“अश्रू आणि हास्य हे माणसांना जोडणारे केवढे बळकट दुवे आहेत”,
हे पु ल देशपांडे यांचे वाक्य एकदा वाचले होते. ते वाचताक्षणी स्तिमित झालो आणि मग ते वहीत लिहून ठेवले होते. एकदा असेच ती वही चाळताना या वाक्यापाशी आलो आणि थबकलो. ते वाक्य पुन्हा एकदा डोळे स्थिरावून वाचले आणि आता ते मनाला अधिकच भिडले, नव्हे, मनात खोलवर घुसले. पूर्णपणे अपरिचित, भाषिक व सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न असलेली माणसे देखील या दोन नैसर्गिक गोष्टींमुळे नक्कीच एकत्र येतात. अशा प्रसंगी ही भावनिक समानता समूहास जोडलेपण देते. या मंथनातून एक विचार स्फुरला. मग डोळ्यातील अश्रूनिर्मितीवर जरा बारकाईने विचार करता करता अश्रूंनाच या लेखाचा विषय करून टाकला !
आपल्या बहुमूल्य अशा डोळ्यांमधून पाझरणारे अश्रू ही आपल्याला निसर्गाने दिलेली एक विलक्षण देणगी आहे. त्यांचा कायमस्वरूपी सूक्ष्म थर डोळ्यांना नेहमी ओलसर ठेवतो आणि त्यांचे रक्षणही करतो. धूर किंवा धूळ डोळ्यात जाण्याचे प्रसंग तर बऱ्यापैकी घडणारे. अशा वेळेस डोळ्यात जमा होणारे पाणी संरक्षक असते. जेव्हा आपल्या मनातील आनंद अथवा दुःख या दोन्ही भावना उचंबळून येतात, तेव्हा तर अश्रू अगदी धाररूपात वाहू लागतात. प्रत्येक मनुष्य आयुष्यात अनेकदा प्रसंगपरत्वे अश्रू ढाळतो. अत्यानंद असो वा अतीव दुःख, या दोन्ही प्रसंगी अश्रूंची निर्मिती खूप वाढते. तेव्हा आपल्या मनातील भावनांचे प्रतिनिधी म्हणून ते डोळ्यावाटे सहज बाहेर पडतात. अश्रूंची निर्मिती, त्यांचे प्रकार आणि त्यांचे कार्य हा एक रंजक अभ्यास आहे. सामान्य माणसासाठी तो कुतूहलजनक आहे. या लेखाद्वारे आपल्या अश्रूंचे अंतरंग उलगडण्याचा हा एक प्रयत्न.
लेखाची विभागणी अशी करतो:
१. अश्रूंची निर्मिती आणि प्रवाह
२. अश्रूंचे घटक
३. त्यांचे प्रकार आणि
४. त्यांचे कार्य
निर्मिती आणि प्रवाह:
आपल्या प्रत्येक डोळ्यात एक स्वतंत्र अश्रुग्रंथी असते. ती बदामाच्या आकाराची असून डोळ्याच्या वरील कोपर्यात तिरकी वसलेली असते. तिच्या मुख्य पेशींपासून अश्रूबिंदू तयार होतात. तिथून ते डोळ्यांच्या पृष्ठभागावर वाहतात. पुढे ते एका अश्रूपिशवीत जमा होतात. (चित्र पाहा).
वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे ते पुढे डोळा व नाकपुडी यांना जोडणाऱ्या नलिकेत शिरतात. अखेर ते नाकपुडीमध्ये उतरतात. अश्रुग्रंथीमध्ये मुख्य पेशींव्यतिरिक्त संरक्षक कार्य करणाऱ्या पेशी देखील असतात. या पेशी इम्युनोग्लोब्युलिन्स ही संरक्षक प्रथिने तयार करतात. डोळा हे शरीराचे एक प्रवेशद्वार असून त्यातून सूक्ष्मजंतूंना आत शिरण्यास वाव असतो. इथे हजर असणाऱ्या या प्रथिनांमुळे जंतूंचा इथल्या इथेच प्रतिकार करता येतो. या ग्रंथीला सामान्य आणि विशिष्ट चेतातंतूंद्वारे चेतना मिळत राहते. त्यानुसार अश्रूंच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवले जाते.
