माझी खंडित झालेली नर्मदा परीक्रमा २०२० !..
साधारणपणे ८ एक वर्षांपूर्वीची गोष्ट , असंच एक दिवस ‘नर्मदा परिक्रमेची ‘ एक cd मला मिळाली , परिक्रमा म्हणजे काय असतं ? या उत्सुकतेपोटी जनरल थोडा वेळ बघू आणि मग झोपुयात या हिशोबाने रात्री मी ती लावली आणि सलग किती तास गेले पत्ताही लागला नाही ,रात्री दीड -दोन वाजता cd संपल्यावरच उठले .अतिशय साध्या वाटणाऱ्या त्या बाईंच्या रसाळ आणि ओघवत्या वर्णनात मी गुंगून गेले असंख्य चमत्कारीक असलेले तरीही अशक्य न वाटणारे अद्भुत प्रसंग त्यांनी सांगितले होते , त्यामुळे खूप कुतूहल वाढलं , आता ‘यु ट्यूब’ च्या माध्यमातून घरोघरी त्या प्रसिद्ध झाल्या आहेतच त्या सौ .प्रतिभा चितळे, सर्व परिक्रमावासीयांमध्ये अतिशय प्रेमाने आणि आदराने ज्यांना माई चितळे , किंवा चितळे मैय्या असं संबोधलं जातं , परिक्रमेच्या इच्छेचं बीज रोपण अर्थातच तिथून झालेलं , मग पुढे जगन्नाथ कुंटे , भारती ठाकूर , यांच्या पुस्तकांनी वेड लावलं, हळूहळू नर्मदा मैय्याच्या नावाने जी काही पुस्तकं दिसतील ती आणायचा सपाटा लावला , त्यातली चंद्रकांत पवार , सतीश चुरी , सुहास लिमये यांची पुस्तकं आवडली , त्याची पारायणं करत राहायची करायची आणि कधीतरी आपणही वीस एक वर्षांनी पायी परिक्रमा करायची असं मनाने ठरवून टाकलेलं . एकेकाचे अनुभव वाचून आणि ऐकून , असं काही खरंच असेल का ? खरंच मैय्या प्रचिती देत असेल का ? आपल्यालाही असे अनुभव येतील का ? असे तमाम सामान्य वाचकांना पडणारे प्रश्न मलाही पडलेले असताना , सहज म्हणून ‘फक्त पायी परिक्रमा ‘ असा एक ग्रुप व्हॉट’स अँप वर कोणी तरी सुरू केला आणि आपणही ,पुढे काही वर्षांनी जेव्हा केव्हा जाणार असू तेव्हा माहिती असावी या हेतूने मी तो जॉईन केला ,आणि माझ्या अतीव (???)प्रेमापोटी मैय्याने मला याच वर्षी म्हणजे २०२० ला बोलावून घेतले .(असं म्हणतात की गिरनार परीक्रमा , नर्मदा परिक्रमा हे त्यांचं बोलावणं असतं ) सुरूवातीला टायटल दिल्याप्रमाणे माझी परिक्रमा खंडित झाली , तरीही यावर लिहायचा मला एवढा सोस का ? तर मनाला जे भावलं पटलं आणि अनुभवलं त्याचं शब्दांकन करावंसं वाटलं कारण प्रवास किती दिवस झाला याला जितकं महत्व आहे त्यापेक्षा तो कसा झाला याला जास्त महत्व आहे असं मला वाटलं म्हणून हा लेखनप्रपंच .
‘फक्त पायी परीक्रमा ‘ हा ग्रुप जॉईन केल्या नंतर काही दिवसातच ‘सुनीता बागवे ‘ हिचा मला फोन आला ती मुंबईची होती, ती याच वर्षी जाणार होती,बोलताना कळलं की आम्ही दोघी साधारण एकाच वयाच्या आहोत त्यामुळेमनाच्या तारा चटकन जुळल्या , तिला वाटलं होतं की मी याच वर्षी जाणार पण तिला मी म्हटलं की मला एवढ्यात जमणार नाही , खूप रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आत्ता ,ती ओके म्हणाली ,फोन संपल्यानंतर मात्र तो विषय मनात घोळत राहिला, मग सध्या
परिक्रमावासींमध्ये फेमस असलेल्या ‘अनिश व्यास’ शी बोलले त्यानेही प्रोत्साहन दिलं आणि त्यानंतर हळूहळू मलाही तेच वेध लागले , आणि न राहवून मी घरी विषय काढला ,घरी सर्वांनी प्रोत्साहन दिलं ,माझ्या चुलत सासूबाई ,माझे चुलत दीर , माझ्या जाऊबाई , माझा भाऊ, सर्वांनी मनापासून प्रोत्साहन दिलं , (हे लिहिण्याचं कारण जेव्हा तुम्ही एखादी अवघड गोष्ट करायला जाता तेव्हा सगळ्यांचा आपल्यावरचा विश्वास आणि प्रोत्सहान हे खूप गरजेचं असतं , निश्चय त्यानेच दृढ होत जातो ) मग सद्गुरूंची संमती घ्यायला ‘वासुदेवश्रमात’ गेले , गंमत म्हणजे घरातल्या जबाबदाऱ्या ,ऑफिस , हे सगळं इतकं पट्कन मॅनेज झालं आणि अखेर २७ नोव्हेम्बर २०२० ला रात्री ९.३० च्या’ पुणे-खांडवा’ ट्रेन मध्ये मी बसले ,रेल्वे स्टेशनवर माझे यजमान , मुलगी , आणि माझे चुलत दिर श्री. विलास सिद्ध हे ही आले होते , त्यांनी स्वतः: कैलास मानस सरोवर वैगेरे केल्यामुळे माझे त्यांना फार कौतुक होते , ओंकारेश्वर पर्यंत सोबत म्हणून मला सोडवायला माझ्या मागे सतत सावलीसारखी असणारी माझी मोठी बहीण , तिचे यजमान आणि माझी मुलगी हे तिघेही आले होते .
परिक्रमा सुरू करणे याला प्रचलित शब्द ‘परीक्रमा उचलणे ‘ असा आहे , आम्ही गोमुख घाट ओंकारेश्वर इथून परीक्रमा उचलणार होतो , तिथे जाण्यासाठी खांडवा किंवा इंदोर वरून सोय आहे , त्यामुळे आधी २८ ला सकाळी मध्यप्रदेशातील ‘खांडवा’ या ठिकाणी पोहोचून मग पुढे साधारण दोन तासांनी ओंकारेश्वरला गजानन महाराजांच्या आश्रमात पोहोचलो. तिथे आल्यावर आधी सुनीताला फोन केला ,ती आणि तिच्याबरोबर अजून दोघी होत्या असे कळले , परीक्रमा वासींसाठी आश्रमात वेगळी सोय केलेली तिथे आदल्या दिवशी रात्रीच त्या आल्या होत्या. मी ,सुनीता बागवे , रोहिणी लेले आणि डॉ . विश्वा देशमुख अशा आम्ही चौघी प्रथमच एकमेकींना भेटलो , सुनीता दादरची , रोहिणी पनवेलची , डॉ. विश्वा ताई या नालासोपारा इथल्या , आणि मी पुण्याची ,पण पहिल्याच भेटीत आम्ही छान मनमोकळ्या बोललो कारण परिक्रमा हा एक समान धागा आमच्यात होता , पुढे कसं काय करायचं ते ठरवून , २८ ला सकाळी ओंकार मान्धाताची परिक्रमा करून , संध्याकाळी अनिलदासजी महाराज यांच्याकडून प्रमाणपत्र घेतलं आणि कन्याभोजनाचा कार्यक्रम छान पार पडला . २९ ला ‘त्रिपुरारी पौर्णिमेच्या ‘ सकाळी साधारण अकरा वाजता , संकल्प घेऊन आम्ही परिक्रमा उचलली .
गोमुख घाटावरून जेव्हा मी पाहिलं पाऊल परिक्रमेसाठी उचललं , तेव्हा मनाची खूप विचित्र अवस्था झाली होती ,एकाकीडे नर्मदा मैय्या जिचा मी रात्रंदिवस ध्यास घेतलेला आणि दुसरीकडे माझे कुटुंबीय , माझी मुलगी जे मला पुढचे पाच महिने आता भेटणार नव्हते , इतक्या सहजपणे सगळं टाकून जाणं खरंच सोपं नसतं ,(आधी मला वाटायचं त्यात काय अवघड आहे ? पाच महिनेच तर काढायचेत , पण ते इतकं सोपं नाही , मायेचा पाश फार मजबूत असतो हे मला प्रत्यक्ष अनुभवाने कळलं ) ज्यांनी हे दिव्य केलं त्यांना माझा साष्टांग दंडवत . असो ...पहिला टप्पा होता ‘ओंकारेश्वर ते मोरटक्का ‘ ५ की .मी. ,आता हे सांगताना अजून एक सांगायचं राहिलं की खूप जणांनी मला सल्ला दिला होता की चालायची सवय कर वैगेरे , पण एक म्हणजे मला तेवढा अवधी मिळालाच नाही आणि दुसरं म्हणजे परिक्रमा हि १ % शारीरिक बळ आणि ९९% मानसिक बळावरच होत असते असे मी अनुभवाअंती ठामपणे सांगू शकते , परिक्रमा हि माई आपल्याकडून करवून घेत असते, आपण करत नसतो या भावाने ती केली तरच आपण सगळं अंतर सहज आणि लीलया पार करू शकतो .आता अंगावर पांढरे कपडे , हातात दंड ,एका बाजूला मैय्यांचं संकल्प करून घेतलेलं जल , अगदी संन्यासी झाल्याचा फील येत होता , परीक्रमा मोड आता ऑन झाला होता , मग कुठलीही आठवण आली नाही , (नंतर बहिणीकडून कळलं की ते म्हणे पुढे जेव्हा लगेच इंदोर ला निघाले , तेव्हा वाटेत कुठे परीक्रमा वासी चालताना दिसले की हे गाडीवाल्याला गाडी हळू चालवायला सांगायचे आणि त्यांच्यात मी दिसते का ते बघायला बाहेर डोकवायचे )
पहिला ५ कि,मी चा टप्पा सहज पार करून साधारण १ वाजण्याच्या सुमारास आम्ही ‘एक रोटी आश्रम ‘ ‘शिवकोठी’ इथे पोहोचलो , प्रत्येकाने एक रोटी दान करायची , या सुंदर संकल्पनेतून हा भव्य आश्रम साकारला आहे , तिथे दुपारचं जेवण आणि थोडी विश्रांती घेऊन आम्ही पुढे निघालो,याठिकाणी आमच्याकडे असलेलं बरंचसं ओझं आम्ही कमी केलं , मैय्यावर भरवसा ठेऊन निघालो होतो तरी खायला किती काय काय घेतलं होतं , लाडू , चिवडा , शंकरपाळे , ड्राय फ्रुट्स ,चिक्क्या , कसल्या कसल्या वड्या अबबब ,खाण्याचं साहित्य , माझा एक ड्रेस ,विश्वताईंचं ब्लॅंकेट , वैगेरे प्रत्येकी कडे एक्स्ट्रा जे जे वाटलं ते सगळं तिथे देऊन टाकलं , फुलवाती ,उदबत्त्या ,काडेपेट्या पण दिल्या आणि ठरवलं की मानसपूजा करायची , आपण स्वतः पाठीवर वाहत असलो की कुठलंही ओझं नकोसं वाटतं , साधारण तासभर विश्रांती घेऊन आम्ही पुढे निघालो ,आठ कि.मी. चालल्यावर ‘ मोरटक्का’ इथे संध्याकाळी साधारण पाच वाजता पोहोचलो , तिथल्या आश्रमात राहण्याची सोय नाही (कोरोनामुळे ) असं व्यवस्थापकाने सांगितलं ,मग पुढे दोन एक कि.मी. वर खेडीघाट इथे ,आशाताई आश्रम आहे असे ग्रामस्थांकडून कळल्यामुळे त्याप्रमाणे चालत शोधत शोधत निघालो सहाच्या सुमारास ‘आशाताई आश्रम ‘ नावाचं एक अर्धवट बांधकाम दिसलं , जिथे गुडूप अंधार ,त्याच्या पुढे एक, बैठं घर, मागे जंगल आणि पुढे विस्तीर्ण मोकळा परिसर होता ,त्याच्याही पुढे नर्मदा माई दिसत होती . बाजूलाच अंतराअंतराने संन्याशाची वाटावीत अशी दोन छोटी घरं होती , इथे थांबायची सोय नक्की कशी होणार हा प्रश्नच होता ,कारण त्या बैठ्या घरातल्या आजी आणि त्यांची सून बाहेर आल्या पण त्यांची फारशी काही ईच्छा दिसली नाही , त्या आत निघून गेल्या , पण आता आम्हाला पुढे जायला काही चान्स नव्हता , ‘नर्मदे हर ‘’नर्मदे हर ‘ असा आवाज देत आम्ही काही क्षण उभे राहिलो असू तेव्हढ्यात तिथल्या एका छोट्या घरातून साधारण सत्तरीच्या आसपास असलेले एक बाबाजी बाहेर आले , आम्हाला चौघीना बघून त्यांनी लगबगीने मघाच्या त्या स्त्री ला बोलावून आणले , त्या आजींना त्यांनी आमची राहण्याची सोय करावी अशा पद्धतीचे सांगून पाहीले ,त्या दोघीना बहुधा बाबाजींचा शब्द मोडता येईना , त्या तयार झाल्या , मग बाबाजींनी अजून काही खटपटी करुन एक दिवा त्या अर्धवट बांधकाम असलेल्या घरात लावून दिला आणि आम्हाला म्हणाले ‘माताजी यहा आसन लगालो ,( ईथे अजून एक सांगायचं म्हणजे आपलं वय कितीही लहान असलं तरी सगळ्यांना सरसकट माताजी संबोधतात , आणि आपल्या जवळ अंथरण्यासाठी जे काय असेल ते टाकायच ,त्याला आसन लावणे म्हणतात ,आणि एकदा ते टाकले की शक्यतो जागा चेंज करायची नसते ) आपके चाय और खाने का प्रबम्ध मै करता हूं “ ते निघून गेले ,आम्ही तिथेच उभ्या होतो , टाचणी पडेल एवढी शांतता आणि रातकिड्यांचा किर्र किर्र आवाज , कालपर्यत शहरात राहिलेल्या मला क्षणभर भीती वाटली , चारी बाजूंनी अर्धवट उघडा असलेला हा परिसर , सुरक्षित आहे ना? रात्री काही जनावर तर राहू दे पण बेडूक जरी आत आला तर भंबेरी उडायची , आत येऊन आधी जागा साफ केली , मग आम्ही आसन लावलं , म्हणजे आपलं फोम शीट अंथरलं , थोडी विंश्रांती घेतली ,सकाळपासून साधारण १६ -१७ की .मी. चालणं झालं होतं , पाठआणि पाय ठणकत होतेच ,सॅक मधून तेल काढून पायांना थोडं मॉलिश केलं ,तितक्यात बाबाजींनी चहाला हाक मारली , त्यांच्या छान सारवलेल्या अंगणात चटई टाकून आम्ही बसलो , बाबाजी रामकृष्ण मिशनचे संन्यासी होते, बेंगॉली आणि वेल एज्युकेटेड ,सर्व काम एकटेच करत होते , आम्हाला काहीही करायला मनाई होती ,आत जायलाही ,कारण त्यांची संन्याशाची मठी , तेव्हढ्यात ते चहा घेऊन आले , काळा चहा आणि त्यात लिंबू पिळलेलं , पहिला घोट घेता क्षणीच , सुख !.. , लेमन टी , आईस टी , ब्लॅक टी आपण कधी पीत नाही असं नाही पण हा प्यायल्यावर खूप फ्रेश वाटलं, मग परत आमच्या आसनावर जाऊन आम्ही संध्याकाळची आरती, पूजा वैगेरे केली, बरोब्बर आठ वाजता बाबाजींनी पुन्हा जेवायला आवाज दिला, त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता ,उलटपक्षी आयतं काही घ्यायची सवय नसलेल्या आम्हाला त्या ‘रॉयल’ सर्व्हिसचा संकोच वाटत होता , पण ते अर्थातच आम्हाला काही करू देत नव्हतेच , अखेर चांदण्यांच्या प्रकाशात, फुलझाडांच्या सोबतीत , अप्रतिम खिचडी,आणि पिगपॉंग बॉल , पापड यांचा आस्वाद घेत आम्ही चौघीनी जेवणं उरकली तेव्हा त्या खिचडीत नेमकं असं काय घातलं होतं की त्याला एवढी अमेझिंग चव होती याचा बराच खल करूनही उत्तर मिळालं नाही, अखेर बाबांच्या सात्विकतेची चव त्यात उतरली यावर आमचं एकमत झालं. आणि आम्ही आजच्या पुरती सोय असलेल्या निवासस्थानी झोपायला गेलो, सुरवातीला मला झोप लागलीच नाही , घरच्यांपासून दूर, एकाकी , अनोळखी लोकांबरोबर एका असुरक्षित जागी आपण निर्धास्त पणे झोपू शकतो हे जरा पचत नव्हतं ,पण सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा वाटलं अरे ?... सुखरूप आहोत की आपण ?, काहीच झालं नाही , छान झोपलो रात्री !.. परमेश्वरावरची श्रद्धा अशामुळेच मग दृढ व्हायला लागते. ,सकाळी उठून बाबाजींच्या हातचा स्वर्गीय लेमन टी घेऊन आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. ईथे त्यांचं बाहेरच्या बाजूला असलेलं टॉयलेट वैगेरे आम्हाला त्यांनी वापरू दिलं त्यामुळे सकाळची आन्हिकं उरकली .
