कोहली कुलोत्पन्न दोघेच फेमस. एक विराट, दुसरा राजकुमार. राजकुमार उर्फ राज कोहली आज आपल्याला नागीन आणि दोन जानी दुश्मन्स मुळे माहित असला तरी त्याचे शिखर वर्ष १९८४ आहे. या वर्षी त्याने एक नव्हे तर दोन डोक्याला ताप चित्रपट बनवले. पहिला जीने नहीं दूंगा, ज्यात रोशनी स्कूल ऑफ अॅक्टिंगशी आपली ओळख करून दिली आहे. आणि दुसरा राज तिलक ज्यातून कमल हसनला सारिका आणि प्रेक्षकांना आ वासण्याची शक्ती मिळाली.
दोन्ही सिनेमे इंदर राज आनंद-राज कोहली याच लेखक-दिग्दर्शक द्वयीच्या देणग्या आहेत आणि साधारण सारखेच आहेत. जीने नहीं दूंगाचा प्लॉट तुलनेने सरधोपट असला तरी त्यातली अॅक्टिंग कहर आहे. तर राज तिलकमधली अॅक्टिंग तुलनेने बरी असली तरी त्याच्या प्लॉटमध्ये जगभरातली कॉम्प्लिकेशन्स आहेत. अखेर राज तिलकमध्ये जानी राजकुमार म्हणजे आपला राकु आहे म्हटल्यावर त्याच्या गुर्हाळातील रसग्रहणाला प्राधान्य देणे क्रमप्राप्त होते. तरी यातून पिचून बाहेर पडलेल्या रसामृताला पचवण्याचा प्रयत्न करूयात.
१) हे तर अथांग असे गहिरे पाणी
१.१) बहुधर्मिय पुत्रकामेष्टी
सिनेमाच्या सुरुवातीला कुठल्यातरी देवीच्या मंदिरात पूजा होताना दिसते. तसेच एका दर्ग्याबाहेर वाळवंटात एकट्यानेच राकु दुआ मागताना दिसतो. दोन्ही विधिंचा हेतु एकच आहे - पूजा करत असलेल्या महाराजांना मुलगा व्हावा, म्हणजे राज्याला युवराज मिळावा. यातून राकु हा अव्वल दर्जाचा स्वामीभक्त आहे हे ठसवले आहे. सुरुवातीलाच भटजी पंचा आणि लाल रंगाचे धोतर, घोळक्यातील बायका चणिया चोळीत आणि स्वतः महाराज युरोपीय वेषात दाखवून आपण धरम वीर, अमर शक्ती, सिंघासन इ. सिनेमांच्या युगातील कथा बघत असल्याचे स्पष्ट होते. महाराजांची तलवार फॉईल (फेन्सिंगची तलवार) असल्यामुळे सिनेमातील हिरो लोक निपुण तलवारबाज असल्याचे स्पष्ट होते. हा महाराज मला काही ओळखू आलेला नाही. यात इतके लोक आहेत की सगळे बरोबर ओळखले आहेत असे छातीठोकपणे मीही सांगू शकत नाही.
असा बहुधर्मीय जुगाड लावल्यानंतर महाराजांना मुलगा झाला नाही तरच नवल! त्यानुसार नोकर शेर सिंग मंदिरात येऊन सांगतो की महाराणींना मुलगा झालेला आहे. या आनंदात महाराज त्याला मोत्यांचा हार काढून देतात (गळ्यातून, हवेतून नव्हे. महाराज महाराज आहेत जादूगर नाही). याने राजीव आनंद फार मोठ्ठा राजा असल्याचे कळते. तो महामंत्री भवानी सिंगसाठी निरोप देतो की गोरगरीबांसाठी खजिना खुला करावा. अशा उधळमांडक्या राजाचा महामंत्री सहसा प्रॅक्टिकल, हुशार, आणि महत्त्वाकांक्षी असतो. हिंदी सिनेमांमध्ये अशा गुणी व्यक्तीस व्हिलन असे म्हणतात.
१.२) व्हिलन आणि इतर पात्र परिचय
या सिनेमाचा व्हिलन आहे अजित. अजित म्हणजे महामंत्री भवानी सिंग अर्थातच राजसिंहासनावर बसण्याची अपेक्षा बाळगून आहे. त्याचा साथीदार आहे मदन पुरी. आश्चर्यजनकरित्या नाव रणजित असूनही ही भूमिका मदन पुरीला दिलेली आहे. हे दोघे बहुतांश सिनेमात जोधपुरी सूट घातलेले दाखवले आहेत. युवराजाचा जन्म अर्थातच यांच्यासाठी वाईट बातमी आहे. पण अजित हुशार व्हिलन आहे. त्याला याची पुरेपुर जाणीव आहे की आपल्या मार्गातला खरा अडथळा आहे समद खान (राकु). अजितच्या म्हणण्यानुसार राकु इतका वफादार आहे की त्याच्या धमन्यांतून रक्त नव्हे तर महाराजांचे मीठ वाहते आहे. मीठ ८०१ सेल्सियस तापमानाला वितळते. एवढा हॉट पुरुष हिंदी सिनेमात दुसरा कोणी नसावा.
तिकडे महाराज लगेचच राजकुमार मोठा झाला की त्याला विलायतेला शिकण्यासाठी पाठवण्याचा, भारतीय पालकांना साजेसा निर्णय घेतात. कचकड्याच्या बाहुलीचे ते बाळ तलवार का धनी आणि कला का प्रेमी असेल हा निर्णयही ते घेऊन टाकतात. आता आनंद साजरा करण्याची वेळ झालेली आहे. त्यानुसार अजित, मदन पुरी आणि रझा मुराद दरबारात हजर आहेत. इतरही किरकोळ सेवक-सेविका आहेत. बाळाच्या सुरक्षेची शून्य चिंता असल्याने महाराज त्याला खुशाल हातात घेऊन मिरवत आहेत. पण राकु कुठे दिसत नसल्याने महाराजांच्या जीवाला घोर लागतो. रझा मुराद जलाल खान नावाने सिनेमात राकुचा धाकटा भाऊ आहे. याने कधी नव्हे ती त्याला न साजेशी हिरो-साईडची भूमिका केली आहे. हे दर्शवण्याकरता याला एकट्याला स्वच्छ धुतलेला ड्रेस दिला आहे. तो म्हणतो की तुम्हाला मुलगा व्हावा म्हणून राकु अजमेरला ख्वाजा गरीब नवाजच्या दर्ग्याला गेला आहे. आता युवराज झालेला असल्याने दर्ग्यात बसण्याचे कारण संपले आहे. मग राकु हा क्यू घेऊन दरबारात प्रकटतो.
राकु या राज्याचा सेनापती देखील आहे. तसेच राज्यातला सर्वश्रेष्ठ तलवारबाजही आहे. हे बघता राकुला युवराजाचा गुरु म्हणून नेमणे स्वाभाविक आहे. पण मग दोन प्रश्न उद्भवतात - १) मग युवराजाला विलायतेला जाण्याची काय आवश्यकता आहे?, २) युवराजाला आत्ताच्या आत्ता, ताबडतोब राकुच्या हातात देण्याची गरज आहे का? ते आत्ता ज्या खोलीत आहेत तिथे स्नायपिंग करणारे धनुर्धारी लपवणे अतिशय ट्रिव्हिअल काम आहे. एक बाण आणि एवढ्या मेहनतीने झालेला युवराज खलास! पण सिनेमा अजून सुरु पण झाला नसल्याने तसे होत नाही. मग राकु पीळ उर्दू भाषण मारतो ज्याचे सार 'ओके' असे आहे. इथे बॅकग्राऊंडला अजित आणि मदन पुरी "हे दळण अजून किती वेळ चालणार आहे" चेहर्याने एकमेकांकडे बघताना दिसू शकतात. या सीनमध्ये राकुचा वेष गदळ आहे. त्याची मिशी उजव्या बाजूने निघून आली आहे. तिरंगात जो मिशीसोबत खेळ खेळला आहे त्याची सुरुवात इथे दिसते. त्याच्या दाढीचा रंग मिशीशी मॅच होत नाही. दाढी जॉ-लाईन रेफरन्सने चिकटवायची ती अट्टाहासाने जबड्याखाली चिकटवली आहे. दर्ग्याची चादर उपरण्यासारखी घेतली आहे. कंबरेला फॉईल (तलवार) तशीच बिन म्यानेची लटकत आहे. ही त्याच्या साईझची सुद्धा नाही. कारण ती त्याच्या बुटापर्यंत येते आहे. तो ज्या प्रकारे चालत येतो ते बघता समद खानचा डावा पाय कायमचा जायबंदी झाला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचे त्याच्या डाव्या हाताला ती रँडम पुरचुंडी कसली आहे? तिचे त्या सीनमध्ये काय काम आहे?
महाराज आपल्या बिनडोकपणाचा आणखी एक पुरावा म्हणून अजितला आदेश देतात की या महिन्यात राज्यात जेवढी म्हणून मुले जन्माला आली आहेत त्या सर्वांना इथे बोलावून घ्या. त्यांचे नामकरण आम्ही करू. तीन मिनिटांच्या आत व्हिलन जिंकावा म्हणून मी यापूर्वी कधी प्रार्थना केल्याचे स्मरत नाही. मग महाराणी आणि सोबत सुलोचना येते. महाराणीची इच्छा असते की हा निर्णय सर्वात आधी तिच्या मानलेल्या भावाला, अर्जुन सिंगला कळावा. कट टू अर्जुन सिंग. अर्जुन सिंगची भूमिका प्राणने केली आहे. अप्रतिम टायमिंग असल्याने प्राणलाही याच महिन्यात मुलगा झाला आहे. बायको दुर्गाच्या भूमिकेत उर्मिला भट (महानमधल्या नाटकात काम करणार्या अमिताभचा सांभाळ करणारी आई) आहे. हिला आपल्याला मुलगा झाला यापेक्षा महाराणीला युवराज झाला याचाच आनंद जास्त आहे. राकुला रझा मुराद दिला तसा प्राणच्या हाताखाली पण कोणीतरी पाहिजे. मग त्याला संग्राम सिंग म्हणून कोणी दिला आहे. परंपरेनुसार प्राणने युवराजासाठी काहीतरी भेट पाठवणे अपेक्षित असते. मग तो संग्राम सिंग हस्ते एक हार पुढे पाठवून देतो. संग्राम सिंग वायुवेगाने राजवाडा गाठतो, हार राकुच्या मांडीतल्या राजकुमाराच्या गळ्यात घालतो आणि प्राणच्या मुलासाठी रिटर्न गिफ्ट घेऊन प्राणकडे परतायला बघतो. आणि नेमकी इथेच माशी शिंकते.
१.३) कधीकधी नशीब व्हिलनच्या बाजूने असते
अजित ठरवतो की ही संधी चांगली आहे, आज उठाव करूया. त्याच्या बाजूला मदन पुरी, जगदीश राज (हिंदी सिनेमांचा घाऊक पोलिस इन्स्पेक्टर) आणि जगदीश राजच्या गँगमधली माणसे आहेत. तो संग्राम सिंगला चाकू फेकून मारतो आणि लढाईला तोंड फुटते. शूटिंगच्या वेळी महाराजांच्या साईडच्या एक्स्ट्रांची संख्या मोजण्यात काहीतरी गडबड झाली असावी. कारण बहुतांश जणांना लाल रंगांचा युनिफॉर्म आहे पण काही तुरळक जणांना निळ्या रंगाचा युनिफॉर्म दिला आहे. अजितला आपले संख्याबळ मर्यादित असल्याची जाणीव आहे. त्यामुळे तो नगारा वाजवून सावध करणार्या सैनिकाला बाण मारून ठार करतो. व्हिलनचा नेम चक्क सलग दोनदा बरोबर लागला आहे - एक्स्ट्रीम रॅरिटी! बहुतांश सैनिक अजूनही बेसावध असले तरी राकु आणि रझा मुरादला घोटाळा असल्याची जाणीव होते आणि तेही लढाईत उतरतात.
रझा मुराद माणिक इराणीला खणाखणीत गुंतवतो. बाकी लोक फालतु असल्याने राकुला त्यांच्याकडे लक्ष द्यायचे काहीच कारण नाही. तो समयसूचकता दाखवून नगारा वाजवून धोक्याची सूचना देऊ लागतो. अजित बाण चालवून राकुलाही ठार करण्याचा प्रयत्न करतो. पण राकु या सिनेमात ब्रिगेडिअर सूर्यदेवसिंगच्या रोलसाठी प्रॅक्टिस करत असल्याने त्याचे रिफ्लेक्सेस दैवी आहेत. तो गुणगुणारा डास झटकावा तसा अजितचा बाण एका हाताने झटकून टाकतो. तसे बघावे तर अजितने हाराकिरी केली आहे. महाराज शांतपणे झोपून राहिला तरी राकु आणि रझा मुराद सहज या लोकांना हाताळताना दिसत आहेत. प्राण कधीही येऊ शकतो त्यामुळे अजितची साईड अगदीच कमकुवत आहे. पण अजितने आपला महाराज काय दर्जाचा बुद्धू आहे हे अचूक ताडले आहे. त्यानुसार महाराज तलवार घेऊन मैदानात उतरतो.
फॉईलचा अतिशय चुकीच्या पद्धतीने वापर करून खणाखणी चालू असताना संग्राम सिंग प्राणच्या डेर्यात जाऊन उठावाचा संदेश प्राणला देतो आणि मरतो. प्राण लगेच राजवाड्याकडे धाव घेतो. तिकडे राकुचा नगारा वाजवून झालेला असल्याने तो रझा मुरादच्या मदतीला जातो. राकुच्या हस्ते माणिक इराणीचा बॉलिवूड रेकॉर्ड टाईममध्ये मृत्यु होतो (सहा मिनिटांत). हे सर्व एवढ्या वेगाने घडत असले आणि मागे दाणदाण मुझिक लावले असले तरी लढाईची कोरिओग्राफी अति विलंबित लयीत आहे. हे म्हणजे बडा ख्यालाला साथ म्हणून एखादे परण वाजवण्यासारखे आहे. राकु मग रझा मुरादला जाऊन सांगतो की बाकी सगळे मेले तरी चालतील, युवराज वाचला पाहिजे. तू त्याला घेऊन नजमा (पक्षी समद खानची बायको) कडे जा. रजा मुराद म्हणतो ओके. इथून खरा घोळ सुरू होतो. प्रत्यक्षात हे लोक ऑलमोस्ट जिंकत आले आहेत. पुढच्याच शॉटमध्ये प्राण आपल्या सैनिकांसोबत पोहोचतो आणि अजितचा प्लॅन पूर्णपणे फसतो. त्यामुळे रझा मुरादला काहीही करायची गरज नाही आहे. पण दुष्टचक्र इथेच संपत नाही.
