पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे, तिखट रस्सा मोदक, म्हाळसा

Submitted by म्हाळसा on 24 August, 2020 - 22:20

दोन दिवस गोड मोदक खाऊन घसा खवखवला असेल तर हा घ्या..तिखट, झणझणीत, रसरशीत असा मोदक रस्सा.

सारणासाठी लागणारे साहित्य -
१ वाटी चिरलेला कांदा, १ वाटी किसलेलं सुकं खोबरं, २ चमचे तीळ, १ चमचा खसखस, ५-६ पाकळ्या लसूण, मीठ, गरम मसाला पावडर १/२ चमचा, थोडीशी कोथिंबीर

पारीते साहित्य -
१ चणाडाळीचे पीठ, पाव वाटी गव्हाचे पीठ, मीठ, तेल, हळद, लाल तिखट

रस्स्यासाठीचे (काही जणं हे ‘रस्त्यासाठीचे’ असेही वाचतील :)) साहित्य -
जीरे, अर्धा वाटी चिरलेला कांदा, पाव वाटी किसलेलं सुकं खोबरं, २ चमचे डाळे, २ पळ्या तेल, २ मोठे चमचे लाल तिखट , १ मोठा चमचा मालवणी मसाला/काळा मसाला, कोथिंबीर

पटापट कृतीकडे पळूयात -

रेसिपी अगदी सोप्पीए ओ.. मोदक म्हंटलं की सासू आणि आई उगाचच बाऊ करतात असं वाटतं..
ही रेसिपी पूर्वी ह्या दोघींनाही शिकवून झाली आहे, त्यामुळे आता जगात कोणालाही शिकऊ शकेन इतका आत्मविश्वास वाढला आहे..
यापूर्वी जर तुमच्याकडे कोणीही असा ‘तिखट रस्सा मोदक’ खाल्ला नसेल तर बिंधास्त किचनच्या रणांगणात उतरा आणि मसाल्याचा धुराळा उडवायला सज्ज व्हा..

सर्वप्रथम पेटत्या शेगडीवर कढई ठेऊन चमचाभर तेलात चिरलेला कांदा, किसलेलं खोबर, तीळ, खसखस, लसूण हे सगळं एकत्र न भाजचा, एका वेळेस एक या पद्धतीने खरपूस भाजून घ्यायचं. त्यानंतर भाजलेलं जिन्नस, मीठ, गरम मसाला, कोथिंबीर पाणी न घालता मिक्सरला फिरवायचं. सारण तयार.

पारीसाठीचे साहित्य एकत्र करून थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यावं. लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून पारी लाटून त्यात सारण भरून मोदकाचा आकार द्यावा. हा मोदक बनवणं उकडीच्या मोदकापेक्षा २१ पटीने सोप्पा आहे यांत मुळीच शंका नाही पण तरीही आकार न जमल्यास चिंता नसावी.. पूर्वी अशा मोदकाला पूर्णपणे रस्स्यात बुडवून लपवण्याची कामगिरी फत्ते केलेली आहे.

आता रस्स्यासाठी थोड्या तेलात कांदा, खोबरं,डाळे खरपूस भाजून घ्या. मिक्सर मधे बारीकसर वाटून घ्या आणि कढईत तेल ओतून त्यात छान परतून घ्या.. लाल तिखट, मसाला पावडर घालून तेल सुटेपर्यंत हलवा ..गरम पाणी ओतून मीठ घालून एक उकळी काढा..त्यानंतर रस्स्यात मोदक सोडून झाकण ठेऊन १५ मि. शिजू द्या.. रस्स्यातले मोदक थुईथुई नाचू लागले की पेटलेली शेगडी बंद करा..शेवटी कोशिंबीर घालून सजवा.

