आम्ही आणि जुगाड

Submitted by mi_anu on 21 January, 2021 - 10:46

"मला अजिबात जमणार नाही.आग्रह करायचा नाही.तू अत्यंत अतरंग गोष्टी करतेस."
"इतका इश्यू करायची गरज नाही. व्यवस्थित जमतं."
"माझं मन सैरभैर होतं.मला होत नाही.कृपा करून हे बदल.असं मला खपणार नाही."
"मनातून इच्छा असली की सगळं जमतं.हे सर्व एक्स्क्यूजेस आहेत.हेच मुनिंदर आणि विशाखा ने केलं असतं तर त्यांना डोक्यावर घेतलं असतंस."

हा तावातावाने वाद चालू व्हायला एकच कारण होतं.महिन्याच्या सामानात स्वस्तात सीएफएल बल्ब आणेपर्यंत दुसऱ्या खोल्यातले लाईट डिस्टर्ब करायला नको म्हणून गणपतीतला रंग फेकत फिरणारा रंगीबेरंगी बल्ब संडासात लावला होता.मुळात दिवसा ढवळ्या 'जायला' लाईट का लागतो हा आमच्या कडचा प्रेमळ संवादाचा मुद्दा आहे.

"ठीक आहे.तुझं लॉजिक अत्यंत भंपक आहे.आणि तरी मी बदलते.कारण मी समजूतदार आणि मनमिळावू आहे.बल्बबदलेस्तोवर नोबा घेऊन जात जा."

आमचा 'नोबा' म्हणजे नोबा कंपनीचा जुन्या काळचा हॉरर सिनेमातला रखवालदार हातात धरतो तश्या लूक चा सोलर कंदील.कंदील घेऊन 'जायची' परंपरा आपल्या इथे वर्षानुवर्षे जुनी आहे.पण याबाबत आमचे साहेब अत्यंत चेंज रीलकटंट माणूस आहे.

"मी नोबा घेऊन जाणार नाही.मला अश्या कामासाठी सी एफ एल चा पूर्ण प्रकाश लागतो.ते विशाखा मुनिंदर बघा काय काय युक्त्या लढवतात.आणि आमच्या कडे बघा.आहे त्या वस्तू बंद पडतात."
"हो क्का?मग विशाखा मुनिंदर च्या घरीच 'जा'.त्यांच्या संडासात नॉर्मल लाईट असेल."

काही घरात ज्योतिष्याचे मत घेऊन सगळे निर्णय घेतात.तसं आमच्या घरात एक काडी इकडची तिकडे हलवण्यापूर्वी 'विशाखा मुनिंदर ने याच्यासाठी काही आयडिया केल्या आहेत का' हे बघायला युट्युब लावलं जातं. हे दोघे 'स्मॉल बजेट बिग मेकओव्हर' नावाचा युट्यूब चॅनल आणि कोणत्या तरी वाहिनी वर याच नावाचा कार्यक्रम चालवतात.म्हणजे असं, एका उदाहरणार्थ कुटुंबात लोकांच्या घरी फुलांचे पडदे, वाघाच्या कातड्याच्या डिझाईन चा सोफा, पांढरी कोरी भिंत,लाल प्लॅस्टिक चं कपाट असं सगळं एकमेकांशी न पटणारं एका घरात नांदत असतं.मग त्यांनी बोलावल्यावर विशाखा मुनिंदर नावाचे दोन इंटिरिअर डिझायनर्स येऊन नाकं मुरडतात आणि त्यांना 20000 रुपयात एक खोली आणि 3 दिवस या दराने घराचा कायापालट करून देतात.जुन्या झालेल्या दरवाज्याचा टीपॉय, बेड चा दरवाजा, टेबल चा बेड काही म्हणजे काही विचारू नका.असे बरेच काही बदलून शेवटी सुंदर खोली करून देतात.आणि मग आपलं जुनं घर असं बदललेलं बघून 3 दिवसांनी आलेली ओरिजिनल माणसं गहिवरतात, हाताने अश्रू पुसणं खूपच मिडलक्लास असल्याने गहिवरून दोन्ही डोळ्याच्या बाजूला पंख्यासारखे हात हलवत अश्रू वाळवतात आणि आनंदाने किंचाळतात.

