क्रिकेटः एक जुनी आठवण

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

२३ वर्षांपूर्वी पाहिलेली ही मॅच पण कपिलचा तो षटकार आणि लगेच दिलेला कॅच अजून आठवतो. आणि नंतर घडलेल्या गोष्टी सुद्धा!

भारतीय क्रिकेटवर एवढा परिणाम करणारे असे सामने फार नाहीत. Cricinfo च्या एका सदरात कळाले की १७ डिसेंबर लाच ही मॅच झाली (शेवटचा दिवस) होता आणि एकदम सर्व आठवले.

त्या काळी भारत दौरा म्हणजे इंग्लंड वगैरे संघातील प्रमुख खेळाडू येण्याचे टाळत. इंग्लिश लोक Ashes वगैरे लढतींना जास्त महत्त्व देत आणि भारत वगैरे क्रिकेट मधे अजून पैशाच्या दृष्टीने बलाढ्य झालेले नव्हते. १९८४ साली आलेला संघ त्यावेळी त्यांचा सर्वात कमजोर संघ समजला जात होता. बोथम यात नव्हता. अशा कमजोर संघांपुढे आपले लोक सवाई कमजोर असतात हे पुढे बर्‍याच वेळा सिद्ध झाले, पण या मालिकेच्या वेळी भारत इंग्लंड ला बेदम हरवणार अशी हवा निर्माण झाली होती. त्यात भारताकडे नवीन लेग स्पिनर 'शिवरामकृष्णन' होता आणि इंग्लंड ची लेगस्पिन विरुद्ध तारांबळ उडण्याची ही पहिलीच वेळ नव्हती (आणि शेवटची ही नव्हती हे वॉर्न ने पुढे दाखवले)

पण अगदी पहिल्या मुंबई कसोटीपासूनच वाटू लागले की हा काही दणकेबाज विजय वगैरे असणार नाही. कारण पहिल्या कसोटीत जरी शिवाने बरेच बळी मिळवले तरी चौथ्या डावात ५१ धावा जमवताना आपली स्थिती ७ ला २ अशी होती आणि पहिल्या डावात सुद्धा शास्त्री आणि किरमाणी च्या जोरावर आपण लीड मिळवला.

नंतरची ही दुसरी कसोटी, दिल्लीची. पहिल्या डावात फक्त ३०७ धावा केल्यावर आपल्या बोथट गोलंदाजीने (आणि पाटा पिचेस मुळे) इंग्लंड ला ४१८ बनवू दिल्या. वास्तविक हे होईपर्यंतच चौथा दिवस जवळजवळ संपला होता. ८० च्या दशकात सर्वच संघ संथ क्रिकेट खेळायचे. त्यामुळे आपल्याला साधारण एक दिवस खेळून काढला तरी काही धोका नव्हता. आणि चौथ्या दिवस अखेर भारत १२८/२ वर होता व गावसकर आणि मोहिंदर खेळत होते. मॅच अनिर्णीत राहणार अशी चिन्हे होती.

पण पाचव्या दिवशी हे दोघे लौकर बाद झाले आणि मग आता उर्वरित फलंदाजांवर मोठी जबाबदारी आली. संदीप पाटील, शास्त्री आणि कपिल. तोपर्यंत भारताची आघाडी फक्त ६०-७० धावांचीच असल्याने आणखी धावा करणे व वेळही घालवणे असे दोन्ही करायचे होते. पण संदीप पाटील ने बेजबाबदार फटका मारला आणि तो बाद झाला. मग कपिल आला, त्याने आल्या आल्या एक जोरात षटकार मारला आणि दिल्लीच्या प्रेक्षकांनी त्याचे कौतुक केले. मग साहेब पुन्हा तसाच शॉट मारायला गेले आणि ऑन साइड ला कोठेतरी झेल देऊन परतले. टीव्हीवर मॅच पाहणारे आम्ही सर्व वैतागलो होतो, पाटील आणि कपिल दोघांवर ही. अपेक्षेप्रमाणे बाकी विकेट्स लगेच पडल्या आणि इंग्लंडला फक्त १२५ चे टार्गेट मिळाले. ते त्यांनी वेळ न दवडता करून टाकले.

या मालिकेत अजून तीन कसोटी बाकी होत्या आणि या पराभवाचे खूप मोठे परिणाम झाले. एकतर इंग्लंड संघाचे मनोधैर्य खूप वाढले आणि पुढच्या मॅचेस मधे त्यांचे लोक एकदम फॉर्म मधे आले. आपल्या लोकांना ढेपाळायला तेव्हा कारण लागतच नसे, हे एवढे सुद्धा पुरले. पुढे मद्रास ची कसोटी हरून भारत ही मालिका १-२ अशी हरला.

