ती (वीस वर्षांनी) भेटण्यास येते तेव्हा...
माझा landline वाजला.
``पराग, ओळखलंस का?`` तिनं फोनवर विचारलं. असं कुणी (विशेषत: स्त्री वर्गापैकी) फोनवर विचारलं की मी आवाजावरून जो अंदाज माझ्या मनात निर्माण झाला असेल तो कधीच व्यक्त करत नाही. कारण हा अंदाज हमखास चुकतो. अगदी माझं नुकतंच लग्न ठरलं होतं तेव्हाची गोष्ट. एकदा पत्नीच्या घरी आणि दुसऱ्यांदा आमच्या घरी असे दोनदा भेटणे, नातेवाईकांना दाखवणे वगैरे कार्यक्रम झाल्यावर आमचा विवाह ठरला. काही दिवसाने मला फोन आला. आणि समोरून यासारखाच `ओळखलंस का?` असा काहीतरी सवाल आला. मला तो आवाज माझ्या एका मैत्रिणीचा वाटला. पण त्याही वेळी मी तसा हुशारच होतो. मी माझा अंदाज व्यक्त केला नाही. आणि बरंच झालं. तो फोन माझ्या भावी पत्नीचा होता. आमचं फोनवरचं ते पहिलं बोलणं होतं.
तर आत्ता आलेला फोनवरचा आवाज ऐकून आवाज वगैरे ओळखण्याचा मी प्रयत्नच केला नाही. शेवटी समोरून आवाज आला,
``मी प्रेरणा...``
``प्रेरणा??? अरे...... काय म्हणतेस?`` माझा अडखळत सवाल. जवळपास वीस-बावीस वर्षांनी मी तिच्याशी बोलत होतो.
``मी बरी आहे! मला तुला भेटायला यायचं आहे. तू अजूनही तिथेच राहतोस ना?``
``हो, हो, तिथेच. ये ना. कधी येतेस?``
फोनवर दिवस ठरला आणि मी फोन खाली ठेवला.
माझं मन भूतकाळात गेलं. मी आमच्या शाळेतूनच बारावी उत्तीर्ण करून भल्या मोठ्या कॉलेजमध्ये गेल्यानंतरचा अगदी पहिला-दुसरा किंवा अगदी तिसरा दिवस.
पुढं जे जे घडलं त्यातलं बहुतेक सगळं अगदी चित्रपटात घडतं तसं घडलेलं.
मी मुलांच्या शाळेतून आलेलो. आजूबाजूला मुली; एवढ्या मुली वावरण्याची अजिबात सवय नसलेला. तसा आमचा एक बालनाट्यात काम करत असल्यापासूनचा मुला-मुलींचा एक group होता. पण आम्ही सर्व इतकी वर्षं आणि इतक्या लहानपणापासून एकत्र होतो की ही सगळी मंडळी एकमेकांच्या अगदी घरातली झाली होती. त्यामुळे या groupमधील मुलींशी मी कितीही बिनधास्त बोलू शकत असलो, तरी इतरांच्या बाबतीत mission impossible होते.
तर असा फक्त मुलांच्या शाळेतून आलेला, मुलींच्या बाबतीत तसा घाबरटच असलेला मी, कॉलेजमधला वर्ग सुटल्यावर सगळ्यात शेवटी बाहेर पडत असे. तर त्या दिवशी असाच बाहेर पडत असताना एका बेंचवर एक वही पडलेली मला दिसली. वर्गात कुणीही नव्हतं. मी ती उचलली. त्यावरचं नाव वाचलं - `प्रेरणा!`
माझा शाळेपासूनचा मित्र राहुलही त्याच कॉलेजमध्ये आलेला. त्याचा वर्ग मात्र वेगळा. तो माझ्या वर्गात आला. त्याच्या सांगण्यावरून मी ती वही माझ्या bagमध्ये ठेवली.
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सर्वात आधी वर्गात येऊन बसलो. जी मुलगी वर्गात येताच वही शोधण्यास सुरुवात करेल, ती प्रेरणा! असा अंदाज होताच. तसंच झालं. मी वही तिच्याकडे दिली आणि आमची ओळख झाली.
