नवरात्र

Submitted by SANDHYAJEET on 15 October, 2020 - 11:02

नवरात्र

नीता आणि मयुरी एकदम घट्ट मैत्रिणी. ऑफिस मैत्रिणी, नाहीतर लोकल ट्रेन मैत्रिणी म्हटलं तर जास्त योग्य ठरेल. दोघींची ऑफिसला जायची नी यायची रोजची एकच ट्रेन. गेली १३ वर्षे मुंबईच्या लोकलबरोबरच्या नात्याबरोबर त्या दोघीनचं नातं पण एकमेकींबरोबर घट्ट झालेलं. ऑफिस पासून घरातल्या सगळ्या सुख दुखांबरोबर वर्षातले सण वार वाढदिवस सगळं एकत्र साजर व्हायचं. एकजण कोण ऑफिसला नाही आलं तर दुसरीला चुकल्याचुकल्यासारखं वाटायचं. वर्षभरातल्या इतर सणांपेक्षा "नवरात्र" दोघींचाही आवडता सण होता.

मुळातच नटण्यामुरडण्याची फार हौस असलेल्या दोघीनाही दरवर्षी नऊ दिवसाचे नऊ वेगवेगळे रंग फार भुरळ घालत असत. महिनाभर आधीपासूनच नऊ दिवस कोणत्या दिवशी नक्की कोणत्या रंगाची साडी घालायची याची लिस्ट व्हाट्सअँपवर फिरत असे. नऊ दिवस कुठल्या दिवसाचा नक्की कोणता रंग आहे, आपल्याकडे त्या रंगाची साडी आहे की नाही, नसेल तर नविन साडी घ्यावी का. साडी असेल तर मॅचिंग ब्लाऊज, दागिने ,कोणते घालावेत, यासारख्या तयारी मध्ये महिना नुसता व्यस्त जात असे. दरवर्षी ही एक वेगळीच मजा असे. उपवास म्हणून रोज निरनिराळे उपवासाचे पदार्थ, नैवैद्याला गोडधोड पदार्थ, खाण्यापिण्याची घरातल्या प्रत्येकाची नुसती चंगळ असे. दोघींच्याही "अहो आईचं " नऊ दिवस उपवास, सर्व रीतीरिवाज करत असतं. दरवर्षी नुसता उठता बसता उपवास करायचा आणि नऊ दिवस एकेक रंग पूर्ण एन्जॉय करायचा असा त्यांचा वार्षिक नियम असे.

करोनामुळे वर्क फ्रॉम होम झाल्यामुळे गेली ६-७ महिने दोघीही एकमेकींना प्रत्यक्षात अजिबात भेटल्या नव्हत्या. रोजची एकमेकींची सवय असल्याने सुरुवातीला रोज फोन व्हायचा. पण नंतर नंतर दोघीही मुलाबाळांमध्ये संसारात इतक्या व्यस्त झाल्या की आता कधीतरीच एकमेकींची आठवण व्हायची. आज अचानक मयुरीचा फोन आल्याचं बघून नीताला सुखद आश्चर्य वाटलं.

नीता : हॅलो बोला मॅडम, मला वाटलं आपण चन्द्रावरच राहायला गेलात की काय ? आज कशी काय माझी तुला आठवण झाली.

मयुरी : मी चंद्रावर आणि तू काय मंगळावर गेली आहेस, असं वाटतंय, तुला तरी कधी माझी आठवण येते

नीता : बरं ते जाऊ देत आज फोन कसा काय केलास ते सांग

मयुरी : काही नाही अग नवरात्र दोन दिवसांवर आलीय आणि मला आपल्या दरवर्षीच्या नवरात्रीची आठवण झाली. काय मजा असायची यार. ९ दिवसाचे ९ रंग. रोज मस्त वेगवेगळ्या साडया. तुझी माझी दरवर्षीची खरेदी. रोजच्या रंगानुसार आपल्या मनाबरोबर पूर्ण लोकलचा डबा आणि आपलं पूर्ण ऑफिस पण लाल, हिरवा, पिवळा, निळा वेगवेगळ्या रंगात नुसतं न्हाऊन निघायचं. काय उल्हास, चैतन्य भरायचं मनामनात. एक वेगळाच फील यायचा जगण्याला. यावर्षी सगळं मिस होणार.

नीता : खरंय तुझं. दोन दिवसापासून माझ्या पण मनात हेच चाललंय. दरवर्षी सारखी तुझी नी माझी नवरात्र यावर्षी साजरी करता येणार नाही म्हणून थोडसं वाईट वाटतय. पण वाईट वाटून न घेता यावर्षी वेगळ काही, जे आजपर्यंतच्या नवरात्रीत कधीच केलं नाही, असं काही करता येईल का याचा मी विचार करत आहे. करोनाने दिलेल्या विचित्र संधीचा चांगला उपयोग करून काही चांगलं करता येईल का ते बघायला पाहिजे. आजपर्यंतच्या आपल्या नवरात्री आठवणीचा एकदम खजाना आहेत. यावर्षीची नवरात्र पुढच्या आपल्या अनेक नवरात्रित अविस्मरणीय राहील, असं काही तरी करूया.

मयुरी : बरोबर आहे तुझं. नुसत्या रंगीबेरंगी साड्या नेसणं म्हणजे नवरात्र साजरी करणं नव्हे. स्त्री शक्तीला ओळखण आणि तिची जोपासना पण व्हायला पाहिजे. विशेषतः आता जे समाजात चाललंय ते बघता आपण आपल्या मुलांपासून, आपल्या घरापासून सुरुवात करून स्त्रीला तुमच्या पेक्षा जास्तही नको आणि कमीही नको तुमच्या बरोबरीची वागणूक द्या एवढं जरी सांगता आलं तरी खऱ्या अर्थाने नवरात्र साजरी केल्यासारखं वाटेल.

नीता : मुलांना नुसतं सांगून चालणार नाही गं. आपल्यातल्या प्रत्येक स्त्री ने स्वतःपासून ते दुसऱ्या स्त्री साठीचा, घरातल्या लहान मुलींपासून ते आजीबाईपर्यंत सगळ्यांबद्दलचा आदर, मानसन्मान आपल्या वागण्या बोलण्यातून दाखवला पाहिजे. आता हेच बघ की माझी लेक मुलापेक्षा मोठी म्हणून रोज ऑफिसमधून आलं की आणि आता सुद्धा किचनमधे, घरकामात मदत करायला तिलाच गृहीत धरते आणि मुलगा ठोंब्या नुसता मोबाइलला वर खेळत बसतो. मुलगी आठवड्यातून एक दिवस डान्स कलासला जाते त्यावेळी मी एकटीच घरातलं सगळं करते. मुलाला कधीच मदत कर म्हणून सांगत सुद्धा नाही. हे मी माझ्या घरापासूनच बदललं पाहिजे. मुलीला गृहीत न धरता मुलगा आणि मुलगी दोघांनाही अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून आपणच समान वागणूक द्यायला पाहिजे. तरच ते शिकतील

नीताने फोन ठेवला आणि तिला लहानपणापासूनची नवरात्र आठवू लागली. तिला कळतंय तेव्हा पासून तिच्या आईचा पूर्ण नऊ दिवस उपवास असायचा. उपवास म्हणून तिच्या दैनंदिनी मध्ये काहीही फरक नसायचा. ती जेवणार नसली तरीही घरातल्या इतर सगळ्यांचं जेवण खाणं, देवीची दोन वेळची पुजाअर्चा, दोन वेळचा गोड धोड नैवद्य यात ती व्यस्त असायची. आई ऑफिसला जात नसल्याने नऊ रंगाच्या साडया, दागिने, हौस मौज असलं काहीच तिच्या नवरात्रीत नव्हतं. नऊ दिवस उपवास म्हणून थोडीशी विश्रांती, आरामही तिला मिळायचा नाही. तिची नवरात्रीची तयारी म्हणजे, नऊ दिवस देवी आपल्या घरी वास्तव्य करणार म्हणून पूर्ण घराची साफसफाई करणे, वापरात नसलेल्याही कपड्यांची, अगदी गोधड्या, मोठे मोठे जमखाने नदीला नेवून त्यांची धुलाई करणे, सगळ्या पाहुण्या पै मधे कोणाकोणाचा उपवास असतो त्यांची नावे काढून त्यांना नवीन साडी चोळी, उपवासाच्या फराळाची पाकिट, फळ पोहोचवणे आणि दहाव्या, दसऱ्याच्या दिवशी पुरणपोळीचा नैवैद्य करणे अशी असायची. लग्न झाल्यापासून गेली १४ वर्षे दरवर्षी नवरात्रीचे नऊ रंग अगदी मनसोक्त जगणाऱ्या आपल्याला कधीच आपल्या "अगं आई " आणि "अहोआईंच्या" नवरात्रीची आठवण झाली नाही याचं तिला फार आश्चर्य वाटलं.

