पुस्तक योग -१
१. पुस्तकं हाताशी असलेली बरं असतं..
कधी एखादा लांबलचक मोकळा स्पॅन मिळाला तर तो
अंगावर येऊ नये म्हणून..
किंवा येता जाता चाळायला म्हणून..
किंवा कामाच्या ठिकाणी फावल्या वेळात एकमेकांची
उणीदुणी काढून, ऐकून डोकं खराब करून घेण्यापेक्षा तेच
पुस्तकात घातलेलं बरं, म्हणून..
किंवा कधी कधी बिनझोपेच्या जालीम रात्री येतात, मग
त्यांच्यावर खात्रीशीर उतारा म्हणून पडल्या पडल्या जरावेळ वाचू म्हणत म्हणत 'अजून थोडा वेळ,अजून थोडा वेळ,
आता हे शेवटचंच पान', अशी लाडीगोडी करत करत अर्धी-पाऊण रात्र सरेपर्यंत विनातक्रार सोबतीला थांबतात पुस्तकं, म्हणूनही..!!
२. पुस्तकांची निवड करायची म्हटली तर..
पेपरमध्ये किंवा नेटवर पुस्तकांचे जे रिव्ह्यू वाचलेले असतात, त्यातलं एखादं पुस्तक इंटरेस्टिंग वाटलं की त्याचा स्क्रीनशॉट ठेवलेला असतो मोबाईलमध्ये...
किंवा एखाद्या पंटरने चार पेग डाऊन झाल्यावर
'हे अमुकअमुक वाचून बघ जरा.. बाकी सगळा शेणसडा है ह्याच्यापुढं..!' असा एक भुंगा सोडून दिलेला असतो डोक्यात..
किंवा एखाद्या आवडलेल्या पुस्तकात अजून काही पुस्तकांचे एवढ्या भरजरी शब्दांमध्ये गोडवे गायलेले असतात की
त्यामुळे पेंडींग लिस्टमध्ये भर पडत जाते..
किंवा कधी कधी असाही काळ येतो की तिथून पुढे एका
विशिष्ट लेखकावरच झपाटल्यासारखा फोकस केंद्रीत
झालेला असतो, तर मग त्याच्या वाचायच्या राहिलेल्या
पुस्तकांची शोधाशोध...
तर हे असं सगळं डोक्यात असतं..मग दुकानांमध्ये किंवा लायब्रऱ्यांमध्ये जाणं झालं की ही वरची पुस्तकं जरा
प्राधान्यानं शोधली जातात..
तसा मी पुस्तकांसाठी बराचसा लायब्रऱ्यांवर अवलंबून असलो तरी, काही पुस्तकांची धुंदी एवढी घनदाट असते की मी ती ताबडतोब विकतच घ्यायची असं ठरवून ते
अमलातही आणतो.
पुस्तक खरेदीसाठी अक्षरधारा बुक गॅलरी, औंधमधलं क्रॉसवर्ड किंवा डेक्कनच्या इंटरनॅशनल बुक स्टोअरमध्ये
राऊंड होतात, महिन्याभरातून...
(आणि शिवाय एखाद्या सुस्त संध्याकाळी झेड ब्रीजवर हवा खाऊन झाल्यावर चालत चालत समजा लकडीपुलावर गेलो, तर तिथं प्रभाकर शेठ, जुनी पुस्तकं मांडून बसलेले असतात नेहमीप्रमाणे.. तिथंही चवड्यावर बसून थोडीफार उलथापालथ केली की कधी कधी लॉटरी लागून जाते..!
बाजीराव रोडवरच्या फूटपाथवरही हेच घडू शकतं..!)
दुकानांमध्ये साधारण पद्धत अशी की सगळ्या
सेक्शन्समधून हळूहळू रेंगाळत रेंगाळत,
मध्येच एखाद्या शेल्फपुढं थांबून मान तिरकी करून,
गुढघ्यावर हात ठेवून मधल्या कप्प्यातली पुस्तकांची रांग.. नंतर कंबरेतून वाकत वाकत अजून खालची रांग..
