"अरे या क्रीमला तर वास येतोय शिवाय डबा पण फुगल्यासारखा वाटतोय , एक्सापयरी अजून झाली नाही तरीही, ही उष्णता+आर्द्रता ह्याने असंच होत रहाणार काही महिने......."
खरं तर वरील संवादाला अवतरण चिन्हे द्यायची काहीच गरज नव्हती कारण ते मनात म्हंटलं होतं , पण तुम्ही लक्ष देऊन वाचावं म्हणून केलेली आयडिया का काय आहे .
भाचीला युट्यूबवर स्ट्रीटफुड विडिओ बघून पेढे खावे वाटले मगं काय मला फार कौतुक आहे तिचे ..आणले लगेच क्रीम आणि मिल्क पावडर , मी नेहमी याचीच आधी कढी करून त्याला आटवत ,आटवत, आटवत खवा करते.
ही युक्ती मला निरंजनच्या मराठी (शिकवणाऱ्या) आजी यांनी दिली तेव्हापासून आम्ही कित्येक मथुरेसदृश पेढे, खव्याचे मोदक गट्टम केले तेवढी त्यानी मराठी पुस्तकं सुद्धा वाचली नसतील.
पणं आमचे काळ काम वेग +स्वयंपाक याचे गुणोत्तर काहीही असू शकते. सगळ्या बाबतीत छोटे छोटे व्यवस्थित नियोजन करणारी मी रोजच्या स्वयंपाकाच्या बाबतीत मात्र spontaneous वगैरे आहे. ऊरक फारसा नाही तरी आत्मविश्वास दुर्दम्य आहे.
रिबेल खवय्ये असल्याने क्रीम आणून ठेवल्यावर भाची सकट आम्हाला खमंग, चमचमीत खायचे डोहाळे लागले. घरातला किराणा हा डोहाळ्याच्या विरूद्धार्थी शब्द झालाय सद्ध्या !! ते बिचारे निमूटपणे फ्रीजच्या शेल्फवर वाट बघत होते. मध्ये एकदा मला त्याची दया आली अगदीच नाही असं नाही आणि म्हणून मटर पनीरमध्ये दोन चमचे घातले होते.
शेवटी भाची परत गेली... जाताना गहिवरल्या आवाजात म्हणाले तिला पुढच्या वेळेपासून महिनाभर आधी सांग आणि जमले तर सहा महिने रहायला ये म्हणजे मला सगळे पदार्थ तुला खाऊ घालता येतील. तिनं सारवासारव केली 'एवढे काय.. वजन वाढलयं इथं आल्यापासून वगैरे म्हणून' !! सहा महिने रहाणे अशक्य आहे माहिती आहे पण आमचे गुणोत्तर साधारण तेच भरेल त्याला काय करणार.
कालनिर्णयचे पान वेळीच न उलटल्याने मला राखी पौर्णिमा नक्की कधी आहे हेच माहिती नव्हते , कायप्पा वर शुभेच्छा आल्या भारतातल्या मगं मला क्लिक झाले. तरी मायबोलीवरील 'नारळीभात' ही सुरेख रेसिपी बघूनही मी दूर्लक्ष करून शब्दकोडी खेळत बसले. माझी स्वयंपाकाची शून्य तयारी असताना त्या धाग्यावर करंजीवर मारे चर्चा सुद्धा केली. निगरगट्ट का काय झाले आहे मी !!
भारतातून चार वर्षाच्या भाचीने फोन केला व तिनं मिळालेली खेळपाणीची ओवाळणी दाखवली , तिचा खोटाखोटा पिझ्झा खाल्ला (मला खोटा पिझ्झा विडिओ call मधूनही खाता येतो ) तिने ताई दादा उठले का /तुम्ही ओवाळले का असे सांस्कृतिक प्रश्न विचारले मगं मला वाटले पाणी गळ्यापर्यंत आलं आता. दोन तीन दिवसापूर्वी आणलेली रसमलाई ठेवली असती तर.. पण रात्री दहाला can फोडून आम्ही प्रत्येकी दोन-दोन खाल्ल्याने दोनच उरल्या होत्या.
