रेडीओचे दिवस.
13 फेब्रुवारी जागतिक रेडीयाे दिवस.
रेडीओची आठवण अगदी लहानपणापासुनची. रात्री मुंबई ब वर आपली आवड लागायची. जुन्या नव्या मराठी गीतांचा हा कार्यक्रम मला फार आवडे. रात्री कधीतरी बिनाका गीतमाला लागे. अमिन सयानीचा भारदस्त आवाज ऐकायला मिळे. शनिवारी दुपारी शाळेतुन परतताना कामगार सभा लागे. भर दुपारी शेजारी संथ आवाजातल्या विविध भारतीवरल्या गझल ऐकू यायच्या...
मला कधी कधी बाजारभाव ऐकायला फार आवडे. निराळा ऊल्लेख नसल्यास भाव प्रती क्विंटलचे आहेत अशी ओळ ठरलेली असायची. त्यानंतर दुपारी वनिता मंडळ लागे. त्या चर्चेतलं मला काहीबाही कळत असायचं असं नाही मात्र ऐकायला आवडायचं एवढं मात्र नक्की.
आंबट गाेड असा एक काैटुंबीक संवादाचा कार्यक्रम सुध्दा फार आवडायचा. किशाेर साेमण ते सादर करीत. शिवाय नेहमी पुणे किंवा नागपुर जिल्हा वार्तापत्र लागे. मला तेही माहितीपर म्हणून आवडे.
डब्बल बी, निरमा अश्या पठडीतल्या जाहिराती आपल्याश्या वाटत. सामाजिक वनीकरण, दुर्गम भागांतील महितीपर कार्यक्रम सुध्दा फार श्रवणीय वाटायचे. हवामान अंदाज तर अगदी कान देऊन ऐकायचाे.
मधेच एकदा रेल्वेवृत्त लागे. दादर भागलपुर किंवा हावडा मुंबई अश्या लांब पल्ल्याच्या गाड्या आठ किंवा दहा तास ऊशिराने धावत असल्याच्या बातम्या असत.
सणवार असले की गाेकुळ अष्टमीला कधी कृष्णजन्माचं किर्तन तर कधी हरिप्रसाद चाैरसिया यांचं बासरीवादन लागे. ऐन दिवाळीत सुध्दा रात्री रेडीयाेवर किर्तन ऐकत झाेपी गेल्याची आठवण आहे.
ने मजसी ने परत मातृभुमीला...हे अजरामर गाणं मी पहिल्यांदा रेडीओवर ऐकलं आणि नकळत डाेळे डबडबल्याचं जाणवलं.
दिसती मजला सुखचित्र नवे, मी रात टाकली, देव देव्हार्यात नाही, ऐरणीच्या देवा तुला.. अशी काही अजरामर गीतं मी रेडीओवर पहिल्यांदा ऐकली व नकळत चांगलं ऐकायची सवय जडली.
मला रेडीयाेची ईतकी सवय झाली की गणितं साेडवताना, केर काढताना, दुपारी, रात्री रेडीओ हटकून ऐकायचाे. मग पुढे एफ एम आलं. त्यात अनेक विषयावार कार्यक्रम ऐकायची नित्य सवय जडली.
सुहाना सफर वीथ अन्नु कपूर हा अगदी अलिकडला कार्यक्रम, भावना साेमैया शाे किंवा तरल असं प्रेमिकांसाठी असलेलं लवगुरू ..रात्री शांत आवाजात विशिष्ठ गाणी नकळत एक नॉस्टेल्जियाचा फील देतात...जसं की अजीब दास्तां है ये...किंवा जिंदगी के सफर मे गुजर जाते है जाो मकाम....वाे फिर नही आतें....वाे फिर नही आतें....
अजुनही कार मधे किंवा घरी रात्री ऊशिरा झाेप येईपर्यंत रेडीयाे चालूच असताे.
माझे रेडीयाेचे दिवस अजुनही चालुच आहेत..
क्रमश:
©prajo
रेडिओची आठवण वाचून Yesterday
रेडिओची आठवण वाचून Yesterday Once More हे गाणे आठवले.
रेडिओ - आमच्या कडे खूप जुन्या
रेडिओ - आमच्या कडे खूप जुन्या पद्धतीचा रेडिओ होता... १९७० -८० च्या काळांत परवाना लागायचा. पोस्टात जायचे, स्टँप घ्यायचा- एक वर्षे काळजीचे कारण नाही. थोडे गुगलल्यावर इथे काही जुने नमुने मिळाले.
https://www.scoopwhoop.com/culture/did-you-know-radio-users-in-india-nee...