तसे विशाखा मुनिंदर बघायला चालू करण्या पूर्वी पासून आम्ही जुगाडवाले कुलकर्णी आहोत.फर्निचर ला जागा नसताना 2 सिलिंडरवर मोठ्या बर्थडे केक चे आयताकृती प्लाय ठेवून त्यावर चादरी पिना लावून टाचून ड्रेसिंग टेबल करणे, गाडीचे टायर्स बदलल्यावर घरी आणून त्यावर सुताराकडून गोल बनवून आणून ठेवून गॅलरीत ठेवायला टीपॉय करणे, ऑफिस मध्ये वाढदिवस केक कापल्यावर खालचा चंदेरी गोल धुवून घरी आणून त्यावर काळा कागद चिकटवून मंडला डिझाईन असे उपयोगी निरुपयोगी जुगाड सारखे केले जातात.शिवाय आमची अजून एक खोड म्हणजे कोणे एके काळी एखाद्याला आवडलेली गिफ्ट आम्ही पुढची 7-8 वर्षं सगळ्यांना देतो.बाळांचे बाथरोब एका बाळाला आवडले(म्हणजे आईबाबांना) तर आम्ही गेली अनेक वर्षं प्रत्येक बारश्यात बाळांना बाथरोब देत होतो.नंतर भारत सरकार पैसे देऊन पासपोर्ट कव्हर देत नव्हतं तोवर आम्ही सर्वाना पासपोर्ट कव्हर देत होतो.सध्या आम्ही सोलर कंदील वाले कुलकर्णी आहोत.सगळ्यांना सोलर कंदील देतोय.

आम्ही जेव्हा इथे राहायला आलो तेव्हा हौसेने डिशवॉशर च्या आकाराचं एक कपाट आणि वर ओट्याचा टॉप केला. पण नंतर त्यात डिश वॉशर न येता 3 टप्पे टाकून ज्वारी कणिक आणि इतर डबे आले.'व्हेन इन डाऊट, पूट इन रेफ्रिजरेटर' हे आमच्या घराचं महत्वाचं ब्रीदवाक्य आहे.त्यामुळे 'ज्या वस्तू ओट्यावर ठेवायच्या नाहीत त्या फ्रीजमध्ये' असं समीकरण आपोआपच झालं.फ्रीज मध्ये आईस पॅक, इंजेक्शन, फेस क्रीम, मेंदी, डोळ्याचा चष्मा असं काहीही असतं.त्यामुळे वस्तू फ्रीजमधून काढून तोंडात टाकली असं अजिबात करता येत नाही.
परवा फ्रीजमध्ये लाल चुटुक रंगाची सुंदर कुल्फी मोल्ड मध्ये होती.पटकन चव घेऊन पाहिली तर न भूतो न भविष्यती असं खारट पाणी होतं.
"अगं पोरी, हे नक्की काय ठेवलंय कुल्फी मोड मध्ये?"
"आई, तू असं कसं खाल्लं मला न विचारता?तो पाण्याची सॉलिड स्टेट किती वेळात येते बघायचा एक्सपरिमेन्ट होता टीचर ने दिलेला."