अश्रूंचे घटक:
यांचा मुख्य घटक अर्थातच पाणी आहे. याव्यतिरिक्त त्यांच्यामध्ये विविध क्षार (मुख्यत्वे सोडियम), संरक्षक प्रथिने, काही एन्झाइम्स, ग्लुकोज व मेद पदार्थ असतात. अश्रुंचे सखोल विश्लेषण केल्यावर त्यांचे डोळ्यांमध्ये एकूण तीन थर वसलेले दिसून येतात:
१. अस्तराचा थर: डोळ्यातील पारदर्शक पडदा म्हणजे कॉर्निआ. त्याच्या भोवती हा थर पसरतो आणि त्यामुळे पडदा नेहमी ओलसर राहतो.
२. जलरूपी थर : यामुळे अश्रू संपूर्ण डोळाभर पसरतात.
३. मेदाचा थर : वरील थराच्या बाहेरून याचे वेष्टण असते. त्यामुळे अश्रू कप्पाबंद राहतात आणि सतत गालावर ओघळत नाहीत.
अश्रूंचे प्रकार आणि कार्य :
अश्रू हे अश्रूच आहेत, त्यात प्रकार ते कसले, हा प्रश्न स्वाभाविकपणे मनात येईल. परंतु अश्रुनिर्मितीच्या विविध कारणांनुसार त्यांचे ३ प्रकार दिसून येतात. त्यानुसार त्यांच्या घटकरचनेत थोडाफार फरकही पडतो. आता पाहूयात हे तीन प्रकारचे अश्रू:
१. मूलभूत : हे डोळ्यात नित्य स्त्रवत राहतात. त्यांच्यामुळेच डोळा ओलसर राहतो आणि त्याचे पोषणही होते. एक प्रकारे ते डोळ्यांचे वंगण असतात आणि त्यामुळे डोळ्यात धूळ व घाण साठत नाही.
२. प्रतिक्षिप्त : जेव्हा काही कारणाने डोळ्यांचा संपर्क उग्र वासाच्या पदार्थांची येतो तेव्हा संबंधित रसायनांमुळे डोळे चुरचुरतात. अशावेळेस अश्रूंचे प्रमाण अर्थातच वाढते आणि त्यामुळे डोळ्यात वायुरूपात शिरलेली रसायने धुतली जातात. नेहमीच्या व्यवहारातील असे उग्र पदार्थ म्हणजे चिरलेला कांदा, सुगंधी द्रव्ये, मिरपुडीचा फवारा आणि अश्रूधूर.
कांदा चिरणे ही स्वयंपाकातील नित्याची घटना असल्याने त्यातील विज्ञान समजून घेऊ. कांद्यामध्ये एक गंधकयुक्त रसायन असते. कांदा चिरल्यामुळे त्याच्यात काही प्रक्रिया होऊन त्या रसायनाचे वाफेत रूपांतर होते. ही वाफ हवेतून आपल्या डोळ्यात घुसते आणि आपल्याला झोंबते. त्यामुळे तिथले चेतातंतू उत्तेजित होऊन अश्रुग्रंथीला संदेश पाठवतात. परिणामी अश्रूंचे प्रमाण वाढते आणि त्याद्वारा डोळ्यात शिरलेले ते रसायन धुतले जाते.
अजून एक रोचक मुद्दा. आपण जेव्हा जोरदार जांभई देतो, शिंकतो अथवा उलटी करतो, त्या प्रसंगीही अश्रूंचे प्रमाण वाढते. या क्रियांचे दरम्यान काही स्नायू आकुंचन पावल्याने ग्रंथींवर दाब पडतो.
