
तारे जमींपर...
माधवी, अजित आणि त्यांची मुलं स्वाती आणि रोहन असं छोटंसं चौकोनी सुखी कुटुंब. बारावीनंतर रोहनला केमिकल इंजीनिअरिंगमध्ये इंटरेस्ट असल्यामुळे त्याने त्यासाठीच्या परीक्षा दिल्या होत्या. त्यातूनच त्याला पिलानीच्या बिर्ला इन्स्टिट्यूट या उत्तम समजल्या जाणाऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. यथावकाश त्यानं कोर्स पूर्ण झाल्यावर अपेक्षित वहिवाटेनुसार सीनिअर मित्रांच्या सल्ल्यावरून आपलं करियर अहमदाबादच्या एका आघाडीच्या केमिकल फॅक्टरी मध्ये सुरू केलं आणि त्याच्यासाठी येत असलेल्या उत्तमोत्तम स्थळांपैकी सर्वांची एकमताने निवड कविताच्या रूपाने झाली. स्वातीही जात्याच सुंदर आणि हरहुन्नरी असल्यामुळे तिचं लौकर लग्न जमलं आणि ती आयटी मध्ये चांगल्या पोस्टवर नोकरी करणाऱ्या तिच्या नवऱ्याबरोबर अमेरिकेला निघून गेली.
रोहन आणि कविताच्या आयुष्यात लग्नानंतर लवकरच तिसऱ्याची चाहूल लागली. त्यावेळी बाळंतपणाची सर्व जबाबदारी तिच्या आईनं घेतली आणि नंतरही ती दोघं मुलीकडे आनंदानं राहिली. त्यामुळे छोटा निनाद शाळेत जायला लागेपर्यंत काही काळजी नव्हती. मात्र त्यानंतर रोहन, कवितानं दुसरा चान्स घेण्याचा विचार केल्यावर या वेळी कविताचं बाळंतपण करायला तिच्या आईची अडचण निर्माण झाली. त्यांच्या अमेरिकेतल्या सुनेलाही त्याचवेळी बाळ होणार असल्यानं आणि तिचे आईवडील तिकडे जाऊ शकणार नसल्यानं त्यांना तिकडे जावं लागलं! मात्र यावेळी अजितची रिटायर व्हायला दोनेक वर्षं उरली होती, त्यामुळे त्यानं झटपट निर्णय घेऊन स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्या दोघांनी मुंबईतला मुक्काम तात्पुरता हलवून त्यांच्याकडे अहमदाबादला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोघे बॅगा भरून अहमदाबादला आले. यथावकाश सून बाळंत होऊन तिनं निखिलच्या रूपानं दुसरा नातू घरी आणल्यानं त्यांचंही चौकोनी कुटुंब झाल्याचा आनंद सर्वांनाच झाला. जेमतेम अडीच वर्षांचा झाला तसं निखिलला घराजवळच्या बालवाडी (प्ले स्कूल) मध्ये घातलं. रोहनला, कविताला चांगल्या नोकऱ्या होत्या. सगळं तसं ठीक ठाकच होतं. कविता वयाची पस्तिशी ओलांडतानाच फारच उच्च पदावर पोहोचली होती. तिच्या बुद्धीची चमक तिला कुठल्या कुठे घेऊन जाऊ शकेल अशी चिन्हं दिसत होती आणि सर्वांना अर्थातच याचा सार्थ अभिमान होता! छोट्या निखिलमध्ये लहानपणापासूनच आईच्या बुद्धीची झलक दिसायला लागली