पौर्णिमा आहे असं कसं काही तरी करावं असं माझ्या मनातली माझी आई म्हणाली. खरीखुरी आई आणि मी दोघीही खोटा पिझ्झा खाण्याच्या गडबडीत असल्याने तिने फोनवर माझ्या 'तयारी' बद्दल विचारले नाही. असंही तिनं माझा नाद सोडलाय बहुतेक !! अधूनमधून मुलं रोडावलीत गं म्हणून सुस्कारे टाकते झालं..मगं मी हिरिरीने मुलांची वजनं / उंची / BMI सांगते ...ती अजून दोन मुलांचे दोन असे सुस्कारे टाकते.
मी चारचौघांसारखी नसल्याने वेळ कमी असताना मला प्रयोग करावा वाटला. किंचीत/ बराच वास असलेले क्रीम उकळायला घेतले मगं त्याला फाडून कलाकंद करावा म्हणून अर्धी वाटी व्हाइट विनेगर घातले . कसचं काय फाटेचना. नासण्याच्या मार्गावर असूनही न फाटण्याच्या या क्रीमच्या हट्टीपणाला काय म्हणावे कळतं नव्हते. नवरा मगं फूड फूडच्या टिप्स द्यायला लागला, त्याला फारच प्रो वाटायला लागलेयं आजकाल.. पण वाद घालायचा नव्हता मला... सगळे लक्ष क्रीमकडे होते. तरी एक वाक्य फेकलेच 'वाया गेले तर गेले, नाही तर काही तरी चांगले होईल, रसगुल्ल्याचा शोध असाच लागला होता म्हणे'....असे म्हणत ढवळत राहिले. मगं आटावे म्हणून अर्धी वाटी मिल्क पावडर घातली. फाटण्याची आशा सोडली होती या स्टेजला फक्त त्याची बदललेली चव + व्हाइट विनेगर याने आंबट तूरट होईल (किंवा सहा चवीपैकी काही तरी) का असं वाटंत होतं...शेवटी तर यात आता साखर घालून सगळं वाया जाण्यापेक्षा नवऱ्याला चव घ्यायला बोलवले बाकी कुणाची हिंमत होणार !! एरवी त्याचे आणि मुलाचे सेन्सेस कसे रिफाईन्ड नाहीत हे मी पटवून देते. पण अशा संकटात तेच धावून येतात , अनरिफाइन्ड सेन्सेस चा मोठाच फायदा आहे हा !!
खाण्याच्या बाबतीत तो माझ्या पहिल्या हाकेला धावून येतो त्याप्रमाणे येऊन त्याने चांगले म्हणाल्यावर तर माझा आश्चर्य वाटून विश्वास बसला नाही. मगं साखर घातली पुन्हा आटवले, थोडे corn starch घातले (तसं हाताबाहेर/ वहावत गेलं होतं प्रकरण) अर्धी लढाई जिंकली होतीच, एकीकडे पोळ्या करत बारीक आच करून ढवळत राहिले. बरेच आटल्यावर ट्रेमध्ये ओतून ठेवले तर त्याची कंसिस्टन्सी काही बरोबर वाटली नाही ट्रे जिकडे हलवला तिकडे जायला लागले... मगं पुन्हा फ्रिजमध्ये , आणि थोड्या वेळाने तर फ्रिझरमध्ये!! बऱ्याच गोष्टी फ्रिजमध्ये ठेवून गुरुत्वाकर्षणावर तात्पुरती मात दिली आहे मी. हा 'तात्पुरता' वेळ गोडघाशांच्या घरी काही सेंकद ते काही मिनिटं असतो !! त्यामुळे सहज मात देता येते. या स्टेजला मला आत्मविश्वास आल्याने बदामाच्या कापांची इनवेस्टमेंट केली.
जेव्हा माझ्या हातात नसलेली कला मला छळते तेव्हा मी आईचं कसं दिसायचं + विज्ञान + common sense यांचा आधार घेते. आता चव चांगली असल्याने माझी वाटीत घालून खायला देण्याची तयारीही होती. खव्याचा शिरा तर शिरा..
