पहिला भाग - https://www.maayboli.com/node/77294
----------------------------------------------------------------------------
"मनू! ते नवीन चेअरमन भेटायला येणार आहेत. खरतर मी स्वत: आग्रह करून बोलावलं आहे त्यांना. तू ही येते का बाहेर? तेवढीच भेट होईल." आबांनी अंगणातून ओरडून मला हाक दिली होती.
नवीन चेअरमन ते कशासाठी? मला काही समजेना.
"आबा, कोण नवीन चेअरमन? मला काहीच समजले नाही." मी कपडे बदली करून, ओले कपडे तिथेच एका दांडीवर वाळत टाकत तडक अंगणामध्ये आले.
"अगं, शाळेची जमीन एका जमीनदाराची होती. त्यांना पैश्याची अडचण होती, म्हणून ती जागा त्यांनी विकली. मग शाळेच काय करायचं ? हा प्रश्न उभा राहीला. बंद करायची वेळ आली होती, पण योगायोग बघ... एका सद्गृहस्थाने तीच जागा विकत घेतली... आणि परत शाळेच्या नावे सुपूर्द केली. माझ्या आग्रहावरून आज ते भेटायला येत आहेत इथे." नेहमीप्रमाणे समोर पेपरमध्ये डोकं घालून आबा सकाळच्या बातम्या संध्याकाळी वाचत होते.
"आबा एवढी मोठी गोष्ट तुम्ही याआधी मला केव्हाच सांगितली नाही. "
" शाळेच्या काही गोष्टी खाजगीत ठेवाव्या लागतात. त्यात वयोमानानुसार मी ही आजकाल खूप काही विसरत चाललोय ग. तुझे आबा म्हातारे झाले आता. " म्हणत आबा त्यांच्या जाडजूड चष्म्याच्या काड्या वरती करत हसले.
एवढ्यात ते नवीन चेअरमन येऊन बसले, तिथे अंगणातच असलेल्या झोपाळ्यावर त्यांच्या आणि आबांच्या गप्पा-ठप्पा रंगल्या देखील. त्या आधीच मी, "बरं बरं.... चहा घेऊन येते." म्हणत आतमध्ये स्वयंपाकघराकडे वळले होते.
" मनू! चहा? "
आबांच्या आवाजासरशी मी चहाचा ट्रे घेऊन अंगणात आले. चहा ठेवून बसणारच एवढ्यात आबांनी आमची ओळख करून दिली,
"हे 'मिस्टर तांबे' नवीन चेअरमन... आणि ही माझी मुलगी मनस्विनी. आपल्या शाळेत शिक्षिका आहे. "
'मी नमस्कार म्हणण्यासाठी हात जोडून वरती पाहिले, आणि मला काही म्हणण्याची हिम्मत झालीच नाही. नुसतेच हात जोडून मी मिनिटभर आवासून बघतच राहिले. हे 'मिस्टर तांबे'? एक जुनी ओळख होती. त्याची, एका पावसाची आणि माझी... पुढचे काही आठवण्याची हिम्मत माझ्यामध्ये आत्ता उरली नाही. मान खाली घालून मी नुसती बसून राहिले. कारण त्याच्याही नजरेत ओळखीची झलक होती. जुनी ओळख. वर्षानुवर्षांची...'
“मला उशीर होतोय आणि आभाळ भरून आलंय, त्यामुळे पाऊस येण्याचे चिन्ह ही दिसत आहे.... निघतो मी. पुन्हा केव्हातरी भेटू. " म्हणत ते उठले.
आत माजघरात असलेल्या जुन्या टेलिफोनची रिंग वाजत होती.
"एक महत्वाचा फोन येणार होता. तोच असेल बहुदा. मलाच जाऊन पाहावं लागेल." म्हणत आबा ही त्यांचा निरोप घेऊन आत वळले.
जाताना, "मनू पाहुण्यांना गेटपर्यंत सोडून ये. " अशी आज्ञा करून गेले.
मी एकही शब्द न बोलता बाजूची एक छत्री घेऊन त्यांच्यासोबत गेटपर्यंत आले, गेटजवळ एक जुनी जिप्सी कार उभी होती. येतो म्हणत ते दरवाजा उघडणार तेवढ्यात अचानक पावसाला सुरुवात झाली होती.
"पाऊस आहे, जा तुम्ही. मी निघतो." म्हणत त्यांनी माझ्याकडे पाहिलं.
"होय. पहिला पाऊस आहे." उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून मी बोलून गेले.
"पहिला नाही... कपाशीचा पाऊस...बरोबर ना?" म्हणत त्यांनी परत माझ्याकडे पाहिलं आणि मी अगदी निःशब्ध झाले.
