त्या दिवशीची लांबलचक पसरलेली दुपार संपवायला एखादा चांगला मूव्ही मिळतोय का, ते शोधत शोधत
शेवटी तो 'जैत रे जैत'पाशी थांबतो..!
मग बेडवर अस्ताव्यस्त लोळत पडून बघत असतानाच,
पुढे त्यात एक असा सीन येतो की स्मिता पाटील मोहन आगाशेंच्या दंडाला चावते आणि विचारते,
"माशी चावलेली चालती आन् मी चावलेली चालत नाय व्हय?"
तर त्या सीनमध्ये स्मिता पाटील जो एक मिश्किलीत भिजून आर्द्र झालेला, मऊ सूर लावते,
त्यामुळे इकडे त्याच्याही आत कसलीतरी ओळखीची
सळसळ नकळत निर्माण व्हायला लागते..!
मग त्या सळसळीला योग्य दिशेनं नेण्याच्या हेतूने,
तो चार हात अंतरावर लॅपटॉपवर काम करत बसलेल्या
तिला धूर्तपणे विचारतो की 'काही मूड आहे का आज?'
हे ऐकताच ती फिस्कारून म्हणते की
'एss काई मूड-बिड नाईये माझा.. रोज रोज काय आहे..!!'
तर अशा स्पष्ट शब्दांमध्ये तिनं याचिका फेटाळून
लावल्यामुळे, त्या सळसळीचं पुढे वादळात वगैरे रूपांतर
होण्याची शक्यता क्षणार्धात संपुष्टात येते,
आणि मग त्यातून निर्माण झालेला अपेक्षाभंग
किंवा खरंतर इथं 'रसभंग' हाच योग्य शब्द होईल,
तो चेहऱ्यावर दिसू न देता, साळसूद बोक्याचा आव
आणत, 'अगं..सहजच विचारत होतो मी, एवढी
चिडचिड कशाला करतेस..!'
वगैरे वगैरे सारवासारव त्यानं चालू केली असतानाच,
ती म्हणते की 'लाडात नको येऊस.. एवढाच जोर आला
असेल तर भांडी पडलीयेत सकाळपासून, तेवढी बघ जरा..!'
खरं तर त्या दिवशी भांडी घासण्याचा वार समजा त्याचा नसला तरीही, दुधाचं खरकटं भांडं घासताना बोटांना जो एक प्रकारचा गिळगिळीत स्पर्श होतो, तो शक्य तेवढा टाळत टाळत आणि इतर भांड्यांचा होता होईल तेवढा
मोठमोठ्यांदा दणदणाट करत करत, ते काम तो संपवतो..!
आणि मग 'आता काय करावं बरं' असा विचार करत
तो उगाचच फ्लॅटभर येरझाऱ्या घालत रेंगाळत राहतो,
ते पाहून काही वेळाने ती लॅपटॉप बाजूला ठेवते
आणि आळोखेपिळोखे देत देत नाचऱ्या डोळ्यांनी
आणि घायाळ आवाजात विचारते की
'ऐक नाss मूड आहे का तुझा अजून ?'
मग ह्यानंतर खरंतर जुन्या मराठी सिनेमांचे दुष्ट दिग्दर्शक,
अशा सीनमध्ये ऐन मोक्याच्या वेळी दोन गुलाबाची फुलं
एकत्र आलेली दाखवून पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास करायचे,..
पण आज समजा एखादा दिग्दर्शक तसं करायला गेला
तर त्यातून हास्यनिर्मितीशिवाय काहीच निष्पन्न होणार नाही,
ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन, ते दोघेही नंतर थेट मुद्द्यावरच येतात,... एवढं सांगून थांबावं म्हणतो..!!
सटल पण छान मांडले आहे.
सटल पण छान मांडले आहे.
_/\_
_/\_
झकास
झकास