पायातली साखळी

Submitted by एविता on 3 September, 2020 - 03:59

पायातली साखळी.

"ऋषि उठला का गं ?" माईनी विचारलं

"नाही अजून माई."

अरे तुम्हाला लवकर निघायला हवं गुरुवायुरला पोचायचं असेल तर."

"तो म्हणाला आपण सहा वाजता निघालो तरी संध्याकाळी सहा वाजता पोचतो."

"हा असाच आहे लहानपणापासून. रात्री नुसतं जागायचं. दोन दोन वेळा अंगाई गीत गायचं तरच हे महाशय झोपणार."

" कुठलं लल्ला बाय माई?" मी विचारलं.

" सांगते गं, पण त्याला तुला मांडीवर घेऊन म्हणता येणार नाही त्याचं काय?!"माईनी माझी फिरकी घेतली.

" मला सांगा माई, पुढच्या वर्षी उपयोगी पडेल ना..!" मी ही गुगली टाकली.

माई हसल्या. "अगं ते, आनी बंत आनी, या उर आनी, इल्लिग याक बंदित्तू, हादी तप्पे बंदित्तु... मी शिकवीन तुला तू परत आलीस की."

" ऐकुन ऐकुन हे अंगाई गीत ऋषिन् ला पाठ झालं असेल ना माई?"

" तुला झोप येत नाही असं एकदा सांगून बघ. मग बघ तो हे म्हणतो का..."

मला झोप येत असेल तरीही तो मला जागवतो ते माईना कसं सांगायचं?....तेवढ्यात ऋषिन् किचन मध्ये आलाच. त्याला चहा दिला आणि मी बॅग भरायला घेतलं.

आम्ही हॉल मध्ये माई आणि अप्पांचा निरोप घेत होतो तेंव्हा अप्पा म्हणाले, " कुठला रुट घेतोयस ऋषि?"

" म्हैसूर, बांदीपूर, मुदुमालाई, नीलंबुर,गुरुवायुर. सव्वाचारशे किलोमीटर होईल साधारण.."

" होय. चांगला रूट आहे. बांदीपूर, मुदुमालाई ...व्वा... हत्तीच हत्ती दिसतील बघ. नाइस रूट. पण बांदीपूर नंतर खायला मिळत नाही कुठेच. सो ईट बेलिफुल सम व्हेअर... खाऊन घ्या भरपूर."

"ओके अप्पा. येस... बाय अप्पा.. बाय माई.."

दोघांना बाय करून आम्ही कार मध्ये बसलो तेंव्हा सकाळचे सहा वाजले होते.

बांदीपूर अभयारण्यात प्रवेश केला तेंव्हा अकरा वाजले होते आणि तिथल्या सिक्युरिटी गार्डने कारचा हॉर्न वाजवायचा नाही, मध्ये कुठेच उतरायचे नाही आणि कार वेगात चालवायची नाही अशा सूचना केल्या. रस्त्यात मध्येच एखादा हत्ती, वाघ दिसला तर गाडी हळू चालवा पण थांबू नका असेही त्याने सांगितले. 

"माझ्या गाडीत एक वाघीण आहे तिला इथल्या जंगलात सोडता येईल काय?," ऋषीन् कारची काच वरती घेत त्या गार्डला पुटपुटला. 

"काय म्हणालात सर?" 

"मी म्हणालो की गाडीवर वाघ हल्ला तर करणार नाही ना..? 

"इल्ला सर, तो हसत बोलला, "ते अगदी रेअर्ली दिसतील. हां आनी मत्तु काणस्ताव री साहेबरू.." (हां. हत्ती मात्र दिसतात हो साहेब...)

"ओके ओके.." असं म्हणत ऋषिन् ने गाडीला वेग दिला तसं मी त्याच्या दंडाला चिमटा काढला. "मी वाघीण काय? जंगलात सोडणार तू मला?"

"आपण दोघं राहायचं गं...! तू शिकार कर मी स्वैपाक करतो."

"तू.... हा हा हा.. स्वैपाक करणार?"

"बर तू कर, मी शिकार करतो."

"बायकांच्या मागचा स्वैपाक काय सुटत नाही बघ."

"जिनिव्हा करार माहिती आहे?"

"होय, त्याचं काय?"

"त्या करारानुसार प्रत्येक कैद्याला जेवण देणं बंधनकारक आहे."

