राक्षस
`पितृछाया` बंगल्याचे गेट उघडून मी अंगणात पाऊल टाकले. बंगल्याकडे एक नजर टाकली. बंगल्याची संपूर्ण रयाच गेलेली होती. बंगल्याचा मालक कफल्लक झाला होता वगैरे काहीही परिस्थिती नव्हती. तो श्रीमंतच होता. मात्र गेले सात-आठ वर्ष आजारी होता; गेले दोन वर्ष तर अंथरुणावरच होता. जवळचं असं कुणी जवळ नव्हतं. आणि मी, त्याचा so called मित्र, एक डॉक्टर होतो. रोजच्या माझ्या visitसाठी मी त्या बंगल्यात शिरत होतो.
माझ्या जवळच्या किल्लीने मी latch उघडून घरात शिरलो. थेट अंकुशच्या खोलीत शिरलो. अपेक्षेप्रमाणे अंकुश वेदनेने विव्हळतच होता. साठीलाही अजून न पोचलेला अंकुश अगदी गलीतगात्र होऊन कमालीचा वृद्ध वाटत होता.
मी त्याच्या जवळ बसलो. क्षीण आवाजात अंकुश म्हणाला,
``हे काय होऊन बसलं रे... आता... आता माझी आशा संपत चालली आहे. मला नाही वाटत आता मी जास्त जगेन.``
``नाही अंकुश, अजून किमान दहा-एक वर्ष तरी तुला जगायचं आहे. जगावंच लागेल.`` मी त्याला म्हणालो. यावर त्यानं काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
माझं मन भूतकाळात गेलं. खूप दूर. अगदी माझ्या विद्यार्थीदशेत.
पाचवीत नव्या शाळेत गेलो आणि माझा अंकुशशी परिचय झाला. नाही, अंकुश माझ्या वर्गात नव्हता. पण आमची आडनावे अशी काही जवळ होती, की पाचवीपासून प्रत्येक वर्षी अंतिम परीक्षेला त्याचा नंबर बरोब्बर माझ्या मागच्या बाकावर येत असे. पाचवीच्या अंतिम परीक्षेत पहिल्या पेपरला माझा त्याचा पहिला परिचय झाला.
माझ्या एकूण अवतारावरून मी अभ्यासू मुलगा असल्याचं अंकुशनं अचूक ओळखलं, आणि त्याच्या एकूण अवतारावरून अंकुश अगदी वाया गेलेला, गुंड प्रवृत्तीचा मुलगा असल्याचं मी ओळखलं. पेपर चालू होण्याच्या काही मिनिटे आधी अंकुशनं मला माझा उत्तरांचा पेपर अधून मधून दाखवण्याबद्दल सरळ सरळ धमकावलं. त्याच्याकडे असलेला धारदार चाकू की सुराही त्यानं मला सहज दाखवतोय, असं दर्शवत दाखवला होता. साध्या, सरळ, शामळू आणि खरं तर अगदी बुळ्या असलेल्या मला यास नकार देणं शक्यच नव्हतं. पेपर चालू झाल्यावर अधून मधून मला मागून हलकेच धपाटे मिळू लागले. मग समोरच्या शिक्षकांचे लक्ष जाणार नाही अश्या प्रकारे मी त्याला उत्तरे दाखवू लागलो. अर्थात अंकुश केवळ माझ्यावर अवलंबून नव्हता. शरीराच्या विविध भागावर महत्वाची उत्तरे लिहिणे, गाईडची पाने इकडे तिकडे लपवणे वगैरे उपद्व्यापही त्यानं केलेले होतेच. त्यामुळे त्यात असलेल्या मजकुरांवर प्रश्न असतील तर त्याचे तो लिहित होताच. अश्या प्रयत्नांनी तो काठावर का होईना प्रत्येक वर्षी पास होत होता आणि दहावीपर्यंत अगदी प्रत्येक वर्षी मला हा त्रास सहन करावा लागला होता. अर्थात पाचवीलाच मी त्याला संपूर्ण सहकार्य केले असल्याने पुढील कोणत्याही वर्षी मला धमकावणे वगैरे त्याला करावे लागले नव्हते. तो मला व्यवस्थित रिस्पेक्ट देऊ लागला होता. परीक्षेपुरते मला त्यानं त्याचा मित्रच मानलं होतं. शिवाय परीक्षा संपल्यावर आमचा कोणताच संपर्क राहत नव्हता. त्यामुळे मीही फारसा त्रासलो नव्हतो.