आणि शेवटी चवड्यावर बसून तळकप्प्यातली रांग, अशा पद्धतीनं सगळी नावं वाचून.. एखाद्या लेखकाचं नवीन काही दिसलं किंवा पुस्तकाचं टायटल एकदम हटके वाटलं की ते हातात घेऊन, त्याच्या ब्लर्बमधला मजकूर पूर्ण वाचून बघतो..
तो कंटेंट आवडला की मग सुरूवातीला लेखकानं
अर्पणपत्रिकेसारखं काही म्हटलं असेल ते.. आणि मग नंतर असंच अधल्यामधल्या कुठल्याही एक-दोन पानांवर नजर टाकून काही गुंतवणारं दिसतंय का ते पाहतो..
ह्या सगळ्या चाळणीतून आवडलं की मग ते हातात घेऊन
पुढच्या शेल्फकडे.. तिथंही शरीराला ह्याच वेगवेगळ्या
पोजेसमधून जावं लागतं..
असं करत करत मग शेवटी दीड-दोन तासांनी सगळा गठ्ठा घेऊन बिलींग काऊंटरवर..!
पण लेखक जर जिव्हाळ्याचा असेल तर त्याची पुस्तकं जिथं कुठं दिसतील त्यावर झडप घालतो... तिथं चाळणी वगैरे काही प्रकार नाही..!
शिवाय माझ्या दृष्टीने जे लेखक आउटडेटेड झालेले आहेत, किंवा त्यापुढे जाऊन एक कबूलीजबाब द्यायचा झाला तर जे लेखक मूळातच रद्दी होते, पण ते माझ्या फार उशीरा लक्षात आलं, त्यांच्या पुस्तकांवर चुकून जरी नजर पडली, तरी मी थोड्यावेळापुरता का होईना, पण पश्चात्तापाच्या आगीत
होरपळून वगैरे निघतो आणि मग घाईघाईने स्वतःला कोसत
तिथून नजर काढून घेतो.. !
(तीन पिढ्यांपासून ज्या अनेक पुस्तकांचा उगाचच उदोउदो चालत आलेला आहे, आणि खरंतर ती पुस्तकं एकाच पिढीत खलास होऊन गेली असती,
तर आमची त्यांच्यापासून आपोआपच सुटका झाली असती, असा विचार एका बाजूला...
आणि त्यामुळे त्या लेखक/लेखिकांना कायमचं टाटाबायबाय करून टाकायला पाहिजे, हे लोकांना कधी कळणार, असा विचार करत असतानाच...
ते लेखक/पुस्तकं अजूनही सर्व दुकानांत, स्टॉल्सवर, लायब्रऱ्यांमध्ये दर्शनी भागात लावून ठेवलेले दिसत
असल्यामुळे, त्या पुस्तकांचा वाचकवर्ग अजूनही मोठ्या
संख्येनं अस्तित्वात आहे, आणि त्या पुस्तकांबद्दल समजा आपण काही खवट शेरेबाजी केली आणि त्यामुळे
वाचकवर्गाच्या भावना वगैरे दुखावल्यामुळे,
ते समजा मिळेल त्या व्हर्चुअल प्लॅटफॉर्मवर आपल्यावर चाल करून आले, तर त्या प्रसंगाला कसं तोंड द्यायचं याचं काहीच नियोजन माझ्याकडे नसल्यामुळे,... काहीच न वाचण्यापेक्षा ती पुस्तकं वाचलेलं चांगलंच आहे, असाही एक तडजोडीचा विचार दुसऱ्या बाजूला...