हे यांचे एक्सपरिमेन्ट कुठे तोंडावर पाडतील सांगता येत नाही.मागच्या महिन्यात एका मासिकात वाचून रिसायकल्ड हॅन्ड मेड पेपर बनवला.मुळात 'कागदाचा कागद करणे' ही क्रिया म्हणजे मूर्खांच्या लक्षणात अजून एका लक्षणाची भर घालण्या सारखी कृती होती. कागद साबणात 3 दिवस भिजवले.मग मिक्सरमधून काढले.मग तो लगदा एका लाकडावर थापून लाटला.हा पेपर वापरणाऱ्याचं देवच रक्षण करो.तर वाळल्यावर हा पुनर्जन्म झालेला पेपर निघेचना.मग छोट्या कलाकाराने तव्यावर चिकटलेला डोसा सुरीने काढावा तसा तो तुकडे करून काढला आणि कंपोस्ट मध्ये टाकला.

हां, तर मुनिंदर विशाखा कडे वळू.त्यांच्या प्रयोगाने भारावून जाऊन आमचे साहेबही स्वतःच्या घरात बरेच(त्यांच्या दृष्टीने) उपयुक्त आणि गेम चेंजर प्रयोग करत असतात.पण साहेब म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको ही अत्यंत भांडकुदळ स्त्री असल्याने ती 'ओह माय गॉड' म्हणून डोळ्यात आनंदाश्रू आणून मिठी न मारता 'हे काय वेड्यासारखं?चांगली चाकं वाली ट्रॉली ओट्यावर ठेवून काय व्हॅल्यू ऍडिशन आहे?आधी सगळं पाहिल्यासारखं कर' म्हणून खेकसते.विशाखा मुनिंदर च्या प्रयोगावर पण 'इतकं पांढरं शुभ्र डेकोरेशन गॅस जवळ?फोडणीतली हळद मोहरी उडाली तर?किंवा मिक्सरमध्ये पालक बारीक करताना भिंतीवर उडाला तर?किंवा चहा गाळून त्यातला भुसा पिशवीत टाकताना शिंतोडे उडाले तर?आणि पडद्यात एल ई डी बल्ब काय?दरवेळी धुताना उस्तवारी घरातल्या बाईनेच करायची ना?' वगैरे अनिष्ट शंका काढते.एकदा विशाखा मुनिंदर च्या घरी जाऊन त्यांच्या फर्निचर ला नाकं मुरडून यायचं दुष्ट स्वप्न अजून पूर्ण झालेलं नाही.खरं तर ते खूप चांगले मेकओव्हर करतात.पण अति शहाण्या माणसाला जगातले काय पटते?

सिनेमात दाखवतात तसं डायनिंग टेबलवर पदार्थाची आगगाडी असावी, त्यातून पदार्थ घेऊन ती पुढे ढकलता यावी, किंवा नोकर ट्रॉलीमध्ये स्वच्छ नॅपकिन्स, कटलरी, पदार्थ घेऊन येतो त्याप्रमाणे आपल्याला रोज मिळावे असं मी सोडून बाकीच्या मेम्बरांना सारखं वाटत असतं.पण घरात रोज स्वयंपाक करणारी स्त्री(म्हणजे मीच की) अत्यंत कजाग असल्याने रोज भाजी पोळी वरण भात इतका स्वयंपाक झाला तरी ते ईश्वराचे आभार मानतात.ज्या भांड्यात खाणं शिजवलं तेच वाढायला टेबलावर घेणे, पोळीच्या तव्यात पोळ्या, नंतर काचऱ्या आणि नंतर मिरचीचा खर्डा करणे,भाजी घट्ट असल्यास वाटी न घेणे, कोशिंबीर संपवत असल्यास नंतर तो चमचा वरण भात खायला वापरणे वगैरे भांडी आणि पाणी बचत जुगाड आम्ही आणि आमच्या जवळपासची कुटुंबं पिढ्यानपिढ्या करत आले आहेत.(खोटं कशाला बोलू, भांडी आणि पाणी वाचवण्या पेक्षा नंतर ढीगभर भांडी मी लावण्यात स्वतःचा जाणारा वेळ वाचवणं हा मुख्य हेतू असावा अशी दाट शंका आहे.)

