आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्यावर पूजा -अर्चा , श्लोक पठण, स्तोत्र म्हणणे याचे संस्कार लहानपणापासून होतच असतात. बहुतेकांच्या घरामध्ये धार्मिक वातावरण असते. ज्योतिषशास्त्रामध्ये यावर खूप लेखन केले गेलेले आहे.
मी गरोदर असताना माझे वाचन चालू होते..थेरॉटिकल नॉलेज मिळवणे म्हणा ना, लहान मुलांच्या बौद्धिक वाढीवर मी काढलेल्या नोट्स वर आधारित एक लेख मी यापूर्वीच लिहिलेला आहे.
https://www.maayboli.com/node/76764
तेव्हाच स्तोत्र - श्लोक या गोष्टी मुलांना शिकवण्यामागचे शास्त्रीय कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला.
अनेक neuroscientists नी सिद्ध केले आहे, की मंत्रांच्या उच्चराचा शरीर आणि मनावर चांगला प्रभाव पडतो. मंत्रांचा विशिष्ट ध्वनी, वारंवारता आणि भाषा यांचा सकारात्मक परिणाम मुलांच्या जीवनावर होतो.
मंत्रांचा जप जेव्हा केला जातो, तेव्हा अंतःस्रावी प्रणालीला उत्तेजना मिळते . मेंदूचे डावा आणि उजवा हे 2 अर्धगोल synchronise होतात . मेंदूकडून सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. ही सकारात्मक ऊर्जा नकारात्मक विचार आणि ताणतणाव कमी करते. मेंदूला जास्त ऑक्सिजन पुरवला जातो.. त्यामुळे हृदय गती आणि रक्तदाब कमी होतो . Brain wave activity शांतपणे चालू राहते . त्यामुळे जप केल्याने मनःशांती मिळते.
मंत्रांचा उच्चर करताना जिभेने टाळूवर आघात केला जातो . ही जी टाळूवर दाब देण्याची क्रिया आहे, त्यामुळे hypothalamus, thalamus आणि pituitary ग्रंथीला उत्तेजना मिळते . बोलण्याची जी क्रिया आहे , तिचे मानसिक कृतींशी विशेषतः बौद्धिक कामगिरीशी जवळचा संबंध आहे . श्लोक म्हटल्याने , मंत्रांचा जप केल्याने जी कंपने निघतात , ती मेंदूमधील चक्रांना सक्रिय करतात . त्यामुळे मुलांची एकाग्रता वाढवणे , स्मरणशक्ती वाढणे यासाठी फायदा होतो . त्यांचा अभ्यासावरचा फोकस सुधारतो . आणि अंतिमतः विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी सुधारल्याचे निदर्शनास आले आहे.
आपल्या संस्कृतीमध्ये 108 वेळा जप करायला सांगितले आहे . यामुळे आपली विश्वातील कंपनांशी लय साधली जाते , सुसंवाद साधला जातो.
स्तोत्रे , मन्त्र , श्लोक यांमुळे जिभेला व्यायाम मिळतो . वाणी शुद्ध होते . उच्चर स्पष्ट होतात . मुलांचे तोतरे बोलणे हळूहळू कमी होते . पाठांतर सुधारते . सर्व श्लोक , मन्त्र एका लयीमध्ये म्हटले जातात . ही लय मनाला प्रसन्न करते , शांतता मिळवून देते .
मंजुश्री मन्त्र, शिवताण्डवस्तोत्र यासारख्या गोष्टी आजही अभिनयाच्या कार्यशाळेत उच्चर, शब्दफेक सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांना पाठ करायला सांगितल्या जातात .ही सारी माहिती मला मिळाली . आता त्याचा वापर कसा करता येईल , यावर विचार आणि कृती चालू केली .
मी गरोदरपणात सर्व च प्रकारचे वाचन भरपूर केले . पण रोजच्या पूजेव्यतिरिक्त फारशी धार्मिक कृत्ये करू शकले नाही . पण माझी रोजची सकाळ
"कराग्रे वसते लक्ष्मी , करमध्ये सरस्वती |
करमूले तू गोविंदम , प्रभाते करदर्शनम ||"
या स्वकर्तृत्वाचे महत्त्व सांगणाऱ्या मंत्राने चालू व्हायची. त्यानंतर
"समुद्रवसने देवी पर्वतम स्तनमंडलं |
विष्णूपत्नीं नमस्तुभ्यं परस्पर्शम क्षमस्व मे ||"
हा मन्त्र म्हणून जमिनीला अभिवादन करायचे आणि मग कामे चालू करायची . आपली संस्कृती प्राणिमात्रांप्रती , पंचमहाभूतांप्रती कृतज्ञता शिकवते , ती मला खूप आवडते.
त्यामुळे स्वयमचा जन्म झाला , तेव्हाही तो सकाळी उठला , की मी हे मन्त्र म्हणायचे . त्याला काहीही कळत नाही , हे माहिती असूनही blindly म्हणत राहायचे .
माझे पती धार्मिक वृत्तीचे , तर माझा प्रवास नास्तिकतेकडून डोळस आस्तिकतेकडे झालेला . स्वयमच्या बाबतीत आपण कोणतेच विचार त्याच्यावर लादायचे नाहीत , असे आम्ही ठरवले . पण आपली संस्कृती , रीतिरिवाज यांची माहिती त्याला करून देणे हे आपले कर्तव्य आहे , असे आम्ही मानले . नंतर मोठा झाल्यावर ठरवेल तो आस्तिक व्हायचे का नास्तिक , पण त्यासाठी पूर्वपीठिका तरी बनवून देणे , आपले काम आहे , असे आम्ही ठरवले . त्यानुसार मग पुढचा विचार चालू केला .सुदैवाने घरात आम्ही दोघेच होतो , इतर कुणाची मदत आणि लुडबुड काहीच नसल्याने आम्ही एकमताने गोष्टी ठरवून त्याची अंमलबजावणी करू शकतो .
आमचे Arrange marriage असले , तरी माझ्या सासर माहेरच्या सण साजरे करण्याच्या पद्धतींमध्ये खूप फरक होता . मग तुझी पद्धत का माझी पद्धत , यावर काथ्याकूट करण्यापेक्षा आम्ही स्वामी समर्थ प्रतिष्ठान चे सणवार , व्रतवैकल्ये हे पुस्तक आणले . त्यात प्रत्येकांची कथा , यथासांग पूजाविधी सगळे सविस्तर वर्णन आहे . मग कोणताही सण आला , की आधी सगळी माहिती वाचून पाहायचे , तयारी करून ठेवायची आणि मग उत्साहाने त्यामधले अवडंबर टाळून तारतम्याने साजरे करायला लागलो सगळे सणवार .
रोज स्वयमला अंघोळ घालताना
"गंगे च यमुने च गोदावरी सरस्वती |
नर्मदे सिंधू कावेरी जले S स्मिन संनिधिम कुरु ||" आणि
"जान्हवी वृद्धगंगा च कालिंदी च सरस्वती
कावेरी नर्मदा वेणी सात गंगा प्रकीर्तिताः ||"
हे श्लोक मी म्हणायचे .
तर अंग पुसताना नवग्रह स्तोत्र म्हणत राहायचे . रोजची पूजा नेहमी अमित करतो . पण फुलांनी देव्हारा सजवणे हे माझे आवडते काम ! गणपती आणि दुर्गादेवी ची आरती रोजची आणि मग प्रत्येक दिवसानुसार त्या त्या देवांची आरती करतो . मग त्या त्या दिवसाप्रमाणे त्या त्या देवाचे स्तोत्र ! संध्याकाळी शुभंकरोती , रामरक्षा , भीमरूपी महारुद्रा म्हणतो . स्वयम जागा असेल , तेव्हा त्याला मांडीवर घेऊनच हे सर्व करायचो .
मी गाण्याची शौकिन ! गाण्याच्या 2 परीक्षा दिलेल्या होत्या . त्यामुळे स्वयमला झोपवताना अंगाईगीत आवडीने व आवर्जून म्हणायचे . अमितला गाणे म्हणता यायचे नाही . त्यामुळे संध्याकाळी मी ओपीडी साठी गेल्यावर त्याच्यावर स्वयमची जबाबदारी असायची , तेव्हा तो बडबडगीते म्हणत स्वयमला खाऊ घालायचा , झोपवायचा . कुसुमाग्रजांचे "अक्षरबाग ", विंदा करंदीकर , मंगेश पाडगावकर यांची बडबडगीते... खूप सारी पुस्तके त्यासाठी आम्ही खरेदी केलेली होती . त्यामुळे स्वयमच्या कानावर फार लवकरच वेगवेगळे शब्द पडले . हिंदी - मराठी - इंग्लिश तिन्ही भाषांमधील बडबडगीते आम्ही म्हणत राहायचो . त्यामुळे तिन्ही भाषा त्याला लवकरच used to झाल्या .
स्वयम सुरुवातीपासूनच शहाणा बाळ होता . खाण्यासाठी मात्र त्याने खूप त्रास दिला . जन्मतः 4 kg चा होता , hypoglycemia होता . त्यामुळे त्याच्या फीडिंग ची विशेष काळजी घ्यायला सांगितले होते सरांनी . पण हा उठायचाच नाही स्वतः होऊन . अक्षरशः 2 -2 तासांचा गजर लावून त्याला फीडिंग द्यावे लागायचे...दिवस असो वा रात्र . उठता उठायचा नाही . हलवून , टिचक्या मारून उठवावे लागे . ही त्याची खाण्याची नावड , ती सवय पुढेही कंटिन्यू राहिली , अगदी तिसरीत जाईपर्यंन्त . शिक्षा वाटायची त्याला खाणे म्हणजे . काहीही न खाता दिवसदिवस आरामात राहू शकायचा तो .(एक स्वतंत्र लेख होईल त्याने खाण्यासाठी दिलेल्या त्रासाचा. ) तर त्यामुळे त्याला कशात तरी रमवत , फसवूनच खाऊ घालायचो आम्ही . त्यासाठी 8 महिन्याचा झाल्यापासूनच त्याला गोष्टी सांगायला सुरुवात केली . मी तर पुस्तकी किडा . त्यामुळे माझ्याजवळ पुष्कळ गोष्टींचा खजिना होता . त्यातल्याच मी रंगवून सांगायचे . अमित पूस्तकातील गोष्टी वाचून सांगायचा . त्यासाठी चित्रे भरपूर आणि गोष्ट छोटी , अशी पुस्तके आणली होती . चित्रे दाखवत , रंगवून गोष्टी सांगायचो . त्यामुळे सुरुवातीला नुसते ऐकणारा स्वयम लवकरच हातात पुस्तक घेऊन चित्रे पाहण्यात आणि त्या अनुषंगाने गोष्टी ऐकण्यात रमून जायला लागला . तो बॉर्न आर्टिस्ट आहे , 1.5 वर्षांपासूनच चित्रे काढू लागला . पण नंतर त्याची कल्पनाशक्ती फुलवण्यात आमचे गोष्टी सांगणे आणि त्याचे पुस्तकातील चित्रे पाहणे यांचा हातभार नक्कीच लागलेला आहे .त्याचे कुतूहल वाढले , चौकसबुद्धी वाढली . सतत विचारप्रक्रिया चालू असल्याचे द्योतक म्हणून सतत प्रश्न विचारणे चालू राहिले , आजही चालूच असते . त्यासाठी आमच्या दोघांच्या करियर्स पेक्षा स्वयमला वाढविण्याला प्रायोरिटी देऊन दोघांपैकी कुणीतरी कायम त्याच्या सोबत राहील, याची आम्ही काळजी घेतली .
आपल्या घरात लहान बाळ आले , की आपल्या चित्तवृत्ती फुलून येतात . ती जेव्हा बोलायला चालू करतात , तेव्हा आपल्याला खूप मजा वाटते ते चिमखडे बोल ऐकायला . आपणच जणू लहान होतो आणि आपण स्वतः च त्यांच्याशी बोबडे बोल बोलू लागतो . आपलेच अनुकरण ती करतात आणि मग बोबडे बोलू लागतात . बहुतांशी घरात असेच घडते . आम्ही जाणीवपूर्वक स्वयमशी कधीच लाडेलाडे बोबडे बोललो नाही . शिवाय घरात चालणाऱ्या आरत्या , स्तोत्रे सगळे तो ऐकत असायचा , गोष्टी , बडबडगीते.. सगळे कानावर पडत असायचे त्याच्या . त्यामुळे तो कधी बोबडे बोललाच नाही . तो एकेक , दोनदोन शब्द असे इतर मुलांप्रमाणेच बोलायला लागला , पण स्पष्ट , अगदी अस्खलित . लवकरच पूर्ण वाक्ये बोलायला लागला . मला सांगायला अभिमान वाटतो , की तो कधीही वाक्यरचना चुकला नाही बोलताना , स्त्रीलिंग - पुल्लिंग चे घोळ घातले नाहीत , किंवा कोणताही शब्द कधी चुकीच्या ठिकाणी वापरला नाही त्याने . बरीच मुले स्वतःचे नाव घेऊन बोलतात . उदा."राणीला पाणी पाहिजे ", "राणीला भूक लागलीय ", असे. तसे स्वयम कधीही बोलला नाही . तो व्यवस्थित मला - तुला , आपल्याला , सगळ्यांना असे बोलायचा . सर्वांना खूप कौतुक वाटायचे त्याच्या अस्खलित बोलण्याचे , चकित व्हायचे लोक त्याचे अचूक बोलणे ऐकून .
आमचे ऐकून ऐकून 4 वर्षापर्यंत घरात म्हटल्या जाणाऱ्या सगळ्या आरत्या , स्तोत्रे , जपमंत्र , बडबडगीते सगळे पाठ झालेले होते त्याला . पहिलीपासून जेव्हा लवकर उठेल , तेव्हा पूजा स्वतः करण्याचा हट्ट धरतो , देव्हारा छान फुलांनी सजवून व्यवस्थित पूजा करतो .
मग आम्ही अंकुर बालवाडी या बिनभिंतीच्या शाळेमध्ये त्याला ऍडमिशन घेतली . त्यांच्याही अभ्यासक्रमात दर महिन्याला इंग्लिश - मराठी बालगीते , एका श्लोकाचा समावेश होता . त्यामुळे आमचाच format पुढे चालू राहिला . स्वयमच्या पाठांतर संग्रहात अजून भर पडली . शिवाय जाणीवपूर्वक त्याला english medium ला घातले नाही आम्ही . तरी त्याला इंग्लिश ची भीती नाही वाटत, व्यवस्थित समजते त्याला इंग्लिश.
पाटणकर मॅडम अनुभवी होत्याच , शिवाय त्यांची शिकवण्याची पद्धत खूप चांगली होती . त्यामुळे स्वयमला त्यांच्या हाती पूर्ण सोपवले होते . आम्ही कसलाच हस्तक्षेप नाही केला त्यात . पण त्यांनी तिथे लेखन - वाचन शिकवल्यावर आम्ही घरी त्याला छोटी छोटी गोष्टीची पुस्तके स्वतः वाचायला लावायचो . अंक, छोट्या छोट्या बेरजा - वजाबाक्या तिथे शिकवल्या गेल्या , तेव्हा घराजवळच्या किराणा /स्टेशनरी /भाजीच्या दुकानात रोज काही ना काहीतरी खरेदी करायला आम्ही स्वयमला एकट्यालाच पाठवायचो . त्यामुळे प्रॅक्टिकल पण पक्के झाले त्याचे .
सध्या स्वयम चौथीत आहे . चित्रे छान काढतोच तो , डान्स पण चांगला करतो . आता आम्ही फक्त त्यालाच वाचायला लावत नाही , क्रमाक्रमाने तिघेही रोज एक तास अभिवाचन करतो . त्यामुळे शब्दांची फेक , अर्थ आणि भावानुसार आवाजाचे चढ उतार हेही माहिती झालेय त्याला . त्याचा वक्तृत्व - कथाकथन स्पर्धेत स्वयमला फायदा झाला . स्वयम त्यात भाग घेतो , यश मिळवतो . श्लोक - स्तोत्रे यांच्या पाठांतरामुळे त्याची स्मरणशक्ती वाढली , बुद्धी तल्लख झाली , एकाग्रता वाढली, त्याचेच हे सर्व फायदे आहेत . शालेय अभ्यासातही चांगला आहे . आजवर A+ ग्रेड चुकली नाहीये त्याची . स्कॉलरशिप परीक्षा पाचवीत असते . त्या धर्तीवर मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दुसरीपासून घेतली जाते . मराठी, गणित , बुद्धिमत्ता असे विषय असतात . शाळेतील मॅडमच्या सूचनेनुसार आम्ही स्वयमला त्या परीक्षांना बसवले . घरीच सर्व तयारी करून घेतली आम्ही . पण त्यावेळी मराठीची फार तयारी करून घ्यावीच नाही लागली . कारण शब्दसंग्रह , म्हणी , वाक्प्रचार.. सगळे त्याला माहिती होते आधीच वाचनामुळे . शुद्धलेखन कळत होते . तेही फारसे चुकले नाही कधी .
दुसरीच्या मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत त्याने 164/200मार्क्स मिळवून सेन्टर ला 6 वा, जिल्ह्यात 17वा, राज्यात 19वा क्रमांक मिळवला . तर तिसरीच्या मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत 260/300 गुण मिळवून सेंटर ला 9 वा, जिह्यात 19 वा , राज्यात 21वा क्रमांक मिळवला आहे .
Drawing competitions मध्ये पहिल्यापासून यश मिळवतोच तो . पण Lockdown काळात कोरोना या विषयावर एक acting challenge होते , त्यात स्वयमने सहभाग घेतला . आणि त्यामध्ये त्याचा व्हिडीओ निवडला गेला . त्यामध्ये सादर केलेले गाणे त्याने स्वतः बनवले होते .आम्ही थोड्या दुरुस्त्या केल्या नंतर त्यात , पण मूळ कल्पना त्याची होती .
https://youtu.be/9gTCGLNt5z0
व्ही. एस. फौंडेशन तर्फे घेतलेल्या एकपात्री स्पर्धेत प्रथम तर वारकरी सेवा संघातर्फे राज्यस्तरीय संत कथाकथन स्पर्धा आयोजित केली होती , त्यात उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला .
काही दिवसानंतर लोककला challenge ची घोषणा झाली . त्यात कीर्तन या लोककला प्रकारासाठी स्वयमचा व्हिडिओ निवडला गेला होता .
https://youtu.be/xYpL-IKGjvU
वाचलेल्या कथा , पुस्तके यांचे संस्कार होत च असतात . त्यामुळे सद्गुण अंगी बाणवायला , नैतिक मूल्ये आचरणात आणायला मदतच होते , याचा अनुभव आम्ही घेतलाय . आजपर्यंत कधीही त्याच्या आगाऊपणा च्या, शिष्टपणाच्या कोणत्याही तक्रारी आमच्यापर्यंत आलेल्या नाहीत . उलट एकदम sincere, मनमिळाऊ, सर्वांना मदत करणारा, हुशार मुलगा म्हणून तो शाळेत, डान्स क्लास मध्ये, नातेवाइकामध्ये , शेजाऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहे. त्याचा सामाजिक जाणिवेचे ,इतरांच्या दुःखाची जाणीव असण्याचे 3 अनुभव आम्हाला यावर्षी मिळाले आणि आम्ही सुखावून गेलो आहोत .(https://www.maayboli.com/node/76657)
अशाप्रकारे आम्ही मिळवलेल्या थेअरीचा , knowledge चा प्रत्यक्षात वापर आम्ही केला . आणि सध्या तरी स्वयमची प्रगती आणि वाटचाल चांगल्या पद्धतीने चालू आहे. यापुढेही तशीच चालू राहील आणि तो एक जबाबदार , सुजाण नागरिक बनेल , अशी आम्हाला आशा आहे .
सुरेख!
सुरेख!
मुले आपले अनुकरण करतात हे खरेच आहे. माझा मुलगा पण कधी बोबडे बोलला नाही. संस्कृत श्लोक म्हणत असल्याने त्याचे उच्चर स्पष्ट होते.
स्वयमचे कौतुक
खूप छान.. स्वयमचे अभिनंदन!
खूप छान..
स्वयमचे अभिनंदन!
धन्यवाद विनिता आणि रूपाली.
धन्यवाद विनिता आणि रूपाली.
तुम्हां उभयतांचे तसेच
तुम्हां उभयतांचे तसेच स्वयंमचे खूप खूप अभिनंदन !
Khoop chhaan.तुम्हा तिघांचे
Khoop chhaan.तुम्हा तिघांचे कौतुक आणि अभिनंदन.
थँक्स देवकी आणि SANDHYAJEET.
थँक्स देवकी आणि SANDHYAJEET.
तुम्ही दोघांनीही कामं आणि घर
तुम्ही दोघांनीही कामं आणि घर/अपत्य यांचा सुरेख समतोल साधला आहे,तेही डोळसपणे आणि अपेक्षांचे ओझे न लादता..
तिघांचेही कौतुक!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद तेजो.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद तेजो.
सुंदर सुसंस्कृत कुटुंब.
सुंदर सुसंस्कृत कुटुंब. स्वयंमचे मनःपूर्वक अभिनंदन.
थँक्स किशोर मुंढे.
थँक्स किशोर मुंढे.
छान लेख, आवडला मला, अनुभव छान
छान लेख, आवडला मला, अनुभव छान शब्दबद्ध केले
धन्यवाद.
धन्यवाद.
बहुतांशी घरात असेच घडते .
बहुतांशी घरात असेच घडते . आम्ही जाणीवपूर्वक स्वयमशी कधीच लाडेलाडे बोबडे बोललो नाही . शिवाय घरात चालणाऱ्या आरत्या , स्तोत्रे सगळे तो ऐकत असायचा , गोष्टी , बडबडगीते.. सगळे कानावर पडत असायचे त्याच्या . त्यामुळे तो कधी बोबडे बोललाच नाही . तो एकेक , दोनदोन शब्द असे इतर मुलांप्रमाणेच बोलायला लागला , पण स्पष्ट , अगदी अस्खलित . लवकरच पूर्ण वाक्ये बोलायला लागला . मला सांगायला अभिमान वाटतो , की तो कधीही वाक्यरचना चुकला नाही बोलताना , स्त्रीलिंग - पुल्लिंग चे घोळ घातले नाहीत , किंवा कोणताही शब्द कधी चुकीच्या ठिकाणी वापरला नाही त्याने . बरीच मुले स्वतःचे नाव घेऊन बोलतात . उदा."राणीला पाणी पाहिजे ", "राणीला भूक लागलीय ", असे. तसे स्वयम कधीही बोलला नाही . तो व्यवस्थित मला - तुला , आपल्याला , सगळ्यांना असे बोलायचा . सर्वांना खूप कौतुक वाटायचे त्याच्या अस्खलित बोलण्याचे , चकित व्हायचे लोक त्याचे अचूक बोलणे ऐकून .
>>>
लहान मुले बोबडे बोलतात याचे कारण बहुतेक जीभेला वळण नसते हे असावे. जाणकार प्रकाश टाकू शकतील.
जर मी आजुबाजुला पाहिले तर फारच कमी लोकं मोठेपणी बोबडं/तोतरं बोलतात. त्याचे कारण बहुतेकदा 'शारिरीक' (फिजिओलॉजिकल) असते. तर स्वच्छ बोलणारे बहुसंख्य लोक लहानपणी बोबडे बोलले असतील कारण खूपच कमी लोकांना असे स्वच्छ बोलण्यासाठी मंत्र वगैरेचे पाठ मिळाले असतील. जर सगळेच लहानपणापासून शुद्ध बोलले असते तर मग वेगळे कौतुक का होईल.
तर प्रश्न असा की मूल बोबडे बोलल्याने त्याचे/तिचे काही नुकसान होते असे विदा बघता दिसत नाही. मग मूल जर बोबडे न बोलता थेट स्वच्छ बोलू लागले तर त्यामुळे काय फायदा होतो?
तोच प्रश्न बोलताना मला म्हणण्याऐवजी नाव घेऊन 'स्वयमला' असे बोलणे. मोठे झाल्यावर असे बोलणारी व्यक्ती मी तरी पाहिली नाही (राज कुमारसारखे हम म्हणणारे आहेत पण तो भाषेचा/माजाचा लहेजा असावा). तर हा नैसर्गिक टप्पा आहे का जडणघडणीतला ज्यात मूल स्वतःला तृतीय पुरुषी संबोधन वापरते आणि मग प्रथम पुरुषी वापरू लागते? तो टप्पा टाळल्याने काय फायदा होतो?
मूल जर बोबडे न बोलता थेट
मूल जर बोबडे न बोलता थेट स्वच्छ बोलू लागले तर त्यामुळे काय फायदा होतो?
