही संस्कार जुन्या जाणत्या लोकांनी केले तर वाईट नाही. आणि संस्कार म्हणजे लगेच काही बुरखा नव्हे.

मी - एक्झॅक्टली. संस्कारांचा आणि पोशाखाचा काही एक संबंध नसतो. सर्वांशी प्रेमाने वागावे, शांततेत जगावे, समानता बाळगून राहावे हे शिकवतो तिला..

मित्र - This is westernization. Mad mimic of western culture

मी - असू दे ना वेस्टर्न कल्चर. हे मॅड आहे हे कोणी ठरवले?

मित्र - ते लोकं नागडे फिरतात, आपण फिरायचे का?

मी - मग बुरख्यात जायचे का? निसर्गानेच माणसाला नागडे जन्माला घातले आहे. कपड्यांचा शोध नंतरच लागला आहे.

मित्र - ते सोड, मी काय म्हणतो, घेऊन फाडायचे कश्याला. मग फाटकेच घ्यायचे ना?

मी - हो, हे बरोबर म्हणालास. तिलाही तेच सांगितलेय. कसेही फाडू नकोस. वाटल्यास तुला एखादी छानशी डिझायनर कटस असलेली जीन्स घेऊया.

मित्र - पण न फाडता वापरले तर चालणार नाही का? उगी तापू नको हा, nothing personal.

मी - छे रे, मी कूल आहे. तूच लोड घेत आहेस उगाच.

मित्र - नाही रे, लोड नाही घेत. विचार करतोय या मानसिकतेचा.

मी - तेच, उगाच जास्त विचार करू नकोस. आपले विचार वेगळे आहेत ईतकेच.

मित्र - नाही रे विचार नाही करत आहे जास्त. कोणाला कर्मदरीद्री व्हायचे असेल तर आपल्याला काय.

मी - बघ, पुन्हा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोणाचा फरक. आपल्या आनंदासाठी जगावे, जगाचा विचार करू नये. ईतका सिंपल फंडा आहे आमच्याकडे
(मला जेव्हा जेव्हा असली फिलॉसॉफी झाडायचा चान्स मिळतो तेव्हा मी तो सोडत नाही Happy )

मित्र - असू देत. compulsion नाही बाबा. कपडे फाडण्यात आनंद मिळतो तर मिळू देत. तुझ्याशी म्हणून बोललो मी. अन्यथा उगी तोंड उघडत नाही.

मी - एक्झॅक्टली ! हाच अ‍ॅटीट्यूड ठेवावा. मला काय. प्रत्येकाला आपल्या मर्जीने जगण्याचा अधिकार द्यावा. जर त्याने आपले नुकसान नसेल..

मित्र - तू मित्र आहेस, म्हणून बोललो रे..

मी - जरूर बोलावे. विचारांची देवाणघेवाण झालीच पाहिजे. फक्त ते लादले जाऊ नयेत. कोणाला एखाददुसर्‍या गोष्टीवरून जज करू नये. हेच जर माझ्या मुलाने पँट फाडली असती तर कदाचित असे बोलला नसतास..

मित्र - मुलगी आहे म्हणूनच तर जास्त काळजी घ्यावी लागते.....
(फायनली !! ये सुनने के लिये मेरे कान तरस गये थे Happy )

मी - मी स्वतःही एक पोरगा आहे रे. मलाही कॉलेजला असताना अशी जीन्स फाडायची बरेचदा ईच्छा व्हायची. पण कधी हिंमत झाली नाही.

मित्र - आपले संस्कारच तसे होते.

मी - छे रे, संस्कारांनी हात बांधले नव्हते. माझ्यात ती फॅशन कॅरी करायची हिंमत नव्हती. त्यासाठी लागणारी बेफिकीरी, तो स्मार्टनेस नव्हता. पोरीत ते ऊपजत आहे.

मित्र - जेवलास का? काय होते स्पेशल आज? तुझी बायको केक करते ते आवड म्हणून की बिजनेस म्हणून? चल बाय ! Dont Take it personally ...

कटला मेला, ते सुद्धा जेव्हा मी छान रंगात आलेलो.. म्हणजे त्या डीडीएलजेच्या अनुपम खेर सारखे, "बस्स चौधरी साहब बस्स, मेरी बेटी मेरा गुरूर है, और मेरे गुरूर को मत ललकारो" वगैरे डायलॉग मारायच्या मूडमध्ये आलेलो तेवढ्यात तो शुभरात्री बोलून निसटला...
बाकी त्याला कोण समजवणार, मी पर्सनली बोललेले किती छान एंजॉय करतो ते Happy

जोक्स द अपार्ट,
मुलीचा बाप होणे फार अवघड असते. येतील हळूहळू अनुभव तुलाही...
येऊ देत Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पारंबीचा आत्मा, धाग्यांच्या लिंक दिल्याबाबत धन्यवाद. तुमचे प्रतिसाद वाचायला मजा येते.

ऋन्मेश, धाग्याचे शिर्षक वाचुन प्रतिसाद द्यायला धावत आलो होतो. पण तुम्ही धागा फक्त एकाच मुद्याभोवती फिरवल्याने निराशा झाली.

जेव्हा तुमच्या मुलींच्या कपड्यांवर कोणी आक्षेप घेते तेव्हा एक पालक म्हणून तुमची भुमिका, तुमची प्रतिक्रिया काय असावी, ते प्रकरण तुम्ही कसे हॅन्डल करावे.. ?>>>>>> मलाही हाच धाग्याचा विषय वाटतोय. आणि त्याच अनुषंगाने प्रतिसाद देतेय....

माझ्या लेकीच्या डाव्या खांद्यावर मोठ्ठी जन्मखूण ( अंगठ्याचा ठसा असल्यासारखी ) आहे. त्यामुळे ती अगदी बाळ असल्यापासून बऱ्याच जणींनी असं सांगितलं की, तिला स्लिवलेस घालायला जमणार नाही. तेव्हापासून माझं हेच मत आहे की, जन्मखूण दिसली तर त्यात लाज वाटण्यासारखं काही नाही. आणि तिलाही मोठी झाल्यावर तसा काही न्यूनगंड येऊ नये, याची काळजी मी घेईनच.

अर्थात मोठी झाल्यावर तिचे कपडे निवडण्याचं स्वातंत्र्य तिलाच असेल. सध्या मी तरी , तिचे कपडे घेताना जन्मखुणेचा विचार करत नाही.

पूर्वीचा एखादा धागा शोधून त्यावर चर्चा चालू ठेवू शकतो
त्यावर आधी बरीच मतं येऊन गेली आहेतच (त्या निमित्ताने स्वतःची काही वर्षापूर्वीची मतं बदलली आहेत की कसे तेही प्रत्येकाला तपासता येईल)
Submitted by mi_anu on 25 May, 2021 - 12:54

मी माबोवरील चर्चांमधे जास्त भाग घेत नाही पण सर्व चर्चा वाचतो.

माबोवरच्या अनेक चर्चा वाचून माझी देव, धर्म, जात/लिंग/धर्म वरील आधारीत भेद/ भेदभाव, यावरील मते बदलली आहेत.

माझे अनेक पुर्वग्रह तोडण्यात, विचार कसा करायला हवा हे शिकवण्यात, काय चूक काय बरोबर अशा अनेक गोष्टी शिकवण्यात माबोवरील चर्चांचा आणि दिग्गज आयडींचा मोठा हात आहे.

माऊमैया, धन्यवाद
मधल्या पोस्टमध्ये हा मूळ विषय भरकटायला नको म्हणून मी सुद्धा पुन्हा बोल्ड करतो.

जेव्हा तुमच्या मुलींच्या कपड्यांवर कोणी आक्षेप घेते तेव्हा एक पालक म्हणून तुमची भुमिका, तुमची प्रतिक्रिया काय असावी, ते प्रकरण तुम्ही कसे हॅन्डल करावे.. ?

@ तुमच्या मुलीच्या खांद्यावरील जन्मखूण, तर ती मोठी झाल्यावर तिला वाटलेच तर ती सर्जरी करून मिटवूही शकते. कदाचित आज तशी सर्जरी सोपी नसेल, उद्या झाली असेल. तर त्याचा आतापासूनच विचार करायची गरज पडू नये. किंबहुना आता जन्मखूण झाकली तर उद्या न्यूनगंड यायची शक्यता जास्त आहे. आतापासूनच तिने आणि बघणार्‍यांनी ते स्विकारले तर त्याचे विशेष कोणाला वाटणार नाही. त्यामुळे आपण योग्यच करत आहात..
सेम असेच माझ्यामुलीबाबतही होते. पायावर काळे सावळे ठिपके होते. फार गडद नव्हते. पण गोरीपान असल्याने जवळून पाहता दिसून यायचे. डोक्टर म्हणाला जातील हळूहळू मोठी होईल तशी, फार विचार करू नका. आताही ते आहेत की नाही कल्पना नाही, कारण रोज ईतके पडून खरचटून येते की तिचे पाय नेहमी ठिपक्याठिपक्यांचेच दिसतात Happy

मुलीच्या खांद्यावरील जन्मखूण, तर ती मोठी झाल्यावर तिला वाटलेच तर ती सर्जरी करून मिटवूही शकते. >>> हो, डॉक्टर म्हणाले होते स्वतःहूनच, की १८ वर्षे पूर्ण झाल्यावर करता येईल म्हणून.

मी आणि माझा नवरा तर, त्याच्या बाजूने फुलपाखराचा टॅटू पण काढता येईल असा विचार करतो. अर्थात, निर्णय तिचाच असेल शेवटी.

टॅटू तर असेही निघणारच आहेत, जन्मखूण असो वा नसो.. हल्ली बड्डे पार्टीमध्येही टॅटू वाले असतात. आणि सगळ्या मुलांची गर्दी तिथेच असते. जेव्हा मुलीने लहानपणी पहिल्यांदा हा अनुभव घेतला तेव्हापासून जो नाद लागला ते स्वतःचे हात पाय मग माझे हात पाय पाठ पोट सारे टॅटू प्रॅक्टीसने रंगवून टाकायची. रात्री व्यवस्थित झोपलेलो असायचो, सकाळी ऊठून ब्रश करता करता आरश्यात पाहिले की गझनी झालेलो दिसायचो Happy

रविना टंडन आजी झाली.

_____________
काही लेगिजना गुडघ्यावर एक आडवी चीर देऊन तिथे स्ट्रेच पट्ट्या शिवलेल्या पाहिल्या आहेत. त्याने काय होते की गुडघ्यावर गोलवे येत नाहीत. कामाची गोष्ट आहे.

मित्राशी तुमचा झालेला संवाद आवडला. असा बाबा सगळ्या मुलींना लाभो!
बाकी त्यावरची चर्चा, चर्चेवरची चर्चा आणि मग त्यावर झालेली वेगळी चर्चा हे सगळंही वाचलं Wink

या अशा गोष्टींचा सामना करणं हे खरंच पालक म्हणून एक आव्हान आहे. घरात आणि बाहेरही अशी टीका करणारे चिकार असतात. त्यांना सतत तोंड देत राहणं सोपं नाही. आपलं बरोबर की चूक असा विचारही काहीवेळा पुसटसा स्पर्शून जातोच. पण, यासंबंधीचे आपले विचार आधी स्पष्ट, खंबीर आणि व्यवहारी असायला हवेत असं वाटतं. त्यानंतर मग कोण काय म्हणतो याने फारसा फरक पडत नाही.

यासंबंधीचे आपले विचार आधी स्पष्ट, खंबीर आणि व्यवहारी असायला हवेत असं वाटतं
>>>

हो एक्झॅक्टली. आपले विचार स्पष्ट हवेत. कारण प्रत्येक जण यात वेगळा विचार वेगळा दृष्टीकोण घेऊन येणार. आपल्यावर दर दुसरया विचाराचा इन्फ्लुअन्स न होणे आणि आपण आपल्या मुलांना सपोर्ट करणे हे महत्वाचे.

काही मर्यादा पळून स्वतंत्र उपभोग ने हेच शहांपांपणाचे लक्षण आहे.कोणत्या जागी कसे वागले पाहिजे ह्याचे तारतम्य हवे.ऑफिस, घर,सार्वजनिक ठिकाणी ,खेडे गावी, समारंभात जे जास्त लोकांनी स्वीकारले आहे तशीच वागणूक ,कपडे असावेत.लोकांपेक्षा वेगळे दाखवायचा प्रयत्न केला की लोक पण अशा व्यक्ती ला वेगळे पाडतात.
मला काही फरक पडत नाही हे वाक्य फक्त स्व समाधान देते .ह्या पलीकडे काही नाही.
कुठे कसे वागायचे,कोणती कपडे परिधान करायची ह्याची. जाणीव आणि. ज्ञान असेलच पाहिजे.
फक्त पालकांनी पाठिंबा देवून काही फायदा नसतो.मुळात पालकांचा प्रभाव. आणि क्षेत्र घरापूर्तेच मर्यादित असते बाहेर समाजात आई वडील चा support च काही फायदा नसतो त्यांचे वर्चस्व समाजात नसते.