30-11-२०२०
सकाळी कोवळ्या उन्हात माईच्या किनाऱ्याने चालत जाणं खूप आल्हाददायक वाटत होतं , शांत निळसर वाहणारी माई आणि तिच्या पात्रात उडणारे शुभ्र रंगाचे बगळे बघत ,तोंडाने नामस्मरण करत वाटचाल चालू होती , लांब अतंरावर एक उंच अशा टेकाडावरच्या एका बाबाजींनी आवाज दिला , ‘नर्मदे हर,आओ मैय्या, चाय पीओ ‘ आमचा मोर्चा मग तिकडे वळला , या तिघींनी आपापले चहाचे पेले काढले , मी माझ्या स्टीलच्या बॉटलचं झाकणच चहासाठी पुढे केलं , माझ्याकडे ग्लास नव्हता , अथवा कमंडलू पण नव्हतं , मनात विचार आला की झाकण चहाला वापरलं तर सगळ्या बॉटलला चहाचा वास लागेल आणि दर वेळी पाणी पिताना बॉटल ला ओशट वास येईल , जितक्या चट्कन विचार आला तितक्या पट्कन तो काढूनही टाकला , आता आपण परिक्रमेत आहोत हे चोचले ठेवायचे नाहीत असं स्वतः:ला बजावलं , पण तेवढा सूक्ष्म विचारही माईने जणू टिपकागदासारखा टिपून घेतला ,(हो इथे नर्मदा किनाऱ्यावर मनात आलेली प्रत्येक ईच्छा माई पूर्ण करतेच करते .कारण या सर्व भागावर तिची सार्वत्रिक आणि सार्वभौम सत्ता आहे ) दोनच दिवसांनी मला स्टीलचा ग्लास मिळाला,नवा कोरा करकरीत प्लॅस्टिकच्या कव्हरसकट . असो.. साधारण अकराच्या सुमारास सीताराम बाबा (यांना टिक्कड बाबा पण म्हणतात , कारण जेवणात ते टिक्कड बनवतात , टिक्कड म्हणजे गव्हाच्या पिठापासून बनवलेला , निखाऱ्यात भाजलेला जाड रोटी सारखा पदार्थ , त्यांचा चतकोर टिक्कड आपल्या मोठ्या पोळीच्या आकाराएवढा असतो ) आश्रमाचा बोर्ड दिसला , बोर्डवर दाखवलेल्या मार्गाने वर निघालो , एका भल्या घरच्या गृहिणीने तेव्हढ्यात चहाला बोलावले , पुन्हा तिकडे वळून चहा घेऊन , मग बाबांच्या आश्रमात गेलो ,’ घनदाट केळीचं बन’ आणि उन्हात वाळवायला ताटात ठेवलेल्या रव्यावर बिनधास्त पणे ताव मारणाऱ्या खारू ताईंनी आमचं स्वागत केलं , अगदी त्यांच्या शेजारी असलेल्या शेणाने सारवलेल्या उंचवट्यावर बसून आम्ही शूज वैगेरे काढले तरी जाम हालल्या नाहीत . खूप खारी होत्या इथे आणि मनसोक्त खेळत होत्या , आश्रम निसर्ग संपन्न होता , त्यामुळे नैर्सर्गिक गारवा वातावरणात होता आणि आल्हाददायक हवा होती , आमच्या अगोदर दहा पंधरा परिक्रमावासी आलेले दिसले , त्यातले कोणी मध्यप्रदेशातलेच होते , कोणी आळंदीचे होते , इथे आम्ही स्नान, पूजा ,आरती वैगेरे उरकली , कपडे धुऊन वाळत घातले , तेवढ्यात भोजनासाठी बोलावणं आलं , कच्च्या केळ्याची भाजी , गरम गरम टिक्कड आणि वाफाळलेला भात , त्यावर दाल ,भोजन सुरू करण्यापूर्वी अन्नपूर्णा स्तोत्र म्हणत असताना प्रकर्षानं मनात आलं ,हे समोर आत्ता गरम गरम भोजन मिळतंय त्यासाठी मी काय एफर्ट्स घेतले आहेत ? काही नाही , किती पैसे मोजलेत ? शून्य. आत्ता जर आपण एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये गेलो असतो आणि अगदी दहा हजारांच बिल त्यांना करून दिलं असतं ,आणि त्यानंतर एक रोटी आणि सब्जी फुकट द्या म्हटलं असतं तर दिली असती कोणी ? ईथे मात्र आपण कोण कुठचे हे माहित नसताना केवळ श्रद्धेपोटी ,आपल्याला गरम आणि ताजं अन्न आदराने आणि मनापसून वाढतात , असं कुठे असतं ? थोडंसं गहिवरून आलं, जेवण करून पुढे निघालो , दुपारी ३. ३० च्या सुमारास गोमुख आश्रम ‘टोकसर ‘ इथे पोहोचलो , तिथे लेकीचा फोन आला ,”आई दुपारी जेवलीस ?” म्हटलं “हो , मैय्याच्या कृपेने जेवण झालं .” , त्यावर तीला हसू आलं , मला म्हणाली “आता मी तुला काही विचारलं तर तु हेच टिपिकल वाक्य टाकणार का ? मैय्याच्या कृपेने ?.त्यावर तिला म्हटलं “ हो !.. कारण ते ऍक्चुली तसंच आहे . “
गोमुख आश्रम अतिशय भव्य आणि सुंदर आहे , दोन मजली , एका बाजूला परिक्रमावासींसाठी छोटया छोटया रूम्स आहेत आणि पुढे विस्तीर्ण पटांगण , वरही तसंच , वरती शंकराचं मंदिर आहे , इथे आम्ही मुक्काम केला , दुसऱ्या दिवशी निघालो तेव्हा विश्वा ताईचं बी .पी. जरा हाय झालं होतं , त्या स्वतः:डॉक्टर असल्यामुळे त्यांनी सर्व औषधं बरोबर आणली होती , आम्ही तिघींनी त्यांना सांगितलं की आज इथेच विश्रांती घ्या आणि उद्या बाकीच्या परिक्रमा वासींबरोबर पुढे या , त्या हो म्हणाल्या. आम्ही तिघीच आवरून पुढे निघालो .
१/१२/२०२०
पहाटे ५.३० ला निघालो , टोकसर , पीतपूर , अशी गावं क्रॉस करत रावेरखेडी ला आलो ,काही काळ गावातून , काही वेळा शेतातून असे मजेत चालत होतो तोपर्यंत सकाळचे ९..३० झाले होते , टोकसर ला एक छोटीशी गम्मत झाली ,पहाटे अंधारात आम्ही आवरून तसेच निघालो होतो, वाटेत एकाने चहा दिला , तर तिथे सुनीता च्या मनात आलं की एखाद बिस्कीट तोंडात टाकायला मिळालं असतं तर बरं झालं असतं , अजून गाव जागं होत होतं ,अंधार सरला नव्हता , कॉर्नरला एका माणसाने ‘मैय्याजी रुको’असं म्हणून आम्हाला थांबवलं, त्याच्या पिशवीतून दोन छोटे पार्ले जी चे पुढे काढले , एक मला आणि एक सुनीताला दिला , चालण्याचा स्पीड आमचा वेगवेगळा असल्या कारणाने सुनीता पुढे , मी तिच्या मागे आणि रोहिणी बरीच मागे अशा आम्ही चालत होतो , रोहिणी येईपर्यंत ते गृहस्थ थांबले आणि तिलाही बिस्किटाचा पुडा दिल्यावर मग निघून गेले , पाच दहा पावलं पुढे गेल्यावर आम्हाला हि गोष्ट लक्षात आली की त्याच्या पिशवीत बरोब्बर तीनच पुडे होते आणि रोहिणी दिसत नसली तरी मागून येते आहे हे त्याला आम्ही न सांगता कसं कळलं ?