3. भावनिक : भावनातिरेकाने जेव्हा डोळ्यातून अश्रू वाहू लागतात त्यालाच आपण ‘रडणे’ म्हणतो. या प्रकारची अश्रू निर्मिती खालील प्रसंगी होऊ शकते:
• प्रचंड भावनिक ताण
• अत्यानंद / अत्युत्कृष्ट विनोदावरील खळखळून हसणे
• अतीव दुःख, शारीरिक व मानसिक वेदना
• नैराश्य किंवा पश्चात्ताप
टोकाचा आनंद अथवा टोकाचे दुःख या दोन्ही प्रकारच्या भावनांमध्ये हा अनुभव आपल्याला येत असतो. अशा प्रसंगी मेंदूतील ‘लिंबिक यंत्रणा’ कार्यान्वित होते. त्यातून पुढे काही हार्मोन्स व प्रथिने अधिक स्त्रवतात आणि ती या अश्रूंद्वारे बाहेर पडतात. त्यामध्ये पिट्युटरी ग्रंथीतली प्रोलाक्टीन व ACTH यांचा समावेश आहे त्याचबरोबर ‘एनकेफालीन’ हे एक वेदनाशामकही स्त्रवले जाते. वर उल्लेख केलेल्या सर्व प्रसंगी या प्रकारची अश्रूनिर्मिती ही शरीरासाठी उपयुक्त ठरते. किंबहुना, ती एक वरदान आहे. या प्रसंगांमध्ये जी तणावकालीन रसायने निर्माण होतात त्यांचा निचरा या अश्रूंद्वारे होतो.
आता आपण वेदनादायी प्रसंगातील भावनिक ताणतणाव आणि शरीरातील रासायनिक घडामोडी समजून घेऊ. एखाद्या घटनेने आपल्याला प्रचंड धक्का बसतो. त्यातून मेंदूतील तणावकालीन यंत्रणा कार्यान्वित होते. यात मुख्यतः हार्मोन्सचा संबंध असतो. प्रथम हायपोथलामस ही हार्मोन्सची सर्वोच्च नियंत्रण ग्रंथी चेतवली जाते. तिच्यातून पुढे पिच्युटरी ग्रंथीला संदेश जातो. त्यानुसार ती ग्रंथी ACTH हे हार्मोन् सोडते. हे रक्तप्रवाहातून आपल्या मूत्रपिंडांच्यावर वसलेल्या adrenal ग्रंथींमध्ये पोचते. आता त्या चेतवल्या जाऊन कॉर्टिसॉल हे महत्त्वाचे हॉर्मोन तयार करतात आणि रक्तात सोडतात. हे हॉर्मोन आपल्याला तणावाचा सामना करण्याचे बळ देते. ते रक्ताद्वारे शरीराच्या सर्वच स्त्रावांमध्ये उतरते. अर्थातच अश्रूंमध्येही त्याचे प्रमाण वाढते. जरी हे हॉर्मोन आपल्याला अशा प्रसंगी लढण्याचे बळ देत असले, तरी त्याची वाढलेली पातळी दीर्घकाळ राहणे चांगले नसते. म्हणूनच निसर्गाने कशी सुरक्षायंत्रणा केली आहे ते पाहू :
अतीव वेदना अथवा दुःख >> भावनिक आंदोलन आणि वाढलेली हॉर्मोन्स >> अश्रू निर्मिती व रडणे >> वाढलेल्या हार्मोन्सचे त्यातून उत्सर्जन.
अशा प्रसंगी वरील हार्मोन्सच्या जोडीने काही क्षार देखील अधिक प्रमाणात उत्सर्जित होतात. त्यांचा आणि भावनांचा संदर्भ या विषयावर संशोधन चालू आहे.
म्हणजेच टोकाला पोचलेल्या भावनेतून रडू येणे ही एक प्रकारे शरीराची सुरक्षा झडपेसारखी यंत्रणा आहे. अशा प्रसंगी जर का आपण नैसर्गिक रडणे मुद्दाम दाबले, तर ही वाढलेली हार्मोन्स शरीरातच साठून राहतात. म्हणून अशा प्रसंगी मुक्तपणे रडून घेणे हा भावनांचा निचरा होण्याचा उत्तम मार्ग असतो.
यावरून प्रसिद्ध इंग्लीश कवी लॉर्ड आल्फ्रेड टेनिसन यांच्या एका समर्पक कवितेची आठवण होते. त्यातल्या काही ओळी अशा :
“Home they brought her warrior dead
She nor swoon’d nor utter’d cry
All her maidens, watching, said,
She must weep or she will die.”