>> नुकसान वाटते मला हे खरे तर... लहान मुलांचे बोबडे बोलणे खूप क्युट वाटते... तो अनुभव वेगळाच आहे...
स्वयमचं अभिनंदन आणि कौतुक.
स्वयमचं अभिनंदन आणि कौतुक.
खरं नाव प्रचेतस आणि घरचं नाव स्वयम आहे का?
माझी दोन्ही मुलं बोबडी बोलली नाहीत की स्वतःच्या नावाने बोलली नाहीत. त्यांच्याशी घरातली मोठी माणसं बोबडी बोबडी लाडेलाडे बोलत होती तरीही
आमच्याकडे श्लोक स्त्रोत्र वैगेरे कुणीही म्हणत नाहीत. मुलांवर बॉलीवुडी संस्कार आहेत म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
झोपताना हिण्दी सिनेम्यांमधली बाळांची गाणी. अगदी बाळांची नसतील तरी एखादं शांत चालीचं गाणं उपयोगी आलं. मराठीत निंबोणीच्या झाडामागे, गुणी बाळ असा, एक झोका वैगेरे.
गुणी बाळ असा गाणं माझ्या दोन्ही मुलांना आवडायचं. त्यांनाच गुणी बाळ बोलतेय असं वाटत असेल म्हणुन.
गोष्टी रंगवून सांगण्यात मी माहिर आहे. त्यामुळे असलेल्या आणि नसलेल्या गोष्टी त्यांना फसवून खाऊ घालताना सांगितल्या. आता ते दोघेच मला बर्याच गोष्टी सांगतात.
मुलगी १५ ची आहे. मुलगा ६ चा. मुलाच्या आवडी कल अजुनही कळत नाही. कळेल हळुहळु. अभ्यासाचा कंटाळा आहे. पण आम्ही दोघेही जबरदस्ती करणारे नाही म्हणून गोड बोलुन जेवढं करतोय तेवढं ठीके. खेळायला हवं भरपुर.
मुलगी मात्र लहान पणापासुनच हुशार आहे. चित्रकले साठी कुठलेही क्लास न करता उत्तम चित्र काढते. अभ्यासात हुशार आहे. वागणुक सडेतोड बंडखोर आहे.
खरंतर दोन्ही मुलं बंडखोर आहेत. कधी कधी वाटायचं की अरे आपण शिस्त लावायला कमी पडतोय की काय? जरा जास्तच मुलांच्या कलाने घेतोय की काय?
खरं तर तुमचे लेख आणि काल तुमच्या लेखावरचे प्रतिसाद वाचुन मलाही वाटु लागलेलं की आम्ही कमी पडतोय की ह्या बाई जरा जास्त करताहेत.
पण मला कळलं की अरे मुलांना वाढवताना ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पण कळत नकळत केल्यात/करत आहोत की. इथे तुम्हाला उद्देशुन काहीही नाही. गैरसमज नसावा. माझं मलाच बरं वाटलं हे सांगायचंय. थोडक्यात मुलं आम्हाला बघुन स्वतः घडली / घडताहेत काही वेळा आम्ही थोडा एफर्ट टाकला.
मुलं दोन्ही बंड आहेत. पण आपलं चुकलं हे लक्षात आलं की ताबडतोब नाही तरी अगदी दुसर्या दिवशी पण सॉरी बोलतात. कुणीही न सांगता.
अगदी लहान्या पण. आम्हालाच नाही आजीआजोबांना, मित्र मैत्रीणींना सुद्धा.
दोन्हीकडचे आजी आजोबा, काका-आत्या-मामा-मावशी, चुलत-मामे-मावस भावंडं भरपुर गोतावळा आहे. मित्र मैत्रिणी आहेत. आपुलकी प्रेम समजदारपणा सगळं आहे. कुठली गोष्ट उघड बोलु नये विचारु नये इतकी समज आपोआप कशी आली मलाही माहित नाही. पण अजुन नको ती गोष्ट कुणासमोर बोलल्यामुळे/कुणाला सांगितल्यामुळे ऑकवर्ड प्रसंग आले नाहीत.
आणि आले असतील तरी आता लक्षात नाहीत. रादर मुलंच ती असं होणारच करुन त्यावेळेला समजावुन सोडुन देण्याचा दोघांचाही स्वभाव असल्यामुळे जास्त मनावर न घेता त्यांना आपोआप शिकवण दिली गेली असावी.