वेगळा धागा काढण्याच्या सूचनेचं काय झालं पुढे ? यावरून आठवलं.
https://www.maayboli.com/node/78992 इथे आपण धागा कसा असावा या सूचना केलेल्या आहेत. त्या धाग्याचा विषय हा फक्त यादी करणे होता. तुम्ही केलेल्या सूचना अंमलात आणायच्या तर यादी फोल झाली असती. या प्रत्येक सिनेमाची ती माहिती द्यायची तर लोक कंटाळा करतील नावे सुचवायला. जर त्या धाग्यावर प्रतिसाद जास्त झाले तरी चटकन हाताशी येईल अशा यादीचा उद्देश फोल होईल यासाठी उत्तर देणे टाळले. तुमच्या सूचनांप्रमाणे दोन धागे चालू आहेत. एक वेबसिरीजचा आणि दुसरा चित्रपट कसा वाटला. यावर ज्यांना सविस्तर लिहायचे ते लिहीत असतात. आता एखाद्याला सिनेमा बघायचा झाला तर त्या धाग्याचे चार भाग वाचून तो ठरवेल काय ?

त्याच धाग्यावर दोन धागे आधीपासून असताना हा धागा का अशीही विचारणा झाली. त्याला उत्तर देताना उद्देश स्पष्ट केला होता. त्यावर आक्षेपकर्त्यांच्या आक्षेपाचे निराकरण झालेले दिसते. मग पुन्हा आपण यु टर्न घेतला. त्याला उत्तर म्हणजे रिपीटेशन झाले असते.

तुमची धागा कसा असावा ही सूचना अत्यंत व्यवहार्य आहे. फक्त इतर ठिकाणी धागा कसा असावा या सूचना करण्याधी ती अंमलात आणली तर अत्यंत समाधानकारक कामगिरी होऊन मायबोलीवरच्या आपल्या दैदीप्यमान कारकिर्दीत अजून एक शिरपेच खोचला जाईल. आपणास वेगळ्या धाग्यासाठी हार्दीक शुभेच्छा !

इथे उत्तर दिल्याने तुमच्या शंकांचेही निरसण झाले असावे हे आमचे समाधान. मायबोलीवर यापूर्वी प्रवासात पेनड्राईव्ह वर घेण्यासाठी गाण्यांची यादी बनवण्यासाठी गाणी सुचवा असे धागे निघाले आहेत. त्याला लोकांनी याद्या बनवून उत्तरे दिलेली आहेत. त्यात कुठेही कुणाचेही गाणं कोणत्या पद्धतीचं आहे, संगीतकार कोन , कुणी गायले आहे या माहितीवाचून अडलेले नाही. ज्याला ही माहिती हवी त्याच्यासाठी गुगल हजर आहे.

सुट्टीत पाहण्यासाठी चित्रपट / वेबसिरीजची यादी या मागे हीच कल्पना आहे. तसे प्रतिसादात देखील स्पष्ट आहे. ज्याला अधिकची माहिती हवी त्याने चित्रपट कसा वाटला किंवा वेबसिरीज च्या धाग्यावर विचारावे किंवा गुगल करावे. यादी पाहून न पाहीलेल्या चित्रपटांची नावे चटकन लक्षात येतात हा उद्देश आहे. कोणता चित्रपट कुठे पाहता येतो हे सुद्धा गुगलवर एका क्लिकवर समजते.
आपल्या शंका फिटल्या असतील ही अपेक्षा. तिथे दिलेल्या प्रतिसादांना उत्तर दिले तर चर्चा होऊन धागा भरकटेल म्हणून इथे उत्तर दिले. धन्यवाद.