त्यात या दिल्ली कसोटीतील बेजबाबदार खेळामुळे पाटील आणि कपिल ला शिक्षा म्हणून पुढच्या मॅच मधे संघातून डच्चू दिला (कप्तान गावसकर होता). यातून आणखीनच नाट्य निर्माण झाले. गावसकर व कपिल मधे दुश्मनी बद्दल कायमच चर्चा होत असे पण येथून ती चिघळली. पुढची कसोटी कलकत्यात होती तेथे लोकांनी "Gavaskar go back", "No Kapil, No Test" वगैरे बॅनर्स आणले. तेव्हा गावसकरने पुन्हा कलकत्त्यात न खेळण्याची घोषणा केली (पुढे १९८७ वर्ल्ड कपला फायनल कलकत्त्यात होती तेव्हा तो काय करणार हा प्रश्न होता, पण मुंबईतच सेमी फायनल ला हरून भारताने तो प्रश्नच निकालात काढला Happy ) कपिल नंतर परत आला पण संदीप पाटील चे करियर जवळ जवळ संपुष्टात आले, कारण कलकत्त्याला त्याच्या जागी अझर ने पदार्पण केले आणि सलग पहिल्या ती कसोटीत (तीन ही याच मालिकेतील होत्या) तीन शतके मारली त्यामुळे पाटील बाहेरच गेला. आणि अझर त्यानंतर मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज झाला.

गावसकर वर कप्तान म्हणूनही खूप टीका झाली. या सिरीज नंतर असणार्‍या ऑस्ट्रेलियातील वर्ल्ड सिरीज कप साठी त्याचे कप्तानपद जाणार अशी जोरदार हवा होती. (याचे सविस्तर वर्णन त्याच्या एका पुस्तकात आहे, कोणत्या ते आठवत नाही... सनी डेज असावे). पण ते राहिले आणि मग स्वत: गावसकर नेच घोषणा केली की त्या वन डे सिरीज नंतर तो आपणहून कप्तानपदावरून निवृत्त होणार. (मुळात जून १९८३ मधे वर्ल्ड कप जिंकल्यावर काही महिन्यांनी कपिल चे कप्तानपद काढून घेतले होते, तेव्हाचे पॉलिटिक्स काय होते ते लक्षात नाही.)

शिवासुद्धा फार काळ टिकला नाही. मग थोडाफार मनिंदर सिंग आणि १९८८ मधे थोडा चमकलेला हिरवानी सोडला तर नव्वदीच्या दशकात कुंबळे येईपर्यंत आपल्याकडे चांगला स्पिनर नव्हता.

पण सगळ्यात गंमत म्हणजे या जवळ जवळ सर्व गोष्टींचा वचपा लौकरच भारताने काढला. बहुधा आपल्या संघाची ही एक खासियत असावी. या मालिकेत वन डे मधे इंग्लंड कडून १-४ हरल्यावर नंतर ऑस्ट्रेलियात भारताने वर्ल्ड सिरीज कप मधे पाचही मॅचेस जिंकून ती स्पर्धा जिंकली. गावसकरच्या कप्तानपदाखाली खेळताना कपिलने एकदा फलंदाजीत व इतर वेळी गोलंदाजीत चांगली कामगिरी केली. या स्पर्धेत बोथम वगैरे सगळे परत आल्यावर ही भारताने इंग्लंड ला हरवले, तसेच पाक ला दोनदा (एकदा फायनल ला) हरवले. मग गावसकरने कप्तानपद यशस्वी रितीने सोडले आणि कपिल पुन्हा कप्तान झाला.

आणि कसोटी पराभव? १९८६ मधे भारत इंग्लंड दौर्‍यावर गेला आणि ३ मॅचेसच्या मालिकेत २-० असा विजय मिळवून कसोटी पराभवाचाही वचपा काढला.

प्रकार: 

जुन्या आठवणी जाग्या केल्यास मित्रा. आमच्या शाळेचं स्नेहसंमेलन होतं त्या दिवशी. कपिल असा आउट झालेला पाहून फारच वाईट वाटलं होतं. त्याचवेळी सुनील आणि कपिलमधे वाराणसीच्या बेनिफिट सामन्याबद्दलही काहीतरी धुमसत होतं. कपिल कसोटी क्रिकेट खेळायला लागल्यापासून, त्या सामन्यानंतर कपिलला एका टेस्ट मधून वगळलं ना तो पर्यंत, एकदाही त्याला वगळलं नव्हतं किंवा त्याला दुखापतींमुळे वगैरे विश्रांती घ्यावी लागली नव्हते. आशिष नेहरा, झहीर खानला पाहिलं की कपिलच्या सलग खेळू शकण्याच्या क्षमतेचं कौतुकच वाटतं ! माझी खात्री आहे, कपिल आजच्या जमान्यातला क्रिकेटर असता तरी वर्षभर कुठेनकुठे क्रिकेट खेळण्यासाठी सक्षम असता !!
- संदीप (http://www.atakmatak.blogspot.com)