महत्वाचा सल्ला - पूर्वी असाच अफलातून ‘रस्सा मोदक’ आई आणि सासूला खाऊ घातल्याची आठवण झाली.. माझ्या आईकडे कौतुकाची कायमच टंचाई म्हणून तिच्याकडे नेहमी प्रमाणे दुर्लक्ष फेकत आपली नजर सासूकडे वळवली होती.. सासूने मस्त चपातीचा घास रस्स्यात मुरगळत, मोदकाचा लचका तोडत तोंडात गडप केला.. तीच्या चेहऱ्यावरचे तृप्त भाव तिखट मोदक आवडल्याची साक्ष देत होते.. तोंडातला घास संपताच आनंदाच्या भरात एखाद्या नवाबाप्रमाणे आपल्या गळ्यातील दोन पदरी सोन्याची माळ काढून माझ्याकडे भिरकावण्यासाठी वळलेले हात बघून माझ्या मनातले मोदक थुईथुई नाचू लागले.. पण तितक्यात “रस्स्यात मीठ थोडं कमी आहे” म्हणत माशी शिंकावी तशी आयशी शिंकली.. सासूनेही लगेचच गळ्याजवळचा हात मीठाच्या बरणीकडे वळवत कधी नव्हे ते आईच्या ‘हो’ ला ‘हो’ दिला.. म्हणून मीठाकडे खास लक्ष द्यावे.

F95B975C-B46A-4C24-B77C-1CE7B3543036.jpegAC549EBA-9532-4369-8DAA-CD07958797B0.jpeg6E69ACAE-9BF8-4A76-9B45-1AC81E245D61.jpeg37F9DE3B-53F6-49A6-9754-158EC3EDC693.jpeg

सकाळी ॲलेक्सावर अरूण दाते यांच्या आवाजातलं “दिवस तुझे हे फुलायचे“ गाणं ऐकत ऐकत तिखट मोदकाचा घाट घातला.. मग तेव्हाच थोडंसं विडंबन सुचलं आणि दिवसभर तेच विडंबन ऐकवून नवरोबाला छळलं..आता थोडंसं माबोकरांनाही छळायची इच्छा झाली आहे Happy

(चालीत म्हणा)

दिवस आले हे खादाडीचे
तिखट मोदक हादडायचे

कांदा थोडा चिरून घेणे
खोबरं पण किसून ठेवणे
कढईत ह्याला परतायचे
पाट्यावर ठेऊन वाटायचे

बेसण घ्या घट्ट मळून
पारी पण घ्यावी जरा लाटून
अलगद सारण भरायचे
कळ्यांचे मोदक बनवाऽऽयचे

तिखट झणझणीत सार
सोसेना मोदकाचा भार
चमच्याने चाटून बघायचे
झाकण ठेऊन उकळायचे

माझ्या ह्या ताटाच्यापाशी
थांबते मी पण जराशी
फोटो जरा टिपून काढायचे
तिखट मोदक हादडायचे

दिवस आले हे खादाडीचे
तिखट मोदक हादडायचे

————————-
सर्वांना गणेश चतुर्थीच्या मोदका सारख्या झणझणीत आणि रश्श्यासारख्या रसरशीत शुभेच्छा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त दिसतायत मोदक
छान स्टेप बाय स्टेप रेसिपी लिहून टाका म्हणजे आम्ही पण प्रयत्न करू

खतरनाक !
तुमची मोदक बनवायची शैलीही अगदी डिट्टो माझ्यासारखी आहे Happy

वा!

उत्तम पदार्थ.
रेसिपी नको. कारण ते गट्टे का साग विद ट्विस्ट( पाकळ्या) आहे हे लक्षात येतंय.

Superb..... फोटो बघूनच मन भरले. माझ्यासाठी ही अवार्ड विनिंग रेसिपी आहे.

रेसिपी नको. कारण ते गट्टे का साग विद ट्विस्ट( पाकळ्या) आहे हे लक्षात येतंय.....>>>

हाहा... प्रांतोप्रांती गट्टे का साग बनवायची पद्धत बदलते.. राजस्थानात दह्याची ग्रेव्ही करतात, मराठी लोक खोबऱ्याचे वाटण घालतात. Happy

सारण कसले केलेय??

कविता लैच भारी हे सांगायचे राहिले.

तेवढे सारणावर पण एक कडवे येऊ द्या, म्हणजे साठा उत्तराची रेसिपी सुफळ संपूर्ण झाली.

Pages