# साहेब
" साहेब, कसा येऊ मी? ट्रेन नाय सुरु झाल्यात "
"बघ बाबा, कसं करतोस ते. ऑफिस चालू केलंय..नाही आला तर पगार कापणार... बस चालूय ...बघ कसं यायचं ते"
तो बिचारा गर्दीतून, रांगा लावून... धक्के खात ..पोहोचतो ऑफिसला...एक महिन्याचा पगार घेतो, खुश होतो... आता अंगवळणी पडलेलं असत... सगळं म्यानेज होत असतं... अन एके दिवशी साहेबाला सकाळी त्याचा फोन येतो.
" साहेब, अंग दुखतंय...ताप पण येतोय..."
" बाबारे ...तू नको येऊ ऑफिसला... "
"साधा ताप पण असू शकतो ना ? साहेब ?"
"covid(19) ची लक्षण आहेत..."
"साहेब, पण रजा शिल्लक नाय "
"तर मग....? घरी राहा चुपचाप... इथं येऊ नको....कर कसंतरी म्यानेज... बिनपगाराचं...सगळ्यांचेच हाल आहेत बाबा... तू बरा होऊन डॉक्टरच सर्टिफिकेट घेऊनच ये"
"पण साहेब........."
फोन केव्हाच कट झालेला असतो....
साहेब... भूतकाळात एक फेरी मारून येतो...
तो त्याच्या स्वतःच्या केबिनमध्ये बऱ्यापैकी सेफ असतो....
© मयुरी चवाथे - शिंदे