बांद्रा वेस्ट १५
समोरुन पोलिसांची व्हॅन येत होती. मॉन्ट्याने गाडीचा वेग थोडा कमी केला.
" मॉन्ट्या, बाईक स्लो नको करुस. फास्ट जाऊ दे. "
" पागल आहेस काय ? असं केलं तर उगाच त्यांना संशय येईल. " मॉन्ट्याचे म्हणणे बरोबरच होते. रस्ताही अरुंद होता. पोलीस पेट्रोलव्हॅन जवळ आली. मॉन्ट्या खाली बघुन बाईक चालवु लागला. जवळ जातो तोच पोलीसांनी त्यांची गाडी आडवी घातलीच. पिवळा-लाल फिरणारा प्रकाश दोघांच्याही चेहऱ्यावर पडला होता. " काय रे ए...? कुठे चाल्लाय एवढ्या रात्री ? आं.....? " समोरच्या सिटवर बसलेल्या पोलीसाने त्यांना हटकलेच...!
" काय नाय साहेब , असंच इथेच जातोय .... " मॉन्ट्या काहीतरी बोलुन गेला. खरं तर आतुन भयंकर घाबरला होता. खाली पाय लटपटत होते.
" इथंच कुठं ? " समोरुन अपेक्षीत प्रश्न आलाच.
" ते.... हेेे..... आपलं ..... हॉस्पीटलला.... मित्राची तब्येत बिघडलीय. " जे सुचेल ते त्याने बोलुन टाकलं .
" कुणाची ? ह्याचीच का ? " पोलीसाने मागे रॉड्रीककडे बघत विचारलं. रॉड्रीकने आपल्याजवळचा बॉक्स् कुणाच्या लक्षात येणार नाही अशा रितीने बसल्याबसल्याच दोन मांड्यांच्या मधे सरकवला. आणि पडत्या फळाची आज्ञा म्हणुन बरं नसल्यासारखं तोंड केलं. पोलीस त्यांच्या गाडीत बसुनच चौकशी करु लागले.
" काय होतंय ह्याला ? " शेवटी पोलीसच ते ! सहज सोडणारच नव्हते.
" काय होतंय..... हां ... चक्कर येतेय . "
" कशी काय ? "
" कशी काय... आता त्यासाठी हॉस्पीटलला जातोय ना साहेब. "
" बरं... बरं... कुठल्या हॉस्पीटलला जातोय...?
" हे इथेच.... रामकृष्ण मिशन हॉस्पीटलला. "
" ठिक आहे.... नावं काय आहेत रे तुमची... " असं म्हणुन समोरच्या पोलीसाने त्याच्याजवळची एक छोटी डायरी आणि पेन काढलं. ' आता आपली खरी नावं सांगायची की खोटी...? पण नुसती नावं खरी सांगितल्याने काय फरक पडणार आहे...? आपला तर दुसरा कसला क्रिमीनल रेकॉर्ड नाही ... त्यामुळे खरी नावंच सांगणं योग्य, उगाच संशयाला जागा नको.... ' मॉन्ट्या असा विचार करत असतानाच त्या पोलीसाचा परत मोठा आवाज आला , " अरे ए... नावं सांगा की ... "
" म...मनोज म्हात्रे...., आणि रॉड्रीक डिमेलो... " समोरच्या हवालदाराने दोन्ही नावं डायरीत लिहुन घेतली.
" ठिक आहे... चला निघा आता... " असं म्हणुन हवालदाराने त्यांना निघायला सांगितलं. दोघांनीही मनातल्या मनात सुटकेचा निश्वास टाकला.' थँक गॉड... ' मॉन्ट्याने लगेच गाडी चालु केली. गियर टाकला , पुढे निघणार इतक्यात - “ अरे थांबा …” व्हॅनच्या मागून एक हवालदार उतरला . तो त्यांच्या गाडीजवळ आला . रॉड्रिकच्या काळजात एकदम धस्स झालं . ‘ आयला , हा आता कशाला उतरला ? ‘ सुटला तर हत्ती सुटतो पण , अडकलं तर शेपूटही अडकतं … आताही तसंच काहीसं झालं .
“ काय रं … ? परवा रात्री बांद्रा स्टेशनात तूच होता ना ? “ हवालदार रॉड्रिकला निरखून पाहत विचारू लागला .