आणि शिवाय शेकडा पन्नास लोकांचे जगण्याचेच प्रश्न एवढे पिळून काढणारे आहेत की मग हे वाचण्याचे वगैरे 'रिकामे धंदे' त्यांना कोठून सुचणार, असा एक थोडासा कम्युनिस्ट
दृष्टीकोन डोक्यात तिसऱ्या बाजूला चाललेला असल्यामुळे.. त्या पुस्तकांची/लेखकांची यादी करण्यासाठी शिवशिवणाऱ्या हातास तूर्त आवर घातलेला बरा, अशा
चौथ्याच विचारावर गाडी थांबते.)
३. आणि ह्याच्याबद्दल अजून पुढं सांगायचं झालं तर..
धार्मिक रूढी परंपरांना वाहून घेतलेली पुस्तकं..
तसेच 'हे पुस्तक वाचून तुमचं जीवन आमूलाग्र बदलेल' वगैरे सरळ सरळ गल्लाभरू पुस्तकं...
तसेच आरोग्यविषयक आणि पाककृतींवर ताईंचा सल्ला वगैरे टाईपची पुस्तकं..
शिवाय असाध्य रोगांना कुणी कशी फाईट दिली वगैरे..
तसेच सामाजिक चळवळखोर पुस्तकं..
प्रशासनातून रिटायर झाल्यावरच ज्यांना कंठ फुटतो आणि सगळ्या भ्रष्ट वातावरणात मीच तेवढा 'भांगेत उगवलेल्या तुळशी'सारखा होतो, असे दावे करत करत, उसासे टाकत टाकत, मधूनच फोडलेल्या हंबरड्यांनी भरगच्च अशी
प्रशासकीय अधिकाऱ्यांची आत्मचरित्रं...
एखाद्या जातीला-धर्माला ठरवून टार्गेट करणारी किंवा ठरवून उदोउदो करणारी पुस्तकं..
तसेच महाभारतातील एखादं पात्र घेऊन त्यावर फुलं
उधळायला लिहिलेली पुस्तकं..
शिवाय जगभरच्या अन्यायग्रस्त लोकांच्या कहाण्यांना कच्च्या मालासारखं वापरून लिहिलेली पुस्तकं..
शिवाय एखाद्या हळव्या कवयित्रीने 'कोवळ्या मनाचे धुमारे' किंवा 'आयुष्याचं चांदणं' वगैरे टायटल देऊन नवरा, दीर,
जाऊबाई, सासूबाई, नणंदा, भावजया, आई-बाबा अशा
सगळ्या गोतावळ्याला अर्पणपत्रिकेत स्थान देऊन, छापून
घेतलेले कवितासंग्रह...
माझ्या देशभक्तीला कळकळीची आवाहनं करणारी पुस्तकं..
तसेच इंग्रजीतून मराठीत दरवर्षी टनावारी ओतल्या जाणाऱ्या आणि वाचणाऱ्याचा टाईमपास व्हावा, या एकाच उद्देशानं
छापलेल्या, आणि ज्या वाचून हाती काहीच लागत नाही, अशा 'अनुवादित' सस्पेन्स कादंबऱ्या...
आणि शिवाय आर्थिक गुंतवणूकीचे सल्ले देणारी पुस्तकं,
तसेच थुलथुलीत, गुबगुबीत कार्पोरेट गुरूंनी ठोकलेल्या
चमकदार भाषणबाजीची पुस्तकं..
ह्या प्रकारच्या पुस्तकांमध्ये मला काहीही इंटरेस्ट वाटत नाही... आणि त्यामुळेच त्यांच्याकडे सरळसरळ दुर्लक्ष
करायला मला अजिबात वाईट वाटत नाही..
पाचपाटलांनी नवीन लेखकांच्या
पाचपाटलांनी नवीन लेखकांच्या पुस्तकांची यादी कुठे दिली होती. त्यात ही नवीन पुस्तके मी या वेळी घेतलेली.
1
गोष्ट छोटी डोंगराएवढी
Authors: अरविंद जगताप
2
अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट
Authors: आनंद विंगकर
3
काय डेंजर वारा सुटलाय !
