मी मागे एकदा लेमनांसाठी भाकरीची पाककृती लिहिली होती. भाकरीचं पीठ मळण्यासाठी एस आकाराचं ब्लेड लावून फुड-प्रोसेसर वापरायचा. एकदम छान, भेगा न पडता भाकरी होतात. उकड मळण्यासाठी हीच पद्धत वापरून मोदक पण छान होतात. उकड मळण्याइतकंच कौशल्याचं काम आहे एकसारख्या कळ्या घेऊन मोदक वळणं. आमच्या घरी मोदक म्हटलं की तळणीचेच. नारळाचा ताजा चव घालून केलेले तळणीचे मोदक फार छान लागतात. उकडीच्या मोदकांशी ओळख झाली ती एका मैत्रिणीच्या घरी. एकदा खाल्ल्यावर तेच जास्त आवडू लागले. सुरूवातीला अनेक वर्ष गौरी-गणपतींसाठी घरी जाणं व्हायचं तेव्हा दोन्ही घरी दोन्ही प्रकारचे मोदक मिळायचे. स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात. उकडीचे मोदक हा असा प्रकार आहे की वश झाला नसेल तर मेल्यावर सुद्धा स्वर्ग दिसत नाही. त्याचं तंत्र जमलं तर सूत आणि नाही तर भूत असा अनुभव आहे. स्वयंपाकाचा तसा उरकच त्यात काही खास कौशल्याचं काम असेल तर मांसाहेबांचा आधीच धीर सुटतो. गूळपोळी आठवत असेलच. आई आमची सुगरण त्यामुळं पुरणपोळी पासून साध्या कोशिंबिरीपर्यंत सर्व पदार्थ अगदी अलवार, चविष्ठ करते, त्याची आम्हाला सवय. तिचा स्वयंपाकघरातला वावर बघितला की पुरणपोळ्या काय आणि मोदक काय, सगळं एकदम सोप्प वाटतं. अमेरिकेत आल्यावर पहिल्याच वर्षी गणपती बसवले तेव्हा प्रसादासाठी म्हणून तळणीचे मोदक करायला घेतले ते त्याच भरवश्यावर. छोट्या खलबत्त्यात रवा कुटून वगैरे उठबस केल्यावर सुद्धा ते काही साध्य झाले नाहीत. बहुतेक पदार्थांची हीच तर्हा होते. गूळपोळी आठवतेय? तर तळणीचे मोदक जरा अवघडच असतात असं स्वतःशी ठरवून पुढल्या वर्षी उकडीचे मोदक करायला घेतले. एक कन्नडिगा मैत्रिण पण गणपती बसवते. तिची आई उकडीचे मोदक करायची. ती पण हौसेनं मोदक करायला येते म्हणाली. कृती वाचून सगळं साहित्य यादीनुसार आणून ठेवलं होतं. मोदक करून त्यावर मस्त तुपाची धार घालून खायचे एवढंच काय ते बाकी होतं. दोघींच्या आयांनी एकच अत्यंत महत्वाची टिप दिली ती म्हणजे उकड चांगली मळली गेली पाहिजे. प्रत्यक्षात उकड मळतानाच एवढी तारांबळ उडाली. त्यावर्षी फॅन्सी पॅचवर्क केलेले मोदक नामक गोळे वळून नैवेद्य दाखवला. नंतर अनेक वर्ष मी मोदकांचं नाव टाकलं आणि तिनं गणपतीच्या दिवसांत आमच्या घरी यायचं. मी मग इतर पदार्थांमध्ये लक्ष घालायला सुरूवात केली. गूळपोळी? आठवतेय ना? एकदा असंच बोलता-बोलता आई म्हणाली की मोदकासाठी भिजवलेला रवा फुड-प्रोसेसरमध्ये चांगला मळला जाईल. त्यावरून आधी भाकरीचं पीठ मळायची कल्पना डोक्यात आली आणि मग मोदकाची उकड. पहिल्यांदा हा प्रयोग बर्यापैकी यशस्वी झाला असं म्हणायला आवडलं असतं. पण उकडीसाठी जे प्रमाण घेतलं होतं त्यात जरा गडबड होती. आता उकडीसाठी ओगलेआजींनी दिलेलं प्रमाण घेते आणि सारणासाठी आमच्या आईसाहेबांचं. आधी म्हटल्याप्रमाणं मोदक वळणं ही एक कला आहे. त्यासाठी पण एक सोपी "ट्रिक" वापरून दरवर्षी उकडीचेच मोदक करते. नवी पिठी, जुनी पिठी, हा ब्रॅन्ड, तो ब्रॅन्ड कशाचा म्हणून फरक पडत नाही. हमखास मोदक होतातच. असो, नमनालाच घडाभर उकड झाली तर आता मोदक करायला घेऊयात.
