कसं वागायचं आता तरी कळतंय का !!!

Submitted by SANDHYAJEET on 22 September, 2020 - 22:09

कसं वागायचं आता तरी कळतंय का !!!

भारतातल्या व्हाट्सअँप ग्रुप मधल्या पोस्ट वाचणे म्हणजे एक निराळाच विरंगुळा असतो. पोस्ट बनवणाऱ्याच्या कल्पनाशक्तीला दरवेळी सलाम ठोकावा असं वाटत. आजकाल मात्र व्हाटसअँप कोरोना पोस्टनीच भरलेलं दिसत. आमच्या डॉक्टरांच्या ग्रुप वर तर रोज प्रत्येकजण किती रिस्क घेऊन लढाई लढत आहे वाचून कामाला उभारी येण्याबरोबर बऱ्याच वेळा मन चिंतीत व्हायला होत. आज अशीच एका डॉक्टरांनी लिहलेली पोस्ट वाचनात आली. पोस्टच्या सुरुवातीलाच कोणतीही सहानुभूती मिळवायची किंवा मोठेपणा सांगायचा उद्देश नसून फक्त सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हेतू आहे असं लिहून कोरोना पँडेमिक मधे डॉक्टरांचा दिनक्रम कसा असतो ते डिटेल मधे लिहलं होत. हॉस्पिटलमध्ये काम करताना आपण आपला स्वतःचा जीव किती धोक्यात घालतो त्यापेक्षा रात्री घरी आल्यावरही वेगळ्या रूम मध्ये सेल्फ आयसोलेशन मधे राहून गेली सहा महिने जिवलग कुटुंबीयांपासून दूर राहणे किती अवघड जात आहे हे वाचून परत एकदा मन खिन्न झालं.

पृथ्वीवरचा प्रत्येक मनुष्यप्राणी कोरोनाचा कहर सहन करत आहे. आपल्यासारखाच हाडामासाचा बनलेला डॉक्टर हा पण एक मनुष्यप्राणीच आहे. त्याला पण कुटुंब, स्वतःच्या आणि कुटुंबाच्या जीवाची भीती त्याबरोबर भावना पण आहेत. आपलं नशीब फार चांगलं आहे की गेली ५-६ महिने अविरतपणे काम करूनही तो अजून थकून गेलेला नाही. त्याने लढायचं थांबवलेलं नाही. वर्ष संपत आलं तरीही कोरोनावर अजून कुठलही ठोस औषध, लस काहीही उपलब्ध झालेलं नाही. जे काही उपलब्ध आहे त्यातच सर्वोत्तम प्रयत्न करून तो स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या जीवावर उदार होऊन पेशंटचा उपचार करत आहे. प्रत्येक मनुष्यप्राण्याचं या २०२० मधे कोरोनाने फारच नुकसान झालेलं आहे. पण आपल्याला घरी बसून स्वतःच आणि आपल्या कुटुंबाच कोरोना पासून रक्षण करायचा पर्याय तरी उपलब्ध आहे. वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना, frontline workers ना तो पर्याय पण नाही. त्यांची इच्छा असो अगर नसो, पेशंट कोरोना पॉसिटीव्ह आहे माहीत असूनही त्याचा इलाज करायला जवळ जावे लागत आहे.

रोज भारतातल्या बातम्यांमध्ये नातेवाईकांकडून वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना शिवीगाळ, मारहाण झाल्याचे व्हिडिओज बघायला मिळत आहेत. तुमच्या घरातला माणूस मेला म्हणजे तुम्हाला कळेल असं एकाला सांगताना बघितलं. तुमच्या घरातला माणूस गेला ही फार फार दुःखाची गोष्ट आहे. हा फार मोठा लॉस आहे जो कधीही भरून निघणार नाही. पण त्यासाठी रागाने डॉक्टरला मारणे हा पर्याय नाही. आतापर्यंत पेशंटचा उपचार करत असताना आमचे शेकडो डॉक्टर मेले. तुमच्या कोरोना पॉसिटीव्ह पेशंटचा उपचार करताना आमचा डॉक्टर मेला म्हणून कोणीतरी डॉक्टरांच्या घरातल्याने वा इतर डॉक्टरांनी पेशंटला किंवा त्याच्या नातेवाईकाला मारहाण केली आहे का. तुमच्या मेलेल्या घरातल्या माणसाला कोरोना झालाच का आणि कसा झाला याच उत्तर शोधलं तर कळेल दोष कोणाला द्यायचा आणि कोणाला शिवीगाळ, मारहाण करायची.

