सुरक्षामंत्र
ऐक मानवा सांगतो मंत्र
जगण्याचे हे नवीन तंत्र
जीव सलामत, स्वप्न हजार
ठेव ध्यानी न होता बेजार
सत्य बोलणे टाकून द्यावे
गोड बोलणे तोंडी बाणावे
स्पष्ट बोलणे, उगाच ताण
मुखी त्यापरीस कुलूप छान
समाज माध्यमी लढू नये
उगाच भानगडीत पडू नये
रोष कुणाचा कधी घेऊ नये
अरिष्टां आमंत्रण देऊ नये
मुख कान डोळे बंद करावे
सरळ रस्ता कापित जावे
आपली मते आपल्यापाशी
बोलाल तर अद्दल खाशी!
मान अपमान गिळून घ्यावा
आणि सुटकेचा ढेकर द्यावा
चेहरा सदा आनंदी असावा
देशाचा अभिमान दिसावा!
सुदैव आपुले, जगण्या देती
आयुष्य आपुले गुंडांहाती
भाग्य हवेवर कर ना घेती
श्वास देणे त्यांच्याच हाती
किडामुंगीसम आयुष्य जगावे
दांडग्यांपायी चिरडून घ्यावे
चौऱ्यांशी योनीतून मुक्त व्हावे
चिरडणाऱ्यांचे उपकार मानावे
ध्यानी ठेवा हा सुरक्षा मंत्र
जगणे होईल सुरळीत तंत्र
यंत्र चालेल दुसऱ्या हाती
आयुष्याला मिळेल सद्गती
-प्रा.अरूण सु.पाटील (असु)
https://www.facebook.com/AsuChyaKavita
आवडली अन पटली
आवडली अन पटली
या काळाशी अगदी सुसंगत मंत्र
या काळाशी अगदी सुसंगत मंत्र आहे हा, अवलंब करावा असा आहे,पण.....असो(स्पष्ट बोलणे, उगाच ताण मुखी त्यापरीस कुलूप छान)