प्रेरणा तशी बिनधास्त होती. माझ्या वाढदिवसाला राहुल आणि माझा मगाशी सांगितलेला नाटक group, असे सर्व हॉटेलमध्ये जायचे ठरवल्यावर राहुलने प्रेरणाला बरोबर येण्यास विचारायला मला सांगितले. मी घाबरत घाबरत तिला विचारलं, तर ती लगेच तयार झाली. मग लवकरच आमच्या अधून मधून canteen मध्ये जा, क्वचित सारसबागेत काहीतरी खादडायला जा इत्यादी गोष्टी झाल्या. बाहेर कुठे जाताना तिची एखादी मैत्रीण आणि माझ्या बरोबर राहुल किंवा माझा अजून एक मित्र, असं एकत्र जाणं होत होतं. आम्ही एकत्रित `मोहरा` हा चित्रपटही पाहिला निलायमला. प्रत्येक ठिकाणी बसताना आम्ही दोघे शेजारी शेजारी बसले जावो यासाठी राहुलचा खास प्रयत्न असायचा.
कॉलेज gathering मध्ये प्रेरणाने स्टेजवरून `रोझा` चित्रपटातील `दिल हे छोटासा` हे गाणं अतिशय सुंदर म्हटलं. हा तिच्यातील गुण मला ठावूकच नव्हता. भरलेल्या त्या hallमध्ये बाजूच्या पायऱ्यांवर जी मुलं उभी होती त्यांत मी उभा होतो. मला अगदी नायिका समोर गातेय, आणि नायक समोरच्या घोळक्यात उभा राहून ऐकतोय असे चित्रपटात आपण पाहतो तसे feeling आले. आमच्या दोघांत काही घडावं (म्हणजे प्रेम, लग्न वगैरे) असा काहीही आमच्यात संवाद झालेला नसताना मला असं तेव्हा का वाटलं, याचं मला नंतरच्या काळात नवलच वाटलं.
क्वचित माझं तिच्या घरी जाणं व्हायचं, क्वचित तिचं माझ्या घरी येणं व्हायचं. माझी बहीण तर वडलांना कितीदा तरी गमतीने म्हणत असे, ``बाबा, तुमची सून अमुक अमुक ठिकाणी राहते बरं का!``
मात्र इतकं सगळं घडत असूनही आमच्यात प्रेमप्रकरण वगैरे काही नव्हतं, अजिबात नव्हतं. तिच्याकडून तर नव्हतंच (म्हणजे नसावंच!), पण मलाही तसं काही जाणवत नव्हतं. माझ्या मनात (अगदी आत कुठेतरी) तसं काही होतं याची पुसटशी कल्पना मला तेव्हा आली, जेव्हा दुसरं वर्षं संपल्यानंतरच्या सुट्टीत माझ्या नाटक groupमधली एक जण मला म्हणाली, ``प्रेरणाचं लग्न झालं. तुला माहीतच असेल म्हणा!``
अरे! मला तर काहीच माहीत नव्हतं.
``हो का! असेल असेल!`` मी सहज म्हटल्यासारखं केलं खरं, पण मनात कुठेतरी जखम झाल्यासारखं वाटलं. आम्ही एकमेकांशी कधीच अशी जवळीक वगैरे दाखवली नव्हती. त्यामुळे तिनं लग्न केलं याचा काही राग येण्यापेक्षा आम्ही इतके संपर्कात असताना, आमचे फोनही (तेव्हा फक्त landline होते) अधून मधून चालत असताना, तिने याबाबत मला काहीच बोलू नये याचं मला प्रचंड आश्चर्य वाटलं, मी दुखावला गेलो.
तिसऱ्या वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रेरणा माझ्याशी बोलायला आली, आणि त्या वीस-एकविशीच्या वयात आणि दुखावलेल्या मनात मी तिच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. तिनं एकदा परत माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, आणि मी तसंच दुर्लक्ष केलं. मी असा का वागतोय, हे तिला कळलं की नाही ते मला कळलं नाही, पण मग तिनंही फक्त `गेलास उडत!` असे expression देऊन ती वर्गात निघून गेली. नंतरचे संपूर्ण वर्ष आम्ही एकमेकांशी अक्षरही बोललो नाही. कॉलेजमधील माझ्या परिचयातील अनेक जण तिच्या अशा एकदम लग्न करून येण्याने माझ्यापेक्षाही जास्त चकित झाले होते. कारण आमच्यात प्रत्यक्षात काहीही नसताना, आमच्या सतत एकत्र वावरण्याने त्यातील प्रत्येकाचा आमची जोडी जमल्याचा गैरसमज झाला होता.
आणि आता जवळ जवळ बावीस वर्षांनी ही प्रेरणा मला भेटायला येणार होती.