वरील शेवटच्या ओळीतून त्या प्रसंगातील रडण्याचे महत्व अधोरेखित होते.
आता मनापासून आलेले रडू आणि केवळ दाखविण्यासाठी उसने आणलेले अश्रू यांची तुलना करण्याचा मोह होतोय. पहिल्या प्रकारात सर्व घटना शरीरधर्माप्रमाणे होतात आणि त्याचा संबंधित व्यक्तीला स्वास्थ्यासाठी उपयोगी होतो. मात्र मनापासून दुःख झालेले नसता केवळ जगाला दाखवण्यासाठी जे अश्रू बळेच आणले जातात, त्यांचा उपयोग फक्त देखाव्यापुरताच असतो ! अशा वरपांगी दुःख प्रदर्शित करण्यावरूनच ‘नक्राश्रू ढाळणे’ हा वाक्प्रचार आलेला आहे. (नक्र म्हणजे मगर. मगर तिचे भक्ष्य खाताना तोंडाने खूप हवा बाहेर सोडते. परिणामी तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात. हे तिचे ‘रडणे’ बिलकूल नसते. मिटक्या मारीत भक्ष्य खायचे असल्यावर रडायचे काय कारण आहे !).
सारांश, रडून दुःख हलके होते. या संकल्पनेचा मानसशास्त्रात देखील वापर केलेला आहे. अनेक जणांच्या मनावर पूर्वायुष्यातील काही वेदनादायी घटनांचा ‘बोजा’ राहिलेला असतो. त्यामुळे त्यांच्या वागण्यात काही अनिष्ट बदल झालेले असतात. अशा लोकांसाठी मानसिक समुपदेशनाचा एक विशेष प्रकार असतो. या बैठकीत समुपदेशक संबंधित व्यक्तीला या घटनेबद्दल मुद्दाम बोलते करतो व अधिकाधिक प्रश्न विचारत राहतो. जशी ती व्यक्ती बोलून मोकळी होत जाते तसे तिला रडू येते. या रडण्याला समुपदेशक अजून उत्तेजन देतो. अशा प्रकारे साचून राहिलेल्या वेदनांचा या रडण्याद्वारे एक प्रकारे निचरा होतो.
डोळ्यातील मूलभूत स्वरूपाचे अश्रू आतील ओलसरपणा राखण्यासाठी महत्त्वाचे आहेत, हे आपण वर पाहिले. हा ओलसरपणा जर काही कारणाने कमी पडला, तर डोळे कोरडे पडू शकतात. गेल्या तीन दशकांत आपल्या जीवनशैलीतील एक महत्त्वाचा घटक यासाठी कारणीभूत झालेला आहे, तो म्हणजे संगणकादि उपकरणांचा वाढता वापर. या महत्त्वाच्या विषयाबद्दल दोन शब्द.
डोळ्यातील ओलसरपणा टिकून राहण्यासाठी अश्रुंच्या उत्पादनाइतकेच डोळ्यांचे ठराविक वेळाने मिचकावणे देखील महत्त्वाचे असते. जेव्हा आपली नजर संगणकाच्या पडद्यावर बरेच तास खिळून राहते तेव्हा या प्रक्रियेत बिघाड होतो. तिथे मुख्यत्वे दोन घटना घडतात :
१. डोळे कमी वेळा आणि अर्धवट मिचकावल्याने डोळ्यातील अश्रूथराचे बाष्पीभवन झपाट्याने होते आणि
२. अश्रूथर संपूर्ण डोळाभर समप्रमाणात पसरला जात नाही.
यातूनच डोळे कोरडे पडण्याची समस्या उद्भवते व डोळ्यांना ताण देखील जाणवत राहतो. या महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण सर्वांनीच जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. त्यादृष्टीने जे सोपे प्रतिबंधात्मक उपाय आहेत ते बहुतेकांना परिचित असतील ( २०-२०-२० इ.).