साहित्य:
उकडीसाठी: एक वाटी तांदळाची पिठी, एक वाटी पाणी, दोन कण्या मीठ, दोन चमचे तूप, एक चमचा तेल, केशराच्या काड्या
सारणासाठी: तीन वाट्या नारळाचा चव, दोन वाट्या गूळ, ३ वेलदोडे, एक चमचा रवा, दोन चमचे खसखस, एक चमचा तूप
कृती: एका कढईत रवा कोरडाच भाजायला घ्यावा. खमंग वास आला की त्यातच खसखस घालून दोन्ही मंद आचेवर भाजावं. नारळाचा चव आणि तूप घालून सगळं एकत्र जरावेळ परतून घ्यावं. त्यात गूळ, वेलदोड्याची पूड घालून नीट हलवून शिजवून घ्यावं.
उकडीसाठी पाणी एका पातेल्यात गरम करायला ठेवावं. त्यात तेल, तूप, मीठ आणि केशराच्या काड्या घालाव्यात. पाण्याला उकळी आली की पातेलं गॅसवरून उतरवून त्यात तांदळाची पिठी घालून भराभरा मिसळून एकजीव करावं. झाकण घालून ते पातेलं पुन्हा मंद आचेवर ठेवावं आणि दोन वाफा काढाव्यात. हे पारायण सर्वांनाच थोड्या-फार फरकानं पाठ असेल.
लेमनांचा खेळ सुरू होतो तो इथून पुढे. फुड-प्रोसेसरला आतल्या बाजुनं तुपाचा हात लावून एस आकाराचं ब्लेड लावावं. त्यात २-३ मोदक होतील एवढी उकड घेऊन मळून घ्यावी. सुरुवातीला एकदम भगराळ होउन जाते. पण म्हाराज गडावर पोचल्याशिवाय....फुड-प्रोसेसर बंद करायचा नाही. उकड सावकाश गोळा होउन एका बाजूस जमा होते.
एक मोदक होइल एवढी लाटी घेऊन पिठी लावलेल्या हातानं पसरत पसरत त्याची वाटी करायला घ्यायची नाssssssही. तर ही लाटी जराशी पसरट करून पोलपाटावर त्याची झक्कास पुरी लाटायची.
पुरीएवढी पुरी झाली की ती डाव्या हातात ठेवून त्यात एक मोठा चमचा सारण भरायचं आणि 'गणपती बाप्पा मोरया' म्हणत कळ्या घ्यायला सुरूवात करायची.
या पायरीवर आपली उमो विषयातली पायरी ओळखून असणं फार महत्वाचं आहे. अजिबात अती-महत्वाकांक्षी न होता, जमतील तेवढ्याच कळ्या घेऊन त्या एका दिशेनं एकत्र आणून मोदक वळायचा. सवयीनं ११-१२-१३ अशी मजल मारता येते. मोदकांचा आकार पण एकसारखा जमु लागतो.
या पद्धतीनं दोन ते तीन मोदकांची उकड मळत सगळे मोदक करायचे. थोडी कोमट झाली उकड तरी नीट मळली गेली असते त्यामुळे चांगले मोदक होतात. वर दिलेल्या प्रमाणात मध्यम आकारचे साधारण अकरा मोदक होतात. सारण थोडं उरतं पण नुसतं सारण खाणारे उंदीरमामा घरात असतातच, त्यांना वेगळा नैवेद्य दाखवावा.
उत्तरकथा सांगायला नकोच-
२०१६
२०१९
२०२०
वा ! मस्त झालेत मोदक!! दर गटग
वा ! मस्त झालेत मोदक!! दर गटग ला खाऊन खाऊन कंटाळलोत पण आम्ही![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
वा वा! आता २०२१ला गणपतीला
वा वा! आता २०२१ला गणपतीला शिट्टी मार्गे बारात जाणार आम्ही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मस्त दिसताहेत.
आणि हो! गूळ पोळी आठवत्येय! तोच हा फूड प्रोसेसर का?
मोदक मस्त दिसत आहेत.
मोदक मस्त दिसत आहेत.
भारी मोदक आणि त्याहून भारी
भारी मोदक आणि त्याहून भारी रेसिपी.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
)
(पण गूळपोळ्यांचं काय ते म्हणे?
मस्त रेसिपी
मस्त रेसिपी
मिक्सरमध्ये उकड फिरवणं चांगली कल्पना आहे.काही जण वाटीने पण मळतात गरम उकड.
भारीये. मोदकाच्या उकडीत केशर
भारीये. मोदकाच्या उकडीत केशर घालण्याची आयडिया मस्त आहे. रंग छान आलाय २०२० मोदकांचा.
लिंबं मात्र साहित्यात दिसली नाहीत.
छान लिहिलंय आणि मोदक सुंदर
छान लिहिलंय आणि मोदक सुंदर दिसताहेत.
