लहान मुलांच्या मेंदूची वाढ - माहिती असावे असे काही.

Submitted by नादिशा on 21 September, 2020 - 12:52

बाळ गर्भावस्थेत असल्यापासून ते 5 वर्षे वयाचे होईपर्यंत चा काळ त्याच्या मेंदूच्या दृष्टीने फार महत्वाचा असतो . जिथून कुठून मिळेल, तिथून माहिती मिळवून , वाचून मी माझ्या गरोदरपणात या नोट्स काढल्या होत्या . जसजशी नवीन माहिती मिळेल, तशी ती update करत राहिले. त्यातील क्लिष्टता टाळून सोप्या शब्दांत महत्त्वाची माहिती थोडक्यात देण्याचा मी या लेखात प्रयत्न केला आहे.

एखाद्या स्त्रीला दिवस गेल्यानंतर पहिल्या 2 आठवड्यातच गर्भाच्या मेंदूची निर्मिती चालू होते. पहिल्या 8 आठवड्यांत जवळपास मेंदूचे सारे आकार अस्तित्वात येतात म्हणजे रचनात्मक वैशिष्ट्ये दिसू लागतात .हेच आकार नंतरच्या काळात वाढू लागतात. आणि गरोदरपणाच्या काळात पूर्ण विकसित होतात.

या काळातली मेंदूच्या वाढीसंबंधी सर्वात महत्वाची घटना असते, मज्जातंतू नलिकेची (न्यूरल ट्यूब) ची निर्मिती ! गर्भधारणा झाल्यानंतर जवळपास 2 आठवडयांनी पेशी गुणाकार पद्धतीने वेगाने वाढतात आणि मज्जातंतू प्लेट ( neural plate )तयार होते. हे म्हणजे गर्भातील एका विशिष्ट (specialized) पेशींचा थर असतो, जो हळूहळू स्वतः भोवतीच गुंडाळला जाऊ लागतो. त्यामुळे आपोआप एक नळीसारखा आकार तयार होतो. ही नळी हळूहळू तिच्या कडांकडून बंद होऊ लागते. ही क्रिया गर्भधारणेनंतर 4 आठवड्यांपर्यंत पूर्ण होते. हीच मज्जातंतू नलिका (न्यूरल ट्यूब )आकार बदलत राहते, आणि त्यापासून अखेरीस मेंदूचे forebrain, midbrain, hindbrain हे भाग आणि पाठीचा कणा /मज्जारज्जू (spinal cord )तयार होतो.

गर्भधारणे नंतर 7 आठवडयांनी पहिली चेतापेशी आणि मग त्या पेशींचा जोड (synapse )मज्जारज्जू मध्ये तयार व्हायला सुरुवात होते. या सुरुवातीच्या connection मुळेच गर्भाची पहिली हालचाल चालू होते .जरी आईला ही हालचाल जाणवली नाही, तरी सोनोग्राफी आणि MRI मधून ही आपण पाहू शकतो . या हालचालींमुळेच पुन्हा मेंदूला चालना मिळते - याला संवादी इनपुट्स म्हणतात. (sensory inputs ), ज्यामुळे गर्भाच्या वाढीला मदत होते. यानंतरच्या काही आठवड्यात अजून समन्वित (coordinated ) हालचाली होऊ लागतात.

गर्भधारणेच्या दुसऱ्या तिमाहीत gyri(उभार भाग )आणि sulci (खोलगट भाग -खाचा )मेंदूच्या पृष्ठभागावर दिसू लागतात. या तिमाहीच्या शेवटी ही प्रक्रिया जवळजवळ पूर्ण होते. मेंदूचा cerebral cortex नावाचा भाग जाडी आणि गुंतागुंत ( complexity) मध्ये वाढू लागतो आणि या भागातील synapses ची निर्मिती चालू होते.

चेतापेशींपासून जी projections निघतात, त्यांना axons म्हणतात. तेच इलेक्ट्रिक प्रेरणांचे (impulses)आचरण करतात. त्यांच्यावर एका चरबीयुक्त घटकाचे आवरण असते, त्याला myelin sheath म्हणतात. ते आता काही काही ठिकाणी दिसू लागते. ही myelin sheath तयार होण्याची गर्भात चालू झालेली प्रक्रिया मूल वयात येईपर्यंत चालू राहते . मिळालेल्या माहितीच्या जलद प्रक्रियेसाठी (processing ) ही myelination ची क्रिया आवश्यक असते.

तिसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीचे आठवड्यात cerebral cortex बरीच कामे करू लागतो, जी यापूर्वी मेंदूचा stem हा भाग करत होता. गर्भाचा श्वासोच्छ्वास आणि बाह्य उत्तेजनांना (stimuli ना) नियमित प्रतिसाद देणे चालू होते. या काळात गर्भाला करता येणाऱ्या सर्व क्रिया शिकण्यासाठी cerebral cortex हा भाग मदत करतो.

त्यामुळे गर्भारपणामध्ये मातेने आहाराची व्यवस्थित काळजी घेणे, विषारी पदार्थ, व्यसने, इन्फेकशन पासून स्वतः चा बचाव करणे आवश्यक आहे.

ऐकणे ही क्रिया गर्भावस्थेत चालू असते. त्यामुळे आजूबाजूचे लोक, परिसर यांतील आवाज गर्भाला समजत असतात.

बाळे 3 वर्षांची होईपर्यंत प्रौढ मेंदूच्या 80% आणि ती 5 वर्षांची होईपर्यंत प्रौढ मेंदूच्या 90% भाग तयार होतो.

नवजात बाळाचा मेंदू प्रौढ माणसाच्या मेंदूच्या पाव भाग एवढ्या आकाराचा असतो. पहिल्या वर्षीच त्याचा आकार जवळजवळ दुप्पट होतो. आणि त्याची वाढ चालूच राहते.हे सर्व नीट समजून घेऊया.

मेंदूचा cerebellum हा भाग जन्मतः जेवढा होता, त्याच्या आकाराने तिप्पट होतो. त्यामुळेच या काळात आपल्याला दिसणाऱ्या motor activities बाळ करू शकते . जन्मतः बाळाला सगळे दिसत असते, पण त्यांचा मेंदू ते सर्व रजिस्टर करू शकत नाही. परिणामी बाळाला जवळचेच आणि थोडेसे अंधुक दिसत असते. एक वर्षाचा होईपर्यंत Cortexया भागामध्ये असणारे दृष्टीशी निगडित भाग वाढतात, त्यामुळे बाळाची दृष्टी क्षमता वाढून नजर स्थिर होते, लांब अंतरावरच्या गोष्टीही आता त्याच्या दृष्टीक्षेपात येऊ शकतात. (full binocular vision )

गर्भात असतानाच बाळाचे ऐकणे चालू झालेले असते. त्यामुळे पहील्या 2 महिन्यात ऐकण्याचीच क्रिया सर्वात सक्रिय राहते. वेगवेगळे माणसांचे, प्राण्यांचे, पक्ष्यांचे आवाज ऐकले, खेळण्यांचे आवाज ऐकले ,अंगाईगीत म्हटले, की बाळांनी कान टवकारल्याचे आपल्याला जाणवते.

नवजात बाळांना स्पर्श लवकर समजतो , आपल्या गरजा , त्रास बाळे रडून दाखवतात , कारण त्यांच्या मेंदूचा रडणे या गोष्टीशी संबंधित भागच तेव्हा जास्त सक्रिय असतो. ही बाळे चेहरा ओळखू शकतात. वस्तूंपेक्षा चेहरेच या काळात त्यांना जास्त आवडतात. आनंदी आणि दुःखी भाव ती समजू शकतात. जन्मतःच बाळ आपल्या आईचा आवाज ओळखू शकते . जर आई गर्भारपणात काही स्तोत्र म्हणत असेल , गोष्टी वाचत असेल , तर बाळ त्याच्याशी ओळख दाखवते . घरातील लोकांच्या आवाजाशी ओळख दाखवते .

बाळ 3 महिन्याचे होते, तेव्हा hippocampus या भागाची लक्षणीय वाढ होते . हा भाग एक limbic रचना असून ओळखीशी संबंधित, स्मृतीशी निगडित असतो. त्यामुळे बाळाची ओळखण्याची क्षमता या काळात वाढलेली असते. त्यामुळे ते सर्वांना ओळखू शकते.

मेंदूच्या frontal आणि temporal lobe मध्ये असणारी भाषेची circuits पहिल्या वर्षात एकत्रित (consolidate) होतात . त्यामुळे बाळ बोलण्याचा प्रयत्न करू लागते. बाळ जे काही ऐकते , त्याचा खूप मोठा प्रभाव बाळाच्या बोलण्यावर होत असतो . पहिल्या काही महिन्यांतच बाळ आपल्या घरातील भाषा आणि दुसरी भाषा यामध्ये फरक करू शकते . पण ते वर्षाचे होईपर्यंत बाळाची ही क्षमता संपुष्टात येते आणि फक्त घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेशी मेंदूच्या तारा जुळतात.आणि तीच भाषा बाळ लक्षात ठेवते.अभ्यासकांच्या असे अनुभवास आले , की शेजारी /मित्र जर वेगळ्या भाषेत बोलत असतील, तर बाळ ती वेगळी भाषा पण या काळात समजू शकते, बोलू शकते . म्हणून आता असे सांगितले जाते, की या काळात जर पालकांनी घरात 2-3 भाषांमध्ये बाळाशी संवाद साधत राहावे , जेणेकरून बाळ त्या सर्व भाषा शिकेल .

वयाच्या दुसऱ्या वर्षी मेंदूच्या भाषा या गोष्टीशी संबंधित भागामध्ये जास्त synapses तयार होतात आणि एकमेकांना जोडले जातात. (Interconnected )त्यामुळे बाळाची भाषा शिकण्याची क्षमता अत्युच्य वाढलेली असते. (peak ).ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये vocabulary explosion म्हणतात , ती याच काळात घडते . त्यामुळे पहिल्या वाढदिवसापासून दुसऱ्या वाढदिवसापर्यंत त्याचा शब्दसंग्रह चौपट वाढू शकतो . त्यामुळे या काळात जर बाळाला गोष्टी सांगायला , पुस्तके वाचून दाखवायला सुरुवात केली , तर त्याचा खूप फायदा होतो . त्याला समजत नाही , असे आपल्याला वाटत असले , तरी त्याची शब्द्ग्रहणक्षमता चांगली असल्याने शब्दसंग्रह वाढवण्यासाठी , कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी त्याचा खुप फायदा होतो.

या दुसऱ्या वर्षामध्येच myelination च्या गतीमध्ये खूप वाढ होते. त्यामुळे अजून गुंतागुंतीची कामे मेंदू करू शकतो.स्व संबंधी जाणीव या काळात जागृत होते .उच्च प्रतीच्या संज्ञांनात्मक क्षमता तयार होतात. (higher order cognitive abilities )त्यामुळे स्वतःच्या भावना , इच्छा यांविषयी बाळ जास्त जागरूक होते . जेव्हा आरशात ते स्वतः ची छबी पाहते, तेव्हा हा मी स्वतः आहे , याची त्याला व्यवस्थित जाणीव होते . लवकरच ते बाळ मी , माझे या ऐवजी स्वतः चे नाव घेऊन (उदा . स्वयमचे, स्वयमला )असे बोलू लागते .

3 वर्षांपर्यंत बाळाच्या मेंदूतील prefrontal cortex या भागातील synapses ची घनता तीव्र वेगाने वाढते . प्रौढ मेंदूतील त्यांच्या प्रमाणाच्या 200% पर्यंत पोचते . मेंदूचा हा भाग इतर भागांशी जोडले जाण्याचे आणि त्यांच्याशी असलेले आपले नेटवर्क दृढ (strengthen )करत राहतो. त्यामुळे अवघड वाटणाऱ्या गुंतागुंतीच्या (complex)संज्ञानात्मक क्षमता (cognitive ) सुधारतात आणि एकत्रित होतात. त्यामुळे आधीच्या घडलेल्या घटनांशी आत्ताच्या घटनांचा संबंध त्यांना समजतो . त्याचा बोलताना वापर ती बाळे करू शकतात . एखाद्या गोष्टीचे कारण आणि त्याचा परिणाम हेही या वयात मुलांना व्यवस्थित समजते . त्यामुळे त्यांच्याशी सतत संवाद साधत राहणे, गोष्टी सांगणे, गाणी शिकवणे , पुस्तके वाचून दाखवणे चालू ठेवावे . त्यांच्या भविष्यकाळातील शैक्षणिक प्रगतीचा हा पाया असतो . ज्या कृतींनी , खेळण्यांनी पालकांचे मुलांशी प्रत्यक्षात सुसंवाद होत राहतील , अशा कृती कराव्यात . टी. व्ही., इलेक्ट्रोनिक खेळणी , मोबाईल , DVD यांना passive toys म्हटले जाते शास्त्रीय भाषेमध्ये . निदान 2 वर्षांखालील मुलांमध्ये त्यांचा वापर करू नये , असा बालमानसशास्त्रज्ञांचा सल्ला आहे .

या काळापर्यंत बहुतेक सर्व axons myelin sheath ने झाकले जातात . त्यामुळे चेतापेशींना मिळालेल्या माहितीची नोंद ठेवणे आणि संदेशांचे वहन करणे ही कामे जास्त जलदगतीने होऊ लागतात .

जन्माला आल्या आल्याच बाळामध्ये आयुष्यभर त्याच्या मेंदूमध्ये जेवढ्या पेशी असतात , त्या सर्व मेंदूच्या पेशी - चेतापेशी , अस्तित्वात असतात. पण मेंदूला त्याचे काम व्यवस्थित करण्यासाठी अजून एक गोष्ट महत्वाची असते , ती म्हणजे त्या पेशींमधले जोड - connections , ज्यांना synapses म्हणतात.

जन्मानंतर सुरुवातीच्या काळात हे connections बनण्याचा दर प्रचंड असतो. जवळपास 1 दशलक्ष प्रति सेकंद एवढ्या वेगाने नवीन connections तयार होतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात
आयुष्यात परत कधीही हे connections बनत नाहीत .

मूल जन्माला आल्यानंतर ते बाळ आपल्या आईवडील, नातलगांकडून जे जे काही अनुभवते , त्यानुसार हे connections बनतात. त्यांना त्या काळात ज्या प्रमाणात प्रेम , काळजी , परस्पर संबंध , सुसंवाद , उत्तेजना , चालना मिळते , त्यानुसार मेंदूचे कोणते connections तयार होणार आणि जन्मभरासाठी टिकणार , ते ठरते.

छोटी बाळे पालकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी रडतात , हुंकार देतात , हसतात.
थोडी मोठी झाल्यावर ती जास्त स्पष्टपणे त्यांच्या गरजा आणि आवडी सांगू शकतात. पालकांसाठी ही एक सुसंधीच असते, त्यांच्या गरजांशी उत्तरदायी असण्याची - जबाबदार राहण्याची . ही देण्याघेण्याची प्रक्रियाच मेंदूमधील वायरिंग साठी मूलभूत गोष्ट असते .

मुलांचे पालकांशी प्रेमाचे संबंध असणे , लक्ष पुरवणे , मुलांना सकारात्मक प्रतिसाद देणे आणि मुलांशी सतत संवाद साधत राहणे , हे मुलांच्या निरोगी विकासासाठी आवश्यक असते . त्यांना खेळण्याची , मनातील भावना अभिव्यक्त करण्याची, घडण्याची, अन्वेषण करण्याची (explore)जेवढी जास्त संधी मिळेल , तेवढी मुले हुशार होतात , असे बालमानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे . अभ्यासाने असे सिद्ध झालेले आहे , की सुरक्षितता , स्थैर्य , पोषक वातावरण, पालकांशी खूप छान सुसंवाद आणि प्रेम , माया, काळजी मिळणारी मुले शाळेमध्ये आणि पुढे आयुष्यातही चांगली प्रगती करतात.

बाळांचे नाते त्यांच्या घरापासून चालू होते . पालक, इतर कुटुंबीय, नातेवाईक , शेजारी , शिक्षक, मित्र असा हळूहळू जास्त लोकांचा यात अंतर्भाव होत जातो.

बाळांच्या पहिल्या 3 वर्षांपर्यंत ही connections बनण्याची प्रक्रिया चालू राहते . त्यानंतर मेंदू स्वतः च स्वतः ला fine -tune करू लागतो. जे connections सतत वापरले जातात , ते बळकट होतात आणि जे वापरले जात नाहीत , ते अखेरीस काढून टाकले जातात. याला pruning असे म्हणतात. मेंदूला जास्त कार्यक्षम बनवण्यासाठी होत असते हे सारे . मेंदूमधल्या connections ची ही बांधणी आपल्या शरीरातील स्नायूंच्या बांधणीसारखीच आहे जणू . एकच नियम दोन्हींकडेही आहे - वापर करा किंवा विसरून जा . (Use it or lose it )

पहिल्या 3 वर्षांतील हे जे बाळाच्या मेंदूतील जास्तीचे synapses असतात , त्यामुळे त्याच्या मेंदूची ग्रहण करण्याची , अनुभव टिपण्याची क्षमता खूप वाढलेली असते . त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त अनुभव त्यांना घेता येतील , तेवढे घेऊ द्यावेत . वेगवेगळ्या कलांशी त्यांची ओळख करून द्यावी . इतरांशी खेळायला , बोलायला प्रवृत्त करावे . छोट्या छोट्या गोष्टी स्वतः करायला लावाव्यात . उदा.कपडे घालणे , जेवणे , glass वापरणे , बॅग भरणे . या सगळ्यांमुळे त्यांच्या शरीरातील छोटे आणि मोठे दोन्ही स्नायू वापरले जातात , त्यांच्या हालचाली होतात , शिवाय स्वतः विचार करण्याच्या त्यांच्या क्षमतेला चालना मिळते . ज्या चांगल्या सवयी आपल्या बाळाला लागाव्यात , असे आपल्याला वाटते , त्यांची सुरुवात या काळापासूनच करायला हवी .

B लहान मुलांच्या बाबतीत आपण बरेचदा भाषा केंद्र किंवा भावना केंद्र यांच्याविषयी बोलतो. पण प्रत्यक्षात आपल्याला ज्या खूप साध्या साध्या कृती वाटतात, त्यामध्ये मेंदूच्या बऱ्याच भागांचा समावेश असतो .

बाळाच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात अनुवांशिक (genetic) घटकांचा प्रभाव जास्त असतो . म्हणजे तयार झालेल्या चेतापेशी मेंदूमध्ये त्यांच्या त्यांच्या योग्य ठिकाणी असणे , त्यांचा एकमेकांशी योग्य संबंध असणे (interact )हे मातापित्यांकडून आलेल्या जीन्स वर अवलंबून राहते . पण वातावरणातून मिळालेल्या माहितीला , अनुभवांना प्रतिसाद देणे , त्यानुसार स्वतः ला घडवणे , हे प्रत्येकाच्या मेंदूला स्वतः च करावे लागते . जीन्स जर पाया असतील , तर बाळाचे अनुभव हे मेंदूचे बाकीचे बांधकाम घडवतात . बाळाची इंद्रिये आजूबाजूचे वातावरण , व्यक्ती , अनुभव यांविषयी मेंदूला माहिती देतात आणि त्यामुळे मज्जातंतू क्रियेला (neural activity ) चालना मिळते.
उदा. बोलण्याचे आवाज - यांमुळे बाळाच्या मेंदूतील भाषा संबंधी भागाला चालना मिळते . जर inputs चे प्रमाण वाढले , म्हणजे जास्त बोलणे ऐकायला मिळाले बाळाला , तर त्या भागातील चेतापेशींमध्ये असणारे synapses जास्त सक्रिय होतात . वारंवार वापर synapses ला बळकट बनवतात. वारंवारतेमुळे मेंदूमधील अंतर्गत wiring बळकट होते आणि मेंदूच्या कामांचा वेग वाढतो . जितका जास्त लोकांशी , वेगवेगळ्या वातावरणाशी , वस्तूंशी संबंध येतो , तेवढे जास्त संवेदी उत्तेजना (sensory stimulations) मिळतात . त्यामुळे बाळाची एकाग्रता , चौकस बुद्धी, स्मृती वाढते .बाळ लवकर वाढीचे टप्पे गाठते. (Milestones )

ज्या भागातील synapses क्वचित वापरली जातात , ती अशक्त होतात आणि pruning process मध्ये काढून टाकले जातात. वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत बाळाच्या मेंदूमध्ये प्रत्येक चेतापेशींसाठी जवळजवळ 15, 000 synapses असतात . तिसऱ्या वर्षापासुन ही pruning ची क्रिया चालू होते. तेव्हा जवळपास 50% जास्तीची synapses काढून टाकली जातात . Visual cortex या मेंदूच्या भागामध्ये ही क्रिया चालू राहते .त्यानंतर तिचा वेग कमी होतो, synapses ची संख्या स्थिर होऊ लागते . पण ही क्रिया वयाच्या 16 व्या वर्षापर्यंत हळूहळू चालू राहते .

अशा प्रकारे synapses ची ताकद फार मोठा हातभार लावते शिक्षण , स्मृती आणि इतर संज्ञांनात्मक क्षमता यांच्या networks च्या connectivity आणि कार्यक्षमतेमध्ये . त्यामुळे बाळाच्या आजूबाजूचे वातावरण , लोकं यांच्या अनुभवांवरून त्यांना फक्त माहितीच मिळत नाही , तर त्या माहितीचा वापर मेंदू कसा करणार, यावर पण प्रभाव पडतो .

आमचे सर म्हणायचे, "सगळ्या लहान मुलांची बुद्धी टिपकागदासारखी असते . देवाने सर्वांनाच हुशार बनण्याची क्षमता देऊन पाठवले आहे . पालक त्यांच्यापुढे काय काय ठेवतात टिपण्यासाठी , त्यावर ती हुशारी टिकणार की गंजणार, हे अवलंबून आहे. " अगदी खरे आहे ते !