डॉक्टर व्हायचं माझं स्वप्न असल्यानं दहावीनंतर मी science घेतलं आणि अपेक्षेप्रमाणे आमचा संपर्क संपला. पुढे मी डॉक्टर झालो आणि माझं राहतं गाव सोडून पुण्याला परंतु पुण्याच्या बऱ्यापैकी outsideला एका बऱ्यापैकी लोकसंख्येच्या भागात माझं क्लिनिक सुरु केलं. येथे येऊनही आता तीन-चार वर्षं झाली होती. माझं एक चांगला डॉक्टर म्हणून या भागात नावही झालं होतं. अधून मधून काहीतरी कारणांनी अंकुशची आठवण येत होती. तो आताशा मोठा गुंड वगैरे झाला असेल अशी माझी कल्पना होती.
अश्याच एका दिवशी, क्लिनिकमध्ये पेशंट बघत असताना समोर एक हडकुळा, गरीब तरुण मला दिसला. प्रथम मी त्याला ओळखलंच नाही. पण त्यानं मात्र मला अचूक ओळखलं. माझ्याही काही क्षणात लक्षात आलं. तो अंकुश होता.
मग त्यानं त्याची सारी कहाणी मला सांगितली. तो पुढे विशेष शिकू शकला नव्हता. काम-धंदाही काही करू शकला नव्हता. तो यासंदर्भातच मला भेटायला आला होता. या भागात अनेक बंगले होते. ज्येष्ठ नागरिकही मोठ्या प्रमाणात होते. या घरांमध्ये, या लोकांसाठी लागेल ते काम करण्याची त्यानं तयारी दाखवली. मी लोकांना त्याची ओळख करून द्यावी अशी त्याची माझ्याकडून अपेक्षा होती.
मी अंकुशला जसं आणि ज्या स्वरुपात पाहिलं होतं, ते पाहता त्याला कुणाला कामासाठी recommend करणं, खरं तर अवघडच होतं. पण आत्ताच्या आमच्या चर्चेवरून तो आता बदललेला वाटत होता. त्याची सगळी मस्ती जिरल्यासारखी वाटत होती.
आमच्या पुढील काही भेटीत तो खरोखरच सुधारला असल्यासारखं मला वाटलं, आणि मी त्याला त्या भागातील काही लोकांची काही किरकोळ कामं मिळवून दिली. हळूहळू त्याला माझी ओळख न सांगताही कामं मिळू लागली. अधून मधून तो मला भेटायला येत होताच.
याच भागातील एक कुटुंब म्हणजे तपस्वी कुटुंब. पती-पत्नी तसे म्हातारपणाकडेच झुकलेले. मुख्य म्हणजे त्यांच्या वयापेक्षा एकुलत्या एक परंतु बौद्धिक वाढ न झालेल्या मुलाच्या सेवेनं मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खचून ते अधिक वृद्ध वाटत होते. त्यात मुलाचा विचार करून त्यांनी एका खेडेगावातील अगदी साधी मुलगी पाहून आपल्या मुलाचा विवाहही करून दिला होता. आर्थिक बाबतीत मात्र काहीच अडचण नव्हती. आपल्या बंगल्याच्या एक भागात त्यांनी एक दुकानही उघडले होते. पुण्याच्या बाहेरच्या भागात ही सारी वस्ती असल्याने दैनंदिन व्यवहारात लागणाऱ्या असंख्य गोष्टी या दुकानात त्यांनी विक्रीस ठेवल्या होत्या, ज्यांची गरज आजूबाजूच्या प्रत्येकास वारंवार लागत होतीच. त्यामुळे हे दुकानही चांगले चालत होते. आजोबा-आजी सुनेच्या मदतीने दुकान चालवत होतेच, पण एका कायमस्वरूपी मदतनिसाची जेव्हा त्यांना गरज भासू लागली तेव्हा त्यांनी अंकुशला त्याबद्दल विचारलं.