होती. मात्र कितीही कानाडोळा करायचं ठरवलं तरी अजितला अधून मधून निखिलच्या वागण्यात काही गोष्टी खटकत असत. यापैकी सर्वात पहिला अनुभव जेव्हा निखिल बालवाडी मध्ये जायला लागला तेव्हाचा. शाळा सुरू झाल्यावर जवळ जवळ सहा महिने तो सोडायला आलेल्या आजीला परत जाऊ देईना. त्यामुळे पूर्णवेळ आजी त्याच्यासोबत शाळेत त्याच्या वर्गात त्याच्याजवळ बसून असे. सुदैवाने ती शाळा प्रसिध्द अक्षरनंदन शाळेसारखी वेगळ्या अपारंपरिक शिक्षण पध्दतीचा स्वीकार केलेली असल्यामुळे त्यांची याला संमती होती. किंबहुना त्यांच्या शाळेत बऱ्यापैकी म्हणता येतील अशा प्रमाणात गतिमंद किंवा तत्सम वेगळेपणाची चिन्हं असलेली मुलं घेतलेली होती आणि अर्थातच त्यांचं धोरण या मुलांच्या बाबतीत आणि एकूणच लवचिक होतं. निखिलच्या शाळेतल्या वागण्यामध्ये इतर मुलांपेक्षा थोडा वेगळेपणा होता. जसं एक म्हणजे त्याला इतर मुलांसोबत काहीही करायची इच्छा किंवा तयारी नसायची. सगळ्यांना जर बाईंनी काहीतरी करायला सांगितलं तर हा आपल्याच तंद्रीत वेगळाच कुठेतरी हरवल्यासारखा उभा राही. मात्र त्याच्या सगळ्या वागण्यावर ‘असतात काही मुलं नादिष्ट’ अशा समजुतीचा शिक्का बसला आणि एकूण या बाबतीत कुणीच फारसं मनावर घेतलं नाही.
सुमारे दोन वर्षानंतर चार वर्षाच्या वयात त्याच्या पुढच्या शाळेसाठी दोन तीन प्रसिध्द शाळांमध्ये प्रयत्न सुरू झाले आणि त्याच्या जात्याच असलेल्या हुशारीमुळे आणि आई वडिलांच्या उत्तम करियरमुळे मुलाखतीचा सोपस्कार यशस्वी होऊन निखिलला अह्मदाबादच्याच एका सर्वोत्तम शाळेत प्रवेश मिळाल्याने तो प्रश्न समाधानकारकरीत्या सुटला. सगळ्यांनाच हुश्श झालं कारण आता बारावीपर्यंत काळजी नाही. आता निखिलची पुढची दोन तीन वर्षं केजीची असल्यामुळे त्याला शाळेत जाण्यासाठी कार, ड्रायव्हर वेगळा नेमावा लागला... पण त्यात काहीच अडचण नव्हती. आता शाळेत सोडायला, आणायला ड्रायव्हर सोबत त्याचे आई, बाबा किंवा आजोबा जायला लागले. हे काम अजितला मनापासून आवडे. निखिल सुध्दा खूष असे. आता निखिलच्या सामाजिक वर्तनामध्ये बदल व्हायला लागला होता. शाळेत पालकांना थांबायला अर्थातच परवानगी नसल्यामुळे निखिलला यापुढे परिस्थितीला एकट्याने तोंड देण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. शाळेत शिक्षिका आपापल्या कामामध्ये तरबेज असल्यामुळे त्यांचं एकूण मुलांकडे बारीक लक्ष असे. आता चांगला सहा वर्षाचा होऊन निखिल सीनिअर केजी मध्ये होता.