वर मी सांगितलेलं सगळं सगळं मी माझ्या पत्नीला पूर्वीच सांगितलं होतं. त्यामुळं आता प्रेरणा येणार असल्याचं कळताच ती थोडीशी disturbच झाली. अर्थात प्रेरणाला येऊ नको असं सांगणंही शक्य नव्हतं. तसं मी सांगावं असं माझ्या पत्नीचंही म्हणणं नव्हतं. मात्र माझ्या पत्नीनं प्रेरणा घरात असेपर्यंत मी खालच्या घरात असेन. ती गेली की मला कळवा. मगच मी वर येईन असं मला सांगितलं. एका दृष्टीनं मलाही तेच हवं होतं.
मी त्यावेळी ज्या तुसडेपणाने प्रेरणाशी वागलो होतो त्याबद्दल मला तिची माफी मागायची होती. मी तसं वागण्यामागे काय कारण होतं तेही (तिला त्यावेळी कळलं नसल्यास) तिला सांगायचं होतं. असं काय घडलं होतं, की प्रेरणाने इतक्या घाईने लग्न केलं, आणि त्याबद्दल मला एक फोनही तिला करावासा का वाटला नाही, हेही मला तिला विचारायचं होतं. आणि हे सगळं बोलताना माझी पत्नी समोर नसली तर मला थोडं मोकळेपणी बोलता येणार होतं.
ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी प्रेरणा आली. सुरुवातीला काही जनरल गप्पा झाल्या. मग मी तिच्या लग्नाचा विषय काढला. मग मला कळलं की collegeच्या सुट्टीत तिला job लागला होता. आणि तेथील मालकाने तिला propose केलं आणि तिनंही त्याला लगेच होकार देऊ टाकला. आता माझे पुढील प्रश्न तयार होते. पण तिने अचानक बोलायला सुरुवात केली.
``अरे... सुरुवातीला सासरी फारच आजारपणं पहावी लागली. सासरे आजारी असायचे. सासूबाईनाही अमुक अमुक त्रास होता. पण मग ना आम्ही abc कंपनीची औषधं, फरशी पुसण्याचे लिक्विड वापरायला सुरुवात केली. हळूहळू सगळी आजारपणं दूर व्हायला लागली. सासऱ्यांचा दमा आटोक्यात आला. यांचं अमुक अमुक बरं झालं...``
मग तिच्याकडून माझ्याबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल, माझ्या आई-वडिलांबद्दल, माझ्या व्यवसायाबद्दल एकामागून एक प्रश्न यायला लागले, आणि त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तिच्या त्या abc कंपनीकडे कसे बरोब्बर आहे याचे उल्लेख यायला लागले. एकूण या abc कंपनीच्या वस्तू वापरल्याने माझे, माझ्या कुटुंबाचे, असलेले आणि नसलेले सगळे problems दूर होणार होतेच, शिवाय या कंपनीशी जोडला गेल्यावर लवकरच मी गर्भश्रीमंत होण्याचीही दाट शक्यता निर्माण होणार होती. तसे अनेक लोक कमालीचे श्रीमंत झालेही होते..
मी प्रेरणाचा- इतक्या वीस-बावीस वर्षांनी मला भेटण्याचा उद्देश साफ समजून चुकलो. प्रेरणाने तेव्हा अचानक लग्न केल्यासंदर्भातले (आणि त्या वेळच्या आमच्या मैत्रीसंदर्भातले) माझ्या डोक्यात दोन दशके अडकून राहिलेले अनेक प्रश्न आता बाजूला पडले होते. आमचे संभाषण कधी आटपतेय याचीच मी वाट पाहू लागलो. अखेरीस ``मी नक्की विचार करतो,`` या माझ्या वाक्यावर माझा निरोप घेऊन माझी ती एके काळची खास मैत्रीण माझ्या घराबाहेर पडली आणि मी माझ्या पत्नीस ``तू आता वर यायला हरकत नाही!`` असा मेसेज पाठवला.
**
(No subject)
ती abc कंपनी Amway असावी .
ती abc कंपनी Amway असावी . उगीच आपला अंदाज.
मजेशीर लेखन!
मजेशीर लेखन!
मस्त कथन ! मानवी नाती खूप
मस्त कथन ! मानवी नाती खूप गुंतागुंतीची असतात.
. असं कुणी (विशेषत: स्त्री
. असं कुणी (विशेषत: स्त्री वर्गापैकी) फोनवर विचारलं की मी आवाजावरून जो अंदाज माझ्या मनात निर्माण झाला असेल तो कधीच व्यक्त करत नाही. >>> या सुरूवातीच्या वाक्यावरच प्रचंड फिदा होऊन बक्षीस द्यायचं मनात आलं होतं. असंही वाटलं की लेखकाने मी जिवंत असताना हा लेख का नाही लिहीला ?
