भरपाई

Submitted by पराग र. लोणकर on 23 September, 2020 - 01:53

भरपाई

दरवाजाची बेल वाजली. सकाळची नऊची वेळ, म्हणजे कमळेची यायची वेळ. विशाखा तिच्या रात्रीच्या हॉस्पिटल dutyवर गेली होती.

मी यंत्रवत उठून दरवाजा उघडला आणि परत सोफ्यावर येऊन बसलो. हातात मोबाइल घेतला आणि सहज समोर पाहिलं, कमळा माझ्या समोरच उभी होती. एरवी ती थेट स्वयंपाकघरात शिरत असल्याने तिला समोर उभं पाहून मला आश्चर्य वाटलं.

कमळा गेले २-३ दिवस कामावर आली नव्हती. पण याबद्दल विचारणा करण्याचं काम विशाखाचं असल्यानं मी याबद्दल काहीच बोलणार नव्हतो.

``सायेब, गणेशला अपघात झालाय...`` कमळा म्हणाली.

आमच्याकडून पैसे काढण्यासाठी कमळा कोणत्याही थराला जाऊ शकत होती, अगदी मुलाचा अपघात झालाय असं सांगायलाही तिला काही वाटलं नसतं हे मी चांगलंच जाणून होतो. थापा मारण्यासाठी एखादं गिनीस बुक रेकॉर्ड असतं तर ते निर्विदादपणे आमच्या कमळेला मिळालं असतं. अर्थात आम्हाला हे सगळं माहीत असूनही ती मागेल तेव्हा आम्ही तिला पैसे पुरवत होतो. कारण ती नसली की घरकामाची कशी वाट लागते याचा अनुभव आम्ही वेळोवेळी घेतलेला होता. त्यामुळे तिच्या ठरलेल्या पगारापेक्षा दुप्पट पगार आपण तिला द्यायचा आहे हे आम्ही दोघांनी अपेक्षित ठेवलंच होतं. आम्ही दोघेही आमच्या कामांत खूप बिझी होतो. त्यामुळे तिनं मागितलेले पैसे नाकारल्यावर तिची होणारी बडबड ऐकण्याऐवजी आम्ही तिला पैसे देऊन मोकळे होत होतो.

त्याप्रमाणे तिचे ``सायेब, गणेशला अपघात झालाय...`` हे एक वाक्य ऐकताच मी सोफ्याशेजारचा drawer उघडला आणि माझं पाकीट उघडलं.

``साहेब, पैसे नकोत.``

कमळाच्या या वाक्यानं मात्र मला आश्चर्य वाटलं.

``मग?``

``केस करायचीये!``

``कोणावर?``

``आमच्या गण्याला उडवलेल्या त्या कार चालवणाऱ्या बाईवर.``

``गण्याला एका कारनं उडवलं?``

``व्हय! पायाला मोठा मार लागलाय. एक पायानं आता तो कायमचा थोडासा अधूच राहणार आहे. आमच्या प्रतापरावांनी त्या बाईवर केस करायला सांगितलीये. पन्नास लाख भरपाई मागायला सांगितली आहे.``

``पन्नास लाख?`` मी आकडा ऐकून चकितच झालो. ``आणि हे प्रतापराव कोण?``

``आमच्या चाळीचे मालक. ते म्हणाले, बाई मोप पैसेवाली आहे. तिच्यावर केस घाला. आपला पोरगा कायमचा अधू झालाय. त्याचं जीवन बरबाद झालंय. पन्नास लाख माग म्हणालेत.``

माझ्या डोळ्यासमोर कमळाचा गणेश आला. मी त्याला त्यांच्या चाळीच्या बाहेर आपल्या मवाली दोस्तांसोबत timepass करताना असंख्य वेळा पाहिलं होतं. तिशीच्या जवळपास येऊनही तो कोणताही कामधंदा करत नव्हता. कमळीचा नवराही काही कामधंदा करत नव्हता. आपल्याला धडधाकट `मालक` असणं याचंच तिला समाधान होतं. तीच दहा-बारा घरी कामं करून घर चालवत होती. त्यामुळे आपला मुलगा काही करत नाही याचं तिला विशेष काही वाटत नव्हतं. आपल्यासारखीच घरकाम करणारी एखादी काटक मुलगी त्याच्यासाठी बघावी म्हणजे तोही आपल्या बापाचा कित्ता गिरवेल हे तिनं अपेक्षिलेलं होतं.

आता मात्र आपल्या मुलाच्या या अपघाताचं भांडवल करून पैसा मिळवायचा तिला मार्ग दिसला होता.

``अगं कमळे, कोर्ट केस केली, तरी त्या बाईचा वकील तुझा गणेश काय करतो, इतक्या वर्षात त्याची किती कमाई होती वगैरे अभ्यास करेल. तुझा गणेश काहीच करत नाही. त्यामुळे तो अधू झाला म्हणून पन्नास लाख वगैरे कुठले मिळायला? सहानुभूती म्हणून पाच-दहा लाख मिळतील कदाचित.``

``प्रतापराव म्हणाले, आपण पन्नास आकड्याला ठाम रहायचं. तुम्हालाच वकील नेमायला सांगितलं आहे त्यांनी. त्ये म्हणाले, तुमची फी या रकमेतूनच तुम्हाला द्यायची आहे. त्यामुळे तुम्ही पैसं मिळतीलच हे पहालच. गण्याही म्हणाला, वकील साहेबांना मागतील तेवढे पैसे देऊ, पण भरपाई मिळाली पाहिजेच.``

ही कमळीची सर्व वाक्यं माझ्यासाठी अपमानकारक असली, तरी कमळीची बौद्धिक पातळी लक्षात घेऊन मी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्या प्रतापरावाला आणि गणेशला मात्र मी मनातून शिव्यांची लाखोली वाहिली.

``बरं, बघूया काय करता येईल ते. त्या बाईचं नाव काय म्हणालीस?``

``मंजिरी मराठे.``

``काय?`` नाव ऐकून मी चकितच झालो.

``मंजिरी मराठे. प्रतापराव म्हणाले, फार मोठी आसामी आहे. पुण्यातच त्यांचे दहा-बारा flat आहेत. गावी बंगला आहे. त्यांना पन्नास लाख म्हणजे किस झाड की पत्ती आहे, म्हणाले. त्यांनी त्या मंजिरी बाईंचा फोन नंबरही मिळवलाय. हा घ्या...``

कमळानं माझ्या हातात मंजिरी मराठे बाईंचा मोबाईल नंबर ठेवला आणि ती लगबगीने तिचं काम करायला स्वयंपाकघरात गेली.

या मोबाईल नंबरचा माझ्यासाठी काहीही उपयोग नव्हता. तरीही मी तो नंबर माझ्या पाकिटात ठेऊन दिला. मंजिरीशी माझा गेली आठ-दहा वर्षे इमेलवर नियमित संपर्क होता. एकमेकांचे फोन नंबर घ्यायचे नाहीत, फोनवर संपर्क करायचा नाही असं आमचं ठरलं होतं.

दहा-बारा वर्षांपूर्वी मंजिरी आणि मी आकंठ प्रेमात होतो. अचानक असं काही घडलं की आम्हाला वेगळं व्हावं लागलं. माझं विशाखाशी लग्न झालं. त्यानंतर एखाद्या वर्षात मंजिरीचंही लग्न अगदी गडगंज श्रीमंत असणाऱ्या मराठे कुटुंबात झालं. पुढे माझी वकिलीही हळूहळू चांगली चालू झाली आणि मीही बऱ्यापैकी पैसेवाला झालो होतो. अर्थात मंजिरीच्या घरच्या श्रीमंतीपुढे माझी श्रीमंती काहीच नव्हती.

ताटातूट झाल्यानंतर काही काळ आम्ही एकमेकांच्या संपर्कात नव्हतो. पण नंतर आमचा इमेलवर संवाद चालू झाला, आणि आताशा आम्ही कायमच इमेलद्वारे एकमेकांच्या संपर्कात होतो. आम्ही दोघेही आपापल्या संसारात सुखी असल्यानं मुद्दामहून प्रत्यक्ष कधीही भेटायचं नाही असा नियम आम्ही एकमेकांना घालून दिला होता. या नियमाची आम्ही एकमेकांना अधूनमधून आठवणही करत होतो.

मंजुनं गणेशला उडवलं होतं? मी लगेच मंजूला मेल लिहावयास सुरुवात केली. त्यात या घटनेबद्दल आणि कमळेच्या मागणीबद्दलचा बाकी तपशील तर मी लिहिलाच, पण पुढे असंही लिहिलं,

``मंजू, या संदर्भात आपल्याला आता भेटणं भाग आहे. किंबहुना आता आपण या केसचं कारण दाखवून कोणतीही लपवाछपवी न करता भेटू शकतो.
मंजू, मध्यंतरी मी एक मराठी चित्रपट पाहिला. बहुदा `तू ही रे!` त्याचं नाव. त्यातल्या नायकाचं एका मुलीवर प्रेम असतं. मात्र त्याला लग्न दुसऱ्याच मुलीबरोबर करावं लागतं. तेव्हा तो मित्रांना म्हणतो, `अरे... ज्या मुलीला ओळखतही नाही तिच्याबरोबर अख्खं आयुष्य घालवायचंय, आणि ज्या मुलीबरोबर आख्ख आयुष्य घालवायची इच्छा आहे, तिच्याबरोबर एक दिवसही घालवता येऊ नये?` त्याचं हे वाक्य पुढे त्याच्या एका मित्राकडून त्याच्या बायकोला कळतं. मग ती या नायकाला त्याच्या जुन्या प्रेयसीबरोबर एक पूर्ण दिवस घालवण्याची सगळी व्यवस्था करते.
मंजू, मला या चित्रपटातील ही संकल्पना फार आवडली. पण तुझा नवरा, किंवा माझी बायको, आपल्याला असं काही प्रत्यक्ष करू देईल असं वाटत नाही. आता या केसच्या निमित्तानं आपण अगदी एक संपूर्ण दिवस जरी नाही, तरी काही तास बरोबर घालवू शकतो. खूप काही बोलायचं आहे, खूप काही सांगायचं आहे. अनेक गोष्टी इमेलवर लिहिता येत नाहीत त्या प्रत्यक्ष बोलायच्या आहेत.``

मी माझा इमेल संपवला. सेंड केला.

दुसरा दिवस उजाडला. दारावरची नऊची बेल वाजली. आज विशाखाला सुट्टी होती. तिनं दरवाजा उघडला.

अतिशय उत्साहात एकदम वेगानं कमळी घरात शिरली आणि थेट माझ्या पायाच पडली.

``सायेब, तुमच्या एका फोननं काम झालं बघा. मराठे बाई कोणतीही घासाघीस न करता पन्नास लाख द्यायला तयार झाल्या. प्रतापराव म्हणतात, बाईंनी अपघातावेळी नक्कीच ढोसली असणार. त्यामुळे कोर्टात, मीडियात मराठे familyची बदनामी नको म्हणून तयार झाले लगेच.``

``काहीतरीच काय बोलतेस? मंजू दारू पिऊन गाडी चालवणं शक्यच नाही.`` मी कमळेच्या वाक्याने आलेल्या संतापाने एकदम बोलून गेलो.

``तुम्हाला काय माहीत? आणि तुम्ही एकदम मंजू वगैरे म्हणताय, जसं काही तुमची मैत्रीणच लागून गेलीये ती मंजिरी मराठे!``

विशाखानं अचानक प्रश्न केला तसा मी गडबडलो. पण काही क्षणात सावरून घेण्यासाठी मी म्हणालो,
``अगं, मराठे कुटुंब किती प्रसिद्ध आहे. केवढी मोठी industry आहे त्यांची. त्यांच्या सगळ्या कुटुंबाविषयी पेपरात कितीदा तरी येत असतं. त्यामुळे एकदम असं बोललं गेलं. आपण एरवीही नाहीका, सहज कंगना, रिया वगैरे म्हणत असतो. त्या काय माझ्या मैत्रिणी असतात?``

``मध्यंतरी या मंजूचं एका डायमंड व्यापाऱ्याच्या मुलाबरोबर लफडं असल्याचंही ऐकलं होतं.`` विशाखानं तारे तोडले.

``तेही साफ खोटं होतं.`` मी परत न राहवून म्हणालो.

``तुम्हाला ना, सगळ्या जगाच्या विरुद्ध काहीतरी नेहमी ठाऊक असतं. फार over confidenceने बोलता, एखाद्या गोष्टीबद्दल काहीही माहिती नसताना...``

माझ्या आत्मविश्वासाने एखादी गोष्ट ठाम सांगण्याच्या सवयीचा इथे मला असा फायदा झाला. दोन वेळा बोलण्यात गडबडूनही विशाखानं माझं बोलणं मनावर घेतलं नव्हतं.

मंजुनं पन्नास लाख देण्याचा हा निर्णय असा एकदम घेतल्यानं मी फारच disturb झालो. तिनं माझ्याशी इमेलवर काही चर्चाही केली नव्हती.

मी चटकन laptop उघडला. इमेल चेक केला. अपेक्षेप्रमाणे इमेल आलेला होताच.

``प्रशांत, तुझा मेल वाचला. तू ज्या चित्रपटाचा उल्लेख केला होतास, तो मी पाहिला नव्हता. तो मी लगेच- कालच पाहिला नेटवर. आपण एकमेकांना न भेटण्याचा घेतलेला निर्णय माझ्या मते अगदी योग्य आहे. कारण त्या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे आपण जर एकट्याने भेटलो, तर आपला संवाद गप्पांपर्यंत मर्यादित राहणं शक्यच नाही याची मला खात्री आहे. नियतीनं आपल्याला एकत्र येऊ दिलं नाही त्यात तिचा काहीतरी उद्देश असावा. आपण नियतीच्या विरुद्ध काही करणं फार मोठी चूक होऊ शकेल. त्यामुळे कोर्टात वगैरे न जाता तुझ्याकडे काम करणाऱ्या कमळेची मागणी मी मान्य करायचं ठरवलं. झालेला अपघात आणि पैश्याची झालेली मागणी मी जेव्हा `ह्यांना` सांगितली तेव्हा ह्यांनी काही माणसं माहिती काढण्यासाठी पाठवली. गणेश, त्याची सगळी मवाली मित्रमंडळी आणि प्रतापराव या गावगुंडाचा या सगळ्याला असलेला पाठींबा बघून ह्यांनीही रक्कम देऊन हे प्रकरण मिटवायला सांगितले आहे. माझ्या आणि माझ्या मुलांच्या सुरक्षेचा विचार करून यांनी हा निर्णय घेतला आहे.
तू मला समजून घेशील अशी खात्री आहे.
मंजिरी.``

मंजिरीने आमची प्रत्यक्ष भेट झाल्यास आमच्याकडून जी चूक होऊ शकेल अशी भीती व्यक्त केली होती, तशी काही करण्याचा माझा किंचितही मानस नव्हता. प्रत्यक्ष भेटीची इच्छा मात्र खूप होती. आमची प्रत्यक्ष ताटातूट व्हायच्या वेळी घडलेल्या खूप गोष्टी तिच्याशी प्रत्यक्ष बोलायच्या होत्या, अनेक गोष्टींचा खुलासा करायचा होता, तिच्याकडून करवून घ्यायचा होता.

मला अजुनची तो प्रसंग आठवतोय.

मंजिरीनं आमच्या प्रेमाविषयी तिच्या घरी सांगितलं आणि दुसऱ्याच दिवशी तिचे वडील, काका वगैरे मंडळी आमच्या घरी आली. मंजिरी त्यांच्याबरोबर नव्हती.

मंजिरीच्या घरच्यांना आम्ही यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. मंजिरी अतिशय नाजूकशी, सालस, गोड मुलगी होती. माझ्या घरी तिचं मैत्रीण म्हणून नियमित येणं-जाणं होतं. माझ्या घरच्यांशीही तिची वागणूक एकदम विनम्र, प्रेमळ होती.

याच्या अगदी उलट ही सगळी मंडळी होती. मराठी चित्रपटात दाखवतात तसे गावाकडचे सरपंच, पाटील वाटावेत अशी ही भारदस्त, रांगडी मंडळी आमच्या घरात आली आणि आल्या आल्या मंजिरीच्या वडलांनी शाब्दिक माराच चालू केला, जो आम्हाला अजिबात अपेक्षित नव्हता. या बोलण्यात काय नव्हतं? माझ्या बौद्धिक क्षमतेवर शंका होती. मी वकिलीचे शिक्षण घेत होतो, ते त्यांना मुळीच पसंत नव्हतं. त्यांचं एक वाक्य तर मला अतिशयच खटकलं. ते म्हणाले होते, ``न्यायालयाच्या आवारात जा. बघा दहा-बारा वकील तरी त्यांना काम द्यावे म्हणून धावत येतात की नाही ते...`` काहीतरी उद्देशानं मंजिरीला मी आणि माझ्या कुटुंबीयांनी प्रेमाच्या जाळ्यात ओढ्ल्याचाही त्यांचा अप्रत्यक्ष आरोप होता. माझे आई-वडील फारच साधे. समोरून असं काही आक्रमण होईल अशी आम्हाला कुणालाच अपेक्षा नव्हती. त्यामुळे यावर कसा प्रतिसाद द्यावा हे आम्हाला कुणालाच काही कळलं नाही. बरोबर असलेले त्यांचे मोठे जावई तर अश्या प्रकारे बसले होते, की कोणत्याही क्षणी खिशातून रामपुरी चाकू काढतील आणि माझ्या पोटात खुपसतील. एकूण काय तर, झाल्या प्रकाराने आम्ही मंडळी स्तिमितच झालो.

दुसऱ्या दिवशी मंजिरीच्या एका मैत्रिणीने मंजिरीचा निरोप पोहोच केला- ``वडलांनी संमती दिली तरच मी लग्न करेन.``

या सगळ्या प्रकाराने मला खूपच मनस्ताप झाला होता. या सगळ्या मंडळींचा विरोध पत्करून काही करण्याचं धाडस माझ्यात नव्हतंच, शिवाय तसं काही करण्यास मंजिरीची संमती नव्हतीच. मी आई-वडलांना माझ्यासाठी स्थळं पहायची परवानगी दिली. पुढील तीन-चार स्थळांमध्ये मला विशाखाचं स्थळ आलं. ती वैद्यकीय शिक्षण घेत होती. दोन्हीकडून पसंती झाली आणि आमचा विवाह झाला. काही महिन्यांतच तिकडे मंजिरीचंही लग्न झालं.

वर लिहिल्याप्रमाणे एक-दोन वर्षांत आमचा इमेलवर संवाद चालू झाला. मंजिरी चांगल्याच मोठ्या घरात पडली होती. तिला नवराही चांगला समजून घेणारा मिळाला होता. त्यामुळे ती सुखात आहे याचं मला मनापासून समाधान आहे. त्यावेळी मंजिरीच्या वडलांनी केलेल्या ठाम, स्पष्ट विरोधामुळे तिचं भलंच झालं होतं. त्यामुळे आता माझीही त्यांच्याबद्दल काही तक्रार नव्हती.

पण तरीही किमान एकदा तिला प्रत्यक्ष भेटून मन समोरासमोर मोकळं करण्याची इच्छा मात्र माझी पाठ सोडत नाहीये.

कोर्टातही न जाता, कमळेला अपेक्षित असलेली भरपाई माझ्यामुळे मिळाल्याने कमळी भलतीच खूष होती, परंतु, दहा-बारा वर्षांपूर्वी माझ्यावर; खरंतर आमच्यावर, झालेल्या अन्यायाची आम्ही पुन्हा समोरासमोर येऊन, मनसोक्त संवाद साधून होऊ शकणारी किंचीतशी भरपाई होण्याची संधी मात्र मला मिळू शकली नव्हती...

***

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आवडली, पण तुमच्या इतर कथांमुळे वाढलेली अपेक्षा या कथेत पूर्ण झाली नाही. Abruptly संपल्यासारखं वाटलं.. किंवा माबुदोस. पुलेशु.

छान लिहिली आहे...

अचानक नियतीनं असा काही विचित्र डाव साधला की आम्हाला वेगळं व्हावं लागल....

असं काय झालं होतं हे थोडक्यात कळलं असतं तर अजून छान वाटली असती कथा.....

आवडली Happy

कथेची सुरुवात छान झाली. आणि लेखकाचे काहीतरी राहीलेले गुपित असेल किंवा अनपेक्षित धक्क असेल असे वाटून वाचत राहिलो पण तसे काहिच झाले नाही. त्यामुळे शेवट जरा कंटाळवाणा झाला.. माझे वैयक्तिक मत.

अभिप्रायांबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद!

ज्या मंडळींना कथा अपूर्ण, ताटातुटीचा (आवश्यक) खुलासा न करणारी, अपेक्षा पुर्‍या न करणारी वाटली, त्यांनाही मनापासून (आणि सपशेल) दिलगिरी व्यक्त करतो. पुढील लेखनात अधीक काळजी घेण्याचा प्रयत्न करेन.

परत पूर्ण कथा वाचून काढली.
छान झालीए...वेगळे व्हायचे कारण पण पटले..
प्रतिसादावर विचार करून कथेत बदल केल्याबद्दल धन्यवाद

छान आहे कथा. सिंपल.
एकंदरच वेडेवाकडॅ थ्रिलर बघून वेडेवाकडे विचार करायची सवय झाल्याने मी मनातल्या मनात मंजिरीचं प्रतापराव बरोबर प्रकरण, आणि दोघांनी मिळून मण्जिरीच्या सासर कडून पैसे काढून त्याचा काहीतरी व्हेकेशन ला वापर करायचा प्लॅन असे काहीही विचार करुन झाले Happy

>>एकंदरच वेडेवाकडॅ थ्रिलर बघून वेडेवाकडे विचार करायची सवय झाल्याने मी मनातल्या मनात मंजिरीचं प्रतापराव बरोबर प्रकरण, आणि दोघांनी मिळून मण्जिरीच्या सासर कडून पैसे काढून त्याचा काहीतरी व्हेकेशन ला वापर करायचा प्लॅन असे काहीही विचार करुन झाले

एक्जॅक्टली Happy

कथा आवडल्याचे आवर्जून कळवलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद!

कथेत बदल केल्यानंतर पुन्हा ती वाचलेल्या मंडळींनाही खूप धन्यवाद!