परवा ७४ वर्षाच्या कसलाही आजार नसणाऱ्या धडधाकट आजी कोरोनाने अचानक गेल्याच ऐकून अतिशय वाईट वाटलं. मरायचं तर सगळ्यांनाच आहे पण आजी अजून दोन चार वर्ष छान जगल्या असत्या की. नातवंड बिनकामाची गावभर गावात काय चाललंय म्हणून फिरून कोरोना घेऊन आली आणि पॉझिटीव्ह झाली. नातवंड तरुण असल्यामुळे वाचली. पण हाकनाक आजींचा जीव मात्र गेला.अश्या कितीतरी केसेस रोज ऐकायला मिळत आहेत. कुटुंबाचा चरितार्थ चालावा, कामधंद्या साठी बाहेर जावच लागत, त्यामुळे कोरोना झाल्याच्या केसेस खूप कमी आहेत. कामावर जबाबदारीने सोशल डिस्टंसिन्ग पाळलं तर हे पण कमी करता येईल. पण कोपऱ्यावर अड्डा करून बसणारी लोकच सगळा कोरोना घरापर्यंत आणत आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या निमित्ताने आम्ही जेव्हा तुम्हाला कोरोना कसा झाला असं प्रत्येक पेशंटला विचारतो, दुर्दवाने एकही पेशंटचा कोरोना काहीही सबळ कारणामुळे झालेला नाही,असं आढळून येतं. डॉक्टरांना मारहाण करण्याअगोदर स्वतःला दोन थोबाडीत देऊन बघीतल्या तर कोरोना सोडून जे काही अजून नवीन प्रॉब्लेम्स हॉस्पिटलमध्ये तयार करून आपण जो वेळ आणि ऊर्जा वाया घालवत आहोत ती कोरोनाशी लढायला वापरता येईल.

कोरोनामुळे जेवढा आपला तोटा झाला आहे त्यापेक्षा जास्त वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांचा आणि सगळ्या frontline workers चा झाला आहे आणि रोज कोणत्याही क्षणी अजून कितीतरी जास्त होण्याचा धोका आहे. टाळ्या वाजवून आमचे आभार माना. अशी कोणत्याही frontline workers नी अपेक्षा केलेली नाही. तुम्हाला पाहिजे तेव्हा आम्हाला देव मानता, पाहिजे तेव्हा मारहाण करता. तस न करता आम्ही पण तुमच्यासारखीच माणसं आहोत,ज्यांना ह्या कोरोनाच काय करायचं अजूनही कळलेलं नाही. वर्षानुवर्षे आम्ही आमच सर्वोत्तम देत आलो आहोत आणि आजही तेच करत आहोत. मारहाण शिवीगाळ करायाला जो काही शहाणपणा वापरताय तो आपल्यामुळे घरातला माणूस इनफ़ेक्ट होणार नाही यासाठी वापरला तर कोरोना केसेस कमी होऊन आरोग्ययंत्रणेवरचा भार कमी होईल आणि ज्यांना काहीतरी सबळ कारणामुळे कोरोना झाला आहे त्यांचा व्यवस्थित उपचार होईल. एवढच डॉक्टरांचं म्हणणं आहे.

उपलब्ध साधनसामुग्रीमध्ये, कोणतही ठोस औषध उपलब्ध नसताना उपचार करून बरं करायचा चमत्कार फक्त देवचं करू शकतो आम्ही हाडामांसाची माणसं नाही एवढं लक्षात ठेवून आमच्याशी वागा. देवाच्या चमत्काराला यश द्यायला आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करत आलो आहोत आणि करत राहू पण तुम्ही असं वागून आमचं मनोधैर्य मोडू नका. एवढीच सगळ्या वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांची आणि frontline workers ची कळकळीची विनंती आहे.

