माझे डॉक्टर ---२

Submitted by सुरेशकुलकर्णी on 12 January, 2021 - 08:06

डॉक्टर आणि शिक्षकी पेशा हे दोन थोर व्यायसाय आहेत. याना नोबल व्यवसाय म्हटलं जात. माझा एक मोठा भाऊ इंजिनियरला होता. त्याकाळच्या अपेक्षेप्रमाणे एक पोरगा इंजिनियर आणि एक डॉक्टर असावा हि आमच्या घरच्यांची पण इच्छा होती. पण 'आशा हे दुःखाचे मूळ कारण आहे!' हे तत्व, ते जरी विसरले असले तरी, नियती विसरली नव्हती! आणि मलाच मुळात 'शिक्षक' व्हायचे होते!
माझ्या मोठ्या भावाने, मला डॉक्टर करण्याचा चंग बांधला. तेव्हा मी आकरावीला होतो. तो इंजिनियरिंगच्या परीक्षा देऊन सुटीत आला होता.
"सुऱ्या! मेडिकलची तयारी करायची! तू सायन्स घेतलंस ते बर झालंय. बारावीला बायोलॉजी वर भर दे . मॅथ्सची पासिंग पुरती तयारी कर!"
"का? मला एम.एससी मॅथ्स करायचंय!"
"बेकूफ! त्यानं काय होत? गणितच मास्तर, फार तर लेक्चरर होशील! डॉक्टर हो! मेडिकलला गेलास तर मी खर्च करीन!"
तो माझ्या पेक्षा सात वर्षांनी मोठा होता. त्याचाशी वाद घालून उपयोग नव्हता. तो शहरात -म्हणजे औरंगाबादला -राहिलेला, ज्यास्त शिकलेला. त्याला आपल्यापेक्षा ज्यास्त कळत. हे मनोमन मला मान्य होत. मी गप्प्प बसलो.
"अन हे काय? तुझी प्रकृती अशी तुलूमुलू! डॉक्टर कसा भारदस्त पाहिजे! ते काही नाही. उद्याससून सकाळी उठून रनिंगला जायचं. मी पण येतो. दोघे मिळून जाऊ. सकाळी पाच वाजता तयार रहा."
बरेच दिवस माझं वजन पंचेचाळीस किलोचा होत. बाकी काही आजार किंवा अशक्तपणा वाटत नव्हता. तरी माझ्या, हेल्थ कॉन्शियस भावाला, मी अंडरवेट वाटत होतो.
"हो!"
दुसरे दिवशी दोघेही साडेआठ पर्यंत ढाराढूर झोपी गेलो!
वजन वाढायला, ज्यास्त खाल्ले पाहिजे, आणि त्या साठी व्यायाम पाहिजे. हे साधे तत्व आम्हा दोघांना जमेना. व्यायाम व इतर काहीही न करता मी मस्त जेवत होतो. पण वजन मात्र पंचेचाळीसच्या पुढे सरकेना.
आमचा भाऊ कसला हटवादी. त्याने मला डॉक्टरकडे नेण्याचा घाट घातला. आणि माझ्या आयुष्यात पहिला MBBS डॉक्टर डोकावला!
डॉ. खामकर! मलखांबासारखा उंच अन शिडशिडीत. ते मेडीकलला औरंगाबादलाच होते. भावाची ओळख होती.
"डॉक्टर, हा माझा लहान भाऊ. तसा ऍक्टिव्ह आहे. पण मला अंडरवेट वाटतो. पुढे काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून, तुमच्या ऍडव्हाइस साठी आणलंय."
मग डॉक्टरांनी मला वजनाच्या काट्यावर उभा केला. चवरेचाळीस किलोवर काटा स्थिरावला. काल तर रेल्वेस्टेशनच्या मशीनवर, आठेचाळीस किलोचा तिकीट आलं होत!
"हूं! थोडं कमीच वाटतंय! या वयात पन्नाशीच्या आसपास वजन असायला हवं!"
"मलाही असच वाटत!" आमचे बंधू म्हणाले.
मग त्यांनी नव्या कोऱ्या पॅडच्या सुंदर कागदावर गिचमिड अक्षरात काही औषध लिहून दिली. त्या काळी चांगल अक्षर असलेल्या विद्यार्थ्याला मेडिकलला प्रवेश देत नसावेत!
"१.नंबरचे औषध जेवणा आधी तासभर घ्यायचे.
२. नंबरची कॅप्सूल जेवणा नंतर लगेचच.
३.नंबरचे कंपाऊंड रात्री झोपताना.
४. रोज एक अंड, सकाळी नऊ वाजता, गरम दुधातून.
५. हे प्रोटीनेक्स झोपताना दुधातून.
६.रोज दुपारी चार दोन केळी.