सुशील दोषी यांची क्रिकेटची कॉमेंट्री आवडायची. चौकार, षटकार, किंवा बाद झाल्यावर एक छोटासा पॉज असायचा. मराठी तसेच हिंदी गाणी, आपली आवड, बातम्या, त्यावेळी कंटाळवाणे वाटणारे हवामानाचे अंदाज... आणि बुधवारी रात्री बिनाका (पुढे सिबाका) गितमाला विशेष आवडायचा. पण सिलोन वर खर खर यायची. त्या खर खरीतून गाण्याचा आनंद लुटण्यात एक वेगळांच आनंद असायचा.
छान लिहिलंय..!!
छान लिहिलंय..!!
मला पण सद्ध्या अधुन-मधुन रेडिओ ऐकायची सवय लागली. बर्याचदा सकाळी कोल्हापुर केंद्र लावून मराठी गीतांचा अनुभव घेतो.. तसेच गुरुवारी सकाळी ९.३० वाजता मुलाखतींच्या कार्यक्रम ऐकतो. सातारा आकाशवाणीवरील कार्यक्रमांची रुपरेषा ऐकण्यात वेगळीच मजा असते
. रात्री १०.३० वाजता सोलापुर आकाशवाणी केंद्रावरील फोन इन कार्यक्रम ऐकत झोपतो.. या शिवाय कोल्हापुर आकाशवाणीवरील शनिवारी सकाळी ९.३० वाजता खुमासदार कथांवर आधारीत "हसुया खुसुखुसु" अन रविवारी सकाळी १० वाजता "बालजगत" हा मुलांसाठी मुलांनीच तयार केलेला कार्यक्रम माझ्या बच्चे कंपनीसोबत जरुर ऐकतो.
लहानपणी घरी रेडिओ लावलेला असायचा पण तेव्हाचे ऐकलेले काही कार्यक्रम आणि निवेदक अजुनही सेवेत आहेत हे बघुन आश्चर्य वाटत रहातं. गेल्या वर्षी मी इथेच माबोवर आकाशवाणीवर आधारीत एक लेख लिहिला होता - https://www.maayboli.com/node/73389
छान लेख..!! लेखा निमित्ताने
छान लेख..!! लेखा निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
मुंबई आकाशवाणीवर सकाळी आरोग्यमं धनसंपदा हा कार्यक्रम लागायचा.. घरातल्या सगळ्यांचा आवडीचा कार्यक्रम होता..!
छान आठवणी.
छान आठवणी.
)
आरोग्यं धनसंपदा >>> हो, आम्हीपण ऐकायचो. सहा पंचावन्न की सातला लागायचा ना? लागोपाठ दोन कार्यक्रम लागायचे पाच पाच मिनिटांंचे. मग सात पाचला पुणे केंद्रावरच्या बातम्या 'सहक्षेपित' करायचे. (मला लहानपणी हा शब्द 'सुरक्षित' असा वाटायचा.
हो वावे.!!. सकाळी ७ च्या
हो वावे.!!. सकाळी ७ च्या दरम्यान लागायचा आणि आजुबाजुंच्या घरात पण रेडिओवर तोच कार्यक्रम चालू असायचा. त्याच शिर्षकगीत अजून कानात रुंजी घालते..!
माझ्या आईला बिनाका
माझ्या आईला बिनाका गीतमालावरची गाणी ऐकायला लहानपणी आजीची मनधरणी करायला लागायची असं ती नेहमी सांगते. लवकर झोपायचं असा नियम होता ना.
आईला गोल्डन एरातली गाणी फार आवडतात त्यामुळे घरी रेडिओवर नेहमी सरकारी चॅनेल्स सुरु असतात. अर्थात आता ती तो सारेगम कारवां वर लावते.
माझा जुना फोन होता तेव्हा मी मार्केट मंत्रा, अनू कपूरचा कार्यक्रम असं काही काही ऐकायचे. कोणी एक शिव नावाचा डीजे 'मांपिताजी की खूब सेवा करना' असं सांगून कार्यक्रमाची सांगता करायचा ते अजून लक्षात आहे. गझल्सवर कार्यक्रम करणारे एक थोडे सिनियर डीजे होते त्यांचा आवाज फार सुरेख होता. आता नाव लक्षात नाही. काही चॅनेल्सवरचे छोटेखानी सद्य घटनांवर टिप्पणी करणारे सेगमेंटसही छान असायचे. उदा. जावेद अख्तरच्या आवाजात एक सेगमेंट होता तो '......ये तो लाझमी है, बाकी फोन रखो क्योंकी कॉल वेटिंगमे आजमी है' अश्या शब्दांनी संपायचा.