निखिलच्या शाळेतल्या अभ्यासाच्या बाबतीत प्रगती सरासरीहून सरसच होत राहिली. त्याच्या वेळोवेळी घेतलेल्या आढाव्यातून हे दिसून येत होतं. मात्र अजितला त्याच्या एकूण वागण्यात काहीतरी खटकतच राहिलं. एक मित्र सोडला तर तो इतरांशी मैत्री करायला किंबहुना बोलायला सुध्दा तयार नसायचा हे अजितला खटकत राहिलं. शाळा सुटायच्या वेळी त्याला घेऊन कारसाठी थांबलं असतांना त्याच्या बरोबरची इतर मुलं त्याला बाय बाय करायला किंवा बोलायला येत तेव्हा तो त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून आजोबांच्या मागे लपायला बघे किंवा अनपेक्षित प्रतिक्रिया देई. इतर पालकांनी हाय, हलो केलं तरी याचा पूर्ण कोरा प्रतिसाद! हे सर्वांनाच जाणवत होतं पण त्यात काही जास्त विचार किंवा काळजी करण्यासारखं वाटलंच नाही घरातल्या इतर कुणाला. वेळोवेळी निखिलला “असं चांगलं नाही निखिल, असं कुणी आपल्याशी बोललं किंवा शेकहँड करायला आलं तर आपण त्यांच्याशी हसून बोलायला हवं... नाहीतर आपल्याला शिष्ठ समजतात. अशानं कुणी बोलायला किंवा मैत्री करायला येणारच नाहीत तुझ्याकडे.” असं सांगितलं जायचं... पण या सगळ्याचा त्याच्यावर परिणाम शून्य! मग काय, ‘मोठा झाल्यावर सुधारेल वागणं या बाबतीत’ अशी मनाची समजूत करून घेणं सगळ्यात सोयीचं... तेच होत गेलं.
निखिलच्या तल्लख बुध्दीमुळे त्याच्या इतर वागण्याकडे कानाडोळा करण्याचं जणू सगळयांनीच ठरवूनच टाकलं. अजितला मात्र अलीकडे निखिलच्या बाबतीत आणखी काही काही गोष्टी खटकायला लागल्या होत्या आणि सगळ्या सोडून देणंही त्याला पटत नव्हतं. उदाहरणार्थ त्याच्याशी बोललं किंवा एखादा प्रश्न विचारला तर किमान ४-५ वेळा विचारल्याशिवाय त्याच्याकडून काही प्रतिसाद मिळतच नसे. जेवायला बसला की, कधीकधी झोपायला अंथरुणावर पडला की, किंवा इतर वेळीही नजर कुठेतरी शून्यात लावून दोन्ही हातांचे विचित्र हातवारे करीत राही. हे सगळ्यांनाच लक्षात येत होतं... पण तो नादिष्ट आहे, काहीतरी डोक्यात विचार चालू असतात यापलीकडे त्यात लक्ष घालायला हवं असं कुणाला वाटलंच नाही. फक्त अशा वेळी मुख्यतः आजीचा “हात खाली, लक्ष जेवणाकडे” असा घोशा सुरू राही. निखिलचा लहरी स्वभाव, कधीकधी अकारण आक्रस्ताळेपणा, कुठल्याही घटनेला अनपेक्षित प्रतिसाद अधून मधून दिसत असे. कुणीही दोघं बोलत असली की काहीतरी बडबड करून, आवाज करून त्यांच्या बोलण्यात व्यत्यय आणायचा... इतकं की तो असतांना कुणाला आपापसात बोलणंही दुरापास्त! स्वरचित गोष्ट बोलायला लागला की अर्धा अर्धा तास अखंड बडबड चालत असे. मधूनच बाप फक्त “निखिल, मध्ये थोडा श्वास घे.” एवढं (जवळजवळ कौतुकाच्या स्वरात) बोलून पुन्हा आपल्या कामात मग्न.
