थोडेसे "दिलखेचक" चिंतन

Submitted by अस्मिता. on 18 November, 2020 - 16:26

पहिलीत असताना वडिलांना विचारले 'प्यार' म्हणजे काय , तेव्हा ते 'कुठे ऐकलेसं गं , कुठे ऐकलेसं गं' करून घाबरून उठून गेले. 'प्यार'मध्ये एवढं घाबरण्यासारखं काये बरं , ते स्वतः एवढे गाणे ऐकायचे मगं मला न कळले तर काय नवल.... पण हा विचार करायला आणि दोनचार दिवस गाणी बंद करून अपराधी वाटून घ्यायला ते काही आजकालचे पालक नव्हते. ते गाणे ऐकत राहिले मी 'शिकत' राहिले. 'प्यार'चा रस्ता दिलापर्यंत जाणारच , शास्त्र असतं ते. त्यामुळे दुसरीपर्यंत मला 'दिला'बद्दल कळलं. यावेळेस मी आईकडे गेले व दिलाची चौकशी केली. त्यावेळी ती बावचळली असेलही पण तिने तसे दाखविले नाही. ती सगळ्या गोष्टींना 'भक्तप्रल्हाद वळण ' द्यायची. सगळ्या भावनांना एकतर मातृत्व किंवा भक्तीचे असंबद्ध स्वरूप देऊन निकोप भावना , बालसुलभ उत्सुकता यांचा 'मोजो' ठार करायची. तेही इतकं हसतंखेळतं की मोठ्यांच्या सुद्धा लक्षात येऊ नये. तिने दिलाचा अर्थ 'काळीज' सांगितला. वरवर पहाता बरोबर आहे पण त्यासोबत एका अभद्र गोष्टीचे अवगुंठण दिले.

काय तर एक मुलगा असतो, त्याचं लग्न होते मगं ठरल्याप्रमाणे तो बायकोच्या आहारी जातो व आईला विसरतो, एके दिवशी आहार इतका वाढतो की बायको म्हणते , आईचं काळीज आणून सिद्ध करा तर हा निघतो देखील , नंतर आईला फुल 'मिर्झापुर' शैलीत चिरून काळीज हातात घेऊन तो पळतंपळतं येताना , ठेच लागून पडतो तर तेव्हा सुद्धा त्या काळजातून आवाज येतो , "तुला लागलं तर नाहीना, बाssssssssssळ" !

हे ऐकून पस्तावा वगैरे..... गोष्ट ऐकून भावाने तर आईला बालवाडीतच डबडबत्या डोळ्यांनी वचन देऊन टाकलं 'मी तुला नेहमी माया करेल' , इतका धक्का बसला त्याला. मी ढिम्म, मला मात्र 'झालं एवढंच?' वाटलं , आई आणि दिलं एकत्रित नांदलेले गाणंही आठवेना. हजारो गाण्यातलं 'दिल' त्याला एवढाच अर्थ .... तरीही सुन्न वाटून मी काही वर्षं दिलाकडे पाठ फिरवली. पण इतकी अभद्र गोष्ट दिलाला जोडल्या गेली ते गेलीच !! पुतनेला 'सक' करून / हिरण्यकश्यपूला पोट फाडून/अभिमन्यूला मस्तक फोडून मारण्याच्या आर रेटेड गोष्टींनी मी विचित्र झाले आहे बहुतेक. जे सगळं कल्पनेत बघतात त्यांचं सगळं "बघून" झालेल असतंच.

पण मीही अननुभवी आहे बावळट नाही, हे स्वतःला सांगत राहिले. साधं मारोतीमामाकडे दूध आणायला गेलं तरी गंज घेऊन रांगेमध्ये उभं असताना एक तरी 'दिल' किंवा गेला बाजार एखादंदुसरी 'धडकन' तरी कानी पडायची, जणू रस्त्यावर पडलेले लॉलीपॉपचे वेष्टन. दुधाच्या वरव्यामुळे दिलाचाही वरवा व्हायला लागला.
त्यामुळे मी माझ्यापरिने दिलाचा छडा लावायचं ठरवलं.