यावर्षीपासून नवरात्र अगदी नव्या पद्धतीने साजरी करायचं असं तिनं मनाशी ठरवून टाकलं. दोन्ही आई गेली कित्येक वर्ष करत असलेली त्यांची नवरात्र आपण आपलीशी करायची आणि आपल्या नवरात्रीचे नऊ रंग त्या दोघींच्याही आयुष्यात यावर्षी पासून भरायचे. यावर्षीपासून सासूबाईंना उपवास करायला न लावता आपणच नवरात्रीचा उपवास, पूजाअर्चा, घराण्याच्या सर्व रीती रिवाजांची जबाबदारी घ्यायची, ऑफिसला जायची घाई नसल्याने यावर्षी सगळं मनापासून करायचं. दोघीनांही नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या, दागिने घालून, नऊ दिवस वेगवेगळे चविष्ट पदार्थ खाण्याची,आपण इतके वर्ष अनुभवलेली नवरात्रीची मजा अनुभवायला लावायचं. माझ्यातल्या स्त्रीपासून सुरुवात करून घरातली चिमुकली, मावशी, काकी, आजी ते आजूबाजूच्या सगळ्या स्त्रियाची काळजी, मानसन्मान माझ्यासाठी किती महत्वाचा आहे हे आपल्या वागण्या बोलण्यातून घरातल्या मुलाला शिकवायचं असं तिने ठरवलं.

नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे माता नवदुर्गाच्या नऊ रूपातील नऊ शक्तीची पूजा करणे आणि प्रत्येक दिवस दुर्गा मातेच्या 9 रूपांना समर्पित करणे असा आहे. दुर्गेची नऊ रूपे असलेल्या शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघण्टा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री अश्या नऊ रूपांची आपण नऊ दिवस पूजा करतो.

नवरात्रीत दुर्गा देवीचा फोटो किंवा मूर्ती मध्यभागी ठेवून गरबा खेळतात. गरब्याचा अर्थ " गर्भ " आईची कूस असा आहे. गरबा गोलाकार सर्कल मध्ये खेळतात. जो मनुष्य जीवन चक्राचे प्रतिनिधित्व करतो, मनुष्य जन्मापासून जीवनाकडे, जीवनाकडून मृत्यूकडे आणि मृत्यूनंतर परत पुनर्जन्माकडे जातो. गरबा हे दर्शवतो की या सगळ्या जीवन चक्रात गरब्याच्या मध्यभागी असणारी स्त्री रूपात प्रतिनिधित्व करणारी देव ही एकमेव गोष्ट आहे जी सतत बदलणाऱ्या विश्वात बदलत नाही, अचल तशीच राहते.

दरवर्षीच्या धावपळीच्या दैनंदिनी मध्ये इच्छा असतानाही आई दुर्गेची नऊ रूपं, नऊ दिवसांचं महत्व समजावून घेऊन मनापासून पूर्ण जागरूकतेने नवरात्र साजरी करायला जमल नव्हतं. ती यावर्षी समजावून घेऊन साजरी करूया. सगळ्या स्त्रियांनी आपल्यात असलेल्या स्त्री शक्तीपासून ते घरातल्या, आजूबाजूच्या सगळ्या स्त्री शक्तीना महत्व देवूया, त्यांची योग्य ती काळजी घेवूया. नऊ दिवस नऊ रंग सगळ्यांनी मनामनात आणि आपल्याबरोबर इतरांच्याही आयुष्यात भरुया. या वर्षाच्या नवरात्रीत घरातल्या आपल्या एका मुला पासून नवीन बदलाची सुरुवात करूया.

अश्या नवीन विचाराच्या नवरात्रीने प्रेरित झालेल्या नीताने तिचा प्लॅन मयुरीला सांगायला फोन उचलला.

आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !!

डॉ संध्याजीत

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users