निसर्गनिर्मित मानवी शरीराची रचना अगदी शिस्तबद्ध आणि स्वसंरक्षक आहे. शरीरात शिरण्याच्या प्रत्येक मार्गामध्ये कुठलातरी स्त्राव पाझरतो. अशा विविध स्त्रावापैकी डोळ्यातील अश्रूबिंदू हा एक. त्यांची वंगणापासून ते उत्सर्जनापर्यंतची कार्ये आपण वर पाहिली. तसेच भावनिक प्रसंगामधील त्यांचे विशेष योगदानही समजून घेतले. सुखद आणि दुःखद अशा दोन्ही प्रसंगी आपण अश्रूधारांना वाट मोकळी करून देत असतो. त्यापैकी आनंदाश्रू वाहण्याचे प्रसंग आपणा सर्वांच्या आयुष्यात येत राहोत, या सदिच्छेसह समारोप करतो !
……………………………………………………………………………………
पूर्वप्रकाशन : मिसळपाव .कॉम, दिवाळी अंक २०२०.
उपयुक्त व चांगला लेख. धन्यवाद
उपयुक्त व चांगला लेख. धन्यवाद.
खूप छान माहिती. तुमचे सगळे
खूप छान माहिती. तुमचे सगळे लेख अभ्यासपूर्ण आणि वाचनीय असतात. धन्यवाद.
उपयुक्त व चांगला लेख. धन्यवाद
उपयुक्त व चांगला लेख. धन्यवाद. +१
छान माहितीपूर्ण लेख.
छान माहितीपूर्ण लेख.
एखादी व्यक्ती रडुबाई असते. छोट्या गोष्टी जरी घडल्या तरी त्या व्यक्तिपूरत्या त्या मोठया असतात आणि मग मुसुमुसु सुरू होतं. मग सल्ले सुरू होतात , रडू नकोस, रडून प्रश्न सुटणार आहेत का ? डोळ्यातले अश्रू आटून जातील एक दिवस वगैरे. असं असणं म्हणजे ती व्यक्ती जास्त भावनाप्रधान असते ना . म्हणजे अशा व्यक्तींमध्ये विशिष्ट हार्मोन्स मुळे असं होत असावं.
संगणक, मोबाईल एकूणच स्क्रिन मुळे डोळे कोरडे होणे हे हल्ली फार ऐकायला येतंय. याबद्दल ही छान लिहिलंय. धन्यवाद.
वरील सर्व नियमित वाचकांचे
वरील सर्व नियमित वाचकांचे आभार !
तुमच्यासारखे अभ्यासू वाचक लाभल्यामुळे लेखन करण्यास हुरूप येतो.
................
म्हणजे अशा व्यक्तींमध्ये विशिष्ट हार्मोन्स मुळे असं होत असावं. >>>
बरोबर.
अशा लोकांची भावनिक मज्जासंस्था अतिसंवेदनक्षम असते.
डॉक्टर, तुमच्या आणखी एका
डॉक्टर, तुमच्या आणखी एका माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद. तुम्ही लेखांना जी शीर्षकं देता, ती सूचक तर असतातच, परंतु त्यांत एक लालित्य असते.
जास्त काळ दुचाकीवरून प्रवास होत असेल तरीही डोळ्यांतील अश्रुथर कमी होतो का?
प्राचीन,
प्राचीन,
धन्यवाद.
जास्त काळ दुचाकीवरून प्रवास होत असेल तरीही डोळ्यांतील अश्रुथर कमी होतो का? >>>
नाही वाटत तसे. उलट अशा प्रवासात सूक्ष्म धूलिकण डोळ्यात आदळण्याची क्रिया तशी जास्तच होते. त्यातून प्रतिक्षिप्त अश्रू वाढण्याचीच शक्यता असते.
माझ्या माहितीत काही जण असे आहेत, की जे दुचाकीवरून जाताना चष्म्याशिवाय सुखाने प्रवास करूच शकत नाहीत. त्यामुळे जरी डोळ्यांना नंबर नसला, तरी ते साध्या काचांचा चष्मा कायम वापरतात.
माहितीपूर्ण सोप्या भाषेत
माहितीपूर्ण सोप्या भाषेत समजावून सांगितलेला लेख.