अंकुशनं हा प्रस्ताव स्वीकारला आणि संपूर्ण वेळ पगारी नोकरी त्यांच्याकडे करू लागला. हळूहळू अगदी घरातलाच एक होऊन त्यानं घरातल्या सगळ्यांचा विश्वास संपादन केला. एक-दोन वर्षे उलटली आणि एक दिवस अचानक तपस्वींचा मुलगा मृत्यू पावला. अंकुश आता तपस्वी पती-पत्नीचा अगदी जवळचा आधार झालेला असल्याने त्यांनी त्यांच्या सुनेशी विवाहाचा प्रस्ताव अंकुशसमोर ठेवला, जो अंकुशनं स्वीकारला. हा सारा काळ मलाही अंकुशमध्ये तो पूर्वीचा अंकुश कुठेच दिसत नसल्यानं मलाही तपस्वी कुटुंबाचा हा निर्णय योग्य वाटला. असेच काही महिने उलटले आणि तपस्वी दाम्पत्य माझ्याकडे आले. प्रकृतीच्या काही तक्रारी घेऊन.
बोलता बोलता तपस्वी आजोबा म्हणाले, ``अंकुशने आता आमचे घर आणि व्यवसाय, दोन्हीही खूप चांगले सांभाळले आहे. आमच्या मुलीसारख्या सुनेलाही त्यानं चांगलं ठेवलं आहे. आम्ही दोघेही आता खूप थकलेलो आहोत. तेव्हा आता आमची सगळी property अंकुशच्या नावावर करायचं आम्ही ठरवलं आहे.``
आजोबांचं हे बोलणं ऐकून मात्र मी एकदम सावध झालो. मी त्यांना म्हणालो,
``माफ करा आजोबा, हा तुमच्या घरातील प्रश्न आहे. पण तरीही एक सांगावसं वाटतं. तुम्ही तुमचं सारं अंकुशच्या नावानं न करता तुमच्या सुनेच्या नावानं करावं असं मला वाटतं. असं मला का वाटतं ते मी सांगू शकत नाही, पण वाटतंय एवढं खरं...``
``ठीक आहे. विचार करतो,`` असं म्हणून आजोबा-आज्जी माझ्या क्लिनिकच्या बाहेर पडले.
साधारण पंधरा-एक दिवसात मी क्लिनिकमध्ये शिरलो तेव्हा तेथे अंकुश बसलेला मला दिसला. पण नेहमीसारखा शांत न दिसता, कमालीचा उत्साही दिसला. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकलीच.
मी माझ्या केबिनमध्ये शिरताच नेहमीप्रमाणे अदबीने `आत येऊ का?` वगैरे न विचारता अंकुश माझ्या मागोमाग आत शिरला आणि माझ्या खुर्चीसमोरच्या खुर्चीवर बसता झाला. असं सारं त्यानं पहिल्यांदाच केलं होतं.
``मित्रा... माझं ध्येय पूर्ण झालं. इतक्या वर्षांच्या माझ्या कष्टांचं चीज झालं. म्हाताऱ्यानं सारं माझ्या नावावर केलंय. आता फक्त म्हाताऱ्यानं लवकर राम म्हटला पाहिजे. शाळेत करायचास तशी आता मला मदत कर. काहीतरी औषध दे आणि संपव या दोघाही म्हाताऱ्याना!``
मी जे ऐकत होतो त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. अंकुश अजिबात बदलला नव्हता. तो गेली काही वर्ष जे काही करत होता, जसं काही वागत होता, तो सगळा त्याचा अभिनय होता. त्याच्या पुढच्या सगळ्या बोलण्यातूनही मला सारा उलगडा झाला. त्यानं या कॉलनीतील लोकांचं व्यवस्थित निरीक्षण केलं होतं. बहुतेक लोकांकडे खूप पैसा होता. अनेक मंडळी ज्येष्ठ नागरिक होती. त्याच्या गळाला कोण लागतं एवढाच त्याच्यापुढे प्रश्न होता. एकूणच परिस्थितीने पिडलेले तपस्वी दाम्पत्य त्याच्या अगदी सहज गळाला लागले होते.
शाळेत असताना अंकुशला झिडकारून टाकणं जसं मला जमण्यासारखं नव्हतं, तसंच आत्ताही उघड उघड त्याला विरोध करणं मला शक्य नव्हतं. कारण आत्ता माझ्या समोर बसलेला अंकुश हा तोच पूर्वीचा अंकुश होता. अर्थात त्याच्या खुनशीपणात प्रचंड वाढ झालेला. त्याच्यातील राक्षस मला अगदी समोर साकार झालेला दिसत होता.
