संवाद म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दोन जणांचं एकमेकांशी चालणारं संभाषण येतं. पण खरं तर आपला सर्वाधिक संवाद हा आपल्या स्वतःशीच सुरू असतो. आपल्या मनात येणारे विचार हाही या संवादाचाच एक भाग झाला. कधी हा संवाद विचारांच्या रूपात असतो, कधी भावनेच्या, पण तो बहुतेक सारा वेळ सुरूच असतो खरा!
काळे ढग आणि बरसणारा पाऊस पाहून कोणाला त्या पावसात चिंब भिजण्याची इच्छा होते, कोणी छत्री शोधू लागतो, कोणी भज्यांची फर्माईश करतो आणि कोणाला कालिदासाचा मेघदूत आठवतो. तोच पाऊस ह्या वेगवेगळ्या गोष्टी कसा साधतो? कारण त्याने वेगवेगळ्या मनांची वेगवेगळी तार छेडलेली असते. मनाच्या तारा जेव्हा सुरांत झंकारल्या जातात तेव्हा सुरेख सुरावट उमटते. पण जेव्हा वरचेवर त्यांचे सूर बिनसतात तेव्हा? आपले विचार आपल्यालाच नकोसे वाटतात तेव्हा? त्यांचा त्रास कधी आपल्याला स्वतःला, कधी इतरांना होतो तेव्हा? "तुला नाही जमणार, तोंडघशी पडशील गेल्या वेळसारखं" असं म्हणून कधी आपलंच मन आपल्याला संधी नाकारतं, तर कधी रागावर ताबा ठेवायचं शेकडो वेळा ठरवूनही आपल्याला कळायच्या आत जळजळीत काटेरी शब्द आपल्या तोंडून निघतात. नाती तोडण्याची आपली इच्छा नसते खरं तर, पण नात्यांमधले पूल अश्या शब्दांनी पार कोलमडतात. कधी निराशेचा काळा अंधार इतका घेरतो की प्रयत्नाचं पाऊल पुढे टाकायला समोर उजेडच दिसत नाही. कधी नोकरी, कधी लग्न, कधी तब्बेत, कधी पूर्ण आयुष्यावर निराशेचे हे काळे ढग येतात. "हे असंच राहणार, काहीच, कधीच नाही बदलणार" असं सतत आत ऐकू येत राहतं. "मला काही झालं तर? माझ्या मुलांचं कसं होईल…." "छे छे असं काही नाही होणार!" "पण झालं तर! माझ्या मित्राच्या भावाचं नाही का अगदी अचानक असं झालं!" असे उलटसुलट विचार जाता जात नाहीत. आणि अजून जवळही न आलेल्या संकटाच्या भीतीने, दुःखाने आधीच हातपाय गळतात. आपल्या अंतर्मनात होणाऱ्या या संवादाचा त्रास तर आपल्याला होत असतो. पण या विसंवादाचा सुसंवाद कसा करायचा?
आपल्याला सार्यांना ही उपजत बुद्धी असते. पण कधी सवयीने, कधी चुकीच्या उदाहरणांमुळे, कधी आयुष्यातील तणावांमुळे त्यावर पुटं चढतात. हे सदर ही पुटं हटवून ह्या आपल्या विसंवादाचा सुसंवाद करण्यासाठी आहे. सध्याच्या काळात कोणाच्या मनात व्हायरसची भीती आहे, कोणाला नोकरी धंद्याची काळजी आहे, काही नाती विस्कटली आहेत आणि कधी सगळं ठीकठाक असूनही आत काहीतरी खुपतंय. माझ्या मानसोपचाराच्या अनुभवांतून आणि अभ्यासातून मी काही साचे (ज्याला आम्ही ट्रीटमेंट प्रोटोकॉल म्हणतो) तयार केले आहेत. मनातील गुंता स्वतःचा स्वतः सोडवायला हे साचे आपल्याला उपयोगी पडतील अशी आशा आहे.