एकंदर धागा मुलींनी/स्त्रियांनी कपडे काय व कसे घालावे याबद्दल आहे. "मुलीचा बाप" होण्याबद्दल नाही.

अन सगळीकडे 'कुठे कसे याचे तारतम्य' हा सूर आहे.

काये ना, आपण कितीही म्हटलो, माय बॉडी माय चॉईस, मुलींनी "उत्तान" कपडे घातले असे म्हणून वाकड्या नजरेने पाहू नये, तरी, कुणी काय कपडे घालावे हे तुमच्या आजूबाजूचे ठरवत असतात. न्यूड बीचवर कपडे घालून फिरता येत नाही, अन रस्त्यावर (जैन साधू असल्याशिवाय) नागडे फिरलं, तर वेडा म्हणून पोरं-बाळं दगड मारतात.

त्याच वेळी रिमोट अफ्रिकन ट्राईब्ज मधे, आपल्याही आदिवासींमधे स्त्रियांचे उघडे स्तन देखिल उत्तरिय नसलेल्या पुरुषांच्या 'स्तनां' इतकेच नॉर्मल समजले जातात.

बेसिकली, जोपर्यंत समाजातील प्रत्येक स्त्री/पुरुष/प्रौढ/बालक हे एकाच प्रकारे विचार (उदा. कपड्यांबाबत) करणार नाहीत तोवर, 'मेजॉरिटी' चे तारतम्य बाळगावेच लागते. बर्म्युडा अन स्लीवलेस टी शर्ट घालून माझे शेपली डोले शोले, अथवा ढेरी दाखवत मी दवाखान्यात पेशंट तपासू लागलो, तर लवकरच पेशंट येणे बंद होते.

(या प्रतिसादाचे लेखक 'एकुलत्या एका कन्येचे' पिता आहेत. कन्या आता (बापापेक्षा जास्त) सुशिक्षित झाल्याने स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम आहे, व तिच्या आचार विचारांच्या घडणीत काही वाटा उचलल्याचे. तिला स्वतःचा विचार करायला व निर्णय घ्यायला शिकवल्याचे, बुद्धीप्रामाण्य, शास्त्रीय दृष्टीकोण, नम्रता, कणव, इतर व्यक्ती/ दृष्टीकोणांप्रती सन्मान, मानायला शिकवल्याचे इ. बाबींचे लेखकांना समाधान आहे. काय पण अवघड नाहिये मुलीचा बाप बनणे, तिला एक संपूर्ण, परिपूर्ण माणूस बनवा, ते महत्वाचे. रच्याकने, येथे "माणूस" हा पुल्लिंगी शब्द नाही.)

नाद खुळा लेख. खूप आवडला.

छे रे, संस्कारांनी हात बांधले नव्हते. माझ्यात ती फॅशन कॅरी करायची हिंमत नव्हती. त्यासाठी लागणारी बेफिकीरी, तो स्मार्टनेस नव्हता. पोरीत ते ऊपजत आहे.
>>>> जबर प्रांजळपणा!

@ हेमंत,
कोणत्या जागी कसे वागले पाहिजे ह्याचे तारतम्य हवे.ऑफिस, घर,सार्वजनिक ठिकाणी ,खेडे गावी, समारंभात जे जास्त लोकांनी स्वीकारले आहे तशीच वागणूक ,कपडे असावेत.लोकांपेक्षा वेगळे दाखवायचा प्रयत्न केला की लोक पण अशा व्यक्ती ला वेगळे पाडतात.

आणि @ आरारा,
कुणी काय कपडे घालावे हे तुमच्या आजूबाजूचे ठरवत असतात. न्यूड बीचवर कपडे घालून फिरता येत नाही, अन रस्त्यावर (जैन साधू असल्याशिवाय) नागडे फिरलं, तर वेडा म्हणून पोरं-बाळं दगड मारतात. त्याच वेळी रिमोट अफ्रिकन ट्राईब्ज मधे, आपल्याही आदिवासींमधे स्त्रियांचे उघडे स्तन देखिल उत्तरिय नसलेल्या पुरुषांच्या 'स्तनां' इतकेच नॉर्मल समजले जातात.

