मागच्या भागाकडे जाण्यासाठी कृपया झाली दिलेल्या दुव्यावर टिचकी मारावी.
https://www.maayboli.com/node/78798
मला कुणीतरी सावरलं.
एका हाताने माझा जाणारा तोल सावरत कुणीतरी मला स्वतःकडे ओढलं होतं.
पुरूषी स्पर्श !
पण खूप ओळखीचा वाटत होता.
भीतीने माझी गाळण उडाली होती. अंगाचा थरकाप होत होता. पायात कंप सुटला होता. सरळ शंभर एक फूट खाली जाऊन पडणार होते.
त्या आश्वासक स्पर्शाने जिवात जीव आला.
वळून मी त्या इसमाकडे पाहीलं आणि दुसरा धक्का बसला.
इतक्या विचित्र पद्धतीने, खरं तर फिल्मी पद्धतीने तो मला भेटला होता.
काय प्रतिक्रिया द्यावी हेच समजत नव्हतं.
तो भेटला म्हणून आनंद व्यक्त करायचा की गेल्या वेळचा राग थोडासा दाखवावा की
जीव वाचवल्याबद्दल आभार मानावेत ?
आणि मला भोवळ आली
मी शुद्धीवर आले तेव्हां एका बाकड्यावर झोपले होते. माझ्या बाजूला ऋतूपर्ण बसला होता.
*************************************************
आशी खूप काही सोसत असावी.
पण माझ्याबरोबर चांगली खुलली होती, अंकल म्हणत होते की कित्येक वर्षात अशी स्वतःहून फेरफटका मारायला बाहेर पडली नव्हती ती.
मी अजूनही विषय काढला नव्हता.
योग्य वेळेची वाट बघत होते. तिचा विश्वास बसू देत.
तीन चार रात्री तर मी तिच्याजवळच झोपले.
पण जे जे ऐकलेलं होतं तसं काहीच अनुभवायला मिळालं नाही.
आशी सुद्धा शांत झोपली होती.
अंकलना सांगितलं ते.
त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. इतकंच म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून थांबलंय सगळं.
झरना आंटीकडे जावंसं वाटत होतं. पण मामीला इतक्यात त्यांच्याकडे यायचं नव्हतं.
आशीच्या अवस्थेला त्याच जबाबदार आहेत असं त्यांचं मत होतं.
अंकलना विचारलं तर ते म्हणाले
"एकटी कशी जाणार ?"
मी त्यांना पटवून देत राहीले. खरं तर आंटींना मी भेटायला जावं हे त्यांना रूचलेलं दिसत नव्हतं.
मामी ने पण नकारघंटा सुरू ठेवली होती.
शेवटी दोघेही कसे बसे तयार झाले.
"आशीला पण घेऊन जाऊ का ?"
त्यावर अंकल थोडे वैतागून बोलले.
" आशीला अजिबात न्यायचं नाहीस. विचारायचं सुद्धा नाहीस याबद्दल "
पडत्या फळाची आज्ञा तर मिळाली होती.
-----------------------------------------------------------------------------------------
आशी आणि मी स्केटींग क्लबला जायला सुरूवात केली होती.
तिथून येऊन तिला घराच्या कोप-यावर सोडलं की चालायला जायचंय असा बहाणा करून मी रोज ऋतूला भेटायला जायचे.
पण हा कधीच ठरल्या वेळेला येत नसे.
पुन्हा एकदा झटका द्यायला पाहीजे असं मी मनाला बजावत असे.
पण आला की सगळं विसरून जायचे.
आजूबाजूला इतके प्रभास, ऋतिक असताना परमब्रत चटर्जी च आवडता नट होता. भले त्याला यांच्यासारखा नाचता येत नसेल. तितका देखणा नसेल, तशा हाणामा-या करता येत नसेल, सिक्स पॅक नसतील. पण परमब्रत चटर्जी ऋतू भेटल्यापासून अजूनच आवडता झालेला होता.