दुसऱ्याने सुचवलेल्या प्रत्येक मांडणी ला 'हॅ, हे फारच गैरसोयीचं आहे' असं म्हणून कचऱ्यात काढणं मी सोडलं नाही आणि देशा परदेशातल्या इंटिरिअर चे व्हीडिओ बघून 'कसे छान राहतात ना लोक, नाहीतर आपण!!' म्हणून उसासे टाकणं साहेबांनी सोडलं नाही.(आणि इतके व्यवस्थित, टापटीप वाले व्हिडिओ बघून पण 'कपडे सरळ करून मगच धुवायला टाकणे' हे मात्र कोणीही केलेले नाही.)
मी एकदा विशाखा मुनिंदर ला पैसे देऊन ते घरातले कपडे सरळ करतायत, टेबल मॅट धुतायत, खिडक्या पुसतायत असे व्हिडिओ बनवून घेणार आहे.यु नो, युट्युब व्हिडिओ मध्ये पाहिलं की सगळं खरं वाटायला लागतं!
(समाप्त)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Rofl फारच हसू आलं...भारी लिहिलंय...
खूप ठिकाणी रिलेट पण झालं दिवसाढवळ्या लाईट.. भांड्याचा ढिग स्किप करायची आयडिया !!! Lol

भारी लिहीलय Lol

गणपतीतला रंग फेकत फिरणारा रंगीबेरंगी बल्ब संडासात लावला होता.
>>>
हे तर अगदी अगदी मी पण केलेय.. किंबहुना करतो.. बाथरूम आणि वॉशबेसिन दोन्हीकडे.. Lol
काय करणार, अचानक ईथला बल्ब गेला तर इकडचा तिकडचा काढा फिरवा नवा आणा मग पुन्हा तिकडचा ईकडे फिरवा काढा त्यापेक्षा हा हाताला पटकन लागेल अश्या जागी ठेऊन दिलाय Happy

मस्त. एकदम खुसखुशीत ! या लेखातून बर्‍याच आयडीया मिळाल्यात त्या करून पाहण्यात येतील Wink . गणपतीतला रंग फेकत फिरणारा रंगीबेरंगी बल्ब संडासात लावायची आयडीया फारच भारी. आता ख्रीसमस/नवीन वर्षाच्या च्या काळात लावायची अख्खी माळ तिथे लावून पहावी म्हणतो. रोज सकाळी नवीन वर्ष !

हे विशाखा मुनिंदर आधी काल्पनिक पात्रे वाटली पण नंतर कोण आहेत त्याचा अंदाज आला. आजच दुपारच्याला यूट्यूब सजेशन्स मध्ये त्यांचा दोन वर्षे जुना व्हिडीओ दिसत होता. आठवड्यातून दोनदा तरी येतोच तिथे. ना मला घर घ्यायचेय, ना इंटेरिअर करायचेय, ना मेकओव्हर तरी येत राहतात ते विडिओ सजेशन्समध्ये. हे बऱ्याच काळापासून चाललेय आणि अजूनपर्यंत मी एकदाही त्यांचा कोणताही विडिओ पाहिलेला नाही. युट्युब अल्गो गंडलेला आहे. कायच्या काय विडिओ सजेशन्स येत असतात रोज. बाकी माझा शाळेपासूनचा जुगाड म्हणजे वाफ घ्यायच्या मशीनमध्ये म्यागी उकडून खायची.

Lol भारी आहे लेख.

इथल्या एच जी टी व्ही वरच्या वेगवेगळ्या शोज ची आठवण झाली. माझ्या मित्राचा आवडता डायलॉग आहे - " मी पार्ट टाईम कुत्रे फिरवायचा जॉब करतो आणि माझी बायको पार्ट टाईम प्रायमरी टिचर आहे आणि आमचे घराचे बजेट आर्धा का पाऊण मिलीयन आहे" Lol

धमाल आहे.
टाकून द्यायच्या वस्तूंचा माल करता येतो या मताचा मी आहे. त्यामुळे भांडार ठेवले आहे.