पुढं प्रोसेसरमध्ये थोडी थोडी उकड फिरवायची ही नवी युक्ती कळली.
उकडीत मीठ घालायचं राहिलं आहे.
आणखी कोणीतरी पोळपाटावर पारी वाटणारं आहे, हे पाहून बरं वाटलं.
मी एकदा(च) पात्तळ आवरणाचे , कळीदार मोदक करायचा चंग बांधला होता, तेव्हा तेल लावलेल्या दुधाच्या दोन पिशव्यांत ठेवून पाऱ्या लाटल्या होत्या. आता तेवढा पेशन्स आणता येत नाही.
मस्त लिहिलंय. गूळपोळीही
मस्त लिहिलंय. गूळपोळीही लक्षात आहे.
पण म्हाराज गडावर पोचल्याशिवाय
पण म्हाराज गडावर पोचल्याशिवाय.... फुडप्रोसेसर बंद करायचा नाही.>>> खूप हसले.
छान लिहिलंय आणि मोदक पण सुबक, सुरेख. फुडप्रोसेसरचा प्रयोग पुढच्या वेळी करून बघेन.
धन्यवाद, मंडळी
धन्यवाद, मंडळी
भरत., पोळपाटावर लाटून बघा, पटापट होतात.
लिंबं मात्र साहित्यात दिसली नाहीत. >>> बडे मजाकिया हो जी![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
दर गटग ला खाऊन खाऊन कंटाळलोत पण आम्ही >>>
पुढल्यावेळी पुपो आणेन मग.
अमित, तो मोडीत निघाला गुळाचे खडे फोडून फोडून
गूळपोळ्यांचं काय ते म्हणे >>> कुठे काय? कुठे काय?
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मोदक पण छानच.
फुप्रोच्या पात्यावरचा वॉटरमार्क आधी कळलाच नाही. तृप्ती ब्रँडचाच कसा अगदी योगायोगाने फुप्रो आहे हिच्याकडे, असंच वाटलं![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
मामे,
मामे,![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
लेमन्स म्हणजे २०२० चे लिंबू कलरचे मोदक
वा मस्तच
वा मस्तच
मोदकाचा मोमोजच्या वाफावायच्या भांड्यात ठेवलेला फोटो आवडला .
![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
मोदक तसे मोमोजच म्हणा
मोदक आणि लिहीलेली रेसिपी
मोदक आणि लिहीलेली रेसिपी दोन्ही छान!
फुप्रोची आयडीया चांगली आहे.
फुप्रोच्या पात्यावरचा
फुप्रोच्या पात्यावरचा वॉटरमार्क आधी कळलाच नाही. तृप्ती ब्रँडचाच कसा अगदी योगायोगाने फुप्रो आहे हिच्याकडे, असंच वाटलं>>>>सेम to सेम ललिता, तुमचं वाचल्यावर कळलं मला तो वॉटरमार्क आहे म्हणून![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
त्यामुळे हे मोदक पण आवडले
गुळपोळी वाचून पाठ झालंय,रेसिपी चुकली एखादी की हमखास गुळपोळी वाचते,10 हत्तीचं बळ येतं मग
सुरेख दिस्ताहेत मोदक!
सुरेख दिस्ताहेत मोदक!
रच्याकने ते चविष्ट कराल का? का ठ ठ ठच बरं वाटतंय?![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
सुरेख दिसतायत मोदक
सुरेख दिसतायत मोदक
छान दिसतायत!
छान दिसतायत!
तृप्ती ब्रँडचाच कसा अगदी
तृप्ती ब्रँडचाच कसा अगदी योगायोगाने फुप्रो >>>
मिक्सर आहे ना तृप्ती ब्रँडचा.
योकु, चविष्ठचा ठसका जाणवायला नको का?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आदू,![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
धन्यवाद पुन्हा एकदा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप छान .
खूप छान .
सही झालेत. लेखन खुसखुशीत.
सही झालेत. लेखन खुसखुशीत.
खरंच उपयुक्त लेख!
खरंच उपयुक्त लेख!
लिंबू, वॉटरमार्क बद्दल अगदी
लिंबू, वॉटरमार्क बद्दल अगदी अगदीच!!![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
)
मोदक छानच झालेत ( पण .....आता काही तिखट पदार्थांचे फोटो बघायला हवेत
वा वा! एकदम झकास!
वा वा! एकदम झकास!
फुप्रो वॉटरमार्क>>> ते तर आहेच, शिवाय मला तर शेवटचा फोटो बघून केळीचं पान पण कसलं भारी सुबक चौकोनी कापलं आहे असं वाटलं.
मस्तच. मोदक आणि लिहिलेलंही.
मस्तच. मोदक आणि लिहिलेलंही.
मस्त लिहल आहे. मोदक सुबक
मस्त लिहल आहे. मोदक सुबक सुंदर.