ओव्हरटाईम- भूत कथा

Submitted by बिथोवन on 17 August, 2020 - 10:43

वन फॉर द रोड असे म्हणून मी तो ओल्ड मंकचा पेग रिचवला आणि ३१ डिसेंबरच्या पार्टीला जमलेल्या सगळ्यांचा निरोप घेऊन पार्किंग मध्ये आलो. पाय जड झाले होते आणि मी गाडी कुठे पार्क केलीय तेही कळत नव्हतं. इथे तिथे शोधल्यावर शेवटी सापडली कार एकदाची. मी दार उघडून आत मध्ये धाडकन् बसलो. स्वतःला सावरायचा प्रयत्न केला. जरा वेळ डोळे मिटले पण चक्कर जास्त झाली. रुमाल भिजवून कपाळाला लावला तेंव्हा जरा बरं वाटलं.

कार सुरू करून हायवेला लागल्यावर काच खाली घेतली आणि थंड वाऱ्याची झुळूक आली तसं एकदम बरं वाटलं. शेजारच्या सीटवर दोन बिअरचे कॅन पडले होते. एक कॅन फोडून बिअर घेऊ असा विचार माझ्या मनात आला तेंव्हा समोर तो हात दाखवत उभा असलेला दिसला. मी लेफ्ट इंडिकेटर दाखवत गाडीचा १२० वेग कमी केला आणि त्याच्या जवळच गाडी उभी केली.

तो दार उघडून बसला देखील. "थॅन्क्स बडी." तो म्हणाला.

मी हसलो. "अरे, एवढ्या अंधारात, इतक्या लांब हायवेवर? गाड्यांच्या हेडलाईटचा त्रास होत नाही..?

"मला उजेड आणि अंधार सारखेच. मला सर्व मनुष्य पारखेच. गेली पन्नास वर्षे इथे मी उभा. न्याहाळत इथल्या माणसांच्या सभा.." तो हसत म्हणाला.

" व्वा! क्या बात है, शीघ्रकवीजी," मी गाडी सुरू करुन रस्त्याला लागत, " इसी बात पे हो जाए दो दो घूंट," म्हणून दोन्ही बिअरचे कॅन उघडून एक त्याच्या समोर धरला.

त्याने बिअरचा कॅन हिसकावला आणि "ओ डिअर, नो बिअर, नो चीअर अँड आय डोन्ट केअर" असं म्हणत कॅन खिडकीतून बाहेर फेकून दिला.

मी आ वासून त्याच्याकडे पाहिले. मला आश्चर्याचा धक्काच बसला. "व्हॉट द फ..." मी बोललो.

"प्रत्येक पाच मधला एक अपघात, ड्रिंक अँड ड्राईव्हनेच होतो घात." तो म्हणाला, "त्यात ड्रिंक करून जेवढे मरतात, त्यापेक्षा जास्त त्यांच्या गाडीखाली येऊन मरतात. ते निर्दोष असतात."

"अरे, तू माणूस आहेस की कोण आहेस," मी संतापाने थरथरत त्याला म्हणालो," एकतर तुला मदत केली तर तू माझे बिअर कॅन फेकून दिलेस आणि वरती भाषण देतो आहेस? मी कोणाला गाडीखाली चिरडलं नाहीये आणि मी मरणार पण नाहीये. बघ ही बिअर कॅन अजून एक." असं म्हणून मी कॅन उघडला आणि तोंडाला लावला.

तो माझ्याकडे बघू लागला. " तुझं काही खरं नाही," स्पीड लिमिट आहे ऐंशी आणि तू एकशेविस वर चालवून करतोयस ऐसी की तैसी."

"मग, काय झालं त्यात?"

"मेलास तर?"

"हाहाहा.. मी मेलो तर तू राहशील काय जिवंत?"

" हाहाहा," माझ्यासारखा तो ही हसला आणि म्हणाला," मी कधी म्हणालो की मी आहे जिवंत?"

मी त्याच्याकडे पाहिले. माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. " तू इथे उतर, मला तू अजिबात नकोयस माझ्या गाडीत," असे म्हणून मी स्टीअरिंग डावीकडे वळवले आणि त्याने ते घट्ट धरून ठेवले. गाडी रस्ता सोडून खाली गडगडत गेली आणि मोठा आवाज करत झाडाला जाऊन धडकली.

मी डोळे उघडले. मी आणि तो हायवे वर उभे होतो. पोलिस होते. माझ्या अंगावर रक्त वगैरे काहीच नव्हते. मला मात्र मी स्टीअरिंग वर पडलेला दिसत होतो. गाडीची काच फुटली होती आणि समोरचे बोनेट झाडात घुसले होते. क्रेन धडधडत होती. एमबुलन्स उभी होती.

"आजपासून तू माझा असिस्टंट," तो म्हणाला, " एकशे वीस वेगात येणाऱ्या गाडीला हात करायचा आणि गाडीत बसायचं. पुढे त्याने काही चौकशी केली की म्हणायचं "मला उजेड आणि अंधार सारखेच. मला सर्व मनुष्य पारखेच. गेली पन्नास वर्षे इथे मी उभा. न्याहाळत इथल्या माणसांच्या सभा.... आणि हो," तो पुढे म्हणाला," ३१ डिसेंबरला ओव्हरटाईम करावा लागतो बरं का..."

Group content visibility: 
Use group defaults

मस्त.

छान आहे कथा.
यमकातले संवाद रस्त्याच्या कडेच्या रोड सेफ्टीची आठवण करून देणार्‍या पाट्यांवरून स्फुरले का? मस्त कल्पना.
अति घाई संकटात नेई.
आवरा वेगाला सावरा जीवाला. Happy

मी त्याच्याकडे पाहिले. माझ्या अंगावर सर्रकन काटा आला.

मला ईथे वाटलं, डरना मना है सिनेमातल्या विवेक ओबेरॉय च्या गोष्टी सारखे, भुताच्या डोळ्याऐवजी फक्त खोबणी दिसते की काय. Lol

जबरदस्त भुतकथा.

छान..

मस्त लिहिलेय...
मलाही डरना मना हैय आठवले... अर्थात दोन्हीत फार फरक आहे. पण संवादतून वातावरण निर्मिती छान

mi_anu...
यमकं यातली
आहेत लिहिली
जाणून बुजून
समजून उमजून
बरेच माबो वाचक
आहेत चारचाकी मालक
त्यांनी घ्यावी खबरदारी
म्हणून ही कथा न्यारी!

धन्यवाद.

इविता, Yes, once ghost, always ghost! Frightening human being is a regular work of a ghost. Rather this is their job profile. Their job time is 00 hour to 3 am. As a PI ( paranormal investigator) I have come across ghosts in the form of even animals! Well thanks for reading.

mrunali.samad, मी तो सिनेमा पाहिला नाही. तुम्ही कोंजुरिंग चे सगळे भाग बघा. हॉरर जॉनर आवडत असेल तर नक्की बघा. पण तुमच्या जबाबदारीवर! रात्री बघू नका. नाहीतर नकाच बघू.

Pages