तो नसेल तेव्हां त्याचे चित्रपट काढून बघायचे.
इतकी एकनिष्ठ राहीलेय समजलं का ? हे मला सांगायचं होतं.
पण नकोच ते.
काश्मिरीचा विषय काढला की ऋतू टाळायचा.
रियाज करण्यासाठी म्हणून मी लक्कडबाजारच्या वरच्या हवेलीची चावी घेतली होती. साफसूफ करवून घेतली होती.
मोहन बुटैल आणि प्रीती बुटैल अशी त्या जोडप्याची नावं होती. दोघेही हसमुख आणि विनम्र होते. कष्टाळू होते. कधी काळी असलेला नितळ गोरा रंग कष्ट, ऊन आणि काळज्यांनी थोडासा काळवंडलेला जाणवत होता.
दोघे आपलं काम भलं आणि आपण भलं अशा वृत्तीचे होते.
मी इथे बराच वेळ घालवायचे. ऋतू इथेच भेटायला यायचा. पण दोघांनी कधी आमच्या भानगडीत नाक खुपसलं नाही. जास्त भोचकपणा केला नाही. काही हवं नको ते अधून मधून विचारायचे. नाहीतर मग आवाज दिल्याशिवाय जास्त ढवळाढवळ नसायची. मोहन कामाला गेला की प्रीतीची सोबत व्हायची.
प्रीतीची आणि माझी चांगलीच दोस्ती झाली.
त्यातून काही काही गोष्टी समजत गेल्या.
झरना आंटी इथे काही दिवस रहायला आल्या होत्या.
तेव्हां त्यांचं मानसिक संतुलन ठीक नव्हतं.
त्या रात्री घाबरून उठायच्या.
जिन्यावरून खाली पळत सुटायच्या. लाकडी जिन्याच्या आवाजाने प्रीती किंवा मोहन जागे व्हायचे. दोन तीन वेळा त्यांनी आंटीला धरून ठेवलं होतं नाहीतर त्या बाहेर अशाच पळत सुटल्या असत्या.
सकाळी त्यांना काही आठवत नसे.
मग त्यांनी घरातच खाली झोपायचा निर्णय घेतला. झोपताना दाराला आतून कुलूप घालू लागले होते.
तिला इतकंच माहीत होतं.
आंटी इतक्या का घाबरल्या होत्या. त्यांच्या बाबतीत काय झालं होतं तिला माहीत नव्हतं.
अनामिका मामीने पण असंच काहीसं सांगितलं होतं.
आणि मग काही दिवसातच झरना आंटीला खासगी मनोचिकित्सालयात पाठवलं गेलं होतं.
आणि आशी हळू हळू नीट झाली होती.
या घटनांचा आपसात संबंध कसा लावायचा ?
******************************************************
ऋतू त्या माकडांच्या हल्ल्याच्या वेळी भेटला तेव्हां काय करावं तेच सुचलं नाही.
पण त्याने जीव वाचवला होता.
त्याबद्दल आभार मानले आणि गप्प बसले.
त्याला खूप आनंद झालेला होता. पण माझा थंड रिस्पॉन्स बघून त्याने चेष्टेखोर आवाजात विचारले,
" राग गेला नाही वाटतं अजून ?"
मला हेच तर ऐकायचं होतं.
अगदी "एक माणूस रूसलं वाटतं " या टोनमधे नसेल तरी चाललं असतं.
पण आधी त्याने शरण यायला हवं होतं. हे मनाला सुखावणारं होतं.
नाहीतर मग त्रास झाला असता. खूपच.
तरी जरा फूटेज खाऊन मगच समाधान होणार होतं.
एक हुकमी आठी कपाळावर पडली.
तर हा अगदी त्या जॉय मुखर्जीच्या स्टाईल मारत गायला लागला
" वो है जरा..खफा खफा
तू नैन यूं चुराए है
के हो हो हो हो हो हो
मी चटकन न राहवून पुढचं गाणार होते...