दातात अडकलेलं काही निघेपर्यंत जसं अस्वस्थ वाटतं तसा अजितला कधीकधी या सगळ्याचा त्रास होई. आणि असंच एकदा.... अजितला पूर्वी वाचलेलं काहीतरी आठवलं आणि त्याने पटापट गूगलवर सर्च केला... ADHD... आणि नेहमीप्रमाणे बदाबदा रिझल्ट्स उमटले. पहिले काही रिझल्ट्स बघून त्याच्या लक्षात आलं की आपल्या डोक्यातलं हेच दिसतं आहे... ‘अटेन्शन डेफिसिट हायपरॅक्टिव्हिटी डिसऑर्डर’. वरखाली स्क्रोल करून अजितनं त्यातल्या त्यात विश्वारार्ह वाटणाऱ्या एका साईटवर क्लिक केलं आणि युरेका... अलिबाबाची गुहाच उघडली. जसजसा तो याविषयी वाचत गेला तसतसं त्याला जाणवत गेलं की आपल्याला हेच जाणवतं आहे! मुख्य म्हणजे सुरुवातीलाच तिथे सांगितलं होतं की हा कुठलाही आजार किंवा गतिमंदत्व/मतिमंदत्व/ऑटिझम अशा प्रकारची गंभीर समस्या नाही. फक्त वागणुकीविषयी छोटी समस्या (behavioral disorder) आहे. शिवाय असंही म्हटलं होतं की ही लक्षणं जास्त हुशार मुलांच्यात दिसण्याची शक्यता अधिक.... म्हणजे पुन्हा एकदा निखिलशी मिळतं जुळतं वर्णन! यामुळे त्याच्या काळजीचं काहीसं रूपांतर उत्सुकतेत झालं. पण त्याची उत्सुकता त्याला फारशी ताणावी लागली नाही. अपेक्षेप्रमाणे पुढे सामान्य लोकांना स्वतः प्राथमिक अंदाज करण्यासाठी दोन लिंक्स दिल्या होत्या ... एक ‘ADHD in adults’ आणि दुसरी ‘ADHD in children’. दुसऱ्या लिंकवर क्लिक केल्यावर त्याला एक प्रश्नावली दिसली आणि तिच्यात बरेचसे प्रश्न आणि त्यांच्या दिलेल्या संभावित उत्तरांपैकी लागू असलेलं निवडून पुढे जायचं आणि प्रश्नोत्तरं संपल्यावर दिलेल्या उत्तरांवरून उमटलेला एकूण स्कोअर बघायचा असा प्रकार होता. त्या स्कोअरवरच ही डिसऑर्डर मुलात आहे की नाही किंवा कितपत आहे ते ठरणार होतं.
अजितनं एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे एकेका प्रश्नाला तो भिडला. जसजसे प्रश्न येत गेले तसतसा अजितचा आपल्याला आलेल्या शंकेविषयी समज पक्का होत गेला कारण बरेच प्रश्न जणू निखिलला समोर ठेऊन बनवल्यासारखे वाटत होते. जसं... मूल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कमीत कमी तीन चार वेळा विचारल्याशिवाय देत नाही का.... डोळ्याला डोळा भिडवायला कचरतं का... दोघांच्या संभाषणात सारखे अडथळे आणून मुद्दामहून आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करतं का... लांबलचक आणि कधीकधी असंबध्द गोष्टी बनवत राहतं का... इतरांबरोबर खेळण्यापेक्षा एकट्याने खेळणं पसंत करतं का... त्याचं कधीकधी अतार्किक वर्तन दिसून येतं का.. इत्यादी. थोडाफार विचार करत योग्य वाटतील अशी उत्तरं सिलेक्ट करून शेवटी त्यानं थरथरत्या बोटानं रीझल्ट वर क्लिक केलं. आलेला आकडा होता... ४७. घाई घाईनं अजितनं पुढचं वाचलं.... त्यांच्या म्हणण्यानुसार ५१ च्या पुढे स्कोअर आल्यास ADHD हा क्लिनिकल स्वरूपाचा असण्याची शक्यता असते. यासाठी सायकॅट्रिस्टच्या मदतीने पुढे जायचा सल्ला होता. त्यापेक्षा कमी असल्यास पालकांचं या बाबतीत प्रशिक्षण किंवा स्वयंशिक्षण तसेच इतर समुपदेशनासारखे उपाय सुचवले होते. पालकांचा यामध्ये सहभाग अर्थातच महत्वाचा आहे हे अधोरेखित केलं होतं. आता अजितला दोन गोष्टी स्पष्ट झाल्या... एकतर त्याला आलेली शंका वेडगळपणाची नक्कीच नव्हती आणि दुसरं म्हणजे त्याला याविषयी इतर कुटुंबियांशी शक्य तितक्या लवकर बोलून मग पुढच्या सगळ्या गोष्टी ठरवायला लागणार होत्या.