संगणकावर काम करून डोळे कोरडे पडतात. त्याकरीता महागडे टिअर ड्रॉप मिळतात. पण त्यापेक्षा परिणामकारक असे २०-२०-२० रुटिन सहज साध्य आहे. मायबोलीवरील आ.रा.रा. यांनी याबाबत अनेकदा लिहिले आहे. माझ्याकडूनही ते नियमितपणे होत नाही मात्र नियमितपणे करणे अत्यंत गरजेचे आहे.
लाखो वर्षांच्या संथ उत्क्रांतीनंतर आपण डोळ्याला एकाच पिढीत इतका मोठा झटका देत आहोत - डोळा सोडून इतर कुठला अवयव अश्या इतक्या मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे/गेला आहे?
ट स
ट स
धन्यवाद.
डोळा सोडून इतर कुठला अवयव अश्या इतक्या मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे/गेला आहे?
>>>>
रोचक प्रश्न. उत्क्रांती या विषयात डूबकी न मारता एक वरवरचे निरीक्षण नोंदवतो. ते म्हणजे- मेंदू आणि हात यांचा आपला वापर. जर आपण प्राण्यांची याबाबतीत आपली तुलना केली, तर ते जाणवते. चतुष्पाद ते द्विपाद होताना आपल्याला ‘हात’ मिळाला. मेंदू आणि हात यांचा वापर आपण प्राण्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक आणि विविध प्रकारे (चांगल्या आणि वाईट दोन्ही कामांसाठी) करीत आहोत.
इथे वपुंची हात-चोरीची गोष्ट आठवते !
चांगला लेख.
चांगला लेख.
टवणे सर , २० २० २० हा काय प्रकार आहे
जाई,
जाई,
1. संगणकावरील काम बराच काळ चालणार असल्यास दर तासाने लांब बघत २-३ मिनिटे डोळे मिचकवयाचे.
2. दर २० मिनिटांनी २० फूट लांब अंतरावरील वस्तूकडे २० सेकंद बघायचे.
3. पडद्यावर जो मजकूर आपण वाचत असू तो थेट नजरेसमोर न ठेवता नजरेच्या खालच्या टप्प्यात ठेवायचा.
नेहमीप्रमाणे सुंदर लेख
नेहमीप्रमाणे सुंदर लेख कुमारदा
ओके डॉक्टर !
ओके डॉक्टर ! धन्यवाद
कुमार सर,
कुमार सर,
माहितीपूर्ण सोप्या भाषेत समजावून सांगितलेला लेख. ++ १११
अनेकदा "२०-२०-२० रुटिन " शक्य नाही होत. + अश्रूनिर्मिती ही शरीरासाठी उपयुक्त ठरते ===> कांदा चिरणे हा उपाय करता येईल का ?
चांगला लेख. नक्राश्रू आणि
चांगला लेख. नक्राश्रू आणि भावनावेगाने येणारे अश्रू यांमागची कारणे रोचक आहेत.
काँटॅक्ट लेन्स लावल्या असतील् तर कांदा झोंबत नाहीच. पण भावनावेगाने रडू आले तरी अश्रू डोळ्यांतून बाहेर पडत नाहीत असा अनुभव आहे.
ओह, कॉन्टॅक्ट लेन्समुळे असे
ओह, कॉन्टॅक्ट लेन्समुळे असे होते हे माहीत नव्हते.
चांगला लेख.
चांगला लेख. छान माहीती.
मला तर राग आला तरी डोळ्यात पाणी येते. समोरच्या व्यक्तीला सांगावे लागते कि मी रडत नाहीये पण डोळ्यात पाणी येतेय ..मग भांडण सूरू
रडवणारा चित्रपट असेल तर रूमाल घेऊनच बसते. किती वाईट! किती वाईट वाटले! म्हणत डोळे टिपते
वरील सर्व नियमित वाचकांचे
वरील सर्व नियमित वाचकांचे आभार !
* कमला, आभार !
* सतीश,
नाही ! भावनावेगाने उत्स्फूर्त निर्माण झालेले अश्रू शरीरासाठी उपयुक्त असतात. मुद्दामहून कांदा चिरून आणलेले नाही.
* भरत,
लेन्सचा अनुभव रोचक वाटला.
* सोनाली, तुमचाही अनुभव रोचक !