ऑटोरिक्षात बसून मावशीकडे गेले तरी मागे मोठे लाल 'दिल' दिसायचे. कधी त्यात श्रीदेवी कधी माधुरी किंवा कधी 'पिक्चर अभी खाली है मेरे दोस्त' अवस्थेत असायचं. सायकल रिक्षावाल्यांचे 'दिल' बरेचदा उडत्या पडद्यामुळे चिरलेले असायचे , हवा खेळती रहावी म्हणून ते 'भग्न दिल' प्रेफर करत असतील असं वाटायचं. इथे मला बऱ्याचदा 'We don't accept American Express, we only take Mastercard for billing purposes 'ऐकावं लागतं तसेच हेही 'We don't accept a whole 'दिल' , we only take a 'भग्न दिल' for ventilation purposes' म्हणत असतील का हे मनात येते.

एकाच मोठ्या भग्न दिलापेक्षा कबुतरांच्या जोडीसारखी दोन लहान अखंड दिलाची जोडी त्यांना फारशी पटली नाही बहुतेकं ! असेही प्रत्येक सायकलरिक्षावाला बलराज सहानी सारखा वाटायचा. त्यामुळे दिलाची अपेक्षा नसायचीच ,'दो बिघा जमिनीसाठी' एवढा अन्याय झाल्यावर 'दिल' कापरासारखे उडून जात असेल वाटायचं त्यामुळे मी समजून घ्यायचे.

कटिंगवाल्यांकडे मागे भल्या मोठ्या पोस्टरवर एक नटी दिलासोबत किंवा दिलातच उभी असायची. हे 'दिल' कुणाचं असायचं हे कधीच कळायचं नाही , पण प्रत्येक हळव्या तरुणाला हे आपलंच वाटायचं. हा माहिमचा 'हळवा' घरोघरी सापडायचा. हा असा कुपोषित तरुण असायचा ज्याला चार सूर्यनमस्कार सुद्धा घालता यायचे नाहीत पण दिलाचे बरेच प्रकार व्हायचे. मला मात्र जेवणाव्यतिरिक्त रोज दोन मोठे पेले दूध पिऊन, चार डिंकाचे लाडू खाऊन ,दोरीच्या दिडशे उड्या मारूनही काहीही जाणवायचं नाही.

हळूहळू आगाऊ मैत्रिणी व हॉर्मोन्सची साथ मिळाल्याने , दिलाचे स्रोत उघडायला लागले. साधुसंतांना सगळीकडे ईश्वर दिसतो तसे सगळीकडे दिलाचे चित्र दिसायला लागले (किंवा होतेच पण लक्ष जायला लागले). सर्वांना 'दिल' असत हे कळलं एकदाचं ! मला जाणवलं नाहीच पण 'उम्मीदपे दुनिया कायम है' , आज ना उद्या जाणवेल म्हणून दुसऱ्यांच्या ऐकीव 'दिला'वर जगायचं ठरवलं. काही काही सभ्य मैत्रिणी होत्या त्या म्हणायच्या असं काही नसतचं माणसाला फक्त मेंदू असतो , अशांशी फक्त 'गृहपाठाला लागल्या तर' असाव्यात म्हणून कट्टी केली नाही. बाकी सामान्य ज्ञानासाठी ताया असलेल्या 'ज्ञानी' मैत्रिणींना जपले. आश्रीतांना हे ज्ञान भ्रष्ट आहे वगैरे शंका मनाला शिवतही नाहीत.

दिलाची इंच इंच लढवली. कुणी दिलाला हार्ट म्हटले तर कसंसच वाटायचं सुंदर कवितेला आधी गद्य परिच्छेद करून मगं विज्ञानाच्या पुस्तकातल्या धड्यांमध्ये फेकून दिले तर तिचे कसे हालहाल होतील अशी कल्पना मी करायचे.
म्हणून ह्रदयाला सुद्धा दिलाचे स्थान मिळाले नाही. ह्रदय दिलागत बदामी व गुटगुटीत दिसत नाही शिवाय फारच वास्तववादी वाटते म्हणून स्वतःला पटवले सुद्वा नाही. त्याला 'तू कर पम्पं' मी चालले म्हटलं. जीवनावश्यक गोष्टीला कल्पनेत स्थान नाही हेच खरं ! शिवाय जीवनावश्यक गरजा पूर्ण झाल्याशिवाय कल्पनेला तरी जीवनात स्थान कुठे मिळतं.

मगं आला वाssssssघ , सारखं मगं आली दिलाची गाणी , आकाशात जेवढे तारे नसतील तेवढी दिल आणि कंपूची गाणी आहेत. कंपूत दिलबर , बेवफाई, (कारण दिलाची टुटीफ्रुटी कशी होणार) तनहाई , श्रीमंतीगरिबी ही जुळी, कुणी तरी कुठे तरी बेपत्ता होणे, याददाश्त खोगयी, अपंगत्वामुळे बेवफाईचे नाटक, मुखदुर्बळतेने होणारे गैरसमज (गाढवा, तू बोलला असतास तर ही शॉर्ट फिल्म असली असती) , मूर्ख त्याग, एकमेकांकडे न पाहता तिसरीकडे बघत गुफ्तगू/गुटर्गु करणे (अहो आश्चर्यम् !) हे एकमेव चाणाक्ष , भुवया उडवणाऱ्या , भरतनाट्यम सारखी मान हलवणाऱ्या बाईच्या लक्षात येणे.... परिणामी तडपंतडपं .सगळ्या मूर्खांच्या पार्टीत तिला किती एकटं वाटत असेल ना !!

मराठीत सुद्धा
'दिलाचा दिलबर, जीवाचा जीवलग' असे दोघे आहेत. उपलब्धतेनुसार एकमेकांना रिप्लेस करत असतील तर करोत बापडी. पोटफोड्या 'ष' च्या इष्काच्या इंगळीचा जहालपणा काही नाही त्यात. ते मटरपनीर तर हे भाकरीठेचा !! त्यामुळे ह्या हिंदी दिलाला इष्काची इंगळी सोसत नाही.

इष्काच्या इंगळीची खबर 'अगं (पाच) बाई ,बाई, बाई, बाई, बाई' मध्येच रहाते. ज्याची इंगळी आहे त्याला सांगावे कुणाला सुचतच नाही. आपल्याला काय आपणं बरं आणि आपलं 'दिल' बरं ! माझ्या मनातली दिलबरची प्रतिमा शेजारच्या काकूंनी खराब केली. जी काय वाटीभर साखर उसणी न्यायच्या. ती परत करताना परत केली हे लक्षात रहावे म्हणून त्रिवार, 'दिलं बरं , दिलं बरं , दिलं बरं ' म्हणायच्या. वारंवार हे तीनदा ऐकण्याने दाक्षिणात्य (चालीतल्या) दिलबराचा पत्ता कट झाला.

एकेकाळी 'दिल'दादा कामात एवढे व्यग्र असायचे की कधीकधी 'जिया' ताईला घरचा व्यवसाय बघावा लागायचा. त्यामुळे काही गाण्यांमध्ये जिया धडक धडक, जिया जाये ना, जिया जले जान जले, जिया बेकरार है, टिंकू जिया असेही ऐकायला मिळते. पण जियाला तितकी लोकप्रियता मिळाली नाही. बिचारी जिया !

मोठे झाल्यावर सँटा क्लॉज/परी नाही हे कळतं तसं दिलाच झालं. एकतर 'दिल' नाहीच किंवा मला नाही हे कळलं. पण आता भारतीय सिनेमात 'दिल' शेवटच्या घटका मोजत आहे हे लक्षात येत आहे. तसं नसेलही पणं असलं तरी मला त्याचं काही नाही. 'दिल धडकने दो , दिल बेचारा, ए दिल है मुश्किल' अशी शीर्षकं जुनाट वाटायला लागलीत व नावंही तडफडसूचक आहेत.

अजिबात गतकालविव्हलं ... मराठीत नॉस्टैल्जिक वगैरे होत नसतानाही फक्त पांचटपणा करत वेळ घालवता यावा म्हणून आवर्जून टिपलेल्या दिलाच्या नोंदी, अवस्था व संघर्षांच्या प्रकारांचे काहीसे चिंतन......

♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡

१. बॉल बॉल दिल (दिल + खेळ गट)

लक्ष देऊन ऐकलं नाही तर पत्त्यासारखं कुणाचं 'दिल' कुणाला गेलंय हेही कळत नाही. अरूणा इराणी यांचा डान्स मात्र आजच्या आयटम डान्सना टक्कर देतोयं.
दिलबर दिलसे प्यारे दिलबर दिलकी सुनता

२. मास्टरशेफ दिल (दिल + पाककृती घटक गट)
१.दिल (बारिक)चिरके देख तेराही नाम होगा

२.दिल चिज (पार्मेजान) क्या है आप मेरी

३.बडी मुश्कील है "खोया" मेरा दिल है

३. टूटीफ्रुटी दिल (दिल + टूटटूट गट)

१.दिल जबसे टूट गया

२.शीशा हो या दिल हो आखिर टूट</a>

३.दिल के टुकडे टुकडे करके मुस्कुराके चल दिये

४. परतोनि पाहे दिल ( फिर + दिल गट ... हिअर वी गो अगेन विथ द सेम आचरटपणा)

१.फिर वोही दिल लाया हुं

२.दिल फिर मोहब्बत करने चला है तू

५. परोपकारी दिल
दिल फिरभी तुम्हें देते है क्या याद करोगे
(* अरे वेड्या ,असुदे असुदे , इथे तूच काठावर पास होतोस , मला काय लक्षात ठेवायला सांगतोस. )

६. अस्थिर/शेक इट सैंया दिल (दिल +काहीही थरथरणारे गट)

१.दिल मचल रहा है

२.दिल बहेलता है मेरा आपके आजानेसे

३.दिल है बेताब

७. उद्धट दिल
दिल है के मानता नही

८. देशभक्त दिल

१.दिल है हिन्दुस्तानी

२.दिल दिल हिन्दुस्तान जाँ जाँ हिन्दुस्तान
(*एकदा जाँ गेल्यावर दिलाचं काय लोणचं घालायचंय का पण असो)

९. मध्यमवर्गीय दिल
दिल है छोटासा , छोटीसी आशा

१०. ज्वालामुखी दिल (दिल+ कुठलाही ज्वलनशील पदार्थ)
१.तडप तडप के इस दिल से आह निकलती रही

२.दिलजले (ओ लाले !)

११. निवारादायी दिल
१.रहेना है तेरे दिलमें
( *क्षेत्रफळाबाबत अस्पष्ट)

२.तुम दिलकी धडकन में रहेते हो
(*एक छोटीशी माळंवजा खोली)

३. दिल में रहो या नजरमें रहो या जिगरमे रहो
(*सदनिका A/B/C विंग पर्यायी)

४.बडे दिलवाला
(*बंगला- हा उदार असल्याने "नजर लागी राजा तोरे बंगलेपर" असाही एक अर्थ )

१२. 'ढ' दिल
ऐ दिले नादान

१३. नेत्रतज्ञ दिल
१.दिल की नजर से नजरोंके(?) दिलसे

२.दिंलं कें अंरंमाँ आंसुंओं में
*शक्य असतं तर एका अक्षरावर दोन-दोन अनुस्वार दिले असते.

१४. थेरपिस्ट दिल

१.मेरे दिलमे आज क्या है तू कहे तो मैं बतादूं

२. दिलकी बाते एएए दिल ही जाने एएए

१५. उघडली मूठ बाराण्याची दिल

१.बदतमीज दिल बदतमीज दिल

२.बदमाश दिल तो ठग है बडा

३.दिल हुवा बेशरम
(*हे माहिती नव्हतं , सहजं बेशरम लिहिले तर सात आठ निघाले.)

१६. बद्धकोष्ठताग्रस्त दिल / बताना भी नही आता, छुपानाभी नही आता -गट

ए दिल है मुश्किल
(नव्या पिढीचे )

ए दिल है मुश्किल जिना यहाँ
(जुने "जाण"कार)

१७. पंडितजी दिल
दिल का भँवर करे पुकार प्यार का राग सुनो

१७. घरात नाही दाणा आणि हवालदार म्हणा- दिल
१. दिल क्या चिज है जानम अपनी जान तेरे नाम करता है
( *हे त्याच लग्नात मास्टरशेफ दिल म्हणूनही वापरता येईल असं बहुगुणी )

२. गोरोंकी ना कालोंकी दुनिया हैं दिलवालोंकी

१८. अप्रामाणिक दिल (दिल + चुपके गट)
दो दिल मिल रहे है मगर चुपके चुपके

१९. उलट्या बोंबा दिल -धटिंगण गट
चुपकेसे दिल देदे नैते शोर मच जायेगा

२०. भुरटे दिल (दिल + चोरी तरी हेहेहे गट)
*भुरट्या चोराने अंगणातली बादली नेली तर आम्ही खांबापर्यंत पळत सुटलो होतो. इथे मात्र लाल पटकूर व स्टिलेटोमध्ये मजा करतात.
दिल चोरी साडा हो गया वे कि करिये कि करिये