Lol भारी जमलाय लेख. नुक्तेच नेटफ्लिक्सवर 'ड्रीम होम मेकओव्हर' चे १-२ एपिसोड्स पाहिलेत. त्यामुळे हा '३ दिवसांनी बदललेलं घर पहा' असा स्टँडर्ड फॉर्मॅट असावा असं वाटतंय. त्यात अक्षरशः काहीही असतं. एका एपिमध्ये तर त्या घरातल्या लोकांनी सांगितलं की आमच्याकडे एक एक्स्ट्रा(!!!) रूम आहे ती वापरात येईल असं काहीतरी करून द्या. अरे! मुळात असलं घर घेतलं कशाला ज्यातल्या खोल्या एक्स्ट्रा होतायत? बरं खोली पण इतकी मोठी की स्टुडीओ अपार्टमेंट पण त्यापेक्षा खूप लहान वाटेल. अवघड आहे एकूण

मस्त लिहिलय अनु. मज्जा आली वाचायला .
ड्रीम मेकओव्हर ( स्टुडीओ मगी) च्या सर्वच वस्तु अत्यंत महाग आहेत परंतु अतिशय सुरेख आहेत. मला प्रोग्रॅम इतका नाही आवडत पण अतिशय बीग फॅन आहे तिच्या डेकोरची.

रंग फेकत फिरणारा रंगीबेरंगी बल्ब संडासात लावला >>celebrity house hunt शो मधे एका घरात संडासात डिस्को बॅाल लावला होता ते आठवले.
हाताने अश्रू पुसणं खूपच मिडलक्लास असल्याने गहिवरून दोन्ही डोळ्याच्या बाजूला पंख्यासारखे हात हलवत अश्रू वाळवतात आणि आनंदाने किंचाळतात.>>> Lol
ज्या भांड्यात खाणं शिजवलं तेच वाढायला टेबलावर घेणे, पोळीच्या तव्यात पोळ्या, नंतर काचऱ्या आणि नंतर मिरचीचा खर्डा करणे,भाजी घट्ट असल्यास वाटी न घेणे, कोशिंबीर संपवत असल्यास नंतर तो चमचा वरण भात खायला वापरणे वगैरे भांडी आणि पाणी बचत जुगाड >> अगदी अगदी.

गणपतीतला रंग फेकत फिरणारा रंगीबेरंगी बल्ब संडासात लावला होता >> हे वाचल्यावर स्क्रोल अप करून वरचे संवाद पुन्हा एकदा वाचले Lol

जबरी लिहिलंय!

गणपतीतला रंग फेकत फिरणारा रंगीबेरंगी बल्ब संडासात लावला होता. >> हाहाहा! भरपूर हसले!
नेहमी प्रमाणेच खुसखुशीत आणि फर्मास!

ज्या भांड्यात खाणं शिजवलं तेच वाढायला टेबलावर घेणे, पोळीच्या तव्यात पोळ्या, नंतर काचऱ्या आणि नंतर मिरचीचा खर्डा करणे,भाजी घट्ट असल्यास वाटी न घेणे, कोशिंबीर संपवत असल्यास नंतर तो चमचा वरण भात खायला वापरणे वगैरे भांडी आणि पाणी बचत जुगाड>>>हे तर अगदीच रिलेट झाले..... माझ्याकडून अजून एक एक एडिशन ..त्याच गरम तव्यावर दुपारची उरलेली भाजी आमटीची वाटी ठेवली कि वाटीतील पदार्थ पण गरम होतो.. पुन्हा ओव्हन किंवा गॅस ची गरज नाही..

विशाखा आणि मनिंदर हा प्रकार माहिती नव्हता. सकाळी लेख वाचल्यावर आधी जाऊन त्यांचा एक व्हिडिओ शोधून तो पाहिला. Happy
लेख मस्तच!

Pages