मनाच्या विसंवादामध्ये एक मोठा भाग असतो भीतीचा. असं झालं तर? तसं होईल का? अश्या प्रकारचे विचार मनाला घेरतातं आणि भीतीचा अंमल वाढत जातो. भीती, भय याला आपण सहसा नकारात्मक दृष्टीने पाहतो पण खरं तर काही प्रमाणात भीती ही आवश्यकच आहे. वानराचा नर होण्याच्या उत्क्रांतीमध्ये मानव तग धरू शकला कारण वेगवेगळे आणि मोठे अधिक बलवान प्राणी, नैसर्गिक संकटं यांपासून असलेला धोका मानवाने ओळखला. त्या धोक्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने निरनिराळ्या शकला लढवल्या, योजना आखल्या आणि त्या अंमलात आणल्या. योग्य प्रमाणात असलेल्या भीतीमुळे माणूस सुरक्षिततेसाठी प्रयत्न करतो, पण भीती जर प्रमाणाबाहेर वाढली तर त्याचे दुष्परिणाम जाणवू लागतात. भीतीने ग्रस्त लोकांमध्ये छातीत धडधडणं, घसा कोरडा पडणं, पोटात मळमळणं, उलट्या, जुलाब होणं, वारंवार टॉयलेटला जायची गरज आहे असं वाटणं, डोकं दुखणं, झोप उडणं, सतत अस्वस्थ वाटत राहणं यापैकी एक किंवा अधिक लक्षणं दिसून येतात. यावर उपाय कसा करायचा हे आपल्याला पाहायचं आहे.
वैद्यकीय शिक्षणाचं पहिलं दीड वर्ष, आठवड्यातले बहुतेक दिवस आम्ही शवविच्छेदन करून शरीर आत कसं असतं, शरीराचे सारे व्यापार कसे चालतात ही शिकत असू. कारण उपचार करण्या आधी गोष्टी सामान्यतः कश्या चालतात हे समजून घेणं फार आवश्यक आहे. अगदी हेच मनोविकारांनाही लागू आहे. म्हणूनच या सदरांमध्ये आपण भय, नैराश्य, तणाव इत्यादी विकारांकडे पाहताना आधी ते समजून घेऊन मग उपचार कसा करायचा हे पाहणार आहोत. समस्येला आधी नीट समजून घेणं, त्याविषयीची माहिती मिळवणं ही उपचाराची पहिली पायरीच म्हणता येईल.
अनेक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या भीतीने ग्रासलेल्या असतात. भीतीचे मुख्य प्रकार समजून घेऊया.
• फोबिया (विशिष्ट गोष्टीची किंवा परिस्थितीची भीती)
• Generalised Anxiety Disorder (जी ए डी किंवा प्रत्येक गोष्टीची धास्ती)
• हेल्थ anxiety (आरोग्याबद्दलची, आजारांची भीती)
• सोशल anxiety (समूहामध्ये वावरण्याची भीती)
• पॅनिक डिसऑर्डर (भीतीचा तीव्र झटका)
सर्वपरिचित असणारा भीतीचा प्रकार म्हणजे फोबिया – एखाद्या विशिष्ट वस्तू/ प्राणी किंवा परिस्थितीशी निगडीत असलेलं भय. उदाहरणार्थ पाण्याची, उंचीची, कीटकांची, सापांची, बंदिस्त जागांची वाटणारी तीव्र भीती. सापांचा फोबिया असणारी व्यक्ती माळरानात, गवतात तर चालायला जात नाहीच, पण प्राणी संग्रहालयातील बंदिस्त पेट्यांमधील साप पाहणंही अश्या व्यक्तीला अशक्य असतं.
भीतीचा दुसरा प्रकार म्हणजे जीएडी (GAD) किंवा प्रत्येक गोष्टीची – प्रत्येक गोष्ट विपरीत झाली तर अशी सतत वाटणारी धास्ती. या प्रकारात मोडणाऱ्या बहुतेक व्यक्ती या सदैव काहीना काही कारणाने चिंताग्रस्त असतात. आणि अशी काळजी करणं आवश्यकच आहे असं यातल्या बहुतेकांचं मत असतं. हा मनोविकारांचा एक प्रकार आहे यांची कल्पनाच नसल्यामुळे त्यावर उपाय योजना करणं लांबच राहतं.
