सौंदर्य "दृष्टी"

Submitted by प्रशांत बाळापूरे on 16 December, 2020 - 09:18

मी चंद्राला विचारले, "हे चंद्रा सांग बरे, माझ्या प्रेयसी पेक्षाही सुंदर तरुणी या पृथ्वीवर आहे का रे?"

चंद्र म्हणाला, "मित्रा तुझ्या या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकत नाही. अरे इतक्या लांबून रात्रीच्या अंधारात काहीच स्पष्ट दिसत नाही!"

मी पुन्हा म्हटले, "मित्रा, माझ्या प्रश्नाला अशी बगल देऊ नकोस. तुझं खरं खरं मत सांगायला संकोच करू नकोस. अरे, नजरेचा प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरकडून डोळे तपासून घे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार चष्मा बनवून घे!"

चंद्र उदास होऊन म्हणाला, "मित्रा, हा उपाय मी करून बघितला होता. डॉक्टरांकडून डोळे तपासून चष्मा ही बनवून घेतला होता. पण ज्या क्षणी मी चष्मा लावून आरशात माझा चेहरा बघितला तर तो मला अतिशय कुरूप आणि ओबडधोबड व्रणांनी भरल्यासारखा दिसला!! त्याचक्षणी मी चष्मा फेकून दिला आणि आरसा फोडून टाकला. पुन्हा म्हणून मी आरशात माझा चेहरा नाही बघितला. त्यावर नासाने तर कहर केला आणि माझा खरा चेहरा जगासमोर आणला. ते पाहून मला जीव द्यावासा वाटला आणि मी डोंगराआड माझा चेहरा लपवला!"

चंद्र दिसेनासा झाला.

मग एका रात्री पृथ्वीवरच्या एका चिमुकल्याने त्याच्या आईला विचारले, "आई चांदोमामा आज का गं नाही आला? त्याच्या पोटात दुखत असेल की मग त्याला ताप आला असेल?"

आईने सांगितले, "नाही रे बाळा! चांदोमामाने आज कदाचित सुट्टी घेतली असेल!"

तसेच पृथ्वीवरील भगिनी सुद्धा चंद्र गायब झाल्याने अस्वस्थ झाल्या. एकमेकांना चंद्राबद्दल विचारू लागल्या. त्यांनाही वाटले की, चांदोमामाला सुट्टी हवी असेल! अविरत सगळीकडे प्रकाशाचे दान देऊन तो बिचारा थकला असेल.

हे विविध संवाद ऐकून चंद्र मला म्हणाला, "हे ऐकून मला गहिवरून आले आणि कळले की लहान मुले तर काय निरागस असतात! पण अजूनही लाखो भगिनी मला आपला भाऊच मानतात आणि भाऊबीजेला न चुकता मला ओवाळतात. मी सुंदर आहे की कुरूप हा विचार ते सर्वजण करत नाहीत. किंबहुना त्यांच्या दृष्टीने मी नेहमीच सुंदर आहे. असा विचार मनात येताच माझ्या मनातील संभ्रम दूर झाला आणि माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला की सौंदर्य हे रंग रूपावर अवलंबून नसतं तर ते बघणाऱ्याच्या दृष्टीवर अवलंबून असतं!"

चंद्र मला पुढे म्हणाला, "म्हणून म्हणतो मित्रा, शहाणा असशील तर माझा एक सल्ला ऐक!आपल्या प्रेयसीकडेच नव्हे तर समस्त स्त्रियांकडे चर्मचक्षूने नाही तर अंतरदृष्टीने पाहायला शिक, म्हणजे जगातील प्रत्येक स्त्री तुला सुंदर दिसल्या वाचून राहणार नाही आणि पुन्हा तुला मला असला प्रश्न विचारण्याची तुला गरज भासणार नाही! गरज भासणार नाही!! गरज भासणार नाही!!!"

चंद्र केवढे तरी छान तत्वज्ञान शिकवून गेला, नाही??

लेखक: श्री. प्रशांत बाळापुरे, फैजपूर (जि. जळगांव)
(लेखक निवृत्त LIC ऑफिसर आहेत)

Group content visibility: 
Public - accessible to all site users