सवाल जवाब

Submitted by Asu on 5 February, 2021 - 06:36

प्रथमच लावणीतला एक वेगळा प्रकार हाताळतो आहे, आपल्याला नक्कीच आवडेल.
सवाल जवाब

सवाल तिचा-

सवाल करते तुला शाहिरा, कान देऊनि ऐक जरा
डोक्यामध्ये असेल अक्कल, शक्कल लढवून सांग जरा ऽ
शक्कल लढवून सांग जरा, रे शक्कल लढवून सांग जरा
जी जी रंऽ,जी जी रंऽ,जी जी रंऽ,जीऽ

दिवस असून चंद्र उगवला, चांदणे हसले मुखी भास्करा
तप्त सूर्य शितल झाला, विपरीत ऐसी कैसी तऱ्हा
डोक्यामध्ये असेल अक्कल, शक्कल लढवून सांग जराऽ
शक्कल लढवून सांग जरा, रे शक्कल लढवून सांग जरा
जी जी रंऽ,जी जी रंऽ,जी जी रंऽ,जीऽ

जबाब त्याचा-

हे सौंदर्य चंद्रिके ऐक प्रियकर सूर्याचा जवाब

जबाब माझा ऐक सांगतो, तलवार तुमची म्यान करा
प्रेमाची ही रीत सदाची, व्याकुळतो तो पाहण्या चेहरा
मुखचंद्र दिसता प्रिय प्रियेचा, प्रियकर सूर्य हसतो खरा ऽ
प्रियकर सूर्य हसतो खरा ग, प्रियकर सूर्य हसतो खरा,
जी जी रंऽ,जी जी रंऽ,जी जी रंऽ,जीऽ

सवाल त्याचा-

हे सुंदरे आता ऐक माझा सवाल

सवाल तुजला करतो नारी, उत्तर देई भरा भरा
डोक्यामध्ये असेल अक्कल, शक्कल लढवून सांग जरा ऽ
शक्कल लढवून सांग जरा, ग शक्कल लढवून सांग जरा
जी जी रंऽ,जी जी रंऽ,जी जी रंऽ,जीऽ

पुरुषासाठी जन्म नारीचा, नियतीचा हा न्याय खरा
सूर्याभोवती पृथ्वी फिरते युगानयुगे का गरा गरा
डोक्यामध्ये असेल अक्कल, शक्कल लढवून सांग जरा ऽ
शक्कल लढवून सांग जरा, ग शक्कल लढवून सांग जरा
जी जी रंऽ,जी जी रंऽ,जी जी रंऽ,जीऽ

जबाब तिचा-

ऐक शाहिरा,
जबाब माझा ऐक शाहिरा, नको दावू तुझा नखरा
सूर्य पृथ्वी प्रेमाकर्षण, गुरुत्वाकर्षण नियम स्मरा
एका विना दुजा अधुरा, संसार होईल न खरा ऽ
संसार होईल न खरा, रे संसार होईल न खरा
जी जी रंऽ,जी जी रंऽ,जी जी रंऽ,जीऽ

दोघं-

सवाल-जबाब नकोच भांडण, श्रोत्यांनो तुम्ही ते विसरा
डोक्यामध्ये असेल अक्कल, थोडासा विचार करा ऽ
थोडासा विचार करा, अहो थोडासा विचार करा
जी जी रंऽ,जी जी रंऽ,जी जी रंऽ,जीऽ

श्रेष्ठत्वाचा वाद नको हा, जगन्नियंत्या ना विसरा
पुरुष श्रेष्ठ ना नारी श्रेष्ठ, श्रेष्ठ असे तू परमेश्वरा
हात जोडून आपण वंदुया,अर्धनारीनटेश्वरा
अर्धनारीनटेश्वरा, अहो अर्धनारीनटेश्वरा
जी जी रंऽ,जी जी रंऽ,जी जी रंऽ,जीऽ

-प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults