प्रसंग अगदी काल घडलाय असा डोळ्यासमोर आहे...
"बाबू, ई नदिलोनि पवित्र जलालधु स्नानम चेसरा... जलालो मुनीगी रा.." नदीकाठावरच्या आणि पलीकडे गुडघाभर पाण्यात उभ्या आईच्या मातुल कुटुंबातील नातेवाईक मंडळींनी कृष्णेच्या 'पवित्र' पाण्यात मी स्नान करावे, असा एकच घोषा लावला होता. स्नानाला कधीही एका पायावर तयार असणारा मी ठामपणे 'नाही' म्हणत असल्याचे दुर्लभ दृश्य बघून आईच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि हसू एकाच वेळी झळकत होते. अखेर बळेबळेच मला त्या गढूळ पाण्यात ओढण्यात आले आणि कृष्णा नदीतीरी दर बारा वर्षांनी भरणाऱ्या 'कृष्णापुष्करम' उर्फ 'दक्षिण कुंभ' मेळाव्यात आमचे घोडे न्हाले! 'न आवडलेले' असे आयुष्यातील ते दुर्मीळ स्नान. अन्यथा आंघोळ करणे हे माझ्या जीवनातील सर्वाधिक आनंददायक काम होते आणि आहे.
Bath is to body what laughter is to soul असे कोणीतरी म्हटलेच आहे, नसेल म्हटले तर मी म्हणतो. जन्माला आल्यावर सर्वप्रथम नर्सबाई काय करतात, तर नवजात बाळाला आंघोळ घालून स्वच्छ करतात. त्याशिवाय खुद्द आईबाबांना तरी दाखवतात का ते बाळ? जन्मल्याबरोबर जे काम आपल्याला चिकटते तेच 'आवडते' काम असेल, तर मग त्याचा मन प्रफुल्लित करणारा सोहळा होतो. त्याचे सर्व टप्पे फार आनंददायक होतात आणि हे स्नानसोहळे स्मृतींमध्ये अलगद जाऊन बसतात.
आज पाच दशके भूतलावर काढल्यानंतर कुणी आयुष्याच्या सर्वात आनंदी प्रसंगांबद्दल विचारले, तर मला माझा स्नानप्रवास आठवतो. सकाळी शाळेत जाण्याआधी गारेगार पाण्याने केलेले सचैल स्नान, कडाक्याच्या हिवाळ्यात ऊन-ऊन पाण्याने अंग शेकणारे स्नान, सुट्टीच्या दिवशी आईने खसाखसा घासूनपुसून लख्ख करीत घातलेली आंघोळ, बाबांसोबत जलतरण तलावात केलेले स्नान, सणासुदीचे - प्रसंगविशेष स्नान, आजोळी स्वच्छ नदीपात्रात डुंबत केलेले स्नान... एक ना हजारो आनंदक्षण स्नानाशी जोडले गेले आहेत.
घरी आईचा दिवस सर्वात आधी सुरू होई. तिच्या माहेरी फार धार्मिक वातावरण होते, स्नान केल्याशिवाय ती काही खात-पीत नसे. आम्ही भावंडे अर्धवट झोपेत असताना आईचे स्नान आटोपत असे. हळू आवाजात तिचे गायत्री मंत्राचे पठण ऐकू येत असे. मग चहा-दूध तयार झाले की मला पूर्ण जाग येई. शाळा सकाळची, त्यामुळे आवरून आंघोळ करूनच शाळेत जायचे, असा नियम होता. शेजारीपाजारी सर्व मुलांमध्ये आंघोळ करून वेळेत तयार होण्यात माझा नंबर नेहेमी वर असे. घरी हिरव्या रंगाचा 'हमाम' साबण आम्हा भावंडांचा सामायिक होता. हो, तेव्हा प्रत्येकाला वेगळ्या साबणाची चंगळ नव्हती. त्यामुळे कोरडा साबण मिळावा म्हणून मीच पहिला नंबर लावत असे. ८० वर्षांपेक्षा अधिक वय असलेला शुद्ध हिंदुस्तानी 'लोकल' हमाम साबण आजही ३०० कोटी रुपयाचा ब्रँड आहे! आतासारखे 'आयुर्वेदिक', 'नैसर्गिक', ‘इको-फ्रेंडली’ साबणाचे काही खास कौतुक नव्हते. त्या वेळेपासून (१९३१) नीम, तुळस, एलोवेरा अशा नैसर्गिक पदार्थांचा वापर हे हमामचे वैशिट्य टिकून आहे हे खास. आधी टाटा आणि आता हिंदुस्थान युनिलिव्हर बनवतात. आजही महिन्याला काही कोटी हमाम साबण विकले जातात भारतात.
हिवाळ्यात गरम पाण्यासाठी स्टोव्हवर वेगळा हंडा तापत ठेवलेला असे, त्यातले हवे तेवढे गरम पाणी काढून तेवढेच गार पाणी त्या हंड्यात परत उकळण्यासाठी ठेवले जाई. जुन्या आठवणीत हमखास असणारा पाणी तापवण्याचा बंब मात्र आमच्या घरी कधीच वापरात नव्हता. नळाला पाणी ठरावीक वेळी असल्याने आणि शाळेसाठी उशीर होणे लाजिरवाणे समजले जात असल्याने टाइम वॉज ऑलवेज ऍट प्रीमियम... त्यामुळे आंघोळीची खरी मजा रविवारी असे. त्या दिवशी भरपूर पाणी आणि साबण वापरून मनसोक्त आंघोळ करायला कोणाची ना नसे. फक्त त्याआधी 'केस धुणे' हा गंभीर अत्याचार होत असे. केसांसाठी वेगळ्या 'शिकेकाई' साबणाचा प्रवेश आमच्या घरी झाला नव्हता. रोजच्याच साबणाने किंवा कधी तर सर्फसारख्या पावडरींनी आमचे 'मळके, घाण, चिपचिप' केस स्वच्छ केले जात. साबणाचे पाणी हमखास डोळ्यात जात असल्याने हे मला फार त्रासदायक वाटत असे. एकदा हे झाले की हवा तेवढा वेळ पाण्यात खेळायला परवानगी असे. आम्ही भावंडे एकमेकांवर पाणी उडवून, एकमेकांना ढकलून, दंगामस्ती करत रविवारची सकाळ सार्थकी लावत असू. कधीकधी बाबाही आमच्या कंपूत सामील होत आणि आमच्या जलपंचमीला उधाण येत असे.
उन्हाळ्याच्या सुटीत आमच्या मूळ गावी आणि आजोळी विभागून जात असू. दोन्ही ठिकाणची स्नानवैशिष्ट्ये वेगवेगळी होती. आमच्या गावी पाण्याचे दुर्भिक्षच. घरात विहीर नव्हती. गावातल्या दोन विहिरींनाच काय ते पाणी आणि उन्हाळा म्हणजे तिथेही पाणी कमी. आमचा घरगडी लच्छू विहिरीतून हंडे भरून आम्ही घरचे, गडीमाणसे, जनावरे सर्वांसाठीच पाणी आणीत असे. पाणी जपून वापरावे लागे, आंघोळीसाठी काटकसर करावी लागे. तरी त्या घरी स्नान आवडायचे, कारण विहिरीचे थंडगार पाणी आणि 'लाइफबॉय' साबण. गुलाबी रंगाचा, चौकोनी. बाबांच्या लहानपणापासून तोच एकमेव साबण गावात विक्रीला असे. लाइफबॉय आता सुमारे शंभर वर्षे भारतात विकला जात आहे, अगदी मागच्या एका वर्षातच २००० कोटी रुपयांचे लाइफबॉय साबण विकले गेले भारतात! म्हणजे आजही वट असलेला हा खरा सुपरब्रॅंड! पुढे 'लाइफबॉय है जहाँ तंदुरुस्ती है वहाँ' या जिंगलचे मराठी भाषांतर 'लाइफबॉय ज्याचे घरी आरोग्य तेथे वास मारी' असे करून खिदळणे अनेक वर्षे चालले.
* * *
तिकडे आजोळी वेगळीच तर्हा. दररोज पहाटे साधारण ५च्या सुमारास ...
नंदिनी नलिनी सीता मालती च महापगा
विष्णुपदाब्जसंभूता गंगा त्रिपथगामिनी
भागीरथी भोगवती जान्हवी त्रिदशेश्वरी
द्वादशैतानि नामानी यत्र यत्र जलाशये
स्नानोद्यत: स्मरेनित्यं तत्र तत्र वसाम्यहं…….
सर्व जण साखरझोपेत असताना बाहेर आजोबांचे मोठ्या आवाजात स्तोत्रपाठांसह स्नान सुरू असायचे. आता थोड्याच वेळात दिवस उगवणार आणि आपल्याला बिछाना सोडावा लागणार, हे दुष्ट सत्य हळूहळू मनाला स्पर्श करू लागे. बाहेर पेटवलेल्या बंबाच्या धुराचा, गरम पाण्याचा, मैसूर चंदन साबणाचा, अग्निहोत्रात टाकलेल्या अर्धवट पेटलेल्या गोवऱ्यांचा, पूजेसाठी आणवलेल्या ताज्या फुलांचा एक मिश्र दैवी सुवास पसरत असे.
त्यांच्याकडे एक जादुई कुलूपबंद कपाट होते - फक्त साबणांचे! त्यात वेगवेगळ्या ब्रँडचे अनेक साबण हारीने रचलेले असत. लांबचा प्रवास करून जबलपूरला आजोळघरी पोहोचल्यावर ते कपाट उघडून आम्हा भावंडांना प्रत्येकी एकप्रमाणे हवा तो साबण घेता येई, फक्त मैसूर संदल वगळता. मैसूरवर आजोबांचा एकाधिकार होता आणि तो अन्य कोणालाही वापरायला मिळत नसे. त्याचा राग येई.
पुढे अनेक वर्षांनी बंगळुरूला कर्नाटक स्टेट सोप फॅक्टरीत एका कामासाठी गेलो, तेव्हा तेथे मैसूर संदल साबण आणि त्याचे अनेक नवनवीन प्रकार सुंदर वेष्टनात विकायला होते. आजही पूर्वीसारखेच चंदनाचे शुद्ध तेल वापरतात त्यात. मी अधाशासारखे विकत घेतले, स्वतः भरपूर वापरले आणि घरी-दारी-मित्रांना भेट म्हणून दिले. 'छोटा बच्चा' म्हणून मला नाही म्हणतात म्हणजे काय? ते एक सोडले तर भेडाघाट, ग्वारीघाट अशा नर्मदेच्या वेगवेगळ्या घाटांवर स्वच्छ गार पाण्यात तासनतास केलेले स्नान ही आजोळची सर्वोत्तम आठवण.
सौंदर्यतारकांचा म्हणून नावाजलेला 'लक्स' साबण फार प्रसिद्ध होता. मध्यमवयीन-मध्यमवर्गीय स्त्री-पुरुष आधी फारसा वापरत नसत. शेजारपाजारच्या कॉलेजकुमारी-कुमार मात्र तो साबण खास वापरत. त्यांचा हेवा वाटत असे. मी साधारण १० वर्षांचा होतो, तेव्हा केसांसाठी वेगळा साबण दिसू लागला. श्रीमंत नातेवाईक स्त्रिया 'केशनिखार' साबण वापरत. गोदरेज आणि विप्रो ब्रँडचे 'शिकेकाई' साबण आले आणि मग केशनिखार चे कौतुक संपले. शिकेकाई साबण पुरुष मंडळी मात्र वापरत नसत, आम्हा मुलांनासुद्धा केसांसाठी शिकेकाई साबण वापरणे फार 'गर्ली' वाटत असल्यामुळे आम्ही रोजचाच साबण केसांना फासत असू.
मग काही वर्षांनी 'सनसनाती नींबू की ताजगी' देणारा लिरिल, 'सुपर फ्रेश' सिंथॉल आणि नीम की गुणवत्ता लिये 'मार्गो' असे अनेक ब्रँड बाजारात दिसू लागले. टीव्ही रंगीत झाला आणि जाहिरातीत दिसणारी बिकिनीतली सचैल लिरिल कन्या सर्वत्र चर्चेचा विषय झाली. पुढेही अनेक वर्षे लक्सचे 'फिल्मी सितारों का सौंदर्य साबुन' हे स्थान आणि लोकप्रियता कायम राहिली. ९०नंतर विप्रोच्या संतूर साबणाने लक्सच्या इंद्रासनाला बऱ्यापैकी झटके दिले. 'आप की त्वचा से आप की उमर का पता ही नही चलता' हे फार गाजलेले कॅम्पेन. पण तो 'गर्ली' आहे हे माझे मत काही बदलले नाही. आम्हा पुरुष मंडळींसाठी विशेष वेगळे साबण फारसे नव्हते. लाइफबॉय, सिंथॉल आणि ओके याच साबणांना 'पुरुषांसाठी' म्हणून मान्यता होती. पुढे सुपरस्टार शाहरुख खानने 'लक्स'साठी टबबाथ घेत हे बदलण्याचा एक प्रयत्न केला. त्यामुळे लक्स फक्त बायका वापरतात हा समज थोडा कमी झाला.
फेब्रुवारी १९८२ ह्या महिन्यात माझ्या स्नानप्रेमासाठी एक नवे युग अवतरले. आम्ही स्वतःच्या मोठ्या घरात राहायला गेलो. ह्या घरात वेगळे मोठे भिंतभर टाइल्सची सुखद रंगसंगती असलेले कोरे करकरीत स्नानघर होते. पूर्ण बंद होणारा दरवाजा, उत्तम सूर्यप्रकाश आणि मुख्य म्हणजे डोक्यावर भरपूर जलधारांचा 'शॉवर' होता! आजवर स्नान म्हणजे बादलीत किंवा घंगाळात असलेले पाणी अंगावर घ्यायचे असे स्वरूप बदलून जलौघाचे रेशमी तुषार अंगावर झेलत सचैल स्नान करायचे, असा सुखवर्धक बदल झाला. माझे आंघोळीचे तास वाढले. आमचे शहर उन्हाळ्यात प्रचंड तापत असे, पाणीटंचाई मात्र नव्हती. त्यामुळे दिवसातून दोनदा स्नानाचे सुख लुटले जाई. पुढे काही वर्षांनी पाणी तापवायला गीझर आला, गरम पाण्याचा हिवाळी स्नानसोहळा जास्तच लांबल्यामुळे पूर्ण स्नानघरात वाफेचे धुके पसरत असे. त्यातून बाहेर पडताना आपण ढगातून बाहेर पडून जमिनीवर पाय ठेवत आहोत असा फील येत असे.
१९८०पासूनच शाम्पूच्या बाटल्या आमच्या शहरातल्या दुकानांत दिसू लागल्या होत्या. हे महागडे प्रकरण आपल्यासाठी नाही असे सर्वच मध्यमवर्गीय लोक समजत, त्यामुळे ते काही आमच्या घरी आणले गेले नाही. शाम्पू प्रकरणात खरी क्रांती 'Chik' नामक शाम्पूच्या सॅशे पॅकने घडवली. १ रुपया अशी माफक किंमत, तीव्र सुगंध, भरपूर फेस असे सर्व काही त्यात होते. बहुतेक १९८३ साल असावे. हे झाले आणि मग मात्र वेगवेगळ्या सर्वच ब्रॅण्ड्सचे शाम्पू असे सॅशेमध्ये मिळू लागले, जास्त आवाक्यात आले. २-५ वर्षांतच ते स्नानाचा अविभाज्य भाग बनले. आज तर देशातील एकूण शाम्पूविक्रीपैकी ७५% विक्री फक्त 'सॅशे पॅक'ची असते.
माझ्या स्नानसोहळ्यातही शाम्पूचे कौतुक वाढतेच राहिले. साधारण १० वर्षांनी त्याचा धाकटा भाऊ 'कंडिशनर' बाजारात आला. कंडिशनरचा जन्म मात्र पुरुषांच्या गरजेपोटी झाला आहे, 'ब्रिलियंटाइन' ह्या दाढी-मिश्या चमकदार करणाऱ्या उत्पादनाचे दुसरे रूप म्हणजे कंडिशनर. काही ब्रॅंड्सनी आधी शाम्पूसोबत कंडिशनर मोफत वाटले आणि पुढे त्याची सवय कधी लागली ते समजलेच नाही.
* * *
१९९४पासून नोकरीधंद्याला सुरुवात झाली, शहर बदलले. सर्व साबण, शाम्पू स्वतःच्या आवडीचे घेता येऊ लागले. याच वेळी लिक्विड सोपचे पेव फुटले. एकापेक्षा एक सरस सुगंध असलेले हे द्रवरूपी नावीन्य, त्याचा फेसच फेस आणि त्यासाठी वेगळे 'लूफा' असा जामानिमा. एकदम राजेशाही. मुंबईतील अनेक छोट्या घरात राहिलो. इथे जागा कमी आणि बाथरूम तर मी जेमतेम उभा राहून ओला होऊ शकेन एवढीच जागा असलेले. बाहेर घाम आणि प्रदूषण भरपूर, त्यामुळे दिवसातून दोनदा स्नान हा शिरस्ता कायम राहिला, तरी स्नानसुखात व्यत्यय मात्र आला.
तोवर खास पुरुषांसाठी म्हणून साबण आणि स्नानप्रावरणे भारतीय बाजारात दिसू लागली होती, त्यांचा लाभ घेण्याएवढी ऐपत आली होती. 'एक्स्ट्राव्हॅगंटली मेल' अशी खास टॅग लाइन असलेला 'आरामस्क' साबण दिल्लीच्या दिवान वाधवा ग्रूपने आणला. तो आम्हा तरुण मुलांमध्ये फारच लोकप्रिय झाला. वेगळा, थोडा तीव्र सुवास आणि वेगळाच आकार, साबणाच्या वडीवर एक डौलदार A अक्षर कोरलेली पट्टी असे ते आकर्षक प्रॉडक्ट होते. नीश की काय म्हणतात तसे. तो अनेक वर्षे मी वापरला. पुढे क्रेझ ओसरली आणि तो ब्रँड विस्मृतीत गेला. एका मराठी मुलीने ब्रँड रिव्हायव्हल शीर्षकाखाली ह्या साबणावर शोधप्रबंध सादर केला, इतकी त्याची लोकप्रियता. जुन्या गाण्यांचे जसे रिमेक बाजारात येते, तसे काही खास ब्रॅंड्सचे व्हायला पाहिजे.
दिवाळीचा सण आणि 'मोती' साबणाने स्नान हे अद्वैत तर वर्षानुवर्षे उपभोगतोच आहे. तो सुवास आणि दिवाळी एकमेकांना पर्यायवाची जणू. मोती साबण आणि दिवाळी निदान महाराष्ट्रात तरी एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत.
पितृत्व लाभले, तेव्हा स्नानप्रेमामुळेच नवजात बाळाला आंघोळ घालायची जबाबदारी सहज स्वीकारली आणि पार पाडली. जसजसे वय वाढत गेले, तसतसे साबण आणि आइसक्रीमच्या जाहिराती सारख्याच होत गेल्या - मलाई, बदाम, फळांचे रस दोहोंत असल्याचे कानीकपाळी सांगण्यात येऊ लागले. साबणातून 'नैसर्गिक' सुगंध हळूहळू कमी होत गेला आणि साबण 'दिसायला' सुंदर होऊ लागले. आता 'खादी'सारखी दर्जेदार (आणि महाग) उत्पादने सोडली, तर 'खरे' सुवास दुष्प्राप्य झाले आहेत.
पुढे कामानिमित्त देशभर-जगभर प्रवास करता आला. आलिशान-गेलिशान सर्वच प्रकारच्या गेस्ट हाउस, लॉज, तारांकित-बिनतारांकित अशा हॉटेलातून राहण्याचे प्रसंग वाढले. जणू एक नवीन स्नान-दालन पुढ्यात आले. तेव्हा आणि आताही रूमचा ताबा मिळाला की सर्वात आधी तेथील बाथरूमचे निरीक्षण-परीक्षण करणे आणि तिथले शॉवर-तोट्या उघडबंद करण्याचे विशेष तंत्र समजून घेणे हे प्रचंड आवडीचे काम आहे. त्यामुळे नंतर होणारी फजिती होत नाही हा मोठा फायदा. त्यातही प्रचंड वैविध्य असते हे कळले. उंची हॉटेलातून स्नानागारांच्या रचनेवर भरपूर मेहनत घेतलेली दिसून येई, स्वच्छतेचा, सौंदर्याचा आणि स्नानानुभव समृद्ध करण्यासाठी लागणाऱ्या वातावरण निर्मितीवर भर दिलेला असे. स्नानाचा आनंद शतगुणित होत गेला.
वेगवेगळ्या शहरात मुक्कामात बाथ टब, बाथ सॉल्ट, बाथ बॉम्ब्स आणि बबल बाथ यासारखे नखरेल प्रकारही पुरेपूर अनुभवले. Wash away your troubles with some bubbles हे ध्येयवाक्य ठेवून स्टीम बाथ, सौना बाथ, व्हिटॅमिन फिल्टर लावलेले शॉवर, पाठीच्या कण्याला सुखद मसाज देणारे प्रेशर शॉवर, जाकुझी असे शरीराचे चोचले करण्यात मागे राहिलो नाही. अत्याधुनिक स्नानगृहांमुळे काहीदा फजितीही झाली. जपानी हॉटेल्समधली स्पेस कॅप्सुलसारखी अरुंद स्नानगृहे आणि माझे सहाफुटी धूड हे व्यस्त प्रमाण सहन न झाल्यामुळे त्यात असलेल्या असंख्य तोट्या-बटणे-रिमोट-अलार्म यांनी वात आणला होता. स्वीडन आणि जपान दोन्हीकडे पारंपरिक बाथहाउसचा अनुभव घ्यायला म्हणून गेलो असता तिथल्या 'दिगंबर ओन्ली' अटीमुळे काही क्षण अवघडलो होतोच.
सिंगापूरच्या मरीना बे सँडच्या सर्वोच्च मजल्यावर माझ्या छोट्या पिल्लाला सोबत घेऊन खिदळत केलेलं जाकुझी स्नान, गोव्यात थोड्या अप्रसिद्ध शांत समुद्रकिनाऱ्यावरचे रात्रीच्या चांदण्यातले स्नान, भोपाळला ३०० वर्षे जुन्या कादिमी हम्माम मध्ये केलेला नवाबी गुसल, धबधब्याखाली केलेली तुषारस्नाने, मे महिन्याच्या प्रचंड उकाड्यात पटियाला-अमृतसर मार्गावरील अनोळखी गावातल्या एक निर्जन ट्यूबवेलवर मनसोक्त केलेले स्नान, कडाक्याच्या थंडीत मित्रांच्या पैजेखातर तिस्ता नदीच्या उथळ पात्रात केलेले, ब्रह्मपुत्रेच्या घनगंभीर पाण्याकाठी घाबरत केलेले, सोरटी सोमनाथला समुद्राच्या प्रचंड खारट पाण्यात केलेले, उज्जयिनीत क्षिप्रा 'नदी' म्हटल्या जाणाऱ्या ओघळात जेमतेम पाय बुडवून केलेले, पुष्करच्या ब्रह्मसरोवरात भल्यापहाटे केलेले, मालदीवच्या रिसॉर्टमध्ये खाली काचेतून समुद्र आणि वर मोकळे आकाश दिसणाऱ्या राजेशाही स्नानागारात केलेले.. अशा एक ना अनेक स्नानस्मृती माझ्या मनाला आजही भिजवून काढतात. Life is a long bath, the more you stay, the more wrinkled you get हे पुरेपूर पटलंय.
स्नानमाहात्म्यात एक अध्याय टॉवेलचाही आहे. सुती पांढरा पंचा, मग थोडे बरके कोइम्बतूरच्या 'मोती' ब्रँडचे जाडसर टॉवेल, मग सुखसंवर्धक टर्किश टॉवेल, मग खास बांबूच्या/केळीच्या तंतूंपासून बनवलेले अतिमुलायम टॉवेल्स, जुन्या सिनेमातील व्हिलन मंडळी वापरीत तसले स्टायलिश बाथरोब असे सर्व चोचले पुरवायला मिळाले. तो प्रवासही आनंददायक ठरलाय.
* * *
सर्वच स्नानप्रवास आनंदी झाला असेही नाही. प्रयाग-वाराणसीला भेटी घडल्या, पण गंगास्नानाचे आलेले योग बरेचदा पाण्याच्या अस्वच्छतेमुळे नाकारले आहेत - डोक्यावर पाण्याचे शिंतोडे घेऊन प्रतीक-स्नान करून वेळ मारून नेली आहे. गंगेच्या कुशीत स्वच्छ नितळ पाण्यात स्नान करायला मिळाले, तोही प्रसंग अगदी कालच घडल्यासारखा वाटतो.
….. कुरु कृपया भवसागरपारम् ...... तीर्थपुरोहित जुळे भाऊ पंडित सुदीक्षित सुभिक्षित मंत्रपठण करीत आहेत. त्यांच्या कानात हिऱ्यांच्या कुड्या चमचमत आहेत. मावळतीचा सूर्य, नोव्हेंबर महिन्याची कडाक्याची थंडी आणि गंगेच्या स्वच्छ बर्फगार पाण्याचा तीव्र प्रवाह, त्यात भिजत उभा मी. मनाची भावविभोर अवस्था. त्यांचा आवाज टिपेला पोहोचतो ...
तव चेन्मातः स्रोतःस्नातः
पुनरपि जठरे सोऽपि न जातः
नरकनिवारिणि जाह्नवि गंगे
कलुषविनाशिनि महिमोत्तुङ्गे …..
सुदीक्षित मृदू आवाजात म्हणतात, "अनिंद्यजी, माताजी को अंतिम प्रणाम कीजिये, अस्थियों को अब गंगार्पण कीजिये..." आणि त्या एका क्षणातच आईचा हात नेहमीसाठी सुटल्याचे आलेले भान... हरिद्वारचे एकमेव गंगास्नानही कधीच न विसरता येण्यासारखे.
* * * समाप्त * * *
इतरत्र पूर्वप्रकाशित. काही चित्रे जालावरून साभार.
@ जाई.
@ जाई.
@ अतरंगी
@ चीकू
@ देवकी
@ Buki
@ वर्णिता
@ सामो
लेख आवडल्याचे आवर्जून सांगितलेत, आभारी आहे.
@ कुमार१,
@ कुमार१,
साबणाविना स्नान ही कल्पना पचायला कठीण जाते आहे. अर्थात साबणाचा अविष्कार नसेल झाला तेंव्हा लोक नुसत्याच पाण्याने शरीर धूत असावेत हे लॉजिक बरोबरच आहे. आताच्या अधिक प्रदूषण अधिक घाम असलेल्या जगात बिनसाबणाच्या स्नानाने शरीर पुरेसे स्वच्छ / निर्जंतुक / दुर्गंधीमुक्त होत असेल का ?
... ‘अंघोळ’ हा मूळ शब्द (अंग + होळणें =धुणे) ... ही व्युत्पत्ती नव्हती माहित, आभार.
@ अभ्या...
@ अभ्या...
व्हिजिल ! सनी गावस्कर शेविंग ब्लेड साठी (सासुरवाडीचे - हाऊस ऑफ मल्होत्रा), कपिल देव पामोलिव्ह शेविंग क्रीम ( पामोलिव्ह दा जवाब नही) साठी आणि वेंगसरकर व्हिजिल साबणासाठी असे थ्री मस्केटीयर्स होते ते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गोदरेज नंबर २ चा किस्सा भारी आहे. शिवाय पारदर्शी पियर्स, निको, विवेल, डव्ह, डेटॉल... सगळ्या साबणाचे गुणविशेष तुम्ही मस्त सांगितले आहेत.
थँक्यू !
@ जिज्ञासा,
@ जिज्ञासा,
परदेशातून साबण मागविणे ... हे मी सुद्धा केलयं. मला झेस्ट नामक ब्रॅण्डचे साबण फार आवडत असत. त्यासाठी मी चुलत भावाच्या घरमालकाशी संधान बांधले होते, तो मला हवे तेव्हढे आणून देत असे
सुंदर प्रतिसादाबद्दल आभार.
@ प्राचीन,
@ मीरा..
तुमच्या आणि डॉक्टर कुमारांमुळे 'साबणाविना स्नान' ह्या नवीनच विषयावर चर्चा झाली. मला ते 'फराळाविना दिवाळी' किंवा 'रंगाविना रंगपंचमी' सारखे का वाटते आहे काय माहित
प्रतिसादाबद्दल अनेक आभार.
@ सई केसकर,
@ सई केसकर,
थँक्यू.
साध्या निर्जीव साबणाच्या गंधानी तुम्हाला 'ओळखीचं कुणीतरी इथे आहे' असा भास झाला हे अगदी रिलेट करू शकलो. अनोळखी जागी एकटं वाटत असतांना परिचित सुगंध, स्वर, भाषा ह्यांची साथ खूप मोलाची वाटते.
पर्ट प्लसची कॉपी ? असू शकेल. ह्याबाबतीत जागतिक देवाण-घेवाण खूप होते.
@ विक्रमसिंह,
.... आई, बाबांच्या हाताचे स्पर्श आठवले..... Are we long lost twins ?
विचित्र वाटेल पण मला बहुतेक लोक त्यांच्या स्पर्शासकट (किंवा स्पर्शामुळेच) आठवणीत राहतात. अगदी १० सेकंदाचा हॅन्डशेक सुस्पष्ट आठवतो
@ भरत.,
'खादी' ब्रॅंडप्रेमी क्लबमध्ये स्वागत आहे
त्यांच्या साबणांचे सुगंध खास भारतीय पॅलेटचे असतात, खूप आवडतात.
तुम्हां तिघांच्या प्रतिसादांमुळे फार आनंद झाला, म्हणून हा आभाराचा मोठा 'प्रति-प्रतिसाद'![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वर सई केसकरांनी फॅब इंडियाचा
वर सई केसकरांनी फॅब इंडियाचा "ऑरेंज-नेरोली" विदेशात नेलाय...
अनेक वर्षांनी घरात एकही आवडता साबण शिल्लक न राहिल्यामुळे आज माझ्याकडेही आला हा ऑरेंज- नेरोली
आज पुन्हा हा लेख वाचला आणि
आज पुन्हा हा लेख वाचला आणि लक्षात आलं की पूर्वी वाचला असून प्रतिक्रिय कशी काय द्यायची राहिली!
आमच्या लहानपणी लाईफबॉय मरून रंगाची दगडी वडी मिळायची. एकदा बाबांनी ती वडी आणली. पण संपता संपेना. मग तेच वैतागले आणि उरलेल्या वडीने त्यांनी आमचं फरसबंदी करून चकच्कीत केलेलं अंगण धुवून काढलं होतं!
हमाम, चंद्रिका हिरवा आणि चंदनाचा, मग एकांनी घरगुती साबण करायला सुरूवात केल्यावर अजून एक चंदनाचा साबण असे बरेच प्रकार वपरले. आता फक्त मैसूर चंदन.
शेवट वाचून तेव्हाही डोळे भरून आले होते आणि आजही __/\__
मस्त आणि खिळवून ठेवणारे लिखाण
मस्त आणि खिळवून ठेवणारे लिखाण. यातले बरेचसे साबण अजिबात माहीत नाहीत. मे बी मी तुमच्या पुढच्या पिढीतील असल्याने असेल.
मला बादलीच्या अंघोळीपेक्षा पेक्षा शॉवर खूप जास्त आवडतो. गरम पाणी येणारा शॉवर म्हणजे तर सुखच. बादली ने अंघोळ करायची तर बादली, मग, बादलीत पाणी खूप गरम असेल तर विसन भरण करायला अजून एक रिकामी बादली, गिझर नसतानाच्या काळात दोन बादल्या पाण्याने (लांब) केस धुवायचे असतील तर एक बादली पाणी घेऊन आईला पातेल्यात अजून एक पाणी गरम करायला आणि आधीचे पाणी संपल्यावर द्यायला लागणे, बसायला स्टूल (मला बाथरूमच्या फरशीवर बसून अंघोळ करायला घाण वाटते), साबणकेस, शॅम्पूची बाटली, कंडिशनरची बाटली, शॅम्पू चा सॅशे असेल तर कापायला कात्री इतका जामानिमा करण्यात अंघोळ करण्याचा उत्साह जायचा. शिवाय कपडे काढल्यावर यातलं काहीही घ्यायचं राहीलं की बाहेरच्या लोकांना एकेक मागत बसायचं या सगळ्यात दीडेक तास जायचा. त्यापेक्षा गरम पाण्याचा शॉवर म्हणजे मज्जानू लाईफ.
तुमच्या पिल्लाला जॉन्सन बेबी लावला नाही का? त्याचा उल्लेख नाही लेखात. जॉन्सन बेबीचा वास खूप वेगळ्या विश्वात नेतो अनेकांना. मेंदू त्याला नुकत्याच छान अंघोळ झालेल्या तान्ह्या बाळाशी रिलेट करतो म्हणून.
लेख वाचून पुन्हा एकदा अंघोळ करावी म्हणून पावले न्हाणीघराकडे वळायला लागली. आणि शेवट वाचून गालांना डोळ्यातल्या पाण्याने अंघोळ झाली कळलंच नाही
आईला तिच्या लहानपणी परिस्थितीमुळे साबण वगैरे ची चैन करता आली नाही कधी. त्यामुळे आमच्या लहानपणी आम्ही नाव घेऊ तो साबण घरी यायचा. तो महाग आहे की स्वस्त.. खरंच वर्थ आहे की उगीच हाईप केलेला आहे हे प्रश्न आईने कधीच आमच्यापर्यंत येऊ दिले नाहीत.
खूप रडवलंत अनिंद्य..
तरीही लिहीत राहा..
शुभेच्छा !!!
ता.क. तुम्ही आणि परदेसाई एकच का? त्यांच्याहीकडे हा लच्छू आंघोळीचे पाणी काढून द्यायला यायचा म्हणून विचारलं.
@ प्रज्ञा९,
@ प्रज्ञा९,
.... अंगण धुवून काढलं होतं!.....
दगडी फरशी धुवायला लाईफबॉयचा दगड
धमाल.
मैसूरप्रेमी क्लबमध्ये स्वागत, तो साबण राजस सुकुमार होता आणि आहे. मैसूरच्या फेसाचा स्पर्श वेगळा आणि तलम-मुलायम आहे.
सुंदर प्रतिसादाबद्दल आभार !
@ प्रज्ञा९,
@ प्रज्ञा९,
.... अंगण धुवून काढलं होतं!.....
दगडी फरशी धुवायला लाईफबॉयचा दगड
धमाल.
मैसूरप्रेमी क्लबमध्ये स्वागत, तो साबण राजस सुकुमार होता आणि आहे. मैसूरच्या फेसाचा स्पर्श वेगळा आणि तलम-मुलायम आहे.
सुंदर प्रतिसादाबद्दल आभार !
@ पियू ,
@ पियू ,
... खूप रडवलंत अनिंद्य..
त्याबद्दल माफी द्या. हा लेख स्मरणरंजन विशेषांकासाठी एकटाकी लिहिला होता, त्यामुळे आठवणींचा धबधबा थांबवता आला नाही. आईचा सहवास फारच कमी मिळाल्याचे दुःख टोकदार आहे अजून....असो. भूपाळी तिथे भैरवी.
मस्त.
मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बर्याच आठवणी जाग्या झाल्या. शिकेकाई साबण आल्यावर त्या एका साप्ताहिक छळातून सुटल्याचं जे हायसं वाटलं होतं त्याला तोड नाही!
दिवाळीला 'मोती'साबणच वापरायचा असा बहुतेक कायदाच आहे आपल्याकडे अशी माझी समजूत होती.
मला स्वतःला अजूनही मैसूर सॅन्डलच आवडतो!
तो नसेल तर शक्यतो फुलांचे सुवास असतील असे माइल्ड साबण आवडतात.
इथे बरेच - विशेषतः लहान मुलांसाठीचे - साबण/शॅम्पू फळांच्या वासाचे असतात. मला अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही तो प्रकार!
खूप सुंदर लेख आहे.
खूप सुंदर लेख आहे.
मुलांसाठीचे - साबण/शॅम्पू फळांच्या वासाचे असतात.>>>+chocolate अजिबात आवडत नाही तो प्रकार!>>>+१
@ स्वाती_आंबोळे,
@ स्वाती_आंबोळे,
…. दिवाळीला 'मोती'साबणच वापरायचा असा बहुतेक कायदाच आहे अशी माझी समजूत होती….
महाराष्ट्रात तरी अजूनही दिवाळी = मोती हे समीकरण आहे. आता खूप पर्याय आहेत पण मोतीशिवाय सणाचा फीलच येत नाही
सुंदर प्रतिसादाबद्दल आभार.
@ sonalisl
@ sonalisl
@ स्वाती_आंबोळे,
…फळांच्या वासाचे साबण…
मलाही तो गोड गोड वास आवडत नाही.
आणि चॉकलेट? Out of all things ?
अरे दुष्टांनो, साबण बनवत आहात की आइसक्रीम ?
लिरील प्रथम आला तेव्हा
लिरील प्रथम आला तेव्हा अभियांत्रिकीचे परीक्षेचे दिवस होते. आणि संध्याकाळी
लिरील ने चेहरा धुतल्यावर त्या गंधाने सारा ताण दूर होई. अतिशय ताजेतवाने वाटे. ही आठवण कायमची त्या गंधाशी निगडित झाली आहे.
लिरिलची जिंगल- सनसनती नीबू की
लिरिलची जिंगल-सनसनाती नीबू की ताजगी… तो तीव्र गंध आणि ती बिकिनीधारी ला रा ला ला गर्ल. The product had many firsts to its credit
…ता.क. तुम्ही आणि परदेसाई एकच
…ता.क. तुम्ही आणि परदेसाई एकच का? …
नाही हो, माझा हा एकच आयडी आहे माबो मिपा दोन्ही कडे.
लच्छू हे लक्ष्मणाचे लघुरुप असावे बहुतेक. त्याचे पाणी भरणे हा योगायोग.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिथे लक्ष्मी पाणी भरते ती घरे वेगळी असतात
छान लेख, आवडला.
छान लेख, आवडला.
माझे आवडते स्नान म्हणजे हिवाळ्याची सुरवात होतेय पण अजून गरम पाणी वापरणं सुरू नाही केलंय. थंड पाण्याने शहारुन शॉवर खालून बाजुला होतणे आणि परत शॉवर खाली येणे असे दोन तीनदा. मग गार पाण्यात स्नान. मग शॉवर बंद झाल्यावर टॉवेल ने कोरडे होई पर्यंत कुडकुडणे.
तसेच अतिथंड ठिकाणी गारठले असताना गरम पाण्याखाली अंग शेकणे.
अजून एक प्रकार अनुभवला वॉटर जेट चा मसाज. त्यातही गरम आणि गार पाणी आलटून पालटून. १५ फूट लांबून प्रेशर जेटने करतात.
..... अतिथंड ठिकाणी गरम
..... अतिथंड ठिकाणी गरम पाण्याखाली अंग शेकणे....
+१
आणि कडक उन्हाळा असतांना नदी-विहिरीच्या थंडगार पाण्यात डुंबणे ! सुखसौख्यपरमावधी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप खूप आवडला लेख..
खूप खूप आवडला लेख.. नॉस्टॅलजीक करून गेला.. शेवट मात्र चटका लावणारा!
आमच्या बाबांचा आवडता साबण ' मार्गो'. स्किन इन्फेक्शन होत नाही, कमी घासला जातो, त्यामुळे जास्त टिकतो अशी त्यांची कारणे. नंतर मैसूर सॅन्डल सोप, चंद्रिका हे ही आवडले. (पावडर अन स्नो मध्ये, त्या काळी 'अफगाण स्नो', इमामी स्नो, खाकी पुड्यातली गुलाबीसर पावडर, क्यूटीक्यूरा पावडर, सिंथॉल पावडर अस काहीबाही बाबा आणायचे)
मार्गोचा तो कडूलिंबाचा वास आवडायचा नाही खर तर! काकांच्या मुली मस्त लिरील, रेक्सॉना, लक्स वापरायच्या!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
एका दिवाळीत मुंबईला मामाकडे गेल्यावर त्याने मोतीऐवजी ' Camy' साबण आणलेला.. फॉरेनचा साबण आहे हे सांगून..! खूप छान सुगंध होता. हा साबण बाजारात दिसलाच नाही.
दिवाळीत मोती होताच! कधीतरी पियर्स आणून चैन केलेली! पुण्यात आल्यावर 'जय', फेअरग्लो' ,'गोदरेज नं १' हे माईल्ड वासाचे साबण आवडले. डव्ह अन पियर्स फारच गुळगुळीत साबण... तो काढायलाच पाणी फार लागते! वर म्हटलंय , तस जॉन्सन बेबी सोपचा वास फारच सुंदर, लहान बाळाच्या जावळासारखा सॉफ्ट!
आमच्या काही मैत्रिणी स्वतःसाठी म्हणून तो साबण वापरायच्या., माईल्ड असतो म्हणून.
गावी मामाकडे मात्र जुना लाल लाइफबॉय. केस धुवायला निरमा. आता आठवून कसेसेच वाटते. पण मामीचे केस तरीही दाट, लांबसडक, सुळसुळीत होते! आई कायम आमचे केस रिठ्याने धुवायची, नुसत्या शिकेकाईने तेल निघत नाही म्हणून आमची नाराजी असायची!
नंतर आम्हाला हॅलो शॅम्पू , अंड्याचा म्हणून आवडायला लागला. क्लिनिक प्लस वै वापरले पण अगदी जाहिरातीत दाखवतात तसे सुळसुळीत , शायनिंग केस होत नाही हे लवकरच समजलं! मध्ये 'सिल्केशा' शॅम्पू वापरायला सुरुवात केली! पतंजली शॅम्पू कधी सूट झाला नाही... केसात कोंडा व्हायचा फार.
आता ४-५ वर्षांपासून ब्लॅक सिंथॉल अन डव्ह शॅम्पूवर येऊन स्थिरावलोय.
स्नानाबद्दल सांगायचं झालं तर, पूर्वी अंघोळीचा फार कंटाळा होता. धुळ्यासारख्या उष्ण अन कमी पाण्याच्या प्रदेशात पाण्याचा जपून वापर. जळगावला शिकायला गेल्यावर मात्र, तिथल्या कडक उन्हाळ्यात ,होस्टेलवर.. बाहेरून आलं की 2-3 दा स्नान मस्ट असायचं!
सर्वात आवडलेलं स्नान म्हणजे नारेश्वर येथील नर्मदा माईमध्ये केलेलं स्नान! अगदी उथळ, तरीही पात्र मोठं असलेली, पारदर्शक नितळ अन अंगाला मुलायम लागणारे पाणी! दिवसा तर छानच पण भर जानेवारीच्या हुडहुडी भरणाऱ्या थंडीत पहाटे अंधारात ब्राम्ह मुहूर्तावर 'तिच्या' उबदार पाण्यात केलेलं स्नान.. तो माईचा स्पर्श.. सगळ्याच आठवणी दाटून आल्या या लेखाच्या निमित्ताने!
@ मी_आर्या
@ मी_आर्या
तुमचा स्नानप्रवासही छान.
डव्ह अन पियर्स फारच गुळगुळीत साबण... तो काढायलाच पाणी फार लागते ....
बरोबर, आणि 'स्वच्छ' झाल्याचे फीलिंग काही येत नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<<आणि 'स्वच्छ' झाल्याचे
<<आणि 'स्वच्छ' झाल्याचे फीलिंग काही येत नाही Happy<< अगदी अगदी
त्वचेवर एक मॉइस्चरायझिंग लेयर
त्वचेवर एक मॉइस्चरायझिंग लेयर सोडतात ते. ती तशीच राहू द्यायची असते. ड्राय स्किन असल्याने हिवाळ्यात दोन महिने पियर्स वापरतो.
@ मी_आर्या,
@ मी_आर्या,
नर्मदेच्या पाण्यातले स्नान म्हणजे जणू लहान बाळ होऊन परत आईच्या मांडीवर बसण्याचा अनुभव देणारे.
याबाबतीत मी फार भाग्यवान ठरलो आहे. जन्मानंतरचे प्रथम स्नानच नर्मदेच्या पाण्याने घालण्यात आले आणि पुढे अनेक वर्षे भरपूर वेळा नर्मदास्नानाचे योग येतच राहिले.
कृतान्त दूत काल भूत भीति हारि वर्मदे
त्वदीय पादपंकजम नमामि देवी नर्मदे
_/\_
छान लेख. काहीतरी इतर देशांब
छान लेख. काहीतरी इतर देशांब द्द ल असेल म्हणून वाचला नाही. आज ह्यावर लंच टाइम निघाला. मी साब् णातील सुगंधांवरच काम कर्ते त्यामुळे मला असा एक साबण शांपू प्रेमी लेख लिह्यायचा होता. हे पर्सनल केअर व हेअर केअर क्याटेगरी आहेत.
पीअर्स function at() { [native code] } अगदी युनिक फ्रेग्रन्स. माझा फेवरिट पीअर्स व डव्ह. आणि शांपू सध्या लोरिआल. पण ग्रीन अॅपल छान वाटतो सुवास.
पूर्वी एक कॅमे नावाचा सोप यायचा तो ही सुरेख होता.
मैसूर सँडल हमाम, लाइफ बॉय तर आयकॉनिक सोप्स.
' Camy' साबण आणलेला.. फॉरेनचा
.......' Camy' साबण आणलेला.. फॉरेनचा साबण आहे हे सांगून..! बाजारात दिसलाच नाही....
.... पूर्वी एक कॅमे नावाचा सोप यायचा तो ही सुरेख होता.....
आहे आहे, CAMAY अजून आहे. ऑनलाईन मागवू शकता तुम्ही आजही.
त्याची टॅगलाईनच 'इंटरनॅशनल सोप' अशी होती, म्हणून 'फॉरेनचा' म्हटलेले चालावे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<<नर्मदेच्या पाण्यातले स्नान
<<नर्मदेच्या पाण्यातले स्नान म्हणजे जणू लहान बाळ होऊन परत आईच्या मांडीवर बसण्याचा अनुभव देणारे.<< काय सुंदर सांगून गेलात.. खरोखर आईच्या मांडीवर खेळल्यासारखं वाटत
<<त्याची टॅगलाईनच 'इंटरनॅशनल सोप' अशी होती, म्हणून 'फॉरेनचा' म्हटलेले चालावे << करेक्ट, हाच तो!
तेव्हा 35 की 50/- ला आणलेला मामाने! अन 10 रु चा साबण वापरणारे आम्ही.. काय अप्रूप वाटलेलं!
मी आर्या, छान लिहिलंत. मी पण
मी आर्या, छान लिहिलंत. मी पण धुळ्याची, त्यामुळे हे पाणी टंचाई अगदीच रिलेट होते. सुदैवाने पुण्यात आल्यानंतर फारसं पाण्याची कमतरता जाणवली नाही( touch wood
) आणि त्यामुळे घराची स्वच्छता करायला आणि त्यानंतर स्वत:ची छानपैकी आंघोळ करायला नेहमीच छान वाटते.
लहानपणी आमच्याकडे लाईफबॉय, कधीतरी लक्स आणि दिवाळीला मोती ठरलेला असायचा. मोती शिवाय दिवाळीचं फिलिंग यायचंच नाही. मैसूर सॅंडल तर आजही आवडतो. तोच आहे आताही वापरात.
मला स्वत:ला मेडिमिक्सही आवडतो, त्याच्या सुगंधाने खासकरून ऊहाळ्यात फार फ्रेश वाटतं. हे सध्याचे गरमीचे दिवस माझ्या साठी सगळ्यात आनंददायी स्नानाचे आहेत. खरोखर पाण्यातून बाहेर यावे वाटत नाही लवकर. कारण मला सर्दी सायनसचा फार त्रास आहे, त्यामुळे हीच आंघोळ हिवाळ्यात रोज नको वाटते अगदी. पण हो, तरीही आंघोळ करून नेहमी स्वच्छ राहीले तर बरेच वाटते कधीही एवढं नक्की.
अनिंद्य, फार छान लेख आहे. सगळा नॉस्टॅल्जियाच आहे
. शेवटी वाईट वाटलेच पण.
@ भाग्यश्री१२३
@ भाग्यश्री१२३
@ मी_आर्या
@ मानव पृथ्वीकर
@ अश्विनीमावशी
प्रतिसादांबद्दल आभार.
जस्ट चेकवले तर CAMAY च्या ३ साबणाच्या पॅकची किंमत रु २५७ दाखवत आहेत.
ऍमेझॉन वर स्वस्त दिसतात - साधारण रु ६६ प्रति १०० ग्राम वडीसाठी.
Pages