इतक्यातच त्यानेच पुढची ओळ पण घेतली
ना बोल दूं तो क्या करुं
वो हंस के यूं बुलाए हैं
के हो हो हो हो हो हो
नशीब..
पण ..
हंस रही है चांदनी
मचल के तो ना दूं कही
ऐसे कोई रूठता नही
या ओळीतल्रा रू अ ठता नही या हरकतीवर वळून त्याच्याकडे पहायची चूक केली आणि खुदकन हसायला आलं.
त्याच्या चेह-यावरचे भावच तसे होते. आता फूटेज खायला चान्सच नव्हता.
कारण त्याच्या चेह-यावर सुटकेचे भाव होते.
नशीब कुणीही नव्हतं या वेळेला.
नाहीतर उगीच गर्दी जमली असती बघायला.
"हेच गाणं बरं आठवलं आत्ता ? मी विचारलं..
" अरे याची पण हिस्ट्री आहे "
" याची पण ?"
" सांगतो. रफी आणि लता यांचं कडाक्याचं भांडण झालं होतं. तीन वर्षे दोघे एकमेकांशी बोलतही नव्हते आणि गातही नव्हते एकमेकांबरोबर. अशा वेळी सुबोध मुखर्जी आपल्या मुलाला घेऊन शागीर्दची तयारी करत होते. जॉय मुखर्जी साठी रफी हे ठरले होते. सायरा बानू साठी सुमन कल्याणपूर यांना घेऊन तयारी चालू झाली. गाणी लिहायची होती. इतक्यात रफी आणि लता हे भांडण मिटल्याची बातमी आली. सुबोध मुखर्जी म्हणाले , आपण लताजींना बोलावू.
लक्ष्मी प्यारेंना रफी लता यांची फिरकी घ्यायची हुक्की आली. त्यांनी मुखर्जींना सांगून एक गाणे बनवले. गीतकार होते साहीर लुधियानवी. तसा गंभीर मनुष्य. पण लता रफीच्या भांडणानंतर फिरकी घ्यायची म्हणून त्यांनी पण लगेच तयारी दर्शवली आणि लगेचच पहिली ओळ लिहीली..
वो है जरा खफा खफा...
बस्स. लता आणि रफी अगदी जीव तोडून गायले.
नंतर त्यांना समजलं की गाणं नायक नायिकेसाठी नसून आपल्यासाठी होतं.
रफींनी हसून दाद दिली. लताबाई निघून गेल्या. पण नंतर फोन करून हसत हसत दाद दिली"
"अच्छा आणि साहेबांना हे माहीत होतं तर."
" अलबत. रूसवा काढायसाठीचं खास गाणं "
मग दोघेही हसत सुटलो.
त्याने मग बोलता बोलता इकडे येण्याचं कारण विचारलं.
मी सगळं सगळं सांगितलं.
****************************************************
ऋतुपर्ण हा माझ्या दुस-या मामाच्या मुलाचा म्हणजे अर्धेंदुचा मित्र होता. त्याच्यामुळेच तर ओळख झाली होती.
विश्वजीत अंकलच्या केसबद्दल त्याला माहिती होतीच.
आम्ही मग खूप वेळ बोलत बसलो.
अंकल शोधाशोध करतील म्हणून निघायला हवं होतं. त्याला घरी बोलावलं तर आता या वेळी नको म्हणाला.
निघायच्या आधी डोक्यात अचानक चमकून गेलं म्हणून त्याला पुन्हा विचारलं
" पण तू इथे कसा आणि ऐन वेळी कसा पोहोचलास ? तो मला धक्का मारलेला कोण होता ?"
" सांगतो सगळं नंतर निवांत भेट "
" अरे पण ?"
’ काश्मिरी होता एक. त्यालाच पकडायला मी पाठलाग करत होतो. आमच्यामुळेच माकडं बिथरली होती. त्याबद्दल सॉरी "
" पण पाठलाग का करत होतास ?"