“ मी … मी नाही … “ रॉड्रिकला काय बोलावं ते समजेना . आता परवा रात्रीचा तो हवालदार इकडे कुठे टपकला ?
“ तूच होतास कि …! फुल दारू पिला होतास . मीच अडवलं होतं तुला … आठवलं का ? पण तुला आता कसं आठवंल ? मघाशी तुझं नाव सांगितलंस तवा माझ्या डोक्यात ट्यूब पेटली . म्हनलं हा तोच बेवडा … ! “ हवालदार जवळ येत म्हणाला . त्यावर आता रॉड्रिक काय बोलणार ?
“ आरं , चांगल्या घरातला वाटतोस ! इतकी कशाला रे प्यायची ? हे चक्कर बिक्कर जास्त दारू प्याल्यामुळे आली आसंल . आजपण पिलास काय ? “ असं म्हणून तो हवालदार वास घेण्यासाठी आणखी जवळ आला . रॉड्रिकच्या जवळ असलेला बॉक्स खरं तर इतकाही लहान नव्हता कि तो दोन मांड्यांच्या मध्ये लपवता येईल ! त्या हवालदाराची त्यावर नजर पडलीच .
“ हे काय आहे रे ? “ संशयाने त्याने विचारलंच .
“ हे …. हे…. ते…. औषधं आहेत . “ रॉड्रिकची चांगलीच बोबडी वळली .
“ बघू , कसली आहेत औषधं ? “ , म्हणून त्याने बॉक्सला हात घातलाच !
“ अहो … काही नाही साहेब … साधी औषधं आहेत . “ रॉड्रिक जमेल तेवढं टाळण्याचा प्रयत्न करत होता . पण त्याच्या आता लक्षात आलं कि आता सगळं संपलेलं आहे . हवालदाराने तो पेपर मध्ये गुंडाळलेला बॉक्स हातात घेतला . वरचा पेपर काढला . रॉड्रिकने आणि मॉन्ट्याने डोळे मिटून घेतले . आता ते वाट बघत होते कि या सगळ्याचा स्फोट कधी होतोय … आणि तो अपेक्षेप्रमाणे तसा झालाच !
“ अरे , हे काय … ? साहेब , लवकर या . पावडर आहे ह्यात … ! ए … थांब …. कुठं पळताय हरामखोरांनो … ! “ म्हणत त्याने मॉन्ट्याच्या खाडकन एक कानाखाली लावली . त्यासरशी तोल जाऊन ते दोघेही गाडीसकट खाली पडले .
“ ए पाटील , बाहेर ये , साहेब लवकर या , ह्यांच्या आयला … ! “ हवालदार आरडाओरडा करू लागला . तसे गाडीतून पोलिस बाहेर आले . रॉड्रिक आणि मॉन्ट्या उठण्याचा प्रयत्न करत होते. उठता उठता त्यांनी वर बघितलं . एखाद्या डोंगराकडे बघावं तसं त्यांनी समोरच्या पोलिस ऑफिसर कडे पाहिलं . उंची साडेसहा फुट , मजबूत देह यष्टी , भरदार मिश्या , डोक्यावर थोडसं टक्कल पडलेलं , डोळ्यातून आग बाहेर पडेल कि काय असं वाटत होतं आणि एक हात कमरेवर ठेवून समोरचा पोलिस ऑफिसर उभा होता . गाडीच्या वर लावलेल्या त्या फिरणाऱ्या लाल - पिवळ्या प्रकाशात छातीवरची त्याच्या नावाची प्लेट चमकत होती . - सहायक पोलिस निरीक्षक - ध. मा . जामसंडे .
क्रमशः
माझी अर्धदशक नावाची कादंबरी वाचण्यासाठी खाली लिंक दिली आहे
https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ARDHADASHAK/3048.aspx
Amazon link
https://www.amazon.in/Ardhadashak-Milind-Mahangade/dp/9353174163/ref=sr_...
Flipkart Link
https://www.flipkart.com/ardhadashak/p/itm7149b4896e81d?pid=978935317416...
बुडत्याचा पाय खोलात. ...
बुडत्याचा पाय खोलात. ...
अरेरे,,, सापडली पोर आता
अरेरे,,, सापडली पोर आता
अर्र!
अर्र!