(ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून यातील प्राण्यांचा व घटनांचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तिंशी व त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांशी संबंध नाही. यात वर्णिलेल्या घटनांचा जर सद्य किंवा भूतकाळातील घडलेल्या घटनांशी काही जरी संबंध आढळला तर तो किव्वळ योगायोग समजावा, ही नम्र विनंती)
पूर्व, पश्चिम, उत्तर ते दक्षिण असे प्रचंड विस्तारलेले एक जंगल होत. गोड्या पाण्यांनी काठोकाठ भरलेली तळी, सुपीक जमीन, बारमाही वाहणार्या नद्या यांनी तो प्रदेश सुजलाम सुफलाम बनला होता. विविध प्रकारचे प्राणी त्यात गुण्यागोविंदाने रहात होते. त्या जंगलावर मात्र वर्षानुवर्षे एकाच सिंहाच्या “घराण्याची” सत्ता होती. कित्येक वेळा काही चांगल्या प्राण्यांनी घराणेशाहीच्या विरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला पण जंगलातील निष्क्रीय झालेल्या प्राण्यांना गुलामगिरीची जणूकाही सवयच लागली होती.
परंतु, कित्येक वर्षानंतर तेथे दुसर्या एका प्रौढ सिंहाने त्याच्या वाक्चातुर्याने लोकांना भुरळ घातली व आपल्या विश्वासू सवंगड्यासह सत्तापालट घडवून आणला. आपल्या अमोघ वाणीने व कामाच्या धडाडीने त्याने लवकरच तेथील बर्याच प्राण्यांच्या मनात नवीन आशा पल्लवीत केली. त्या सिंहाने व त्याच्या सवंगड्यांनी वर्षानुवर्षे जंगलात कधीही न घडलेल्या सुधारणा घडवून आणण्यास सुरूवात केली. जंगलाची भरभराट होत होती व बर्याच प्राण्यांची या नवीन सिंहावर “भक्ती” जडली. तो दर महिन्याला जंगलातील प्राण्यांसमोर “जंगल की बात” हा कार्यक्रम आयोजित करून प्राण्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना राबवत असे. कित्येक वर्षे जंगलाच्या उत्तर सीमेबाहेरील “लाल तोंडाच्या माकडांनी” उच्छाद मांडला होता. वेळीअवेळी जंगलात घुसून फळझाडांचे नुकसान करणे, जंगलातील प्राण्यांना मारहाण करणे, जंगलाच्या सीमा मनाला येईल तश्या बदलणे इ. अनेक कृत्यांनी त्यांनी जंगलातील प्राण्यांना अक्षरशः वेठीस धरले होते. सिंहाने त्याच्या “वीर” वानरसेनेला पूर्णपणे मोकळीक देऊन या माकडांवर दहशत बसवली. कित्येक वर्षे शांतीची आस मनी बाळगून असलेल्या या जंगलातील प्राण्यांना प्रथमच काही नवीन बदलाची जाणीव होत होती. जगातील कित्येक नावाजलेल्या जंगलामध्ये या जंगलाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. दुसऱ्या जंगलातून या सिंहाचे प्रचंड कौतुक होऊ लागले व इतर जंगलात त्याला मोठा सन्मान मिळू लागला. “सिंह आहे तर सगळे शक्य आहे” ही जणू जंगलातील घोषणाच बनली होती. सगळे कसे अगदी दृष्ट लागण्यासारखे चालले होते ......
पण नियतीला बहुधा हे मंजूर नव्हते...एके वर्षी जगात सगळीकडे “दुष्काळ” पडला...महीनो महिने पाऊस पडण्याची लक्षणे दिसेनात. प्राणी पाण्यावाचून तडफडून मरू लागले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सिंहाने व त्याच्या सहकार्यांनी ताबडतोब काही योजना अमलात आणल्या. कित्येक जनांवरांनी चालवलेली पाण्याची नासाडी थांबवून, पाण्याची बचत करून त्यांनी या दुष्काळावर काही प्रमाणात का होईना पण विजय मिळवला. त्याने प्राण्यांनी एकत्र येऊन जोरजोरात ओरडून पावसाला आवाहन करण्यासाठी उद्युक्त केले. त्याच्यावरील प्रेमापोटी जंगलभर प्राण्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र जमून तालासुरात ओरडून पावसाला आवाहन केले. पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. इतर काही उपायांनी दुष्काळावर काही प्रमाणात विजय मिळवल्यावर त्याने इतर जंगलांबरोबर आपले संबंध मजबूत करण्यासाठी व काही नवीन मित्र जोडण्यासाठी इतर जंगलात काही प्रमाणात पाणी पाठवण्यास सुरूवात केली. त्याच्या या कृत्याने इतर जंगलातील बर्याच प्राण्यांचे प्राण वाचले. त्याच्या या दानशुरतेचे इतर जंगलातून कौतुक होऊ लागले. प्रसिध्दीमुळे त्याला आपल्या शक्तीवर व बुध्दीवर अतोनात विश्वास बसायला लागला. त्याला विरोध करण्यांची गळचेपी केली जाऊ लागली. त्याच्या कृतीला विरोध म्हणजे जंगलाशी बेईमानी असे काहीसे चित्र त्याच्या “भक्तांनी” निर्माण केले. सिंहाला आता आकाश ठेंगणे वाटू लागले. परंतु त्याच्या सगळ्याच सवंगड्यांना हे रूचत नव्हते. त्यात होता एक चतुर कोल्हा. जंगलात अहोरात्र प्रामाणिक काम करून त्याने “रस्त्यांचे जाळे” विणले होते. प्राण्यांना जंगलातील कोणत्याही टोकाहून पाणवठ्यांवर जायला त्यामुळे कमी वेळ लागत असे. त्याला मात्र हा दुष्काळावर मिळवलेला विजय तात्पुरता वाटत होता. जंगलातील इतर वयोवृध्द प्राण्यांच्या मते पुढच्या वर्षी दुष्काळ अजून उग्र रूप धारण करेल. त्यासाठी आत्तापासूनच उपाययोजना कराव्या असे त्या तज्ञ प्राण्यांचे मत होते. पण स्वमग्नतेमध्ये रमलेल्या त्या सिंहाला मात्र याची काहीच भीती वाटत नव्हती. आपण येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करू अशी आताशा त्याला खात्री वाटायला लागली होती.
