धर्मसंकट

Submitted by पराग र. लोणकर on 14 September, 2020 - 00:27

धर्मसंकट

``हे बघ मध्या, तुला माझी सगळीच परिस्थिती माहिती आहे. माझ्या मुली जवळ जवळ तिशीला आलेल्या आहेत रे. पण पैशामुळे त्यांच्या लग्नाचं मला काहीच बघता येत नाहीये. या डिसेंबरला माझी पॉलिसी संपतेय. माझा अपघाती मृत्यू झाला असता तर माझ्या कुटुंबाला एक कोटी रुपये मिळाले असते आणि नैसर्गिक झाला असता तर पन्नास लाख. कोटी जाऊ दे, पन्नास लाखही जाऊ दे. निदान पंचवीस लाख मला मिळवून दे. मला दोन्ही मुलींची लग्न लावून देता येतील रे.`` सुधाकर काकुळतीने मला म्हणत होता.

``अरे सुध्या, मला शक्य असतं तर मी ते केलं असतं रे. पण तुझी पॉलिसी प्युअर टर्म इन्शुरन्स पॉलिसी आहे. घेतानाच मी तुला इतरही पॉलिसी समजावून दिल्या होत्या. त्यातल्या मनी बॅक पॉलिसी सारखी एखादी घेतली असतीस तर रक्कम परतही मिळाली असतील, अगदी बोनस सहित. पण प्युअर टर्म इन्शुरन्सचा हप्ता सगळ्यात कमी म्हणून तू टर्म इन्शुरन्स घेण्याचा आग्रह धरलास. या विम्याच्या मुदतीत policyधारक हयात असेल तर रिटर्न काही मिळत नसतं रे...``

``तुझं म्हणणं बरोबर आहे मध्या, पण त्यावेळी आयुष्यात पुढे माझी चांगली प्रगती होईल अश्या स्वप्नात मी होतो रे. पण दुर्दैवानं तसं काहीच झालं नाही. गेल्या तीस वर्षात परिस्थिती आहे तशीच राहिली. प्लीज काहीतरी मार्ग काढ मध्या...``

``खरंच शक्य नाही रे! अरे... मला शक्य असतं ना, तर मी स्वतः तुला थोडी मदत केली असती. पण माझ्यावरच किती जबाबदाऱ्या आहेत हे तू जाणतोसच...``

आमचं बोलणं चालू असतानाच आम्ही ज्या नदीच्या काठावर बसलो होतो तिथला कॉन्ट्रॅक्टर आमच्या जवळ येऊन उभा राहिला आणि आम्ही शांत झालो.

पुढच्या दिवशी गणपती विसर्जन. त्याची सगळी तयारी तिथे चालू होती. आमच्या इथूनच तो कॉन्ट्रॅक्टर त्याच्या माणसांना ओरडून म्हणाला,

``अरे गण्या, रव्या, तो तिकडचा भाग खूप घसरडा झाला आहे रे... उद्या विसर्जनासाठी धरणाचं पाणीही सोडणारेत बरंच. तेवढ्या त्या भागात बांबू लावून entry बंद करून टाका.``

माणसांना सूचना देऊन कॉन्ट्रॅक्टर तिथून निघून गेला आणि आम्हीही उठलो. सुध्याचा उतरलेला चेहरा मला दिसत होता, त्याच्या मनात विचारांचं काहूर माजल्याचंही समजत होतं, पण माझ्या हातात काहीच करण्यासारखं नव्हतं, अगदी काहीच.

दुसरा दिवस उजाडला. दुपारचे बारा वाजले असतील. मला माझ्या दुसऱ्या एका मित्राचा फोन आला.

``मध्या, खूपच वाईट बातमी आहे. सुध्या सकाळी विसर्जनासाठी घाटावर गेला अन तिथे पाय घसरून नदीच्या जोरदार वाहणाऱ्या पाण्यात वाहूनच गेला. काही वेळातच पलीकडच्या घाटावर त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला. तू आता थेट त्याच्या घरीच ये.``

मी झटकन आवरलं आणि पंधरा मिनिटात सुध्याच्या घरी पोहोचलो. घरामध्ये प्रचंड रडारड चालू होती, जी अपेक्षितच होती. वहिनी म्हणत होत्या,
``अहो गणपती विसर्जन करायला गेले आणि पाय घसरला. आमच्या अगदी समोर वाहून गेले हो... आम्ही त्यांना वाचवण्यासाठी मदतीसाठी खूप आरडाओरडा केला पण पाण्याला एवढा जोर, की कुणाला मदतीसाठी उडीही टाकता आली नाही. गोंधळ ऐकून तिथला एक कॉन्ट्रॅक्टर धावत आला. ज्या ठिकाणाहून `हे` घसरले तिथे काल रात्रीच बांबू बांधले होते म्हणे. मध्यरात्रीनंतर ते बांबू कोणी काढले हेच त्याला कळत नव्हतं. कुणीतरी हा उपदव्याप केला आणि `हे` हकनाक गेले हो...``

मध्यरात्रीनंतर ते बांबू कोणी काढले हे फक्त माझ्या लक्षात आलं होतं. सुध्याचा झालेला मृत्यू जगाच्या दृष्टीने अपघाती होता. या घटनेला अनेक जण साक्षीदार होते.

मी सुध्याचा मित्र होतो आणि विमा एजंटही. सुध्याच्या कुटुंबाला विम्याचे एक कोटी मिळवून देण्याची जबाबदारी आता माझी होती. पण सुध्याची ही आत्महत्या होती याबद्दल माझ्या मनात किंचितही शंका नव्हती. सुध्याच्या policyमध्ये काही कलमं अशी होती की त्यानं आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं असतं तर विम्याची रक्कम मिळायला अवघड होणार होतं, कदाचित कोर्ट खटले करावे लागले असते आणि तरीही क्लेम रिजेक्ट झालं असतं तर विम्याची रक्कम मिळालीही नसती.

ज्या विमा कंपनीसाठी मी गेली तीस वर्षे काम करत होतो त्या विमा कंपनीशी प्रामाणिक राहायचं की सुध्याच्या कुटुंबाची आर्थिक अडचण कायमची दूर करायची या धर्मसंकटात मी सापडलो होतो...

**

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आजकाल इतका सात्विक विचार कोणी करत नाही. आणि जिथे येवढ्या मोठ्या रकमेचा प्रश्न असतो तिथे तर नाहीच...

पण संकल्पना मस्त आहे...