दुपारच्या वेळी भारतातल्या गावोगावी पसरलेले बातमीदार छोट्या शहरातल्या बातम्या सांगतात तेही ऐकलंय पूर्वी. ह्यात एकदा दोन जोडप्यातल्या बायकांनी आपापल्या नवर्यांसाठी किडनीज डोनेट केल्याची न्यूज ऐकली होती. एकदा स्वर्गीय मदनमोहन ह्यांच्यावरचे दोन भाग लागोपाठच्या आठवड्यात ऐकले होते.
मग मी नवा फोन घेतला. त्यात स्टिचर अॅप इन्स्टॉल केलं आणि पॉडकास्टस ऐकायला लागल्यापासून माझा आणि रेडिओचा संबंध तुटला.
>>दादर भागलपुर किंवा हावडा मुंबई अश्या लांब पल्ल्याच्या गाड्या आठ किंवा दहा तास ऊशिराने धावत असल्याच्या बातम्या असत.
मला तर हे ऐकलं की ह्या गाड्यांनी प्रवास करणारे प्रवासी, विशेषतः स्त्रिया, एव्हढ्या रात्री स्टेशनवरून कसे घरी जाणार ह्याची काळजी लागते.
दूरदर्शनसुरू होईपर्यंत
दूरदर्शनसुरू होईपर्यंत आकाशवाणी हे सर्वात मोठे करमणूक , माहिती देणारे आणि जगाशी संपर्कात ठेवणारे एकमेव माध्यम होते..
तोपर्यंत च्या सगळ्या पिढ्या आकाशवाणी ऐकतचे मोठ्या झाल्या..त्यांच्या बौद्धिक, भावनिक, मानसिक जडणघडणीत , संस्कार करण्यात आकाशवाणी चा मोठा वाटा आहे.
विविध संगीतांचा आणि मातब्बर कलाकारांच्या आविष्काराचा खजिना आकाशवाणी नेच सामान्य जनांपर्यंत पोहोचवला..
कुठल्याश्या सरकारी रेडिओ
कुठल्याश्या सरकारी रेडिओ चॅनेलवर नाटकही ऐकवतात. मी एकदा ऐकलं आणि मस्त वाटला होता तो अनुभव. दुपारचा 'सखीसहेली' मात्र मला थोडा बिनडोक वाटतो. त्यात बायका भयानक रेसिपीज सांगतात. आणि व्हॉटसॅपवर आलेल्या गोष्टी आपल्यासोबत घडल्या आहेत हे ठोकून देतात.
आजकाल हवी ती गाणी एका क्लिकवर उपलब्ध असताना लोक गाण्यांची फर्माईश करतात हे पाहून आश्चर्य वाटतं. त्यात ज्या गावाचं कधी नाव ऐकलं नाही आणि तिथे जाण्याची सुतराम शक्यता नाही अश्या गावचे शर्माजी आणि आपण देशाच्या दोन कोपर्यात बसून एकाच वेळेस 'इतना ना मुझसे तू प्यार बढा' ऐकतोय हे भारी वाटतं. ही किमया फक्त रेडिओच करू शकतो
छान लेख..!! लेखा निमित्ताने
छान लेख..!! लेखा निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. >>> +1
किती वाजले हे घड्याळ न बघता रेडिओवरच्या कार्यक्रमावरून समजायचे पूर्वी. आतासारखी प्रत्येक खोलीत घड्याळ नसायचे पण तेव्हा.
आजकाल हवी ती गाणी एका क्लिकवर
आजकाल हवी ती गाणी एका क्लिकवर उपलब्ध असताना लोक गाण्यांची फर्माईश करतात हे पाहून आश्चर्य वाटतं.>> हीच तर खासियत आहे. जो आनंद आणि उत्सुकता फर्माईश मधे लागलेलं गाणं ऐकण्यात आहे तो क्लिक वर आजिबात नाही.