सध्याच्या व्हायरस मुळे पुढच्या काही वर्षांत ज्या एका प्रकारच्या भीतीचं प्रमाण वाढणार आहे तो प्रकार म्हणजे हेल्थ anxiety. या रोगाला पूर्वी हायपोकोंड्रिया म्हटलं जात असे. हेल्थ anxiety च्या व्यक्तींना स्वतःच्या आरोग्याविषयी खूपच चिंता वाटत असते. आपल्याला हा रोग तर नाही ना तो रोग तर नाही ना अश्या अवाजवी काळजीने त्यांचं मन सतत ग्रासलेलं असतं.
सर्वत्र भरपूर दिसून येणारा आणि तरीही कमी परिचित असणारा भीतीचा प्रकार आहे सोशल anxiety किंवा समूहामध्ये वावरण्याची भीती. अनोळखी लोकांशी बोलणं अश्या व्यक्तीना नकोसं वाटतं, बरेचदा या व्यक्तीना ओळखीच्या अनेक लोकांशी एकत्र भेटण्याची, बोलण्याची, उठण्या-बसण्याची वेळ आली (उदाहरणार्थ पार्टी / मीटिंग / पिकनिक) की त्यांना त्याचं अतिशय दडपण येतं. मग ते सहसा असे कार्यक्रम टाळतात किंवा कोणाचीतरी सोबत घट्ट पकडून ठेवतात. लाजरा स्वभाव या लेबलखाली दडून गेल्यामुळे कित्येक व्यक्तींच्या या रोगाचं निदानच होत नाही.
भीतीचा थोडा कमी परिचित असणारा प्रकार म्हणजे पॅनिक डिसऑर्डर. या व्यक्तींना भीतीचा तीव्र झटका हा अचानक कधीही येऊ शकतो. या झटक्यांच्या वेळी त्यांना वाटणारी भीती, जसं “मी आत्ताच्या आत्ता मरेन/ माझ्या शरीराचे तुकडे होतील / मला फिट येईल" इतरांना तर्कहीन, बिनबुडाची वाटते पण त्या व्यक्तींसाठी मात्र ती अतिशय तीव्र असते.
भीती किंवा चिंता (Anxiety) या मनोविकाराचे हे काही प्रमुख प्रकार आहेत. एकाच व्यक्तीला एकाहून अधिक प्रकारची भीती असणं किंवा भीती आणि नैराश्य असणं हेसुद्धा बरेचदा दिसून येतं. पुढच्या भागांमध्ये पाहूया की या भीतीशी टप्प्याटप्प्याने मुकाबला कसा करायचा ...
डॉ. माधुरी ठाकूर
https://drmadhurithakur.blogspot.com/2020/08/1.html?m=1
खूप छान विषय आणि माहितीपूर्ण
खूप छान विषय आणि माहितीपूर्ण लेख. पुढील भाग वाचायला नक्कीच आवडेल.
खूप उपयुक्त माहिती दिली आहे
खूप उपयुक्त माहिती दिली आहे लेखात.. लेख आवडला.
खुप छान आणि उपयुक्त माहिती .
खुप छान आणि उपयुक्त माहिती . पुढील भाग वाचायला नक्कीच आवडेल.
उपयुक्त माहिती
उपयुक्त माहिती
छान आहे लेख आणि महत्त्वपूर्ण
छान आहे लेख आणि महत्त्वपूर्ण माहिती.
छान माहिती देत आहात.
छान माहिती देत आहात.
पुढील भागांच्या प्रतिक्षेत....
खुप छान माहीती आता पुढील
खुप छान माहीती आता पुढील भागाच्या प्रतिक्षेत !
माऊमैय्या, रूपाली, सुमित्रा,
माऊमैय्या, रूपाली, सुमित्रा, साद, मृणालि, एस, आसा आपल्या प्रतिक्रियांकरिता आभारी आहे. पुढचा भाग लिहिते आहे. लवकरच पूर्ण झाला की लगेच पोस्ट करेन.
छान सुरुवात आहे. महत्वाचा
छान सुरुवात आहे. महत्वाचा विषय आहे.