आता अजितनं थोड्या विचारांती आपल्याला सापडलेली माहिती माधवी आणि कविताला पाठवण्याचं ठरवलं. तर तसा त्यानं दोघींना मेसेज पाठवला आणि त्यातल्या साईटवर जाऊन सांगितलेल्या कृतीप्रमाणे प्रश्नांची उत्तरं सिलेक्ट करून त्यांचा किती स्कोअर येतो ते पहायला थोडक्यात सांगितलं. झालं... अजितच्या मनावरचं ओझं थोडंफार उतरलं. स्वतःपुरतं त्यानं आपला नेहमी फारसा वापरात नसलेला इमेल आयडी देऊन त्या साईटवर यासंबंधीचे वेबिनार आणि इतर माहितीसाठी रिक्वेस्ट टाकली. दोनतीन दिवसांनी एक वेबिनार असल्याचा मेसेज आला तेव्हा आपण पाठवलेल्या लिंकवरून कवितानं थोडंफार वाचलं असेल या कल्पनेनं थोड्या साशंक मनानं अजित कविताजवळ जाऊन म्हणाला... “ADHD संबंधी एक वेबिनार आहे आज संध्याकाळी.. तुला बघायचा असला तर...” आता यावर कविताने काही म्हणजे काहीही प्रतिक्रिया दिली नाही. मग अजितलाच अपराध्यासारखं वाटून तो आपल्या खोलीत निघून गेला. तिची या शक्यतेविषयी नकारात्मक भूमिका असावी... तिनं जरी असं म्हटलं असतं की "बाबा मी बघितलं तुम्ही दिलेली लिंक उघडून. माझ्या आलेल्या स्कोअरवरून मला नाही वाटत की यात काही काळजी करण्यासारखं आहे"... तरी अजितचं समाधान झालं असतं. मात्र संपूर्ण दुर्लक्ष? म्हणजे एकतर तिनं काही वाचलंच नव्हतं किंवा तिला कदाचित सासरा जास्तच टोकाला जाऊन विचार करतो आहे असं वाटलं असावं.
खरं म्हणजे ती स्वतः सुध्दा अनेकदा निखिलला म्हणाली होती, “असं काय करतो आहेस? तुला डॉक्टर काकांकडे न्यायचं का?” म्हणून. पण ही शक्यता गृहीत धरून काही करायला तिचं मन तयार होत नसावं. न जाणो खरोखरंच काही प्रॉब्लेम असला तर काय.. असंही वाटलं असेल (denial mode). असेल ते असो... आता अजितनं माधवीला स्पष्टच विचारायचं ठरवलं.
खरं तर तो माधवीशी तसा जास्त बोलतच नसे कारण त्याचा तिच्याशी संवाद जवळपास संपल्यातच जमा होता. तिला लग्नानंतर मुख्यतः सासरेबुवांकडून मिळालेल्या वागणुकीचा खूपच त्रास झाला होता. त्यासंबंधी तिच्या म्हणण्याप्रमाणे तिने अजितला वेळोवेळी कल्पना दिली पण त्याचा काही उपयोग न होता तिला तसंच कुढत राहून ४-५ वर्षे काढायला लागली. माधवीला झालेल्या मानसिक जखमा जरी त्यांच्या पुढच्या दीर्घ संसाराच्या मानाने अल्पकाळ म्हणाव्या अशाच होत्या तरी त्या इतक्या खोल होत्या की त्यांचं भरून येणं सोडाच, त्यांच्यात वाढच होत गेली. दोघांच्यात कधी मित्रत्वाचं नातंच निर्माण होऊ शकलं नाही. आता अजित रिटायर झाल्यावर तर त्यांच्यातला दुरावा वाढतच चालला होता. अजितनं कित्येक वेळा सांगितलं होतं की माझ्या चुका झाल्या, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यात कुचराई केली हे मला मनापासून पटलं आहे. ... पण आता बहुधा माधवीनं मनाशी असं ठरवलं होतं की आता माझं मन इतकं विटलं आहे की मला जुन्या गोष्टी विसरता येतही नाहीत आणि प्रयत्नही करायचा नाही. थोडक्यात त्यांचं नातं ‘They loved each other, but didn’t like each other’ अशा प्रकारचं उरलं होतं.
