पैठणी म्हंटलं की प्रत्येकीच्याच काही आठवणी असतात. त्यात लग्नसराई असली की प्रत्येक मुलीला तिच्या स्वप्नातली पैठणी खुणावत असते. कधी मैत्रिणीच्या लग्नातली, कधी आजीच्या आठवणीतली तर कधी चालत चालत दुकानाच्या काचेत बघितलेली पैठणी मनात घर करून असते. शालूच्याही मनात अशीच एक पैठणी होती- तळहातावर मेंदी खुलल्यावर येणाऱ्या रंगाची. लहानपणी जेव्हा आईनी तिच्या शालूचं वर्णन करून सांगितलेलं, तेव्हापासूनच तिनं ठरवलेलं की तिचं जेव्हा केव्हा लग्न ठरेल तेव्हा चक्क आधी मेंदी काढायची, ती गडद रंगली की मग खरेदी करायची - अगदी हुबेहूब त्याच रंगाची पैठणी घ्यायची! कोणी हसलं, तऱ्हेवाईक म्हंटलं तरीही...
आणि अखेर एकदाची लग्नाची तारीख निघालीही. अजून तब्बल सहा महिने होते लग्नाला; मुहूर्तच नव्हते ना आधीचे. आणि समीरही दूर परदेशी असल्यानी त्यालाही सुट्टी मिळणार नव्हती. पण त्यामुळे सगळ्याच तयारीला खूप वेळ मिळणार होता. बैठकीत ठरलं की मुलाचा पोशाख मुलीकडच्यांनी तर मुलीच्या मुहूर्ताच्या साड्या मुलाकडच्यांनी घ्यायच्या. लग्नखर्च निम्मा-निम्मा वाटून घ्यावा, बाकी मुलांकडच्यांची काहीच अपेक्षा नव्हती. असं सोन्यासारखं स्थळ मिळाल्यानी शालू खूपच खूष होती.
हॉल बुक करताना सासूबाईंनी आधीच सांगितलं कार पार्किंगसाठी जागा हवी बरं; नाहीतर आमच्या पाहुण्यांची भारी गैरसोय होईल ना. आणि आपण ना मस्त रुमाली रोटीचा स्टॉल, पानाचा ठेला ठेवूया, आणि सनईवाले बोलवू - ते रेकॉर्डेड music नको आपल्याला. झालं, आई-बाबांची धावपळ सुरु झाली. फार काही नकोय नं; आणि निम्मा खर्च तर देणार आहेत. मग करूया की त्यांचीही हौस-मौज...
दागिने, मंगळसूत्र खरेदीला शालूला घेऊन जायचं ठरलं; तिनी आधीच ठरवलेलं मंगळसूत्राचं पॅटर्न. मागच्या वर्षी रियाचं -तिच्या मामेबहिणीचं लग्न झालेलं. तिच्यासारखं लांब अगदी पोटापर्यंत! उत्साहात शालू आणि तिची आई त्यांनी सांगितलेल्या सराफाच्या दुकानावर पोहचल्या. त्यांच्या आधीच तिचे होणारे सासू-सासरे, नणंद पोहचलेले. सराफानी त्यांच्या पसंतीचे दागिने, मंगळसूत्र काढून ठेवलेले. आईनी आधीच ताकीद दिलेली, "जास्त ताणात बसू नकोस; त्या म्हणतील ते आवडलंय असं दाखव. माणसं महत्त्वाची, सोनं-दागिने नंतरही होत राहतील." तसं शालूनी त्यांच्या आवडीला पसंती दिली; असंही दागिन्यांचा तिला फारसा शौक नव्हताच. पण मंगळसूत्र तरी आपल्या मनासारख व्हावं, असं तिला वाटत होतं. पण एवढं लांब मंगळसूत्र असलं की कसा भुरट्या चोरांचा त्रास होऊ शकतो, ह्याच्याच गप्पा रंगल्या. शालूला बाजूला घेऊन आईनी समजावलं की, "काही वर्षांनी करून घे तुझ्या मनासारखं लांबलचक, आता राहू दे..." येत्या शनिवारी तिच्या सासूबाई पुण्याला जाणार होत्या, नात्यातल्या लग्नासाठी; त्यामुळे सोन्याची खरेदी आताच आटपावी अशी त्यांची ईच्छा होती. झालं, आटपली खरेदी. शालूला समीरची खूपच आठवण आली. तो आता खरेदीला असता तर सगळं माझ्या मनासारखं झालं असतं, नेमका लंडनला जाऊन बसलाय-प्रोजेक्टसाठी. नकळत मनात गाठ पडली, "लग्न म्हणजे तडजोड!"
सोमवारी संध्याकाळी शालूच्या सासूबाईंचा फोन आला, "संध्याकाळी चक्कर टाकशील का? गम्मत दाखवायचीये तुला! अगं पुण्याला गेलेलो नं, तर साड्यांची खरेदी आटपून टाकली. इतक्या सुरेख साड्या होत्या नं, चंदा मावशी म्हणाली आलीयेस तर बघून घे नं. आणि कसचं काय तुझ्या पाची साड्या घेऊन टाकल्या एका पाठोपाठ.. हिरवीगार पैठणी पण घेतली, तुला खूप आवडेल बघ... " शालूच्या मनातली पैठणी मनातच राहिली.