``अंकुश, मी एक डॉक्टर आहे. मला असं काही करणं शक्य नाही.`` मी एवढंच बोललो. मग अंकुश त्यावर काहीही बोलला नाही. तो खूपच आनंदी मूडमध्ये होता. शिवाय त्याच्याकडे इतर काही पर्याय उपलब्ध असावेतच.
नंतरही अंकुश अधून मधून माझ्याकडे येत राहिला. प्रत्येक वेळी त्याचे बोलणे माझ्यावर कमालीचे दडपण आणत होते. त्यानं आता आजोबा-आजींचा कमालीचा छळ चालवला होता. तो बायकोवर- वासंतीवरही हात टाकत होता. साधी-सरळ ही मंडळी त्याच्यातील अचानक समोर आलेल्या राक्षसाला पाहून अगदी घाबरूनच गेली होती. त्यानं इतका दरारा निर्माण केला होता, की या सगळ्याची कुठे वाच्यता करण्याचे धाडसही त्यांच्यात नव्हते. माझ्यासारखा तरणाताठा माणूस जर काही करू शकत नव्हता, तर त्यांच्याकडून अपेक्षाच चुकीची होती. त्यातल्या त्यात त्यानं या मंडळींना छळू नये यासाठी त्याला समजावण्याचा मी खूप, अगदी खूप प्रयत्न केला. पण ते सारं पालथ्या घड्यावर पाणीच ठरलं. या सगळ्याची त्याला याच आयुष्यात किंमत मोजावी लागेल, इतपत मी त्याला बोलून पाहिलं. पण काहीच उपयोग झाला नाही.
सारी estate त्याच्या नावावर केल्यानंतरच्या अगदी एका वर्षात या सर्व गोष्टींचं कमालीचं दडपण येऊन आजोबा-आजींनी हे जग सोडून दिलं. आता तर अंकुशला आणखीनंच मोकळं रान मिळालं. वासंतीच्या छळास पारावारच राहिला नाही आणि शेवटी ती साधी, सरळ मुलगी घर सोडून पळून गेली.
अंकुशनं ही आनंदाची(?) बातमी मला येऊन सांगितली. त्याच्या मते, वासंतीनं नक्की कुठे तरी जाऊन जीव दिला असेल. मला कमालीचं वाईट वाटलं. अंकुश निघून जाताच मी क्लिनिक बंद करून बाहेर पडलो.
०००
आज हा सारा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला.
गलीतगात्र होऊन हा राक्षस माझ्या समोर पडला होता. मी त्याला म्हणालो,
``आज माझ्या गावी असलेल्या पत्नीला घेऊन येतो म्हणालो होतो न मी, आलीये आज ती बरोबर! ये गं...``
मी तिला आत बोलावलं.
अंकुशनं त्याही परिस्थितीत उत्सुकतेनं माझ्या मागे पाहिलं आणि आत आलेल्या स्त्रीकडे पाहून तो चपापलाच!
``वासंती???`` त्यानं थक्क होऊन विचारलं.
``हो अंकुश, वासंती!`` मी त्याला म्हणालो. ``त्या दिवशी ही पळून गेली आणि तू आनंदानं माझ्याकडे आलास. तू जाताच मी हिच्या शोधात बाहेर पडलो. तुझ्या आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे नदीवरच्या पुलावर ही मला दिसलीच. जीव द्यायचं धाडस गोळा करीत होती. तुला आठवतं, त्यानंतर काही दिवस माझं क्लिनिक बंद होतं. कारण मी हिला घेऊन थेट गावी निघून गेलो होतो. पहिले एक-दोन दिवस ही प्रचंड भेदरलेली होती. पण मी तिच्याशी अगदी प्रेमानं संवाद साधून तिचं counselling केलं तशी ती अगदी भडभडा बोलायला लागली. तुझी पत्नी असूनही तू तिच्यावर अनेकदा केलेल्या पाशवी बलात्काराची कहाणी तिनं मला सांगितली. त्यातले अनेक प्रसंग ऐकून डॉक्टर असूनही माझ्या अंगावर काटा उभा राहिला. तुझ्या राक्षसीपणाचे अनेक किस्से तू स्वत: मला सांगितले असलेस तरी यातलं बरंच काही तू मला सांगितलं नव्हतंस.
मी वासंतीला आश्वस्त केलं. पण तिला गावीच ठेवलं. तुला हे काही कळू दिलं नाही. कायदेशीर बाबीत अडचणीत येऊ नये म्हणून मी तिच्याशी विवाह मात्र करू शकलो नाहीये.
