हे तो श्रींची इच्छा

Submitted by सरनौबत on 21 January, 2021 - 03:24

अपनी गली मै कुत्ता भी शेर होता है" ही म्हण कसोटी क्रिकेटला फारच लागू पडते. पाहुण्या संघाने सिरीज हरायची आणि मग त्यांना आपल्या देशात बोलावून "घरचा आहेर" देण्याची जुनी परंपरा आहे. भारत-ऑस्ट्रलिया पहिला कसोटी सामना ह्याच परंपरेनुसार चालू झाला. ३६ धावांत सर्वबाद होण्याची नामुष्की ओढवली. कोहली बाळंतपणाच्या रजेवर आणि इतर प्रमुख खेळाडू दुखापतीने उपलब्ध नाहीत; असा "दुष्काळात तेरावा महिना" रहाणे पुढे ओढवला. पाहुण्यांना सराव म्हणून राखीव संघ खेळवतात तसला संघ उरला. केवळ पाऊस आला तरच एखादा सामना ड्रॉ होईल अशी शक्यता निर्माण झाली.

दुसऱ्या कसोटीत रहाणे ने शतक ठोकून सामना जिंकून दिला. तरीही सिरीज हारण्याचीच चिन्हे जास्त होती. तिसऱ्या सामन्यात रोहित आणि पंत ह्यांनी चांगली सुरुवात करून दिल्यावर हनुमा आणि अश्विन; जहाजाने नांगर टाकावा तसे उभे राहिले आणि सामना ड्रॉ केला. शेवटचा सामना ऑस्ट्रलियाच्या बालेकिल्ल्यात ब्रिस्बेन ला होता. जवळपास निम्मा संघ एव्हाना दुखापतीने पांगळा झाल्याने मिळतील ते ११ खेळाडू घेऊन रहाणे उभा राहिला. पाच गोलंदाजाचा एकत्रित कसोटी सामन्यांचा अनुभव एकूण चार सामने इतका "तगडा"असा होता. दुसरीकडे स्टार्क, कमिन्स आणि हेझलवूड चा तोफखाना भारतीय फलंदाजांची पिसे काढायला सज्ज होता. केवळ वरुण देव पाऊस पाडून सामना ड्रॉ करू शकेल असे आपला संघ कागदावर वाटत होता.

पहिल्या इंनिग मध्ये शार्दूल ठाकूर आणि सुंदरने कांगारूंना जास्त लीड मिळणार नाही अशी जबरदस्त भागीदारी केली. सिराज आणि ठाकूरने दुसऱ्या इनिंगमध्ये जीव ओतून अख्खा संघ बाद केला. शेवटच्या दिवशी ३२४ धावा करण्यापेक्षा ९० षटके टिकणे अवघड होते. नॅथन लायन चा चेंडू हातभर वळत होता. कारण गब्बा च्या पिच ला शिवथरघळीला लाजवेल अश्या भेगा पडल्या होत्या. पीचवर ऑस्ट्रेलियाच्या कृषी समितीने "जलयुक्त शिवार" योजना राबवली कि काय ? अशी शंका येत होती. दुसरीकडे टीम पेन चे मलयुक्त शिवीगाळ स्लेजिंग चालू होते. ह्याच शिवारात शुभमान गिलने शुभमुहूर्तावर ९१ धावा ठोकून विजय मंदिराचा पाया भरला. पुजाराने बचावाची अभेद्य भिंत बांधून पूजा बांधली. नंतर पंतांनी त्यावर कळस चढवला.

शिवाजी महाराजांनी तुटपुंज्या फौजेसह मोगलांचा पराभव करण्यासाठी सह्याद्रीचा गनिमी काव्यासाठी वापर केला. इकडे पीचवर खिळे ठोकल्याप्रमाणे पुजारा सह्याद्रीसारखा भक्कम उभा राहिला आणि गनिमाला काव आणला. सामना हरणार नक्की नाही ह्याची खात्री झाल्यावरच हा बाजीप्रभू २११ चेंडूचा सामना करून गब्बा ला पावन करून तंबूत परतला. ड्रेसिंग रूम मध्ये तो सलमान खान प्रमाणे शर्ट काढून उघडा फिरला असता तर बाऊन्सर्स लागल्याचे अंगावरील काळे-निळे डाग दिसले असते. ३ स्लिप्स आणि गली असताना लायनला पुढे येऊन षटकार ठोकून पंत ने "गब्बा चा अब्बा" आपण असल्याचे सांगितले. गांडुळाने शेषशायी नागाचे रूप धारण करून ऑस्ट्रेलियाचा ऍनाकोंडा नाम"शेष" केला.

सिरीज जिंकून दोन दिवस होऊन गेलेत तरी अजून आपण कांगारूंना त्यांच्या देशात कसोटी सामन्यात हरवल्याचे खरं वाटत नाहीये. ज्याला सुरुवातीला IPL सामन्यात देखील घेतलं नाही त्या अजिंक्य रहाणे ने इतकी नवखी टीम घेऊन असं करून दाखवणं खरंच अशक्य वाटतंय. कसं काय घडून आलं हे? बहुतेक नियतीच्या मनात भारतीय संघ "अजिंक्य रहाणे" असावंं. हे तो श्रींची इच्छा!!!

~ सरनौबत

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख. खरंच खूप exciting होती ही सिरीज.

ही सगळी नवीन टीम (बरेचसे प्लेयर्स) राहुल द्रविडचे विद्यार्थी आहेत असं वाचनात आलं. कुठेतरी द्रविडची छाप जाणवत होती. अजिंक्यला तर आजचा द्रविड म्हणतातच. त्याचं नेतृत्व प्रभावी आहे.

बाय द वे, धागा स्पोर्ट्स ऐवजी ललित लेखनात आहे आणि शीर्षकावरून क्रिकेटबद्दल आहे हे कळत नाहीये.