ऑपेरा मेट्रिडेट, रे डी पोंटो - मोझार्ट

Submitted by बिथोवन on 6 August, 2020 - 06:00

(बिथोवन आणि मोझार्ट भाग चार आणि भाग पाच यामध्ये ही कथा विभागून लिहिण्यात आलेली आहे. परंतु माबोच्या रसिक वाचकांना ह्या ऑपराची कथा सलग वाचायला मिळावी म्हणून ही पूर्ण कथा एकाच लेखात लिहिली आहे. धन्यवाद)

चौदाव्या वर्षी मोझार्टने लिहिलेला ऑपेरा मेट्रिडेट, रे डी पोंटो. २६ डिसेंबर १७७० ला मिलान कार्निवल मध्ये या ऑपेराचं तीएत्रो रेजिओ ड्युकल इथे उद्घाटन झालं. सोप्रानो, अल्टो आणि टेनर अशा आवाजाचा उपयोग करून मोझार्टने आपली सातवी सिंफनी अशी पेश केली की त्या सिंफनीने इटलीतल्या लोकांना वेड लावलं!.

(अंक पहिला)

ऑपेराची कथा तुर्कस्तान येथील अर्म्फ्यूम राज्याच्या क्रिमिअन बंदरावर घडते. काळ ख्रिस्त पूर्व ६३.  ऑपेरातल्या राजाचं नाव मेट्रिडेट. रोमन सम्राट पॉम्पीचे साम्राज्य उध्वस्त करण्यासाठी तो चालून जातो. युद्धात तो मारला गेला अशी बातमी राज्याचा राज्यपाल अर्बाते, राजाची दोन मुलं, फर्नासे व सिफारे आणि राजाची होणारी बायको अस्पाशिया यांना कळवतो. अर्थातच फर्नासे व  सिफारे पहिल्या बायकोची मुलं असतात आणि अस्पाशीयाच्याच वयाची असतात. प्रचंड पराभवाचा सामना करणाऱ्या मिट्रिडेटला मृत मानले जाते.

पहिल्या अंकात अर्म्फ्यूमचे राज्यपाल अर्बाते, सिफारे यांचे स्वागत करताना दाखवले आहे. सिफारे आपला भाऊ, फर्नासे याच्यावर प्रचंड संतापलेला असतो कारण तो शत्रूंबरोबर, रोमन साम्राज्याला फितूर झालेला असतो. अशा परिस्थितीत अर्बाते सीफारेवर निष्ठा ठेवण्याचे वचन देतो. अस्पाशीयावर फर्नांसे जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून अस्पाशीया सीफारेला फर्नासेपासून संरक्षण करण्याची विनंती करते. तो तिची विनवणी स्वीकारतो आणि तिच्याबद्दलचे त्याचे प्रेम प्रकट करतो.

फर्नासे परत एकदा अस्पासियाला वश करण्यासाठी प्रयत्न करतो पण ती त्याला नकार देते. सिफारे तिला वचन दिल्याप्रमाणे आपल्या भावापासून तिचे रक्षण करतो. त्याच वेळी  मेट्रिडेट जिवंत आहे आणि तो आपल्या राज्यात परत येत आहे अशी बातमी थडकते. राज्यपाल अर्बाते दोघा बंधूंना त्यांचे मतभेद लपवून ठेवण्यास व वडिलांना अभिवादन करण्यास उद्युक्त करतो. दोन्हीं भाऊ अस्पासियाबद्दलच्या भावना लपविण्यास सहमत होतात परंतु त्याच वेळी फर्नासे मेट्रिडेटच्या विरुद्ध रोमन सैनिकी अधिकारी मार्झिओ यांच्या बरोबर कट रचतो.

मेट्रिडेट परत येतो तेंव्हा युद्धातला त्याचा सहयोगी राजा पार्थियाची मुलगी राजकुमारी इस्मीनसोबत निमफॅमच्या किनाऱ्यावर येतो. मेट्रिडेटची इच्छा असते की सहयोगी राजाला वचन दिल्याप्रमाणे फर्नासेने  इस्मीनसोबत लग्न करावे. इस्मीन फर्नासेच्या प्रेमात पडते पण अस्पाशीयाचे प्रकरण तिला कळते  आणि तिला निराशा जाणवू लागते. अर्बाते  मेट्रिडेटला  फर्नासे अस्पाशीयाच्या मागावर आहे असे सांगतो परंतु सीफारेचा उल्लेख करत नाही. मेट्रिडेट संतापतो आणि फर्नासेचा सूड घेण्याची प्रतिज्ञा करतो.

