ययाती
आयुष्य सारे विषयी गेले
नाही शोधला जीवनी राम
रमा, रमणी आणि वारूणी
अन्य ना काही केले काम
मानवयोनी जन्मा आलो
कसला यात असे पुरुषार्थ
व्यसनांध आयुष्य जगलो
नाही भविष्य, जगणे व्यर्थ
कोटीं मधला मी शुक्रजंतू
स्पर्धा मिलनी जिंकलो परंतु
धावतो अजुनि, काय नियती?
वासनांध मी क्षुद्र ययाती!
सर्व सुखांच्या रत्न-सागरी
अतृप्त अजुनि रिती घागरी
मृगजळाच्या चकव्यापाठी
सुख शोधितो ना पडले गाठी
तृषार्त मी प्राशुनि पाणी
घसा कोरडा, खोल वाणी
क्षणैक सुखाच्या धुंद क्षणी
गाया विसरलो आनंद गाणी
धावतो अजुनि सुखांपाठी
हव्यास अजुनि भोगांसाठी
भोग भोगिता भोग छळतो
त्याग करता आनंद कळतो
ययाती सगळे या जगती
सुखे भोगुनि तळमळती
कचासम जे जन जगती
नाही कुणा त्यांची गणती
जगी वासना अनंत बेभान
खुणावती वारनारी समान
असो मनाचा सदा लगाम
आयुष्य ना तर सुटे बेफाम
- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita