ए मिने (ते Hey Means म्हणणारा नाही फार मिन वाटत.) तेंव्हा सोपच आपलं प्रिय मिनू
कशी आहेस? किंवा How are you? यासारखे ऐहीक सुखाशी संबंधित प्रश्न विचारुन मी तुझा आणि मुख्य म्हणजे माझा वेळ खर्ची घालणार नाही हे मी तुला याआधीही प्रत्येक पत्रात स्पष्ट केले आहे. मी मागेच लिहिणार होतो पण करोनाच्या काळात इ-मेल सुरु राहिल की नाही याचा स्पष्ट खुलासा सरकारकडून न झाल्याने लिहायला उशीर झाला. नोकरशाहीच्या चुकांसाठी मी दिलगीरी व्यक्त करणार नाही. आता आमच्या इंग्लडात असे नाही असा तू कितीही कांगावा केला तरी त्यातील सत्य हे होस्टेलवरील वरणात सापडणाऱ्या दाळीएवढे किंवा हनीसिंगाच्या गाण्यात सापडणाऱ्या शास्त्रीय रागदरबारी एवढे आहे हे न समजण्याइतपत मी दुधखुळा नाही. अखिल मानवजातीचे मूळ कुठे आहे यावर कितीही मत मतांतरे असली तरी जगातल्या साऱ्या नोकरशीहीचे मूळ हे ब्रिटिशांच्या नोकरशाहीत आहे यावर अजिबात दुमत नाही.
टिव्हीवरील भाषणं, चर्चा ऐकल्या आणि करोना आमच्या गल्लीत पोहचला. त्याआधी करोना म्हणजे आयुष्यात एकदा विदेशवारी करुन त्याचे फोटो सतत फेसबुक किंवा व्हाटसअॅपवर ढकलवून माझ्यासारख्याच्या डेटापॅकची परीक्षा बघणाऱ्या सहाटक्के लोकांच्या घरातले एक खेळणे आहे असेच मी मानत होतो. त्यादिवशी मी माझे मत बदलले. एक जबाबदार सुजाण नागरीक यानात्याने आयपीलच्या पिचवरील गवताची उंची किंवा अॅकेडेमी अवार्डसमधील वाढणारी हिल्सची उंची यासारख्या उंची चर्चा सोडून सर्व चॅनेलवर करोनाविषयीच्या त्याच त्याच चर्चा ऐकल्या. त्या चर्चा ऐकून मी एका मोठ्या निष्कर्षापर्यंत पोहचलो, जो आजतागायत कुणालाही समजला नाही. तो निष्कर्ष आहे करोनाच्या प्रसाराचे महत्वाचे कारण आणि साधन आहे टिव्ही. नंतर मला कळले मी अर्धवट बरोबर होतो. ज्याप्रमाणे न्यूटनच्या गुरत्वाकर्षणाच्या सिद्धांततील त्रुटी आईनस्टाइनने शोधल्या तसेच माझ्या निष्कर्षातील त्रुटी मीच शोधल्या. करोनाच्या प्रसारामधे टिव्हीबरोबर टिव्हीइतकाच किंबहुना काकणभर जास्तच हात आहे मोबाईलचा. यातून कामाची कमी आणि बिनाकामाची माहिती लोकांपर्यंत वेगात पोहचली असे एक दुर्लक्षिलेला चर्चापटू टिव्हिवर सांगत होता पण त्याकडे सर्वांचेचे दुर्लक्ष होते. शेवटी काय चर्चेमधे विचारांपेक्षा आवाजाला अधिक महत्व असते. तेव्हा टिव्ही मोबाईल वर बंदी आणावी असा क्रांतीकारी विचार माझ्या डोक्यात आला. हे असे करणे म्हणजे मधुमेह झाला म्हणून तोंड बंद करणे किंवा मुळव्याध झाली म्हणून …… असो.
करोना आल्यानंतर खऱीप आणि रब्बी पिकांपेक्षा जास्त पीक शास्त्रज्ञांचे आले. जीवशास्त्राचा शास्रत्रज्ञ, संख्याशास्त्राचा शास्त्रज्ञ, व्यायामशास्त्राचा शास्त्रज्ञ, आहारशास्त्राचा शास्त्रज्ञ, शास्त्र नसलेल्या शास्त्राचा शास्त्रज्ञ. या शास्त्राज्ञांनी संधी मिळेल तिथे ज्ञानाचे डोज पाजण्याची एकही संधी सोडली नाही. मुळात या विषयावर शास्रज्ञांचेच इतके वाद होते तर गल्लीगल्लीतल्या शास्त्रज्ञांमधे न जुंपली तर नवलच होते. व्हॉटसअॅपवर सतत जुंपलेली असतेच. आमच्या गल्लीतल्या चहावाल्याने दुकानात पाटी लावली ‘आमच्या इथला टि प्या टि सेल वाढतात’. त्याच्या समोरचा दुधवाला बोलला 'टि सेल नाही व्हाइट सेल हव्या तेंव्हा दूध प्या'. पब्लीकचा दोघांवरही विश्वास बसला. ते एकाकडले दूध आणि एकाकडला चहा एकत्र करुन पितात. WHO म्हणजे कोण याचा पत्ता नसणारा त्या दुकानातील पोरगा परवा WHO मधे नेमक कोण चुकलं हे समजावून सांगत होता. आमच्या घऱात सुद्धा परिस्थिती काही वेगळी नाही. इम्युनिटी वाढते म्हणून आईने बाबांना कारल्याची किंवा दुधीची भाजी खाऊ घालणे मी समजू शकतो. पण रोज अंगण झाडल्याने आणि झाडांना पाणी दिल्याने इम्युनिटी कशी वाढते हे मलाही न उलगडलेले कोडे आहे. असो त्यानिमित्ताने आईने बाबांना घरकामात जुंपले.
त्या शास्त्रज्ञांची कमी होती की काय आता परत नवीन काहीतरी शिकणाऱ्यांचे पीक आले. कुणी काय शिकावे याला काहीही तारतम्य उरले नाही. आमच्या मागच्या गल्लीतल्या आजीबाई कवळी बाजूला ठेवून सा लावत होत्या. विचारले तर मला म्हणाल्या “पोरा किशोरीताई गेल्या, लतादिदिनी गाणं बंद केले आता अभिजात भारतीय संगीताची धुरा या तरुणीच्याच खांद्यावर आहे.” करोना आला आणि आजीबाई तरुण झाल्या. केशर हे केशरी रंगाचे असते किंवा सिमला मिर्च सिमल्यावरुन येत नाही हे सुद्धा माहिती नसणारी मंडळी स्वयंपाकघरात हातपाय हलवीत आहेत. आमच्या घरी बाबांनी बनविलेली खीर आम्ही कढी म्हणून पित आहोत. आईला वाइल्ड लाइफ फोटोग्राफीचे वेड लागले आहे. ते थ्री इडीयटस कधी कुणाला इडीयट बनवतील काही सांगता येत नाही. ती घऱातल्या किडे मकोड्यांचे फोटो काढून व्हाटसअॅपवर देत असते. हातात कॅमेरा घेऊन तास न तास खिडकीजवळ बसली असते, मांजरीचे फोटो काढण्यासाठी. विचारले तर म्हणाली “मांजर झाली म्हणून काय झाले शेवटी वाघ सुद्धा कॅटच आहे. ” शिकणाऱ्यांचे इतके पिक आले तरी शिक्षकांची अवस्था फार चांगली नाही असे वाचले होते. परीक्षाच नसल्याने मुलांचे मार्क मोजण्याएवजी ते घरोघरी जाऊन लोकांचे ताप मोजीत होते.
या साऱ्यात भाषणशुद्धीची वाट लागली आहे, सोशल डिस्टंस(सामाजिक दूरी), लॉकडाऊन (कुलप खाली) , ऑनलाइन (वरची रेघ) अशा चुकीच्या शब्दांचा जगभर सुळसुळाट झाला आहे. हे आम्हाला सांगतात लॉकडाऊन म्हणजे कुलुपखाली नाही तर कुलुपबंद, या न्यायाने मग लॉकअप म्हणजे काय कुलप उघडे. तुम्ही कुणाला लॉकअपमधे ठेवता म्हणजे नक्की काय करता? लॉकअपमधून कुणी पळून गेला यात नवल ते काय? सार काही रेषेच्यावर सुरु आहे म्हणजे ऑनलाइन सुरु आहे. शाळा ऑनलाइन, कॉलेज ऑनलाइन, पहिला लुक ऑनलाइन, पहिले प्रेम ऑनलाइन, ब्रेकअप ऑनलाइन, लग्न ऑनलाइन, हनीमुन ….. बुकींग ऑनलाइन, सार काही ऑनलाईन सुरु आहे. भाषणशुद्धी म्हणजे मास्कला मुखलंगोट किंवा मुखावरणवस्त्र असे म्हणून त्या उपयुक्त मास्कला सामान्य जनतेपासून दूर ठेवण्याचा माझा डाव नक्कीच नाही. मास्क ही अतिशय उपयोगीची वस्तू आहे आणि करोना संपल्यानंतरही हा मास्क वापरावा असे माझे मत बनले आहे. या मास्कने किती समस्या सोडविल्या आहेत बघ. मास्कमुळे नाकाचा पत्ता लागत नाही त्यामुळे कुणीही तुमच्या कामात नाक खुपसु शकत नाही. कुणाचे नाक किती मोठे याचा अंदाज न आल्यामुळे तुम्ही कुणावर उगीच तोंडसुख घेतले आणि तोंड लपवायची पाळी आली तर मदतीला मास्क आहेच. मास्कमुळे कुणाच्या तोंडावर तोंड पडत नसल्यामुळे मी त्याचे तोंड बघणार नाही असा योग येत नाही.
करोना आल्यानंतर घरात माझ्यात आणि बाबांत संवाद वाढला आहे. पूर्वी ते मला फक्त ‘ढोल्या लोळत पडला राहतोस’ असे म्हणायचे. आता ‘ढोल्या लोळत पडला राहतोय तुझ्या बरोबरीच्या पोरांची लग्न झाली’ असे म्हणतात. पूर्वीची चार शब्द जाऊन आता आठ शब्द आले आहेत म्हणजे आमच्यातील संवादात शंभर टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता माझ्या बरोबरींच्या पोरांना घरात आरामात लोळत पडण्याचे स्वातंत्र्य नाही यासाठी मी काहीही करु शकत नाही. हे त्यांना कसे समजावून सांगावे ते कळत नाही. मी दुकानात बसावे हा त्यांचा बापहट्ट त्यांनी कधीच सोडला. दुकानातील पुस्तके खपत नाही म्हणून पुस्तकांवरील अक्षरे मिटवून स्टेशनरी विकणाऱ्या त्यांच्या तत्वहीन भांडवलशाही व्यवसायात मी त्यांची मदत करणार नाही याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. आईत मात्र अजूनही सुधारणा नाही तिने करोनाच्या काळात सुद्धा मला भाजीबाजारात पाठवायचा चंग बांधला आहे. पोटात काही टाकल्याशिवाय मला काहीही करायची इच्छा होत नाही आणि पोटात काही गेल्यावर माझे शरीर मला साथ देत नाही. आईला हे समजावून सांगणे म्हणजे उगाच तोंडाची वाफ दवडण्यासारखे आहे. करोनाच्या काळात तोंडाची वाफ अशी दवडणे सांयुक्तिक होणार नाही. परवा ती मला म्हणाली “भाजी घेऊन ये” मी म्हणालो “नाही” ती म्हणाली “का बर?” मी स्पष्ट सांगितले “तिथे भाषणशुद्धी नाही”. ती चिडली, बडबड केली, वाद घालायला लागली “हे काय कारण आहे?” मीही उत्तर दिले “तुला काय हवे कारण कि निर्णय. तुला हवे ते कारण देतो पण निर्णय तोच आहे.” मग बसली गप्प. माझ्याशी वाद घालते यार, दहा हजाराचा फोन धड वापरता येत नाही आणि आयफोनबाबत वाद घालते.
तुझ्यावर लाइन मारणाऱ्या त्या पंक्याने गेल्या वर्षी कायमची लाईन मारली. मला काय होते असे म्हणत तो हल्ली गावोगावी हिंडत असतो. गावोगावी फिरण्याने त्याला सर्दी झाली म्हणून त्या दोघा नवराबायकोने करोनाची टेस्ट केली. त्याची टेस्ट निगेटिव्ह आली पण कसलीही लक्षणे नसताना त्याची बायको लाक्षणी निघाली. सर्वांना आश्चर्य वाटले पण करोना असल्याने कुणी आश्चर्याने तोंडात बोटे घातली नाही. नंतर कुणीतरी सांगत होते त्यांच्या बाजूचे काका गेले दहा दिवस खोकलत होते. शेवटी काय कंपाउंड वॉलची उंची कितीही वाढविली तरी करोना तुमच्या घरी शिरणार नाही अशी कोणी खात्री देऊ शकत नाही. तुम्ही कितीही फुशारक्या मारल्या म्हणून तो तुम्हाला सोडत नाही. तेंव्हा माझ्यासारखे आपल्या घरातच लोळत पडलेले बरे.
मिने तुला ती सुमन लेले आठवते, ती ग डोक्यावर तेलघाणी घेउन फिरणारी. ती आता सियाटेलला असते. तिथे डोक्यावर तेलघाणी घेऊन फिरते कि नाही माहित नाही. तिचे बाबा त्यांच्या पासपोर्ट, व्हिसा याच्या गंमती रोज सांगत असत. आता करोना आल्यावर एकदा भेटले होते मी विचारले “काय काका कुठपर्यंत आली अमेरिका?” ते मला म्हणाले “काही पडल नाही त्या अमेरिकेत, सार निरर्थक आहे, आयुष्यच निरर्थक आहे”. नेमाडेंची कोसला न वाचताही त्यांना आयुष्यातली निरर्थकता करोनामुळे समजली. जे नेमाडेंना साठ वर्षात साधले नाही ते करोनाने साठ दिवसात करुन दाखविले. ते जेधेआजोबा, अजूनही आहेत बर, नव्वदीत असतील. रोज पेपर वाचायचे. भेटलं की एकच वाक्य ‘लवकरच जायचे आहे फक्त त्याच्या बोलावण्याचीच वाट आहे.’ हल्ली दिसत नाहीत दरवाजे खिडक्या बंद करुन आत बसले असतात. दरवाज्याच्या खालच्या फटीतून सूर्याच्या किरणांसोबत करोना येईल भितीने त्या फटी सुद्धा रद्दीपेपर टाकून बुजवुन टाकल्या. करोना येताच अचानक त्यांना आयुष्याची सार्थकता जाणवली असणार. जगणे सोपे असले की आय़ुष्य निरर्थक वाटते एकदा जगणे कठीण झाले कि मग आयुष्याची सार्थकता जाणवायाला लागते. करोना कधी कुणाला काय शिकवेल काही सांगता येत नाही. सारेच शिकत आहे, या करोनाच्या काळात शिकणाऱ्यांचे आणि शिकविणाऱ्यांचेच भरपूर पिक आले आहे.
ए मिने मला टायपायचा कंटाळा आला, आता एवढेच परत कधी पुढे
तुझाच जुना झालेला मित्र
एक मोठ शून्य
आवडला लेख
आवडला लेख
छान आहे पत्र!
छान आहे पत्र!
भारी आहे हे. खूप सटायर विनोद
भारी आहे हे. खूप सटायर विनोद आहेत.
परत एकदा वाचणार आहे. स्पेशली "अंगण झाडून इम्युनिटी कशी वाढेल' आवडलं.
जगणे सोपे असले की आय़ुष्य
जगणे सोपे असले की आय़ुष्य निरर्थक वाटते एकदा जगणे कठीण झाले कि मग आयुष्याची सार्थकता जाणवायाला लागते. +1
धन्यवाद हर्पेन, Cuty, mi_anu
धन्यवाद हर्पेन, Cuty, mi_anu , sumitra
खूप धन्यवाद. हलकेफुलके लिहायचा प्रयत्न केला.
पहिला पॅरा वाचून हे आवडणार
पहिला पॅरा वाचून हे आवडणार नाही असे वाटले होते ते शेवटच्या पॅरा वाचून खूप भावून गेले.
खूप सटायर विनोद आहेत. +१२३
आवडलं!
आवडलं!
धन्यवाद पियू आणि वावे
धन्यवाद पियू आणि वावे
पहिला पॅरा वाचून हे आवडणार नाही असे वाटले होते
>> विचार करायला हवा काय चुकले ते म्हणजे पुढे कधी सुधारणा करता येतील. सुरवातीलाच रसभंग नको.
Chan ahe
Chan ahe
विचार करायला हवा काय चुकले ते
विचार करायला हवा काय चुकले ते म्हणजे पुढे कधी सुधारणा करता येतील. सुरवातीलाच रसभंग नको.
>> तसं काही नाही. मला ब्रिटिश कल्चर, नोकरशाही, इंग्लड वगैरे बद्दल फारशी माहिती नाही. विषेशतः ब्रिटिश जोक्स माझ्या डोक्यावरून जातात. तर पहिला पॅरा वाचून असे वाटले कि पुढे तसे किंवा त्याविषयी काही जोक्स / टोमणे वगैरे असतील तर ते माझ्या डोक्यावरून जातील. परंतु पुढचे सगळे भारतीय कॉंटेक्स्ट मधले असल्याने रिलेट करून वाचू शकले आणि आवडले.
पण हे अत्यंत वैयक्तिक कारण आहे.
छान
छान
धन्यवाद नानबा, निलुदा
धन्यवाद नानबा, निलुदा
स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद पियू. मी ते ब्रिटिश नोकरशाहीचे असेच अतिशयोक्तीने लिहिले होते. कुठेतरी वाचले होते ब्रिटिशांनी राज्य केले तिथे तिथे
सध्याची नोकरशाही पोहचविली. त्याचीच अतिशयोक्ति
खूप छान लिहीलयं , आवडलं.
खूप छान लिहीलयं , आवडलं. नर्मविनोदी शैली मस्तच. काही काही पंचेस भारीच .
आवडला लेख
आवडला लेख
आवडले
आवडले
मस्त लिहिलय..
मस्त लिहिलय..
किड्या मकोड्यांचे फोटो, चहावाला, दूधवाला एकूण सारेच पंचेस भारी जमलेत... हहपुवा
धन्यवाद अस्मिता, साद, स्वाती२
धन्यवाद अस्मिता, साद, स्वाती२, mrunali.samad
सर्वांच्या सुंदर प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. अशा प्रतिसादांमुळे लिहायचा उत्साह वाढतो.