^^^^^^^^^^^

हे या लेखातील केसमध्ये लागू होते का?
या आधी आपण अश्या स्टाईलच्या जीन्स घातलेली मुले मुली कधीच पाहिल्या नाहीयेत का? किंवा अपवादानेच कोणीतरी असे केलेय आणि समाज त्यांना वाळीत टाकते का?
अर्थात आपण कुठल्या गाव शहरात राहतात याची कल्पना नाही, त्यामुळे आपले अनुभव वेगळे असतील
पण मी आफ्रिका युगांडा झेकोस्लोव्हाकिया वगैरे कुठे राहत नाही. मुंबईत राहतो. आणि ईथे हि फॅशन माझ्या बालपणापासून बघण्यात आली आहे. कॉलेजम्ध्येही य कपड्यांवर कॉलेज प्रशासनाने आक्षेप घेतला नाहीये.
तुम्ही आसपास नाही किमान चित्रपटांमध्ये तरी अशी फॅशन नक्कीच पाहिली असेल? कि सिरीअसली नाही, आणि हा प्रकार तुमच्यासाठी नवीनच आहे??

आणि जर हे आधीही पाहिले असेल तर फक्त विरोधाला विरोध म्हणून थेट रस्त्यावर नागडे फिरायचा टोकाचा आणि ईथे गैरलागू असलेला प्रतिसाद देत आहात का?

थोडक्यात तुम्ही सिद्धच करत आहात की एका मुलीचा बाप होणे किती अवघड असते. कारण मुलीने जरा गुडघ्यावर जीन्स काय फाडली तर तिच्या वडिलांना थेट न्यूड बीच, आफ्रिकेतील उघडे स्तन ठेवणार्‍या आदिवासी स्त्रिया आणि नागडे जैन साधू यांचे संदर्भ दिले जातात.

त्यामुळे तुमच्या या पोस्टसाठी मनापासून धन्यवाद !

काय पण अवघड नाहिये मुलीचा बाप बनणे, तिला एक संपूर्ण, परिपूर्ण माणूस बनवा, ते महत्वाचे.
>>>>>>>
ते बनवतच आहोत, साईड बाय साईड आम्ही तिला सुजाण नागरीक सुद्धा बनवत आहे, समता बंधुभाव सर्वधर्मसमभाव सुद्धा शिकवत आहोत, झालेच तर डान्स, आर्टस अ‍ॅण्ड क्राफ्ट, कूकिंग, मार्शल आर्ट, स्विमिंग अशी ईतर कलाकौशल्येही शिकवत आहोत.. आणि ही बरेच काही.. सगळेच लिहीत नाही आता...
सांगायचा मुद्दा ईतकाच की जर तुम्हाला असे वाटत असेल की नुसते तिने काय घालायचे आणि काय नाही ईतकेच ठरवून आम्ही पालक असल्याचे कर्तव्य पुर्ण झाले या विचारात स्वस्थ बसत असू तर असे काही नाहीये Happy

@ कॉमी, धन्यवाद Happy

@ पारंबीचा आत्मा, आपण माझी दुसर्‍या धाग्यावरची पोस्ट वाचून तिची दखल घेतल्याबद्दल आपलेही धन्यवाद. फुरसत मिळताच या सर्व मुद्द्यांना एकत्र गुंफून नक्कीच धागा काढेन.

पुन्हा एकदा प्रतिसादाची संख्या वाढवायला वेगवेगळे उत्तर दयायला सुरू झालेला दिसते
एकाच प्रतिसादात सगळ्यांना उत्तरे दिली तर मायबोलीकरांना कळणार नाही त्यामुळे चांगलं चालू आहे Happy

५०

वेलकम बॅक आशूचॅम्प, कूठे होता ईतके दिवस?
@ पुन्हा एकदा? अहो मी नेहमीच हे करतो. वेगवेगळ्या आयडींना मोठमोठाली उत्तरे एकाच प्रतिसादात दिली तर ज्याची त्याला कशी पोहोचतील.
आणि या नादात जर प्रतिसादांची संख्या वाढत असेल तर त्याने कोणाचे काय नुकसान होतेय हे मला आजवर समजले नाही? कधी तरी ते सुद्धा सांगा Happy
आणि हो, अजून एक गोष्ट क्लीअर करतो, पारंबीचा आत्मा हा माझा आयडी नाहीये Happy

असो, धाग्याबद्दल, या विषयाबद्दल आपले प्रामाणिक मत जाणून घ्यायला आवडेल Happy

असो, धाग्याबद्दल, या विषयाबद्दल आपले प्रामाणिक मत जाणून घ्यायला आवडेल

कशाला अजून एक प्रतिसाद मिळवायला ?