अशा प्रकारे गर्भावस्थेपासून वयाच्या 5 व्या वर्षापर्यंतचा काळ बाळाच्या मेंदूसाठी अक्षरशः सुवर्णकाळ असतो . पालकांसाठी एक सुसंधी असते . आणि दुर्दैवाने हाच काळ वाया जातो बरेचदा . "एवढ्या लहान वयापासून कशाला मुलांच्या डोक्याला त्रास?... आत्तापासून कशाला शिस्त लावायची?..."अशा चुकीच्या विचारांपोटी . तसे होऊ नये, या प्रामाणिक कळकळीचीपोटी हा सारा लेखनप्रपंच .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख

या कोरोनामुळे नुकतेच कळायला लागलेली मुले जग न बघता घरी बसून मोबाईल बघत आहेत याचे याच कारणामुळे वाईट वाटतेय

या कोरोनामुळे नुकतेच कळायला लागलेली मुले जग न बघता घरी बसून मोबाईल बघत आहेत याचे याच कारणामुळे वाईट वाटतेय >> एक्झॅक्टली..
माझ्या बाळाला रे ग्युलर बेसिस वर नि सर्गा च्या सानिध्यात नेता येत नाही ह्याचे मना पासून वाईट वाटते.

तिला कळायला लागल्यापासून सोशियल कनेक्टही फार कमी आहे आमचा (कोरोनामुळे अर्थातच)

रुन्मेष आणि नानबा अगदी खरं आहे. कोरोनाच्या आधी लेक सकाळी, संध्याकाळी सोसायटी गार्डनमध्ये खेळायची तोपर्यंत आम्ही कधीही टीव्ही समोरही बसायचो नाही जेवतांना पण lockdown पासून खेळणं बंद झालं आणि energy चॅनलाईज करणं ही कमी झालं तरी जूनपर्यंत जेवतांना मोबाईलची सवय नव्हती पण घरातली सगळी काम करून तिच्या मागे दिवसभर फिरणं यात माझीच शक्ती संपायला लागली आणि तिला जेवतांना मोबाईल दिला बस तेव्हापासून आजपर्यंत एक चीज slice खायलाही आम्हाला आता मोबाईल लागतोय. जोपर्यंत बाहेर नेऊन तिला मनसोक्त खेळू देत नाही हे असंच चालणार बहुतेक. मध्ये दोन रविवारी तिला टेकडीवर घेऊन गेलो तेव्हा मस्त खेळली तर त्या दिवशी मस्त जेवली.
खरच कधी संपणार हे दिवस.

या कोरोनामुळे नुकतेच कळायला लागलेली मुले जग न बघता घरी बसून मोबाईल बघत आहेत याचे याच कारणामुळे वाईट वाटते>>>>>>> +११११११

वावे, नानबा, विनिता, केशव थँक्स. ऋ ss न्मेष, पिन्की, बोकलत, नानबा, खरे आहे तुमचे म्हणणे. आम्ही दोघांनी यासाठी काय केलेय, छोटेसे timetable बनवलंय. ते flexible आहे अमितच्या wfh load आणि माझ्या पेशंट च्या संख्येनुसार. पण एक तासभर पुस्तकाचे अभिवाचन करतो आम्ही. रोटेशन नी रोज एकेकाने वाचायचे. एक तास पत्ते /कॅरम /ल्युडो असे काहीतरी खेळतो. मी स्वयंपाक करताना मुलालाही छोटी छोट्या कामात सहभागी करून घेते. उदा. भाज्या धुणे, धान्य निवडणे(बरेचदा मी निवडलेलेच त्याला निवडायला देते ), घासून निथळलेली भांडी जागेवर लावणे, washing machine मधून काढून कपडे वाळत घालायला मदत करणे, वाळलेले घरात आणणे, बागकाम करताना लुडबुड करू देणे, असे काहीतरी रोज शोधून काढून त्याला गुंतवून ठेवतो. Online डान्स क्लास लावलाय एक. त्यामुळे exercise पण होतो. Online school व्यतिरिक्त त्याला मोबाईल हातात घ्यायची परवानगी नाही आणि तेवढा त्याला वेळ मोकळा ठेवायचाच नाही, असे जाणीवपूर्वक जमवतो आहोत आम्ही दोघे मार्च पासून. अजूनतरी successful आहोत.