रावेरखेडीला बाजीराव पेशवेंच्या समाधीचं दर्शन घेऊन , तिथे घरच्यांना व्हिडीओ कॉल वैगेरे सोपस्कार करून झाले , मग पुढे किनाऱ्याने निघालो ,जप करत अखंड चालत होतो , मध्येच उंच सखल भाग , मध्येच खडकाळ जागा, दलदल , काटेरी झुडपं यातून वाट काढत चालत होतो , कधी तरी एखादा माणूस किंवा छोटी मुलं दिसली तर त्यांना विचारून पुढचा रस्ता शोधत होतो , दोन तीन तासांनी म्हणजे साधारण ११ वाजण्याच्या सुमारास अशा टापूत आलो की लांबपर्यंत कोणी चिटपाखरू देखील दिसत नव्हतं आणि पुढे जायला रस्ता दिसत नव्हता कारण पलीकडे एक नदी आणि अलीकडे आमच्या पुढ्यात प्रचंड मोठे काळे कातळ , आता हे चढून जायचे कसे ? कारण ते गुळगुळीत होते आणि आमच्या दुप्पट तिप्पट उंचीचे , शिवाय उभे आडवे कसेही होते , या मार्गानेच पुढे जायचं आहे का तेही ठाऊक नव्हतं, कोणीतरी दिसेल , मार्ग सांगेल म्हणून वाट पहिली पण सगळीकडे निस्तब्ध शांतता , फक्त पाण्याचा काय तो आवाज , थोडा वेळ वाट पाहून आम्ही , ‘नर्मदे हर’ चा गजर केला तर खूप लांबून, पलीकडच्या तीरावरून , दोन छोटी मुलं प्रतिसाद देत होती ,आम्ही त्या दिशेने पाहिलं असता ती आम्हाला हात वारे करून बोलावत होती ,असं लक्षात आलं , मग आम्हीही त्यांना ओरडून , हातवारे करून सांगितलं की रस्ता कळत नाही , तेव्हढ्यात ती मुलं दिसेनाशी झाली , परत सगळीकडे निस्तब्ध शांतता , आता आम्ही डोळ्यात सगळी आतुरता एकवटून ,ती मुलं दिसली होती त्या दिशेने पुन्हा पाहू लागलो , परत पाचव्या मिनिटाला ती मुलं आमच्या दिशेने पळत येताना दिसली , बरोबर एक काळं आणि उंच कुत्रं देखील होतं ,आता जरा हायसं वाटलं आणि वाईटही वाटलं बिचारी आमच्या करता एव्हढ्या लांबून येत होती . थोड्याच वेळात ती दोन्ही मुलं त्या कातळांवर आली , त्यांनी वरून हात देऊन आम्हाला चढायला मदत केली , कुठल्या खाचेत पाय टाकायचा हे सांगून खाली उतरायलाही मदत केली , आता पुढे नदी क्रॉस करून ‘बकावा’ गावात पोहोचायचं हे देखील त्यांनीच सांगितलं , जरासं पाण्यात जाऊन दंड नदीत टाकून बघितला तर पाण्याला चांगलाच फोर्स होता , आणि आत पाय ठेवण्यासाठी खडक होते पण त्यावर प्रचंड शेवाळं साचलेलं होतं , नदीचं पात्रही बरंच मोठं होतं , पाण्याच्या फोर्सबरोबर पुढे वाहणारा दंड ,(या दंडाचा चालताना सगळीकडे खूप उपयोग होतो , ईतका की त्याच्याशिवाय आपण चालूच शकत नाही ) शेवाळ्यावरून घसरणारे पाय आणि पाठीवरचं १२ की पेक्षा जास्त असलेलं ओझं अशी कसरत करून नदी क्रॉस केल्याचं श्रेय , साध्या रस्त्याने चालताना मध्येच धपकन पडणाऱ्या मला ,मी चुकून तरी देईन का ? पण खूप मस्त वाटलं पाण्यातून बाहेर आल्यावर , माझ्यासारख्या साध्या गृहिणीला हा अडव्हेंचरस अनुभव दिल्याबद्दल माईचे आभार मानले . मुलांचे आभार मानले , फुल द्यायची आपली ऐपत नाही पण पाकळी म्हणून थोडी दक्षिणा दिली , आणि आपल्या काळ्याभोर चकचकीत कांतीने , सडपातळ आणि उंच बांध्याने आणि सुरेख पिंगट डोळ्याने मघापासून उगाचच माझं सारखं लक्ष वेधून घेणाऱ्या ‘लकी ‘नावाच्या त्या कुत्र्याला (एरवी मला कुत्री अजिबात आवडत नाहीत ) बिस्किटं दिली आणि पुढे निघालो , (असं म्हणतात की मार्ग दाखवायला वेगवेगळ्या रूपात नर्मदा माई किंवा कोणी विभूती , दैवी शक्ती या कुठच्याही रूपाने येत असतात ) असो ..नदी ओलांडून पुढे चालत निघालो , दुपारी १ .३० च्या सुमारास सुप्रसिद्ध बकावा गावात आलो , सुप्रसिद्ध म्हणण्याचं कारण , इथे नर्मदा माईच्या पात्रात मिळणाऱ्या बाणलिंगांना शाळीग्रामच्या आकारात तयार करतात आणि गावात परिक्रमावासींच आदरतिथ्य हि खूप मनापासून करतात . ज्यांची ती फॅक्टरी आहे तिथेच आम्ही भोजन प्रसादी साठी थांबलो , अजूनही काही परिक्रमावासी आलेले होते , स्वतः:चं नाव ‘संदीप मेहता ‘असं सांगणारा एक तरतरीत आणि देखणा २७-२८ वर्षांचा तरुणही इथे भेटला , त्याने कपडे वाळत घालण्यासाठी दोऱ्या वैगेरे बांधायला खूप मनापासून मदत केली त्याच्याशी बोलताना कळलं की त्याचे ह्रिषीकेष ला दोन तीन रिट्रीट सेंटर आहेत आणि तिथे खूप फॉरिनर्स येत असतात , योगा मास्टर असलेला हा मुलगा त्याचा केशरी फेटा नीट करून बांधत होता तेव्हा त्याचा प्रचंड जटा संभार दिसला , खूप नवल वाटलं , त्याला हे करिअर निवडायची , किंवा एवढ्या लहानपणी परीक्रमा करायची हे ज्ञान कुठून मिळालं असेल? (त्याची उंची जबरदस्त होती त्यामुळे चालण्याचा वेग खूप , हा परत भेटला नाही ) बकावा आश्रमातल्या किरकोळ शरीरयष्टीच्या माताजी एकट्याच अतिशय चटपटीत पणे सर्व काही करत होत्या , आम्ही यायच्या आधीच एक पंगत जेऊन उठली होती , आम्ही तिघी गेल्यावर , आतून पुन्हा फोडण्यांचे वास आणि भांड्यांचे आवाज येऊ लागले तसं आम्ही त्यांना मदतीसाठी विचारलं , माताजींनी अर्थातच मदत नाकारली , पुरी , मुगाची उसळ , कढी आणि गरम भात असं जेऊन थोडा वेळ विश्राम केला , त्यानंतरही परिक्रमावासी येतच होते जेवण करून पुढे जात होते , एवढ्या लोकांचं ही बाई हसत हसत करत होती , आम्ही तिघी ते पाहत होतो , घरी आपल्याकडे अनाहूत दोन- चार मंडळी आली तर आपल्याला असं वाटतं यांना आधी कळवता येत नाही का? आणि इथे ही किती लोक येणार काय येणार सगळ्यांसाठी भराभर करत होती , भांडी पण पटापट घासून मोकळी , कितीही वेळा विचारलं तरी आमची मदत घेणं तिला चालत नव्हतं ,आम्ही परिकम्मा वासी ना .. साधारण ४. ३० च्या सुमारास माताजी आमच्याजवळ चहा घेऊन आल्या आणि गप्पा मारायला बसल्या , त्याना विचारलं दिवसभर एवढं काम करताय थकायला नाही होत का ? त्यावर त्यांचं उत्तर “ मै कहा करती हुं ? वो तो नर्मदा मैय्या करती है , जिस दिन मै बोलू की मै करती हू ऊस दिन से कुछ ना कर पाऊगी !.. सुबह- शाम पास मे रामजीके मंदिर मे दिया जलाने जाती हू और सीता मैय्या को बोलती हू मैय्याजी चलो मेरे साथ रसोई मे , बस वो आती है , तो कितने भी लोग आए खाना कम नही पडता ,” !...किती सहजभाव होता , म्हटलं आपल्या जशा शेजारी मैत्रीणी तशा हिच्या मैत्रीणी म्हणजे सीता मैय्या , नर्मदा मैय्या , किती छान !..
रात्री त्याच गावात नर्मदा आश्रम इथे मुक्काम केला, इथे ‘ विश्वाताई ‘येऊन आम्हाला पुन्हा जॉईन झाल्या ,तब्येत आता बरी होती , गप्पा , टप्पा झाल्या , मैय्याची आरती झाली , माझ्या मैय्याचं जल असलेल्या बॉटलला चुनरी लावलेली नव्हती , त्यांनी प्रेमाने मला विचारलं ‘बाबू तुझ्याकडे चुनरी नाही का ? “ मी म्हटलं नाही , लगेच त्यांच्या सॅक मधून काढून दिली त्यांनी मला , आणि हो लिहायला डायरी पण नव्हती , ती देखील त्यांनी मला दिली , खरं तर माझं खूप झटपट ठरल्यामुळे मला या सगळ्या गोष्टींसाठी अवधी मिळालाच नाही . पण मैय्या खरंच काही कमी पडू देत नाही , जेवायचं ताट ही मी आणलेलं नव्हतं ते मला सुनिताकडून मिळलं ,आज इथे चिकार परीक्रमा वासी मुक्कामाला होते , काही गुजराथी कुटुंबे होती संपूर्ण शाळा आणि तिचं आवार परिक्रमा वासींनी भरून गेलं होतं पण तिथल्या गावकऱ्यांनी व्यवस्था अतिशय चोख केलेली असल्यामुळे कोणतीही गैरसोय झाली नाही ,दोन मोठे हॉल आणि प्रशस्त आवारात नवीन कोऱ्या गाद्या , ब्लँकेट्स घालून ठेवलेली होती त्यामुळे स्लीपिंग बॅग आज लागली नाही , संध्याकाळी आरती व पूजेसाठी सर्वांनी फ़ुलवाती ,उदबत्त्या वैगेरे लावल्या आणि वातावरण खूप सुगंधी , पवित्र झालं , तेव्हा आम्ही शिवकोठी ला देऊन टाकलेल्या फ़ुलवाती आणि उदबत्त्यांची आठवण झाली , सुनीताला म्हटलं , “काही म्हण सुनीता पूजा करताना निदान उदबत्ती तरी पाहिजे “ ती म्हणाली , “ हो ना , पण आता काय करणार आपणच देऊन टाकल्या ना “ . संध्याकाळी सात वाजता ‘भोजन की सीताराम’ (इथे जेवायला बोलावताना ‘भोजन की सीताराम SSS असा आवाज देतात ) वर्दी आली , पुरी ,भाजी, कढी , खिचडी असा बेत होता , जेवण करून ,थोडा वेळ गावकऱ्यांशी गप्पा मारून आम्ही झोपी गेलो ,इथे गाढ झोप लागली , त्यामळे पहाटे साडे तीन ला जाग आली, मग आवरून साधारण पाच च्या सुमारास निघालो , शेजारी राम मंदिर होतं , ईथे तुळशीची पानं घातलेला सुरेख चहा मिळला , ईथल्या बाबाजींनी उपदेश केला , “देखो माई चलने की घाई मत करना , अब आप मैय्याके पास आये हो , जैसे अपने मायके मै खुश होकर रहते हो वैसे रहेना ,मजेसे चलना ,आनंद लेके चलना ,आरामसे चलोगे तो परीक्रमा पुरी करके जल्दी अपने घर वापस पोहोचगे , और घाई करोगे तो देरी से पोहोचोगे , यहा सब माई की ईच्छा से चलता है !.. “ बाबाजींचा उपदेश लक्षात ठेऊन आम्ही पुढे निघालो , अजून बऱ्यापैकी काळोख होताच , वेशीवरच एक फेटा धोतर घातलेले गृहस्थ समोर आले आणि आम्हाला म्हणाले “मैय्याजी रुको, आपको कुछ देना है!..” पिशवीत हात घालून त्याने आम्हाला काय द्यावं? चौघीनांही एक एक शाळीग्राम , उदबत्त्या , काडेपेटी. आश्चर्य वाटलं ना ? नाही वाटून घ्यायचं.. मागितलं , ईच्छा केली की मिळणार, हे गृहीतच धरायचं !..“ साधारण ११ वाजेपर्यंत ‘तेली भटियान’ ला पोहोचलो ,इथे आम्ही मुक्काम करायचं ठरवलं होतं त्यामुळे घाई कसलीच नव्हती , मागची एक गोष्ट सांगायची राहिली मागे टोकसर च्या अलीकडे शेताच्या पायवाटेवरून जाताना या सुनीता आणि रोहिणीची एका मुलीवरून चर्चा चाललेली मी, ऐकली होती , एक अगदी तरुण , २१-२२ वर्षांची मुलगी एकटीच परिक्रमा करते आहे आणि अनवाणी आहे , शिवाय तिने हातात दंड न घेता त्रिशूळ घेतला आहे , कपाळावर भस्म आहे , मला तिला बघायची उत्सुकता लागली , ती आम्हाला शिवलिंग फॅक्ट्री बकावा इथे दिसली , आणि माझ्या उत्सुकतेचं माईने शमन केलं , खरोखर अतिशय शांत आणि तेजस्वी चेहेरा तिच्याशी बोलताना समजलं की ती केदारनाथ वरून परिभ्रमणाकरीता निघाली आहे ,जनसंपर्क ती टाळत असल्यामुळे जास्त बोलत नव्हती पण तिच्या आसपास बसण्याने पण काहीतरी वेगळी एनर्जी पास ऑन होत होती एवढं खरं , तिचा ऑरा इतर कोणाहीपेक्षा वेगळा होता . मीराबाई हे तिने धारण केलेलं नाव , तर‘तेली भाटियान ‘ ला ,ही मीराबाई पुन्हा भेटली, केवळ वयाने लहान दिसते आणि बघता क्षणी आपलीशी वाटली म्हणून अरे तुरे म्हणायचं धाडस केलं ,अन्यथा तिची योग्यता किंवा अधिकार मोठा असेल हे ती त्रिशूळ घेऊन निर्भयपणे एकटी भ्रमण करतेय यावरूनच कळतं . तेली भाटियान ला महान संत ‘सियाराम बाबा ‘चे दर्शन झाले ,कुणी म्हणतात की ते १०५ वर्षांचे आहेत , कुणी म्हणतात ११० असो .. यांनी १२ वर्षे एका जागी उभे राहून तपाचरण केले त्यांना ओळखण्याची आपली काडीमात्र योग्यता नाही , दर्शन झालं हे भाग्य . हे दक्षिणा म्हणून फक्त दहा रूपये घेतात , कितीही पैसे दिले तरी त्यातले दहा घेऊन बाकीचे सुट्टे परत करतात , मला हे ठाऊक नसल्यामुळे मी दोनशे ची नोट नेली होती , त्यांनी एकशे नव्वद परत केले , खूप गंमत वाटली . आवडले मला बाबा खूप .
इथे अजून एक जोडपं लक्षात राहिलं ते म्हणजे पुनमभाई आणि त्यांची मिसेस , त्यांची जुन्या काळातल्या धर्मेंद्र सारखी हेअरस्टाईल आणि जिवणीच्या एका कोपऱ्यातून हसण्याची स्टाईल खूप भारी होती हे त्यांना बिचाऱ्यांना कुणी सांगितलं असेल की नाही कोण जाणे , सियाराम बाबांच्या मुदपाक खान्याची जबाबदारी या दोघांनी स्वीकारलेली , सकाळी स्वतःच्या घरातलं आवरून हि दोघे इथे येतात , जेवढे परिक्रमावासी असतील तेवढ्यांचा स्वयंपाक करतात , भांडी वैगेरे घासून , दुपारी घरी जातात ,पुन्हा संध्याकाळी येऊन रात्रीच्या भोजनाचा प्रबंध , तेव्हढ्याच एनर्जीने करतात , संध्याकाळची कढी -खिचडी तमाम परिक्रमावासींयांना खूष करून गेली , बायका स्वभावप्रमाणे पूनमभाईंच्या मिसेस ला रेसिपी विचारायला गेल्या , “आपने कढी मे क्या क्या डाला जो ईतना अच्छा स्वाद आया ?. “ “यावर तिचे उत्तर , “ मन डाला है अपना !.. “ आहे की नाही चतुर ? पूनमभाईंचा मुलगा बी फार्मसी चा अभ्यास करतो , रात्री आम्हाला भेटायला आला , आम्ही पुण्या मुंबईचे म्हटल्यावर त्याला फार आनंद झाला कारण मुंबईला सेट्ल व्हायचं त्याचं स्वप्न होतं , विश्वा ताईंनी त्याचा ताबा घेतला , बरेच उपदेश करून आपल्या घराचा ऍड्रेस दिला आणि त्यांच्या फर्ड्या हिंदीत सांगितलं “बेटा तुम कभी भी मेरे घर आना , मै तुम्हारे पढणे का ईंतजाम करुंगी “ ,आज जवळपास ८० परिक्रमावासी आले होते , त्यातले काही जेवून पुढे गेले तर काही मुक्कामी थांबले होते , काहींच्या पायाला फोड आले होते, काहींना जखमा झाल्या होत्या , त्यावर गावातून एक मुलगेलासा डॉक्टर बोलावला होता , त्याला सगळ्यांनी कलकल करून बेजार केलं होतं पण तो ही त्यांच्या वरचढ असल्यामुळे , चुकीच्या गोष्टीही रेटून सांगत होता ,नंतर कळलं की तो कंपाउंडर होता , मूळ डॉक्टर आलेच नव्हते, त्याचं आणि त्या परिक्रमावासींचं जे संभाषण चाललं होतं त्याने आमची करमणूक होत होती, इथे अजून एक नाथबाबा म्हणून भेटले , त्यांची आणि विश्वताईंची फार गट्टी जमली होती, साठी पार केलेल्या विश्वताईंना ते ‘विश्वा बाळा ‘ अशी हाक मारायचे तेव्हा गंमत वाटायची , इथला एक दिवसाचा मुक्काम खूप छान गेला, खरोखर माहेरी आल्यासारखं वाटलं. कधीही कोणाशी न बोलणारे ‘सियाराम बाबा’ आमच्याशी बोलले , भरपूर गप्पा मारल्या अर्थात ते एकटेच बोलत होते आम्ही फक्त श्रवण भक्ती चालू ठेवली. ईथला घाटही खूप सुंदर आहे , प्रचंड मोठया पिंपळाखाली बसून इथे मी ‘नर्मदा पुराण’ वाचलं आणि सुनीता ने ‘भगवद गीता ‘ ,त्यानंतर मैय्या मध्ये स्नान करून पितरांना तर्पण दिलं , बराच वेळ शांतपणे घाटावर बसले होते, समोर ‘शांतपणे वाहणारी निळ्या रंगाची नर्मदा माई आणि मी ‘बास , बाकी कसलेही विचार नाही , कसलीही काळजी नाही , शांत निवांत …या शांततेची खूप गरज होती का ? … ! रात्री सगळयांच्या एकमेकांशी गप्पा चालू असल्यामुळे झोपायला उशीर झाला.
३. १२. २०२०
पहाटे आवरून 4. 30 ला चालायला सुरुवात केली , आज मध्येच एका ठिकाणी साबुदाण्याच्या चिवड्याचा बालभोग मिळाला (नाश्त्याला इथे बालभोग म्हणतात ) मग पुढे अखंड चालत राहिलो , इथले रस्ते अधून मधून शेतातून जात असल्यामुळे सकाळच्या वेळी चालणं फार अल्हाददायक वाटत होतं , पपई , केळी च्या बागा , टोमॅटो , कोबी ची शेतं , मधूनच खळाळत वाहणारं पाणी मनाला खूप सुखावून जात होतं , अशा वेळी बहुधा रोहिणी गाणं गुणगुणायची , “सुख म्हणजे नक्की काय असतं SSS . “ लेपा इथे साधारण १२. ३० पोहोचलो , वेदा संगम ईथल्या आश्रमात गरमगरम खिचडीची भोजन प्रसादी घेऊन परत चालायला सुरूवात केली , साधारण ३ ते ३.३० च्या सुमारास ‘कठोरा’ गावात पोहोचलो , तिथे बुलेट बाबाजींच्या आश्रमात हिरवळीवर थोडा वेळ विसावलो ,आता पायाला जांभळे पाण्याचे फोड यायला सुरूवात झाली होती आणि जखमा देखील झाल्या होत्या , बाबाजींनी आल्या चहा , आणि फोडांवर लावायला त्यांनी स्वतः: तयार केलेलं , एक विशिष्ट प्रकारचं १५ औषधी वनस्पती टाकून तयार केलेलं तेल लावायला दिलं , त्यांच्या म्हण्याप्रमाणे तेल लावल्यावर पहिल्या दोन मिनिटात बरं वाटलं पाहिजे , तिसरा मिनिट लागला तर तेलाचा काही उपयोग नाही , आणि to my surprise !.. खरोखरच दुसऱ्या मिनिटाला बरं वाटलं , फ्रेश होऊन या तिघी पुढे चालायचं म्हणत होत्या , पण मी मात्र थकून सॅक वर डोकं टेकवून बसले होते , बाबाजींचं तिकडे लक्ष गेलं ,आणि त्यांनी आम्हाला इथेच मुक्काम करा असं फर्मावलं , “ ये माईजी तो बहोत थकी हुई है आज चल नही सकेगी .. रुको आज यही पे …” खरं तर आम्हाला वाटलं होतं की ईथे मुक्कामाची सोय नीट नसेल म्हणून आम्ही का कु करत होतो पण , आत जाऊन पाहिलं तर अतिशय सुंदर व्यवस्था होती , इथे अजून एक गंमत आम्ही पहिली ती म्हणजे जंगलात मुगुसांच्या दोन जोड्या होत्या , बाबाजींनी हाक मारली की ते पळत यायचे आणि टोस्ट घेऊन जायचे , संध्याकाळ नंतर आलेले अजून काही परिक्रमावासीही इथे थांबले , बाबाजी स्वतः: जातीने सगळ्यांची काळजी घेत ज्याला जे हवं ते न मागता देत होते , (यांना सिद्धी प्राप्त आहे की काय असं वाटावं , एवढं मनातलं ओळखत होते ) किती सेवा करावी ? आई सुद्धा मुलांचं एवढं करणार नाही .इथे सुनीता आणि मी , रोहिणी आणि काही आळंदी हून आलेले परिक्रमावासी आम्ही सगळ्यांनी मिळून, जवळपास तीस एका लोकांसाठी, मेथी, कोबी ,मुळा, यांचे पराठे केले, त्याच्या आधी, सुनीता आणि मी गप्पा मारत होतो ती सहज म्हणाली, ‘आज गुरुवार आहे ना, आज आमच्या दादरच्या मठात जिलेबीचा प्रसाद असतो , “ पाच एक मिनिटात बाहेर गेलेले बाबाजी आत येऊन म्हणाले , “यहा जलेबी किसको खानी है? “ आम्ही दोघी आश्चर्याने एकमेकींकडे पहात असतानाच भलीमोठी जिलेबीची दोन पुडकी थोड्याच वेळात हजर , गुळाची आणि साखरेची गरमगरम जिलेबी, नवल वाटणार नाही काय? “ कोण ओळखत असतं इथे कोणाला? तरीही इतकं निरपेक्षपणे किती करायचं , ज्याला काही सीमा नाही, असं वाटतं इथे एकच भाव असतो सगळयांच्या मनात, की आपण सगळी माईची लेकरं आहोत , देणारीही तीच ,घेणारीही तीच. इथेही रात्री विश्वा ताईंना एकदम हुडहुडी भरून आली , त्यांना खूप पांघरुणं घातली , औषधं दिली त्यानंतर त्यांना झोप लागली , सकाळी आम्ही आवरून निघालो तेव्हा बाबाजींनी विश्वताईंना थांबण्याचा आणि विश्रांती घेण्याचा खूप आग्रह केला, पण त्या आमच्याही आधी आवरून पुढे हजर ..सकाळी चहा टोस्ट खाऊन , बाबाजींचा प्रेमळ निरोप घेऊन साधारण साडे आठ च्या सुमारास निघालो. मागे तेली भाटियान च्या मुक्कामात मला कळलं की नाथबाबांचं सगळं सामान मागे हरवलं त्यामुळे त्यांच्याकडे आता पांघरायला काही नाही , त्यावेळी माझ्या कडे असलेली एकुलती एक शॉल मी त्यांना देऊ केलेली , तरआत्ता सांगायचं कारण मला बुलेट या बाबाजींनी नवीन ब्लॅन्केट देऊ केलं, अतिशय हलकं आणि उबदार , या सगळ्या गोष्टी मला न मागता मिळालेल्या आहेत ,हे परत एकदा आवर्जून सांगते आहे .
4-12-2020
सकाळी चालायला सुरूवात केल्या नंतर साधारण दहाच्या सुमारास ‘मांडव्य ‘ गुंफा इथे पोहोचलो ,हा परिसर अतिशय रमणीय आणि एकांतात आहे ,मूळ रस्त्यापासून साधारण आत अर्धा एक कि.मी. चालत गेल्यानंतर आश्रम लागतो , चालताना वाटेत तुरीची शेत लागतात , आतला परिसर शांत आणि प्रसन्न आहे , गुंफेत थोडा वेळ ध्यान केलं ,ईथलं वडाचं झाड इतकं भव्य आहे आणि त्याच्या पारंब्याचा विस्तार एवढा आहे की त्या सावलीत एक छोटीशी कुटी सहज बांधता येईल , कमालीचा शांत परीसर , फक्त पक्ष्यांचा काय तो चिवचिवाट ऐकू येतो . , इथे कीर्तन नावाचा गोड छोकरा सगळयांना मनापासून चहा बिस्किटं देत होता ,चहा झाल्यानंतर निघालो पुढे मात्र कुठेही न थांबता अखंड चालत राहिलो , माईचा किनारा शांत आणि रमणीय होता त्यामुळे थकवा जाणवत नव्हता , दुपारी शालिवाहन आश्रम ‘नावाटोडा ‘इथे मुक्काम केला , इथे कपडे धुण्याची व्यवस्था होती त्यामुळे कपडे , मोबाईल चार्जिंग वैगेरे गोष्टी उरकून घेतल्या , संध्याकाळी नर्मदा माईच्या जवळ घाटावर गावातले काही लोक आरती करत होते , काही दिवे सोडत होते , आम्हीही शांतपणे बसून पाहत होतो , इथून समोर महेश्वर घाट दिसत होता , दूरवर लुकलुकत जाणारे पाण्यातले दिवे रात्रीच्या अंधारात फार सुंदर दिसत होते ,साधारण सात वाजता आश्रमाची जेवणाची घंटा वाजली आणि आम्ही आत वळलो , घाटावर विश्वाताई एकट्याच दिवे सोडत बसलेल्या , त्यांच्याकडे बघताना चुकूनही वाटलं नाही की आमच्याबरोबरची ही यांची शेवटची रात्र असेल .
जेवण करून रात्री लवकर झोपलो. सकाळी साडे पाच वाजता बाबाजींच्या हातचा गरम गरम पोहे आणि चहा घ्यायला एकच झुंबड उडाली होती , पोहे अतिशय चविष्ट होते यात वादच नव्हता . तिथल्या दक्षिणा पेटीत काही दक्षिणा टाकून आम्ही पुढे जायला निघालो ( जिथे जिथे आम्ही आश्रमात मुक्काम केला तिथे तिथे जमेल तशी दक्षिणा दिली ).