हे सगळं असूनही त्यानं माधवीजवळ स्वयंपाकघरात जाऊन विचारलं, “तू वाचलंस का मी पाठवलेल्या लिंक मधून ADHD संबंधी ?” माधवीने कंटाळलेल्या आवाजात उत्तर दिलं, “नाही, मला नाही वाटत आपल्या नातवामध्ये काही काळजी करण्याजोगं आहे म्हणून!”... माधवीचं तुटक उत्तर ऐकूनही अजितनं यावेळी तिचा पिच्छा सोडायचाच नाही असं ठरवल्यासारखा तो लोचटपणे म्हणाला, “पण तू एकदा स्वतः ते थोडं वाचून त्यातल्या स्केलप्रमाणे काही मोजक्या प्रश्नांचे पर्याय देऊन टोटल स्कोर पहा आणि मग ठरव ना!” “मला त्याची गरज वाटत नाही.” माधवीनं असे एक घाव, दोन तुकडे केल्यावर अजितपुढे पर्यायच उरला नाही. तो हताशसा होऊन परत त्यांच्या खोलीकडे वळला. पण माधवीनं त्यांच्या संभाषणाची गाडी एकदम दुसऱ्या रुळावर नेत त्याला टोमणा मारला, “आणि मला माहिती आहे तुझी अक्कल... गेल्याच वर्षी मला बरेच दिवस खोकला झालेला असतांना त्याच्या बरोबरीने तीव्र पोटदुखी सुरू झाली तेव्हा काळजी वाटून आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन चेकअप करायचं ठरवलं तेव्हा तू मला माझी पिशवी भरून जाण्याचा आग्रह करायला लागलास... म्हणे कमीत कमी दहा दिवस रहायला लागू शकेल तिथे म्हणून.” “अगं ते फक्त माझ्या मनानं नव्हतो म्हणत मी.. माझा डॉक्टर मित्र तसं म्हणाला होता. मी जेव्हा त्याला सगळी परिस्थिती सांगून त्याचा सल्ला विचारला होता तेव्हा तो म्हणाला होता की तुझ्या नुकत्याच बदललेल्या एका डायबेटीसच्या गोळ्यांमुळे पेरीटोनायटिसची शक्यता असते म्हणून.” फटकन माधवी म्हणाली, “ तो फक्त शक्यता असते म्हणाला. त्यावरून तू मला एकदम पोहोचवायलाच निघाला होतास!” “अगं काहीतरी काय, पोहोचवायला काय... कुठून कुठे नेतेस?” माधवी फटकन म्हणाली, “मग काय तर, नाहीतरी तुला पराचा कावळा करायची सवयच आहे.”
आता मात्र हताश होऊनसा अजित म्हणाला, “ मी कबूल करतो की त्यावेळी माझं जजमेंट चुकलं... पण आता हे फक्त माझ्या मनाचे खेळ नाहीत, नेटवरून मिळालेलं ज्ञान आहे, पण ते तू बघायलाही तयार नाहीस! असू दे... तुम्ही सगळेजण इतके शिकलेले, हुशार असूनही तुम्हा कुणालाच निखिलच्या बाबतीत काही करायचं नाही तर मी तरी डोकंफोड करून काय करू?” खरं सांगायचं तर माधवी अशिक्षित वगैरे नव्हती... उलट M.Sc.(Micro) झाल्यावर बऱ्याच गॅपनंतर B.Lib.I.Sc., नंतर पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा इन इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स (PGDIPR) अशी बिरुदावली यशस्वीपणे आपल्या नावासमोर लावून नंतर एका पेटंट एटर्नीच्या ऑफिसमध्ये नोकरी करायची. तिथे तिचे बॉस तिच्या पेटंटविषयीच्या ‘फोकस्ड सर्च’च्या हातोटीची जुनिअर स्टाफसमोर तारीफही करायचे. असं असूनही तिनं या बाबतीत नुसता सर्चही न करता उलट आपल्या अकलेचे वाभाडे काढावेत याचं मनस्वी दुःख अजितला झालं होतं! खरं म्हणजे तोही हेल्थ सायन्सेस मध्ये पोस्ट ग्रॅजुएट होता पण आजकाल त्यांच्यातल्या वाढत गेलेल्या दरीमुळे छोट्या छोट्या गोष्टींवरून भडका उडत असे आणि त्यामुळेच संभाषणही जितक्यास तितकं उरलं होतं.