" अगं आली आहेस आता. सांगतो म्हटलं ना "
निघताना त्याचा फोन नंबर घेतला.
***********************************************************************
नाही म्हटलं तरी ऋतूशी भेटीगाठी व्हायच्या त्यातून विचारांना दिशा यायची.
आमच्यात तो तटस्थ होता.
शिवाय रॅशनल थिंकिंग होतं त्याचं. त्याचं लॉजिक अगदी परफेक्ट असायचं.
एकच गोष्ट खटकायची.
तो बाहेर असायचा, त्याबद्दल जास्त सांगत नव्हता.
उशीर व्हायचा. त्याची कारणे देत नव्हता.
एक दोन वेळा माझ्यावर वैतागला होता,
आता पुन्हा रिलेशन मधे बाधा नको म्हणून मी गप्प बसले.
तो कुठल्यातरी काश्मिरींच्या मागावर होता इतकंच समजलं.
पण तो माझ्याशी का शेअर करत नव्हता ?
इथे तो ट्रॅव्हल एजन्सी चालवत होता म्हणाला.
मग ऑफीस, किमान बाकडं तरी का नाही दाखवलेलं अद्याप ?
टेबल टाकून सुद्धा अनेक जण इथे लाखोंचा धंदा करतात की.
पण तो शिताफीने टाळायचा.
"विश्वास नाही का ?"
मग मी पण वाट बघू म्हणून थांबायचे.
त्याने मला लवकरात लवकर आशीला काय काय विचारायचं त्या प्रश्नांची यादी पाठ करून घेतली होती माझ्याकडून.
आता संगतवार सगळं यायला पाहीजे होतं.
म्हणजे काय काय निसटलं ते दुवे नंतर सांधून घेता येणार होते.
***************************************************************
रात्री मी आता खालच्या बंगलीत एकटी झोपू शकत होते.
उशीर पर्यंत ऋतू असायचा,
जेवणं झाली की नवाच्या सुमारास तो निघायचा.
मला त्याला थांबवावंसं वाटायचं..
पण ..
ते कधीच ओठावर नाही आलं.
तो चॅप्टर झालेला होता. डोळ्यात नक्कि वाचलं असेल.
मग मिस्कील हसत निघायचा.
गैरफायदा घेत नव्हता.
सकाळी लवकर जाग यायची.
मग अंगावर शाल घेऊन , कानटोपी वगैरे सगळा जामानिमा करून मी फिरायला निघायचे. आता वरच्या दिशेने जायची रिस्क घेत नव्हते.
रीज वर थोडं वॉर्मिंग अप व्हायचं.
एक ग्रुप तेव्हां तिथे स्केटींग करत असायचा.
जागच्या जागी उड्या मारून झाल्या की मग मी सरळ स्कॅन्डल पॉईन्ट पर्यंत जायचे.
ऑक्सिजन भरून घेतला की फ्रेश वाटायचं.
मग लाला लजपतराय यांच्या पुतळ्याला वळसा घालून मॉल रोडने खाली निघायचे.
इंडीयन कॉफी हाऊसच्या इथे पावलं थबकायची.
त्याचा ट्रेडीशन लुक अजून आहे तसा आहे.
बाबांबरोबर इथे खूपदा आले होते.
इथली कॉफी, स्नॅक्स अनेकदा बाबाबरोबर बसून खाल्लेलं आठवायचं.
त्याच्य़ा शेजारी टंडन अंकलचं आधुनिक कॅफे होतं.
अंकल दारात असायचे. हसून अभिवादन करायचे.
"गुड मॉर्निंग "
" गुड मॉर्निंग अंकल "
" अंधेरा है, इतनी जल्दी निकला ना करो"
" कुछ नही होता अंकल. आपका शहर है "
मग ते हसायचे.