१.४) अॅडॅप्टेबल व्हिलन
तरी अजितचा प्लॅन फसत असताना तिकडे रझा मुराद महाराणीला गाठतो. तो म्हणतो युवराज माझ्या हवाली कर. त्याच्या दरडावणीच्या सुरामुळे महाराणी अर्थातच साशंक होते. शांत शब्दांत तिला समजावून तिच्यासकट युवराजाला बाहेर काढणे हे दोन मिनिटांचे काम आहे. पण रझा मुरादला हिरो साईडचा अनुभव नसल्याने तो जबरदस्तीने युवराज हिसकावून घेतो. डोन्ट वरी, महाराणीही कमी बिनडोक नाही. रझा मुराद युवराजाला घेऊन पळ काढतो तर त्याच्या मागे चार बंडखोर येतात. ते रझा मुरादला महाराणीसमोर बाणाने मारतात. तरीही महाराणी रझा मुरादच गद्दार असल्याचा निष्कर्ष काढते. तसेच रझा मुरादला जे बाण लागतात ते वर्महोलचा प्रवास करून येतात. अन्यथा त्या अँगलने त्याला बाण लागणे अशक्य आहे. एनीवे, तिकडे अजित निरुपाय म्हणून खांबामागे लपून महाराजांच्या मर्मावर बाण मारतो. याच्या निम्मी जरी अॅक्युरसी इतर व्हिलन्सने दाखवली असती तर बॉलिवूडच्या हिरोंचे अवघड होते. जगदीश राज काम संपवावे म्हणून चाकू भोसकायला जातो आणि प्राण त्याला आपल्या ताब्यात घेतो. राकु व प्राण त्याच्याकडून या षडयंत्रामागे कोण आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. आपले बिंग फुटते आहे बघून अजित धावत पळत येतो आणि तलवार भोसकून जगदीश राजला ठार करतो. पण दुष्टचक्र इथेच संपत नाही
अर्थातच राकु चिडतो (आणि त्याला संशयही येतो). अजित यावर "राजपूत जब अपने आका का खून देखता हैं तो तुम्हारे तरह सवाल नही करता. बल्कि खून का बदला खून से लेता हैं" असा बचाव पुढे करतो. प्राण राजपूत असल्याने हा बचाव त्याला पटतो. राकु हुशार असल्याने त्याला हा बचाव पटत नाही. राकु राजपूत नसल्याने त्याला प्राण भाव देणार नाही हे स्पष्ट असले तरी तो बापडा प्रयत्न करतो. हे सर्व संवाद अतिशय काव्यात्मक आहेत. उदा.
"अभी अभी यहां एक लाश गिरी हैं जिसे तुम्हारी आंखे नही देख सकती अर्जुन सिंग."
"लाश? किसकी?"
"असलियत की!"
प्राण महाराजांच्या तब्येतीची चौकशी करायला निघून जातो तर राकु नजमाला गाठतो. नजमाची भूमिका केली आहे योगिता बालीने. नजमा त्याला सांगते की रझा मुराद काही इकडे आलेला नाही. मग हा मनुष्य गेला तरी कुठे च्यामायला? हा शॉक कमी म्हणून की काय, तिकडे महाराज मरायला टेकतात. पटकन गचकून राजवैद्याला मोकळे करावे तर त्यांना युवराजाचे मुखदर्शन घेण्याची इच्छा होते. आता युवराज कुठून आणायचा? अशावेळी अजित आणि मदन पुरी कमालीची अॅडॅप्टेबिलिटी दाखवत फसलेला प्लॅन मार्गावर आणतात. मदन पुरी कुठून तरी एका बाळाचे शव पैदा करून हाच युवराज असल्याचे महाराणीला सांगतो. अजून एक छिन्नविछिन्न शव रझा मुरादचे म्हणून खपवले जाते. आता महाराजाचा आत्मा शांत कसा करावा? यावर महाराणी इतका वेळ झाले ते काहीच नाही असा कहर उपाय काढते. प्राणने आपला मुलगा महाराणीला युवराज म्हणून द्यावा जेणेकरून महाराजांना हा धक्का सहन करावा लागणार नाही. प्राणही परस्पर होकार देऊन आपला मुलगा आणायला जातो. त्याची बायको त्याला विचारते की किमान मला हे तरी सांग की आपला मुलगा कोणाच्या घरात देत आहेस. प्राण म्हणतो मी हे सांगू शकत नाही. कोणी विचारले तर सांग की आपला मुलगा मेला. पण दुष्टचक्र इथेच संपत नाही.
१.५) अबूबाबाच्या वरचढ कॅच आणि वफादार नोकराच्या वरचढ वफादार मालक
अजित तयारीतच असतो. तो म्हणतो की वहिनी बेशुद्ध झाल्यात तू त्यांना सांभाळ, मी तुझा मुलगा महाराणींना देऊन येतो. प्राणच्या तंबूतून तो जातो थेट मदन पुरीकडे. मदन पुरी अजितचा मुलगा घेऊन तयार आहे. आपण नाही तर युवराज रुपाने आपला मुलगा सिंहासनावर बसवण्याची बार्गेन त्याने मान्य केली आहे. आता प्राणच्या मुलाचे काय करावे? अजित म्हणतो की माझ्या मुलाला नजर लागू नये म्हणून याचा बळी देऊ. मग मदन पुरी प्राणच्या मुलाला, अजितच्या मुलावरून ओवाळून फेकून देतो. मिसटाईम्ड शॉटला बाऊंड्रीवरचा फिल्डर जसा धावत पुढे येऊन कॅच करतो तशी सुलोचना विंगेतून अचानक येऊन प्राणच्या मुलाचा कॅच घेते. अबूबाबाचा कॅच यापुढे काहीच नाही कारण संजीव कुमारला बसल्या जागी कॅच आहे, सुलोचनाला आपले बूड हलवून योग्य जागी पोहोचण्याचे अॅडिशनल चॅलेंज आहे. सुलोचना अजितची बायको असल्याचे कळते. ती म्हणते की आपला मुलगा मी युवराज म्हणून दिला, त्या बदल्यात प्राणचा मुलगा मला द्या. अजित तिची विनंती मान्य करतो.
आता एकच काम उरले आहे, राकुचा बंदोबस्त! मदन पुरी त्याला अटक करायला जातो. राकुसारखा अजिबात न दिसणारा स्टंट डबल मदन पुरीच्या काही सैनिकांना मारतो पण लवकरच राकुला अटक करण्यात मदनला यश येते. तिकडे आपला मुलगा युवराज म्हणून महाराजांना खपवण्यात अजितला यश आले आहे. महाराजही "मी युवराज पाहिला, आता मी काही मरत नाही" मोडमध्ये. थोडक्यात हा जगेल अशी चिन्हे आहेत. पण दुष्टचक्र इथेच संपत नाही.
राकुला गद्दार म्हणून महाराजांसमोर आणले जाते. राकु गद्दारी करेल ही कल्पनाच असह्य असल्याने महाराज ऑक्सिजनवर जातात. त्यात महाराणी महाराजासमोरच याची उलटतपासणी सुरु करते. खुशाल जाऊन ती महाराजांना म्हणते की राकुच आपल्या मुलाच्या मृत्युस जबाबदार आहे. आत्ता थोड्याच वेळापूर्वी त्याला अजितचा मुलगा युवराज म्हणून खपवला असल्याचे ती विसरते. पण महाराज हे विसरलेले नाहीत. त्यांना तिथल्या तिथे हार्ट अॅटॅक येतो आणि ते जागीच गतप्राण होतात. राकुला गद्दारीचा आरोप आणि फाशीची शिक्षा मान्य होण्याचा प्रश्नच नाही. मग तो काहीतरी बरळून आपल्या बेड्या सहजगत्या तोडतो आणि पसार होतो.
एवढा अगडबंब सेटअप ज्याच्यामुळे झाला तो रझा मुराद कुणा खानाबदोश म्हणजे बंजारा टोळीला सापडतो. या बंजारा टोळीचा प्रमुख आहे ओमप्रकाश. रझा मुराद युवराजाला ओमप्रकाशच्या हवाली करून मरतो. इथून पुढे दोन मिनिटे आपल्याला अतिशय गचाळ एडिटिंग बघायला मिळते. राकु निर्धार करतो की जोवर तो आपल्या माथी लागलेला कलंक दूर करत नाही तोवर तो राज्यात परतणार नाही. या निर्धाराचे डायलॉग तो कुठल्याशा चितेसमोर उभे राहून बडबडतो आहे. ही कोणाची चिता? महाराज किंवा रझा मुरादची तर असू शकत नाही. बहुधा राकु म्हणतो त्या असलियतची चिता असावी. मग राकु व योगिता बाली नेसत्या वस्त्रांनिशी घर सोडतात. अजमेरच्या दर्ग्यात हजेरी लावून ते थेट वाळवंट गाठतात. त्यांच्या हालअपेष्टांचे प्रतीक म्हणून वाळवंटात योगिताचे पाय काटे आणि फोडांनी भरलेले, रक्ताळलेले दाखवले आहेत. राकु दु:खी होतो पण यात त्या दोघांचीच चूक आहे. अनवाणी वाळवंटातून चालायला कोणी सांगितलं होतं? वाळवंटात कुठे तडमडतात कोणास ठाऊक पण त्यांना एक गुहा सापडते जिथे राकु आपले बस्तान बसवतो. गुहा राज्याच्या सीमेवर कुठेशी असावी.
टाईम स्किप!
२) पोस्ट टाईम स्किप
२.१) बावीस मिनिटे गाण्याची वाट पाहायला लावणारा दिग्दर्शक
मध्ये बरीच वर्षे निघून जातात. राकु आणि योगिताचे केस थोडेसे पांढरे झाले आहेत. बाकी दोघेही टकाटक दिसत आहेत. राकुने तलवार शिकवण्याचे क्लासेस उघडले आहेत. युवराज न सापडल्याने अजूनही राकुवर गद्दारीच ठपका आहे. हे दु:ख सोडले तर बाकी त्यांच्या अॅरेंजमेंटमध्ये नाव ठेवायला जागा नाही. .
तिकडे राजवाड्यात चक्क बिबळ्या घुसला आहे. या बिबळ्याला पकडून एक नरपुंगव त्याच्यासोबत मस्ती करतो आहे. हा नरपुंगव म्हणजे तोतया युवराज अर्थात अजितचा मुलगा. बिनडोक महाराणी अर्थात राजमातेने याचे नाव समशेर सिंग ठेवले आहे. ही भूमिका केली राज किरणने. पोस्ट टाईम स्किप प्राणने राकुची जागा घेतल्याचे स्पष्ट होते. अजित आणि मदन पुरी अजूनही जोधपुरी सुटातच आहेत. राज किरण आपल्या आईसोबत आदराने वागतो पण नोकरवर्गाच्या पाया पडायला त्याची ना आहे. राजमाता आणि प्राणच्या मते तो प्राणचा मुलगा असल्याने तो थोडे व्यथित होतात पण प्राणला आपल्या (?) मुलामध्ये राजपूतांचे गुण आले आहेत असे वाटून तो खुश होतो. प्रत्यक्षात खुश फक्त अजित आहे कारण राजघराण्याला साजेशी गुर्मी त्याच्या रक्ताने दाखवायला सुरु केली आहे. राज किरण आता राज्याभिषेक करण्या इतपत मोठा झालेला असल्याने त्याचे लग्न राजमातेने राजगढच्या राजकुमारी मधुमतीशी ठरवले आहे.
मधुमती दाखवली आहे रीना रॉय. राज किरणला भेटायला म्हणून ती आपला लवाजमा सोबत घेऊन निघाली आहे. ऑफ कोर्स रीना रॉय राज किरणची हिरोईन असणे शक्य नाही. मग हिचा हिरो कोण? लगेच ओ ओ ओ सुरु होते. रीनाची मैत्रीण सांगते की इथून जवळच एक बंजार्याचा डेरा आहे. मधुमती गाणे ऐकू आले की जाऊन नाचलेच पाहिजे या तत्वाचे पालन करत असल्याने ती तडक बंजारा वस्ती गाठते. अखेर सिनेमात पहिले गाणे सुरु होते.
२.२) डेंजरस इश्क
संगीत दिले आहे कल्याणजी आनंदजी यांनी, आवाज आहे सुरेश वाडकर आणि आशा भोसलेंचा. गाणे आहे अजूबा अजूबा अजूबा, हुस्न तेरा हैं एक अजूबा. सुरुवातीला याहियातूबा असे म्हणत कमल हसन आणि सारिका नाचताना दिसतात. कमल हसनच खरा युवराज आहे हे कोणीही सांगू शकतं. नृत्यकुशल अभिनेता असल्याने खेमट्याच्या बीट्सना मॅच होणार्या स्टेप्स देता आल्या आहेत. खंजिरी वाजवण्यासाठी हाथाने थाप द्यावी लागते हा गैरसमज दूर करण्यात आला आहे. मुळात खंजिरी दोन्ही हातांनी धरून हिरविणीच्या पार्श्वभागावर आघात करून वाजवायचे वाद्य आहे. कमलभाऊंनी हे अतिशय मन लावून दाखवले आहे. रीना रॉयच्या अंगावरचे मोत्यांचे दागिने बघून ओमप्रकाश ही कोणी राजकन्या असल्याचे ओळखतो. पण कपड्यांची गुलाबीची भयाण शेड बघून कमल हसन ही इथे नाचायलाच आली आहे हे ताडतो. लगेच तिला जरा बरे कपडे घालायला दिले जातात आणि कमल सारिकाला सोडून तिला पकडतो. शूटिंग आऊटडोअर असल्याचा पुरावाही इथे बघता येतो. नाचताना या लोकांनी प्रचंड धुरळा उडवला आहे.
अचानक घाणेरडा जंप कट बसतो आणि कमल हसनला रीना रॉय स्वप्नात दिसत असल्याचे स्पष्ट होते. प्रत्यक्षात तो सारिका सोबतच नाचत आहे. मग उर्वरित वेळ कोलांट्या उड्या आणि इतर कसरत नृत्ये होतात. ओव्हरऑल गाणे बरे आहे आणि डान्सही सहणेबल आहे. आता या गाण्यातून काहीतरी निष्पन्न तर झाले पाहिजे. मग सारिकाला अचानक ध्यानात येते की कमल रीनावर लाईन मारतो आहे. रीनासोबत अॅक्चुअल डान्स स्टेप्स सुरु झाल्यावर तर तिचा तिळपापड होतो. मग एक चाईल्ड आर्टिस्ट तिला नाग आणून देतो. हा चाईल्ड आर्टिस्ट म्हणजेच दिग्दर्शकाचा सुपुत्र अरमान कोहली होय. ही तो नाग रीना रॉयवर सोडते. नागही बिचारा जाऊन रीनाला चावतो. गतकाळात क्राईम पेट्रोलच्या अभावामुळे असे कितीक गुन्हे घडले असतील याची गणतीच नाही.
२.३) द्रोणाचार्य राकु
कमल हसनचे नाव ओमप्रकाशने सूरज ठेवले आहे. तो रीनाला एका तंबूत घेऊन जातो आणि तपासतो. नाग चावल्याची जखम दिसताच तो यावरचा रामबाण उपाय - विष चोखून थुंकणे - करतो. इथे याचे जाळीदार जाकीट जवळून बघता येते. बाहेर अरमान कोहली, सारिकाचा भाऊ, खंजर घेऊन आला आहे. याला आवरा अरे कोणीतरी! विष चोखल्याने कमल हसनही अंडर रिस्क आहे. त्याला काही झाले तर सारिका लगेच खंजर मारून रीनाला ठार करण्याची घोषणा करते. आपण एका राजघराण्यातील व्यक्तीवर जीवघेणे हल्ले करतो आहोत. त्याचे काही कॉन्सिक्वेन्सेस असतात. हे मूल्यशिक्षण सारिका व अरमानला मिळालेले दिसत नाही. पण कमल हसनचे मूल्यशिक्षण झालेले आहे. त्यामुळे फ्रेंच किसचा मोह आवरता घेऊन तो रीनाच्या तळहाताचे चुंबन घेतो. याने रीना शुद्धीवर येते.
विषय फार वाढू नये म्हणून रीना आणि तिची मैत्रीण काढता पाय घेतात. सारिका कमल हसनला "परत लाईन मारलीस तर याद राख. ती भवानी आहे आणि मी आहे" अशी वास्तववादी धमकी देते. ओमप्रकाश उगाच काहीतरी बोलून विषय बदलतो. त्यात तिकडे राकु येतो. कमल हसन राकुच्या क्लासचा विद्यार्थी आहे. ओमप्रकाशचे नाव सरदार झुबेरी असल्याचे स्पष्ट होते. राकु आपल्या क्लासमार्फत बदला घेण्यालायक शिष्य तयार करतो आहे. कमल हसनही त्यापैकीच एक आहे. थोडक्यात राकु द्रोणाचार्य आहे. पण अजूनही कमल हसन युवराज असल्याचे रहस्य रहस्यच आहे.
या द्रोणाचार्यांचा अजून एक शिष्य आहे सुनील दत्त. एकाच वेळी गुहेतील सर्व शिष्यांचा सामना करून, राकुच्या हातून तलवार हिसकावण्याचे कसब दाखवून तो प्रेक्षकाला पटवून देतो की आपण एक महान योद्धे आहोत. राज कुमार सुनील दत्तपेक्षा फक्त तीन वर्षांनी मोठा आहे पण मेकअपने पराकाष्ठा करून काळे केस असलेला सुनील दत्त राकुपेक्षा म्हातारा दिसेल याची खात्री घेतली आहे. त्याहूनही आश्चर्यजनकरित्या समद खानच्या क्लासमध्ये महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. सुनील दत्तचे नाव आहे जयसिंग. जयसिंगची तालीम आज पूर्ण झाल्याचे राकु सांगतो. इतकी वर्षे राकुने हा कोणाचा मुलगा आहे हे विचारलेले नसते. अखेर सुनील स्वतःच सांगतो की मी प्रतापगढचे महामंत्री भवानी सिंग यांचा मुलगा आहे. हा स्वतःला अजितचा मुलगा समजतो आहे. म्हणजे हा सुलोचनाने कॅच घेतलेला प्राणचा मुलगा आहे. आपण अजितच्या मुलाला शिकवल्याचे कळताच राकु क्रुद्ध होतो. पण दुष्टचक्र संपवायचे नसल्याने तो सुनील दत्तला आपल्या चिडण्याचे कारण सांगत नाही. त्या ऐवजी तो भविष्यात गुरुदक्षिणेचे वचन घेऊन सुनीलला जायला सांगतो. सुनील राजपूत असल्याने तो वचन पाळणार हे वेगळे सांगणे न लगे. जाता जाता योगिता बाली त्याला दर्ग्यातून आणलेला रुमाल बांधते आणि राकुला टोमणा हाणते. नवरा-बायकोत आपले काय काम म्हणून सूज्ञ सुनील काढता पाय घेतो.
२.४) सेटअप कंप्लीट आणि समरी
आता एकच मेजर जोडी राहिली आहे आणि मग स्टार लोक संपले. तशी सुनील दत्तलाही एक हिरवीण आहे पण ती नंतर. जंगलातून घोडागाडी जाताना दिसते. या घोडागाडीत बसली आहे हेमा मालिनी. हेमा मालिनी सिनेमात आहे म्हटल्यावर तिचा हिरो धरम पाजी असणार ही सेफ बेट आहे. हेमा मालिनीचा ड्रायव्हर गणवेशावरून प्रतापगढचा असल्याचे ओळखता येते. थोडक्यात ही देखील प्रतापगढची आहे. ही मंदिरात पूजा करून परत येते आहे. रस्त्यात एक झाड पडल्याने गाडी थांबवावी लागते. या सैनिकांच्याकडून काही ते झाड हलत नाही. सुदैवाने तिकडून धरम पाजी पांढर्या रंगाचा लेदरचा सदरा घालून चालले आहेत. आधी ते थोडे उचकतात पण गाडीत हेमाला बघून विरघळतात. मग एकटेच त्या झाडाला उचलून बाजूला फेकून देतात.
हेमाला पाजी कोण आहेत हे माहित नसल्याने ती इनाम म्हणून त्यांना एक सोन्याची मोहोर देते. पण पाजीदेखील राजपूत आहेत. त्यामुळे ते स्त्रियांची मदत करणे हा आपला धर्म मानतात. म्हणून इनाम स्वीकारणे त्यांच्या शान के खिलाफ असते. मग ते मोहोर हेमाला परत करतात आणि तिला वाटेला लावतात. अचानक तिथे प्राण प्रकटतो. धर्मेंद्र प्राणचा मुलगा आहे म्हणजे टेक्निकली सुनील दत्तचा भाऊ. हा मुद्दा नंतर क्लिअर होईल. प्राण येऊन सांगतो की ही अजितची मुलगी आहे. अजितने मध्यंतरीच्या काळात आपल्या मुलीला राजकुमारीचा दर्जा मिळवण्यात यश मिळवलेले दिसते. अर्थात पाजींची राजपूतगिरी टेक्स प्रिसिडन्स. हेमासुद्धा पाजींवर इंप्रेस होते आणि थॅंक्स म्हणून जाते. पाजींचे नाव आहे जोरावर. पाजींनाही हेमा पसंद आहे. प्राणलाही काही हरकत नाही. त्यामुळे ही जोडी जुळली. प्राणला आणखी एक मुलगा शाम सिंग दाखवला आहे. त्याचा मुद्दा आणि इतर काँप्लिकेशन्स आपण प्रतिसादांत अभ्यासू. अल्पविराम घेण्यापूर्वी या सर्व नात्यांची एक समरी
महाराज + महाराणी - एक मुलगा = कमल हसन. सध्या ओमप्रकाशचा मुलगा म्हणून वावरतो. याने राकुकडून युद्धकलेचे शिक्षण घेतले आहे. हा खरा युवराज असल्याचे सध्या कोणालाच ठाऊक नाही.
राकु + योगिता बाली - राकु राजसेवेत अहोरात्र गुंतला असल्याने मूलबाळ नाही
प्राण + उर्मिला भट - तीन मुलगे = सुनील दत्त, धर्मेंद्र, शाम सिंग. शाम सिंगचा नट बिनमहत्त्वाचा असल्याने तो डेफिनिटली धाकला. बहुधा सुनील दत्त थोरला पण नीट स्पष्ट केलेले नाही. सुनील दत्त सध्या अजितचा मुलगा म्हणून वावरतो. याने राकुकडून युद्धकलेचे शिक्षण घेतले आहे. सुनील दत्तचे सत्य केवळ अजित, मदन पुरी आणि सुलोचना यांना ठाऊक आहे.
भाऊबंद : याखेरीज राकुला एक भाऊ - रझा मुराद. याने युवराज ओमप्रकाशच्या हवाली करून अंग टाकले. तसेच प्राण हा महाराणींचा मानलेला भाऊ.
अजित + सुलोचना - एक मुलगा, एक मुलगी = राज किरण आणि हेमा मालिनी. राज किरण थोरला. राज किरण सध्या युवराज म्हणून वावरतो. प्राण व राजमातेनुसार राज किरण प्राणचा मुलगा आहे पण प्रत्यक्षात तो अजितचा मुलगा आहे. हे सत्य केवळ अजित, मदन पुरी आणि सुलोचना यांना ठाऊक आहे.
जोड्या
कमल हसन + रीना रॉय + सारिका - प्रेम त्रिकोण. सारिकाला कमल आवडतो. कमलला रीना आवडते. रीनाला अजूनतरी या डाऊनमार्केट लोकांबद्दल काहीच वाटत नाही.
धरम + हेमा - ट्रिव्हिअल जोडी.
सुनील + ? - मुख्य हिरोंपैकी एक असल्याने यालाही एक हिरवीण आहे हे फिक्स.
ती कोण? एवढी सर्व कॉम्प्लिकेशन्स कशी निस्तरली जातात? आणि मदन पुरीचे नाव रणजीत का आहे या प्रश्नांची उत्तरे अल्पविरामानंतर
......................... मदन पुरीचे नाव रणजीत का आहे हा प्रश्न सोडून, त्याचे उत्तर कोणाकडेच नाही.
(अल्पविराम)
एडिट : करेक्शन -
याखेरीज प्राणला एक भाऊ - रझा मुराद >>> रझा मुराद राकुचा भाऊ आहे
धन्यवाद rmd
जब्राट लिहीलयस पायस!!! कीप ऑन
जब्राट लिहीलयस पायस!!! कीप ऑन रायटींग!!!
भन्नाट हाणामारी
भन्नाट हाणामारी
ह्या सिनेमासाठी राज खोसला चे
ह्या सिनेमासाठी राज खोसला चे इनिशियल चॉईसेस पुढीलप्रमाणे होते: दिलीपकुमार (राजकुमार), फिरोझखान (सुनील दत्त) आणी जितेंद्र (कमल हसन). go figure!!!
अडीच तीन तासांच्या रटाळ
अडीच तीन तासांच्या रटाळ चित्रपटाचा पाच सहा तास मनोरंजक आस्वाद घ्यायचा असेल तर पायस यांचे हे लिखाण आणि चित्रपट एकत्र बघणे..
खूप छान लिहीले आहे. ह.ह.पु.वा...
सुरूवातीला नगारा वाजवताना राजकुमार त्याच्या दिशेने सोडलेले बाण हाताने झटकतो. या रिफ्लेक्सेसची प्रेरणा बहुतेक संजय लिला भंसाळीने घेतली असावी. बाजीराव मस्तानी मध्ये असाच प्रसंग त्याने शेवटी दाखवला आहे.
५) राजकुमारी-बंजारा मॅटर
५) राजकुमारी-बंजारा मॅटर
५.१) बात यही खतम हो जाती तो और बात थी
आता थोडा वेळ "अरे बाबा अरे बाबा क्या हो गया, देखा जो तुम्हे मुझे प्यार हो गया" खेळण्याची वेळ झाली आहे. प्यार झालेला मनुष्य कमल हसन आणि त्याने बघितले रीना रॉयला. रीनाची गेस्ट बेडरूममध्ये सोय केलेली आहे. या खोलीचे डिझाईन मेजर चुकलेले आहे. ते कसे ते थोड्याचे वेळात स्पष्ट होते पण तत्पूर्वी कमल आणि रीनाच्या वेष-केशभूषेबद्दल दोन शब्द झाले पाहिजेत. रीनाचे राज्य बहुधा अधिक मॉडर्न असल्याने हिला नाईट गाऊन दिला आहे. पण त्याचे मटेरिअल आणि सोबतचे दागिने यामुळे तो दरबारी नर्तकीचा ड्रेस वाटतो. हिच्या केसांना डाव्या बाजूला करकचून बांधल्यामुळे डावीकडे चालबाजमधल्या रोहिणी हट्टंगडीचा कोंबडा तर उजवीकडे भासमान टक्कल अशी विचित्र केशभूषा तयार झाली आहे. कमल हिला भेटायला रात्रीचा राजमहालात घुसला आहे. सहसा अशा निंजा-छाप कामगिरींवर जाताना नखशिखांत काळा वेष करणे हे भ्याडपणाचे लक्षण असल्याने कमल छाती उघडी टाकून केवळ एक जाकीट, विजार आणि चक्क गमबूट घालून आला आहे. हे दोघे एकमेकांसाठी परफेक्ट आहेत.
आता गेस्ट बेडरूममधला झोल. कमल या खोलीतल्या झुंबरावर उभा राहून शीळ घालून रीनाचे लक्ष वेधून घेतो. मग कंटाळा आल्याने तो तिच्यासोबत झुंबराला लटकून गप्पा मारतो. इथे झोल अगदीच स्पष्ट होतो. ते झुंबर जमिनीपासून उण्यापुर्या सहा फूट उंचीवर लटकवले आहे. त्या गेस्ट रूमचे छप्पर जेमतेम अकरा फूट उंचीवर आहे. ही महालातील खोली आहे का स्टुडिओ अपार्टमेंट? रीनातैंनी या राज्यासोबत संबंध जोडण्याविषयक पुनर्विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. असो, तर कमल म्हणतो की मी तुझ्या जखमेतून विष चोखून तुझे प्राण वाचवले पण त्यात माझे प्राण गेले. "बात वही खतम हो जाती तो और बात थी" - हा कमल हसनचा तकिया कलाम आहे. गेट यूझ्ड टू इट. आता सिनेमाभर हे वाक्य ऐकावे लागणार आहे. कमल उगा पाल्हाळ लावून सांगतो की मला तू आवडतेस. रीना कंटाळून म्हणते की मी एक टाळी वाजवायचा अवकाश की सैनिक येऊन तुला जेरबंद करतील. इतर कोणी असता तर तो घाबरला असता पण कमल हा राकुचा शिष्य आहे. हिला जर टाळी वाजवायची असती तर हिने केव्हाच वाजवली असती. म्हणजे आग दोनो तरफ से बराबर लगी हैं. कमलने हे ताडले आहे. तो म्हणतो की मी तुला भेटायला राजमहालात आलो, तू मला भेटायला खंडहरमध्ये ये. डेटसाठी खंडहर? मग रीनासुद्धा भाव खायला "बात यही खतम हो जाती तो और बात थी" डायलॉग मारते पण हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे की ताई कमलदादांना भेटायला खंडहरमध्ये जाणार आहेत.
५.२) तुम्ही डेटसाठी कुठे जाल - खंडहर का जंगल?
कट टू राजसभा. अजित आणि मदन पुरीसाठी नवीन जोधपुरी सूटचे बजेट सँक्शन झाल्याने ते नवीन जोधपुरी सुटात राजमातेसमोर उपस्थित आहेत. अजित म्हणतो वसंत पंचमीला चांगला मुहूर्त आहे. राज किरणचा राज्याभिषेक करून टाकू. राजमातेला ही कल्पना पसंत पडते. तिला राज्याभिषेक आणि रीना रॉयसोबत साखरपुडा असे दोन समारंभ एकत्र उरकायचे आहेत. बरोबरच आहे. केटररवर डबल खर्च कोण करेल? राज किरण - रीना जोडी जुळावी म्हणून तिने दोघांना शिकारीवर पाठवले आहे. या सीनमध्ये डबिंगची झालेली गडबड सोडून देऊ. किंबहुना एकंदरीत सिनेमातच डबिंग नीट झालेले नाही असे म्हणून हा मुद्दा क्लोज करू. पण खास डेटिंगसाठी त्या काळात लोक बारादर्या, बागा वगैरे बांधत असत ते सोडून शिकारीवर कोण पाठवतं? यापेक्षा तर कमलचा खंडहरचा ऑप्शन बरा म्हणावा लागेल. का हिच्या डोक्यात आपला मुलगा रीनाची शिकार करेल असे विचार घोळत आहेत? या राजमातेची लक्षणे काही ठीक दिसत नाहीत.
रीना रॉय तिच्या मैत्रिणीला घेऊन राजकिरणबरोबर शिकारीला जाते खरी. राज किरण चहापानाचा कार्यक्रम आयोजित करतो. रीनाने अरेबियन नाईट्समध्ये शोभेल असा लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. राज किरणने नॉर्मल माणसाप्रमाणे स्वच्छ शर्ट-पँट घातले आहेत. हा इतका नॉर्मल आहे की अजितचा मुलगा नसता तरी सिनेमात व्हिलनच झाला असता. बिचारा चहाचा घोट घेणार एवढ्यात सुरेश वाडकरच्या आवाजात कमल हसन विव्हळतो. हा ज्याला खंडहर म्हणतो आहे ती एक सुस्थितीतील गढी दिसते आहे. यांच्या शिकारीच्या ठिकाणापासून जवळच आहे. आता याचा आवाज आल्यावर रीनाने धावत पळत जाणे स्वाभाविक आहे. बात यही खतम हो जाती तो और बात थी.
५.३) मॅटर आऊट
राज किरण बिचारा हा अपमान गिळून कपडे बदलून तयार होतो. याला गंडवायला म्हणून ती मैत्रीण रीनाचे कपडे घालून बसली आहे. याने राज किरण कसला गंडायला? तो अगदी सहज रीना कुठे गेली आहे ते शोधून काढतो. बात यहां खतम हो जाती तो और बात थी. राज किरण कमल हसनला मारण्याच्या निर्धाराने फाईट सुरु करतो. कमल नि:शस्त्र आहे तर राज किरणकडे फॉईल आहे. तसे कमलला राकुने शिकवले आहे पण कमल सिनेमाचा अॅक्शन हिरो नसल्याचे आपण ध्यानात ठेवले पाहिजे. आणि राज किरणला ज्याने कोणी विलायतेत शिकवले तोही चांगला शिक्षक असावा कारण राज किरण अॅक्चुअली फॉईल जशी वापरायची असते तशीच किंवा त्याच्या बर्याच जवळ जाणार्या स्टाईलने फाईट करतो. तो व्हिलन असल्याचा आणखी एक पुरावा. शेवटी राज किरणची शारिरिक शक्ती जास्त असल्याने तो कमलवर हावी होतो. पण कमलवर प्रेम करणारी आणखी एक हिरोईन आहे. सारिका याचा पाठलाग करत खंडहरमध्ये पोहोचली आहे.
सारिकाला कोणीही कमलला फोडलेले मान्य नसते, भले तो युवराज का असेना. ती झेप घेऊन राज किरणला जमिनीवर लोळवते आणि थेट गळ्यापाशी रामपुरी लावते. राज किरण याने चक्क एक्साईट होतो. आता रीना का सारिका हा ज्याचा त्याचा चॉईस पण बयो आपला जीव घ्यायला निघालेली असताना असे चॉईस करण्यासाठी डोक्यात बर्फच हवा. सारिका मग कमलची अक्कल काढते, रीनाची निर्भत्सना करते आणि ती अजून काही करण्याआधी कमल तिला घेऊन पोबारा करतो. एकंदरीतच सारिका राजघराण्यातल्या व्यक्तींच्या जीवावर उठलेली दाखवली आहे. रीनाचा झाला तेवढा अपमान कमी म्हणून राज किरणही तिला टोमणे मारतो. रीना साईडला हे मॅटर चव्हाट्यावर आलेले असल्याने आता कबिल्यातही सेम घटना घडायला हवी. मग कट टू कबिला.
५.४) अगम्य प्लॅन
कबिल्यात बाल अरमान कोहलीने एका बैलाला धरून ठेवले आहे. जानी दुश्मनमधल्या अलौकिक शक्ती तेव्हापासूनच याच्याकडे होत्या असे दिसते. ओम प्रकाश त्या बैलाला वेसण घालतो आहे. सारिका विचारते का बरे? कारण तो बैल जाऊन कुठल्याशा ठाकुरच्या शेतातल्या गाईमागे गेला होता. हे ऑफकोर्स प्रतीकात्मक आहे जेणेकरून सारिकाला "या बैलाला पण वेसण घाला" डायलॉग मारता यावा. त्या डायलॉगला जोडून ती "इसे मेरे साथ बांध दो" हा संदेश पण पास ऑन करते. हे ऐकून ओम प्रकाश चक्क दु:खी होतो. तो तिला तंबूत बोलावतो. म्हणतो मंगला (सारिकाचे नाव मंगला आहे), कमलला मी मुलासारखे वाढवले असले तरी तो माझा मुलगा नाही, बाहेरचा आहे. आपल्या कबिल्याच्या रीतिनुसार तू बाहेरच्या व्यक्तीसोबत लग्न करू शकत नाही. इथे ओमप्रकाशने कमलच्या आईवडलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला ही महत्त्वाची बातमी आहे.
ओमप्रकाशने बालपणी कमलच्या गळ्यात असलेला हार जपून ठेवला आहे. पण आपल्या दुर्दैवाने तो हार अजूनही त्याने राकुला दाखवलेला नाही. त्यामुळे सिनेमा अजून लांबतो. जणू जखमेवर मीठ चोळायला तिकडे राकु येतो पण त्या हाराचा विषय सरळ सरळ बंद केला जातो. राकु एक चिंतेचा विषय घेऊन आला आहे. राज किरणचा राज्याभिषेक होणार असल्याचे त्याच्या कानावर आले आहे. तोतया युवराजाचा राज्याभिषेक राकुसारखा वफादार खपवून घेणे असंभव आहे. कमल प्रथमच राकुला एक लॉजिकचा प्रश्न विचारतो - खरा युवराज जिवंत आहे याचा पुरावा काय?
यावर राकुचे कहर उत्तर आहे - मेरा इमान, मेरा इतकाल, मेरा तलाश-ए-मंजिल का सफर
...................
...................
अगम्य उत्तरांखेरीज यावेळेस राकुकडे एक अगम्य प्लॅनसुद्धा आहे. तो कमलला म्हणतो की तू राजमहालात जा. राजमातेची भेट घे. तिला विनंती कर की प्लीज राज तिलक (पक्षी: राज्याभिषेक) करू नका. राजमाता कमलचं का ऐकेल? का केवळ याला राजमहालात घुसण्याचा पूर्वानुभव म्हणून तोफेच्या तोंडी दिले जात आहे? या प्रश्नांची उत्तरे केवळ राकु देऊ शकतो. त्याची अगम्य उत्तरे ऐकण्यापेक्षा आपण पुढच्या भागात राजमाता कमलचं ऐकते का या प्रश्नाचे उत्तर पाहूयात.
यावर राकुचे कहर उत्तर आहे -
यावर राकुचे कहर उत्तर आहे - मेरा इमान, मेरा इतकाल, मेरा तलाश-ए-मंजिल का सफर..!!
हे खूपच मस्त आहे. डायलॉग्ज विशेष विचार न करता लिहिलेले आहेत....एकूणच सिनेमा डोके गहाण ठेऊनच लिहिलेला आहे म्हणा !
अफाट विनोदी वर्णन.....
सुरेश वाडकरच्या आवाजात कमल
सुरेश वाडकरच्या आवाजात कमल हसन विव्हळतो. >>
मस्तच! अजून येऊ द्या.
मस्तच! अजून येऊ द्या.
कहर..:-D
कहर.. !! अशक्य हसलो
(No subject)
कहर आहे रे बाबा !! नाद खुळा!
कहर आहे रे बाबा !! नाद खुळा!
कहर लिहिलेय.... परत परत
कहर लिहिलेय.... परत परत वाचतेय. नंतर लेख हातात धरून चित्रपट पाहायचा प्रयत्न करणार आहे.
1952 की कितीतरी साली वैजयंती, पद्मिनी, जेमिनी गणेशन, प्राण यांचा याच नावाचा चित्रपट आला होता. तो बघितलेला. त्याची कथाही थोडीफार अशीच आहे. तो गावठी राजतीलक आणि हा शहरी तडका मारलेला राजतीलक इतकाच फरक असावा. गावात लिमिटेड माणसे असल्यामुळे एकच हिरो व एकच व्हिलन होता. शहरात सगळ्यांची सोय करावी लागते.
नवीन प्रतिसादांना धन्यवाद
नवीन प्रतिसादांना धन्यवाद
६) हिरो लोकांच्या आयुष्यात संकटे यायलाच हवीत.
६.१) पहाटेच्या आरतीला काकडआरती म्हणत असतील तर मध्यरात्रीच्या आरतीला वाकडआरती म्हणावे काय?
पडत्या फळाची आज्ञा पत्करून कमल राजवाड्यात जातो. राजवाडा म्हणजे राजस्थानातील वाळवंटातला भुईकोट किल्ला आहे. त्यामुळे कमलने सुयोग्य असा समुद्री चाच्याचा वेष धारण केला आहे. राकुने याला तलवार चालवायला शिकवले असले तरी निंजालोकांप्रमाणे दबक्या पावलांनी हालचाली शिकवलेल्या नाहीत. त्यामुळे हा लगेच पहारेकर्यांच्या दृष्टीस पडतो. हे पहारेकरीही फळाची अपेक्षा न करता काम करणारे आहेत. एका पॉईंटला कमल झेंड्याच्या काठीवर उभा आहे आणि काठी ज्या भिंतीत रोवली आहे तिच्या कठड्यापाशी सर्व पहारेकरी आहेत. कमल त्यांच्या रेंजच्या संपूर्णतया बाहेर आहे. तरीही बिचारे हवेतल्या हवेत तलवारी फिरवत राहतात. असो, कमल पडत-धडपडत एकदाचा राजमातेच्या कक्षात गच्चीमार्गे प्रवेश करतो. राजमाता मध्यरात्रीची पूजा करते आहे. मध्यरात्री कोण पूजा करतं? दिग्दर्शकाने अशा बिनडोक बाईला समजावण्याचे कर्मकठीण काम कमलकडे केवळ एवढ्यासाठीच दिलेले आहे जेणेकरून "कही तुम मेरे बेटे - कही आप मेरी माँ" शॉट्स काढता यावेत.
राजमाता कमलला त्यादिवशी विजय मैदानातला युवक म्हणून ओळखते. कमल जाऊन विनंती करतो की राज तिलक थांबवा (थेटरातल्या प्रेक्षकांनी सेम विनंती केली असावी). राजमाता म्हणते की का म्हणून? कमल म्हणतो की राज किरण खरा युवराज नाही, व्हिलन लोकांनी प्लांट केलेला प्लॉट डिव्हाईस आहे. राजमातेच्या मते राज किरण हा प्राणचा मुलगा आहे (प्रत्यक्षात तो अजितचा मुलगा आहे). पण राज किरण आपला मुलगा नाही हे रहस्य या तरुणास कसे ठाऊक? कमल म्हणतो की मला ज्याने सांगितले तो आयुष्यात कधी खोटे बोललेला नाही - समद खान म्हणजे आपला राकु. इथे अजितचा प्लॅन आणि युवराजाचा जन्म त्याच्यासाठी अडचणीचा का हे थोडे स्पष्ट होते. महाराज निपुत्रिक मेले तर राजमाता कोणालातरी दत्तक घेणार हे स्पष्ट आहे. आता राकुला तर काही मूलबाळ नाही (ज्यावरून बिचारा अजून योगिता बालीची बोलणी खातो). बहुधा महामंत्री या नात्याने पुढचा नंबर अजितचा असावा. मग आपल्या मुलाला गादीवर बसवून त्याच्यामार्फत राज्यावर कबजा जमवण्याचा त्याचा हेतु सफल होऊ शकतो, होत आहे. मध्ये प्राण तडमडला, पण मोठ्या हुशारीने अजितने त्यावरही तोडगा काढून आपला मुलगा राजमातेच्या गळ्यात मारलाच. बहुत दूर की कौडी निकला ये तो.
६.२) माँ-बेटा मिलन
बॅक टू राजमाता. राकुवर तिचा विश्वास नसल्याने राकु गद्दार की वफादार यावर मिनीचर्चा होते. पण कमल तिचाच मुलगा असल्याने त्याच्याकडे एक कहर बिनडोक उपाय आहे. जोवर ती आपला निर्णय मागे घेत नाही तोवर कमल समईतल्या ज्योतीवर आपला हात धरून उभा राहण्याचे ठरवतो. यावर अस्मादिकांचे म्हणणे असे आहे - राहिना बापडा! ज्योतीपासून दीड-दोन इंचावर त्याने हात धरला आहे. फार फारतर हाताला फोड वगैरे येतील, दुसर्या दिवशी जुने तूप वगैरे लावून अगदी सहज बरं करता येईल. तसेही फार वेळ तो हात त्या स्थितीत धरू पण शकणार नाही. थोड्याच वेळात त्याचा बाहू रक्तप्रवाह अवरुद्ध झाल्याने बधीर होईल. पायांना मुंग्या येतील आणि हा कंटाळून निघून जाईल. फारच हट्टी असेल तर तसाच जमिनीवर कोसळेल. मग आपल्याला दोन मिनिटे मिळतील. मस्तपैकी बोंब मारून पहारेकर्यांना बोलवावे, त्यांना हलगर्जीपणाबद्दल बोलणी घालावीत, मग याला कारागृहात नेऊन टॉर्चर करावे आणि आपला ज्याच्यावर राग आहे त्या राकुचा पत्ता काढून घ्यावा. पण अशा उत्तमोत्तम कल्पना फक्त गुणी लोकांना सुचतात आणि राज कोहलीपटात गुणी लोक व्हिलन असतात. त्यामुळे राजमाता असले काही करत नाही.
देवीमातेला हिची आणि कमलची कीव येते. मग देव्हार्यातल्या सगळ्या घंटा दाणदाण वाजतात आणि हिचे आईचे काळीज द्रवते. मग अपेक्षित असा "कही तुम मेरे बेटे - कही आप मेरी माँ" शॉट काढून घेतला जातो. दुर्दैवाने हिने "नहीं" अशी बोंब मारल्याने पहारेकरी धावत धावत हिच्या खोलीबाहेर जमतात. पण आता ती राजमाता नसून नुसती माता आहे. त्यामुळे ती पहारेकर्यांना खोटे बोलून कटवते. कमल विचारतो की हा परोपकार का? ती म्हणते की "मेरे अंदर माँ की ममता जल उठी". कमलही मेरे अंदर भी कुछ तो हुआ छाप उत्तर देतो. या अभागी जीवांची सत्य (हे खरेच आई-मुलगा आहेत) जाणण्याची वेळ झालेली नसल्याने कमल तिला पैरीपौना करून काढता पाय घेतो.
६.३) प्रेम करण्याच्या नादात मौत के चक्रव्यूहमध्ये जाऊ नये
कमल राजमहालात आला आणि रीनाला भेटून न गेला तर काय उपयोग?! त्यानुसार राजमातेच्या खोलीतून बाहेर पडताच हा पहारेकर्यांच्या दृष्टीस पडतो. पहारेकर्यांपासून वाचण्यासाठी तो एका गवाक्षातून उडी घेतो तर नेमका रीनाच्या बिछान्यात पडतो. रीना झोपण्यापूर्वीचा मेकअप करून घेत आहे. विचक्षण प्रेक्षकांना या सीनमध्ये रीना शक्तिमानमधील शाल्या उर्फ सफेद बिल्ली (शक्तिमानच्या वडलांना मारण्यासाठी किल्विषने पाठवलेली मारेकरी) च्या मानवरुपासारखी दिसते हे कळेल. नॅचरली आपली कॅटवूमन विचारते तू इकडे का आलास? कमल म्हणतो की नॅचरली तुला भेटायला. बात यहां भी खत्म हो जाती तो और बात थी. रीना म्हणते की तुझे उद्योग काय मला माहित नाहीत? इकडे माझ्यावर लाईन मारतोस, तिकडे सारिकावर लाईन मारतोस. तुझा काय भरवसा? पण कमलच्या डोक्यात हिंदी हिरोंना न साजेशी क्लॅरिटी आहे. सारिका त्याची दोस्त असली तरी प्रेमिका (सिनेमात) नाही. तो म्हणतो "मला फक्त तू पायजे." मग हिंदी हिरोची आवडती जागा, अर्थात हिरोईनची मान पकडून तो सुरु होतो. पण हे दोघेही मूर्ख आहेत. रीनाचा मेकअप करणार्या बायका जाऊन पहारेकर्यांना बोलावणार ही शक्यता ते विसरले. साहजिकच पहारेकरी येऊन व्यत्यय आणतात.
पुन्हा एकदा पाठलाग पण या वेळेस राज किरण हुशारीने कमलला एका दालनात कोंडतो. राज किरणला आपल्या अपमानाची परतफेड म्हणून सोलो फाईट हवी आहे. तो फ्रिलचा शर्ट घालून आला आहे. मग दोघेही मेणबत्त्या तोडून आपल्याला तलवार चालवता येत असल्याचे सिद्ध करतात. बोथ आर इंप्रेस्ड विथ इच अदर्स स्किल. बात यहां खतम हो जाती तो और बात थी. फाईटिंग सुरु. कमल अधिक निपुण तलवारबाज असल्याचे लगेच सांगता येते. शेवटी त्याला राकुने शिकवले आहे. त्यानुसार तो राज किरणला जखमीही करतो. पण तो मुलगा राजमातेचा आहे. आपले लक्ष्य इथून पळ काढणे आहे, राज किरणसोबत खेळणे नाही हे तो विसरतो. त्यापेक्षाही कहर म्हणजे तो टेरेनकडे लक्ष देत नाही. झुळझुळीत टेबलक्लॉथवर उभं राहून फाईट करणार असशील तर ऑफकोर्स राज किरण ते टेबलक्लॉथ खेचून तुला खाली पाडणार आहे. याला खरंच राकुने शिकवलं आहे? राज किरण त्याला उपरोक्त ट्रिक वापरून बंदी बनवण्यात यशस्वी होतो.
६.४) पोपट
जे काम राजमाता करू शकली नाही ते राज किरण करतो. याला कारागृहात नेऊन टॉर्चर करणे. राज किरणमध्येही सुलोचनाकडून काही अवगुण आले आहेत. आपल्या डाव्या अंगाला खोलवर जखम झाली आहे. तिच्यातून रक्त वाहते आहे. फ्रिलचा छान शर्ट खराब झाला आहे. तो बदलावा. राजवैद्यांकडे जाऊन मलमपट्टी करावी. सेप्टिक होऊ नये म्हणून जरुर ती काळजी घ्यावी. ते गेलं कुणीकडे, तसाच जाऊन बेसमेंटमधल्या तुरुंगात कमलला बांधून चाबकाने फोडत बसतो. सफेद बिल्लीसुद्धा हा प्रकार पाहायला तिथे हजर आहे. चाबकाने कमलचे रक्त निघून त्याच्या चेहर्यावर उडते. पण अंगावर एकही जखम दिसत नाही. हा चमत्कार प्रेक्षकाला दाखवल्यावर अजून फोडाफोडी करण्यात फारसा पॉईंट नाही. राज किरणकडे कमलवर जालीम उपाय आहे. तो रीना रॉयशी लग्न करेपर्यंत कमलला तसेच डांबून ठेवण्याचा निर्णय घेतो. स्टोरीवाईज ही डेवलपमेंट चांगली नाही कारण असे हिरोला मुख्य कथाप्रवाहातून बाजूला काढणे इज नेव्हर अ गुड आयडिया. पण या सिनेमात इतके हिरो आहेत की बहुधा नाईलाजाने असे करावे लागले आहे. एनीवे कमल हसनने रीनाच्या नादी लागून स्वतःचा पोपट करून घेतला आहे.
याचा फायदा घेऊन पटकथालेखक दुसर्या लव्हस्टोरीवर फोकस वळवतो. धरम पाजी आपल्या कबिल्यातल्या (कबिला/कम्युनिटी/व्हॉटेव्हर अप्लाईज) एका तंबूत जातात. हा तंबू आहे आशालताचा. आशालताही बहुधा अर्धी जिप्सी अर्धी राजपूत आहे. या सिनेमात सगळेच राजपूत आणि जिप्सी यांचे कॉम्बिनेशन आहेत. अपवाद केवळ तीन - राकु, योगिता बाली आणि रझा मुराद. आशालता आहे रंजिताची आई. पाजी आधी जाऊन तिला भ्वॉ करतो (शब्दशः, नॉट जोकिंग) आणि एका पेटीतून हार काढून तिला देतात. आशालताही लाजून विचारते - मेरे लिए? प्रेक्षकही दोन क्षण - हे काय चाललंय? - मोडमध्ये जातो. धर्मेंद्र मग क्लिअर करतो - तुझी मुलगी रंजिता, माझा भाऊ शाम सिंग. दोघांची जोडी जुळू शकते. इस हाथ से हार ले, उस हाथ से होकार दे. या पॉईंटला काहीही घडत असल्याने आशालतादेखील परस्पर "शाम सिंगसे कह दे आज से सपना उसकी हुई" अशी संमती देते. बराच वेळ गाणे झाले नसल्याने एक गाणे सुरु होते.
गाणे आहे - एक लफ्ज मोहोब्बत है, जो कहने से डरता हूं. ए मेरी जिंदगी मैं तुमसे प्यार करता हूं. शाम सिंग बिनमहत्त्वाचा हिरो असल्याने तो शब्बीरकुमारच्या आवाजात गातो. प्रत्येक हिरोईनच्या काँट्रॅक्टमध्ये "एक गाणे आशाजींच्या आवाजात मिळेल" असा क्लॉज असावा. त्यामुळे रंजिता आशा भोसलेंच्या आवाजात गाते. सिनेमातील इतर गाण्यांप्रमाणेच, कल्याणजी-आनंदजींनी चाल गुणगुण्याजोगी दिली आहे. म्युझिक डिपार्टमेंटने ओव्हरऑल तक्रारीला वाव दिलेला नाही. नॅचरली लक्ष डान्स आणि टेकिंगवर वळवावे लागते. रंजिता मंदाकिनीछाप पांढरी साडी आणि डोक्यात मोराचे पीस घालून आहे. शाम सिंगकडे एकच जोड कपडा असल्याने तो त्याच कपड्यांत आहे. कुठल्याशा जंगलातील नदीत यांचा डान्स सुरु होतो. हे दोघे नाचत असताना त्यांच्यावर पाणी उडवायला सोळा बॅकग्राऊंड डान्सर्स ठेवल्या आहेत. त्यातली एक भलतीच एक्साईटेड आहे. त्यामुळे रंजिताच्या वाटची कंबरही तीच हलवते. राजीव आनंद आणि रंजिता काहीतरी मुळमुळीत डान्स करतात. त्याच्यावर लिहिण्यासारखे काही नाही.
पुढच्या कडव्यात हे लोक धबधब्याच्या काठावर नाचायला जातात. हा धबधबा साफ खोटा आहे. इतके कोरडे काठ असलेला धबधबा? जे बाल्यावस्थेतल्या नदीच्या भूरुपांच्या काठांवर शेवाळ साचते ते यांच्या डोक्यात साचल्याचा परिणाम! धबधब्यात घसरून न पडल्याने, ते कपडे बदलून जंगलात नाचायला जातात. राजीव आनंद-रंजिता जोडी नाचणार मान्य! पण मग तिच्या सख्यांना एक-एक जोडीदार द्यायला हरकत नव्हती. पण राज कोहलीला "काळाच्या पुढचा संदेश दिला" असा क्लेम ठोकायचा असल्याने त्या सोळाजणी एकमेकींसोबत नाचतात. मग पाऊस होतो हे ओलेत्याने नाचतात. त्याच वर्षी आलेल्या सुपरहिट तोहफामधून डोक्यावरून साड्या नेणे ही स्टेप कॉपी करण्याचा फेल प्रयत्न केला जातो.
एव्हाना प्रेक्षकाच्या डोक्यात काहीतरी गडबड असल्याची घंटा वाजू लागली आहेच. रंजिताला आवडतो सुनील दत्त. मग ही राजीव आनंदसोबत कशी? आणि लग्गेच राजीव आनंद स्वप्नातून जागा होतो. त्याला दिसते की गाण्यावर रंजिता सुनील दत्तसोबत नाचत आहे. मग ते दोघे बागडत निघून जातात आणि राजीव आनंदचाही मोठ्ठा पोपट झाल्याचे स्पष्ट होते.
निम्मा सिनेमा संपला पण दुष्टचक्र अजूनही संपलेले नाही. दोन हिरोंच्या आयुष्यात संकटे आलेली आहेत. आता बघायचे की सुनील दत्त आणि धरम पाजींच्या नशीबात काय संकटे लिहिली आहेत?
मस्त! एवढे वाचूनच दम लागला
मस्त! एवढे वाचूनच दम लागला तुम्ही कसा बघितला असेल हा चित्रपट? तुमच्या सहनशक्तीची कमाल आहे !!
1952 की कितीतरी साली वैजयंती, पद्मिनी, जेमिनी गणेशन, प्राण यांचा याच नावाचा चित्रपट आला होता. >> चित्रपट नाही बघितला पण त्यातली पद्मिनी आणि वैजयंतीची नृत्य जुगलबंदी खूप गाजली होती. त्यात दोघीत सरस कोण यावर बरेच वादही झाले होते.
अगदी शेवट पर्यंत उत्सुकता
अगदी शेवट पर्यंत उत्सुकता ताणून धरणारा चित्रपट दिसतो!
कास्टींग किती गंडलेलं असावं.....!!! सुनील दत्त काय.... आणि राजकुमार, कमल हासन, राज किरण, अजित, प्राण, धर्मेंद्र- हेमा, रीना रॉय, सारीका....कुणाचा कुणाला मेळ नाही, वयांचा संबंध नाही, केमिस्ट्रीचा तर नाहीच नाही..........!!
असतील नसतील तेव्हढे हिरो हिरॉइन्स कोंबून भरलेल्या दिसतात.......कुणाचे ना कुणाचे नाव पाहून तरी प्रेक्षक येतील या हिशेबाने.......
Happy अगदी शेवट पर्यंत
Happy अगदी शेवट पर्यंत उत्सुकता ताणून धरणारा चित्रपट दिसतो! >> उत्सुकता ताणून धरणारा लेख नक्कीच आहे.
थिएटर मध्ये चालायचे का हे सिनेमे ?
कास्टींग किती गंडलेलं असावं..
कास्टींग किती गंडलेलं असावं.....!!! सुनील दत्त काय.... आणि राजकुमार, कमल हासन, राज किरण, अजित, प्राण, धर्मेंद्र- हेमा, रीना रॉय, सारीका....कुणाचा कुणाला मेळ नाही, वयांचा संबंध नाही, केमिस्ट्रीचा तर नाहीच नाही..........!!
धर्मेंद्र- हेमा,???
कमल हासन, सारीका????
फायनली हा पिक्चर बघायला घेतला
फायनली हा पिक्चर बघायला घेतला...पायस तुमच्या सहनशक्तीचे, निरिक्शणशक्तीचे कौतुक करावे ते कमीच. असे हिरे आमच्या भेटीस आणल्याबद्दल धन्यवाद!
हा पिक्चर खराच असा पळवत पळवत
हा पिक्चर खराच असा पळवत पळवत बनवलाय का? आणि किती ते लोक भरलेत..
त्यातली एक भलतीच एक्साईटेड
त्यातली एक भलतीच एक्साईटेड आहे. त्यामुळे रंजिताच्या वाटची कंबरही तीच हलवते. }}}}}} हे वाचून हहपुवा झाली.
गाण्यांचंही अगदी चित्रदर्शी वर्णन करता तुम्ही....।
खरे तर लहानपणी हा सिनेमा
खरे तर लहानपणी हा सिनेमा बघितला असेल. राजे लोकांचे सिनेमा मला आवडतात. त्यामुळे आवडला पण असेल
थिएटर मध्ये चालायचे का हे
थिएटर मध्ये चालायचे का हे सिनेमे ? >> हा १९८४ चा ब्लॉकबस्टर हिट आहे.
वयांचा संबंध नाही >> धर्मेंद्र-आशालता सीन या अँगलने आणखीन डेंजर आहे. धर्मेंद्र आशालतापेक्षा पाच का सहा वर्षांनी मोठा आहे, आणि त्यांचे सिनेमातले रोल......
७) रक्ताचा डाग
७.१) मौत का टीला
शाम सिंगला आपला पोपट झालेला सहन होत नाही. रंजितासाठी आणलेला हार जंगलातच फेकून तो कबिल्यात परत जातो. तिकडे धरम पाजींनी कामगिरी फत्तेचा निरोप प्राण आणि उर्मिला भटपर्यंत पोहोचवला आहे. त्यामुळे हे लोक राजीव आनंद आणि रंजिता दोघेही अनुपस्थित असूनही परस्पर साखरपुडा उरकतात. प्राण तर चक्क सफारी सूटच्या कापडाचे कपडे घाऊन फिरतो आहे. अशा आनंदाच्या वेळी मिठाचा खडा पडलाच पाहिजे. कोणी एक टकला येऊन सांगतो की शाम सिंग मौत के टीले के तरफ गया हैं. पाजींच्या काळजात धस्स होते. ते लगेच शाम सिंगला परावृत करायला धाव घेतात.
या टील्याच्या रस्त्यात नदी पडते. नदीकाठी एका खडकामुळे आडोसा निर्माण झाला असून, युवतींच्या आंघोळीसाठी ते एक उपयुक्त ठिकाण आहे. तिथे सारिका आपल्या मैत्रिणींसोबत स्नानास आली आहे. यांच्या सततच्या आंघोळींमुळे असेल किंवा आणिकही काही कारण असेल पण पाणी अतिशय मातट आणि गढूळ दिसते आहे. राज किरण निळ्या रंगाचा शर्ट घालून घोड्यावरून चाललेला असतो. बाकी काही असो, सिनेमात याचे शर्ट एकदम झकास आहेत. याच्या नावाने मात्र "युवराज मौत के टीले के तरफ गये हैं" अशी बोंब कोणी मारलेली नाही. मग त्या टकल्याने शाम सिंग मौत के टीले के तरफ गया हैं कसं काय ओळखलं कोणास ठाऊक? असो, राज किरण सारिकाने आपली केलेली फजिती विसरलेला नाही. तो घोडा नदीपात्रात घालतो. सारिका एव्हाना रॉयल फॅमिली अॅसेलंट म्हणून एस्टॅब्लिश झाल्याने ती केसातली पिन काढून याच्या गळ्यात खुपसू बघते. पण राज किरण सावध असल्याने तिचा प्रयत्न फसतो. मग झटापट होते पण व्हिलनचे आद्य कर्तव्य पार पाडण्याआधीच सारिका राज किरणच्या नाजूक ठिकाणी लत्ताप्रहार करते. आपला सख्त लौंडा काही झाले नाही अशा आविर्भावात उभा आहे पण सबको मालूम सारिकाभोवतीची पकड ढिली का झाली.
तर मौत का टीला. मौत का टीला म्हणजे नदी काठचा एक मोठा खडक आहे जिथून उडी घेतल्यावर फार फार तर शाम सिंग आपले हात पाय मोडून घेईल. रंजिताशी लग्न तर लांबच, याच्या उपचारांचा भुर्दंड प्राणच्या खिशाला बसून पाजींना नाहक बोलणी बसण्याचा संभव अधिक. अशा मौत का टीलावरून हा उडी घेणार एवढ्यात याला सारिकाच्या सख्यांच्या "बचाओ बचाओ" च्या हाका ऐकू येतात. एवीतेवी आपण मरणार आहोतच तर एका ललनेस वाचवून मरावे, या उदात्त विचाराने तो आत्महत्येचा प्लॅन कॅन्सल करून सारिकाला वाचवायला निघतो. सगळे लोक दोनेक मैल धावतात आणि एकदाचे एकमेकांसमोर येतात. शाम सिंग राज किरणला आव्हान देतो. शाम सिंगला देव जाणे कोणी तलवार शिकवली आहे पण तो राकु-शिष्य सुनीलपुढे टिकू शकला नव्हता. तर राज किरणचे फारीनचे शिक्षण राकु-शिष्य कमल हसनला टक्कर देण्यास समर्थ आहे. म्हणजे राज किरण याची खांडोळी करणार हे नक्की.
७.२) शाम सिंगचा मृत्यु
तसेच होते. शाम सिंग आपल्या परीने बरी लढत देतो पण राज किरण सेक्टमसेम्प्रा वापरल्याप्रमाणे त्याचे शरीर जखमांनी भरून टाकतो. एवढा डीले पाजींना स्क्रीनवर प्रकटण्यास पुरेसा आहे. आपल्या भावाचा असा अंत झालेला पाहून त्यांचा राग अनावर होतो. इथून पळ काढणे श्रेयस्कर, हे कळत असल्याने राज किरण घोड्यावर स्वार होतो. पण पाजी त्याच्या घोड्याला असा काही धक्का देतात की घोडा राज किरणसकट पडतो. हा धक्का अॅक्चुअली विश्वसनीय आहे. मला तर वाटते की जे कोण स्टंटवाले या शॉटमध्ये असतील, शॉटनंतर त्या घोड्याने नक्की त्यांना बुकल बुकल बुकलले असेल. पाजींना तलवार चालवता येत नसली तरी ते मल्लयुद्धात प्रवीण आहेत. राज किरण त्यांचे वार पचवून हुशारीने हातातून पडलेली तलवार शोधतो आणि पारडे फिरते.
शाम सिंग अजून मेलेला नाही. तो या लढाईत व्यत्यय आणतो. धरमपाजींना अजूनही तलवार चालवता येत नसल्याने त्यांचा पराभव निश्चित आहे. त्यामुळे शाम सिंग सर्व शक्तिनिशी पाजींना अडवून धरतो. राज किरणलाही इतर कामे असल्यामुळे तो म्हणतो की तलवार शिक आणि मग ये माझ्याशी लढायला. त्याचाही मूड गेला असावा. कारण ज्या सारिकापायी हे रामायण घडले, तो तिच्याकडे ढुंकूनही न बघता निघून जातो. आता परत लक्ष शाम सिंगकडे वळते. शाम सिंगमध्ये अजूनही पाजींना अडवण्याइतपत जोर आहे म्हणजे याला वाचवण्याचा प्रयत्न करायला काही हरकत नाही. अॅटलीस्ट टेकिंगमध्ये राज किरणचा एकही वार याच्या रक्तवाहिन्या चिरणारा दिसत नाही. सारिकाचा तळही इथून जवळच असावा. तिकडचा लोकल वैद्य मलमपट्टी करू शकतो. पण पाजींना हे सर्व करण्याऐवजी हार्ट अॅटॅक देण्यात जास्त रस आहे. ते म्हणतात अरे तुझं लग्न रंजिताशी ठरलं. दुखरी नस पुन्हा वर आल्याने शाम सिंग अजूनच मरणासन्न होतो. तो एवढंच बोलू शकतो की रंजिताचं त्याच्यावर प्रेम नाही आणि गचकतो. ही एक पिव्होटल मोमेंट आहे. याने धरम पाजींच्या आयुष्यात संकट आले आहे, त्यांना तलवार चालवायला शिकण्याचे मोटिव्हेशन मिळाले आहे, पर्यायाने त्यांना राकुकडे जावे लागेल आणि धरम पाजी व प्राण-राज किरणमध्ये आता थेट कॉन्फ्लिक्ट निर्माण झाला आहे.
७.३) बॅकग्राऊंडची मजा
पाजी आपल्या भावाच्या मृत्युने वेडे होते. शब्दशः वेडे!! ते प्रतिज्ञा करतात की जोवर राज किरणला मारून ते शाम सिंगचा बदला घेत नाहीत, तोवर त्याच्या रक्ताने माखलेला आपला बनियनसदृश सदरा ते बदलणार नाहीत. सारिकादेखील ही प्रतिज्ञा ऐकून पाजींकडे भयचकित नजरेने बघते. मग ते शाम सिंगचे प्रेत घेऊन आपल्या कबिल्यात परत जातात. इथे एक धमाल मिनी जेम आहे. धर्मेंद्र प्राणला हाक मारतो "बाहर आईये". या पॉईंटला कॅमेरात आशालता, उर्मिला भट (दोघी खुर्चीत बसलेल्या) आणि त्यांच्या मागे बायकांचा जथ्था! बाहर आईये पूर्ण होताच या बायका मागून पुढे, सावलीतून बाहेर उजेडात धावत धावत येतात. यांची तारांबळ अशक्य विनोदी आहे. एक बाई तर खुर्चीतून उठत असलेल्या आशालताला चक्क ढकलून देते. आणि पुढच्या रांगेत डावीकडच्या गोरटेल्या एक्स्ट्राचे "अरे बापरे, याला गळा काढायला काय झाले" छाप एक्सप्रेशन तर न चुकवण्यासारखे!
असो, आय डायग्रेस. शाम सिंगचे प्रेत बघून रंजिता किंचाळते. तिची किंचाळी ऐकून इतका वेळ स्वस्थ बसलेल्या उर्मिला भटला प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येते आणि ती आशालतासकट त्या सगळ्या बायकांना ढकलून आवाजाच्या दिशेने जाते (ती आंधळी आहे). बिचारी आशालता. तिच्या चेहर्यावर "जो येतो तो मला ढकलून जातो" असे भाव. एवढे सगळे झाल्यानंतर प्राण एकदाचा बाहेर येतो. हा सगळा शोक सोहळा याच्या कबिल्याच्या मधोमध एक गरुडाचा पुतळा आहे, त्याभोवतीच्या चबुतर्यावर चालला आहे. या लोकांची काय अपेक्षा आहे की गरुडाखाली ठेवल्याने शाम सिंग फिनिक्सप्रमाणे परत जिवंत होऊन बसेल? प्राण भावनावेगात तलवार उपसतो आणि म्हणतो तू फक्त नाव सांग रे, तू फक्त नाव सांग! मग नुसती मजा बघ. धर्मेंद्राला ही मजा क्षणभंगुर असल्याचे ठाऊक आहे. त्यामुळे तो टोमणा स्वरात सांगतो की तुमच्या लाडक्या युवराजाने शाम सिंगची हत्या केली आहे. इथे कन्सिस्टन्सीचे मार्क दिले पाहिजेत. धर्मेंद्र अजूनही त्याच रक्ताळलेल्या शर्टात आहे. हां, आता त्या रक्ताने छानपैकी रोशार्क टेस्टमधल्या फुलपाखरासदृश डाग पाडला आहे, पण डाग आहे. प्राणची दोलायमान मनोवस्था दाखवण्याकरिता शेकी कॅमचा एक डायरेक्शन शॉट! प्राणची तलवार बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असल्याने परत म्यानेत जाते.
७.४) कुणाचं काय तर कुणाचं काय
धरम पाजींकडे मोरल हायग्राऊंड असल्याने टोमणे सत्र सुरु होते. प्राणच्या मते राज किरण त्याचा थोरला मुलगा असल्याने (खरेतर तो अजितचा मुलगा आहे) प्राण काही राज किरणला मारू शकत नाही. एक (सपोज्ड) मुलगा खुनी, दुसरा टोमणेबहाद्दर ज्याला तलवारही चालवता येत नाही आणि तिसरा मृत. त्याचे बापाचे हृदय पिळवटून निघते. पण रंजिता आणि इतर कबिलेवाल्यांची न्यायाची संकल्पना वेगळी असल्याने ते पाजींच्या साईडने उभे राहतात. प्राण म्हणतो तुम्ही बंड पुकारता आहात? रंजिता म्हणते हे बंड नाही, हा उठाव आहे - ये बगावत नही, इन्किलाब हैं. प्राण म्हणतो की थोडा विचार करा. खून कोणाचा झाला? माझ्या मुलाचा. कोणी केला? माझ्या बहिणीच्या (राजमाता, मानलेली बहिण) मुलाने. बदला घ्यायचा पहिला हक्क कुणाचा? माझा. आता तुमचं काय म्हणणं आहे, मी इतक्या वर्षांच्या राख्या विसरून जाऊन भाच्याला मारून येऊ? हे राजपूतांच्या परंपरेस कलंकित नाही करणार? इथे प्राणची डायलॉग डिलीव्हरी इतकी सॉलिड आहे की मुरब्बी प्रेक्षकालाही या लॉजिकमधला फोलपणा लक्षात यायला पाच सेकंद जावे लागतात.
प्राणचे भाषण ऐकून सगळे मान खाली घालतात. या सिनेमाचे मॉब ज्याने कोणी मॅनेज केलेत त्याला आणि राज कोहलीला दंडवत घातला पाहिजे. शाम सिंगची लाश बघायला आलेल्या मॉबमध्ये पाच ते सात वर्षांची मुले लाशपासून इतक्या जवळ उभी असतील का? आणि त्या बिचार्यांना इतक्या सिन्सिअरली मान खाली घालून उभं केलं आहे की ज्याचं नाव ते. हा भेकडपणा पाहून पाजी उखडतात. ते आपल्या प्रतिज्ञेचा - जोवर राज किरणला मारत नाही तोवर शाम सिंगच्या रक्ताने भिजलेला शर्ट बदलणार नाही - पुनरुच्चार करतात. प्राणच्या पोटात हे ऐकून गोळा येतो. इतके दिवस न धुतलेला शर्ट? सॉरी, आपलं, युवराजांच्या (जो की प्राणच्या मते त्याचा मुलगा आहे, प्रत्यक्षात जो अजितचा मुलगा आहे) जीवाला धोका? प्राण म्हणतो की असं करू नको, नाईलाजाने मला तुझ्या विरोधात उभं ठाकावं लागेल. पण पाजी एक नाही अन् दोन नाही. प्राणला ढकलून ते निघून जातात. या पॉईंटला पुन्हा बॅकग्राऊंडचा मॉब बघण्यासारखा आहे. एक डोक्यावरून पदर घेतलेली बाई नळावरची भांडणं पाहावं तसा हा वाद बघते आहे. एक पांढर्या शर्टातला डिसप्रपोर्शनेट ढेरीवाला स्टॅच्यू दिल्यासारखा उभा आहे. बाकीच्या लोकांच्या चेहर्यावर "कोण पडणार रे? प्राण की धर्मेंद्र?" अशी जेन्युईन क्युरिओसिटी दिसते आहे.
७.५) एंट्रन्स टेस्ट
पाजींच्या आयुष्यात संकट आलेले आहे. पण ते अगदीच काही मूर्ख नाहीत. तलवार येत नसल्यामुळे आपला राज किरणसमोर निभाव लागणार नाही हे त्यांना ठाऊक आहे. त्यांच्याकडे एकच ऑप्शन आहे. राकुचा क्लास लावणे. त्यानुसार ते जातात राकुच्या गुहेत. राकुसुद्धा कमी नाहे. तो त्यांना गुहेच्या दारात तसाच उभा करून ठेवतो. इतक्या दिवसांत शाम सिंगच्या रक्ताचा डाग आता वेगळ्या आकाराचा दिसू लागला आहे. योगिता बाली अखेर वैतागते. दोन दिवसांपासून तो गलिच्छ शर्ट घातलेला युवक आपल्या दारात उभा आहे, राकु त्याला ना अॅडमिशन देतो आहे ना हाकलून देतो आहे. हिने बिचारीने सहन तरी काय काय आणि किती करायचं?! राकु म्हणतो की तसं नाही गं राणी, पण हा शत्रु आहे की मित्र हे कळायला नको? या आधी आपण सुनील दत्तला (स्वत:ला अजितचा मुलगा समजतो, प्रत्यक्षात प्राणचा मुलगा आहे) अशीच अॅडमिशन दिली आणि तो निघाला अजितचा मुलगा! नवरा-बायकोची ही वादावादी राकुचे सगळे विद्यार्थी प्रॅक्टिस थांबवून ऐकतात. तसेच त्या गुहेत राकुने दानपेटीचे पैसे मिळावेत म्हणून महिषासुरमर्दिनीचे मंदिर उघडलेले दिसते. कारण एक बाई या सगळ्याकडे साफ दुर्लक्ष करून मनोभावे देवदर्शन घेताना दिसते आहे.
राकुचा युक्तिवाद ऐकून धर्मेंद्र पुढे सरसावतो. तो म्हणतो की मी चांगला आहे हो. राकु म्हणतो कशावरून? नशीब धर्मेंद्र इथे देवीपुढचा नारळ उचलून एवढ्याशा खोबर्याच्या तुकड्यावरून म्हणत नाही. आता जॅक्सन पोलॉकच्या पेंटिंगसारखा दिसणारा शाम सिंगच्या रक्ताचा डाग दाखवून तो म्हणतो की हे बघा. बघा माझ्या भावाचे वाळलेले रक्त! रक्त वाळले असेल पण मनाची जखम अजून ताजी आहे. मला बदला घ्यायचा आहे. अन्यायाचा, माझ्या भावाचा. मग भले तुम्ही मला तलवार शिकवा वा नका शिकवू. यावर राकु त्याला वरपासून खालपर्यंत न्याहळतो आणि एकच वाक्य अतिशय ताकदीने टाकतो - नौजवान, ये तो खुदकशी होगी (भाऊंची स्टाईल बघा फक्त!)
धर्मेंद्र बोलण्याच्या ओघात सांगतो की त्याला राज किरणला मारायचे आहे. तोतया युवराज टार्गेट आहे कळताच राकुचा अॅटिट्यूड बदलतो. पण राकु अंटार्क्टिकातलं फूड पॅकेज आहे, इतक्या लवकर डिफ्रॉस्ट होणार नाही. तो म्हणतो आधी एंट्रन्स टेस्ट द्यावी लागेल. याची गुहा नक्की कोटा शहरात आहे. योगिता बाली याची एंट्रन्स टेस्ट घेऊन येते. एक भली मोठी तलवार आहे. तिच्या पात्यावरून धर्मेंद्राने चालायचं. जर या टोकापासून त्या टोकापर्यंत जमिनीला पाय न लावता चालला तर पास. याचा आणि तलवार चालवण्याचा काय संबंध आहे? धर्मेंद्राचे पाय जायबंदी करून राकुचा काय फायदा होणार आहे? एक तर मुश्किलीने याला राज किरणविरुद्ध पर्सनल अजेंडा असलेला शिष्य मिळाला आहे. त्याला डोक्यावर घ्यायचं सोडून त्याचे पाय चिरले जात आहेत. आपल्या नवर्याचा बिनडोकपणा बघून योगिता दोन आसवे ढाळते. एकदाचा धर्मेंद्र एंट्रन्स टेस्ट पास करतो आणि आनंदातिशयाने राकु धर्मेंद्राला उचलतो.
आता राहिला फक्त सुनील दत्त. याच्यामागे कोणते दुष्टचक्र लागणार आहे ते पुढच्या भागात.
आशालताने बहुतेक तुमचा रिव्हू
आशालताने बहुतेक तुमचा रिव्हू वाचला असावा... (ह.घ्या.). तिला श्रद्धांजली.
ह ह पु वा जबरदस्त लिहीले आहे.
ह ह पु वा जबरदस्त लिहीले आहे.
इतके दिवस न धुतलेला शर्ट? >>
येवू द्या पुढला भाग!
येवू द्या पुढला भाग!
वरती आशालता यांचा उल्लेख आला
वरती आशालता यांचा उल्लेख आला आहे म्हणून. आजच या ज्येष्ठ अभिनेत्रीचे कोविडने निधन झाले
आशालता यांना भावपूर्ण
आशालता यांना भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
८) आयडेंटिटी क्रायसिस
८.१) काट्याने काटा
प्राणसारख्या ज्येष्ठ सरदाराच्या मुलाची हत्या लपून थोडीच राहते? ही बातमी जाते राजमातेच्या कानावर. राजमातेच्या मते राज किरण प्राणचा मुलगा आहे (प्रत्यक्षात तो अजितचा मुलगा आहे). तिचा समज होतो की राज किरणच्या हातून आपल्याच भावाचा खून झाला. ती राज किरणला जाब विचारायला जाते तेव्हा राज किरण आपल्या पाळीव बिबळ्याला खाऊ घालत आहे. राज किरणला याचे काही सोयरेसुतक नसल्याचे पाहून ती भावनेच्या भरात सत्य - राज किरण प्राणचा मुलगा - सांगू बघते. जे खरे तर असत्यच आहे कारण तो अजितचा मुलगा आहे. प्राण वेळेत प्रकटून अनर्थ टाळतो. तो म्हणतो की झालं गेलं गंगेला मिळालं, घडला प्रकार विसरून जा. विश्वासु चाकर असणे एक बाब आहे पण कूलनेस आणि विश्वासुपणाच्या नावाखाली असा भंपकपणा करण्याचे काही प्रयोजन नाही.
एनीवे, प्राणने हे सगळं कूलली घेतलं असलं तरी धर्मेंद्राने राज किरणला मारण्याची प्रतिज्ञा केली आहे. मदन पुरी येऊन याची प्राणला आठवण करून देतो. प्राण म्हणतो की आधी त्याला हल्ला करू देत, मग बघू. युवराजांच्या केसालाही धक्का लागणार नाही याचा जिम्मा माझ्याकडे. पण राज किरण अजितचा मुलगा आहे आणि अजित हुशार व्हिलन आहे. अजित विचार करतो की प्राणने कितीही वल्गना केल्या तरी धर्मेंद्ररुपी धोक्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एक चूक व सर्व योजना आणि पोटचा मुलगा, दोन्ही खलास! यावर धर्मेंद्राचा कायमस्वरुपी बंदोबस्त हाच एक उपाय! अजितला हेही ठाऊक आहे की सुनील दत्त, जो स्वतःला आपला मुलगा समजतो, प्रत्यक्षात प्राणचा मुलगा व धर्मेंद्राचा मोठा भाऊ आहे. तसेच सुनीलला अजितची मर्जी संपादन करण्यात इंटरेस्ट आहे. तरी काट्याने काटा काढावा. मग तो धर्मेंद्राचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सुनीलवर सोपवतो. तो सुनीलला सांगतो की तू जर धर्मेंद्राला जिंदा या मुर्दा पकडलं तर आपण सगळे वफादार आणि तू राजपूत सिद्ध होशील. सुनील ओके म्हणून कामगिरीवर निघतो. मदन पुरी अजितच्या प्लॅनची प्रशंसा करतो आणि अजितमधला लॉयन एका डायलॉगपुरता जागा होतो.
इकडे राकु धरमपाजींना स्पेशल ट्रेनिंग देत आहे. तलवार चालवण्याकरिता बाहुंमधले स्नायु बळकट हवेत. यासाठी रस्सीखेचचा डाव लावला जातो आणि दोरीला रुमालाऐवजी पाजींना बांधतात. पाजी दोन्ही साईडला ओढून फेकून देतात. स्नायु पुरेसे शक्तिशाली बनवल्यावर मग सुनील दत्तवाला शॉट रिपीट होतो. धर्मेंद्र एकटाच सर्वांना हरवतो. म्हणजे पाजी आणि सुनील दत्त आता तुल्यबळ तलवारबाज आहेत. यांची फाईट लावता येऊ शकते.
८.२) राजकुमारी-बंजारा मॅटरः बाँड्स डीपन
या सर्व गडबडीत कमलकडे काहीसे दुर्लक्ष झाल्याने कथेची गाडी तिकडे वळवली आहे. हा अजूनही राज किरणच्या कैदखान्यात कैद आहे. याचा राकुने पाठपुरावा केला नाही हे अनाकलनीय आहे. ही कैद काही फारशी जाचक दिसत नाही. कमलला दोन वेळचे व्यवस्थित जेवण मिळत असावे असे दिसते. रीनाला याला कधीही भेटण्याची मुभा असावी कारण ती ये जा करते आहे. याला त्या रात्रीनंतर परत टॉर्चर केलेले दिसत नाही. एकंदरीत ती कोठडी वगळता तक्रार करायला जागा नाही. रीना रॉय येऊन म्हणते की मला तुझा विरह आता सहन होत नाही. मला पन तू पायजे. दोघे एकमेकांच्या बाहुपाशात विसावतात. इथे कंटिन्युटीचे मातेरे केले आहे. कमल जेव्हा राजमातेला भेटायला जातो तेव्हा त्याच्या दोन्ही कानात चापाची कुंडले आहेत. तो जेव्हा पकडला जातो आणि राज किरण त्याला चाबकाने फोडतो तेव्हा त्याची दोन्ही कुंडले गायब आहेत. असे समजू की कैद करताना याची आभूषणे जप्त केली. पण मग आता याच्या फक्त उजव्या कानात चापाचे कुंडल कुठून आले?
पण हे विसरता कामा नये की राज किरण हा दर्जेदार व्हिलन आहे. रीना रॉयने ज्या पहारेकर्याला लक्ष ठेवायला सांगितले होते त्याला ठार करून तो यांच्या कार्यक्रमात व्यत्यय आणतो. इथे त्याचा एक अप्रतिम डायलॉग आहे ज्याचे मराठी भाषांतर असे - मला ठाऊक नव्हतं की जेव्हा राजकुमारीजींना पान खायची इच्छा होते तेव्हा त्या पिकदाणीत तोंड मारायलाही मागे पुढे पाहत नाही. हा तिच्या चॉईसवरच शेरा आहे. तिला नजरकैदेत टाकण्याचे आदेश देऊन तो निघून जातो. राज किरण हिंदी व्हिलन करतात ती प्रथम क्रमांकाची चूक करतो आहे - आपल्या प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणे. कमल हसनकडून राज किरणला कोणतीही माहिती काढून घेण्यात रस नाही. जर रीना लाच देऊन इथपर्यंत येऊ शकते याचा अर्थ पहारा फारसा कडक नाही. अशा वेळी संधी आहे तोवर कमलला ठार करण्यातच राज किरणचे हित आहे. पण तो तसे करत नाही आणि हिरो लोक अखेरीस विजयी होणार आहेत.
८.३) वय लपवण्याची पराकाष्ठा
व्हिलन लोकांच्या पराभवाचे मुख्य कारण मात्र राकुच ठरतो. ते कसे आता पाहुयात. अजितने सुनीलला धर्मेंद्राचा बंदोबस्त करण्याचे काम दिले आहे. पण त्याला या दोघांचा राकुशी असलेला संबंध माहित नाही आणि हेच अज्ञान त्याची इतक्या वर्षांची मेहनत धुळीस मिळवणार आहे. धर्मेंद्र राकुच्या गुहेत राहतो आहे. त्याच्या शर्टावरचे रक्ताचे डाग दिसून किळस येऊ नये म्हणून योगिता बालीने त्याला वरुन घालायला एक जाकीट दिले आहे. अचानक त्याच्या कानावर बायकांचे गॉसिप पडते. राज किरणने शिकारीकरिता राकुच्या ठिकाणापासून जवळच तळ ठोकला आहे. तलवार शिकून फार दिवस झाले नसले तरी पाजींचा आत्मविश्वास जबर! ते तडक राज किरणला मारायला एकटेच बाहेर पडतात.