Authors: जयंत पवार
4
श्रीलिपी
Authors: किरण गुरव
5
दंशकाल
Authors: ऋषिकेश गुप्ते
6
लीळा पुस्तकांच्या
Authors: नीतीन रिंढे
7
सातपाटील कुलवृत्तांत
Authors: रंगनाथ पठारे
8
लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी
Authors: जयंत पवार
9
वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा
Authors: जयंत पवार
10
राखीव सावल्यांचा खेळ
Authors: किरण गुरव
टवणे सर,पाचपाटलांनी नवीन
टवणे सर,
पाचपाटलांनी नवीन लेखकांच्या पुस्तकांची यादी कुठे दिली होती. त्यात ही नवीन पुस्तके मी या वेळी घेतलेली.>>
_/\_
ही मागच्या काही वर्षांतल्या नवीन पुस्तकांची/लेखकांची यादी दुसऱ्या एका धाग्यावर टाकली होती, इथं ती आणखी एकदा डकवतोय..
दीडदमडीना, पेरूगन मुरूगन-- वर्जेश सोळंकी
(कादंबरी)
विवादे विषादे प्रमादे प्रवासे -- प्रशांत बागड
(लेखसंग्रह)
अतीत कोन? मीच-- प्रसाद कुमठेकर
(लेखसंग्रह)
बाकी शून्य- कमलेश वालावलकर
(कादंबरी)
सातपाटील कुलवृत्तांत- रंगनाथ पठारे (कादंबरी)
तीव्रकोमल दु:खाचे प्रकरण -- रंगनाथ पठारे
(कथासंग्रह)
आटपाट देशातल्या गोष्टी-- संग्राम गायकवाड
संप्रति, उद्या -- नंदा खरे(कादंबरी)
विनाशवेळा- महेश एलकुंचवार (अनुवादित)
निकटवर्तीय सूत्र, रिबोट- जी के ऐनापुरे
(कादंबरी)
आलोक- आसाराम लोमटे (ग्रामीण/निमशहरी कथासंग्रह)
दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी- बालाजी सुतार
(ग्रामीण/निमशहरी कथासंग्रह)
स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट- अवधूत डोंगरे (कादंबरी)
एन्कीच्या राज्यात- विलास सारंग (कादंबरी)
(नवीन आवृत्ती)
व्हाया सावरगाव खुर्द- दिनकर दाभाडे (कादंबरी)
राखीव सावल्यांचा खेळ, श्रीलिपी - किरण गुरव
(कथासंग्रह)
वरणभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा- जयंत पवार
फिनिक्सच्या राखेतून उठला मोर-जयंत पवार
नाईन्टीन नाईंटी, कोबाल्ट ब्ल्यू- सचिन कुंडलकर
(कादंबरी)
दंशकाल- ह्रषिकेश गुप्ते (कादंबरी)
डॉ. मयांक अर्णव- आनंद विनायक जातेगावकर
(कादंबरी)
अच्युत आठवले आणि आठवणी- मकरंद साठे
(कादंबरी)
आणि कविता आवडत असतील तर ..
१.धांदलमोक्ष- स्वप्नील शेळके
२.काळ्या जादूचे अवशेष- सत्यपालसिंग रजपूत
** ह्यात आणखी थोडी भर घालायचा मोह होतोय...
अस्वस्थ वर्तमान- आनंद विनायक जातेगावकर
डॉ. मयांक अर्णव - आनंद विनायक जातेगावकर
पतंग, एकम्, रण आणि दुर्ग- मिलिंद बोकील
जग दर्शन का मेला - रमणाश्रित
(नाव हिंदी असलं तरी पुस्तक अस्सल मराठी आहे)
बारोमास, चारीमेरा - सदानंद बोरसे
जुगाड - किरण गुरव
(हे अगदी लेटेस्ट आहे)
आणि तुमच्या यादीतील गोष्ट छोटी डोंगराएवढी, अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट, काय डेंजर वारा सुटलाय ! ही तीन विश लिस्ट मध्ये टाकतोय..
धन्यवाद.