देवभोळ्या, साध्या सरळ आजोबा-आजींना मारण्यासाठी तू मला औषध मागत होतास ना, मी तुझ्या बाबतीत तेच केलं. तू जेव्हा किरकोळ तक्रारींसाठी माझ्याकडे औषध घ्यायला येऊ लागलास तेव्हापासून मी तुझ्या औषधात असं काही मिळवत आलोय, की ज्यानं तुला तात्पुरतं जरी बरं वाटत असलं, तरी एकूण तुझ्या शरीरावर घातक परिणाम होणं सुरु झालं. मग तुझ्या तक्रारी वाढत गेल्या, आणि तू माझ्याकडे येतच राहिलास. वासंती आणि आजी-आजोबांचा तू छळ करत होतास, तेव्हा तू जे काही करत आहेस, त्याची शिक्षा तुला याच जन्मी भोगावी लागेल, असं मी तुला समजावत असे, हे आठवतंय तुला? वासंतीची सगळी गाथा ऐकली आणि या तुझ्या शिक्षेसाठी देवावर अवलंबून न राहण्याचं मी ठरवलं. ही शिक्षा मीच तुला देण्याचं ठरवलं. तुझ्यातील राक्षसानं शेवटी माझ्यातील राक्षस जागा केला असं म्हटलंस तरी चालेल.
लक्षात घे, आता तू कधीच अंथरुणावरून उठणार नसलास तरी तू लगेच मरणारही नाहीस. या अखंड आणि असह्य वेदना सहन करीत तुला आता पुढची अनेक वर्ष हा नरकवास भोगायचा आहे. तुझ्या हाता-पायातली ताकद तर संपलीच आहे, पण लवकरच तुझी वाचाही जाणार आहे. तुझी पत्नी या नात्यानं ही सगळी संपत्ती लवकरात लवकर वासंतीच्या नावानं होईल हे मी बघणार आहे. याच जन्मी तुला मरणयातना सहन कराव्या लागणार आहेत. अगदी २४ तास.``
मी अगदी आवेशानं अंकुशला बोलत होतो आणि अंकुश माझं बोलणं शांतपणे ऐकत होता. सध्या वाचा गेलेली नसूनही तो यावर काहीच बोलला नाही. तशीही काही बोलण्याची ताकद त्याच्या शिल्लक नव्हतीच.
माझ्याही मनात साठलेला इतक्या वर्षांचा संताप, आक्रोश आज बाहेर पडत होता आणि माझ्या मागे उभी असलेली वासंती पूर्वीइतक्याच साधेपणाने हा सारा संवाद ऐकत उभी होती...
**
कडल
कडक
छान लिहिले आहे.. जशास तशे..
छान लिहिले आहे.. जशास तशे..
साधं सरळ पण प्रचंड गाभा
साधं सरळ पण प्रचंड गाभा असलेली लिखाण शैली म्हणून नेहमीच तुमच्या कथा मनापासून आवडतात. ही मात्र खचित जास्तच आवडली हे आवर्जून म्हणावेसे वाटते.
सॉलीड.
सॉलीड.
प्रेडिक्टेबल पण छान
प्रेडिक्टेबल पण छान
छान आहे.
छान आहे.
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!
आवडली!
आवडली!
भारी आहे. आवडली.
भारी आहे. आवडली.
अपेक्षित वळणाने गेली तरी छान
अपेक्षित वळणाने गेली तरी छान वाटली वाचायला. आपल्यालाही नकळत आनंद झाला. लिखाणशैलीची ताकद
छान आहे!
छान आहे!
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे मनापासून आभार!
वाह कमाल
वाह
कमाल
आवडली...
आवडली...
मस्तच कथानक.
मस्तच कथानक.
सुंभ जळाला तरीही पिळ जळत नाही..... तशीच काही लोकांची मानसिकता देखील काही केल्या बदलत नाही. हेच खरे.
छान!!
छान!!
किल्ली, पद्म, सिद्धि, मेघा -
किल्ली, पद्म, सिद्धि, मेघा - मनापासून धन्यवाद!
छान आणी सुरेख लेखन शैली
छान आणी सुरेख लेखन शैली
नेहमीप्रमाणे मस्त जमलीये
नेहमीप्रमाणे मस्त जमलीये