६. १२ . २०२०
खलघाट ला मौनीबाबांचा आश्रम आहे ,९.३० पर्यंत इथे पोहोचल्या नंतर थोडा वेळ विश्रांती घेतली , दुपारी १ वाजता इथे डाळ चावलं टिक्कड असं जेवण झाल्यानंतर आम्ही तिघी पुढे निघालो , उन्हाचं चालायला नको म्हणून काही जण थांबले होते , त्यांच्याबरोबर तुम्ही पण विश्रांती घ्या आणि मग या असं विश्वताईंना आम्ही सांगितलं , आजचा प्रवास फार रखरखीत उन्हातून करायला लागला , आजूबाजूला फक्त खडकाळ रस्ते आणि वीटभट्ट्या असा हा परिसर होता , बॉटलमधलं पाणी संपत आलं होतं , रस्त्यात मध्ये मध्ये छोटी टेकाडं लागली , तितक्यात दुरून वरच्या बाजूला एक छोटासा आश्रम दिसला , टळटळीत उन्हात , हिरव्यागार वेलींनी नटलेला आणि रंगीत फुलांनी बहरलेला तो आश्रम नजरेला खूप सुखद वाटत होता , पाणी मिळालं तर बघावं आणि थोडं टेकावं असा विचार करून आम्ही , वर गेलो , आश्रमातल्या बाबाजींनी तत्परतेने माठातलं थंडगार पाणी आणून दिलं , आम्ही बॉटल भरून घेतल्या , थोडा वेळ टेकलो , बाबाजींशी बोलताना कळलं की ते महाराष्ट्रीयन असून सांगली जिल्ह्यातले होते , त्यांनीही सांगितलं की एवढ्या उन्हाचं चालू नका , पण आता आम्ही चालायला सुरूवात केलीच होती , संध्याकाळी साधारण पाच साडेपाच ला बालाजी मंदिर चिखली ईथे पोहोचू या हिशोबाने निघालो होतो त्याप्रमाणे पोहोचलो तर तिथे विश्वाताई आधीच येऊन पोहोचल्या होत्या , मनात आलं म्हणजे यांनी आजही ओव्हर एक्झर्शन केलेलं आहे , मनात पाल चुकचुकली तेव्हड्यात रोहिणीला एका परिक्रमावासीचा फोन आला की पुढे महाराष्ट्रींयन लोकांसाठी आश्रम आहे तिथे जा , म्हणून मग आम्ही तिघी पुढे निघालो , ‘कुणाल पाटील ‘आणि’ राखी पाटील’ या तरुण दांपत्याने परिक्रमावासींयासाठी ‘चिखली’ इथे मैय्याच्या किनारी एक तात्पुरता आश्रम बांधून ,सेवा सुरू केली आहे , या दोघांची निष्ठा आणि सेवा भाव याला तोड नाही , जवळच राहणारी एक छोटी मुलगी आणि तिच्या आई , आज्जी वैगेरे त्यांच्या मदतीला सेवा म्हणून येतात ,सात आठ वर्षांच्या त्या मुलीचा कामाचा झपाटा , उत्साह आणि समज बघून थक्क व्हायला होतं , ईथे त्यांना भाकऱ्या वैगेरे बनवायला आम्ही मदत केली ,आणखी एक आवडलेली गोष्ट म्हणजे इथे बनारसला गंगा मैय्याची करतात तशी भव्य पंचारती घेऊन हे दोघे संध्याकाळी मैय्याची महाआरती करतात त्यावेळी प्रत्येक परिक्रमा वासीच्या हातात ती पंचारती देतात , मनाला खूप छान वाटतं , बाजरीची भाकरी , फ्लावर बटाट्याचा रस्सा , मेथीचं सॅलड ,आणि वरण भात असा महाराष्टीयन मेनू बऱ्याच दिवसांनी खायला मिळला , जेवण करून आम्ही झोपलो , साधारण १० ते साडे दहाची वेळ असेल ,बाहेरून कोणीतरी आवाज देत होतं “अरे वो डॉक्टर माई किसके साथ थी ?, उनको खून की उल्टीया हो रही है !... “ आवाज ऐकून रोहिणी खाडदिशी उठली “बापरे , विश्वांताई !.. “ मी ही उठले,आलेली व्यक्ती सांगत होती की विश्वताईंना बालाजी मंदिरात थांबल्यानंतर हायपर ऍसिडिटी झाली आणि मग रक्ताच्या उलट्या सुरू आहेत ,मी आणि रोहिणी ताबडतोब मग तिकडे गेलो , त्यांना ऍम्ब्युलन्स मध्ये नेऊन आम्ही दोघीनी ठिकरी या गावात सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट केलं , तिथे त्यांना डॉक्टरांनी काही इंजेक्शन्स वैगेरे दिले , त्यांच्या मुलांना कळवलं , झोपायला साधारण १ ते १. ३० वाजून गेला , रात्री त्यांनाही चांगली झोप लागली ,उलट्या तात्पुरत्या थांबल्या. त्यांची दोन्ही मुले रात्रीच निघाली असल्यामुळे सकाळी दहा पर्यंत पोहोचू असे त्यांनी कळवले , सकाळी विश्श्वाताई बऱ्या वाटल्या , उठून बोलत वैगेरे होत्या , त्यांनी चहा वैगेरे घेतला , मुले थोड्या वेळात येतील म्हणाल्या , मग त्यांना आराम करायला सांगून ,आम्ही ठिकरी इथून पुन्हा चिखली ला कुणाल पाटील यांच्या आश्रमात आलो , सुनीता आवरून वाट पाहत होती , आमच्या दोघींचं नर्मदा मैय्याचं जल तिच्या कडे होतं ,आल्यावर आम्ही आमचं आवरून पुजा करून निघालो ,पुढचा टप्पा ‘संकट मोचन ‘ हनुमान मंदिर भोईंदाला पोहोचलो , पुढचं मुक्कामाचं ठिकाण बरंच लांब असल्यामुळे इथेच रात्री थांबलो . ईथे काही गुजराथी मंडळींचा ग्रुप होता , आणि एक मुंबईच्या लोकांचा ग्रुप होता , काही m.p. आणि काही बिहारी साधू असे सगळेजण होते , सकाळी ३. ३० ला उठलो कारण एवढ्या सगळ्या लोकांसाठी एकच हातपंप आणि एकच टॉयलेट होतं पण तरीही पहाटेची आन्हिकं व्यवस्थित उरकली.
७. १२. २०२०
सकाळी पोह्यांचा बालभोग मिळाला . तो घेऊन पुढे निघालो ,आजचा रस्ता सगळा डांबरी होता ,नर्मदेश्वर महादेव मंदिर , लखनगाव इथे आजचा मुक्काम केला ,बकावा पासून एक गुजराथी परिक्रमावासींची टीम आमच्या बरोबर होती , आणि एक रमेश म्हणून मध्यमवयीन गृहस्थ होते , यांचा आणि आमचा चालण्याचा स्पीड साधारण सारखा असल्याने ही मंडळी अधून मधून भेटत नंतर शेवट पर्यंत आमच्या बरोबर होती , खूप छान सूर जुळले होते आमचे . रात्री भोजन प्रसादी झाल्यावर , मंदिराला लागून मांडव घातला होता तिथे झोपलो , मांडव अगदी हायवे ला लागून होता , त्यामुळे रस्त्यावर झोपलोय असंच फील येत होतं . इथेच ती दुःखद बातमी मिळाली की “ विश्वाताई गेल्या ‘ ..नर्मदे हर !... विश्वा ताईंची पायी परीक्रमा पहिली असली तरी बसने त्यांच्या तीन परीक्रमा झाल्या होत्या , मैय्याचं हे लेकरू मैय्याने आपल्याजवळ बोलावून घेतलं ,त्यांचं सोनं झालं , पण या बातमीने मला रात्रभर नीट झोप लागली नाही .
८. १२.२०२०
पहाटे लखनगाव वरून निघालो , मांडवा गड अंजेडी च्या दिशेने , चालत होतो , आठ साडे आठ ला एका आजोबानी चहासाठी आग्रहाने थांबवले तिथून चहा घेऊन , गप्पा मारून पुढे निघालो तो लगेच अजून एकाने चहाचं विचारलं , रस्ता क्रॉस करायचा कंटाळा आलेला आणि नुकताच चहा झालेला त्यामुळे त्यांना नाही म्हणालो, असं म्हणतात की परीक्रमेत असताना कोणी काही आपण होऊन द्यायला बोलावलं तर नाही म्हणू नये , पण आपल्या लॉजिकल माईंड ला ही अंधश्रद्धा वाटते , त्यातला मैय्याचा सूक्ष्म हेतू कळत नाही ,मग अद्दल घडते , आमचंही असंच झालं पुढे कित्येक तास काहीच मिळालं नाही ,साधा टेकायला कट्टाही नाही , असं अखंड चालत राहिलो , दुपारचा १. ३० वाजत आला, सकाळपासून १७ कि.मी. एकसारखं चालणं झालेलं , अंघोळ झाली नसल्यामुळे सगळं अंग चिकचिकत होतं , शेवटी मी आणि रोहिणी ने रस्त्यावर बसकण मारली, थोडा वेळ घरच्यांशी गप्पा मारल्या , व्हिडीओ कॉल वैगेरे झाले , बाजूने ट्रक , गाड्या , ईतर वाहनं जात होती , एरवी आपण असे बसलो असतो का ? गंमत वाटली आणि एक वेगळा अनुभव मिळाला , थोड्या वेळाने उठलो आणि चालायला लागलो , परत तेच लांबलचक डांबरी रस्ते , आता उन्हाने आणि भुकेने व्याकूळ झालो तेवढ्यात एक पत्र्याची शेड दिसली ,बस स्टॉप असावा असं वाटलं ,पण आत गेल्यावर बोर्ड लिहिलेला होता त्यावरून कळलं की एरवी परीक्रमा वासींसाठी तिथे जेवण देतात पण सध्या कोरोना मुळे ती सेवा त्यांनी बंद केली होती ,ईथे नर्मदा माईची खूप सुंदर आणि हसरी मूर्ती होती . (म्हणजे शेवटी तिलाच दया आली ,रस्त्यावर बसू नका म्हणाली ,
इथे थोडा वेळ बसलो , पायाला तेल लावलं , फोड आलेले दिसत होते तिथे औषध वैगेरे लावलं , थोडे चिप्स वैगेरे कोरडा फराळ करून निघालो , परत चालायला सुरूवात केली ,आजूबाजूला वाळलेलं गवत , मोठाले खडक आणि समोरचा काळा चकचकीत डांबरी रस्ता संपायचं नाव घेई ना ,साधारण तासभर पुन्हा चालल्या नंतर आता चालायचं त्राण उरलं नाही ऊन लागून भोवळ येते की काय असं वाटत होतं,अचानक सकाळची चूक लक्षात आली आणि हे असं का होतंय त्याचं कारण उमजलं त्याचक्षणी मैय्याची प्रार्थना केली , माफी मागितली ‘बाई गं सकाळी चहा नाकारला ते चुकलं , माफ कर परत अशी चूक करणार नाही , पण आता चालवत नाही ,प्लिज आता पुढच्या पंधरा मिनिटात मुक्कामाचं ठिकाण येऊ दे नाही तर मला चक्कर येईल ,’ हे असं मनात म्हणून झालं न झालं तोच एक मोठं वळण आलं आणि कॉर्नरलाच बोर्ड दिसला , “परीक्रमा वसियोंके भोजन एवं रहेने का प्रबंध , आश्रम - ग्राम चकेरी “ . काय आनंद झाला म्हणून सांगू … प्रेमाने मैय्याचे आभार मानले,अशी आहे ती माझी मैय्या खूप खूप गोड . (आता आमच्याबरोबर जे बाकीचे परिक्रमा वासी होते त्यांना पहिल्या पाच कि.मी. वर एका शिवमंदिरात भोजन मिळालं आणि अंघोळ वैगेरे करून , दुपारी विश्रांती घेऊन ते ‘चकेरी’ ला आमच्यानंतर सावकाश पोहोचले , आम्हाला शिवमंदिर चं कोणी कसं सांगितलं नाही याचं त्यांना आश्चर्य वाटलं ,म्हणून चहाचं किंवा कुठलंच आमंत्रण नाकारायचं नसतं कारण त्यातूनच पुढचा क्लू मिळतो , यानंतर आम्ही अशी चूक परत केली नाही आणि परत असा प्रसंग ही आला नाही )
9.12.2020
चकेरी इथला आश्रम म्हणजे दोन मोठ्या रूम , वरती पत्रा टाकलेला ,बाहेर एक टॉयलेट बाथरूम आणि कपडे वैगेरे धुण्यासाठी दोन -तीन नळाची सोय ,खूप निवांत वाटलं इथे , ईथले संचालक होते ते दिसायला अतिशय साधे , सडपातळ शरीरयष्टी , पांढरा सदरा आणि पांढरी लुंगी , उत्पल दत्त सारखा ‘डोळे हाय रिझोल्युशन’ मध्ये दिसतील असा चष्मा ,आणि मागे वळवलेले केस , बोलण्यात वागण्यात वेगळीच चमक ,छान फ्लुएंट ईंग्लीश बोलत होते , परीक्रमा वासियांचं फार आस्थेने आणि प्रेमाने आदरतिथ्य करत होते , स्वतः: हाताने जेवायला वाढत होते , मुगाची उसळ , रोटी , डाळ चावलं असं सात्विक भोजन त्यांच्या बल्लवाचार्याने बनवलं होतं , हे दोघेच इथे राहतात , बल्लवाचार्य जरा स्वतःच्याच नादात रमणारे आणि सनकी वाटत होते पण त्यांचा आम्हाला काही त्रास नव्हता . इथे कपडे वैगेरे धुवायला भरपूर पाणी मिळाल्यामुळे मनसोक्त कपडे धुतले , चैन झाली असं वाटलं , घरी आपल्याला किती गोष्टी सहजच मिळून जातात तेव्हा त्यांची किंमत कळत नाही , मैय्या इथे प्रत्येक गोष्टींची जाणीव अनुभवातून करून देते त्यामुळे अभ्यास पक्का होतो . नापास व्हायचा काही चान्सच नाही .