पण जमली एकदाची ... स्वतःच्या आळशीपणाच्या आणि प्रयोगाच्या हुक्कीला मी निगूतीने केलेली बर्फी म्हणणार आहे. मलाही घटकाभर 'निगूतीने संसार' करणारी बाई मिरवताना मजा आली. नवऱ्याला माझ्या निगूती- प्रुफपेक्षा खाण्यात इंटरेस्ट होता मगं त्याने हो ला हो (सत्यनारायणाच्या पूजेसाठी हाताला हात लावतात तसे ) लावले. मुलाने खाऊन "छान आहे आई , It tastes like orange पेढा " हा अभिप्राय दिला त्याने ओरेंज पेढा कधीच खाल्ला नाहीये (बहुतेक ) . मुलीला सगळी प्रक्रियाच संशयास्पद वाटल्याने तिने खाल्ली नाही अजून. नवऱ्याला खूप आवडली. मीही कणभर खाल्ली, बरी आहे .
तर ही निगूतीच्या बर्फीची कहाणी सुफळ (शब्दशः) संपूर्ण.
*
*
*
*
Assorted shapes and sizes of निगूती बर्फी !
******
धन्यवाद !
-अस्मिता
मुलीसारखी मलाही ही प्रक्रिया
मुलीसारखी मलाही ही प्रक्रिया संशयास्पद वाटली तर एन्ड प्रोडक्ट फोटोत भारीच यम्मी दिसत आहे.
निगुती नीगुती. बाकी काय असते म्हणे.
धन्यवाद अभ्या !
धन्यवाद अभ्या !
फारच प्रो प्रॉडक्ट दिसतंय
फारच प्रो प्रॉडक्ट दिसतंय
तुमच्या जिद्दीला सलाम.
Mast लिहिलं य.शेवट गोड तर
Mast लिहिलं य.शेवट गोड तर सर्व गोड.
बर्फात गेल्याशिवाय बर्फी बनत
बर्फी छान दिसतेय.
अस्मिता बर्फी भारी.. अगदीच
अस्मिता बर्फी भारी.. अगदीच निगुतीने केलीय..म्हणून दिसतेय हि सुंदर..
मस्त लिहिलंय. तुमचा प्रयोग
मस्त लिहिलंय. तुमचा प्रयोग यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन.
मी मिल्क पावडर आणि दूध वापरून( क्रीम नव्हतं घरात!) पेढे करायचा प्रयत्न केला पण एन्ड प्रॉडक्ट भयानक चिवट झालं आणि गार झाल्यावर तर दगडच. टाकून दिले ते प्रकरण.
रच्याकने ते 'निगुती' असं हवं.
पाकृतलं कळत नाही. पण दिसतेय
पाकृतलं कळत नाही. पण दिसतेय छान
इथे सायो ह्यांची मलई बर्फी
इथे सायो ह्यांची मलई बर्फी पाककृती आहे. छान पेढे पण होतात त्या रेसीपीने.
मस्त दिसते बर्फी
मस्त दिसते बर्फी
@अमा, हो. मलई बर्फी छान आहे
@अमा, हो. मलई बर्फी छान आहे पण त्या रेसिपीत आणि त्या खालच्या प्रतिसादात क्रीम / मिल्कमेड आहे बहुतेक. माझ्याकडे काहीच साहित्य नव्हते. गुगलवर फक्त मिल्कपावडर वापरून करायची पाकृ शोधली पण प्रयोग अयशस्वी झाला.
सलाम तुमच्या चिकाटीला.. छान
सलाम तुमच्या चिकाटीला.. छान दिसतेय बर्फ़ी.
(अवांतर :
'निगुती' शब्द बर्याच काळानी वाचला
तशीच आणखी एक वाक्यरचना असायची..
'टुकीनी' संसार करणे. यात टुकी म्हणजे कोण हे मला कधीच समजले नाही. )
बर्फी अन लेख दोन्ही भारी☺️
बर्फी अन लेख दोन्ही भारी☺️
मनीमाऊ टुकीने संसार करणे
मनीमाऊ टुकीने संसार करणे म्हणजे ..कदाचित.. काटकसरीने.. नेटका .. टापटीप संसार असे असेल..निगुतीने.. टुकीने हे शब्द वैजयंती काळे ह्यांचा पुस्तकात वाचले होते..
फायनल प्रॉडक्ट छान दिसतंय.
फायनल प्रॉडक्ट छान दिसतंय.