पण पुढे ज्या मैत्रिणीशी पुसटसे संबंध होते ते सर्व पत्नीला सांगितले हे वाचल्यानंतर तो आदर कमी झाला आणि बक्षीस देण्याचा विचार रद्द झाला. या बाबतीत जरा मी स्वतःला हुषार म्हणेन.
बाकी नीलायमला मी पण एक चित्रपट पाहिला होता. तीच मैत्रीण नंतर मला तिच्या ट्रॅव्हल एजन्सीची फ्रँचाईजी द्यायला घरी आली होती. आपली आयुष्यं समांतर आहेत. तुम्ही स्वप्नील जोशी असाल तर मी ओरोजिनल श्रीकृष्ण आहे.
लिखाण छान आहे हे सांगणे न लगे. शुभेच्छा !
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!
पारंबीचा आत्मा, आपल्या प्रतिसादाने खूप गम्मत वाटली. आपलेही मनापासून धन्यवाद!
भारी लिहिलयं..!!
भारी लिहिलयं..!!
अगदीच आवडली आणि पटली
अगदीच आवडली आणि पटली.प्रेरणाचा भेटायचा उद्देश वेगळाच होता हे वाचून एकिकडे वाईट वाटलं, पण प्रेरणा पक्की सासरची झाली, ती काही विवाहबाह्य संबंध परत चालू/आताच्याअ लग्नात दु:खी म्हणून आली नाही याचं हायसंही वाटलं. ( डोक्यावर पदर गहिवरला आवाज मोड ऑनः "पोर मार्गी लागली हो" डोक्यावर पदर गहिवरला आवाज मोड ऑफ)
(No subject)
छान आहे...:D :-
छान आहे...
व्हाट्सअप्प वर याच आशयाचा जोक
व्हाट्सअप्प वर याच आशयाचा जोक मागे फिरत होता. त्या जोकमध्ये ती बाई इन्शुरन्सवाली होती.
तुम्ही जोक वाचा किंवा कथा
तुम्ही जोक वाचा किंवा कथा वाचा. दोन्ही नको.
तुम्ही जोक वाचा किंवा कथा
तुम्ही जोक वाचा किंवा कथा वाचा. दोन्ही नको.>>>हे जग एक मायाजाल आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा संदर्भ दुसऱ्याशी कनेक्टेड असतो. आपण जेव्हा कोणतीही गोष्ट इंद्रियांनी अनुभवतो तेव्हा आपला मेंदू नकळतपणे त्या गोष्टीचे सारे संदर्भ जे आपण पूर्वी अनुभवलेत ते आपल्यासमोर उलगडतो. धन्यवाद शुभरात्री.
व्हाट्सअप्प वर याच आशयाचा जोक
व्हाट्सअप्प वर याच आशयाचा जोक मागे फिरत होता. त्या जोकमध्ये ती बाई इन्शुरन्सवाली होती.>>>+१
हि कथाही छान आहे.
मस्त लिहलंय...
मस्त लिहलंय...
अभिप्रायांबद्दल सर्वांना
अभिप्रायांबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद!
लिखाण छान आहे
लिखाण छान आहे
शेवट धक्कादायक होता हो. ती
शेवट धक्कादायक होता हो. ती अशी का वागली याचे स्पष्टीकरण, तिचे दु:ख वगैरे वगैरे वाचण्याची तयारी केली होती. पण एकदम स्टोरीच मस्त फिरवली. कथा आवडली.
प्रेरणानेच अशी कथा लिहायची प्रेरणा दिली तुम्हाला याचे समाधान माना आता...
व्हाट्सअप्प वर याच आशयाचा जोक
व्हाट्सअप्प वर याच आशयाचा जोक मागे फिरत होता. त्या जोकमध्ये ती बाई इन्शुरन्सवाली होती.>>>+१
त्यामुळे अंदाज आला होता.
पण तुमची लेखनशैली छान आहे त्यामुळे शेवटपर्यंत वाचावसं वाटले
सर्वांना मनापासून धन्यवाद!
सर्वांना मनापासून धन्यवाद!
मस्त लिहिली आहे कथा.
मस्त लिहिली आहे कथा.
अरे ..अगदी अश्शीच गोष्ट चक्क
अरे ..अगदी अश्शीच गोष्ट चक्क २-३ वर्षापुर्वी वाचलीये .. व्हाट्सअप्प च्या क्रुपेने ! ती येते अन इन्शुरन्स च्या दोन पोलिस्या माथ्यावर टाकुन जाते.
ही तीची लहान बहिण असावी कदाचित कथा आवडली.
छान लिहिली आहे कथा!
छान लिहिली आहे कथा!