मिलिंद बोकिलांच्या पुस्तकांची
मिलिंद बोकिलांच्या पुस्तकांची चर्चा कुठे झाली ?
पाचपाटलांच्या यादीत मिलींद बोकीलांची पुस्तकं कशी नाहीत ह्याचा मी परवाच विचार करत होतो. पोस्ट लिहायची राहिली.
माझ्याकडे बोकीलांची कादंबरी आणि कथा संग्रह प्रकारातली बरीच पुस्तक आहेत. एकम, शाळा, झेन गार्डन, उदकाचिया आरती, रण-दुर्ग, समुद्र, गवत्या आणि नुकतच घेतलेला पतंग नावाचा लघुकथा संग्रह. मला त्यांची भाषा खूप आवडते. आगदी प्रत्येक शब्द योजून लिहिलेला वाटतो. तसच निसर्गाची वर्णनं खूप सुंदर असतात.
किरण गुरव हे नाव वाचून फार
किरण गुरव हे नाव वाचून फार बरे वाटले. त्यांची बाळूच्या अवस्थांतरणाची डायरी, क्षुधाशांती भुवन आणि जुगाड ही तीन पुस्तके मजजवळ आहेत. खुप आवडता लेखक. कधी काळी बाळूसारखा मी पण अवस्थांतरीत झालेलो होतो म्हणुन असेल पण हा लेखक क्लिक झालाय.
अशातच प्रसाद कुमठेकरांचं बगळा, नंदा खऱ्यांचं ऑन द बीच हे नवे भाषांतरीत कादंबरी, श्री ज जोशींचे पुणेरी, मी अल्बर्ट एलिस, आणि कुरुंदकरांचे मागोवा ही पुस्तके घेतली. बगळा खुप आवडले.
आलोकचा आणि विशेषतः त्यातील
आलोकचा आणि विशेषतः त्यातील ओझं ह्या कथेचा मी जगातला सगळ्यात मोठा फॅन आहे. लोमटे उच्च दर्जाचे कथाकार आहेत.
<फिनिक्सच्या राखेतून उठला मोर-जयंत पवार> यामधील सड्ढम मे डुड्ढुम ही कथा खुप अस्वस्थ करणारी आहे. जबरदस्त कथाकार!
श्याम मनोहरांचे काहीच वाचले नाही अद्याप. काय सुचवाल मंडळी?
दर महिन्याला २०० रुपयांवर
दर महिन्याला २०० रुपयांवर मिलिंद बोकील आहेत.
पुंबा, श्याम मनोहरांच्या सगळ्या कादंबर्या - मोजक्याच आहेत.
हे ईश्वरराव हे पुरुषोत्तमराव , शीतयुद्ध सदानंद , कळ , खूप लोक आहेत , उत्सुकतेने मी झोपलो , खेकसत म्हणणे आय लव्ह यू शंभर मी , प्रेम आणि खूप खूप नंतर.
यातलं शीतयुद्ध सदानंद आणि शंभर मी सोडून बाकीच्या वाचल्यात. त्यांचे कथासंग्रहही आहेत. तेही वाचले नाहीएत त्यांचे कथासंग्रहही आहेत. मी अद्याप वाचले नाहीत.
लेखातील पुस्तकांच्या
लेखातील पुस्तकांच्या वर्गवारीवर सहमत.
कथा कादंब्र्या विकत घेऊन वाचणार नाही. संग्रहासाठी नसतात आणि पुढच्या पिढीत वाचणारे कुणी नाहीत. कशाला कपाटं भरायची?
मराठीत विनोदा पासून ते
मराठीत विनोदा पासून ते सामाजिक हाणामारीपर्यंत सर्वच प्रकार लीलया हाताळणारे महाराष्ट्राचे लाडके लेखक बेफिकीर यांच्याबद्दल वाचायला आवडेल. तमाम मराठी साहीत्यिक एकीकडे आणि बेफिकीर यांचे साहीत्य एकीकडे.
Pages