"राजन." एवढा एकच शब्द माझ्या तोंडून निघाला. छत्री सावरत मी मागे वळणार तोच जोराची वीज चमकली, बेभान वार्याने माझी छत्री उलटी-सुलटी केली होती. तिला सावरण्याची धडपड करत मी जागीच खिळले.
"अजून विजेला घाबरतेस? " म्हणत त्याने माझ्या हाताची छत्री स्वतःचा हातात घेत तिला सरळ केले. परत बंद करून माझ्या हातात देत पुढे म्हणाला,
"आज परत एकदा भिजवास वाटतंय, अगदी त्या दिवशी सारखं, ना विजेची भीती… ना वार्याचे भय, उनाड लहान मुलाच मन घेऊन सैरभैर धावत सुटावं... रानोमाळी. ते ही तुझ्यासोबतीने."
"का आलास परत?" मी रागारागाने प्रश्न केला.
"यावंच लागलं. माहित होत मला, कोणीतरी वाट पहाताय माझी... आणि नाही नाही म्हंटल तरी त्या कपाशीच्या पावसाचीही. "
त्याच्या उत्तराने माझा राग कुठल्या कुठे पळाला होता. त्याचा हात हातात घेत मी भरल्या आभाळाकडे पाहिले.
'खरच भिजायचं. अगदी त्या दिवशी सारखं, लहान मुलं होऊन."
त्यानेही मानेने होकार भरला आणि तसेच आम्ही निघालो... त्या कपाशीच्या पावसाचा आनंद घेत. ना विजेची भीती… ना वार्याचे भय.
दोन पावलं चालताच तो मध्येच थांबला. मी मानेने काय झालं म्हणून विचारताच म्हणाला,
"मनू. आज परत तेव्हासारखं कुणी पाहिलं तर? काय म्हणतील लोक? "
मी ही दोन मिनिट स्तब्ध झाले, मग हसून त्याला म्हणाले,
"आता तुला कोणीही शाळेतून हाकलून देऊ शकत नाही. कारण आता शाळाच मुळी तुझी आहे. आणि...आणि..."
"होय. तेव्हा शाळेतून काढलं नसत तर, तो राजू आता मिस्टर राजन तांबे झाला नसता. तुझ्या आबांचे आभारच मानायला पाहिजेत." म्हणत तो ही हसला.
"होय. पण आबांनी तुला ओळखलं कस नाही?'' मी माझ्या मनातलं आश्चर्य व्यक्त केलं.
तो अजूनच मोठ्याने हसून म्हणाला,
"ओळखल्याशिवाय तो महत्वाचा फोन घ्यायला ते गेले का? त्यांनी केव्हाच ओळखलं मला. तस बोलूनही दाखवलं. त्यावेळेसही ते माझ्यासाठी उभे होते. पण शाळेच्या नियमांपुढे कुणाचे काही चालले नाही."
"म्हणजे आबांनी त्यासाठी मला तुला गेटपर्यंत सोडायला सांगितलं तर? " माझा अजूनही विश्वास बसत नव्हता.
"होय. चल... पुन्हा एकदा शाळेत जाऊ."
आम्ही दोघेही शाळेच्या दिशेने निघालो. आज कपाशीच्या पावसाची मला भीती नाही, किवा कोणीतरी पाहिलं त्याची लाज ही नाही. आज कोणी विचारलं तर, अगदी गौरीने जेवढ्या निर्भीडपणे गणेशाची साथ दिली, तेवढ्याच हिमतीने ओरडून-ओरडून सांगेन त्यांना,
' होय। आवडतो मला तो, आणि त्यालाही मी आवडते, आणि आम्हाला दोघांना आवडतो हा बरसणारा कपाशीचा पाऊस.'
समाप्त
©सर्व हक्क लेखिकेस्वाधिन
https://siddhic.blogspot.com
सुंदर शेवट..आवडली.
सुंदर शेवट..आवडली.
मस्त ! शेवट सुखाचा व आनंदाचा
मस्त ! शेवट सुखाचा व आनंदाचा झाला हे फार आवडले.
सिद्धी... कथा छान!
सिद्धी... कथा छान!
प्रेमभावना खूप उत्कटतेने मांडतेस कथेत!!
शेवट खूप छान झाला.. आवडली
शेवट खूप छान झाला.. आवडली
छान कथा ... आवडली
छान कथा ... आवडली
शेवट सुखाचा व आनंदाचा झाला हे
शेवट सुखाचा व आनंदाचा झाला हे फार आवडले.>> +11
तसंही तुझ्या कथांचा शेवट छान हळूवार असतो.
Full of emotions.
खूप छान कथा!
खूप छान कथा!
मनु हे नाव आल्याने विशेष आनंद झाला.
Chan
Chan