अजित माधवीला विचारायला गेला काय.. आणि त्यातून अपेक्षित प्रतिसाद मिळण्याऐवजी त्याचा इतका मोठा स्फोट झाला काय! आता काय करायचं अजितला काहीच कळेना. तो अधून मधून त्याच्या कमी वापरातल्या इमेलवर चेक करी तेव्हा याविषयी पुस्तकं, पालकांसाठी आवश्यक ट्रेनिंगचे स्रोत असं भरपूर मटेरीअल तिथे जमा झालेलं त्याला दिसे... पण ते वाचायचाही त्याला उत्साह वाटेना. जर काहीही समजून न घेता आपल्यालाच वेड्यात काढायला लागली घरचीच मंडळी तर आपण तरी किती ताणून धरायचं! आता अजितनं त्याच्यापुरतं ठरवलं की जोपर्यंत निखिलच्या बाबतीत कुणाला काही करावसं वाटत नाही तोपर्यंत त्याचं ‘ज्ञान’ त्याच्यापर्यंतच ठेवायचं आणि गरज व्यक्त झाली तर आणि तरच तोंड उघडायचं!
आता जरी अजितच्या मनातलं वादळ थोडंफार शमलं तरी अधूनमधून अंथरुणावर पडल्या पडल्या त्याच्या मनात येई, “निखिल जर असाच मोठा झाला, आपण नेटवर वाचल्याप्रमाणे 'मुलांच्यातली ही डिसऑर्डर एक तृतियांश जणांमध्ये मोठं झाल्यावर सुध्दा राहते' हे खरं असलं, आणि दुर्दैवानं तसं झालंच तर त्याच्यासाठी तेव्हा ‘ADHD in Adults’ च्या लिंकवर क्लिक करून मदतीला कोण येणार?”
-oOo-
अजित ची दया वाटतेय...
अजित ची दया वाटतेय...
माधवी येडछाप आहेच.. पण रोहन आणि कविता यांचे लक्ष कुठेय??
संपली की क्रमशः आहे????
संपली की क्रमशः आहे????
चांगली आहे.. पुढे येणार आहे
चांगली आहे.. पुढे येणार आहे का अजून भाग कि संपली?
पुढे येणार आहे का अजून भाग कि
पुढे येणार आहे का अजून भाग कि संपली?+१
विषय चांगला आहे कथेचा...
कथेबद्दल - तुम्ही एक
कथेबद्दल - तुम्ही एक महत्वाचा प्रश्न हाताळायचा प्रयत्न करताय हे जाणवलं पण वेगवेगळ्या प्रश्नांची सरमिसळ होते आहे त्यामुळे नक्कि कशाबद्दल लिहिताय त्याला सूर सापडत नाहिये. अजित आणि माधवी च्या नात्याबद्दल चा इतिहास अचानक आला व गेला. तसाच कविता, रोहन बद्दल मधेच संदर्भ येऊनही पुढे काहीच झालं नाही.
अवांतर - कोणा परिचिताच्या घरी उद्भवलेली परिस्थिती कथे द्वारे मांडत असाल किंवा त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शोधत असाल (असे मला वाटते आहे), तर तसे करण्या ऐवजी मायबोलीवर इतर ग्रुप मधे (आरोग्यं धनसंपदा, ललितलेखन, मुलांचे संगोपन इ.) सरळ लेख लिहा, प्रश्न विचारा. ह्या विषया बद्दल मायबोलीवर आधी काही लिखाण माझ्या वाचनात आले आहे. अनेक वाचक जरूर मदत करतील.