डॉ संध्याजीत
© सर्व हक्क स्वाधीन
हा लेख वैयक्तिक आलेल्या अनुभवाच्या आधारे लिहलेला आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम योग्य लिहिले आहे संध्या. इतक्या बेफिकिरीने लोक वागतात ना, की संताप येतो. माझ्या दवाखान्यात येताना सुद्धा mask न घालणारे, मला कुठे सर्दी -ताप आहे, म्हणणारे लोक आहेत. "आमच्यासाठी नाही, तुमच्या स्वतः साठी घालायला हवा, अहो,आत्ता तुम्हाला नसला, तरी इथे अगोदर येऊन गेलेल्या पेशंट मुळे होऊ शकतो", असे समजावून सांगून थकलेय. काही लोक दवाखान्याजवळ येऊन नाक चिमटीत धरतात, पदराने, रुमालाने झाकतात. इथे कसला वास येतोय म्हणून नाक धरताय, का हा mask वापरण्याचा कोणता शॉर्टफॉर्म आहे, असे विचारावेसे वाटते. Mask घातला, तरी तो वर /खाली करून बिनधास्त थुंकणे, अंघोळ करणे लांब राहिले, बाहेरून आल्यावर हातपाय सुद्धा न धुणारे लोक आहेत. मेडिकल मधून दुकानदाराच्या सल्ल्याने, तर कधी यू ट्यूब गुरूच्या सल्ल्याने तात्पुरत्या गोळ्या घेणे, गळ्याशी आल्यावर डॉ. कडे जाणे, बरे वाटले की कोर्स पूर्ण न करता गोळ्या बंद करणे आणि पुन्हा जास्त झाल्यावर दुसऱ्या डॉ कडे जाणे.. किती आणि काय लिहायचे?
/शारीरिक थकवा आहेच, रोजचे रिपोर्टींग, sanitization, हात धुणे यामुळे. पण त्याहून जास्त मानसिक थकवा आलाय सध्या.

अगदी परखड लिहिता तुम्ही. अगदी मनातले उतरवलेत असं वाटतं बघा. अशा फालतु आणि टुकार मुलांमुळे आई-वडील-आजी-आजोबा यांना कोरोना झाल्याच्या घटना मीही स्वतः डोळ्यांनी पाहिल्यात. आई-वडील म्हणतात आमचं ऐकतच नाहीत मुलं (मग कसले आई-बाप झालात बाबांनो..! आम्ही मुलांना त्यांना हवं ते देत आलो.. हवं तसं करा म्हणत आलो.. मग मरा आता..!! )

खरं आहे. घरात वृद्ध, डायबेटीस असणारे आजीआजोबा असूनसुद्धा बेजबाबदारपणे बाहेर फिरणारे लोक पाहिले की चिडचीड होते.

कळकळीने लिहिलेत dr
संताप येणं साहजिक आहे
काळजी घ्या
आणि एक कडक salute सुद्धा घ्या

अगदी परखड लिहिता तुम्ही. अगदी मनातले उतरवलेत असं वाटतं बघा. अशा फालतु आणि टुकार मुलांमुळे आई-वडील-आजी-आजोबा यांना कोरोना झाल्याच्या घटना मीही स्वतः डोळ्यांनी पाहिल्यात. +१२३

लोकं १४ दिवस वेगळे राहु शकत नाहित तिथे तुंम्ही डॉ इतक्या दिवसापासुन अविरत काम करता आहात खरच मनापासुन तुंम्हा सगळ्याचे आभार.. लोकं का वागतात अशी कळत नाहित.. तुमची कळकळ समजली. बरं झाल इथ लिहिलत.. दुसरी बाजुहि समजेल असं वागणार्‍यांना.

नादिशा ...खरंच किती आणि काय लिहायचं असं झालयं. डॉक्टरांना मानसिकरीत्या थकवलं आणि खचवलंय जातंय त्याचीच जास्त काळजी वाटते
Dj आणि पियू परखड लिखाणाला दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद
अगदी खर आहे वावे घरातून अजिबात बाहेर न पडणाऱ्या आजीआजोबांचा हकनाक बळी जातोय म्हणून खूप चिडचिड होतेय
किल्ली salute बद्दल धन्यवाद !
भावना प्रतिसादाबद्दल अगदी मनापासून धन्यवाद !