रात्री ‘कढी खिचडी ‘अशी भोजन प्रसादी झाल्यावर बाबाजींनी काही उपदेश केला तो खरोखरच अंजन घालणारा होता , त्यांचा आवाज थोडा घोगरा आणि बोलणं खूप स्पष्ट , ऐकायला खूप छान वाटत होतं , आपण ‘रजनीश ‘म्हणजे ‘ओशोंचे लांबच्या नात्याने भाऊ आहोत हे त्यांनी सांगितलं आणि डोक्यात प्रकाश पडला की हे ओळखीचे का वाटतायत . बाबाजींनी (‘कल्पेश त्यांचं नाव ,) सांगितलं जेव्हा परिक्रमा करता तेव्हा धावाधाव करू नका , रोज किती अंतर कापायचं ते ठरवून पळत सुटायचं असं करू नका , मैय्यावर सगळं सोपवा आणि शांतपणे प्रत्येक स्थळ , त्याचं महत्व , आणि त्याची पूर्ण माहिती घेऊन ,चौकस बुद्धीने चालत रहा , पुन्हा पुन्हा परीक्रमा करायचं पुण्य लाभत नसतं . पिकनिक ला चालतोय असं चालू नका , इथे प्रत्येक स्थळ जागृत आणि महत्व पूर्ण आहे त्याची नीट माहिती घ्या , त्यांनी त्यांच्या परिक्रमेतली एक गोष्ट आम्हाला उदाहरणा दाखल सांगितली , ते जेव्हा परीक्रमेत होते त्यावेळेस एकदा ते ज्या आश्रमात एक रात्र मुक्कामाला थांबले होते तो आश्रम स्मशानाच्या बरोब्बर समोर होता , ह्यांनी तिथल्या साधुमहाराजना कुतूहलाने विचारलं , “महाराज ये आश्रम आपने यहा शमशान के सामने क्यू बनवाया है ? हर रोज यहा पे चिता जलती हुई दिखती है , बदबू आती है , “ यावर त्या साधुमहाराजांनी त्यांच्याकडे कांही न बोलता फक्त पाहिलं , पण हे गप्प न बसता जोवर त्यांच्याकडून उत्तर मिळत नाही तोवर विचारत राहिले ,बाकीचे लोक त्यांना सांगत होते , असं काही विचारू नका म्हणून ,पण कल्पेशजी विचारत राहिले ,साधु महाराज मात्र मौनात होते , रात्री भोजन प्रसादी झाल्यावर सगळे झोपले त्यानंतर साधारण साडे तीन वाजता साधू महाराजांनी ‘कल्पेशजींना ‘ उठवलं आणि स्नान वैगेरे करून ये असं सांगितलं , मग ते त्यांना आश्रमाच्या मागच्या बाजूला घेऊन गेले तिथे एक शिवलिंग होतं , त्यांनी कल्पेश जी कडून त्या शिवलिंगाची पूजा करवून घेतली आणि बिल्वार्चन करून घेतलं , त्यानंतर सांगितलं की स्मशान तर आत्ता झालं , पण इथे हे शिवलिंग जे आहे ते अतिशय प्राचीन म्हणजे ‘मार्कण्डेय ऋषी ‘नी स्व हस्ते स्थापन केलेलं आहे , म्हणून मी हा आश्रम ईथे बांधला आहे , पण आजपर्यंत असा प्रश्न मला कोणीही विचारला नव्हता , तू विचारलास म्हणून या जागृत शिवलिंगाची पूजा तुझ्या हस्ते करून घेतली ,” त्यामुळे ज्याची जेवढी तयारी असेल तेवढे अनुभव प्रत्येकाला मिळतात आणि ते वेगवेगळ्या पातळीवर असतात तेव्हा तुम्ही ग्रुप जरी करत असाल तरी मैय्या तुम्हाला वेगळं करते , तेव्हा जितकं घेता येईल तितकं इथून घेऊन जा .. “ असं सांगून कल्पेशजींनी त्यांचं प्रवचन आटोपतं घेतलं , रात्री लवकर झोपलो त्यामुळे सकाळी लवकर आटोपून निघालो ,
१०. १२. २०२०
सकाळी सहा वाजता चालायला सुरूवात केली , साधारण नऊ वाजता एका छोट्या गावात पोहोचलो तिथे हनुमान मंदिरात भोजन प्रसादीची सोय होती पण त्याला वेळ होता आणि ईतक्या लवकर भूक पण नव्हती , मी एकटीच पुढे निघाले , सुनीता आणि रोहिणी तिथे थांबल्या , पुढचा मुक्काम ‘करी ‘या गावी करायचा होता आणि अंतर साधारण 18 -20 की .मी. असल्यामुळे मी न थांबता चालत राहिले , नामस्मरण करत निघाले होते , सगळीकडे चकचकीत डांबरी रस्ते आणि आजूबाजूला डोंगर, साधारण दोन एक तासानंतर ‘तलौन’ नावाचं छोटं गाव लागलं ,तिथे एकाने चहा -बिस्कीट दिलं ते घेऊन पुढे निघाले , पुन्हा डोंगर आणि रस्ता कापत पुढे ,आता दुपारचा दीड वाजत आला होता , ‘मेकलसुता नावाचा आश्रम रोड ला लागूनच आहे असं मघाशी गावात दोन परिक्रमा वासी भेटले त्यांनी सांगितलं होतं त्यामुळे पहात निघाले , दुपारी दोन ला आश्रम दिसला , एक मोठा हॉल आणि बाहेर जेवण्यासाठी मोठी ओसरी आत एक छोटं किचन असं साधारण स्वरूप होतं , मी दिसताच त्यांनी अतिशय आनंदाने आणि आदराने बोलावलं , भूक लागलेली होतीच , पण आधी सॅक मध्ये ओले कपडे होते ते वाळत घातले , पायाचे फोड जरा आज त्रास देत होते त्याला औषध लावलं , दोन तीन बिहारी परिक्रमा वासी आणि एक साधू असे आत झोपले होते ,जेवण करून मग मी सुनीता आणि रोहिणी ला फोन केला तर त्याही नुकत्याच जेवण करून निघाल्या होत्या, पण त्यांना यायला वेळ होता , मग थोडावेळ ईथेच विश्रांती घेतली , तीन साडे तीनच्या दरम्यान त्यांनी रस्त्यावरूनच आवाज दिला , कपडे अजून ओलेच होते ते तसेच पॅक करून मी त्यांच्याबरोबर निघाले, पुढचा मुक्काम बडवानी ला करायचा होता आणितेअजून सहा सात की.मीं.वर होतं , बडवानी हे मोठं शहर आहे त्यामुळे इथे लागणाऱ्या वस्तूंची खरेदी वैगेरे केली, संध्याकाळी साधारण सहा वाजता ‘सिद्धेश्वर’ आश्रमात पोहोचलो .आज जवळजवळ तीस कि.मी.चाललो होतो , सिद्धेश्वर आश्रम म्हणजे खरं शंकराचं मोठं मंदिर आहे पण परिसर अतिशय विस्तीर्ण आणि मोकळा आहे , अंगणात आम्ही सर्वानी आपापली आसनं लावली ,भरपूर परिक्रमावासी होते इथे मुक्कामाला , ईथे पुण्याचेही काही परिक्रमावासी भेटले , गुजराथी फॅमिली पण ईथे थांबल्या होत्याच आणि हो ‘मीराबाई’ पण ईथेच मुक्कामाला होती , तीबोलत नसली तरी तिचा आसपास असलेला आवर मनाला खूप शांत करून जाई , ईथे आम्ही एक दिवस पूर्ण मुक्काम करायचे ठरवले , माझे कपडे खूप काळ ओले सॅक मध्ये तसेच राहिल्याने त्याला वास येऊ लागला होता , कपड्यांचे दोनच सेट असल्यामुळे मी ते ताबडतोब परत धुवायला घेतले , सगळे धुवून वाळत घालायला इथे भरपूर जागा होती आणि वेळ पण होता , खूप आनंद झाला मला , सुख कीती छोट्या छोट्या गोष्टीत दडलेलं असतं आणि किती सापेक्ष असतं हे अगदी प्रॅक्टिकली पटलं . पुढे शूलपाणी जंगल लागणार असल्याने त्यावर सर्वांची प्रदीर्घ चर्चा झाली , जंगलातूनच का जायचं तर ते मैय्याचं हृदय स्थान आहे , पण ईथे सर्वांनी शक्यतो एकत्र चालायचं असं ठरलं , मुंबईच्या एका लेडीज ग्रुप ने बाय रोड जायचं ठरवलं त्यामुळे त्यांच्यातल्या एक काकू आम्हा तिघींबरोबर यायचं असं म्हणाल्या कारण आम्ही जंगलातून जाणार होतो आणि त्यांना जंगलातून यायचं होतं , त्यांचं वय साधारण सत्तरीच्या आसपास होतं . बडवानी ला एक दिवस पूर्ण विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशी पहाटे उजाडल्यावर चालायला सुरूवात केली.
--
11.12.2020
आज सकाळपासूनच कुंद वातावरण होतं , पाऊस नव्हता पण आभाळ आलेलं होतं , सिद्धेश्वर आश्रमात चहा बिस्कीट खाऊन निघालो होतो त्यामुळे कुठेही न थांबता चालत राहिलो पहिला टप्पा ‘गायत्री आश्रम ‘ , आश्रम छोटासा आणि सुबक होता , आजुबाजुला तुरीची शेतं आणि पुढे भोपळ्याच्या वेलींनी बहरलेला होता , ईथे , चहा घेतला तोवर रिमझिम पाऊस सुरू झाला होता , थोडा वेळ थांबून निघालो. एकत्र चालायचं ठरवलं होतं तरी चालण्याचा स्पीड वेगवेगळा असल्याने पुन्हा सगळे पांगले , सुनीताचा उजवा गुडघा दुखत असल्यामुळे ती आज हळू हळू चालत होती, मी आणि रोहिणी आज पुढे मागे होतो ,सॅक ला कव्हर टाकून आम्ही चालत होतो , परीक्रमेत आल्यानंतर आज पहिल्यांदाच रामरक्षेची सात आवर्तनं करावी असं मनात आलं ,( गुढी पाडवा ते राम नवमी रोज ११ वेळा रामरक्षा म्हटली तर ती सिद्ध होते असं म्हणतात , तशी मी केली आहे ) त्याप्रमाणे सुरू केली पिछोडी गाव लागेपर्यंतचा हा सगळा रस्ता अतिशय निसर्ग संपन्न आहे , धरण बांधल्यानंतर ही गावं इथे वसवली गेली पण त्यांचं पुनर्वसन नीटसं झालेलं नाही , त्यामुळे लाईट ,पाणी ईथे अभावानेच दिसते , रिमझिम पावसात , सॅक अडकवून अख्ख्या रस्त्यावरून एकटेच चालताना खूप मस्त वाटत होतं , समोरचे हिरवे गार डोंगर डोळ्यांना खूप सुखद वाटत होते , मनात रामरक्षा चालू होती , एक दोन आवर्तनं झाली असतील , पुढे गेलेली रोहिणी थांबली म्हणून मी पण थांबले , पाऊस थोडा वाढला होता तिने तिच्याकडे असलेलं प्लॅस्टिक कव्हर काढलं आणि डोक्यावर घेतलं , मी ही थोडं थांबून माझी सॅक नीट लावत होते तेवढ्यात मागून दोघे तरुण आले , हिन्दी भाषिक होते ,त्यातला एक जण मला म्हणाला , “ माई सामान बहोत है आपका , ईतना चल नही पाओगे “ मी म्हटलं “हा भैय्याजी लेकिन सब सामान लगता है तो क्या करे “ यावर “ अच्छा! “ असं म्हणून ते पुढे निघून गेले ,माझी रामरक्षा पुन्हा सुरू झाली , माहिती नाही का पण, “ ध्यायेत आजानुबाहुं ..पासून दधत मुरूजटा मंडनं रामचंन्द्र “ अस म्हणत असताना मघाचा “माई आपका सामान बहोत है” म्हणणारा आठवायला लागला आणि खरंच रामाचं वर्णन त्याला चपखल लागू पडत होतं त्याची सणसणीत उंची , डोक्यावर बांधलेला जटाभार , शुभ्र धोतर आणि पंचा , तेजस्वी वर्ण ,खरंच की एक क्षणभर माझ्याशी बोलून तो झपाटयाने पुढे गेला होता तरी तेवढ्या वेळात माझ्या मनाने कित्ती गोष्टी टिपून घेतल्या होत्या , मग मला वाटलं अरे लक्ष्मणाचा चेहेरा आपण पहिलाच नाही ,असो.. माझं पुढचं आवर्तन सुरू झालं , मध्येच चुलत सासूबाईंचा फोन आला , एकटी चालू नकोस त्यांनी बजावलं , मग थांबले आणि रोहिणी मागे पडली होती तिची वाट पाहत उभी राहिले .ती लांबून येताना दिसली तशी मी पुन्हा चालायला लागले काही अंतर चालल्यानंतर मघाची जोडी पुढे चालताना दिसली ,
आणि आता गंमत म्हणजे त्यातल्या लक्ष्मणाने अगदी आवर्जून मागे वळून बघितलं आणि हात केला, मला हसू आलं , (लक्ष्मण काही खास लक्षात राहण्यासारखा नव्हता ) ह्या गंमती माईच्या चालू आहेत का ? काय माहिती , पुढे ते दोघे एका देवळात थांबले होते मला बोलावून त्यांनी गूळ-शेंगदाणे दिले , प्रसाद समजून मी खाऊन टाकले , माझी रामरक्षेची आवर्तनं संपली त्यानंतर ते दोघे मला किंवा रोहिणीला परत दिसले नाहीत , खरं तर तेही परीक्रमेत होते , पण त्यांचा स्पीड कदाचित फार असावा , माझ्या मनाने मात्र शेवटपर्यंत त्यांची ‘राम-लक्ष्मण’ म्हणूनच नोंद केली .असो..जवळ जवळ बावीस एक कि.मी.चालल्यानंतर पिछोडी गाव आलं , पाऊस रिमझिम रिमझिम चालूच होता, ईथे आश्रम नाही परंतु एका गावकऱ्याने त्याच्या घराजवळ खाली (त्याच्या घराचा जोता उंच आहे वर चढून जावं लागत होतं ) रिकाम्या जागेत वर आणि खाली प्लॅस्टिक टाकून तात्पुरती व्यवस्था केली होती , आम्ही आत डोकावून पाहिलं तर आधीच पंधरा एक परीक्रमा वासी तिथे बसले होते , जागा खूप अपुरी होती पण बाहेर पाऊस आणि पुढे १२ कि.मी. पर्यंत काहीच सोय नव्हती म्हणून मग ईथेच थांबलो , दुपारचा दीड वाजून गेला होता ,जेवणाची सोय झाली पण आता मुक्कामाचं काय हा प्रश्न पडायच्या अगोदरच नर्मदा मैय्याने आमची राहायची सोय ही केली , गुजराथी फॅमिली आणि सुनीता ही तोपर्यंत आले होते , समोर रस्त्याच्या पलीकडे एक छोटासा बंगला होता , बंगला म्हणजे गावातली बांधलेली घरं असतात तशी , त्यांच्या घराच्या हॉल मध्ये आम्ही राहिलो , पथाऱ्या म्हणजे आसनं टाकली , बाहेर पाऊस सुरू होता आणि आज चालणं भरपूर झालं होतं त्यामुळे त्या कुटुंबियांशी गप्पा मारत बसलो , ईथे सुनीताचा गुडघा पुन्हा खूप दुखु लागला , गावात एक जण पाय चोळून ठीक करून देतील असं सांगितल्या मुळे ती जाऊन आली , थोडा आराम वाटला , आम्ही सर्व एकंदरीत १२ ते १५ लोकं एकाच छोट्या हॉलमध्ये असू त्यात लाईट बऱ्याचदा जात होती आणि कोंबड्या , बकऱ्या , उंदीर यांचा ईथे मुक्त वावर होता , त्यात घरातल्या गृहिणीशी (यांची भाषा निमाडी असते , कधी कधी हिंदी शब्द कळतात , पण आमचा हिंदीत आणि त्यांचा निमाडीत असा मुक्त संवाद होत होता आणि दोन्ही बाजूंना व्यवस्थित कळत होता हे विशेष ) तर तिच्याशी बोलताना कळलं की रात्री ईथे लांडगा येतो , बकऱ्या किंवा कोंबड्याना ओढून घेऊन जातो , संध्याकाळी सात वाजताच आपापल्या स्लीपिंग बॅग मध्ये घुंसून चिडीचूप झोपून घेतलं , रात्रभर पाऊस कोसळत होता . सकाळी उठल्यावरही चालूच होता तशीच आन्हिकं उरकली . अर्थात सगळं बाहेर . रात्री जेवलो नव्हतो म्हणून आमच्या यजमानांनी बायकोला पोहे करायला सांगितले , गावात एकच दुकान त्यांना आमच्यासाठी सगळं साहित्य विकत आणावं लागलं , वाईट वाटलं , आपण परीक्रमा करणार त्यांना त्रास का द्यावा ? पैसे देऊ केले पण त्यांनी घेतले नाहीत , “पाप लगेगा “ म्हणाले , त्यांची मैय्यावर खूप श्रद्धा असते , “माई को अच्छा नही लगेगा “ असं सगळीकडे ऐकू येत असतं . त्यांच्यासाठी मैय्या ही तुमच्या माझ्यासारखी अस्तित्वात आहे . आणि एवढे नाना विविध अनुभव घेतल्यानंतर त्यांची ही श्रद्धा खरी आहे असं आपल्यालाही वाटायला लागतं आपणही मैय्यामय होऊन जातो .
१२-१२-२०२०
सकाळी नऊ -दहा च्या सुमारास पाऊस थांबला तसे आम्ही सर्वच जण निघालो , पिछोडी पासून पुढे भवनी , नऊ कि.मी. वर मोरकट्टा आणि मग बोरखेडी , आज जवळजवळ ३० कि.मी. चाललो साधारण पाचच्या सुमाराला बोरखेडी ला पोहोचलो , ईथे हिरालाल रावत यांचा आश्रम आहे , हे कोणे एकेकाळी लुटणाऱ्या आदिवासींपैकी होते हे सांगूनही खरे वाटणार नाही , अतिशय रूबाबदार व्यक्तिमत्व , चारी बाजूंनी पत्रे ठोकून साधारण वीस एक लोक थांबतील असा आश्रम त्यांनी पुलाच्या खाली विस्तीर्ण पटांगणावर बांधला आहे . तिथे गेलो , आसन लावलं आज कपडे धुवायचे राहिले होते , अंघोळही नव्हती मिळाली , संध्याकाळ होत आली होती , अंघोळी साठी पुलावरून पलीकडे खाली उतरून एक हातपंप आहे तिथे जावे लागेल असे कळले , मी आणि रोहिणी गेलो , उघड्यावर अंघोळ पहिल्यांदाच करत होतो , रोहिणी आणि मी क्रमाक्रमाने अंघोळ करताना वरून कोणी पाहत नाहीये ना वैगेरे बघत बघत पटापट आवरलं , पण कोणीच नव्हतं इनफॅक्ट , कोणी असं बघत देखील नाही . हा सगळा आदिवासी भाग असूनही कल्चर आणि सभ्यता त्यांनाच जास्त कळते असं वाटतं . रात्री सर्वांनी मिळून चुलीवर खिचडी बनवली , सकाळी सात वाजता निघायचं होतं उद्यापासून शूलपाणीचं जंगल सुरू होणार त्यामुळे ओझी वाहण्यासाठी पोर्टर घ्यायचे असं आम्ही ठरवलं . रात्रभर पाऊस पडत होता , आडवा तिडवा आणि जोरदार ,पण टेम्पररी कनात लावलेली असूनही आत पाणी आलं नाही हे विशेष . खरंच ती किती काळजी घेते !..
१३-१२-२०२०
सकाळी सात वाजता आवरून निघालो , बरोबर चार पोर्टर होते , शूलपाणी जंगलातला पहिला दिवस , थोडंसं अंतर पुढे गेल्यावर चहासाठी एके ठिकाणी थांबलो , ईथे बस उभी होती , आणि सुनीताच्या पायाच्या दुखण्याने चांगलाच जोर धरला , एकदा पुढे गेलं की परतता येणार नाही , याच बसने मागे फिरावं आणि मग बसने परीक्रमा करावी असा विचार करून ती तिथूनच निघाली आणि पुढे मग ओंकारेश्वरला गेली . आम्ही पुढे चालणं सुरू केलं , प्रचंड उंच डोंगर आणि उतार , कधी चांगली वाट तर बहुतेक वेळा जेमतेम पाय मावेल एवढी अरुंद वाट आणि खाली हजार फूट किंवा जास्तच खोल अशी दरी , बरं निसटलो तर धरायला काँग्रेस गवतासारख वाळलेलं गवत , पण मैय्यावर भरवसा ठेऊन चाललं की ते सहज पार करून होतं आणखी एक म्हणजे ईथली माती आपल्या महाराष्ट्रातल्या मातीसारखी निसरडी नाही त्यामुळे पाय सटकत नाही , माझे बाटा चे शूज मला खूप उपयोगी पडले एकदाही घसरले नाही की पडले नाही , खूप छान ग्रीप मिळत होती पायांना , असे साधारण दहा एक डोंगर चढलो उतरलो असू , मध्ये एकदा घोंगसाला दुपारी थांबलो तिथे बोटीतून जावं लागलं , वातावरण खूप ढगाळ होतं आणि मैय्याचं बॅक वॉटर तिथे आहे त्यातूनच बोटीने पुढे जावं लागतं , आश्रम वर उंचावर आहे , आज तिथे जेवणात सोयाबीनची भाजी आणि मोठे मोठे टिक्कड होते , खाऊन लगेच निघालो कारण संध्याकाळच्या आत जंगल पार करायचं होतं , या जंगलात वाघ , अस्वल आदी प्राणी आहेत हे माहिती असल्यामुळे डोक्यात ठेऊन त्याप्रमाणे चालत होतो , संध्याकाळचे साडे पाच वाजत आले अजून तीन -साडे तीन कि.मी. बाकी आहे आणि ते अंधार पडायच्या आत कव्हर होणार नाही असं कळल्यामुळे जंगलात एका आदिवासी घरात मुक्काम करायचं ठरवलं , वर उंच डोंगरावर त्यांचं घर ते बघून पायातलं त्राणच गेलं , एवढं चालल्यानंतर आता पुन्हा तो उभा सुळका चढून कसं जाणार ?जीवावर आलेलं , पण निघालो मैय्याचं नाव घेत निघालो , आणि थोड्याच वेळात हाश हूश करत पोहोचलो , घर जरी मोठं असलं तरी जंगलात असल्या कारणाने लाईट नव्हतीच थोड्याच वेळात काळाकुट्ट अंधार झाला ,बिचारे आदिवासी , अंगावर पुरेसे कपडेही नव्हते पण चहा देऊ केला त्यांनी , तो पिऊन बॅटरीच्या प्रकाशात पूजा आरती वैगेरे उरकली आणि आता यांच्याकडे एवढ्या १०-ते १२ लोकांची जेवणाची सोय कशी होणार , आपल्याला झोपायला सुरक्षित जागा मिळाली यातच मैय्याचे खूप आभार मानून आम्ही स्लीपिंग बॅग मध्ये शिरून गुडूप झोपून घेतलं , लगेच गाढ झोप लागली , किती वेळ गेला माहिती नाही ,आम्हाला कोणीतरी उठवत होतं ,”मैय्याजी उठो , खाना खा लो “ आधी तर वाटलं स्वप्नच आहे , डोळे उघडले तर समोर काळाकुट्ट अंधार , दोन सेकंद कुठे आहोत हे लक्षातच येईना , मग कुणीतरी बॅटरी ऑन केली तेव्हा घराचा मालक आम्हाला जेवण्यासाठी उठवत होता हे कळलं , खरच मैय्या उपाशी झोपू देत नाही , गरम मसुराची आमटी , चुलीवरची बाजरीची भाकरी आणि वाफाळलेला भात , पुन्हा एकदा गहिवरून आलं , त्यांच्याकडे असलेल्या चिमणीच्या प्रकाशात जेवण करून पुन्हा झोपलो . खेरवानी नावाचा आदिवासी पाडा होता हा , प्रसाद समजून जेवले मी , या लोकांनी दिलेल्या आश्रयाची किंमत कशातही करू शकत नाही आणि आपल्या सारख्या शहरी लोकांकडे एवढा मनाचा मोठेपणा महत्प्रयासानें किंवा अपवादात्मकच येऊ शकतो एवढं नक्की .
१४. १०. २०२०
सकाळी आन्हिकं उरकून निघालो ,कालचं राहिलेलं साडे -तीन की .मी. चं अंतर पार करून साडे नऊ च्या सुमारास ‘सेमलेट ‘ इथे पोहोचलो , ईथे सरपंचाच्या घराच्या बेसमेंट मध्ये परिक्रमा वासींची सोय केली होती , आमच्यातल्या एका काकूना ईथे ‘फूड इन्फेक्शन’ चा त्रास झाला , वयस्कर असल्यामुळे त्यांना ते झेपेना , बरोबरचे सगळे परीक्रमावासी पुढे निघून गेले , त्यांची नीट व्यवस्था होत नाही तोवर त्यांना टाकून पुढे जायचं माझ्या आणि रोहिणीच्या जीवावर आलेलं, गोळ्या घेऊनही उतार पडेना ,सरपंचाला डॉक्टर बद्दल विचारलं असता ईथे डॉक्टर दुसऱ्या गावातून बोलवावा लागतो , तो संध्याकाळी येईल, आणि ईथे वाहनाची वैगेरे सोय नाही , आज सकाळी आठ वाजता येऊन गेलेली बस दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजताच येते , आता काय करायचं ? बरं काकूंचं डिहायड्रेशन सुरू च होतं ,मग पुन्हा सरपंचाना रिक्वेस्ट करून एखादी खाजगी गाडी मागवता येते का ते विचारलं , ते म्हणाले बघतो, त्यानंतर बरीच फोनाफोनी झाल्यावर एक गाडी यायला तयार झाली , त्यांना घेऊन मग आम्ही बडवानी ला रिटर्न आलो , साधारण तीन एक तास लागले , आल्यावर लगेच हॉस्पिटल ला ऍडमिट केलं , तिथे त्यांना ताबडतोब सलाईन , इंजेक्शन देण्यात आलं , पुण्याला त्यांच्या मुलीला कळवलं , ती तिथून रात्रीच निघाली , ती येईपर्यंत आम्हाला टेन्शन होतंच कारण त्यांचा त्रास थांबत नव्हता ,रात्री डॉक्टरांनी आम्हाला तिथेच थांबायला सांगितलं आमच्या सॅक , दंड , मैय्याचं जल वैगेरे सगळ्या सामुग्री सह तिथेच राहिलो , सकाळी त्यांना थोडा आराम वाटला , मुलगी आणि जावई देखील सकाळी पाच वाजेपर्यंत पोहोचले , मग त्यांना मुलीच्या ताब्यात देऊन, पहाटे तिथेच ब्रश वैगेरे करून आम्ही निघालो , रात्री आम्ही दोघीनी थोडा विचार विनिमय करून घरी परतायचं ठरवलं , कारण मागे परत आल्यामुळे परीक्रमेच्या नियमाचा भंग झाला होता आणि दोन्ही वेळेस आलेल्या या अनुभवाचा नाही म्हटलं तरी मनावर थोडा परिणाम झाला होता . घरी फोन केला , आणि परत येतेय असं कळवलं .
१५. १२. २०२०
सकाळी साडे पाच ला हॉस्पिटल मधून निघालो तेव्हा खिन्न आणि उदास वाटत होतं ,आपली परीक्रमा अर्धवट झाली याचं शल्य मनाला बोचत होतं , नेमकं काय चुकलं ते ही कळत नव्हतं , रोहिणी म्हणाली ,” स्टेशनवर चहा घेऊ “,रात्री धावपळीत जेवलो नव्हतो त्यामुळे सकाळी खूप भूक लागली होती , पहाटेचा अंधार असला तरी स्टेशनवर चहा , पोहे मिळत होते , मग समोर एका चहाच्या स्टॉल पाशी गेलो , पोहे घेतले , खाऊन होतायत तोवर समोर एका माणसाने पाण्याचा ग्लास अगदी दोन्ही हातात माझ्या समोर धरला , पहाटेच्या अंधारात समोरच्या लाईट च्या प्रकाशात लक्षात राहिले ते कौतुकाने आणि अदबीने चमकणारे त्याचे डोळे , न बोलता तो हे करत होता , मी पाणी घेऊन गपचूप प्यायले तोवर त्याने चहाचा कप समोर धरला , तो ही घेतला ,तेवढयात ‘ इंदोर , इंदोर ‘ असं एक बसवाला ओरडत आला , रोहिणी पळत निघाली ,जाता जाता तिने मला हाक मारली , तिला मी ‘आले ‘म्हटलं आणि स्टॉल वरच्या बाईला विचारलं , “कितने पैसे हुए ? “ त्यावर ती म्हणाली “ आप दोनो के पैसे तो वो दे के गये , “ तीने हात दाखवलेल्या दिशेने मी पाहिलं तर तो मघाचाच माणूस होता , पाठमोरा चालताना दिसला . एकदम डोळे भरून आले . गाडीत बसल्यावर रोहिणी ला सांगितलं , ती हसली आणि आम्ही दोघी एकदमच म्हणालो , “बघ मैय्याने जाता जाता पण आपले लाड केले . मनात म्हटलं “रोहिणी आपली परीक्रमा खंडित नाही झाली ,आता ऊलट आपण परत परत जाऊ , Divinity has welcomed us with open arms !.. “
मन्नत के धागे ऐसे हे बांधे ,
टूटेना रिश्ता जुडके तुझसे कभी !..
सौ बलाये ले गया तू सर से रे ,
नैना ये मल्हार बनके बरसे रे !!.. ...
नर्मदे हर !
नर्मदे हर !
जगन्नाथ कुंटे यांचे पुस्तक
जगन्नाथ कुंटे यांचे पुस्तक वाचल्यावर नर्मदा परिक्रमेची खूप इच्छा होते, पुढच्या वेळी नक्कीच तुमची परिक्रमा पूर्ण होईल.
@गौरी : मनापासून धन्यवाद!’.
@गौरी : मनापासून धन्यवाद!’..परीक्रमा अपूर्ण राहिल्याची खंत मला नाहीये , आलेले अनुभव महत्वाचे असतात हेच सांगायचं आहे मला यातून, पूर्ण किंवा अपूर्ण हे आपण ठरवतो कारण आपल्याकडे लिमिटेशन्स असतात.
सुंदर अनुभव आहेत. __/\__
सुंदर अनुभव आहेत. __/\__
३०-३०'किमी चालयचा तुम्ही
३०-३०'किमी चालयचा तुम्ही म्हणजे खरच हँट्साॅफ
परिक्रमा पुर्ण व्हायला हवी होती,एकदम थांबायचा निर्णय कसा काय झाला
विश्वाताइईंचे वाईट वाटले
चांगलं लिहिलेय. तुमची
चांगलं लिहिलेय. तुमची परिक्रमा लवकर पूर्ण होवो .