त्यातच, दरवर्षीसारखा स्थलांतरीत “केशरी” पक्षांचा मोठा थवा या जंगलातील पाणवठ्यावर उतरला. लाखोंच्या संख्येत हे पक्षी “शाही स्नान” करून पाण्याचा मनाजोगता वापर करू लागले. मागच्या दुष्काळात होरपळून निघाल्यामुळे जंगलातील कोल्हा व काही सवंगड्यांनी तसेच काही सुज्ञ प्राण्यांनी त्यांच्या या “शाही स्नानाला” विरोध केला. तेव्हा या पक्षांच्या प्रतिनीधींनी सिंहाकडे यासाठी परवानगी मागितली. आमच्या शाही स्नानामुळे जंगलाची किर्ती चहुदिशांना कशी पसरते आहे हे त्यांनी त्या सिंहाच्या गळी नीट उतरविले. प्रसिध्दीच्या मोहाला बळी पडून त्याने आपल्या सवंगड्यांचा व वयोवृध्द प्राण्यांचा सल्ला न जुमानता त्या “शाही स्नानाला” परवानगी दिली. पाण्याची होणारी अपरिमीत नासाडी व दिवसेदिवस कमी होणारी पाण्याची पातळी कित्येक प्राण्यांच्या मनात भय उत्पन्न करत होती. परंतु सिंहाच्या आज्ञेच्या विरोधात जाण्याची त्यांची हिंमत होत नव्हती.
अखेर जे व्हायला नको तेच झाले. यावर्षी देखील पावसाने जंगलाकडे पाठ फिरविली. यंदाच्या दुष्काळाचा “दुसरा तडाखा” प्रचंड होता. जंगलातील सगळे पाण्याचे स्रोत आटले. शाही स्नानानंतर तलावाच्या पाण्यात प्रचंड घाण झाली होती. दुसरा कोणताच पर्याय नसल्याने प्राणी त्यातील पाण्याने आपली व आपल्या बछड्यांची तहान भागवत होते. परंतु अस्वच्छ पाण्याने जंगलात रोगराई पसरू लागली. प्रचंड मोठ्या संख्येने प्राणी जीव सोडू लागले. त्यातच तापमान प्रचंड वाढल्याने जंगलात कित्येक ठिकाणी वणवे पेटले. काळ्याकुट्ट धुराने सगळा आसमंत व्यापून राहिला. “प्राणवायू” न मिळाल्याने कित्येक प्राणी “तडफडून” मरू लागले. यासंबंधीच्या अनेक बातम्या इतर जंगलात पसरल्या. आता त्या सिंहाच्या एकंदरीत निर्णय क्षमतेवर व नेत्तृत्वावर सगळीकडून संशय घेण्यास सुरूवात झाली. या संकटावर वेळीच उपाययोजना न केल्यामुळे त्याच्यावर जंगलातून व बाहेरून अशी चहूबाजूंनी टीका होऊ लागली. नेहमी कौतुकाची सवय असलेला सिंहाला मात्र या धोक्याच्या गंभीरतेची जाणीव नीटशी झाली नव्हती. परिस्थिती हाताबाहेर जाते आहे हे जाणवल्याने त्या चतुर कोल्ह्याने सिंहाला उत्तरेकडे एका “सिंहीणी”ने बंड केले असून त्यावर मात करण्यासाठी आपल्या बरोबर ताबडतोब चलायची विनंती केली. आपला पराक्रम सगळ्यांना दाखवून त्यांना आपल्या सामर्थ्याची जाणीव करून द्यावी म्हणून तो ताबडतोब कोल्ह्याबरोबर उत्तर दिशेला निघाला. हुशार कोल्ह्याने त्याला अशा मार्गावरून नेण्यास सुरूवात केली जेथे त्याला पाण्याशिवाय तडफडणारे प्राणी, वणवे पेटलेले प्रदेश, त्यात जळालेले प्राण्यांचे देह व “प्राणवायू”च्या अभावाने जीव सोडताना प्राणी हे सगळे दिसतील. हे सगळे पाहून त्या सिंहाला अतिशय दुःख झाले. कोल्ह्याची युक्ति त्याच्या लक्षात आली. सिंहाला आपल्या चुकांची जाणीव झाली होती. जोपर्यंत यातून मार्ग निघत नाही तोपर्यंत मी “आयाळ” वाढवत राहाणार अशी त्याने प्रतिज्ञा केली. परंतु, त्याला यातून कसा मार्ग काढावा ते काहीच सुचेना. तेव्हा त्याने या सगळ्यावर उपाययोजना करण्यासाठी कोल्ह्याची ताबडतोब नियुक्ती करून त्याला सगळे अधिकार बहाल केले. कोल्ह्याने आपल्या चातुर्याने भराभर निर्णय घेऊन त्यांच्या अंमलबजावणीस सुरुवात केली.