पहिल्यांदा काजू मोद्क केले तेव्हा मलाही मिल्क पावडर, फ्रीज, फ्रीजर यांचा आधार घ्यावा लागला होता.
टुक - शिस्त; रीत; तजवीज; व्यवस्था.
निगूत - काळजी; लक्ष; देखरेख;
भरत धन्यवाद..
भरत धन्यवाद..
मागे एकदा रव्याचे लाडू इतके
मागे एकदा रव्याचे लाडू इतके मेजर फसले होते की पुरावा नष्ट करण्यासाठी कढईसकटच सगळं प्रकरण कॅरीबॅगेत ढकलून संपूर्ण विल्हेवाट लावली होती ते आठवलं.
छान दिसतेय बर्फी
छान दिसतेय बर्फी
एन्ड प्रॉडक्ट छान दिसतोय.
एन्ड प्रॉडक्ट छान दिसतोय.
बर्फी छान दिसतेय. नीगुतीला
बर्फी छान दिसतेय. नीगुतीला सांगा
फायनल प्रोडक्ट झक्कास दिसतय.
फायनल प्रोडक्ट झक्कास दिसतय. लिहीलयस पण भारी.
मेधावी तुमचा अनुभव पण भारीच आहे.
आणि सगळीकडे "निगुती " कर ना "नीगुती"चा
दिसतेय हि सुंदर.. छान
दिसतेय हि सुंदर..
छान
फायनल प्रॉडक्ट खरंच छान
फायनल प्रॉडक्ट खरंच छान दिसतंय!
हीरा, प्रतिसाद का बरे संपादित
हीरा, प्रतिसाद का बरे संपादित केला?अर्धी वाटी व्हिनेगर घालून पदार्थ आंबट न झाल्याचे कारण छान दिले होते.आताही तुमच्या प्रतिसादाला धन्यवाद देण्यासाठी धागा उघडला तर प्रतिसाद गायब!
निगुती " कर ना "नीगुती"चाअसेच
निगुती " कर ना "नीगुती"च ...असेच होते आधी पण अभ्या यांनी योग्य शब्द सुचवले असे वाटल्याने सगळे बदलले ...
सगळ्यांना धन्यवाद.
जिद्दीला कसला सलाम अनु ' आली
जिद्दीला कसला सलाम अनु ' आली लहर केला कहर ' प्रकार आहे मी.
धन्यवाद देवकी.
धन्यवाद हीरा...प्रतिसाद पुन्हा लिहा मलाही उत्सुकता आहे आंबट कसे काय नाही झाले याची.
धन्यवाद श्रवु.
धन्यवाद चैत्रगंधा.
धन्यवाद ऋन्मेष.
धन्यवाद अमा. छान आहे ती रेसिपी.
धन्यवाद बोकलत.
धन्यवाद मनिम्याऊ.
धन्यवाद VB.
धन्यवाद भरत.
मेधावी ... नवीन लग्न झाले तेव्हा मी पण बरेच पुरावे नष्ट केले होते . धन्यवाद.
धन्यवाद जाई.
धन्यवाद मानव.
धन्यवाद चिन्नु .
धन्यवाद धनुडी.... तुमचे बरेच प्रतिसाद मीच लिहिले असे वाटतात हे सांगायच होते कधीचं !! बदल केला आहे.
धन्यवाद वावे.
धन्यवाद Doctor कुमार, करंजी
धन्यवाद Doctor कुमार, करंजी चर्चा आठवली असेलच !
कला कंद.
कला कंद.
मस्त दिसतेय बर्फी.
मस्त दिसतेय बर्फी.
धन्यवाद धनुडी.... तुमचे बरेच
धन्यवाद धनुडी.... तुमचे बरेच प्रतिसाद मीच लिहिले असे वाटतात हे सांगायच होते कधीचं !! बदल केला आहे.>>>जत्रेत हरवलेल्या बहिणी? उलट मला माबोवर चे बाकीच्या सगळ्यांचे चटपटीत प्रतिसाद वाचायला आवडतात आणि मला तसं फारसं लिहीता येत नाही, पण आज तु हे असं म्हणून माझी कॉलर टाईट केलीयेस, छान वाटलं.
Pages