एका सतरंजीच्या कापडाच्या तंबूची कनात फाडून ते आत घुसतात. हा तळाच्या प्रमुखाचा तंबू असावा. इथे पाजींना कळायला हवे की राज किरणचा फॅशन सेन्स यापेक्षा चांगला आहे. अशी मळखाऊ रंग संगती असलेला तंबू त्याचा असू शकत नाही. षडयंत्राचा वास लागून त्यांनी तंबू बाहेरूनच परतीची वाट धरायला हवी होती. पण पाजी शक्तिशाली हिरो आहे, बुद्धिमान नाही. त्यामुळे ते सुनील दत्तने लावलेल्या सापळ्यात अलगद सापडतात. सुनीलने खोटीच आवई उठवलेली असते जेणेकरून धर्मेंद्र मैदानात यावा आणि सुनीलला त्याला अटक करण्याची संधी मिळावी. या फाईट सीनमध्ये सुनील दत्तकडे बारकाईने बघा. इतका वेळ याला राजमहालात पाहिल्यानंतर जेव्हा परत फाईटिंग करताना दाखवले आहे तेव्हा हे प्रकर्षाने जाणवते की सुनील दत्तसाठी विग आणि खोटी मिशीचे दोन वेगळे सेट तयार केले आहेत - एक फाईट सीन्स साठी आणि एक इतर सीन्स साठी. फाईट सीनचा विग टाईट फिटिंगचा आहे - जेणेकरून तो निघून न यावा - आणि त्याचा भांग मधोमध पडतो. सुनीलचे विरळ होऊ लागलेले केस या विगमध्ये जास्त लवकर लक्षात येते आणि त्याचे वय जास्त दिसते. इतर सीन्समध्ये, खासकरून रंजितासोबतच्या सीनमध्ये, त्याचा विग लूज पण घनदाट केसांचा डावीकडे भांग पाडलेला आहे. यात तो अधिक तरुण दिसतो. मिशीबाबतही असाच काहीसा मामला आहे.
धर्मेंद्रासाठीच्या ट्रिक्स कमी सटल आहेत. याला कारण असे की त्याची हिरोईन हेमा आहे जी रंजितापेक्षा ८ वर्षांनी मोठी आहे. त्यामुळे त्यांच्यातला वयाचा फरक सुनील-रंजितापेक्षा निम्म्याहून कमी आहे. पुन्हा धरम-हेमा जोडी पडद्यावर बघून प्रेक्षक असे नीरस प्रश्न विचारतही नाही. त्याचा प्रॉब्लेम वेगळा आहे. सुनील अधिक मोठा असला तरी त्याचे पोट अजूनही मापात आहे. धर्मेंद्र हेमा सोबतच्या सीन्समध्ये जाड झालेला कळून येतो. एवढा जाड हिरो इतर फिट हिरोंसमोर फाईट करताना दाखवायचा तर त्याचे पोट दिसू देता कामा नये. याकरिता त्याचा विग विस्कटलेल्या केसांचा दाखवून चेहर्याची गोलाई लपवली आहे. जवळपास प्रत्येक सीनमध्ये सहा इंच रुंद पट्टा करकचून आवळला आहे. सर्व प्रोफाईल शॉट्स किंचित आऊट ऑफ फोकस आहेत किंवा काहीतरी अतर्क्य घटना दाखवून लक्ष दुसरीकडे वळवले आहे.
८.४) राजपूत स्त्रिया
परत कथेकडे येऊयात. धरम पाजी म्हणतात की माझे वैर राज किरणशी आहे तुझ्याशी नाही. सो नाईश मीटिंग, प्लीज लीब्व्ह. सुनील दत्त म्हणतो की मला अजितनं सांगितलं आहे की तुला जिवंत किंवा मृत पकडून आण आणि मला अजितला इंप्रेस करायचं आहे. त्यामुळे फाईट तर तुला करावीच लागेल. पाजी चॅलेंज अॅक्सेप्ट करतात. दोघेही राकुशिष्य असल्याने लढत बरोबरीची आहे. पाजी जास्त तरुण असल्याने अधिक चपळ आहेत. ते सुनील दत्तला नि:शस्त्र करण्यात यशस्वी होतात. पण सुनील सिनियर राकुशिष्य आहे. तो आपल्या अनुभवाचे प्रदर्शन करत पाजींचे वार चुकवून एक हॅलबर्ड (परशुसदृश शस्त्र) मिळवतो. मग आधी पाजींना नि:शस्त्र केले जाते. मग तो हॅलबर्डचा वार करतो आणि कट!!
ऑफकोर्स धर्मेंद्र मेलेला नाही. त्यामुळे उगाच सस्पेन्स निर्माण करण्याचा प्रयत्नही केला गेलेला नाही, परिस्थिती लवकरच क्लिअर होते. सुनील राजधानीत परत जाऊन अजितची भेट घेतो. तो एक जाकीट दाखवून म्हणतो की हे धर्मेंद्राचे जाकीट आहे आणि यावरचे रक्ताचे डाग हे सिद्ध करतात की मी धर्मेंद्राला मारले. मी त्याचे शव आणू शकलो नाही याबद्दल मी दिलगीर आहे. अजितही सुनीलवर विश्वास ठेवतो आणि प्रथमच त्याला प्रेमाने वागवून गळाभेट घेतो. खरंतर अजितसारख्या हुशार व्हिलनने हा पुरावा मान्य करता कामा नये. पण हिरो लोकांना शेवटी जिंकवणे भाग असल्याने बिचार्याने ही चूक केली आहे. सुनीलला दोन वेण्या घातलेली हेमा दु:खी झालेली दिसते. त्याच्या मते हेमा त्याची बहिण असल्याने (प्रत्यक्षात ती राज किरणची बहिण आहे) 'हिला काय झाले' हा तपास करणे त्याचे कर्तव्य आहे.
सुनील तिला विचारतो की हुंदके द्यायला काय झालं? ती म्हणते की तू धर्मेंद्राला मारलंस आता मी जगून काय करू? मलाही मारून टाक. सुनील आश्चर्यचकित होतो. तो म्हणतो की तुला धर्मेंद्र आवडतो? मग मला सांगितलं का नाहीस? इतका वेळ राजपूत पुरुष काय करतात हे सांगितले जात असल्याने आता हेमा राजपूत स्त्रिया काय करतात हे सांगते. हेमाच्या म्हणण्यानुसार राजपूत मुली आपले प्रेम एखाद्या हिर्याप्रमाणे हृदयाच्या तिजोरीत बंद करून ठेवतात. या तिजोरीचे कुलुप फक्त मृत्युरुपी हातोडाच तोडू शकतो. अगदी असे गृहीत धरले की या सिनेमातले लोक फारसे प्रोग्रेसिव्ह नाहीत, तरीदेखील धर्मेंद्र प्राणचा मुलगा आहे. त्याचे रेप्युटेशन आता खराब झाले असले तरी राज किरणने शाम सिंगचा गेम करण्यापूर्वीपासून हेमा-धर्मेंद्र प्रेम प्रकरण चालू आहे. अजित व्हिलन असला तरी प्राणसोबत त्याचे वैयक्तिक काही वैर दिसत नाही. जर पूर्वीच धर्मेंद्रने येऊन अजितकडे हेमाला मागणी घातली असती तर अजितने बहुधा होकार दिलाही असता. मग हे प्रेम लपवून ठेवण्यामागे हेमाचा पॉईंट काय? प्रेक्षकासारखा प्रेक्षक सुनीलही हा ब्रेनडेड डायलॉग ऐकून अवाक होतो.
८.५) आणि त्यांचे प्रियकर
ती जीव द्यायला निघते तेव्हा सुनील तिला नाईलाजाने सत्य सांगतो. त्या रात्री यांची फाईट चालू असताना राकु येतो आणि फाईट थांबवतो. कंटिन्युटीच्या विपुल चुका इथे बघावयास मिळू शकतात पण सर्वात खटकणारी बाब म्हणजे फॉईलने लढणारा धर्मेंद्र अचानक सेबर (वेगळ्या प्रकारची तलवार) घेऊन लढतो आहे. राकु म्हणतो की पुरे आता, दोघेही थांबा. सुनील म्हणतो मला अजितला इंप्रेस करायचं आहे. राकु म्हणतो की तसे असेल तर तू मला पकडून घेऊन जा, अजितचा सर्वात मोठा शत्रू मी आहे. दोघांच्याही मनात राकुविषयक आदर असल्याने ते त्याला इग्नोर करून फाईट पुन्हा सुरु करू बघतात. पण राकुकडे यावर रामबाण उपाय आहे. राकु म्हणतो की सुनीलची गुरुदक्षिणा अजून पेंडिंग आहे. त्याच्या बदल्यात तू तसाच परत जा. कपडेवाला प्लॅनही राकुचाच आहे. राकुला खात्री असल्याप्रमाणे अजित उतावीळ होऊन अधिक चौकशी करत नाही. राकुचा दुसरा कयास आहे की अजित सुनीलला मार्गातून बाजूला करण्याचा प्रयत्न करेल. पण ते नंतर.
सत्य ऐकून हेमा आनंदते. ही खरे तर सुवर्णसंधी आहे. परिस्थितीचा फायदा घेऊन हेमा व सुनीलच्या मनातला अजित विरोध वाढवावा, त्याच्या मदतीने कमलला सोडवावे आणि मग अजितने केला तसाच आतून उठाव करावा. पण धरम पाजी भलतेच उतावीळ आहेत. त्याच रात्री अजित, मदन पुरी व राज किरण धर्मेंद्राच्या मृत्युची बातमी सेलिब्रेट करत आहेत. धर्मेंद्र घोड्यावर बसून दालनाची काच फोडून येतो. मान्य आहे की याला आता तलवार चालवता येते पण एकट्याने इतका उघड उघड हल्ला चढवल्यानंतर काय होणार असे वाटते? तो राज किरणपर्यंत पोहोचू शकला हेच त्याचे नशीब म्हणावे लागेल. तरीसुद्धा तो राज किरणवर हावी होऊ लागतो. जर राज किरण एकटा असता तर कदाचित हा आत्मघातकी हल्ला सफल झाला असता. पण सोबत अजितही आहे. अजित धर्मेंद्र योग्य जागी यायची वाट बघतो आणि मग एक कळ दाबतो. याने पाजींच्या पायाखालची फरशी सरकते आणि तो तळघरात आपटतो. बरं आपटतो तो देखील एका काटेरी चक्रावर आणि त्याच्या सर्वांगात खिळे घुसतात. तरी पाजींच्या अंगात जोर बहुत. ते आणिक यत्न करतात आणि फेल जातात. अजित, मदन पुरी आणि राज किरण बुटांनी याचे हात तुडवतात. मग याला मरणासन्न समजून निघून जातात.
त्यांना हे दिसत नाही की हेमा आडोशाला लपून उभी आहे. ती रीनाप्रमाणे पहारेकर्याला लाच देण्याच्या फंदात पडत नाही. खंजीर खुपसून पहारेकर्याला मारून टाकते. बिनकामाचे काही लव्ही डव्ही डायलॉग होतात आणि हेमा म्हणते की आता पुरे. मला गुप्तमार्ग माहित आहे. तू बरा होईपर्यंत तुला मी लपवते. अजितपुढे याहून मोठा प्रॉब्लेम आहे. सुनीलने त्याला धोका दिला म्हणजे तो कोणातरी शत्रुला मिळालेला आहे. तो मदन पुरीला म्हणतो मारून टाक सुनीलला. मदन पुरी म्हणतो ओके. मग रात्री त्याला भोसकण्याचा प्रयत्न होतो पण पांघरुणाखाली सुनीलने लोड तक्के लपवलेले असतात आणि तो वाचतो. यामागे आहे सुलोचना. सुलोचनाकडून सुनीलला समजते की हा आदेश अजितने दिला होता. त्याला कळत नाही की त्याच्या वडलांनी असं का केलं? मग सुलोचना फायनली एक कॉम्प्लिकेशन सॉल्व्ह करते (थँक यू!!). ती सांगते की तू आमचा पोटचा मुलगा नाहीस. इथे हेही क्लिअर होते की सुलोचनाला हे ठाऊक नाही की सुनील प्राणचा मुलगा आहे. ते रहस्य फक्त अजित आणि मदन पुरीलाच माहित आहे. तरीदेखील सुनीलला तो अजितचा मुलगा नाही हे कळले हेही नसे थोडके! ती म्हणते की आत्ता एवढी क्लॅरिटी पुरे! आता पळ. मदन पुरी याच्या शोधात सुलोचनापर्यंतही पोहोचतो पण तोवर सुनील तिथून निसटतो.
सुनीलवरचे संकट अशारीतिने आयडेंटिटी क्रायसिसचे आहे. त्याला हे कळेल की तो नक्की कोणाचा मुलगा आहे? धर्मेंद्र बरा होऊन आपला बदला घेऊ शकेल का? कमल हसनची सुटका कोण करेल? हिरो लोकांवर आता पुरेशी संकटे आली आहेत. व्हिलन लोकांनी चुकाही करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता एक एक करून संकट निवारण करण्याची वेळ झालेली आहे.
खूपच मस्त.
खूपच मस्त.
कायच्या काय कास्टिंग! सुनील दत्त आणि प्राण च्या vayat असा कितीसा फरक असेल ..बाप लेक दाखवायला?
आणि तुमचे observation ग्रेट आहे... चापाचे कुंडल, continuity चे मातेरे, तो पीकदाणी चा डायलॉग, ....
आणि सुलोचना.....? हिला घेणे आवश्यक च होते का? ती अजित ची बायको? अरा रा .....!!
कुणी ही घ्यायची....पण नाही..स्टार कास्ट तगडी पाहीजे यावर निर्माता ठाम दिसतो....
शिवाय राज किरण त्यामानाने बराच तरुण दिसत असेल ना...त्याच्या प्रतिस्पर्ध्यांच्या मानाने? म्हणजे सुनील दत्त, धर्मेंद्र prabhrutin peksha?.....
वाचतानाच दमले
वाचतानाच दमले
येऊ द्या पुढचा भाग!!
ती म्हणते की आत्ता एवढी
ती म्हणते की आत्ता एवढी क्लॅरिटी पुरे! >>>
अजूनही वर वर वाचतोय. पहिली १५-२० मिनीटे फक्त नीट पाहिली आहेत. आता पुढे क्लिप पाहात हे वाचायचे आहे. त्या पहिल्या १५ मिनीटांतच नक्की कोणाचे बाळ कोठे आहे याचा गुंता डोक्यात झाला होता. इथले वर्णन पाहता तो चित्रपटात बराच काळ सुटत नाही असे दिसते.
Pages