मला माझी मुलगी देव आनंदचं तेरे घरके सामने इक घर बनाउंगा किंवा ये दिल ना होता बेचारा जेव्हा लहान असताना गायली गुणगुणली तेव्हा जो आनंद झाला जो तुमच्या मुलाला श्लोक स्त्रोत्र म्हणतांना ऐकुन झाला हाच काय तो फरक.
हे मी स्वतःसाठी प्लस समस्त माझ्यासारख्या पालकांसाठी लिहिलंय ज्यांना आपण आपल्या मुलांना नीट वाढवतोय की नाही असे प्रश्न पडताहेत.
टेक अ चिलपिल.
चांगली पोस्ट सस्मित
चांगली पोस्ट सस्मित
हे सगळ जर तुम्ही इतक्या छान
हे सगळ जर तुम्ही इतक्या छान , प्रीप्लॅनिंग, आनि सहज करताय , अनै लिहत्ताय पण इतक्या सहज की मला अस वाटु लागले आहे का काटेरी मुकुट का असावा ???
आमच्याकडे श्लोक स्त्रोत्र
आमच्याकडे श्लोक स्त्रोत्र वैगेरे कुणीही म्हणत नाहीत. मुलांवर बॉलीवुडी संस्कार आहेत म्हटल्यास वावगं ठरणार नाही. Happy
झोपताना हिण्दी सिनेम्यांमधली बाळांची गाणी. अगदी बाळांची नसतील तरी एखादं शांत चालीचं गाणं उपयोगी आलं. मराठीत निंबोणीच्या झाडामागे, गुणी बाळ असा, एक झोका वैगेरे>>> +१
नादिशा, सगळे लेख आवडले.
नादिशा, सगळे लेख आवडले. आपल्या अवतीभवती जागरूक पालक क्यॅटेगरीतील आईवडील असतात त्यांची हे सर्व वाचताना आठवण झाली. पण च्रप्स ना अनुमोदन. लहान मुलांचे बोबडे बोलणे खूप क्युट वाटते. किंबहुना ती टीनेजर वगैरे झाल्यावर जरा हे बोबडे बोल आठवून स्मरणरंजन करण्यात आनंद होतो. कारण ते निरागसपण आता निसटलेलं असतं.
आम्ही पाहिलेले एक जागरूक पालक (वैयक्तिक घेऊ नये नादिशा. सहज आठवले म्हणून लिहिले) आमचे शेजारी. त्यांना दोन मुलगे वय वर्षे आठ व पाच. त्या काळात घरी vcr आणून सिनेमा बघितला जाई. तर आईवडील आधीच तो सिनेमा मुलांच्या अनुपस्थितीत बघून मगच ठरवत की तो मुलांना दाखवण्यासाठी योग्य आहे का ते. ;
सस्मित छान लिहिलंय.
सस्मित छान लिहिलंय.
जागरूक आदर्श पालक होण्यासाठी स्वतः फार गुणी असावं लागतं किंवा स्वतःवर जबरदस्त ताबा, पेशन्स, कंसिस्टंट असावं लागतं. माझी मुलगी गोष्ट तर सोडा पण गायत्री मंत्रही अजून नीट ऐकून घेत नाही आणि तिने तो ऐकावा यासाठी लागणार पेशन्स, वेळ ठरवणे वगैरे गोष्टी मला जमत नाहीत. चिडचिड होते किंवा हताशपणे सोडूनच दिले जाते.
पण जे पालक या आणि अशा गोष्टी घडवून आणू शकतात त्यांच्याबद्दल असूया न वाटता फार कौतुक आणि आदर वाटतो.
खरंय.
खरंय.
माझी मुलगी मला स्वतः मम्मा गाणं बोल/गोष्ट सांग म्हणायची झोपताना.
पण मुलगा आता जरा मोठा झाल्यापासुन नको बोलु गाणं म्हणतो. मी एकदा विचारलं का रे म्हणून तर सिरीयसली म्हणाला किती बेसुरा आवाज आहे तुझा. गाणी गाण्यापेक्षा त्याला त्याच्या गोष्टी ऐकवायच्या असतात. डायनसॉर, मेगलादॉन, शार्क, दुनिया का सबसे बडा अजुबा इइ.