हा प्रश्न मी आधीही विचारला आहे.. परत विचारतो... हे प्रतिसाद संख्या प्रकरण नक्की काय आहे... जास्त प्रतिसाद असतील तर मायबोली प्रशासन तर्फे पैसे मिळतात का.. यावरून बरेच टोमणे मारलेले पाहिले आहेत..
खरेच माहीत नाही म्हणून विचारत आहे...

स्वतंत्र धाग्यात चर्चा करूया. ईथे चर्चा करणे म्हणजे पुन्हा तोच आरोप.

प्रतिसादांची संख्या वाढल्याने कोणाला काय फायदे तोटे होतात?
https://www.maayboli.com/node/79105

ईथे अवांतर टाळूया Happy

धागा नक्की कशावर आहे? Uhoh

मुलीचा पिता होणे अवघड आहे?

की

मुलीने कोणते कपडे घालावेत हे आई बापानी ठरवावे

की

मुलीने कोणते कपडे घालु नये हे समाजाने ठरवावे.

की

मुलींनी छोट्या चड्ड्या ( शॉर्ट्स ) घालु नये.

बाकी तुमची मुले गोड आहेत.

थोडक्यात तुम्ही सिद्धच करत आहात की एका मुलीचा बाप होणे किती अवघड असते. कारण मुलीने जरा गुडघ्यावर जीन्स काय फाडली तर तिच्या वडिलांना थेट न्यूड बीच, आफ्रिकेतील उघडे स्तन ठेवणार्‍या आदिवासी स्त्रिया आणि नागडे जैन साधू यांचे संदर्भ दिले जातात.
<<

"मुलीचा बाप होणे" अन कपडे फाडून फिरणे याचा एकमेकांशी संबंध काय? भारतात नाईलाजाने फाटके कपडे घालणारे बरेच आहेत.

मुलीचा बाप होण्यात कपडे घालणे याच्या पलिकडचे बरेच काही असते. तुम्ही हा धागा फाटक्या चड्डीबद्दल केला आहे. त्याच्याबद्दल बोलाय्चं का? जरा आपले अन आपल्या मित्राचे संभाषण (बहुतेक काल्पनिक) जे आपण धागा म्हणून लिहिले ते परत वाचा.

मुली सोडा भाउसाहेब, स्वतः हापिसात जाता का फाटकी फ्याश्नेबल ५० हजाराची जीन घालून? किंवा हाफ बनियन वर्/टीशर्ट वर ऑनलाईन बिझिनेस मिटींग?

फक्त नागडे आदिवासी अन जैन साधू दिसले का माझ्या बोलण्यातले?

धागा नक्की कशावर आहे? >>> अमर अकबर अँथनी हा चित्रपट नेमका कशावर होता ? हरवले सापडले की पोलीस विरूद्ध गुंड की सर्वधर्मसमभाव की कॉमेडी ? की गाणी ? की मेडीकल सायन्स की साईबाबांचे चमत्कार ?
अशा चित्रपटावर जर साईबाबाच्या चमत्कारावरून टीका झाली तर लगेच हा सिनेमा त्याच्यावर नव्हताच असे म्हणता येते, हरवले सापडले वर टीका झाली की चित्रपट कॉमेडी आहे असे म्हणता येते. पण चुकून जर कुठल्याही एका घटकामुळे स्तुती झाली तर होय हाच विषय आहे असे म्हणता येते. तसंच आहे हे. मसाला चित्रपट तसा मसाला धागा.
मित्राने फाटक्या जीन्स वरून छेडले त्याला उत्तर दिले हे छान केले असे म्हटले की धन्यवाद. आणि त्यावरून कुणी टीका केली की वेगळा धागा काढतो. तिकडे चर्चा करा म्हणता येते.
असा बहुगुणी धागा काढल्याबद्दल सदर लेखकाचे धागेरीलाल बहुगुणा असे नामकरण करावे अशी शिफारस या ठिकाणी मा. प्रशासक यांना मायबोलीच्या वतीने करीत आहे.

Pages