नेहमप्रमाणेच छान लेख
छान लेख
लेख आवडला . तुम्ही लेखन
लेख आवडला . तुम्ही लेखन माहितीपर असूनही अजिबात कंटाळवाणे होऊ देत नाही , शिवाय लेखात एक सकारात्मक आशय जाणवतो. टेनिसन यांची कविताही समर्पक ,लेखाच्या समाप्तीचे वाक्य ही सुरेख !
मी सध्या खूपच हळवा झालोय.
मी सध्या खूपच हळवा झालोय. म्हणजे पहिल्यापासूनच आहे. मला हळव्या क्षणात रडू येणार नाही असा काहीतरी उपाय सांगा.
चांगला लेख. छान माहीती....+1.
चांगला लेख. छान माहीती....+1.
तुम्ही लेखन माहितीपर असूनही
तुम्ही लेखन माहितीपर असूनही अजिबात कंटाळवाणे होऊ देत नाही +++
वरील सर्व नवीन प्रतिसादकांचे
वरील सर्व नवीन प्रतिसादकांचे मनमोकळ्या अभिप्रायाबद्दल मनापासून आभार !
* बोकलत,
तुमच्या प्रश्नाबाबत इथून काही सांगणे योग्य नाही. एखाद्या समुपदेशकाचा सल्ला जरूर घ्यावा.
शुभेच्छा.
उपयुक्त व चांगला लेख.
उपयुक्त व चांगला लेख.
डॉक्टर,
सकाळी झोपेतून उठल्यावर डोळ्यांच्या आतील कडांना जे कोरडे झालेले चिकट द्राव निघून येते त्याचा अश्रूंच्या प्रमाणाशी संबंध असतो का ?
साद, सकाळी झोपेतून उठल्यावर
साद,
सकाळी झोपेतून उठल्यावर डोळ्यांच्या आतील कडांना जे कोरडे झालेले चिकट द्राव निघून येते
>>>>>
रात्रीच्या झोपकाळात डोळ्यातील अश्रूंमध्ये म्युकस, त्वचेच्या त्याज्य पेशी आणि स्निग्ध पदार्थ हे सर्व मिसळून ‘चिपाड’ तयार होते.
दिवसा अश्रू व पापण्यांची हालचाल यामुळे असे काही साठून न राहता धुतले जाते.
चिपाडनिर्मिती हा डोळ्यांच्या दैनंदिन स्वच्छता प्रक्रियेचा भाग आहे.
मी सध्या खूपच हळवा झालोय.
मी सध्या खूपच हळवा झालोय. म्हणजे पहिल्यापासूनच आहे. मला हळव्या क्षणात रडू येणार नाही असा काहीतरी उपाय सांगा.
+
अन मी कांदा चिरून अश्रूनिर्मिती प्रयत्न करत होतो......
पुलं च व्यक्ती अन वल्ली मानवी आरोग्य ह्या विभागातही लागू पडते....
सतीश,
सतीश,
तुम्ही ‘व्यक्ती आणि वल्ली’ हा चांगला मुद्दा काढलात. सहमत आहे.
या संदर्भात प्रसिद्ध इंग्लिश लेखक सॉमरसेट मॉम यांचा किस्सा सांगतो. ते स्वतः डॉक्टर असूनही त्यांनी लेखनावरच उपजीविका केली. ते म्हणायचे,
“मला त्याबद्दल अजिबात खंत नाही. माझ्या वैद्यकीय शिक्षणामुळेच मला मानवी स्वभावाच्या विलक्षण गुंतागुंती नीट समजायला मदत झाली. मी जर अन्य कुठलाही पदवीधर असतो, तर इतके प्रभावी लिहू शकलो नसतो !”
तर इतके प्रभावी लिहू शकलो
तर इतके प्रभावी लिहू शकलो नसतो !” ==>
आम्हीही तुमच्या लिखनाला....
कुमार सर डोळ्यासंबंधित एक
कुमार सर डोळ्यासंबंधित एक प्रश्न - चष्म्याचा नंबर वाढू नये म्हणुन काय काळजी घ्यावी? आहार, व्यायाम , गॅझेट चा कमी वापर इत्यादी
Pages