मनाला दार असते तर

Submitted by किमयागार on 29 September, 2020 - 04:04

मनाला दार असते तर कधीही लावले नसते
तिच्या ह्या आठवांना मी मनातच डांबले नसते.

तिला मी रोखले नाही कधीही दूर जाताना
तसेही निश्चयी पाऊल ते भांबावले नसते.

तिचे माझ्या घरी येणे घराला भावले असते
तिच्या-माझ्यातले नाते जगाने मानले नसते.

सहन झालेच असते जर धरेचे मौन ताऱ्यांना
असे आकाशगंगेतून तारे निखळले नसते.

दगा केलाच नसता जर सुईने घट्ट टाक्यांशी
उसवणे काय असते हे कुणीही जाणले नसते.

---------©मयुरेश परांजपे(किमयागार)--------
           २९/०९/२०२०
७२७६५४६१९७

Group content visibility: 
Use group defaults