कित्येक माकडे पेटलेल्या फांद्या कुतूहलापोटी इकडेतिकडे घेऊन फिरत होती त्याने जंगलात आग पसरली होती. त्याने प्रथम जंगलातील या प्राण्यांच्या “मोकाट फिरण्यावर” पूर्ण बंदी घातली. त्याची शिकारी कुत्र्यांची फौज जंगलात मोकाट फिरणार्या प्राण्यांना पकडून व चावे घेऊन जेरीस आणत होती. उंच मानेच्या जिराफांची त्याने जंगलभर नेमणूक केली. छोट्या वणव्यांची बातमी ताबडतोब त्याला कळू लागली. वणवे पेटलेल्या भागांचे “विलगीकरण” करून त्याच्या आजूबाजूची झाडे व गवत कापून आग पुढे पसरणार नाही याची काळजी घेतली. पेटलेले छोटे वणवे त्याने हत्तींकडून विझवून टाकले. आगींवर नियंत्रण मिळवल्यामुळे जंगलात प्राणवायूचे प्रमाण परत वाढीस लागले. प्राण्यांना त्यांच्या बिळापर्यंत गवत, मास आणि ठराविक प्रमाणात पाणी मिळेल अशी तरतूद त्याने केली. प्राण्यांच्या मोकाट फिरण्यावर पूर्ण बंदी घातल्यामुळे जंगलात रोगराईचा प्रसार आटोक्यात आला. त्यामुळे प्राणी त्यांच्या घरात का होईना पण सुरक्षीत राहू शकले. नंतर, जंगलातील सगळे पाणवठे त्याने प्रयत्नपूर्वक जोडले त्यामुळे पावसाचे पाणी जंगलभर फिरते राहिले. पडलेल्या पावसाच्या पाण्याची योग्य साठवणूक व नियंत्रीत वापर याने जंगलात पाण्याचे दुर्भीक्ष कमी झाले. कित्येक दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर जंगलातील या अभूतपूर्व संकटावर त्यांनी मात केली.
कोल्ह्याच्या या जलद उपाययोजना व त्याच्या प्रयत्नांचे सिंहाला कौतुक वाटले. त्याने त्याला पुढचा राजा बनवण्याची तयारी दाखवली. कोल्ह्याला मात्र आपल्या कुवतीची जाणीव होती. सिंहाच्या तळमळीची, सामर्थ्याची व त्याच्या धडाडीची कोल्ह्याला पूर्ण खात्री होती. त्याच्याशिवाय दुसर्या कोणाकडेच या जंगलाला गतवैभव मिळवून देण्याचे सामर्थ्य नाही हे तो पूर्णपणे जाणून होता. काही ठराविक काळासाठी सिंह चुकला होता परंतु त्याने मोठ्या मनाने आपली चुक मान्य करून कोल्ह्याकडे सगळी सूत्रे सोपवली होती. त्यामुळे सिंहानेच या जंगलाचे नेत्रृत्व करावे हे सर्वानुमते ठरले. सिंहानेपण सगळ्या मानमरातब व कौतुकाकडे दुर्लक्ष करून त्याच्या जंगलाला गतवैभव मिळवून देण्याची प्रतिज्ञा केली. त्यानंतर काही वर्षातच त्या जंगलाने आपले गतवैभव परत मिळवले व परत सुजलाम सुफलाम म्हणून ते नावारूपाला आले.
(टीप – ही कथा लहान मुलांसाठी लिहीली असूनदेखील काही मोठ्या लोकांनी पण जर यातून बोध घेतला तर कथा लिहीण्यासाठी लेखकाने घेतलेल्या प्रयत्नांचे चीज होईल.)
शेवटचा पॅरा जितक्या लवकर खरा
शेवटचा पॅरा जितक्या लवकर खरा होईल तितकं चांगलं.
तो खरा व्हावा ही प्रार्थना करु सगळे.