"तू आणि कैदी..? मलाच गळ्यात मंगळसूत्र घालून, कैद करून तुझ्या घरात ठेवलंय तू....  कूर्गला आला होतास मला पळवायला...."

" लेकीन मुझे तुमसे प्यार हो गया और आपको मुझसे मुहब्बत।

" मुहब्बत ही ना जो समझे वो जालिम प्यार क्या जाने..." 

"गला किस का कटा, क्यों कर कटा, तलवार क्या जाने..."

"काय चाललंय ऋ.... मघाशी वाघीण म्हणालास, आता तलवार..."

"अगं तलवार वगैरे काहीं नाही गं, स्टॉकहोम सिंड्रोम..."

"ओह.. के... व्वा व्वा.. सो स्वीट..."

त्याला अजून एक चिमटा काढला तेवढ्यात " ते बघ, ते बघ"  असं म्हणत त्याने कारचा वेग अगदी हळू केला आणि जरा लांबवर दिसणाऱ्या हत्तीच्या कळपाकडे बोट दाखवले. "आनी बंत आनी, या उर आनी, इल्लिग याक बंदित्तू, हादी तप्पे बंदित्तु..." तो म्हणाला. हिरव्या कंच गवतातून उंच हत्ती हळू हळू चालत जात होते. उजवीकडे नजर गेली तर अगदी जवळ हरणांचा कळप दिसला. ते डोळे रोखून गाडीकडे बघत होते आणि गाडी जवळ आल्यावर टणा टणा उंच उड्या मारत हिरव्या झाडीत दिसेनासे झाले. त्यांच्या बरोबरीने दहा बारा माकडं झाडावरून उड्या मारत गेली. 

बांदीपूर संपल्यावर दहा मिनिटात मदुमालाई नॅशनल पार्क मध्ये प्रवेश झाला आणि प्रवेश द्वारावर सेक्युरिटी गार्डने तेच सांगितले जे बांदीपूर इथल्या गार्डने सांगितले होते. अगदी त्याचप्रमाणे हत्ती, माकडे, हरण दिसले. इथे मोर मात्र बरेच होते. नॅशनल पार्कच्या बाहेर पडल्यावर जे पहिलं हॉटेल दिसलं तिथे गाडी थांबवली आणि फ्रेश होऊन खाऊन घेतलं. त्यानंतर ऋषि न् ने गाडीचा वेग वाढवला आणि मध्ये एकदाच पेट्रोल पंप वर थांबून नंतर निघालो ते संध्याकाळचे सहा वाजले गुरुवयुरला पोचलो तेंव्हा. गाडीत बसून अंग एवढं आंबलं होतं की केंव्हा एकदा हॉटेल मध्ये जाऊन फ्रेश होतो असं झालं होतं. स्टर्लींग हॉटेलला कार पार्क केली तेंव्हा संध्याकाळचे साडेसहा वाजले होते. 

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नऊ वाजता मंदिरात गेलो. हे मंदिर म्हणजे दक्षिणेची द्वारका. मंदिर परिसर आणि तिथली दुकानं बघण्यासारखी आहेत. ते बघितल्यानंतर मग मंदिराच्या ताब्यात असणारे हत्ती बघून येऊ असा विचार केला. मंदिराच्या मागच्या बाजूला साधारण तीन  किलोमीटर अंतरावर असलेल्या अन्नाकोट्टा नावाच्या परिसरात विशाल मैदानावर हे सर्व हत्ती असतात. हे ठिकाण टुरिस्ट स्पॉट म्हणून चांगलेच नावाजलेले आहे.

"एवढ्या सकाळी एवढे सगळे टुरिस्ट?" ऋषिन् म्हणाला.

"व्वाव.. खरंच की, तिकिटाला एवढी लांब लाईन?" 

शेवटी आम्ही आत शिरलो. हत्तींना आंघोळ घालण्याचा कार्यक्रम बरेच ठिकाणी चालला होता. एका हत्तीच्या समोर उभे राहून आम्ही बघत होतो. त्याच्या अंगावर पाईपने पाणी मारले जात होते.

"किती हत्ती आहेत इथे?" ऋषिन् ने त्या माहूताला विचारले

"एकसष्ट हत्ती आहेत."

"किती वजन असतं हो ह्यांचं?"