२१. फ्लो चार्ट दिल(दिमागका दही गट)
[स्टार्ट]
दिल मेरा चुराया क्युं जब ये दिल तोडना ही था, हमसे मुँ मोडा ही क्युं जब ये
[एन्ड]

२२. भक्त दिल
१. दिल एक मंदिर और प्यार है पूजा

२. दिल है नमाझी है इश्क खुदा

* ( *याला अफगान जलेबीचा नैवैद्यच चालतो असं ऐकून आहे)

२३. एककलमी दिल (दिल+ कागदपत्र पेन गट)
१.फुलोंके रंगसे दिलकी कलमसे

२.कागज कलम दवात ला, लिखदूं दिल तेरे नाम करूं

२४. अर्धशिक्षित दिल
अ आ ई उ ऊ ओ मेरा दिल ना तोडो
(*यांच्या सहाखडीत र्हस्व 'इ' गायब आहे )

२५. कुपोषित दिल (हे तर नकाच बघू !)
१. मराठी

*वि. सु. पहायचा मोह झाल्यास मी जबाबदार नाही !
२. हिंदी बवफा... हो बवफाच (क्लिकू नकाच!)

२६. परग्रहवासी दिल
दिल दरबदर

२७. कालकेय दिल (वरच्याला असू शकते तर आम्हाला का नाही, आम्हीतर इथलेच! )
शिवगामी सारख्या तत्वनिष्ठ व बलवान स्त्रीला पण त्यांनी
उनुकास्ठा ...पीझझराआआ..रूपूवीमिन्न..बहाट्टी.. झराथ्रामा माहिष्मती भ्रीमसा .इन्कूम.. मिन्माहाक्की..चूहु
..... (मी पूर्ण लिहील्यावर जसं काही तुम्हाला समजणारचे, किबोर्डची बोबडी वळली इथं) मृत्युशिवाय दुसरं काही होण्याची शून्य शक्यता असतानाही दुभाषाच्या मदतीने जमेल तसे छेडून दिलाचा रानटी वेडपटपणा दाखवला.

२८. वॉट्सअप दिल (दिल + तरल कहां गट)
एकाच खोलीत असूनही बोलण्याऐवजी एकमेकांना कायप्पाने संदेश पाठवणारी दिलं !

दिल ने ये कहां है दिल से

२९. मनोरुग्ण दिल (दिल + वेडसरपणाची झाक ते ठार वेडे ई. गट)
१. झाक-- दिल तो पागल है

२. मध्यम-- दिल दिवाना टिंग बिन सजनाके टिंग मानेना आ

३. ठार-- ये दिल दिवाना है , दिलतो दिवाना है, दिवाना दिल है ये, दिल दिवाना है
३०.
:
:
:

एवढ्या लिंका डकवल्यात की 'लिंकादहन' केल्यासारखे वाटतेयं.
*<- -हे सगळे तारे मला दिवसा दिसलेतं.

♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡

या सगळ्या अवस्था तुम्ही थंड मनाने पाहून तुम्हाला काहीही जाणवले नाही तर एकाच अवस्थेची शक्यता उरते. ती म्हणजे
'गुप्ताअंकल दिल' यात फक्त दिलकी बिमारी, दिलका दौरा/धक्का/ठेस /सदमा हे प्रकार होतात. सिनेमात ज्यांना हे होते त्यांना वरच्या अवस्थांमधून कधी जायलाच मिळत नाही. बरेचदा त्यांची पोरं वरची मजा घेतात व 'दिल' असूनही त्यांच्या नशिबी दुष्परिणाम केवळ येतात !! माझ्या 'दिलालेखाने' कुणाला गुप्ताअंकल यांच्या यादीतले काही झाले असेल तर क्षमस्व.

♡♡♡इति ©अस्मिता विरचितं दिलपुराणम् संपूर्णम् ।।♡♡♡

दिलफेक प्रतिसादच येऊ द्या ही विनंती....
Happy आभार !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच लिहिलंय. Lol
आम्ही मैत्रिणी पूर्वी असे दिल, प्यार , फूल, खाण्याचे पदार्थ शब्द असलेली गाणी एकत्र करत बसायचो टाईमपास म्हणून.