लग्नाचा दिवस उजाडला, लहानपणापासून ज्या घरात लहानाची मोठी झालेली त्याचा घराला आज शालू परकी होणार होती. ह्यापुढे ह्या घरी आल्यावर परत जाण्याची वेळ आधीच ठरणार होती. हिरव्यागार पैठणीवर मेंदीने खुललेले हात निरखत, मनातली निरगाठ सांभाळत शालू निम्मा खर्च सोयीस्कर रित्या विसरणाऱ्या हौशी सासरची वाट चालू लागली.
निरगाठ
Submitted by केजो on 12 May, 2021 - 12:35
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चांगले आहे.
वास्तववादी.
पण फार पटकन आवरते घेतले.
अजून ताणावंसं नाही वाटलं, पण
अजून ताणावंसं नाही वाटलं, पण तुम्ही म्हणताय तसं अजून वाढवता आली असती तडजोड.
धन्यवाद me_rucha तुमच्या अभिप्रायाबद्दल.
छान लिहिलंय. वास्तववादी,
छान लिहिलंय. वास्तववादी. साडीच्या बाबतीत खूप रिलेट केलं. मला हवा तशा रंगाचा शालू घेताच आला नाही, तो सल आहेच मनात अजूनही. नंतर काही वर्षांनी त्या रंगाची शालु type साडी घेतली पण अगदीच दुधाची तहान ताकावर तसं झालं. महाग मला हवा तसा शालू घ्यावासा वाटलाच नाही नंतर कधी. तसंही साड्या नेसत नाही पण लग्नात तसाच हवा होता जो मनात होता तो.
लग्नात बायकोने तिच्याच आवडीचा
लग्नात बायकोने तिच्याच आवडीचा शालू घेतला होता, हे आठवले. नंतर आयुष्यात तो नंतर कधीच वापरला नाही. २.५ वर्षांपूर्वी मी हौसेने केरळमधून २ साड्या आणल्या होत्या, त्यातली १ पार्टिमध्ये नेसली, दुसरीची अजून घडी पण मोडली नाही. पण नवनवीन साडी खरेदी होतच असते. साडीखरेदी हा विषय माझ्या आकलनाच्या बाहेरचा विषय आहे.
जाऊद्या, चालायचंच.
साडीखरेदी हा विषय माझ्या
साडीखरेदी हा विषय माझ्या आकलनाच्या बाहेरचा विषय आहे.+100
आटोपशीर पण छान कथा.
आटोपशीर पण छान कथा.
आटोपशीर पण छान कथा.>>+१
आटोपशीर पण छान कथा.>>+१
साडीखरेदी हा विषय माझ्याही आकलना पलिकडचा आहे. पण इथे निमित्त साडी-दागिने असले तरी मूळ मुद्दा सासरच्या मंडळींनी उत्सवमूर्तीला(नववधू) गृहित धरणे, तिच्या मतांना आवडीनिवडींना किंमत न देणे आणि माहेरच्यांनीही तिला समजूदारपणाच्या नावाखाली विनाकारण तडजोड करायला भाग पाडणे हा आहे. निम्मा खर्च सोयिस्करपणे विसरणे म्हणजे निरगाठ कसली ? सरळ फसवणूकच की!
बाकी प्रोजेक्टसाठी भावी पती परदेशी असला तरी त्याच्या संपर्कात राहून मनासारखी खरेदी करणे शालूला जमायला हवे होते.
निरगाठ म्हणजे काय?
निरगाठ म्हणजे काय?
निरगाठ म्हणजे सहज सोडवता येते
निरगाठ म्हणजे सहज सोडवता येते ती. घट्ट नसलेली.पण चुकीच्या दिशेने खेचली तर घट्ट बसणारी असं असावं. प्रत्येकी च्या मनात ही अशी एकतरी गाठ असतेच लग्नाच्या वेळची.. ती तशीच सोडून द्यायची नाही तर सोडवण्याच्या नादात घट्ट बसायची.
सासरच्या मंडळींनी
सासरच्या मंडळींनी उत्सवमूर्तीला(नववधू) गृहित धरणे, तिच्या मतांना आवडीनिवडींना किंमत न देणे आणि माहेरच्यांनीही तिला समजूदारपणाच्या नावाखाली विनाकारण तडजोड करायला भाग पाडणे हा आहे. निम्मा खर्च सोयिस्करपणे विसरणे म्हणजे निरगाठ कसली ? सरळ फसवणूकच की!
बाकी प्रोजेक्टसाठी भावी पती परदेशी असला तरी त्याच्या संपर्कात राहून मनासारखी खरेदी करणे शालूला जमायला हवे होते. >>> +१
गोष्ट छान.
मनमोकळेपणे तुमचे अभिप्राय
मनमोकळेपणे तुमचे अभिप्राय मांडल्याबद्दल धन्यवाद!
छान लिहिलंय
छान लिहिलंय