पंधरा दिवसात किमान पाच किलो वजन वाढावं हि माझी अपेक्षा आहे. बघू! पंचेवीस रुपये!"
"मग जेवण कधी करायचं?" मी हळूच विचारलं.
"जेवण? नेहमीच्याच वेळेला करत जा. जमलं तर एखादी पोळी ज्यास्तच खा!"
पंचेवीस रुपये देऊन मी अन भाऊ त्या डॉक्टरांच्या तडाख्यातून बाहेर आलो.
"सुऱ्या, तुला हे इतकं सगळं खाण जमलं का रे? मला तर ऐकूनच मळमळायला लागलंय!"
मग त्या डाएटची आणि औषधाची काटेकोर अंमल बजावणी करण्यात आली. पंधरा दिवस! पुन्हा त्या खामकराकडे आम्ही हजर झालो. वजनात फरक पडला होता. वजनाचा काटा, चाळीशीत आला होता! खामकर किंचित शरमल्या सारखे झाले. त्यांनी फालोअपची फी घेतली नाही!
मी आमच्या डॉ.मांडेकडे 'वजन वाढवायचे औषध द्या!' म्हणून गेलो होतो.
"कशाला? रनींग करताना दम लागतो का?"
"नाय."
"सकाळी पोट साफ होत का?"
"हो,"
"कितीदा जेवतोस?"
"तीनदा!"
"जा. तुला तीस वर्ष काही होत नाही! फालतू पेपरात वाचून वजन वाढवायच्या भानगडीत पढू नकोस!" त्या नंतर मी कधीच वजन कमी ज्यास्त करायच्या भानगडीत पडलो नाही. अगदी आज पर्यंत!
०००
बारावीला मला अभ्यासाठी म्हणून भावाने स्पेशल रूम भाड्याने करून दिली. आम्ही तिघे चौघे मित्र मिळून अभ्यास करायचो. व्हायचा तोच परिणाम झाला. भरपूर गप्पा व्हायच्या. बरेचदा सिनेमाचा सेकंड शो पाहायला जायचो. मेडिकल सोडाच, बीएएमएसला सुद्धा नंबर लागणे दुरापास्त व्हावे इतके मार्क मिळाले! मॅथ्स ग्रुप मध्ये, त्या वर्षी बीई ला प्रवेश मिळण्या इतके मार्क्स होते! वडील रिटायर झाल्याने तिकडे जात आले नाही! माझ्या नशिबी सटवाईने 'बँक'लिहली होती. असो.
पण डॉक्टरांन बद्दल मला कमालीचे आकर्षण आहे. 'डॉक्टर' हा सगळ्यात गूढ प्राणी आहे. मला डॉक्टर सार्वजनिक ठिकाणी कधी दिसत नाहीत. 'आज, आमुक आमुक परिसरात बिबट्याचे दर्शन!' या बातमी इतकिच 'आज प्रेमदन, चौकात डॉ. जोशी. येवलेकडे चहा पिताना दिसले!" हि सुद्धा ब्रेकिंग न्यूज होऊ शकते.
मला या डॉक्टरनं बद्दल खूप प्रश्न पडतात. याना मित्र असतात का? हे लोक कायम दवाखान्यात कसे राहतात? मला माझ्या आयुष्यात एक हि डॉक्टर सकाळी कटिंग साठी सलून मध्ये दिसला नाही, तरीही एकही डॉक्टरांचे केस अस्ताव्यस्थ वाढलेले नसतात. ते कधी टेलरकडे किंवा गारमेंटच्या दुकानी दिसणार नाहीत, पण कपडे मात्र, नेहमी आंगनेटके आणि अद्यावत असतात.
डॉक्टरीशिक्षण काळ प्रदीर्घ असतो, म्हणजे इतर व्यावसायिक कोर्स पेक्षा. सी ए आणि MBBS हे अर्धवट सोडून चालत नाहीत. मधेच सुटला कि, माणूस साप सिडी खेळांतल्या, सापाने गळाल्या सारखा तळाला येतो. त्यामुळे एकदा त्या मेडिकल कॉलेजच्या आवारात गेलेला विद्यार्थी डॉक्टर होऊनच बाहेर पडतो! वॉशिंग मध्ये घातलेल्या कपड्या सारखे. हल्लीच्या जमान्यात, या मेडिकलचा एक जबरदस्त फायदा आहे. याना इंजिनियर मुलानं सारखा लग्नाचा प्रश्न पडत नाही! जमून जात. कॉलेज मध्ये, एक्साम फी भरण्याच्या काउंटर सारखं, 'लग्नाचं' एखाद काउंटर कॉलेजात असत का हो?(एक शंका.)
डॉक्टर लोकांचे इतर काय छंद आहेत माहित नाहीत, पण 'संगीताचे' शौकीन बरेच आढळले. गाणं आणि तेही शास्त्रीय संगीत! यांचा जीव कि प्राण! एरव्ही न दिसणारे डॉक्टर, भीमसेनच्या कार्यक्रमाला आवर्जून आलेले मी पाहिलेत. एखादा डॉक्टर 'मारी कटारी ---' म्हणून ऑपरेशनचा पहिला कट घेत असल्याचे सांगितले तर, नवल वाटणार नाही. खूप दिवस शारीरिक रोगांच्या डायग्नोसिस सोबत, शास्त्रीय रागांची पण -सिम्टम्स -लोकेशन्स-अँड ट्रीटमेंट शिकवत असतील वाटायचं.
पण हि सगळ्यात हुशार मंडळी. वैद्यकीय व्यवसाय सोडून इतर व्यवसायात हे लोक चमकतात. मग सिनेमा असो, नाटक असो, कि टीव्ही असो, आपली आपली छाप सोडून जातात.
मला सगळ्यात नवल वाटत ते मेडिसिनवाल्यांचा . 'शस्त्र न धरी करी, सांगेन युक्तीच्या गोष्टी चार!' या, श्री कृष्णाच्या वक्तव्याप्रमाणे यांचे काम असते. अशा काही दिग्ग्जयाचा ज्ञानी परीक्षा, माझ्या आजारांनी घेतली आहे! पण ते पुन्हा केव्हा तरी.
माझी अँजिओग्राफी झाली होती, हि साधारण वीस वर्षा पूर्वीची गोष्ट. १००% एक ब्लॉग होता. प्लास्टी करण्याजोगी परस्थिती नव्हती. बायपास अटळ आणि लवकरात लवकर करणे गरजेचे होते. तेव्हा हार्ट प्रॉब्लेम म्हणजे, स्वर्गाच्या व्हिसाची अपॉइंटमेंटच! शिवाय सामान्यांच्या आर्थिक चादरीला फाडून टाकणार शल्य कर्म. माझ्या पाया खालीची जमीन हादरली. मुलं लहान होती. इतक्यात मरून चालणार नव्हतंच. इतर काही मार्ग आहे का? याची मी चाचपणी करत होतो. माझ्या मित्राचे एक मेव्हणे कार्डिओलॉजिस्ट होते. त्यांच्याकडे, ओळखीतले म्हणून गेलो. त्यांनी टाळाटाळ केली, जाणवत होते, पण मी चिकाटीने त्याची भेट घेतलीच.
"ज्यांनी अँजिओग्राफी केली, ते डॉक्टर काय म्हणतात?" त्यांनी थोड्याश्या रुक्ष स्वरात विचारले.
"बायपास करा म्हणतात!"
"मग, घ्या करून! त्यात मी काय वेगळं सांगणार?" असे म्हणून ते उठून गेले.
त्या क्षणी मला खूप अपमानित झाल्या सारखं वाटलं. मी त्या गृहस्थाचे पुन्हा थोबाड पाहिलं नाही!
आम्ही ओळखीच्या डॉक्टरांकडे का जातो तो, हो? आमचा त्यांच्यावर विश्वास असतो म्हणून. दुसरे या क्षेत्रात खूप वेडंवाकडं घडतंय. आपल्याला ओळखीचा माणूस योग्य सल्ला देईल, हि आशा असते म्हणून!
मित्रानो, आपण जर हा लेख वाचत असाल आणि डॉक्टर असाल तर, एक विनन्ती. अश्या लोकांना तुमच्या आपुलकीची नितांत गरज असते. तुम्ही त्यांच्याकडून तुमची काय फी असेल ती घ्या, पण त्यांच्या विश्वासाला लात मारू नका! प्लिज!

सु र कुलकर्णी. आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेशजी, हा सुद्धा लेख छान जमलाय पण थोड्या थोड्या अवधीने धागे येत गेल्यास वाचक जास्त आनंद घेतील. एकदम बरेच धागे आल्यावर काही धागे सुटून जातात वाचायचे.
good dishes should be served slowly so that we can savour it Happy

जिद्दु +१

जे लिखाण एका भागात न संपणारे आहे ते दर दोन दिवसांनी चालेल.
बाकी स्वतंत्र लेख आठवड्यातून एकदा ह्याप्रमाणे योग्य राहतील.

तुमचं सगळं लेखन छान आहे. आवडतंय.
थोड्या गॅपने लिहा. म्हणजे वाचता येईल.
मला हल्लीच एका प्रख्यात म्हणवल्या जाणार्या डॉक्टरचा अतिशय विचित्र दुःखदायी संतापजनक अनुभव आलाय. शेवटी तोही एक माणुसच आहे ह्यामागे तो अनभव विसरायचा प्रयत्न करतेय.