खूप छान लिहिलंय... !! पुढील
खूप छान लिहिलंय... !! पुढील वारी साठी शुभेच्छा तुम्हाला..!
मस्त आहेत एकेक अनुभव.
मस्त आहेत एकेक अनुभव.
खरच वेगळीच असते का परिक्रमा?
खरच वेगळीच असते का परिक्रमा? बरच ऐकले आहे.
छान लिहिलेय. वर्णन आवडले.
छान लिहिलेय. वर्णन आवडले.
चितळ्यांची नर्मदा गाथा यु ट्यूबवर पाहिलीय. त्यांनी खूप छान सांगितले आहे.
हल्ली हल्ली खूप जणांनी लिहिलेल्या परिक्रमा वाचल्या. बहुतेक जणांनी मैय्या कसे खायप्यायचे लाड करते ते लिहिलेले वाचून कंटाळा यायला लागलेला. पण तरी तुमची परिक्रमा आवडली.
जगन्नाथ कुंट्यांचे पुस्तक वाचून नर्मदा परिक्रमा करावी असे खूप वाटायला लागले होते. पण तितका वेळ देता येणे शक्य नाही. बाकी मैय्याची इच्छा.
परिक्रमा करताना मनात 'जगात शांती नांदू दे' ही इच्छा धरून करावी असेही वाटते. ही इच्छा पूर्ण करणे कदाचित नर्मदामैय्यालाही शक्य नसेल असेही मग वाटू लागते.
खूप सुंदर लिहिलं आहे तुम्ही.
खूप सुंदर लिहिलं आहे तुम्ही. शेवट पर्यंत वाचेपर्यंत थांबवत न्हवते. बरचं ऐकलेले आहे परिक्रमेबद्दल पण तुमचा अनुभव पहिला नीट वाचला.
धन्यवाद इथे शेअर केल्याबद्दल.
परिक्रमा पूर्ण करण्यासाठी
परिक्रमा पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा... छान लिहिलं आहे
अनुभव आवडला. तुम्ही लिहिला पण
अनुभव आवडला. तुम्ही लिहिला पण छान आहे.
मला वाटते की परिक्रमेवेळी येणारे चमत्काराचे अनुभव स्वतःजवळच ठेवावेत. त्याची वाच्यता करू नये. माणूस श्रद्धेपोटी, नर्मदा मैय्या वर असणाऱ्या भक्ती पोटी अशा परिक्रमेला जातो मग काही चमत्कारिक अनुभव आल्यास आश्चर्य का वाटावे? बरेच अनुभव कथन अशा प्रकारचे असतात - "आम्हाला दाल भाफळे खायची इच्छा झाली आणि संध्याकाळी प्रसादात बघतो ते काय दाळ भाफळे. मैय्याची कृपा" . मध्य प्रदेशाची खाद्य संस्कृती पाहता दाल बाफळे खूप कॉमन आहे. स्थानिक जेवणात दाल बाफळे दिवसाआड बनतात म्हणून ते जर ताटात आले तर त्याचा संबंध मैय्याशी जोडणे थोडे खटकते. भक्ती मार्गात चमत्कारा बद्दल आश्चर्य व्यक्त करणे हे आपल्या भक्तीवरच प्रश्न उपस्थित करणे नाही काय?
अवांतर : हल्ली पुस्तके
अवांतर : हल्ली पुस्तके ल्यावीत म्हणून परिक्रमा करणारी पण लोके आहेत,
मुळातला आध्यात्मिक गाभा हरवत चाललेला आहे.
चैत्रगंधा : मनापासून आभार !
चैत्रगंधा : मनापासून आभार !.. बन्या : तिथली श्रद्धाच आपल्याला चालवते , खरंच त्यात आपलं योगदान एवढंच की तिच्यावर श्रद्धा ठेवायची आणि थांबायचं म्हणाल तर लागोपाठ घडलेल्या अनपेक्षित दोन अनुभवांमुळे पुढे असं काही परत घडलं तर ते पेलायची ताकद आणि सहनशक्ती निदान माझ्यात तरी नव्हती . परिक्रमेच्या पूर्ततेचं म्हणाल तर पूर्ण वा अपूर्ण ह्या आपल्या कन्सेप्ट्स आहेत कारण आपण मर्यादित जगात जगतो , परमेश्वरापाशी तसं काही नाही तो अथांग आणि अनंत आहे . त्यामुळे तिच्या किनारी रहाता आलं , तिला अनुभवता आलं हे माझ्यासाठी खूप आहे . जाई, Yo.Rocks , सायो : मनापासून आभार सामो : वरील अनुभव वाचून वेगळी असते असं तुम्हाला वाटलं , तर असते , अन्यथा नाही :-) साधना : चमत्कारांबद्दल सांगावे की न सांगावे यावर मत मतांतरे आहेत पण माझ्या बद्दल सांगायचं झालं तर मला जे अनुभवायला मिळालं ते आवर्जून सांगावंसं वाटलं , ना जाणो माझयासारखा एखादा तृषार्त चातक असेल परमेशवरच्या अनुभूतीसाठी भुकेला पण त्याला प्रमाण हवं असेल की असं घडू शकतं का तर हो .. असं घडू शकतं हे verified & certified truth आहे . अमितव : खूप खूप धन्यवाद !.. सुखी१४ : मनापासून आभार !.. बन्या : खरं आहे, गाभा हरवत चालला आहे पण लुप्त नाही झाला , कधी होणारही नाही कारण त्यावरच जग चाललंय .
खूप छान. मनाला प्रसन्न वाटले
खूप छान. मनाला प्रसन्न वाटले वाचुन. नर्मदे हर ! देव कुठल्या न कुठल्या रुपात माणसाला जरुर भेटतो.
लेख आवडला. मनापासून सरळ साधं
लेख आवडला. मनापासून सरळ साधं लिहिलंय.
सुंदर अनुभवकथन! एका सलग भागात
सुंदर अनुभवकथन! एका सलग भागात लिहीलेत म्हणून विशेष आभार! कोणा एकाची भ्रमणगाथा वाचल्यापासून नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा आहे. आधी परिक्रमा म्हणजे adventure आणि ती पूर्ण झाली की एक काहीतरी मिळवले अशी काहीशी कल्पना होती माझी. पण आता हळूहळू निसर्ग हाच सो कॉल्ड देव किंवा गुरू आणि ही परिक्रमा म्हणजे त्याच्या जितके सान्निध्यात राहता येईल तितके राहणे असे वाटू लागले आहे. बघूया. योग्य माईंडसेट असल्याशिवाय काही गोष्टी करू नयेत. ही परिक्रमा त्यातलीच एक गोष्ट आहे.
अनुभव ही फार फार सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे. ती दुसऱ्यांना सांगितली तरी ती १००% नाहीच पोहोचत. त्यामुळे सांगणं न सांगणं याने काही फरक पडत नाही. प्रत्येकाची उर्मी असेल तसे!
सुंदर अनुभवकथन!
सुंदर अनुभवकथन!
वेल सेड @जिज्ञासा
वेल सेड @जिज्ञासा
नर्मदे हर!
नर्मदे हर!
पुढच्या वेळी मैया तुमची परीक्रमा नक्की पुर्ण करो.
आवडलं तुमच्या अनुभवांचं शब्दांकन. लहाणपणी केलेलं नर्मदा स्नान आठवलं. तेव्हा त्याचं महत्त्व माहित नव्हतं.
विश्वा ताईंबद्दल हळहळ वाटली. पण त्यांना नक्कीच मोक्ष दिले असणार नर्मदा मैय्यानी.
अनुभव आवडला वाचायला!
अनुभव आवडला वाचायला!
जिज्ञासा, तुझा प्रतिसाद खूप आवडला.
उत्तम लेख आणि साधं सरळ वर्णन.
उत्तम लेख आणि साधं सरळ वर्णन.
सध्या परिक्रमेचे पेव फुटल्यासारखे वाटते. लोकं गाडीने परिक्रमा करता येते म्हणून झुंडीच्या झुंडी ने जाऊ लागले आहेत. अश्याने तिथले पावित्र्य कमी होईल, प्लास्टिक कचरा वाढत जाईल आणि मग सगळंच बट्ट्याबोळ होईल कि काय असे वाटते. सध्या YouTube भरले आहे परिक्रमा विडिओ ने. अशी गर्दी वाढली तर तिथले लोकं तरी कशी मदत करतील परिक्रमावासीयांना?
छान लिहीले आहे!
छान लिहीले आहे!
रंजक वर्णन आहे. पण खाण्याचे
रंजक वर्णन आहे. पण खाण्याचे वर्णन जास्ति. आणि आध्यात्मिक उन्नती किती झाली. वैराग्य किती आले? काही वैचारिक मौक्तिके मिळाली का ते पण दुसृया भागात लिहा. शारिरिक श्रम शहरी मध्यमवर्गीय माणसाला " कोथरू ड" सोडले की होतातच. पण इतर जनता नेहमीच त्रासात जगत असते ते नजरेस आले त्याने काय वैचारिक बदल झाला. त्यांना सामावून घ्यावे वाट्ते का? बेघर उपाशी जगणारे लोक इथे शहरात पण आहेत.
राम निरंजन न्यारा रे अंजन सकल पसारा रे.
रश्मी. , शकुन , जिज्ञासा
रश्मी. , शकुन , जिज्ञासा , स्वाती२ , @Shraddha , वावे , फारएण्ड : मनापासून आभार !!..
उनाडटप्पू : सहमत.
अमा : लिहिण्याच्या एका उर्मीत जेवढं लिहून झालं तेवढच , दुसरा भाग वैगेरे लिहिता येईल असं काही वाटत नाही , खाण्याचं वर्णन मुद्दाम केलेलं नाही ते लिहिण्याच्या ओघात आलेलं आहे कारण तिथे त्याचं अप्रूप वाटतं , ते का वाटतं हे आपल्याला ईथे बसून कळत नाही , २०-३० कि.मी. ऊपाशी पायी चालून गेल्यावर आणि जवळ काही नसतं त्यावेळीच कळतं . माझ्यात काय बदल झाला ,अथवा आध्यत्मिक उन्नती झाली यापेक्षा लेख वाचून समोरच्याला काही त्यातून घ्यावंसं वाटलं तर ते जास्त स्वागतार्ह आहे . लेखनप्रपंच त्यासाठीच आहे . तिथे प्रचंड गरिबी असून आनंदाने जगण्याची वृत्ती आणि द्यायची वृत्ती किती आहे , अनोळखी माणासांठी करायची किती वृत्ती आहे हे वाचून आपल्याला त्यातून काही वैचारिक बोध झाला असल्यास मला नक्की सांगा , माझ्या लेखनाचं सार्थक झालं असं मी समजेन .
माझ्या आईने 2020 मध्ये पायी
माझ्या आईने 2020 मध्ये पायी परिक्रमा पूर्ण केली. मस्त अनुभव आहेत तिथे.
काही वैचारिक बोध झाला असल्यास
काही वैचारिक बोध झाला असल्यास मला नक्की सांगा >> अर्रर... आमच्या उनत्तीसाठी तुम्ही परिक्रमा करून इथे लेख लिहिण्याची तसदी घेतल्याबद्दल तुमचे कसे आभार मानू कळत नाहीये. हा मुद्दा अगदीच लक्षात नाही आला सुरुवातीला.
आता झाला बरोबर वैचारिक बोध.
अतिशय सुंदर लिहिलंय,
अतिशय सुंदर लिहिलंय,
खाण्याचं वर्णन सुद्धा खूप आवडलं, जेंव्हा काहीही जवळ नसताना, कोणत्याही मोबदल्याशिवाय, कोणत्याही ओळखीशिवाय , इतकं चालून / दमून भागून गेल्यानंतर पोटभर अन्न-पाणी मिळतं ही मैय्याची कृपाच आहे.
एरवी प्रपंचात असणा-या आपल्यासारख्या सामान्य लोकांना याचं अप्रूप असणं मुळीच चुकीचं नाही
खूप छान अनुभव
नर्मदे हर !!
हे पर्यटन( परिक्रमा) एक
हे पर्यटन( परिक्रमा) एक आश्चर्य आहे. बारा किलो वजनाची पिशवी पाठीवर घेऊन रोज पंधरा वीस किमी चालायचं चार पाच महिने म्हणजे कठीणच. शिवाय तिकडे थंडीही फार असते.
तुम्ही चौघी एकत्र निघाल्यावर सतत एकत्रच का चालत नव्हता?
पूर्वी ही परिक्रमा निवांतपणे करत असतील. म्हणजे पहाटे लवकर चालायला सुरुवात करून अकरा बाराला चालणे थांबवत असावेत. अंगावर वजन असले की तासाला फार तर तीन किमी चाल होत असेल. म्हणजे बारा पंधरा किमी चाल आणि विश्रांती.
कुणी रूट ट्रेसिंग केले आहे का? म्हणजे परिक्रमा नियम वगैरे न पाळता थोडा थोडा अनुभव घेता येईल भाविक वगैरे नसलेल्यांना . ओंकारेश्वर हे नर्मदेच्या उत्तर तटावर आहे. तिथून प्रथम उत्तर तटानेच भडोचकडे जाण्याची प्रथा आहे का? कुणी उलट उगमाकडेही जातात का?
परिक्रमेचे वर्णन फारच आवडले. अर्धवट राहिलेली यात्रा पुढे कधी नक्कीच पूर्ण कराल. प्रयत्न आणि निश्चयाने इतरांना हुरूप येत आहे.
पुढे कधीतरी यातला छोटासा भाग केवळ पर्यटन अनुभव म्हणून करण्याचा विचार आहे. ओंकारेश्वर आणि माहेश्वर पाहिले आहे पण समोरच्या नर्मदा नदीला मैया म्हणण्याइतकी मानसिक पातळी गाठली नाही. त्यामुळे भटकंती होईल पण परिक्रमा नाही.
परिक्रमा करणाऱ्यांना प्रणाम.
Pages