(मध्यांतर)

(अंक दुसरा)

इस्मीन फर्नासेच्या प्रेमात पडते पण अस्पाशीयाचे प्रकरण तिला कळले आहे याचा सुगावा फर्नासेला लागतो आणि हे कुणाला कळता कामा नये अशी तिला तो धमकी देतो. तरीही ती हे प्रकरण मेट्रिडेटला सांगते. तिने सिफारेशी लग्न करावं असे मेट्रिडेट तिला सुचवतो. दरम्यान मेट्रिडेट अस्पाशीया ला आपण लग्न करूया म्हणून लग्नाची तयारी करतो तेंव्हा अस्पाशीया नकार देते. तू माझा विश्वासघात केलास असे  मेट्रिडेट तिला म्हणतो.

अस्पाशीया सिफारेला भेटून मी तुझ्यावर प्रेम करत असून तुझ्याशीच लग्न करणार असल्याचे सांगते पण ती आपल्या वडिलांची वधू आहे हे समजून
सिफारे तिला सोडून निघून जातो. प्रेम आणि कर्तव्याच्या संघर्षामुळे अस्पाशीया अस्वस्थ होते.
 
रोमनांसोबत फर्नासेने आपल्याविरूद्ध कट रचल्याची माहिती मिट्रिडेटला कळते. रोमन अधिकारी मार्झिओ समेट घडवून आणतो आणि राजद्रोह म्हणून फर्नासेला अटक करून फाशीची शिक्षा सुनवतो. इस्मीन त्याची सुटका करायचा प्रयत्न करते तेव्हा तो आपल्या विश्वासघातकीपणाची कबुली देतो पण आपण हे सिफारेच्याच सांगण्यावरून केले असे सांगून त्याला अडकवतो. सिफारेचा ह्या कटात हात नाही असे अस्पाशीया सांगत असतानाच तिच्या तोंडून आपण सिफारेवर प्रेम करत असल्याचे वाक्य बाहेर पडते आणि ते मिट्रीडेट ऐकतो. तो त्या दोघांचा सूड घेण्याची शपथ घेतो. मिट्रीडेटच्या धोक्यांमुळे अस्पाशिया आणि सिफारे एकत्र मरण्याची इच्छा व्यक्त करतात.

इस्मीन, जी अद्याप फर्नासेच्या प्रेमात आहे, मित्रीडेटला अस्पाशीयाला क्षमा करण्यास पटवून देण्याचा प्रयत्न करते. रोमन आक्रमण करतात आणि मित्रीडेट युद्धासाठी निघतो. अस्पाशिया विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. सिफारेही 'मेलो तर युद्धातच मरू' असा विचार करून वडिलां बरोबर युद्धावर जातो.

मार्झिओ फर्नासेला मुक्त करतो आणि नेम्फियमच्या राज्यावर बसवतो. या काळात फर्नासेच्या वागणुकीत बदल घडतो आणि तो मिट्रिडेटच्या बाजूने निर्णय घेतो. युद्धात मिट्रिडेटचा पराभव झाल्यामुळे बंदिवास टाळण्यासाठी तो आत्महत्या करतो. मरण्यापूर्वी तो सिफारे आणि अस्पाशिया यांना आशीर्वाद देतो आणि फर्नासेला क्षमा करतो. फर्नासे इस्मीनशी लग्न करण्यास सहमत होतो. हे चारही लोक रोमपासून जगाला मुक्त करण्याचा संकल्प करतात. सिफारे आणि मेट्रिडेट प्रत्येकी पाच,अस्पाशिया, इस्मीन आणि फर्नासे प्रत्येकी तीन, अर्बाते आणि मार्झिओ प्रत्येकी एक असं मिळून एकूण एकवीस गाणी असलेला हा मेट्रिडेट, रे डी पोंटो ऑपेरा समाप्त होतो.

....

Group content visibility: 
Use group defaults