सीमंतिनी, ऋन्मेष, सामो, कुमारसर, निलेश81, चंद्रा, वीरु, श्रद्धा, मृणाली, वंदना, माझेमन, रुपाली, कमला, मोहिनी१२३, मानवदादा, अमृताक्षर, सुमुक्ता , मंदार, च्रप्स, जिज्ञासा, अज्ञातवासी, अमितव, sparkle, व्यत्यय, किल्ली, झंपी , सायो, फारेंड, अतुल, vijaykulkarni, वर्णिता, स्वातीताई, रश्मी, A_श्रद्धा, श्रद्धा.
सर्वांचे आभार.
Happy

सहीच लेख आहे.
"ये आख्खा इंडिया जानता है, हम तुमपें मरता है
दिल क्या चीज है जानम अपनी जाँ तेरे नाम करता है" हे लगोलग आठवलेलं दिल बद्दलचं शा. शि. (P. T.) गीत. रोनित रॉय ऐन उमेदीच्या काळात आणि जाँ तेरे नाम 'करता है' म्हणताना गायकाचा थेट खर्जातला आवाज आठवला. (हिरॉईनचा स्टिल लाईफ चेहरा उगीच आपला तरळण्यापुरता..)

ओके आता बर्‍याचश्या प्रतिक्रिया आलेल्या असाव्यात, त्यामुळे थोडी रिक्षा Happy

साधारण याच विषयावर मी फार प्राचीन काळी जुन्या माबोवर एक लेख लिहीला होता. बहुधा माबोवरचा माझा पहिलाच लेख होता. अर्थात तो या लेखाच्या मानाने अगदीच लहान आहे पण विषय तोच. दिल बद्दलचे कोडे अनेकांना माबोवर बरीच वर्षे पडत आहे हे नक्की Happy

तसेच इथे मूळ लेखात पोटफोड्या ष असलेल्या इष्काची इंगळी वगैरेचा उल्लेख आहे. त्याबद्दल काही संशोधन इथे मिळेल. गरजूंनी आपापल्या जबाबदारीवर वापर करावा.
https://www.maayboli.com/node/4607

धन्यवाद प्राचीन Happy
ते टाकलयं लेखात... घरात नाही दाणा आणि हवालदार म्हणा या गटात Proud

फारेन्ड, धन्यवाद !!
तुम्हाला योग्य वाटले तर पहिला लेख इथे कॉपीपेस्ट करु शकता (विषयही तोच आहे)..... कारण तिथे प्रतिक्रिया देता येत नाहीत. तो वाचायला तसा फार मोठा नाही. जुनी माबो असल्याने फोनवर झूम करावे लागतेयं.

दिल बद्दलचे कोडे अनेकांना माबोवर बरीच वर्षे पडत आहे हे नक्की.... अगदीच+1 !
काल योगायोगाने टिवीवर 'दिल' लागला होता, ते ज्या कन्विक्शनने करतात हे (१० मिन)बघून हहपुवा झाले. (स्टूलचे तुकडे जाळून ... कमरेला ओढणी बांधून फेरे , आ.खा. चा शर्ट फॉरेस्ट ऑफिसर सारखा त्यामुळे शर्टवरून कमरेला बेल्ट होताच, शिवाय लग्नही युं करता येते.. मा.दि. बाबा चवताळून बंदूक वगैरे , मगं एक नदियाके पास छोटासा घर , हिरो एकदमच प्रामाणिक लाकूडतोड्या )... हे बघून आपण 'प्यार/दिल' दुष्मन गटात आहोत असे हळूहळू लक्षात येतेयं. योगायोगाने तीच जालिम दुनियावाली .... आज बरीच माबोकर मंडळी आहे. Biggrin

इश्क इष्क वाचलायं खूप वर्षांपूर्वी..... .... मस्तच लिहिलयं. पुन्हा वाचते. तुमच्याच लेखांमधून काहीशी प्रेरणा मिळाली आहे. ती घेऊन मी माझाही वैयक्तिक राग/वचपा काढलायं Happy .