फोन इन कार्यक्रम ऐकुन फोन आलेल्या श्रोत्यांच्या गाण्यांच्या फर्माईशी ऐकणं मजेशीर अनुभव असतो. अगदी गेल्या आठवड्यातच मी सोलापुर केंद्रावर रात्री १०.३० वाजता फोन ईन कार्यक्रम ऐकत होतो. कानपूर हुन फोन आला होता. फोन करणारी मुलगी हिंदीतुन बोलत होती. तिचं हिंदी बोलणं खरेच खुप लाजवाब होतं. निवेदकाने विचारलंही की कानपुरातुन तुम्ही सोलापूर केंद्र कसे ऐकता तर तिने न्युजऑनएअर अॅप बद्दल सांगुन तिला सोलापुर केंद्रावरील हे फोन इन कार्यक्रम आवडतात असं सांगितलं. तिचे मामा-मामी सोलापुर मधे रहातात त्यांच्यासाठी तिने गाणं लावायला सांगितलं. तिचं २ मिनिटांचं भरभरून बोलणं खरेच खुप आनंददायी होतं. दुसराच फोन आला तो राजस्थान मधुन. निवेदकाने देखिल त्याला विचारलं की तुम्ही सोलापुर आकाशवाणीच्या फोन इन कर्यक्रमात कसा काय फोन केला म्हणुन. तर ते म्हणाले की ते सोलापुर जवळच्या खेड्यात रहातात अन सद्ध्या राजस्थान-पाकिस्तान बॉर्डर मधे सैन्यदलात कार्यरत आहेत.. आईसाठी त्यांनी एक गाणं लावायला सांगितलं.
मला वाटतं आकाशवाणी अजुनही भारतियांच्या मना-मनात जोडला गेलेला दुवा आहे.. ज्याला तो सापडला त्याला ती अनुभुती मिळाली असं मला तरी वाटतं.
>>मला वाटतं आकाशवाणी अजुनही
>>मला वाटतं आकाशवाणी अजुनही भारतियांच्या मना-मनात जोडला गेलेला दुवा आहे.. ज्याला तो सापडला त्याला ती अनुभुती मिळाली असं मला तरी वाटतं.
हे मात्र अगदी खरं. आणि ते करोनाच्या काळात प्रकर्षाने जाणवलंही. लाँग लिव्ह आकाशवाणी!
जो आनंद आणि उत्सुकता फर्माईश
जो आनंद आणि उत्सुकता फर्माईश मधे लागलेलं गाणं ऐकण्यात आहे तो क्लिक वर आजिबात नाही.>> 100% सहमत. रँडम गाणी ऐकण्यात आणि आपल्या आवडीचं गाणं अचानक लागण्यात जो आनंद आहे तो मुद्दाम ते गाणं लावण्यात येत नाही.
https://m.youtube.com/watch?v
https://m.youtube.com/watch?v=pMYCOYjIKrE
मस्त लेख. मला पण खूप आवडतो
मस्त लेख. मला पण खूप आवडतो रेडिओ ऐकायला. ही माझ्या छोट्याश्या लेखाची लिंक -
https://www.maayboli.com/node/77853
मी मध्यंतरी मिळतील तेवढ्या महाराष्ट्रातल्या रेडिओ स्टेशन्सच्या लिंका जमवून एक वेबपेज तयार केले. त्याची लिंक माझ्या लेखात आहेच. पण कोणाला हवी असेल तर सोपं जावं म्हणून ती इथेही डकवते आहे -
https://marathiradiostations.blogspot.com/p/marathi-radio.html
लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत
लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत १-२:३० दरम्यान उशाशी रेडिओ लावून पहुडायला प्रचंड आवडायचं
१-१:३० एक फनकार आणि १:३०-२:३० मनचाहे गीत! एक फनकार मधे कुठल्यातरी एका कलाकारावर (गायक, गीतकार, संगीतकार) आधारित गाणी असायची आणि मनचाहे गीत मधे श्रोत्यांच्या फर्माइशी 
एकदम nostalgic व्हायला होतं ते दिवस आठवले की!
<< रँडम गाणी ऐकण्यात आणि
<< रँडम गाणी ऐकण्यात आणि आपल्या आवडीचं गाणं अचानक लागण्यात जो आनंद आहे तो मुद्दाम ते गाणं लावण्यात येत नाही. >>
------ सहमत....
मी लहान असताना,
मी लहान असताना,
पाठीवर दोन-चार रट्टे दिले की खरर्रकर्र करत सुरू होणारा एक भलामोठा काळा रेडिओ घरी होता. तो थांबला रे थांबला, की आई येऊन पुन्हा त्यावर दोन रट्टे ठेवून द्यायची.