" वो तो है "
जरा पुढच्या वळणावर एक आर्ट गॅलरी होती.
तिच्यावर कुणीतरी रहायचं.
रोज या वेळेला व्हायोलिन वाजवत असायचं.
त्या व्हायोलिनचे गूढ स्वर आसमंतात भरून रहायचे.
विधू विनोद चोप्राचा खामोश पाहिला असेल तर त्याचं पार्श्वसंगीत आठवत असेल.
तसेच सूर कुणीतरी आळवत असायचं.
हे असलं कोण असेल विचित्र ?
मी एकदा पाटी वाचायचा प्रयत्न केला.
अंधारात ते म्युझिक स्कूल असल्याचं समजलं.
दूर टनेल पर्यंत गेले की मग परत दुस-या दिशेने लक्कडबाजारच्या इथून पाय-या पकडून थेट बंगलीवर यायचं.
तिथून मग मुखर्जी अंकलच्या घरी.
कुणी ओरडायला नको म्हणून अधून मधून इथेही राहत होते.
आशी उठायची वाट बघत चहा नाश्ता होऊन मी फ्रेश व्हायला जायचे.
आज मात्र काही तरी ठरवलंच होतं.
आशी उठलेली होती.
तिच्याशी काही गेम्स खेळल्यावर ती पण तरतरीत झाली.
मग तिला तयार केलं.
आणि दोघीच बाहेर पडलो.
इंडीयन कॉफी हाऊस मधे येऊन बसलो.
मॅनेजर चांगला ओळखीचा झालेला होता.
या वेळी गर्दी कमी झालेली असायची. त्यामुळे काही मागवलं नाही तरी काही बोलायचा नाही.
ऋतू आणि मी बरेचदा बसलो होतो इथे.
वेगळ्या वातावरणाचा चांगला परिणाम आशीवर दिसत होता,
ऋतूने सांगितलं तसं तिला खोदून खोदून विचारण्यात फायदा नव्हता.
सूचक प्रश्न विचारल्याने ती विचारात पडायची.
मग इकडच्या तिकडच्या गप्पा.
कॉफी घेऊन आम्ही रीजच्या कट्ट्यावर येऊन बसलो.
आशी म्हणाली
"दिदी, तू मघाशी काहीतरी विचारत होतीस ना ?’
" काय गं ?"
" अगं नाही का ते ?"
" काय माझ्य़ा लक्षात नाही "
" तुम्हाला मी वेडी वाटते ना ?"
" नाही राणि. का गं ? "
" मी वेडी नाही दिदी "
" मला माहीत आहे "
" काय ? तुला सगळं माहीत आहे ?"
’ सगळं म्हणजे ? अगं तू वेडी असूच शकत नाहीस हा माझा विश्वास आहे असं म्हणाले मी.
तुला काही वेगळं सांगायचंय का ?"
"दिदी , माझ्या मनात खूप काही साठलेलं आहे. मी फक्त तुझ्याजवळ बोलू शकते "
" शोनू मग इथे नको. चल आपण खालच्या आपल्या लाकडी बंगलीत जाऊयात "
कामच झालं होतं.
ऋतुला मेसेज टाकला.
"मी सांगत नाहीस तो पर्यंत खालच्या घरी येऊ नकोस"
हो नाहीतर सगळा खेळ खलास.
दार उघडतानाच प्रीतीला सांगितलं.
"काही झालं तरी बोलवल्याशिवाय येऊ नकोस"
माझ्या चेह-यावरचे भाव आणि आवाजातला खर्च पाहून ती समजून गेली.
सकाळी स्नो फॉल झालेला होता.
वरच्या खिडक्यांवर साठल्यामुळे आतली हवा थंडगार होती.
मी फायरप्लेस पेटवली.
घर लाकडी असलं तरी त्याचे खांब आणि आडव्या बीम्स दगडी होत्या.
त्यामधे या लाकडाच्या फ्रेम्स घट्ट बसलेल्या होत्या.