प्रेमात ‘two is a company, three is crowd’ म्हणतात. पण काही काही लोकांना कुंभमेळाच भरवायचा असतो, का कोणास ठाऊक. उदा. ( बघायचीच असतील तर आपापल्या रिस्कवर बघा.)
प्यार दिलो का मेला है
https://youtu.be/dc5bEPnBZEk

मेला दिलों का आता है
https://youtu.be/TREkt94M6kc

नशापाणी करणारी दिलं अशीपण कॅटेगरी करता येईल आपल्याला.
मदहोश दिल की धडकन
https://youtu.be/mnOs6GTZwhA

मनोरुग्ण गटात हे पण येईल की
दिल तेरा दिवाना है सनम
https://youtu.be/tdeaeyr8wS4

धोकादायक दिलं
दिल का ऐतबार क्या किजे
https://youtu.be/5NYAsEn6-Uo

भोली सुरत दिल के खोटे
https://youtu.be/Cb2ef3cUrKU

बरं या दिलाच्या कॅरॅक्टरीस्टीक्स सांगणंही कठीण. कधी हे दिल मुकं असतं तर कधी त्याला बोलल्याशिवाय चैन पडत नाही. तर कधी ते ऐकण्याचं काम करतं. कधी कधी तर त्याला दृष्टीपण असते. म्हणजे काही झालंच तर ENT कडे जायचं का स्पीच थेरपिस्टकडे का आय स्पेशलिस्टकडे?

इन दिनों दिल मेरा मुझसे ये कह रहा
https://youtu.be/EEnB3vDN9AI

दिल क्यों ये मेरा शोर करे
https://youtu.be/maKDIvUVkQo

दिल दिया गल्लां
https://youtu.be/nqUbSvFS1e4

ये दिल सुन रहा है तेरे दिल की जुबां
https://youtu.be/SM5SDobPdi0

बेजुबां दिल की जुबानी
https://youtu.be/wjcFaAwo9Yk

दिल की नजरसे
https://youtu.be/t8vDu-C7u1Q

पण ते एकवेळ परवडलं.आपण निदान मानवांचे गुणधर्म बघत होतो. पण या दिलांचं काय करायचं?

तुम मिले दिल खिले
https://youtu.be/wont7x8184k

दिल पंछी बन ऊड जाता है
https://youtu.be/55LRrp3XNA4

@माझेमन Happy

खरंतर सगळेच 'दिलं' मनोरूग्ण गटात येतात पण घाऊक अपमान करण्यात मजा नाही म्हणून वर्गवारी आवश्यक होऊन बसते.

या दिलांना इच्छाधारी दिल गटात टाकूया का... रूप बदलल्यामुळे

इच्छाधारी दिल (दिल + मेक ओव्हर गट)

तुम मिले दिल खिले

दिल पंछी बन उड जाता है

पिगी बँक दिल (गल्ला मुळे)

दिल दिया गल्लां

लांडगा आला रे आला गट (दिल +दगा )

दिल का ऐतबार क्या किजे

भोली सुरत दिल के खोटे

मेलो रे मेलो गट (दिल+मेला)

प्यार दिलो का मेला है

मेला दिलों का आता है

पिके दिल ( दिल+नशा गट)

मदहोश दिल की धडकन

बघा बरं आहे का Happy
उत्स्फूर्त प्रतिसादासाठी धन्यवाद.

दिल लेना खेल है दोन दिलदार का ... हे सापडले. गट कुठला हे ठरवतेयं.
सर्वांचे मनःपूर्वक आभार.

कसलं सुंदर लिहीलंय. कुरकुरीत शैलीतलं विनोदी लिखाण.
बारीक निरीक्षण आणि नर्म विनोदाची फोडणी. झकास जमलीय फोडणी Happy
लिखाणाची चाहती होतेच अजून झालेय.

धन्यवाद वावे आणि रानभुली Happy

एक गंमत - हा लेख लिहिला तेव्हा नवीन होते माबोवर, व्यासपिठाचा अंदाज घेत होते. Happy

Lol पुन्हा वर आल्याने पुन्हा वाचला.

लेख धमाल तर आहेच, पण पुन्हा वाचताना मोजो ठार करणे, वार्‍यामुळे चिरले गेलेले दिल वगैरेला टोटल लोल झाले Happy

दिलबर दिलसे प्यारे गाण्याचा उल्लेख अशा जागी तोडला आहे की तेथे नक्की काय झाले प्रश्न पडेल - त्या दिलबराचे मतपरिवर्तन की दिलाचेच धर्मपरिवर्तन Wink Happy

Pages