'उजाले उनकी यादोंके, भोले भीसरे गीत, आजके फंकार' वगैरे बरेच कार्यक्रम असायचे. काही कळो वा न कळो पण त्यावेळी ते ऐकण्याची मजाच वेगळी.
उजाले.... च शिर्षक गीत ज्या सुरात गायलं जायचं. सुरेख... अगदी श्रवणीय.
<< पाठीवर दोन-चार रट्टे दिले
<< पाठीवर दोन-चार रट्टे दिले की खरर्रकर्र करत सुरू होणारा एक भलामोठा काळा रेडिओ घरी होता. तो थांबला रे थांबला, की आई येऊन पुन्हा त्यावर दोन रट्टे ठेवून द्यायची. >>
------- हे रट्टे मारुन रेडिओला ताळ्यावर आणायचा प्रकार अजब आहे. मी पण वापरला आहे. बरेच वेळा ( loose contact/ connection असेल तर) यशस्वी होतो. ते थप-थप मारण्याचे तंत्र अनेक ठिकाणी यशस्वी होते. पण तसे करणे धोक्याचे (पंप, विजेची मोटार - थोडे जोराने हाणावे लागते- लाकडी फळी किंवा बुटाचा लत्ताप्रहार) ठरु शकते म्हणून टाळावे.
Instrument or tools - दुरुस्त वेळीच करावे.
रेडिओ ला मारून सरळ करणारे
रेडिओ ला मारून सरळ करणारे श्रोते मीही माझ्या घरी पाहिलेत..
इयम् आकाशवाणी। संप्रति वार्ता
इयम् आकाशवाणी। संप्रति वार्ता: श्रूयन्ताम्। प्रवाचकः बलदेवानन्दसागरः। - हे ऐकून ऐकून पाठ झालं होतं.
सर्वाना धागा आव ड्तोय हे
सर्वाना धागा आव ड्तोय हे पाहून हुरूप आलाय.. ध् न्यवाद !
इयम् आकाशवाणी। संप्रति वार्ता
इयम् आकाशवाणी। संप्रति वार्ता: श्रूयन्ताम्। प्रवाचकः बलदेवानन्दसागरः। - हे ऐकून ऐकून पाठ झालं होतं.>>>> अगदी अगदी
आणि मला हे पाठ झालेलं
आणि मला हे पाठ झालेलं
"मध्यम लहरी दोनशे एकोणचाळीस अंश आठ एक मीटर्स अर्थात बाराशे एक्कावन्न किलोहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्र "
'उजाले उनकी यादोंके, भोले
'उजाले उनकी यादोंके, भोले भीसरे गीत, आजके फंकार' >>> भोले भीसरे नाही हो, भूले बीसरे गीत असं नाव होतं
दर रविवारी रात्री 11वाजता
दर रविवारी रात्री 11वाजता एकाच चित्रपटातील गाणी लागतात पुणे आकाशवाणी वर. मला तो कार्यक्रम अजून आठवतो.
सुंदर आठवणी. क्रिकेटचा कसोटी
सुंदर आठवणी. क्रिकेटचा कसोटी सामना ऐकायला फार आवडायचा.
आंबटगोड आणि अहो प्रपंच हे
आंबटगोड आणि अहो प्रपंच हे आईचे आवडते कार्यक्रम! लहानपणी तिच्या सोबत ऐकत ऐकत आम्ही कधी ह्या आठवणी जमवल्या ते कळलंच नाही. अजूनही आईसोबत गप्पा मारताना आठवण होते.
मला रेडिओ ऐकायची सवय
मला रेडिओ ऐकायची सवय लहानपणापासून लागली आई-वडिलांमुळं. त्यावेळी सांगली आणि सीलोनचे केंद्रांचे प्रामुख्यानं ऐकले जायचे. नंतर मला मुंबई आकाशवाणीचे कार्यक्रम आवडू लागले. त्यावर चंद्रशेखर संत यांचा ऑलिंपिकचा दैनिक आढावा खूप भावत असे. त्याचबरोबर माझी Deutsche Welle, Voice of Russia, Voice of America, NHK Radio Japan अशांशीही मैत्री जमली. आता रेडिओ संचावरून कार्यक्रम ऐकणं कमी होऊन भ्रमणध्वनी संचावरून ऐकणं वाढलं आहे.