आतून ग्रीलवर्क होतं.
खिडक्या मात्र छान पैकी बाहेर उघडणा-या होत्या.
१९४२ मधल्या मनिषासारख्या या खिडक्या उघडताना मजा वाटायची.
अशी गप्प बसलेली होती.
शब्दांची जुळवाजुळव करत होती.
मी तिला हातानेच खूण करून झटकन प्रीतीला खायला गरम गरम काहीतरी घेऊन ये असं सांगितलं.
एकदाच ती येऊन जाणार होती.
आशीचा मूड जाऊ नये म्हणून मी टोकलं नाही.
तिला तिचा वेळ घेऊ दिला.
तोपर्यंत पहाडी पद्धतीचे नूडल्स प्रीती घेऊन आली. तिच्याकडे ते यंत्रसुद्धा होतं. अक्षरश: दोन मिनीटात तिने बनवलं ते.
आशीला मी देऊ केलं. पण तिने हातानेच थांब म्हटलं...
मग एकदाची तॊ बोलायला सुरू झाली..
क्रमश:
(इथून पुढचे भाग संथ नसतील हे आश्वासन देते )
पुढच्या भागाकडे जाण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारावी ही विनंती
https://www.maayboli.com/node/78827
वाचतेयं.
वाचतेयं. पुभाप्र
छान भाग..
छान भाग..
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.!!
वाचतेय!
वाचतेय!
छानच.
छानच.
वाट पाहतेय पुढच्या भागाची.
उत्कंठा वाढत चालली आहे.. छान
उत्कंठा वाढत चालली आहे.. छान।।
खूप छान लिखाण. . तुझ्या
खूप छान लिखाण. . तुझ्या आधीच्या लिखाणासारखेच..
मस्तच सुरू आहे कथा....पुढील
मस्तच सुरू आहे कथा....पुढील भागाची उत्सुकता आहे..
खूपच मस्त भाग !
खूपच मस्त भाग !
सर्वांचे मनापासून आभार !
सर्वांचे मनापासून आभार !
प्रतिसादांमुळे कुणीतरी वाचतंय या भावनेने उत्साह येतो. हुरूप टिकून राहतो.
अशा प्रकारच्या संथ लयीच्या कथेमधे जर पुढचे भाग लवकर आले नाहीत तर वाचक म्हणून काय अवस्था होत असेल याची मी कल्पना करू शकते. खरं तर मलाच यातून लवकर मोकळं व्हायचंय. पण प्रत्येक भागाचे तपशील तपासून त्यातून अनवधानाने रहस्योद्घाटन होतील अशा बाबी काढून टाकणे यात वेळ जातोय. (बहाणे सांगण्याचा लेखिकेला अधिकार नसतो). तरीही टायपिंग करताना बोटं दुखू लागली आहेत आणि शिरा आखडल्याने ते अवघड झालंय.
आतापर्यंत साथ दिली तशी थोडा काळ अजून द्या ही विनंती. अंतिम भाग लवकरच टाकण्याचा माझा प्रयत्न आहे.
छान सुरू आहे कथा.
छान सुरू आहे कथा.
अंतिम भागाच्या प्रतिक्षेत.
अंतिम भागाच्या प्रतिक्षेत. आशीची सही सलामत सुटका कराल अशी आपेक्षा.
पुढील भागाची लिंक द्यायची
ऋतुपर्ण ची एंट्री होणार हा माझा(मनातल्या मनातला)अंदाज खरा ठरला.
कथा आता रंजक वळणावर आली आहे.
(पुढील भागाची लिंक द्यायची राहिली आहे.)
मामी, स्वप्नील, प्रभूदेसाई
मामी, स्वप्नील, प्रभूदेसाई आपले आभार.
स्वप्नील - खरंच की या भागात मी लिंक नव्हती दिली. माझं ना डोकं जागेवर नाही.
धन्यवाद लक्षात आणून दिल्याबद्दल..