सावली……...
काळ साधारण ८० ते ९० चा आहे. ती पौर्णिमेची रात्र होती, निशिकांत आईला आणायला निघालेला होता. आई नोकरी करायची, आईला रोज दुपारची पाळी म्हणजे घरी यायला रात्रीचे १०.३० ते ११.०० वाचायचे आणि आईला आणायला कायम निशिकांत जायचा. तो रस्ता हा गर्द झाडीने वेढलेला होता व एवढ्या रात्री वर्दळ पण नसायची, अशावेळेस चालताना त्या चंद्रप्रकाशात टोलेजंग मोठ्या झाडांची सावली म्हणजे अक्राळविक्राळ चेहेरे भासायचे, एका एका झाडाच्या पारंब्या अंगावर काटे आणायचे. चालता चालता एक एक सावल्या वाटेत आडवे पडल्या सारखे दिसायचे. आशात त्या सावल्या चालायच्या बरोबर आणि अशाच वेळेस असे वाटायचे की एखादी समोर येऊन उभी ठाकती की काय. मधेच ढग आले की अंधारून यायचे मग त्या सावल्या गायब होत, परत ढग गायब झाले की त्या अक्राळविक्राळ सावल्या दिसायच्या मग परत तोच खेळ. अशातच तो पाया खालचा पण डोंगरा एवढा रस्ता कापला जायचा आणि सावल्यांचा खेळ संपायचा, मग समोर साक्षात आई दिसायची म्हणजे प्रेमाची सावली, मायेची सावली आणि ती कशी असते याची पूर्ण अनुभूती यायची.
आता काळ एकविसाव्या शतकात आहे तरीही सावल्यांचा खेळ तसाच चालू आहे. निशिकांत पण सावल्यांचा खेळ परत बघायला तयार आहे, ती भीती परत अनुभवायला तयार आहे, पण पलिकडे आई भेटायला हवी कारण निशिकांतची आयुष्याची संध्याकाळ जवळ आली आहे.
यश