"साडेसहा हजार किलोग्रॅम पर्यंत असतं आणि तेरा ते चौदा फूट उंच असतात बघा ते."

"ओहो.. बरं.. पिल्लू हत्तीचं वजन काय असतं?" 

"जन्मलेल्या पिल्लुचं नव्वद शंभर किलो असतं. ताकदवान प्राणी आहे बघा. माणसानं त्याच्या ताकदीचा बराच वापर केला. लाकूड वहा, युद्ध कर, मिरवणूक काढ, हस्तिदंत चोरण्यासाठी मारून टाक... बिचारे... त्या विरप्पनने दोन अडीच हजार हत्ती मारले बघा.."

"आता एवढे दिवस, एवढी वर्षे हत्तींच्या सानिध्यात घालवल्यावर त्यांची भाषा तुम्हाला कळतच असेल ना..?" मी विचारलं.

"होय, त्यांची भाषा शिकवायला येतात महाराष्ट्रातून एक साहेब. ते हत्तीशी बोलतात.आनंद शिंदे नाव आहे बघा."

"व्हॉट.. रिअली? सरप्रायझिंग....! काय काय बोलता हत्तिशी तुम्ही? ह्याचं नाव काय?"

"एक तर ही हत्तीण आहे. नाव मंगला. यांच्यात मातृसत्ताक पद्धती असते. त्यांच्याशी खूप प्रेमाने बोलावं लागतं. यांना सात आठ किलोमीटर दूर असलेला बारीक आवाज पण ऐकू येतो. आम्ही शक्यतो कमी आवाज करतो. ते सोंडेने पाणी उडवतात ते व्यायाम म्हणून, खेळ म्हणून नाही. त्यांची स्वतःची एक वेगळी भाषा असते ते आपल्याला कळत नाही पण सात आठ किलोमीटर दूर असले तरी पण त्यांना त्यांची भाषा कळते. हे दहा प्रकारचे आवाज काढतात. बार्क, क्राय, ग्रंत, हस्की, रोर, रंबलींग, रेव्ह हे आवाज माणसाला ऐकू येत नाहीत पण ट्रम्पेट, नेझल ट्रम्पेट आणि स्नोर्ट ऐकू येते. भिंतीच्या अलीकडे आणि पलीकडे दोन हत्ती ठेवले तरी ते त्यांच्या भाषेत बोलतात." 

"भीती नाही वाटत तुम्हाला ते सोंडेनी तुम्हाला उचलतील? किंवा पळून जातील?" 

तो हसायला लागला. "नाही, काही करत नाहीत ते. साखळी आहे ना त्यांच्या पायात. लहान पिल्लू असतात तेंव्हापासून त्यांच्या पायात आम्ही अगदी हलकी साखळी बांधून ठेवतो. ते सुटण्याचा प्रयत्न करतात पण ती साखळी त्यांना पायाला काचते आणि तिथे जखमा होतात. असं चार पाच वेळेला झालं की ते पळायचा प्रयत्न करायचं सोडून देतात. मग साखळी काढून आम्ही साधा दोर बांधतो. काही दिवसांनी दोर काढून टाकतो. आम्ही त्यांना एका मानसिक सापळ्यात अडकवल्याने ते कुठे जात नाहीत. हे हत्ती केव्हाही त्यांच्या बंधनातून मुक्त होऊ शकतात परंतु ते तसे करूच शकत नाहीत. त्यांना माहीतच नाही ते बंधन तोडू शकतात."

" अरेरे.. बिचारे, " ऋषि न् म्हणाला...  " अजून दिसतायत पायाला ते जखमेचे वळ..." 

एकूणच हत्तीबद्दल ही माहिती ऐकून मन थोडे सुन्न झाले.

एक दोन तास त्या पार्क मध्ये फिरल्या नंतर  तिथली मंदिरं बघितली आणि मग थ्रिसूरला जायचं ठरवलं. वाटेतच खाणं करून मग  थ्रिसूरहून यायला चार वाजले. आल्यानंतर गुरुवयुर फिरून झालं आणि कृष्णाचं दर्शन परत एकदा घेऊन हॉटेल वर परतलो. रात्री बेडवर झोपल्यावर मी ऋषिला म्हणाले, " ऋ..... मला झोप येत नाही, माई तुला लहानपणी अंगाई गीत म्हणायच्या ते म्हण की..." मी हसत बोलले.

"अगं ते...? म्हणतो की."  त्याने माझ्या डोक्यावर थोपटायला सुरुवात केली आणि म्हणायला लागला, " आनी बंत आनी, या उर आनी, इल्लिग याक बंदित्तू, हादी तप्पे बंदित्तु...."

मी कुशीवर वळले आणि त्याच्या पायावर पाय टाकला. माझा पाय त्याच्या पायावर पडल्यावर तो म्हणायचा थांबला आणि उठून बसला. मी पण डोळे उघडले. 

 "एवी," तो बोलला, " आय नेव्हर न्यु की जो हत्ती मला लहानपणी झोपवायचा तो हत्ती लहानपणी किती यातना भोगायचा ना..? पायात साखळ्या घालून त्याला अवखळपणे हुंदडू पण देत नसत. खूप वाईट वाटलं बघ सकाळचं ते हत्तीबद्दल ऐकून."

मी ही उठून बसले. " हो ना.. अरे मला पण वाईट वाटलं रे... पण तुला आता का आठवलं ते?"

"तुझ्या पायातली साखळी टोचली आणि माझ्या मनात तो विचार तरळला.." 

मला हसू फुटलं.. " मला हळूच इंडिरेक्टली हत्ती म्हणतोयास ना...?"

"हत्तीच्या पिल्लाच्या वजनानुसार अर्धं वजन आहेच की तुझं..."

मी त्याच्या पाठीत एक गुद्दा घातला. 

"एवी, जोक अपार्ट, सिरीयसली सांगतोय स्विटी, तू एक काम करशील काय?"

"काय?"

"परत पायात कधीही साखळी घालू नकोस. प्लीज."

" अरे..." मी हसत बोलले," एकतर मी हत्तीण नाही आणि सेकंडली तू मला कधीच बंधनात ठेवलं नाहीयेस, पूर्ण स्वातंत्र्य दिलंयस... मग व्हाय वरी?" 

" मला सारखे हे हत्ती आठवत राहतील तुझ्या पायातली साखळी बघितली की..." 

"ओके डिअर, ये लो मैं निकाल देती हूं.." असं म्हणत मी दोन्ही पायातल्या साखळ्या काढून टाकल्या.

दुसऱ्या दिवशी बेंगलोरला पोचलो तेंव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते.

"कशी झाली ट्रीप?" आम्ही हातपाय धुऊन डायनिंग टेबल वर बसल्यावर, माईनी चहाचे कप आमच्यासमोर सरकवले आणि त्यांनी आणि अप्पांनी प्रश्न केला.

"बेस्ट," ऋषि बोलला, " वेरी मेमोरेबल. मस्त. मजा आली.थ्रिसूरला पण जाऊन आलो काल दुपारी."

"एवि, अन्नाकोट्टातले हत्ती बघितले का?"

"हो अप्पा. बघितले आणि बरीच माहिती मिळाली." मी ट्रीपची सगळी हकीकत सांगितली आणि अप्पाना आणि माईना हे ही सांगितलं की मी आता पायात साखळी कधीच घालणार नाही. आय वॉन्ट टू रिस्पेक्ट ऋषिज् फिलींग्ज.

"नको घालू. खरंच आहे ते. गजांतलक्ष्मी म्हणायचं आणि साखळदंडांनी करकचून ठेवायचं त्या हत्तींना," माई म्हणाल्या, " साक्षात् गजानन तो आणि त्याला बांधून ठेवायचं म्हणजे काय?"

"पिटिफुल" अप्पा म्हणाले.

आणि त्या दिवसापासून माझ्या पायात साखळी नाही.

......

(आनी बंत आनी, या उर आनी, इल्लिग याक बंदित्तू, हादी तप्पे बंदित्तु... हत्ती आला हत्ती, कुठल्या गांवचा हत्ती, इथे का आला होता, वाट चुकून आला होता...)

........

 

Group content visibility: 
Use group defaults

हत्ती केव्हाही त्यांच्या बंधनातून मुक्त होऊ शकतात परंतु ते तसे करूच शकत नाहीत. त्यांना माहीतच नाही ते बंधन तोडू शकतात."..... सुंदर... कधी कधी आपल्याला पण माहित नसतं आपण बंधन तोडू शकतो ते....तशीच ठेऊन जगत असतो...

बांदीपूर आणि मुदुमलाई... म्हैसूरचे आठवण करून दिलीत तुम्ही.. माझा अल्टरनेट विकेंड म्हैसूरच्या आसपासच्या जंगलातच जायचा.. BR हिल्स पण झकास आहे.

मानवप्राण्याचा धिक्कार बऱ्याचदा वाटतो, त्यातला हा प्रसंग.. छान लिहिलंय.

मला पण आर्निका ची मालिकाच आठवली. कथा छानच आहे.

बंगलोर च्या आयडी, ते मराठी कट्टा वाले माहीत आहेत का हो तुम्हाला?

आवडली गोष्ट. हत्त्तींची साखळदंडाची कथा आधी ऐकली होती पण ती अशी भावनीक गुंत्यांत अडकवून सुंदर गुंफली आहे.

काय सुरेख लिहीले आहे.
>>>>अशी भावनीक गुंत्यांत अडकवून सुंदर गुंफली आहे.>>>> अगदी!! खरे आहे.
छान हातोटी आहे तुम्हाला गोष्टी सांगण्याची.

वावे, अर्निका ची लेखमाला दिलीस हे किती छान. मी वाचलीच नव्हती. पण खुप बेचैन व्हायला झालं वाचून.

कथा कथनाची हातोटी छान साधलीय तुम्हांला. तीव्र वेदनेच्या भावनेला झटकन खेळकर विनोदात बुचकाळून दूर करायचं आणि पुढल्या क्षणात प्रवेश करताना मागच्या क्षणाचं बॅगेज दूर फेकून देऊन पुढच्या क्षणासाठी सज्ज व्हायचं. त्याचबरोबर वेदनेचं भानही जागृत ठेवायचं. खूप सकारात्मक आणि जागेपणाने जगता तुम्ही .

खूप मस्त... As usual... Happy
आम्ही पण बांदीपूरचं जंगल बाहेरून बघीतले आहे... एकदा आत मधे फिरायला जायचं असं खूप वर्षे झाली ठरवतोय... आता परत इच्छा होतिये...
तिथे एका रोडसाईड हाँटेल मधे उपमा खाल्लेला... अप्रतिम चव... कदाचित त्या वातावरणाचा परिणाम असेल किंवा खास साऊथ भागातील चव असेल... पण तशी चव परत कधीच मिळाली नाही...

बाकी.. लिखते रहो... :}

तू मला कधीच बंधनात ठेवलं नाहीयेस, पूर्ण स्वातंत्र्य दिलंयस. >>> अनेक बाया हे अतिशय अभिमानानं म्हणतात. Freedom Is Your Birthright. पायातली साखळी गेली तरी मानसिक साखळी गेलेली दिसत नाही, त्या हत्तींसारखंच. ती झुगारता आली तर बघा.

अनेक बाया हे अतिशय अभिमानानं म्हणतात. Freedom Is Your Birthright. >> खरय. बऱ्याचजणी नकळतही हे वाक्य बोलून जातात. स्वातंत्र्य ही कोणी कोणाला देण्याची गोष्टच नाही आहे. ते असतेच आपले आपल्यापाशी. हम्म एकत्र प्रवास करताना आपण एकमेकांच्या मताने जुळवून घेत थोडे तुझे थोडे माझे असा प्रवास करतो तो पूर्ण वेगळा भाग पण स्वातंत्र्य हे देण्या घेण्याची गोष्ट नक्कीच नसते आणि नसावेही

बंगलोर च्या आयडी, ते मराठी कट्टा वाले माहीत आहेत का हो तुम्हाला?

नवीन Submitted by अमा on 3 September, 2020 - 18:49
>> नाही अमा. मी तो पत्ताही चेक केला. बरंच लांब आहे माझ्या एरियापासून.

हत्तींबद्दल काहीही वाचलं तरी अर्निकाचे ते लेख आठवतात.

तू मला कधीच बंधनात ठेवलं नाहीयेस, पूर्ण स्वातंत्र्य दिलंयस. >>> अनेक बाया हे अतिशय अभिमानानं म्हणतात. Freedom Is Your Birthright. पायातली साखळी गेली तरी मानसिक साखळी गेलेली दिसत नाही, त्या हत्तींसारखंच. ती झुगारता आली तर बघा.>>>> अनुमोदन ...
लेख छान, मस्त जमलय

वाह! सुरेख लिहिलं आहेस गं... तुमची प्रेमळ नोकझोक पण गोड!

अवांतर
माझ्या साबा कानडी असल्याने ही अंगाई मुलीसाठी म्हणायच्या (आनी बंत आनी, या उर आनी, इल्लिग याक बंदित्तू, हादी तप्पे बंदित्तु...
पण पुढे असं काहिसं होतं.. माफ कर मला कानडी अजिबात येत नाही अक्षरशः जसं ऐकू यायचं तस्सं लिहिलं आहे. याचा पूर्ण अर्थ काय?
हाथ गोन दुड्डू
लटालटा मुरदू
पोट्टून बाया कोट्टू

अती अवांतर
हत्ती माझा फार आवडता प्राणी. खूप गोड, एवढा विशालकाय पण प्रेमळ वाटतो. बिचार्‍याला नेहमी कामाला जुंपलेले बघून फार वाईट वाट्ते. कुठेतरी वाचले होते की त्याची पाठीची रचना टोकदार असते म्हणजे जिथे लोकं राईड साठी ते लाकडी आसन घेऊन बसतात तिथे वर टोकं आलेली असतात त्याच्या स्पाईनची. त्यावर असं वजन पडणं चांगलं नाही वगैरे. तेव्हापासून मी ठरवलंय कधी बसणार नाही.

दुड्डू म्हणजे पैसे, रक्कम.
कोट्टू म्हणजे दिले.
बाकी शब्द कळत नाहीयेत. एविता, तुला ती सगळी अंगाई येत असेल तर लिही अर्थासहित. Happy

Chasmish धन्यवाद. खरे आहे तुम्ही म्हणता ते.

अमृताक्षर. धन्यवाद.

विनिता. झक्कास. मनःपूर्वक धन्यवाद.

अजिंक्य राव पाटील, होय बी आर हिल्स मस्त आहे. या एकदा माझ्याकडे. म्हैसूर इथे पण आमचं घर आहे. आपण जाऊ पिकनिक ला. धन्यवाद.

ए_श्रद्धा, मनःपूर्वक धन्यवाद.

कविन, थँक्यू सो मच.

वावे. (१) अगं काय सुंदर लिहिलंय गं अर्निकानी! दोन आसवांचे थेंब गळाले थेट टॅबवर. हुंदके किती दाटले. एवढं वाईट गुरूवयुर मध्ये पण वाटलं नव्हतं तेवढं वाईट हे वाचताना वाटलं. हृदयाला हात घातला ह्या लेखाने.

धनुडी, माय स्वीट फ्रेंड! धन्यवाद.

मंजूताई, मनःपूर्वक धन्यवाद.

अमा, मी मराठी कट्टा सदस्य होते पण वेळे अभावी भाग घेता येत नाही. ऑनलाईन सदस्य होता येते. धन्यवाद.

सामो, तुमचे मनःपूर्वक आभार.

हीरा, या कौतुकास मी पात्र नाही. हो, अगदी खरं आहे. Let bygones be bygones असे म्हणून बॅगेज कॅरी करायचे नाही. अगदी करेक्ट! धन्यवाद.

नंबर १ वाचक. अगं खरंच. इथला उपमा आणि शिरा. द बेस्ट. असा उपमा महाराष्ट्रात बनत नाही. बर तू ये माझ्याकडे मी तुला बांदिपुरला घेऊन जाते. तुझ्याकडून मराठीतून कानडीत भाषांतर करून घ्यायचे आहे. धन्यवाद.

सिंडरेला, (१) स्वातंत्र्याबद्दल ती जी दोन वाक्यं आहेत ती मी संभाषणाच्या ओघात म्हटली आहेत. माझा आणि ऋषि मधला तो संवाद आहे. खाजगी. मी माझ्या मित्र मैत्रिणीत वावरत असते तेंव्हा ह्या स्वातंत्र्याबद्दल कधीच उच्चार करत नाही.

(२) नवऱ्याने दिलेले स्वातंत्र्य ही माझ्या मते खरोखर अभिमानाने मिरवण्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. आपण लग्न करून परक्या घरी जातो म्हणजे सासरी जातो तेंव्हा तिथले काहीं डुज अँड डोन्टस् असतात ती पाळावी च लागतात. अशा वेळी सगळ्यात जवळची व्यक्ती आपला नवराच असतो. चुकलं तर सांगणारा आणि सांभाळून घेणारा. मी अशी कुटुंब पहिली आहेत जिथे स्वातंत्र्य हिरावून घेतलेले आहे. लग्नानंतर जॉइंट अकाउंट केलेले आहे, सगळा पगार नवऱ्याच्या हाती द्यावे असा दंडक आहे, काय पोशाख घालावा आणि काय घालू नये यावर बंधनं आहेत, लग्नानंतर शिक्षण चालू ठेवावे की नाही याबद्दल चर्चा, असलेली चांगली नोकरी सोडून द्यावी आणि फुल्ल टाईम हाऊस वाइफ व्हावे म्हणून आग्रह करणारी फॅमिलीज मी बघितली आहेत. उत्तर भारतात तर असं खूप आहे. अगदी IAS झालेल्या कुटुंबात स्त्री बंधनात आहे. राजस्थान मध्ये अजूनही घुंघटप्रथा आहे. बंगालमध्ये पण अशी कुटुंब मी पाहिली आहेत. सासऱ्यासमोर ब्र उच्चारता येत नाही अगदी उच्च शिक्षित मुलीला देखील. माझ्या बाबतीत असे काहीच नाही. अशा वेळी आपल्याला असे स्वातंत्र्य मिळाले (जी मला मिळाली आहेत) तर ती अभिमानाने मिरवण्याची बाब आहे असे मला वाटते. हे माझे वैयक्तिक मत आहे.

(३) ही जी मानसिक बंधनं आहेत ती माहेरचे सगळे चांगले आणि सासरचे सगळे वाईट या मानसिकतेतून वाटत असावीत का हा एक संशोधनाचा विषय आहे. ही बंधनं नेमकी लग्नानंतर का येत असावीत? माहेरी आपल्याला असं काही वाटत नाही. आई कशीही बोलली तरी तिला उलट उत्तरे देता येतात हे स्वातंत्र्य आहे का? आणि सासू बोलली की आपल्या स्वातंत्र्यावर घाला घातला जातो का हे ही तपासून घ्यायला हवे. आपण जेंव्हा परक्या घरी जातो तेंव्हा तिथले रीतिरिवाज, कुलधर्म, कुलाचार पाळणे हे बंधन या व्याख्येत बसत असेल तर लग्न न केलेलच बरे. तसं असेल तर घरजावईच शोधावा, अथवा कायम लिव इन रिलेशनशिप मध्ये राहावे. माझ्या बाबतीत सासरचे रीतिरिवाज, कुलधर्म, कुलाचार पाळणे ही बंधनं मी स्वखुशीने स्वीकारली आहेत. स्वखुशीने स्वीकारलेली बंधनं झुगारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
(३) ही अशी बंधनं असतात हे ठरवणं ही काही वेळेला मानसिक क्रिया आहे असं मला वाटतं. अगदी स्वतःच्या संततीचे पालकत्व देखील काटेरी मुकुट आहे अशी मानणारी मंडळी आहेत. धडधाकट संतती वाढवताना पण ज्यांना त्रास होतो तर दिव्यांग संततीला वाढवताना काय होत असेल याची केवळ कल्पनाच करू शकतो आपण. पण ही ही जबाबदारी खुशीने घेणारे पालक पण आजूबाजूला दिसतात. अगदी गवगवा न करता ते सगळं करत असतात. ज्यांना ही बंधनं नकोशी वाटतात त्यांनी Freedom is my birthright and I will fight to get it असा पवित्रा घ्यावा लोकमान्य टिळकांनी घेतला तसा. मग आपला मंडाले कसा होतो ते ही जाणून घ्यावे. तसं फ्रीडम मिळालं पण ते बघायला लोकमान्य नव्हते. ते गेल्यानंतर सत्तावीस वर्षांनी स्वातंत्र्य मिळालं. एवढा वेळ वाट पाहायची इच्छा असेल तर झुगारा ती बंधनं.

(४) ही बंधनं झुगारुन पहा असं तू मला वैयक्तिक रित्या सांगत असशील तर तशी काहींचं बंधनं मला नाहीत. माझा स्वतंत्र अकाउंट आहे. माझी वेगळी गाडी आहे. मी मडिकेरी (जिथं माझी आई असते) तिथे मी स्वतः ड्राईव्ह करत जाते. माझ्या पगारातले पैसे मी आईला देते त्या बद्दल पण घरात कोणाचीच तक्रार नाही. ऋषि ला बहीण नाही आणि मला वडील नाहीत म्हणून अप्पा मला अगदी मुलीसारखी वागवतात. माझ्या मनाला लागेल असा एकही शब्द ते बोलत नाहीत. अगदी रंगाचारी सारख्या ब्राह्मणांच्या घरात मी वेगळ्या जातीची मुलगी आहे तरी. मला चार दिवस बाहेर बसावं लागत नाही. मला दुखवायचे नाही असं त्यांनी ऋषि ला बजावले आहे. माझी जाऊ मैत्रिणी सारखी आहे. ऋषि चा मोठा भाऊ मला खूप रिस्पेक्ट देतो. आणि जी काही काल्पनिक बंधनं असतील ती मी स्वखुशीने स्वीकारलेली आहेत. ती मी झुगारणार नाही.

पण तू तुझं मत मांडलं या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

नीलिमा, मनःपूर्वक धन्यवाद.

Vaishali Joshi.मनःपूर्वक धन्यवाद.

अंजली_१२. वाव! अजून एक कानडी भेटली. खरंच गं. बिचारा मुका प्राणी. वाटेल तसं वापरून घेतात.

ते हत्तीवालं अंगाई गीत असं आहे.

आनि बंतू आनी,
या उर आनी
इल्लिग याका बन्दित्तु
हादि तप्पे बंदित्तु
हादिगे वन्दु दुड्डू
बिदिगे वन्दु दुड्डू
यल्ला दुड्डू कुडस्शी
शेर खोब्री तन्दु
लटालटा मुरदू
हिरेर्गे यल्ला कोट्टू
सन्नावर्गे यल्ला बिट्टू
हित्तलदागे व्हक्कीत्तू
हिरिकाई हुवा कोयदित्तू
आनि बंतू आनी.....

( हत्ती आला हत्ती
कुठल्या गावचा हत्ती
इथे का आला होता
वाट चुकून आला होता
वाटेत एक पैसा
बिटेत एक पैसा ( वाट बीट या अर्थी)
सगळे पैसे मिळवून
शेर खोबरे आणून
लटालटा मोडून
मोठ्यांना वाटून
छोट्याना सोडून
परसदारी घुसले
दोडक्याचे फुल तोडले
हत्ती आला हत्ती....)

वावे, तू सांगितल्या प्रमाणे अर्थासहित लिहिलंय. "कथि कथि खब्णा" असं अजून एक अंगाई गीत आहे. त्याबद्दल पण मी लिहिते नंतर. तुझे मनःपूर्वक आभार.

एविता दिल खूष कर दिया तुने तो ......लेखापेक्षा प्रतिसादाचा हा भाग माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. लेखही आवडला आहे.
.....
अशी बंधनं असतात हे ठरवणं ही काही वेळेला मानसिक क्रिया आहे असं मला वाटतं. अगदी स्वतःच्या संततीचे पालकत्व देखील काटेरी मुकुट आहे अशी मानणारी मंडळी आहेत. धडधाकट संतती वाढवताना पण ज्यांना त्रास होतो तर दिव्यांग संततीला वाढवताना काय होत असेल याची केवळ कल्पनाच करू शकतो आपण. पण ही ही जबाबदारी खुशीने घेणारे पालक पण आजूबाजूला दिसतात. .....अनुमोदन..

*******
ह्या स्वातंत्र्याच्या , निष्ठेच्या, समर्पनाच्या व्याख्या गंडलेल्या आहेत का काय , ज्याने नात्यांवर अन्याय होतो असं वाटतय मला आजकाल. सतत प्रुव्ह(?) करण्याच्या नादात acceptance आणि संवेदनशीलता हरवते. कुठेतरी नात्याला सुद्धा कमी लेखतो आपण , which is not fair. I value my relationships than anything but I am clear about it.

मी किती समर्पित आहे हे दाखवण्यासाठी मी नात्याला
तीव्र संघर्षाचे रूप देणार नाही. It is not healthy or fair for the relationship. Technically you demean the relationship to pamper your personal ego
नाही का ?

You made my day !! Happy

Pages